डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

'टाळकरी, भजनकरी यांना नाही म्हटलं तरी दहा हजार रुपये राखून ठेवावे लागतील. गडावरच्या महाराजाला कपडे, प्रवासभत्ता आणि बिदागी एक तोळ्याची अंगठी मिळून वीस हजार रुपये पाहिजेतच. शेवटच्या पंक्तीला वीस पोती साखर गाळावी लागेल. आणि पालखीच्या मिरवणुकीचा खर्च वेगळा.

भांडण-तंटा हाणामारी माणुसकीचे मारेकरी

सर्व पेपरात जाहिराती झळकल्या.

'महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान' राज्यभर सुरू झाले. 

गावात दवंडी झाली. गावसभा भरली.

'याच दिवशी सभा का घेता?' 

'याच टाइमाला का घेता?'

'मोकळ्या दिवशी- फावल्या टाइमाला सभा घ्यावी ना? गलका झाला.

कशीबशी सभा सुरू झाली.

कोणाच्या अध्यक्षतेखाली सभा घ्यायची, यात अर्धा तास गेला. 

अध्यक्ष तंबाखू चोळीत कोपऱ्यात बसला. तलाठी परिपत्रक वाचू लागला. त्याला दम लागला. मग ग्रामसेवक वाचू लागला. लोक कंटाळले. निम्मे पांगले. परिपत्रक वाचून झाले.

'कमिटीचा अध्यक्ष फुलटाईमर करा.

गावातील क्लबचा सूत्रधारच तेवढा फुलटाईमर आहे. करा ना त्याला अध्यक्ष.

'आचार संहिता आडवी येते तर तेवढी त्याला सूट द्या.

सदस्य कोणालाही घ्या. अध्यक्ष याला करा.

'याला करा, त्याला नको म्हणता म्हणता हाणामारीची भाषा सुरू झाली. भांडण जुंपण्याची तयारी होऊ लागली. 

'आमच्या भावकीतला'....'आमच्या भागातला'.... 'आमच्या नात्यातला अध्यक्ष झाला पाहिजे'

साळसूद बघे हळूहळू निघून गेले. राहिलेले शेलके लोक गंभीर चर्चा करू लागले.

गडावरच्या बाबाचा नामसप्ताहाचा नारळ गावाने घेतलाय. त्याची वर्गणी झाली पाहिजे. 

'एकरामागे दोनशे रुपये घ्यावेत की औतामागे (बैलजोडीमागे) दोनशे रुपये घ्यायचे' यावर खेळीमेळीत चर्चा सुरू झाली.

'कोण वर्गणी देत नाही ते बघून घेऊ' यावर एकमत झाले. 

ग्रामपंचायतीकडे वीजबील थकलेय- 'सरकार आपसूक माफ करील, नाहीतर बीज बंद करील.'

'नाहीतरी गावात राहतोय कोण? गाव तसा पुरा पांगलाय.

'आपापल्या वस्त्यावर आकडे टाकून वीज सगळेच घेतात, त्यामुळे तसा काही प्रश्न नाही.

टेंभीकडील पांदी चिखलाने भरलीय. रस्ता नाही. 

सरकार तरी काय करणार? दोन्ही-तिन्ही ठेकेदार हरामी निघाले. 

शाळेची इमारत मोडकळीस आलीय. 

'शिक्षणखाते पाहून घेईल.

गावात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. 'नाही तरी कोणी बिनपाण्याचं रहातंय का? 

गावावर पतसंस्थेची-सोसायटीची बँकेची कर्ज वाढलीत. ज्यांनी घेतलीत त्यांचे ते पाहून घेतील. 

अतिक्रमणे वाढलीत. 'कोणी कोणाशी वाईटपणा घ्यावा? 

गावातील भांडणतंट्याचं काय?

'ज्याला आग आहे तो जिरवून घेतो. भांडण पेटवायला हे लोक पोलिसाला पैसे देतात, वकिलाला पैसे देतात, कोर्टात पैसे घालतात. आपण फुकटातच त्यांचे भांडणतंटे मिटवायचे काय? कोणी कोणाच्या उचापती करायच्या?

'आपण आपल्या नामसप्ताहाचं बघू. पैसे, शिल्लक राहिले तर आणखीन एखादं मंदिर बांधू.'

शेवटी, गावाची शान वाढली पाहिजे.'

'कीर्तनकाराला एक शाल, एक श्रीफळ, एक हार आणि एक हजार रुपये द्यावे लागतील. प्रवचनकाराला एक हार, एक श्रीफळ आणि पाचशे रुपये द्यावे लागतील.

'टाळकरी, भजनकरी यांना नाही म्हटलं तरी दहा हजार रुपये राखून ठेवावे लागतील. गडावरच्या महाराजाला कपडे, प्रवासभत्ता आणि बिदागी एक तोळ्याची अंगठी मिळून वीस हजार रुपये पाहिजेतच. शेवटच्या पंक्तीला वीस पोती साखर गाळावी लागेल. आणि पालखीच्या मिरवणुकीचा खर्च वेगळा.

दसरा येतोय्, हंगामा असा झाला पाहिजे की पहिलवान, छबीनावाले, तमाशाबाले यांनी गावाचे नाव घेतलं पाहिजे.' 

देवाधर्माच्या कामात नाही कोणी म्हणायचं नाही. नाही कोण म्हणतोय, त्याचा बेत केल्याशिवाय राहायचा नाही.' 

राहिलेल्या लोकांचं एकमत झालं. सभा शांततेत पार पडली. तलाठी, ग्रामसेवक यांनी बाजारच्या दिवशीच सह्या गोळा केल्या होत्या. 

सावकाश प्रोसेडिंग तयार होईल.  भांडणतंटा हाणामारी  माणुसकीचे मारेकरी ..

Tags: का. वा. शिरसाठ माणुसकीचे मारेकरी गावसभा 'महात्मा गांधी तंटामुक्त भांडण-तंटा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके