डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

रामाची मर्यादापुरुषोत्तम (आदर्श पुरुष) ही प्रतिमा संघ परिवार सर्व भारतीयांच्या गळी उतरवू शकत नाही. मुस्लिम आणि ख्रिश्चन यांनी रामाबद्दल बोलणे वेगळे. पण रामाबद्दल बोलताना तमिळ द्रविडांना फेरविचार करावा लागत नाही, हे करुणानिधींच्या उद्गारांनी स्पष्ट केले आहे. रावणाविषयी आर्य जेवढ्या सहज उपेक्षेने बोलतात, तेवढ्याच सहजपणे बहुसंख्यांक द्रविड रामाबद्दल बोलतात.
 

पेरियार म्हणाले होते, "ईश्वर नाही रे, नाही". करुणानिधी म्हणाले, "राम नाहीच; कधी झाला नाही". जयललितांनी मात्र रामनामाचा जयघोष केला. तमिळ आणि द्रविडांच्या इतिहासात 'पेरियार इ.व्ही. रामस्वामी नायकरांच्या विवेकपूर्ण नास्तिकतेचा खरा वारसा चालवणारे नेते' म्हणून करुणानिधींचे नाव नोंदले गेले. 'पेरियार यांच्या नास्तिकवादावर आपला विश्वास नाही आणि आपण केवळ ब्राह्मणच नाही; तर सर्व हिंदू देवतांच्या- विशेषतः रामाच्या पूजक आहोत,' असे सांगून जयललितांनी आपलीही भूमिका एकदाची स्पष्ट केली.

'सेतुसमुद्रम् प्रकल्प' मार्गी लागतो आहे, हे पाहून जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम् स्वामी- (जे स्वत: ब्राह्मण आहेत आणि द्राविडी बहुजन समाजाच्या राजकारणाचे द्वेष्टे आहेत)- यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 'सेतुसमुद्रम प्रकल्पामुळे रामाने लंकेला जाण्यासाठी बांधलेला सेतू- 'रामसेतू' उद्ध्वस्त होणार असल्यामुळे त्याचे काम थांबवावे, असा आदेश केंद्र सरकारला देण्यात यावा, अशी विनंती त्यांनी त्या याचिकेत केली. 'हा सेतू वाल्मिकी रामायणातील नायक रामानेच बांधलेला असल्यामुळे त्याचे अस्तित्व लक्षावधी लोकांच्या भावनांशी निगडित आहे', असेही त्यांनी म्हटले आहे. 

त्याउलट पुरातत्त्व खात्याने (आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे, की 'पाल्कच्या सामुद्रधुनीवर अशा प्रकारचे कोणतेच बांधकाम आढळत नाही; किंवा ते बांधले गेल्याचा पुरावा नाही, आणि राम या नावाचा ऐतिहासिक पुरुष होऊन गेल्याची इतिहासात नोंद नाही.

हे जाहीर होताच प्रसार माध्यमांनी ही बातमी भरपूर फुगवून पुरातत्त्व खात्याच्या प्रतिज्ञापत्रातील विधानाला विकृत वळण देण्याचा प्रयत्न केला. भाजप परिवार दबा धरून बसलेला होताच. त्यांनी रस्त्यावर उतरून सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना हिंदूविरोधी संबोधून टीकेचे लक्ष्य केले. सोनिया गांधी ख्रिश्चन आहेत आणि मनमोहन सिंग शीख असे सांगून लोकमानस प्रक्षुब्ध करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या प्रशासकीय कर्तृत्वातील त्रुटीमुळे नाही, तर ते धार्मिक अल्पसंख्य आहेत, म्हणून त्यांना लक्ष्य केले गेले.

अर्थातच सोनिया गांधी हे टीकेचे केंद्र राहिले, कारण त्या ख्रिश्चन, शिवाय देशाबाहेरून आलेल्या. त्यांना पुढे करून सर्व ख्रिश्चन समाजाला देशद्रोही ठरवून, गुजरात आणि मध्यप्रदेशसारख्या राज्यांतून त्यांच्यावर हल्ले चढवणे व त्यांना उद्ध्वस्त करणे, हे संघ परिवाराचे डावपेच होते. रक्तरंजित हातांनी त्यांना निवडणुकांना सामोरे जायचे होते, जे पूर्वीही एकदा संघ परिवाराने घडवले होते. अनपेक्षितपणे करुणानिर्धींनी या डावपेचांना शह दिला. त्यांनी बहुसंख्य हिंदू विरुद्ध अल्पसंख्य ख्रिश्चन या भाजपच्या मांडणीचे रूपांतर बहुसंख्य द्राविडी समाज विरुद्ध अल्पसंख्य सवर्ण (आर्य) असे केले आणि भारतामध्ये 'गुजरात'ची पुनरावृत्ती ख्रिश्चनांविरुद्ध झाली असती, ती टाळली, याबद्दल करुणानिध्धींना धन्यवादच दिले पाहिजेत.

द्र.मु.क.च्या या नेत्याने रामाचे अस्तित्व केवळ नाकारले नाही; तर रामायण या महाकाव्यातील त्याच्या प्रतिमेवरही हल्ला चढवला. करुणानिधींच्या विधानानुसार राम हा कोणत्याही उच्च गुणांनी मंडित पुरुष नव्हता. वाल्मिकींनी त्याला 'मद्यपि म्हटलेले नाही काय? त्याच्या जवळ स्थापत्यशास्त्रातली पदवी होती काय? जर नव्हती, तर श्रीलंकेला जाण्यासाठी समुद्रावर तो पूल कसा काय बांधू शकला? असे प्रश्नांवर प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

करुणानिधींच्या प्रश्नांच्या या भडिमारामुळे सेतूचा मुद्दा थोडा बाजूलाच पडला. त्यांनी वास्तव प्रश्नाला दिलेल्या वळणामुळे हिंदुत्ववाद्यांनाही मूग गिळून गप्प राहावे लागले; कारण तमिळ द्राविडांच्या राष्ट्रवादाला आव्हान देणे त्यांना झेपणारे नव्हते. तसे केले असते तर तमिळनाडूमधील त्यांच्या एकमेव पाठीराख्या जयललिता यांचे लोकांच्या पाठिंब्याअभावी उरलेसुरले राजकीय अस्तित्व संपुष्टात येण्याचा धोका होता. 

सुब्रह्मण्यम् स्वामींची 'एकला चलो रे' वाटचाल नगण्यच होती. सोनिया गांधींच्या शिकारीचा मौका हुकला होता. त्यामुळे झालेल्या सर्व प्रकाराबाबत मौन बाळगून दुर्लक्ष करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. प्रतिज्ञापत्र मागे घेणे, एवढीच कृती करण्याचा सरकारने पुरातत्त्व खात्याला आदेश दिला होता. त्यामुळे भाजपाची आणि त्याच्या दिवाळखोर नेत्यांची मोठी पंचाईत झाली. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपा आणि त्याचे सहकारी पक्ष यांनी आर्थिक प्रश्नांवर सरकारची कोंडी करायला हवी होती, पण ते काम डाव्या पक्षांनीच थोड्याफार परिणामकारक रीतीने पार पाडले.

'राम-सेतू'ची मोहीम बाबरी मशिदीच्या विध्वंसाइतकी सोपी नव्हती. द्राविडी तमिळांबरोबरच अनेक गंभीर समस्या पुढे आल्या असत्या. जेहोवा किंवा अल्ला यांच्याप्रमाणे राम हे जगभरातल्या हिंदूंमध्ये सर्वमान्य दैवत नाही. रामाची मर्यादापुरुषोत्तम (आदर्श पुरुष) ही प्रतिमा संघ परिवार सर्व भारतीयांच्या गळी उतरवू शकत नाही. मुस्लिम आणि ख्रिश्चन यांनी रामाबद्दल बोलणे वेगळे; पण रामाबद्दल बोलताना तमिळ द्राविडांना फेरविचार करावा लागत नाही, हे करुणानिधींच्या उद्गारांनी स्पष्ट केले आहे. रावणाविषयी आर्य जेवढ्या सहज उपेक्षेने बोलतात, तेवढ्याच सहजपणे बहुसंख्यांक द्रविड रामाबद्दल बोलतात.

संघ परिवाराने अगदी प्रामाणिकपणे वास्तवाचा शोध घेण्याचे ठरवले, तर त्यांना आढळेल की रामाला देव मानणाऱ्या दक्षिण भारतातील हिंदू घरांत रामापेक्षा शिर्डीच्या साईबाबांची उपासना जास्त चालते. आन्ध्र प्रदेशात भद्राचलम् येथे रामाचे अतिभव्य मंदिर उभे आहे, पण ते सुने पडले आहे. थोडीफार सुशिक्षित माणसे त्या मंदिरात जात-येत असतात. बहुजनांच्या भक्तिलाटेपासून ते दूरच आहे. तेव्हा रामाला पुन्हा उभा' करून त्याच्याभोवती लोक गोळा करून मते मिळवता येतील, अशी भाजप नेत्यांची समजूत असेल तर ती चुकीची आहे. करुणानिधी एकीकडे रामाच्या प्रतिमेवर हल्ले चढवीत आहेत आणि दुसरीकडे 'सेतुसमुद्रम प्रकल्प' हा विकासाचा प्रश्न म्हणून हाताळत आहेत. त्यामुळे तमिळ जनतेचा पाठिंबा त्यांना निश्चित आहे.

तहलका वरून साभार

Tags: मर्यादापुरुषोत्तम करुणानिधी सुब्रह्मण्यम् स्वामी सेतुसमुद्रम् प्रकल्प' कांचा इलाया weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कांचा इलैया शेफर्ड

लेखक, राज्यशास्त्राचे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते, तेलुगू व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लेखन
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके