डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

भावनिक सुज्ञता, भावनांक आणि मुलांच्या आत्महत्या

प्रत्येक बाळाचे आई-वडील बाळाच्या जन्मपूर्व काळात कितीही शिकलेले, अनुभवी,ज्ञानी व थोर असले तरी,बाळाला जन्म देणे ही त्यांची पहिलीच खेप असल्याने, तसेच प्रत्येक बाळ हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असल्याने, त्या बाळाचा जन्म होतो तेव्हाच त्या बाळाच्या आई-वडिलांचा जन्म होतो. सबब बाळ व त्याचे आई-वडील यांचे वय एकच असते. बाळाचा भावनांक उपजत जास्त असतो तर आई-वडिलांना त्यांच्या वयाचा फायदा व्यवहारांमधला कार्यकारणसंबंध कळण्यासाठी होतो. तरीही पालक व त्यांचे  बाळ एकमेकांशी व्यवहार करण्यासंबंधात अपरिपक्वच असतात. इतर आई-वडिलांचा त्यांची त्यांची मुलं वाढविण्याचा मिळालेला अनुभव फारफार तर मार्गदर्शक ठरू शकेल, प्रत्यक्ष मार्ग किंवा घालून दिलेला धडा नव्हे. तसेच दुसऱ्या खेपेच्या बाळासंबंधीही तीच गोष्ट लागू होते. दुसरे बाळ हेही पुन्हा एक वेगळेच व्यक्तिमत्त्व असल्याने त्या बाळाचा जन्म आणि त्या बाळाच्या आई-वडिलांचा जन्म  एकाच वेळी होतो. सबबपहिल्या बाळाच्या संगोपनाचा अनुभव जसाच्या तसा दुसऱ्या बाळाच्या संगोपनात उपयोगी ठरत नाही.

भावना- निसर्गामधे स्वत:चा टिकाव धरून ठेवून सभोवतालच्या अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक प्राणिमात्रास ग्रहणशक्ती आणि प्रतिकारशक्तीचे वरदान मिळालेले आहे. मनुष्येतर प्राण्यांना सामर्थ्यवान स्नायू, मजबूत दात, तीक्ष्ण ज्ञानेंद्रिये, अणकुचीदार नखे, पंख, चापल्य, शीघ्रगती, परिस्थितीनुरूप रंग पालट करणे यांसारखी अनेक बचावतंत्रे मिळाली आहेत. मानवाला याच कारणासाठी, म्हणजे समोर असेल त्या परिस्थितीत तग धरून रहाण्यासाठी बुद्धिचातुर्य आणि भावनिक सुज्ञता याचे वरदान मिळाले आहे.

मानवाच्या उत्क्रांतीमधला पहिला टप्पा म्हणजे समाजाभिमुखता. आपण संघटन करून एकत्र राहिलो तर योग्य ते नियोजन करून शत्रूवर किंवा आपत्कालीन परिस्थितीवर यात करू  शकतो, हे तंत्र त्याला सर्वात प्रथम अवगत झाले. त्यासाठी त्याला भीती ही भावना उपयोगाची ठरली. भीतिपोटी मदतीसाठी एकमेकांचा आधार घेतल्यामुळे त्याला भीतिमुक्त रहाता आले. इतर भावनांचा त्याला संघटित रहाण्यासाठी उपयोग झाला. कालौघात त्याला आपण संघटन करून एकत्र राहिलो तर ‘विवेक-बुद्धि' आणि ‘भावनांचे सुज्ञ सादरीकरण' (इंटेलिजन्स आणि इमोशनल इंटेलिजन्स) यांच्या आधारे कोणतीही प्रतिकूल परिस्थिती आपण नियंत्रणाखाली आणू शकतो, याची योग्य ती जाणीव झालेली आहे. बुद्धी आणि भावनांच्या आधारे सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करून त्यापासून काहीतरी शिकून आवश्यक ती बचाव-तंत्रे विकसित करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. सभोवतालच्या परीस्थितीमधे टिकून रहाण्यासाठी प्रत्येकाला भीती, आश्चर्य, आनंद, दु:ख, राग आणि तटस्थता अशा किमान सहा भावनांची गरज असते.

भावनिक सुज्ञता आणि भावनांक - एकत्र आणि संघटितपणे रहाण्याच्या दृष्टीने सर्व भावना मनामधे जशा उचंबळतील तशाच व्यक्त न करता, बुद्धीच्या आधारे त्यांना त्या त्या परिस्थितीनुरूप योग्य ठरतील त्याप्रमाणे सादर करण्याची क्षमता म्हणजे भावनिक सुज्ञता. सदर भावनिक सुज्ञता योजण्याचे परिमाण म्हणजे भावनांक. सध्याच्या संयुक्त औद्योगिक आणि व्यावसायिक जगतात काम करणाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्याच्या दृष्टीने भावनिक सुज्ञता आणि उत्तम भावनांक कसा मदत करतो तसेच भावनांक वाढविण्याच्या दृष्टीने काम काम करता येईल हा विचार विस्ताराने प्रथम डॅनिमल गोल्डमन माने मांडला. आता तर सर्वच क्षेत्रांत या  संकल्पनेची लोकप्रियता वाढली आहे. शून्य ते अठरा या वमोगटातील मुलांच्या बाबतीत त्यांच्यामधील गुन्हेगारी आणि आत्महत्या करण्याची प्रवृत्ती कमी करण्याच्या दृष्टीने भावनिक सुज्ञता आणि भावनांक या संकल्पनेचा विचार कसा करता येईल, ते या लेखाद्वारे मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

भावनिक सुज्ञता या उपजत आणि अंतस्थ क्षमतेच्या आधारे सर्वसाधारणपणे कोणत्याही बालकावर एखाद्या नवख्या परीस्थितीला तोंड देण्याची वेळ आली, तर योग्य ती भावना व्यक्त करता येते. उदा. अनोळखी व्यक्ती, कधी न पाहिलेली चमत्कारिक वस्तू, भयकारक प्रसंग,एकटेपणा, मोठा आवाज, विपरीत दृश्य इ. गोष्टी त्याच्या समोर आल्या तर त्यांची जाणीव होऊन त्या बाबींबद्दल उत्सुकता वाटण्या ऐवजी प्रथम त्याच्या मनात नैसर्गिक भीती उत्पन्न होते.अशी भीती त्याच्या मनात उत्पन्न झाल्यानंतर नेमके काय केले म्हणजे आपण यातून बाहेर पडू,याचा विचार करण्याची त्याला गरज निर्माण होते. ओरडणे, लांब पळणे, कुवतीनुसार प्रतिकार करणे, अशा कृती करून ते बालक आपल्या भावना इतरांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करते.

स्वत:च्या बाबतीतील तसेच इतरांच्या बाबतीतील अशा प्रकारच्या भावनाही त्याला ओळखू येतात व प्रसंगानुरूप त्याच्या लक्षात रहातात. भावनांच्या सादरीकरणातले बारकावे त्याला कळतात.आपल्या व इतरांच्या भावनांच्या सादरीकरणाद्वारे भाव-भावनांमधील तरल फरक आळखण्याची क्षमताही त्याला प्राप्त होत जाते. उदा. आश्चर्य आणि भीती, आनंद आणि प्रेम, दु:ख आणि भीती, राग आणि भीती इत्यादी. जीवनात पुढे नेमके कसे वागावे,याचे धडे त्याला आपोआप मिळत जातात आणि याच प्रकारे त्याच्यामधील भावनिक सुज्ञता वृद्धिंगत होते. हे बालक समर्थपणेस्व त:च्या भावनांचे नेटके संयोजन करण्यास शिकते. जन्म ते त्यानंतर 6-7 महिने, इतक्या वयाच्या सर्वसाधारण बालकांच्या वागणुकीवरून आपल्याला ते कळू शकते. थोडक्यात जन्मत: आणि नंतर काही महिने बालकांचा भावनांक उच्च प्रतीचा असतो असे म्हणावयास काही हरकत नाही.

हे मूल जसजसे मोठे होत जाते, तसतसे अंतस्थ भावनिक सुज्ञता आणि भावनांच्या सादरीकरणाचे प्रत्यक्ष बहिस्थ अनुभव,यामधे त्याला विरोधाभास जाणवू लागतो. मुले मोठी होत असताना जास्तीत जास्त आईच्या संपर्कात असतात. आई जे काही करेल किंवा जशी काही वागेल, त्याकडे त्याचे बारकाईने लक्ष असते. मुलांची दुसऱ्याचे निरीक्षण आणि अनुकरण करण्याची क्षमता तीव्र असते. फक्त आईचेच नव्हे, तर ज्यांच्या संपर्कात ती जास्त वेळ रहातात त्यांच्या वागण्याचा मुलांवर सखोल परिणाम होत असतो. त्याची स्वत:ची भावनिक सुज्ञता आणि आई व इतरेजनांच्या भावनांचे सादरीकरण यामधे त्याला दिवसेंदिवस बरीच तफावत आढळते. या दोन्हींमधला फरक समजून घेण्यासाठी त्याला कार्यकारण संबंध (कॉज-इफेट रिलेशनशिप) कळणे जरुरीचे आहे,पण लहान मुलांना तो समजलेला नसतो. त्यामुळे त्याच्या मनात भावनांच्या सादरीकरणाबाबत गोंधळ उडून जातो.

परिणामत: त्याचा भावनांक कमी होतो. उदा. मुले आईइतकेच वडिलांवरही प्रेम करीत असतात. तसेच शाळेत जाऊ लागल्यानंतर वर्गशिक्षिकांवरही तितकेच प्रेम करीत असतात. यामुलांना जेव्हा आई किंवा घरातील इतर कोणीही धाक दाखविण्याच्या निमित्ताने- ‘‘बघ हं, हे असं केलं नाहीस तर तुझं नाव सांगेन बाबांना/गुरुजींना/बार्इंना म्हणजे अश्शी शिक्षा करतील ते (मार, ओरडणे, रागावणे वगैरे).''दिवसभरानंतर बाहेर असलेले बाबा आता भेटणार किंवा एका दिवसाच्या मध्यंतरानंतर वर्गशिक्षक भेटणार याचा आनंद व्यक्तकरावा, की थोड्या वेळाने नेमकी कोणती शिक्षा मिळणार याची भीती बाळगावी, याबाबत त्याचा गोंधळ उडतो. कारण बाबा किंवा शिक्षक त्याच्यावर प्रेम करीत असले तरी एखादे कर्तव्य पार पाडणे हे त्याच्या हिताचे असून ते तसे पार न पाडल्यास ही मंडळी त्याला प्रेमापोटीच रागवतील किंवा त्याला शिक्षा करतील, असा कार्यकारणसंबंध त्याला जोडता येत नाही. असे अनेकदा घडतच रहाते. परिणामी त्याचा भावनांक कमी होतो.

भावनांक कमी असेल तर मुलांच्या वागण्यातील सुसूत्रता कमी होते. निर्णय घेण्याच्या त्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. ‘कसं वागायचं ते कळतंच नाही', अशा प्रकारच्या संभ्रमावस्थेत तो  अडकून बसतो. वरती नमूद केलेला हा एक अगदी छोट्यात छोटाअसा प्रसंग आहे. बऱ्याच मुलांच्या दैनंदिन व्यवहारात असे शेकडो प्रसंग दररोज घडत रहातात. त्यातही पुन्हा एका प्रसंगाची सांगड त्याला तशाच प्रकारच्या दुसऱ्या प्रसंगाशी घालता येत नाही आीण हा भावनिक गुंता वाढतच रहातो. जिथे त्याला भीती वाटावयास हवी,तिथे त्याला आश्चर्यापोटी उत्सुकता वाटून अवाजवी धाडस करावेसे वाटते.

एखाद्या गोष्टीवर, विशेषत: अपयशावर तटस्थपणे विचार करून मार्ग काढण्याऐवजी, त्या गोष्टीची त्याला अकारण भीती वाटत रहाते. त्यामुळे वस्तुस्थिती दडवण्याकडे किंवा खोटे बोलण्याकडे त्याचा कल रहातो. आपण अमुक-तमुक सांगितल्यानंतर आई-वडील नेमक्या कोणत्या भावना व्यक्त करतील याबद्दलचा त्याचा अंदाज चुकतो व त्याचीही त्याला भीती वाटत रहाते. त्याच्या हातून नको असलेल्या चुका घडल्यानंतर आई-वडील रागावतील असे वाटत असताना ते कधी गप्पच बसतात, तर कधी त्याकडे बघायला त्यांना वेळ नसतो, किंवा कधीतरी त्याची नेमकी कोणती चूक झाली आहे याबद्दलच्या अज्ञानामुळे त्याचे कौतुकच केले जाते. अशा वेळी त्याला स्वत:बद्दल वृथा अभिमान वाटू लागतो. कोणत्याही मुलाचे असे हे वागणे म्हणजे त्याचा भावनांक कमी झाल्याचे लक्षण आहे हे विसरता कामा नये.

घरामध्ये किंवा किमानपक्षी घराजवळ कमी-जास्त वयाच्या(भावंडे, आई-वडील, आजी-आजोबा, काका, मामा, मावशी)व्यक्ती उपलब्ध असल्या तर हा गोंधळ व्यक्त करण्यासाठी मुलांना कोणता ना कोणता तरी आधार मिळतो. याउलट एकुलते एक मूल,नोकरी-व्यवसायात बुडून गेलेले पालक, अशा परिस्थितीत मुलांचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता वाढीला लागते. सध्याच्या परिस्थितीत मुलांकडून आत्महत्यांसह इतरही जे अनेक गुन्हे घडताहेत त्यामागे इतर अनेक कारणांपैकी भावनांक कमी होणे हेही एक महत्वाचे कारण असू शकते.

पालकनीती

‘सध्याच्या स्पर्धेच्या युगात'; ‘सध्याच्या धकाधकीच्या युगात';आपल्या बाळाचा टिकाव लागला पाहिजे. त्यासाठी त्याला विविध प्रकारची कला-कौशल्ये शिकणं गरजेचं आहे. या गोष्टी शिकण्यासाठी मी वाट्टेल तितका पैसा खर्च करायला तयार आहे. दहावी-अकरावी-बारावी ही वर्षं तर पुढच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असल्याने अभ्यास व अभ्यासेतर गोष्टी शिकायला वय वर्षे तीन ते बारा-तेरा इतकाच कालावधी उपलब्ध आहे. हे आहेत आजच्या मध्यम, उच्च-मध्यम वर्गातल्या प्रातिधिनिक पालकांचे विचार. त्यांच्या डोळ्यांसमोरचे आदर्श म्हणजे खोऱ्याने पैसे ओढणारा श्रीमंतवर्ग. आणि खरोखरच या  उपलब्ध दहा वर्षांत बरेचसे पालक अहमहमिकेने आपल्या पाल्याला अभ्यासाचे जादा शिकवणी वर्ग आणि त्याबरोबर गायन, चित्रकला, वेस्टर्न डान्स, पोहणे, कराटे, मैदानी खेळ, बुद्धिबळ इ. आणि इतरही काही गोष्टी शिकावयास भाग पाडतात. त्या त्या मुलाचा कल पाहून यापैकी एखादा खेळ किंवा कला शिकणे हे ठीक आहे, परंतु मुलाला काम हवे काय नको हे न पाहता वरीलपैकी एकापेक्षा जास्त गोष्टी शिकण्याची त्याच्यावर जबरदस्ती करणे म्हणजे त्याच्या भावनांकावर हल्ला करण्यासारखे आहे. विशेषत:सध्याच्या ‘सा रे ग म प' किंवा ‘एकापेक्षा एक' यासारखे टी.व्ही.रिॲलिटी शो डोळ्यांसमोर ठेवून मुलांना काही शिकावयास भाग पाडणे किंवा या गोष्टींबद्दल त्यांच्या मनात अवास्तव आकर्षण निर्माण करणे,हे ही तितकेसे बरोबर नाही. या  स्पर्धांमधल्या यशापयशाचा आणि त्यांच्या उत्तर आयुष्यातल्या यशापयशाचा नेमका कार्यकारण संबंध काय आहे, हे त्यांना समजत नाही.

कोणताही पालक आपल्या पाल्याचे वाईट चिंतणार नाही.आपली मुले आनंदी रहावीत, त्यांना आयुष्यात सर्व प्रकारची सुख-साधने मिळावीत ही इच्छा धरण्यात काहीही चुकीचे नाही. चूक आहे तो त्यांच्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन. स्पर्धा, धावपळ, धकाधकी ही आपल्या डोक्यात आहेत. आपल्या वाढलेल्या वयाच्या अनुभवातून ती निर्माण झाली आहेत. आपल्या मनातल्या अवास्तव महत्वाकांक्षा मुलांवर लादल्यामुळे त्यांच्या मनावर सतत जे दडपण रहाते किंवा त्यांना जो अस्वस्थपणा येतो, त्यामधून आपली मुले आनंदी रहाण्याऐवजी विविध प्रकारच्या विकृती, गुन्हेगारी, व आत्महत्या यासारख्या वाममार्गाकडे वळण्याची शक्यता वाढते.

यावरती मार्गदर्शक ठरतील असे अनेक विचार बऱ्याच मानसशास्त्रतज्ज्ञांनी विशद केले आहेत. त्यापैकी आपल्याला दैनंदिन व्यवहारात अंमलात आणता येतील अशा दोन तज्ज्ञांचे  विचार आपण पाहू.

1.संयुक्त औद्यागिक आणि व्यावसायिक जगतात क्रिस आर्गिरिस याने व्यक्तिमत्त्वाचा विकास याबद्दल बोलताना ‘अपरिपक्वतेकडून परिपक्वतेकडे' (इम्‌मॅच्युरिटी टू मॅच्युरिटी) अशी एक संकल्पना मांडली आहे. कोणत्याही वयात कोणतीही नवीन गोष्ट शिकताना आपण अपरिपक्व असतो. व जसजसे ती विशिष्ट गोष्ट आपण शिकत जातो,तसतशी त्या बाबतची परिपक्वता आपल्याला येत जाते. हा काळ कामगार आणि व्यवस्थापन यांच्या दृष्टीने महत्वाचा असतो. याच तत्वाने आपण पालक व पाल्य या संबंधांचा विचार करूया. प्रत्येक बाळाचे आई-वडील बाळाच्या जन्मपूर्व काळात कितीही शिकलेले, अनुभवी,ज्ञानी व थोर असले तरी,बाळाला जन्म देणे ही त्यांची पहिलीच खेप असल्याने, तसेच प्रत्येक बाळ हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असल्याने, त्या बाळाचा जन्म होतो तेव्हाच त्या बाळाच्या आई-वडिलांचा जन्म होतो. सबब बाळ व त्याचे आई-वडील यांचे वय एकच असते.

बाळाचा भावनांक उपजत जास्त असतो तर आई-वडिलांना त्यांच्या वयाचा फायदा व्यवहारांमधला कार्यकारणसंबंध कळण्यासाठी होतो. तरीही पालक व त्यांचे  बाळ एकमेकांशी व्यवहार करण्यासंबंधात अपरिपक्वच असतात. इतर आई-वडिलांचा त्यांची त्यांची मुलं वाढविण्याचा मिळालेला अनुभव फारफार तर मार्गदर्शक ठरू शकेल, प्रत्यक्ष मार्ग किंवा घालून दिलेला धडा नव्हे. तसेच दुसऱ्या खेपेच्या बाळासंबंधीही तीच गोष्ट लागू होते. दुसरे बाळ हेही पुन्हा एक वेगळेच व्यक्तिमत्त्व असल्याने त्या बाळाचा जन्म आणि त्या बाळाच्या आई-वडिलांचा जन्म  एकाच वेळी होतो. सबबपहिल्या बाळाच्या संगोपनाचा अनुभव जसाच्या तसा दुसऱ्या बाळाच्या संगोपनात उपयोगी ठरत नाही. थोडक्यात, आपल्या प्रत्येक बाळाला नेमके काय हवे ते त्या त्या पालकांना त्या त्या बाळाबरोबर शिकायला हवे.आपल्या मनात जे काही आहे ते त्या बाळावर लादून बाळाचा योग्य तो विकास होणार नाही.

पालकांच्या भावना ओळखण्याइतपत भावनिक सुज्ञता बाळाकडे असते. पालकांनाही बाळाच्या भावना ओळखता येणे जरुरीचे आहे. आपल्या मुलांच्या भावना वाचणे, त्या समजून घेणे,त्याप्रमाणे आणि बाळाच्या कुवतीनुसार हळूहळू भावना आणि व्यवहार यांचा कार्यकारण संबंध काय असतो हे त्याला समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यानंतर मुलांना सभोवतालचे जग, त्यातली स्पर्धा, स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी शिकावी लागणारी कौशल्ये,जगण्यासाठी करावी लागणारी धकाधकी यांचा अर्थ कळू लागेल व अशा परिस्थितीत तग धरून स्वत:चा विकास करून घेण्याची आस त्याच्या मनात निर्माण होईल. कोणतेही दडपण न घेता साधारण अठराव्या वयापर्यंत आपला पाल्य पूर्ण व्यक्ती म्हणून समर्थ झाली,तर कोणत्याही गुन्हेगारीकडे त्याचा कल रहाणार नाही, तसेच त्याचा भावनांकही उन्नत राहील.

2.याच संदर्भात अब्राहम मॅस्लो या मानसशास्त्रज्ञाचे मत विचारात घेणे योग्य ठरेल. अब्राहम मॅस्लो याच्या म्हणण्याप्रमाणे अंत:प्रेरणा (मोटिव्हेशन) आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. प्रत्येक व्यक्ती एका बाजूला एकाच वेळी स्वत:च्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त/अंत:प्रेरित होत असते, पण दुसऱ्या बाजूला यागरजा कोणत्या क्रमाने पूर्ण करावयाच्या आहेत त्याचा चढता क्रम त्याच्या मनात तयार असतो.तो कालपरत्वे बदलू शकतो. पूर्ण नाहीसा होत नाही. मॅस्लो पुढे म्हणतो की या चढणीवरची प्रथम क्रमांकाची गरज पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या क्रमांकाची गरज पूर्ण करण्यात त्याच्या स्वयंप्रेरणेच्या प्रक्रियेला अडथळा उत्पन्न होतो.

त्याच्या म्हणण्याप्रमाणे पाच पायऱ्यांची ही चढण आहे. प्राथयिक गरजा, सुरक्षितता, प्रेम आणि नातेसंबंध, आत्मसन्मान,आणि आत्मविकास असा गरजांचा सर्वसाधारण चढता क्रम त्याने विस्तारित केला आहे. व्यक्तीगणिक यागरजांचा क्रम वेगवेगळा असू शकतो. अब्राहम मॅस्लो आणि गुन्हेगारी जगतावर लिहिणारा जगद्‌विख्यात कॉलिन विल्सन यांच्या एका संभाषणाचा कॉलिन विल्सनच्या ‘ऑर्डर ऑफ ॲसासिनस' यापुस्तकात समावेश आहे. दोघांच्या संभाषणातून निघालेला एक निष्कर्ष असा आहे, की प्रत्येकजण आपापल्या गरजा त्यांच्या मनात असलेल्या चढत्या क्रमानुसार पूर्ण करण्यासाठी सतत झटत असतो. त्याची अंत:प्रेरणा त्याला गरजांच्या वरच्या टप्प्यांवर नेण्यासाठी धडपडत असते. अशावेळी कोणत्याही, विशेषत: प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाची गरज पूर्ण झाली नाही तर वरच्या टप्प्यांवरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या अंत:प्रेरणेच्या प्रक्रियेत अडथळा उत्पन्न होतो. बऱ्याचदा हा अडथळा निवारण न करता आल्यामुळे किंवा वरती जाण्याचा मार्गच खुंटल्याच्या जाणिवेपोटी मानसिक संतुलन बिघडून ही व्यक्ती पुन:खालच्या टप्प्यांवरच्या गरजेकडे वळते. पण हे असे खाली वळणे त्या व्यक्तीमधे विकृती उत्पन्न करते. अशी व्यक्ती दुसऱ्यांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशेने दुसऱ्या व्यक्तींचा आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न करते. इतरांना किंवा स्वत:ला शारीरिक इजा करणे, धाक-दपटशा दाखवून दुसऱ्यांच्या मौल्यवान चीज-वस्तू हिरावून घेणे,वेगवगेळ्या शकला लढवून कोणालाही गंडवणे, खून-मारामाऱ्या करण्यात रोमांच अनुभवणे आणि अशी व्यक्ती फारच संवेदनाशील असेल तर स्वत:चे जीवन संपविण्यास उद्युक्त होते.

महत्त्वाकांक्षी पालकांनी या विचारांचा मागोवा घेणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तविक सर्वच पालकांनी आपल्या मुलांच्या नेमक्या गरजा काय आहेत त्या समजून घेणे जरुरीचे आहे. त्यांच्या अंतरंगात  जाऊन, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधून हे जमू शकेल. आपल्यामुलांनाही आपल्याशी कधीही संवाद साधता येईल याबाबत खात्री वाटली पाहिजे. आपण ठरवलेल्या मुलांच्या गरजा आणि मुलांच्या प्रत्यक्ष गरजा यामधे किती तफावत आहे, याचा अंदाज पालकांनी सतत घ्यायला हवा. मुलांना प्राधान्य वाटणारी त्यांची गरज समजा अवास्तव असली, तर आपणच त्याला त्यातली वास्तवता त्याच्या भाषेत समजावून नाही सांगितली, तर त्यालाही ते कधी कळणार नाही. आणि या परिस्थितीत त्याची ही अवास्तव गरज पूर्ण करण्याच्या नादात त्याच्या हातून कोणतीही लहान मोठी चूक घडू शकेल. सहाजिकच ती गोष्ट त्याला आपल्यापासून लपवावी असे वाटू शकेल. मुलांनी कोणतीही आणि कितीही मोठी चूककेली असेल किंवा आपण त्याच्याबाबत काही चुका केल्या आहेत असे त्याला वाटत असेल, तर त्यावेळीही त्याला आपल्याशी संवाद साधावासा वाटला पाहिजे, म्हणजेच पालकांबद्दल त्याला कधीही संवाद साधण्यास आस्त वाटले पाहिजे.

3.डॅनिमल गोल्डमन माने त्याच्या ‘इमोशनल इंटेलिजन्स' या संयुक्त औद्योगिक जगतासाठी लिहिलेल्या पुस्तकात भावनिक सुज्ञता उन्नत करण्याच्या दृष्टीने किंवा भावनांक वाढविण्याच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्त्वे विस्ताराने मांडली आहेत. आपल्यालाही पालक-पाल्य संबंधात त्याचा मोठा उपयोग होऊ शकेल अशी मला खात्री वाटते. त्यांचा उपयोग आधी आपण पालकांनी स्वत:साठी करावयास हवा. आपली मुले आपल्याकडून आपोआपच शिकत जातात.

अ) आत्म-संयमन - बऱ्याचदा आपण परिस्थितीनुसार किंवा काही विशिष्ट कारणाने इतरांशी वागताना जाणून-बुजून,प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किंवा कळत-नकळत काही फरक करीत असतो.आपली मुले त्याच वेळी आपल्या आसपास असतील तर त्यांना हा फरक जाणवतो. खरे तर आपल्या वागण्यात सुसूत्रता हवी. पण  कधीकधी हे शक्य होत नाही. आपण हा फरक का करतो हे आपणमुलांना कधी ना कधी त्याचा कार्य-कारण संबंध उलगडून देऊन समजावून सांगणे जरुरीचे आहे. मुलांना काही कळत नाही किंवा हे समजून घेण्याची त्यांची क्षमता नाही, हे आपले गृहीत तत्त्व सोडूनदिले पाहिजे. मुलांना सर्व काही समजते. तसे नसेल तर मग आपल्या वागण्यातून शंभर नंबरी प्रामाणिकपणा तरी दिसून आला पाहिजे.

ब) आत्म-भान - स्वत:बद्दलच्या वस्तुनिष्ठ किंवा यथार्थ कल्पना बाळगणे म्हणजे आत्म-भान. आपल्या वागण्यातून,कृतीतून, आचार-विचारांतून, आपण स्वीकारलेल्या रहाणीमानातूनही वस्तुनिष्ठता व्यक्त होणे जरुरीचे आहे. आपण बऱ्याचदा मुलांपासून आपली गरिबी, आपले अज्ञान, आपली असमर्थता, आपले दुर्गुण,आपल्या चुका, आपले अपमान अशासारख्या आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी लपवून ठेवायचा प्रयत्न करतो. अशा गोष्टी त्यांना मुद्दामहून त्यांचे लक्ष वेधून सांगणे जरुरीचे नाही, पण तितकेच प्रयत्नपूर्वक लपवून ठेवणेही गरजेचे आणि योग्य नाही. कारण आपण जरी या गोष्टी त्यांच्यापासून लपवून ठेवल्या तरी त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून त्या सुटलेल्या नसतात.

क) अंत:प्रेरणा - सतत काही ना काही उद्दिष्ट मनात ठेवून स्वत:ला कार्यमग्न ठेवण्याची उर्मी म्हणजे अंत:प्रेरणा. आपण आपल्या आणि आपल्या मुलांच्या दैनंदिन गरजा, नजीकच्या काळात पूर्ण कराव्या लागतील अशा गरजा, तसेच आपले जीवनसुखी होण्याच्या दृष्टीने भविष्यकाळात उद्‌भवणाऱ्या गरजा नेमक्या काय आहेत हे जाणून घेऊन त्या दृष्टीने कार्यशील राहिलो, तर आपल्या अंत:प्रेरणेची पातळी निरोगी रहाण्यास मदत होते.

ड) सहअनुभूती - दुसऱ्या व्यक्तीशी कोणताही संवाद किंवा व्यवहार करताना सतत आपण आपल्याला त्या त्या व्यक्तीच्या ठिकाणी ठेवून ती व्यक्ती त्या विशिष्ट प्रसंगात कशी वागेल याचा विचार करून वागण्याचा प्रयत्न म्हणजे सहअनुभूती. आपण या वृत्तीला फार फार महत्त्व दिले पाहिजे. दुसऱ्यांना काय वाटेल याचा विचार करण्याने मुलांकडून होणारे कित्येक गुन्हे टळू शकतील. सहअनुभूती उच्च पातळीची असेल तर सहसा कोणीही छोटे वा मोठे गुन्हे करण्यास प्रवृत्त होणार नाहीत.

ई) सामाजिक भान - संघटन करून रहाणे हा मनुष्यप्राण्याचा मूळ धर्म आहे. समाज आणि संघटन ही सर्व मानवी व्यवहारांची प्राथमिक गरज आहे. इतरांबरोबर वागताना बऱ्याच तडजोडी कराव्या लागतात. समाजात कोणतेही व्यवहार करताना इतरांच्या मतांचा,व्यक्तिमत्त्वाचा, अस्तित्वाचा अनादर होणार नाही याची काळजी आपल्याला सतत घ्यावी लागते.

हे सर्व कसे साध्य होईल यासाठी आपण आपल्या मुलांबरोबर  काही सोप्या सोप्या गोष्टी करू शकतो. वर नमूद केलेल्या प्रत्येकतत्त्वाला धरून आपल्या मोकळ्या वेळेत काल्पनिक असे छोटे-मोठे प्रसंग घेऊन त्या त्या प्रसंगात आपण कसे वागू याचा एकत्र सराव करीत राहिलो, तर आपला भावनांक उन्नत राहील. अर्थात आपल्या मुलांचाही भावनांक उच्च राहील.

Tags: कल्पना भागवत भावनांक क्रिस आर्गिरिस इमोशनल इंटेलिजन्स डॅनिमल गोल्डमन अब्राहम मॅस्लो emotional quotient khris aargiris danial goldmal abraham maslo theory tendancy suicide kalpana bhagwat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके