डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

इंदूमती जोंधळे यांचे 'बिनपटाची चौकट'

आत्मकथनाचे काही भाग वाचून झाले की ते, मी मुलांना सांगायचे. त्यातून मुलांनाही अनाथपणाचा अनुभव समजला. तेही अशा कुणाला मदत करतात तेव्हा त्यांना माहीत असतं की, आई रागावणार नाही. त्यांच्या वर्गातल्या मुलांना कशाची गरज वाटली तर ती आनंदानं करतात. एक मैत्रीण- जी जुने कपडे गोळा करते. ती व्यवस्थित धुऊन, घड्या घालून पिशवीत ठेवते. त्या मापाचं कुणी गरीब आढळलं तर ती देते. न मागता मिळालेल्या कपड्यांनी नटलेली लेकरं आनंदी होतात. मलाही अशी मदत करायला आवडतं.  

‘बिनपटाची चौकट’ हे इंदुमती जोंधळे यांचं आत्मकथन. नऊ-दहा वर्षांपूर्वी माझ्या हाती लागलं, तेव्हा झपाटल्यागत वाचून काढलं होतं. पुस्तकदिनाच्या निमित्ताने, आपल्यावर प्रभाव पाडणाऱ्या पुस्तकाविषयी लिहायचा विचार करत असताना हे आत्मकथन पुन्हा ठळकपणे आठवलं. मी अनेकांना हे आत्मकथन वाचायला दिलं होतं, सुचवलं होतं. त्यांनाही ते वाचनीय वाटलं होतं. कुणी तरी कौतुक केलं म्हणून एखादं पुस्तक चांगलं असतंच असं नाही, तर ते आपोआप वाचकाच्या मनाचा ठाव घेणारं असावं लागतं. साधारणतः आत्मकथनामध्ये लेखकाला त्याच्या वैयक्तिक आयुष्याची जडणघडण, चढ-उतार, ताणेबाणे, धग याबरोबरच भवताल, सामाजिक परिस्थिती उलगडता आली पाहिजे. लेखकाचा समकाल त्यातून दिसला पाहिजे, अशी अपेक्षा असते. तसंच ते लेखन प्रांजळ, निर्मळ, प्रामाणिक हवं. स्वतःचा उदो-उदो, मीपणाचा सोस, माझंच खरं- असा मोह टाळलेलं आत्मकथन अधिक प्रभावी वाटतं. ‘बिनपटाची चौकट’ हे मला असं नितळ, पारदर्शी आत्मकथन वाटतं.

एका मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबात सुरक्षित वातावरणात वाढलेल्या मला या आत्मकथनातील अनाथपणाने हादरे दिले. ‘पट नसलेलं घर’ या पहिल्या प्रकरणात लेखिका तिला आठवणारं, तिचं असलेलं अंधुकसं घर दाखवते. आई-वडिलांचा संसार दाखवते. शिक्षणाची आवड असलेल्या वडिलांनी शाळा काढलेली असते. मात्र शाळा आर्थिक अडचणी सोडवू शकत नाही. आर्थिक चणचण माणसाचं डोकं चिनभिन करते. ते किराणा सामानाचं दुकान काढतात. मात्र दुकानात येणाऱ्या गिऱ्हाइकांशी बोलण्यावरून वडील आईवर संशय घेतात आणि जात्याचा मोठा खुंटा उपसून आईच्या पाठीवर, डोक्यात घालतात. ती जात्याच्या पाळ्यावर आपटते. रक्ताच्या थारोळ्यात पडते. आईला असं बघून लेकरंबाळं टाहो फोडतात. गाव गोळा होतं. चार-पाच दिवसांनी आई मृत्यू पावते. वडील पोलीस कोठडीत जातात. चार लेकरं उघडी पडतात आणि इथून लेकराबाळांची फरपट चालू होते. वडिलांच्या संतापाचा एक क्षण कुटुंबाची वाताहत करतो.

ते वाचताना सतत पाणावणारे डोळे पुसत पुढं-पुढं सरकावं. लेकरांचं उद्‌ध्वस्त झालेलं जग बघावं. त्यातून उभं राहणं अनुभवावं. कधी स्वतःला त्यांच्या जागी उभं करावं. लेखिका सांगतेय आणि आपण ऐकतोय- यात आपण फार मोठी गोष्ट सांगतोय, असा बडेजाव नाही. सोसलेल्याचा आव नाही. कधी मायेची दारं बंद होतात, तर कधी नव्या माणसांची माया मिळते, आधार मिळतो. कुणाला आईच्या जागी, कुणाला वडिलांच्या जागी पाहणारी अनाथ लेकरं ही. काहींची खोटी सहानुभूतीही मिळते. परिस्थितीने कोवळ्या वयात लेकरांना अकाली प्रौढत्व आलेलं. नाइलाजाचं आयुष्य पेलणं, सावरणं. कितीही वाटलं तरी परिस्थितीपासून पळून जाणं नाही, तर समजून-उमजून स्वीकारलेलं अनाथपण आहे हे. दिवस हे असे, काही असं- काही तसं, समज-गैरसमज, अनुभवातून शहाणं होणं- असं बरंच काही ओघात येतं.

या आत्मकथनात सांगण्याचा संयत सूर आहे. जे घडलं ते लेखिका सांगते. त्यातून तिचं वय, परिस्थितीनं आलेली समज दिसते. ताटातुटीनंतर आतेभावाकडं आधारानं राहत असलेल्या लेकरांचे हाल होतात. घरातली मोठी माणसं शेतात राबतात आणि घरी या लेकरांकडून कामं करून घेतली जातात. लेखिका चार भावंडांत मोठी. मोठी तरी किती? साताठ वर्षांची. या वयात ती सहा महिन्यांच्या धाकट्या बहिणीची- मुन्नीची आई होते. नदीवर मुन्नीची बाळुती धुणारी ही पोर डोळ्यांपुढून हलत नाही. सहा महिन्यांचं लेकरू काय खाईल? भाकरीचे वाळलेले कोरडे तुकडे? मुन्नीला दूध मिळावं म्हणून लेखिका धनगरांच्या शेळ्या- मेंढ्यांचं दूध चोरून काढून मुन्नीला पाजत असते. थेंब-थेंब दुधावर ती कशी जगणार? शेवटी एक दिवस पाळण्यात मुन्नी मरून पडलेली असते, तर तेव्हाही घरातली मोठी माणसं संवेदनाशून्य वागतात. मेलेल्या मुन्नीला शेवटचं मांडीवर घेतलेली इंदू, दोन्ही बाजूला बसलेले दोन छोटे भाऊ- अशी अनेक चित्रं मनात रुतून बसतात. जेव्हा ते आतेभावाच्या घरून निघतात, तेव्हा उकिरड्यात जिथं मुन्नीला पुरलेलं असतं तिकडे बघतात. आज मुन्नी असती तर ते चौघं जण असते, असा चटका बसल्याशिवाय राहत नाही.

पुढे शिशुसदन, रिमांड होममध्ये त्यांची ताटातूट होते. ज्या वयात आई-वडिलांच्या प्रेमळ छायेखाली लेकरांनी खाऊन-पिऊन आनंदी राहावं, खेळावं, बागडावं, उड्या माराव्यात, लुटूपुटीचं भांडावं; त्या वयात या लेकरांना जे भोगावं लागतं ते वाचताना मन हेलावून जातं. पण मन हेलावून जातं म्हणून हे आत्मकथन प्रभावी आहे, असं मी म्हणत नाही! तर ते वाचल्यापासून माझ्यात, माझ्या मुलांमध्ये इतरांविषयी दया-माया, कळवळा वाढला. जाणीव निर्माण झाली. अगोदर ती अजिबात नव्हती असं नाही. पण त्यानंतर कुणीही गोरगरीब दिसलं की त्यांच्यासाठी काही करता येतंय का, यांचा विचार सतत मनात येऊ लागला. शेतात कुणी लेकुरवाळी कामाला आली तर तिची पात मागं राहील म्हणून ती लेकराकडं लक्ष देत नाही. बांधावर एखाद्या झाडाला बांधलेल्या झोळीत लेकरू झोपवून ती काम करते. हे बघून आपण तिची पात उरकू लागावी, ‘जा, घे लेकराला’ म्हणावं. रांगतं लेकरू असेल तर सांभाळावं. येता-जाता लेकराला खायला- प्यायला द्यावं. नादवावं. कपडेलत्ते द्यावेत. ऊस तोडायला आलेल्या लोकांना कधी खायला दे, कधी काही सामान दे, असं करावं. उपवास आहे म्हणून कुणी न खाता-पिता काम करत असेल तर त्याला काही ना काही खायला घालावं. आपल्याला जे-जे करता येईल ते करण्यासाठी धडपडावं.

आत्मकथनाचे काही भाग वाचून झाले की ते, मी मुलांना सांगायचे. त्यातून मुलांनाही अनाथपणाचा अनुभव समजला. तेही अशा कुणाला मदत करतात तेव्हा त्यांना माहीत असतं की, आई रागावणार नाही. त्यांच्या वर्गातल्या मुलांना कशाची गरज वाटली तर ती आनंदानं करतात. एक मैत्रीण- जी जुने कपडे गोळा करते. ती व्यवस्थित धुऊन, घड्या घालून पिशवीत ठेवते. त्या मापाचं कुणी गरीब आढळलं तर ती देते. न मागता मिळालेल्या कपड्यांनी नटलेली लेकरं आनंदी होतात. मलाही अशी मदत करायला आवडतं. एकदा थंडीच्या दिवसांत स्लॅब टाकायला आलेल्या बायका पोरांना साड्या, स्वेटर, चहापाणी दिले. थंडी आहे म्हणून आपल्याला बाहेर पडू दिले जात नाही, त्यात ही मुलं आई-वडिलांमागं सिमेंट-खडी-वाळूत कुडकुडताहेत; ते बघून माझ्या मुलांनी त्यांच्यातील लहानग्यांना स्वतःचे कपडे, स्वेटर, कानटोप्या गोळा करून दिल्या होत्या. त्यांना खायला घरातलं काही बाही देत होते.

मध्यंतरी माझा चुलत भाऊ ऐन चोविसाव्या वर्षी  वारला. कधीही विसरता न येणारं दुःख... किती मोठ्ठं संकट! पहिल्या वर्षी दर महिन्याला पुण्यात ‘आपलं घर’ या अनाथ संस्थेत काका-काकू मुलांना जेवायला द्यायचे. मी त्यांच्याबरोबर गेले होते, तेव्हा एका लहान मुलाच्या ताटात पोळीवर दूध देताना तो ‘बास’ म्हणत नव्हता. पटकन उचलून पिऊन ‘अजून दे’ म्हणायचा. आपापलं ताट-वाटी घेऊन ओळीनं जेवायला बसलेली, आपापलं सामान जपून ठेवणारी इवली अनाथ लेकरं बघून गलबलून आलं होतं. तेव्हा ‘बिनपटाची चौकट’मधील ही तिन्ही भावंडं आणि दुधाच्या थेंबासाठी तरसणारी मुन्नी परत आठवत होती.

सणासुदीला घरोघरी उत्साहाचं वातावरण असताना अनाथालयातील मुलांना कसं वाटत असेल? बरोबरची मुलं सुट्टी लागली की, आपापल्या घरी जातात. ज्यांना घर नाही, त्यांनी कुठं जायचं? लेखिकेचे अनुभव वाचून वाईट वाटते. एका दिवाळीत इंदूने खाण्यासाठी अनारसे चोरले खरे, पण ते खाण्याचं धाडस मात्र झालं नाही. कुणी पाहिलं तर, चोरीचा आळ आला तर... म्हणून मन भित्रं झालेलं. शेवटी पेटीतल्या अनारशांवर बुरशी आली आणि ते फेकून द्यावे लागले. घरी सहजपणे मिळणाऱ्या साध्या-साध्या गोष्टींसाठी ही मनाची तडफड दिसते. दुःखाचे अनेक प्रसंग येऊनही इंदू त्यातून धडे घेत पुढे जाते. ‘इतकं दुःख, दुःखात बुडून गेले आणि हे पाहा- अशात कसं उभं राहू मी?’ असा प्रश्न नाही विचारत ती. मार्ग काढते. मुळूमुळू रडत बसत नाही. कणखर होते. वसतिगृहाला घर मानून राहणाऱ्या अनाथांच्या वेदना जवळून बघत असताना ‘उद्याचं काय?’ हा प्रश्न असतो तिच्यापुढे.

औरंगाबादमध्ये असताना त्या वेळचे विरोधी पक्षनेते रा. सु. गवई वसतिगृहाला भेट द्यायला आलेले होते. तेव्हा धीटपणे उभं राहून इंदू विचारते, ‘अठरा वर्षांनंतर मी कुठे जाऊ? कुठे राहू? काय करू? अठरा वर्षांनंतर आम्हा अनाथांना वाऱ्यावर का सोडलं जातं?’ यातून तिच्यापुरता मार्ग निघतो. पदवीपर्यंच्या शिक्षणाचा प्रश्न सुटतो. पण बाकीच्यांचं काय, हा विचार तिच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. परिस्थितीने खंबीर झालेली इंदू शिक्षणासाठी धडपडते. स्वतःच्या पायावर उभी राहते. इंदूचा प्रवास वाचक म्हणून आपल्यालाही बळ देतो. जाणिवांना खतपाणी घालतो.

पुढे घडोघडी येणारे माणसांचे अनुभव लेखिका सांगते आणि आपण गुंतून जातो. मायेसाठी आसुसलेली ही अनाथ लेकरं, शिशुसदन, छात्रालय, शाळा, महाविद्यालय इंदूच्या नजरेतून आपण पाहतो. वाढत्या वयात इंदूला अण्णासाहेब सहस्रबुद्धे, गजाननराव गायकवाड, दादा धर्माधिकारी, एसेम अण्णा, मामा क्षीरसागर, श्यामराव पटवर्धन, शांताबाई पितळे यांच्यासारख्या सहृदय व्यक्तींनी लावलेला पितृवत्‌- मातृवत्‌ जीव आपल्याला जगातल्या चांगुलपणावर विश्वास ठेवायला लावतो. त्या-त्या वेळी भेटलेल्या योग्य माणसांनी आयुष्याचा रस्ता ओलांडण्याचं सामर्थ्य लेखिकेला दिलं, याची कृतज्ञतापूर्वक जाणीव वेळोवेळी होते.

आपल्यामुळे कुटुंब उद्‌ध्वस्त झालं, लेकरांची आबाळ होत असल्याची टोचरी जाणीव असलेले वडील ‘माझ्या मुलांच्या शिक्षणाची सोय करावी’, असं तुरुंगातून पत्र पाठवून विनवणी करतात. भलेही दिवस अवघड होते, मात्र त्याही परिस्थितीत शिक्षण घेऊन लेकरं आत्मनिर्भर होतात.

मला अजून एक गोष्ट जाणवली की, माझी आई आणि लेखिका साधारण समवयस्क. पण सामान्य कुटुंबातल्या माझ्या आईच्या घरी मात्र मुलींचं शिक्षण या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं गेलं होतं. सहा भावंडांत आई थोरली. शाळेत कोण जाणार? तर, फक्त मुलगे. त्यामुळे आजही माझ्या आईला ती खंत वाटते. हा संदर्भ कदाचित वेगळा वाटू शकेल, पण मला तो आठवला खरा.

बालपणी घर तुटल्यापासून घरासाठी आसुसलेल्या इंदूला लग्नानंतर तरी घर मिळेल असं वाटत असतानाच ती पुन्हा तिच्या घरी पाहुणी होते. सुरुवातीला तिला घराची ऊब मिळत नाही. पण पती म्हणून महावीर जोंधळे यांनी मोडलेले घरातले नियम आणि पुढचा संसार ती संयमितपणे सांगते. काळ माणसाला बदलायला लावतो, त्याप्रमाणे घरातील माणसं बदलतातही. पण तोपर्यंत बरंच काही घडून गेलेलं असतं. त्या घडून गेलेल्याचा गंध लेखिका उगाळत बसत नाही.

या आत्मकथनाची पहिली आवृत्ती 1994 मध्ये आली. त्यानंतर अनेक आवृत्त्या निघाल्या. पाच विद्यापीठांनी अभ्यासक्रमात समावेश करून घेतला. हिंदी, तेलुगू, गुजराती, इंग्रजीत अनुवाद झाले. आता अकरावी आवृत्ती प्रकाशित होईल. मनोगतात लेखिका म्हणते, ‘खरं तर माझ्यापेक्षा किती तरी जास्त हाल-अपेष्टा सहन केलेल्या मुली अनाथाश्रमातून वाढल्या असतील, जगत असतील. त्यांचे व माझे अनुभव फारसे वेगळे असतील असे नाही. या सर्वांची मी एक प्रतिनिधी होण्याचा प्रयत्न केला आहे.’

अनाथपणाच्या दुःखाचा डोलारा उभारून घायाळ होता आलं असतं; पण तो डोलारा झुगारून उभी राहिलेली ही बिनपटाची चौकट आहे, म्हणून ती माझ्या जगण्यावर प्रभाव टाकत आलेली आहे असं मला वाटतं.

Tags: पुस्तकदिन वाचन कविता कल्पना दुधाळ मराठी वाङ्मय साहित्य आत्मकथन बिनपटाची चौकट इंदूमती जोंधळे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कल्पना दुधाळ,  बोरीभडक, जि.पुणे

ग्रामीण भागात वास्तव्य करून शेती मातीत राबणारी कवयित्री म्हणून कल्पना दुधाळ यांची ओळख आहे, त्यांचे दोन्ही कवितासंग्रह मराठी साहित्यात विशेष दखलपात्र ठरले आहेत.


Comments

  1. Swati Newalkar- 23 Apr 2021

    Khupach sunder parikshan. Tumchya oghawtya bhasha shaily mule pustak wachaulach hawe hi eacha atishay tiwra hote.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके