डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मी आधी म्हटल्याप्रमाणं नाटक हे काय प्रकरण आहे, त्याची व्याप्ती काय, किती असू शकते, किंबहुना त्याचं अथांगपण समजून घेण्याची ही केवळ सुरुवात तरी असू शकेल का, हा प्रश्न मनात आहेच. शिवाय अद्याप कितीतरी बाबींना स्पर्शही केलेला नाहीये हेही जाणवतं आहे. परंतु यापुढील संवादासाठी काही एक मनोभूमिका तयार होण्याच्या दिशेनं हे एक पाऊल तरी असेल अशी आशा आहे.

'गेले काही दिवस... म्हंजे रंगभूमीविषयक काही बोलायचं, लिहायचं असं मनात आणल्यापासून लई घालमेल चाललीय मनाची. पहिलं म्हंजे गेल्या काही वर्षात डोक्याचं एकदम परफेक्ट गोडाऊन झालेलंय. दुसरं म्हंजे... खूप जणं सैरावैरा पळतायत इकडन-तिकडन, उलटी-पालटी, एकमेकाला हुशा देत, घालत-पाडत असं काहीतरी जाणवतंय... त्यानं डोक्याचा पार गोलघुमट झालेलाय. बरं, हे सगळे मिनतवारीनं आकलून, त्यातलं चांगलं-बरं निवडून त्याकडं बघावं म्हटलं तर 'अभ्यास' नावाचं स्टेशन केव्हाच मार्ग पडलेलं... त्यात आणि हे सैरावैरा पळणं वगैरे जे दिसतंय मनाला, त्याकडे ही रंगभूमी नावाची आदिमाया टक्क डोळ्यांनी बघतीय असंही काहीतरी जाणवतंय... कुठंतरी आतमध्ये खूप काही घडतंय; तरी बरंच काही पडून आहे असंही आणि येतंय मनात. त्यात.... लिहिण्यासाठी, बोलण्यासाठी अमुक एक भाषा ‘आपली' असंही काही मनाशी ठरवता इना झालंय बुवा. तेव्हा आपण आपलं जमल तसं धेडगुजरी सरमिसळ भाषेत बोलत जावावं असा विचार आहे. कारण संवाद घडायचा तर जीभ अथवा पेन उचलायलाच हवं कसंही करून. तर...' एव्हाना आपल्या लक्षात आलंच असेल की सुरुवात गोंधळानंच होणार आहे आणि त्याबाबत सुरुवातीलाच सगळ्यांना सावध करणं माझं कर्तव्य आहे.

आता माझे सोडून देऊ. 'नाटक' या गोष्टीकडे वळू. इथंही गोंधळ आहेच. त्याची कारणंही बरीच आणि वेगवेगळी. काही नेहमीची, माहितीची आणि काही लक्षात न घेतलेली किंवा लक्षात न आलेली पण असलेली. 'रंगभूमी', "नाटक', ’नाट्यानुभव' या शब्दांपासूनच खरं तर गोंधळ सुरू, म्हणजे असं की आपण एखादा सर्वे करायचा म्हटला. आणि वेगवेगळ्या लोकांना, 'नाटक कशाला म्हणायचं?’ 'नाट्यानुभव म्हणजे काय?' असे प्रश्न विचारत गेलो; तर माणसागणिक वेगवेगळी उत्तरं आपल्याकडे गोळा होतील. या उलट, उदाहरणार्थ 'भीमसेन आज अलौकिक गायले' किंवा 'किशोरीताई अप्रतिम गायल्या' असं जेव्हा श्रोते छातीठोकपणे सांगतात तेव्हा त्याबाबत दुमत होण्याची शक्यता जवळजवळ शून्य असते. संगीतातला प्रशिक्षित-जाणकार-प्रतिभाशाली गायक त्याच्या अंतःचक्षूला दिसणारं गानस्वरूप केवळ स्वतःच्या ताकदीवर आविष्कृत करू शकतो. असं का होतं? नाटक या प्रकाराचं मूलभूत असं वेगळंपण काय आहे? 'नाटक' म्हटल्यावर काय काय मनाशी येतं? नाटकाचं एवढ्यावर भागत नाही असं आपण का म्हणतो?...

ते शोधायचं झालं तर अनेकांपैकी एक कारण मला असं दिसतं, की वेगवेगळ्या तंत्रकौशल्यांच्या एकत्र येण्यातून नाटकाला आकार मिळत जातो आणि अनेकांच्या प्रतिभा- आविष्कारातून ते सजीव होत जातं. दुसरं असे की, नाटक आपल्या प्रत्यक्ष जगण्याला अनेक अंगांनी, अनेक तऱ्हांनी भिडलेलं असतं. अवघं जगणंच असंख्य प्रकारांनी ते आपल्यापुढे मांडत असतं. कुठल्याही कला वा ज्ञानशाखेचे स्वतःचं एक शास्त्र असतं, गृहीतकं असतात. एक स्वायत्त संवेदनाविश्व असतं; तसं ते नाटकाचंही असतंच. पण असं असले तरी मानवी जगणं सतत, अव्याहतपणे बदलत असतं, बदलती रूपं घेऊन पुढे जात असतं. या बदलांच्या नाना परी समजून घेत त्यांना आविष्कृत करणं हे एक गुंतागुंतीचं आव्हान असतं आणि ते पेलण्याचा प्रयत्न नाटक करते असं मला वाटतं.

नाटक (आणि सिनेमाही) लिहिणं-करणं-पाहणं इतर कुठल्याही आविष्कारापासून खूप वेगळं असतं. याचे आणखी एक कारण मला वाटतं असंही आहे की ते जगण्याला त्याच्या सर्व बेफाटपणासह कवेत घेऊ पहातं. त्यात व्यक्तिगत प्रतिभेचा आविष्कार जितका महत्त्वाचा असतो तेवढीच जगण्याची प्रत किती जोरकसपणे, किती ताकदीने सामोरी येते, पेश होते हेही महत्त्वाचं ठरतं. किंबहुना तेच त्याच्या निर्मितीतलं मर्मस्थान असतं. या अंगानं विचार करत गेलं की अनुभवाचं - अनुभव घेण्याच्या क्षमतेचं महत्त्व लक्षात येतं. अनुभव संवेदन क्षमतेनं घेणं, वेगवेगळे अनुभव एकमेकांशी जोडत जाणं, सांधत जाणं आणि हे करत असताना घटितांच्या कार्यकारणभावाची संगती लावत जाणं... या सगळ्यांत निर्मितीची बीजं सुप्तपणे बसत असतात.

अनुभव-निरीक्षण- बुद्धी-भावना-चिंतन यांच्या धाग्यांमधून एक समजूत निर्माण होते. यांच्या अलग-सलग बाण्यातून निर्मितीचा वावर होऊ लागला की काहीतरी हलू डोलू लागतं, हे सगळं 'अमूर्त' असलं तरी ते ‘असतंच'. गंमत म्हणजे जे मूर्त रूप आपण पहात असतो तेच आपल्याला या अमूर्ताकडे खेचत नेतं. एकंदर निर्मितिप्रक्रियेचा विचार करताना काय काय मनाशी येतं? कुठकुठले आणि कुणाचे प्रभाव आहेत मनावर? धारणा कसकशा बनत गेल्या आहेत? हे शोधत, उजळणी करत गेलं, तर त्यातून काहीतरी मिळेल असं वाटतं. शिवाय नाटक म्हटल्यावर जी दाटी-रेटारेटी-झुंबड उडते मनात तिचीही काही एक मांडणी होऊ शकेल. अर्थात निर्मितिप्रक्रियेची सगळीच कोडी उलगडत जाणं जवळपास अशक्य वाटलं तरी नाटक - एक चांगलं नाटक निर्माण होताना अवधानानं किंवा अनवधानानंही खूप काही खर्ची पडत असतं हे मात्र लक्षात घ्यायला हवं.

एकंदरीने नाटक - चांगलं नाटक जगण्याकडे प्रगल्भतेनं बघायला लावतं - लावू शकतं, असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. पण चांगल्या नाटकामागे - नाटकासाठी जी गुंतागुंतीची, सूक्ष्म प्रक्रिया अव्याहतपणे घडत असते ती त्या नाटककाराचं अवघं अस्तित्व व्यापून टाकणारी असते, ताब्यात घेणारी असते. त्यासाठी त्याला बरंच काही मोजाव लागतं. अंतर्यामीचे झगडे तेवत ठेवावे लागतात.... आता झगडे तेवत ठेवावे लागतात म्हणजे काय? नाटकाचे तंत्र- तालीम-सराव-अंगभूत कौशल्य यांवर नाही का उभा राहू शकत नाट्यानुभव?... याचं उत्तर सोपं नाही. कारण ते 'हो' आणि 'नाही' दोन्ही असू शकेल. म्हणजे असं की, ज्याला आपण 'अंगभूत' असं म्हणतो, त्याचा आवाका मोठा असू शकतो. तसा लहानही असू शकतो. त्यानुसार नाट्यानुभवही 'लहान' अथवा 'मोठा' होऊ शकतो. पण या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. मुळात, खरं तर कबीर म्हणतो त्याप्रमाणे 'साहिब मिले सबुरीमें' हे नाटकाच्या बाबतीतही (अर्थातच) खरं आहे आणि झगड़े तेवत ठेवण्याचा संबंध याच्याशी आहे - नाट्यतत्त्वाचा आवाका समजून घेण्याशी आहे.

ही गुंतागुंत आपण समजून घेतली किंवा त्यावर नुसती नजर टाकली तरी मंग आसपास जे घडतंय त्याचा बरे- वाईटपणा निदान मोघमपणे लक्षात येत जातो. व्यवसाय म्हणून नाटकव्यवहाराकडे बघणाऱ्या बहुतांशजणांना कसदार नाटकाची जोखीम अंगावर घेणं जमण्यासारखं नसतं आणि त्यांचा तसा इरादाही नसतो. मग त्या मानानं सोप्या सोप्या युक्त्या योजून चार विरंगुळ्याचे असे वेगवेगळ्या चवीढवींचे पदार्थ बनवून नाटकाचं फराळाचं ताट सजवलं जातं.

स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी व्यावसायिक नाटक आकार घेऊ लागलं, संगीत नाटकाच्या मुख्य प्रवाहाला पुढे आणि वेगवेगळे प्रवाह मिळत जाऊन 'आज'च्या कालखंडापर्यंत मराठी नाटक पोचलंय. या सगळ्या प्रवासावर दुरून नजर टाकली तरी दोन तट प्रामुख्यानं दिसतात. काही अधलंमधलंही दिसतं पण बहुतांश तथाकथित नाटयव्यवहार 'मनोरंजन' व त्यातून (अर्थातच) अर्थार्जन यासाठी पडताना दिसतो. नाटकानं मनोरंजन करावं ही अपेक्षा काही गैर आहे असं नव्हे. आणि मनाचे रंजन झालं नाही तर मन त्यात 'गुंतून' कसं राहील हेही खरंच, पण खरा प्रश्न यापुढेच निर्माण होतो असं मला वाटतं.

आमचं मनोरंजन 'कशानं’ होतं? केवळ मनोरंजनानं मनाच्या भुका शमतात का? मनाला काहीतरी 'नवं' उमगल्यानं त्याच्या दृष्टिकोनात काही फरक पडतो का? आणि त्या 'नवं' उमगण्याच्या प्रोसेसमध्ये मनाचं 'रंजन' होतं/नाही अथवा कसं? शिवाय 'नव' उमगण्याच्या प्रोसेसमध्ये रंजनाबरोबरच उन्नयन- उद्दीपन वगैरेची काही शक्यता? या व अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील. व्यावसायिक रंगभूमीवर नव्वद टक्के नाटकांतून जे कलेचं किंवा वास्तवाचं दर्शन घडतं. त्याला एक समाज म्हणून आपण कुठे बसवतो? मुळात एकूणच एक समाज म्हणून कला व संस्कृतीकडे पहाण्याचा आपला काही अभ्यासपूर्ण दृष्टिकोन विकसित झाला आहे काय? ज्या गोष्टींना आपण डोक्यावर घेऊन नाचतो, त्यात आपल्याला काय गुणवत्ता दिसलेली असते? या व या अनुषंगानं येणाऱ्या प्रश्नांचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. 

दोन-तीन गोष्टींचा विचार प्रामुख्यानं करायचा आहे. एक तर 'वरलीया रंगा'तच घोटाळत असलेलं आजचं बहुतांश मराठी व्यावसायिक नाटक. दुसरीकडं वेगवेगळ्या पातळ्यांवर उभी रहात असलेली प्रायोगिक नाटकाची चळवळ आणि या दोन्हींसमोर सध्याच्या सामाजिक परिस्थितीनं उभी केलेली आव्हानं. या दोन्ही वाटांवर पडलेलं आजच्या सामाजिक वास्तवाचं सावट नजरेआड करून त्यांच्या हालचालींकडे आपल्याला बघता येणार नाही. प्रत्येक समाज हा नेहमीच संक्रमणावस्थांमधून जात असतो हे खरं असलं तरी आजचं संक्रमण अमानवीय गतीनं चाललेलं आपल्याला दिसतं आहे; जाणवतं आहे. याचा परिणाम सर्व प्रकारच्या कला- अभिव्यक्तीवर होणं अपरिहार्य आहे. या परिणामांना सध्याची रंगभूमी कसं तोंड देते आहे हे पाहणं व यातूनच काही अभिजात कुठे नजरेस पडतं आहे का याचा शोध घेत जाणं अशाप्रकारे एकूण आपल्याला पुढे जायचं आहे.

मी आधी म्हटल्याप्रमाणं नाटक हे काय प्रकरण आहे. त्याची व्याप्ती काय, किती असू शकते. किंबहुना त्याचं अथांगपण समजून घेण्याची ही केवळ सुरुवात तरी असू शकेल का, हा प्रश्न मनात आहेच. शिवाय अद्याप कितीतरी बाबींना स्पर्शही केलेला नाहीये हेही जाणवतं आहे. परंतु यापुढील संवादासाठी काही एक मनोभूमिका तयार होण्याच्या दिशेनं हे एक पाऊल तरी असेल अशी आशा आहे.

नाटकाचा खेळ जिथे मांडला जातो त्या जागेला आणि एकूण नाट्यव्यवहाराला आपण रंगभूमी असं म्हणतो यातील 'भूमी' या शब्दाची योजना विशेष नोंद घेण्याजोगी आहे, असं मला वाटतं. भूमी सर्वदूर असते, सलगपणे पसरलेली. तिला टू-थ्री बीएचकेच्या सुबक टाऊनशिपमध्ये बांधून घालता येत नाही, एवढं लक्षात घेतलं तरी बरी सुरुवात झाली असं म्हणता येईल.

Tags: नवनिर्मिती रंगभूमी नाट्यानुभव नाटक rangbhumi theatre artist theatre weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

ज्योती सुभाष

मराठी अभिनेत्री आणि रंगकर्मी
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके