डिजिटल अर्काईव्ह (2012-2020)

महार, मराठे, मुसलमान आणि ओबीसी एकजुटीने लढले; म्हणून भीमा कोरेगावचा जय स्तंभ सांप्रदायिकांच्या डोळ्यात सतत खुपत होता. गांधीहत्येनंतर सांगली- कोल्हापुरात जळलेल्या घरांची राख हिंदुत्ववाद्यांच्या मनात जशी धगधगत होती, तसाच हा जयस्तंभ. जे समाज एकत्र लढले, त्यांच्यातच भांडण लावून देण्यात आलं. भांडण किती विकोपाला गेलं आहे, ते दोन्ही बाजूच्या व्हॉट्‌सॲपवरचे मेसेज पाहिले की कळून चुकतं. जे एकत्र लढले, ज्यांनी शिवाजी-संभाजी राजांवर प्राणापलीकडे प्रेम केलं; त्या जाती-जातीतले तरुण इतिहासातल्या शौर्याचा कैफ बारुदासारखा डोक्यात भरत आहेत आणि परस्परांना डिवचत आहेत. सांप्रदायिक शक्तींनी सनातनी राग मनात ठेवत किती अचूक हल्ला केला आणि किती द्वेषाचा विखार पेरला, त्याचं दर्शन भीमा कोरेगाव व नंतरच्या घडामोडीतनं स्पष्ट दिसतं.


भीमा कोरेगावचा हिंसाचार कुणी घडवला? कल्याणला कुणा तेलंगणातल्या नक्षलवाद्यांना सरकारने अटक केली आहे. पण मनोहर ऊर्फ संभाजी भिडेंना आणि मिलिंद एकबोटेंना अजून हातही लावलेला नाही. हल्ला कुणी केला? कारस्थान कुणाचं?- या प्रश्नांची उत्तरं खुद्द मनोहर भिडेंनीच दिली आहेत. मनोहर (संभाजी) भिडे. पांढरी दाढी, मिशी वाढवलेला वयोवृद्ध माणूस. आखूड धोतरात राहतो. अनवाणी फिरतो. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्यांची मुलाखत घेताना त्यांच्याप्रति सहानुभूतीचं वलय निर्माण होईल याची बऱ्यापैकी काळजी घेतली. त्यामुळे त्यांनी वापरलेली भाषा ना माध्यमांना आक्षेपार्ह वाटली, ना त्यावर कुणाच्या प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्षांनीसुद्धा हे प्रकाश आंबेडकर आणि संभाजी भिडेंचं भांडण आहे, अशी साळसूद भूमिका घेतली. विरोधी पक्षांमधल्या अनेक नेत्यांचा संभाजी भिडेंशी असलेला स्नेहसंबंधसुद्धा कदाचित त्यासाठी कारण असेल.

ज्यांच्या (मराठ्यांच्या) बुडाखालची सत्ता गेली, त्यांनी हे घडवलं आहे. आपण तर त्या गावात गेलोच नाही, असा प्रतिआरोप मनोहर भिडे यांनी केला आहे. XXX खालची किंवा बुडाखालची ही भाषा असभ्य किंवा असंसदीय मानली जात नाही. सडकेवरचं आंदोलन करण्याची भाषा मात्र आंतकवादी ठरते. मनोहर भिडे यांनी थेट मराठा समाजावर आरोप केला. रामदास आठवलेही त्यांच्या मदतीला धावले. मनोहर भिडेंनी जातीचं नाव नाही घेतलं, आठवलेंनी नाव घेत मराठ्यांवर आरोप केला. मनोहर भिडे आरक्षणावरही बोललेत. ॲट्रॉसिटीवरही बोललेत. एका ‘जमावा’ला घाण करण्याचा आणि ‘लोकशाहीचा मुडदा’ पाडण्याचा अधिकार दिल्याची त्यांची भाषा ‘गरळ ओकणे’ या शब्दातच वर्णन करावी लागेल. दलित समाजाबद्दलची त्यांच्या मनात असलेली घृणा आणि दलितेतर समाजात विष ओकण्याची त्यांची तऱ्हा या मुलाखतीने पुन्हा एकदा समोर आली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर त्यांची प्रतिक्रिया अशीच अत्यंत कुत्सित आणि अपमानकारक आहे. ‘सगळ्याच ताटांत वाढलंय, त्यांच्याही ताटात टाका.’ कर्जमाफीवरही भिडेंनी आग ओकली आहे. लिंगायत धर्मावरही हल्ला चढवला आहे. माध्यमांसमोर बोलत असल्यामुळे काळजी घेऊनही ही भाषा. ज्यांनी त्यांची भाषणे ऐकली आहेत, त्यांना विचारा- भिडे काय काय बोलतात?  

मनोहर भिडेंच्या म्हणण्यानुसार मराठ्यांचं आरक्षण, कर्जमाफी व लिंगायत धर्माची मागणी हा सगळा ‘देशघातक कावा’ आहे आणि ‘हिंदू धर्मात तोडफोड’ करण्याचं कारस्थान आहे. भीमा कोरेगावचा हल्ला भिडे-एकबोटे या दोघांनी केला, की हल्ला करणाऱ्यांचे ते फक्त समोर केलेले चेहरे आहेत? ओसामा बिन लादेनही वर्ल्ड ट्रेड सेंटरला गेला नव्हता. दंगल पेटवण्यासाठी कुठं जावं लागत नाही. पण आठवलेंना बोलायला लावून या दंगलीची धग कायम राहील, याची व्यवस्थाही कारस्थान्यांनी केलीच आहे. त्यांनी भीमा कोरेगाव आणि वढू बुद्रुकच का निवडलं? विद्वेषाची ही आग पेटवण्यामागे त्यांचा काय उद्देश होता? त्यासाठी इंधन आणि सरण कुणाचं वापरण्यात आलं? आगीची झळ महाराष्ट्रभर पसरत राहील याची काळजी कुणी घेतली? मनोहर भिडे यांच्या मुलाखतीनेच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत.

महाराष्ट्राने तीन मोठ्या दंगली अनुभवल्या आहेत. पहिली महात्मा गांधींच्या हत्येनंतरची. गांधीहत्येनंतर देशभरच्या दंगली थांबल्या. पण महाराष्ट्रात ज्यांनी पेढे वाटले, त्या हिंदुत्ववाद्यांची घरं पेटवण्यात आली. (त्यात अनेक निरपराध ब्राह्मणांचीही घरं जळाली.) मराठवाडा विद्यापीठ नामांतरच्या मागणीवर दलितांची घरं पेटवण्यात आली. बाबरी मशीद उद्‌ध्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्राने हिंदू-मुस्लिम दंगाही पाहिला. त्यांच्या जखमा दीर्घ काळ राहिल्या. भीमा कोरेगावला झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात दंगल नाही पेटली, घरं नाही जळली; पण दोन्ही बाजूची मनं कमालीची करपली आहेत. कलुषित झाली आहेत. सोशल मीडियावर दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया पाहिल्या की, धग किती तीव्र आहे याची जाणीव होते.  अठरापगड जाती-धर्मांच्या ठिगळांनी शिवलेली महाराष्ट्राची उबदार गोधडी साडेतीनशे वर्षांत प्रथमच उसवली गेली आहे.

गोधडी हे महाराष्ट्राचं उबदार वस्त्र. महाराष्ट्रातल्या सलोख्याचं प्रतीक. छत्रपती शिवरायांनी ती पहिल्यांदा शिवली. महार, मांगांसह अठरा-पगड जातींचे मावळे त्यांच्या सैन्यात सामील झाले. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखामेळा, गोरा कुंभार, शेख महम्मद आणि जनी व बहिणाबाई या संतांच्या धाग्यांनी ही गोधडी शिवली गेली आहे. रायगडावर शिवरायांची समाधी शोधायला गेलेल्या महात्मा फुलेंनी, पहिलं आरक्षण देणाऱ्या छत्रपती शाहूमहाराजांनी आणि संविधानाच्या माध्यमातून अवघ्या देशाचं भाग्य लिहिणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या गोधडीचं महत्त्व ओळखलं होतं. एकमय समाजाचं स्वप्न महात्मा फुले पाहत होते.

यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे, साने गुरुजी, एस.एम. जोशी, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण ते थेट शरद पवार या साऱ्यांनी महाराष्ट्राला एकमय ठेवण्याचा प्रयत्न केला, तोही गोधडी पांघरूनच. ‘फुले-शाहू-आंबेडकर’ ही शब्दावली रूढ केली ती यशवंतराव चव्हाणांनी. शरद पवारांच्या राजकारणाबद्दल कुणाचेही, कितीही मतभेद असोत; पण मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी सत्तेची किंमत त्यांनी चुकवली, पण ही गोधडी उसवू दिली नाही. ही गोधडी पहिल्यांदाच उसवली गेली आहे, मोठ्या योजनापूर्वक. भीमा कोरेगाव आणि वढू बुद्रुक यांची निवड या कारस्थानात मोठ्या हुशारीने करण्यात आली होती. भीमा कोरेगावच का? वढू बुद्रुकच का? महाराष्ट्रातील हिंदुत्ववाद्यांना किंवा सांप्रदायिक शक्तींना छत्रपती संभाजी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रिय आहेत म्हणून?

या दोघांनी पुरोहितशाहीच्या विरोधात आणि वर्णवर्चस्वाच्या विरोधात बंड केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास सर्वांना माहीत आहे. पण त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरही धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असंच म्हणत होते. संभाजीची फक्त ‘धर्मवीर’ ही प्रतिमा त्यांना प्रिय आहे. बुद्धभूषण लिहिणारा, अवैदिक शाक्त परंपरा मानणारा संभाजी त्यांना मान्य नाही. शिवरायांचा आणि स्वराज्याचा घात करणाऱ्या अष्टप्रधान मंडळातल्या अण्णाजीपंत दत्तो यांना संभाजीराजांनी हत्तीच्या पायी दिलं होतं. मोरोपंत पिंगळेंना तुरुंगात टाकलं होतं. त्याचा राग मनात ठेवत औरंगजेबाला फितूर होत संभाजीराजांना पकडून देण्यात आलं. दरबारातील पंडितांच्या सल्ल्यानुनसार संभाजीराजांना मनुस्मृतीनुसार शिक्षा देण्यात आली. डोळे काढण्यात आले. देहाचे तुकडे- तुकडे करण्यात आले. भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांच्या संगमावर राजांच्या देहाचे तुकडे फेकून देण्यात आले.

वढू बुद्रुक त्या संगमावरच आहे. वढू बुद्रुकच्या शिर्के (शिवले) आणि गोविंद महार (गायकवाड) यांनी हिम्मत केली. राजांचा तुकड्या-तुकड्यांचा देह गोविंद गायकवाडांनी शिवला. गावच्या पाटलाने विरोध केला, म्हणून गोविंद महाराच्या जमिनीवर महाराष्ट्राच्या छत्रपतींचे अंत्यसंस्कार करण्यात आले. शिर्के पुढे आले, आपल्या राजासाठी महाराला शिवले. म्हणून ते शिवले झाले. शिवलेंनी पुढे गोविंद गायकवाड यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचीही समाधी राजांच्या जवळ बांधायला पूर्वास्पृश्य बांधवांना मदत केली. गायकवाड आणि शिर्के यांनी केवळ संभाजीराजांचा देह नाही शिवला; निष्ठा, हिम्मत व बंधुभावाच्या गोधडीने अवघा महाराष्ट्र जणू शिवला. शिवचरित्रकार वा.सी. बेंद्रे, कमल गोखले आणि प्राच्यविज्ञापंडित कॉ.शरद पाटील यांनी संभाजीचा इतिहास समोर आणला नसता, तर तो इतिहास धर्मवीरांनी कधीच गाडून टाकला असता. म्हणून आजवर वढू बुद्रुकच्या ग्रामस्थांनी संभाजीराजांची समाधी राखली, तसाच गोविंद महाराबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करणारा फलक परवापर्यंत सांभाळला होता.

त्या शिवले आणि गायकवाडांना वर्ष 2018 सुरू होताना परस्परांच्या विरोधात उभं करण्यात भिडे संप्रदाय यशस्वी झाला आहे. भीमा कोरेगावच्या शौर्यदिनापूर्वी भिडे संप्रदायाने गोविंद गायकवाडांच्या समाधीचा अवमान केला. तणावाला पूरक वातावरण तयार केलं. दि.1 जानेवारी 2018 ला लाखो दलितांचा समुदाय जमला होता, तेव्हा त्यांच्यावर थेट हल्ला चढवला.

कोण आहेत हे मनोहर भिडे? भिडे हे संघाचे प्रचारक. त्यांनी स्वतःचं नाव संभाजी भिडे करून घेतलं. आपण संभाजीभक्त असल्याचा त्यांचा दावा आहे. बहुजन समाजातल्या तरुणांच्या गडवाऱ्या आयोजित करून अत्यंत विखारी प्रचार ते गेली अनेक वर्षे करत आहेत. वारकरी संप्रदायाच्या विरोधात त्यांनी धारकरी संप्रदाय निर्माण केला. पारंपरिक वारीला अपशकुन करण्याचा  अनेकदा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर-तुकारामांना मानणाऱ्या वारकऱ्यांनी भिडेंना जुमानलं नाही. पण वढू-बुद्रुकला संभाजीराजे आणि गोविंद महाराच्या समाधीवरून आग लावण्यात भिडे संप्रदाय यशस्वी ठरला.

पानिपतकार, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या एका सभेला मनोहर भिडे हजर होते. वढू बुद्रुकचा इतिहास विश्वास पाटील सांगत होते. गोविंद महाराने केलेल्या हिमतीचं कौतुक करत होते. शिवाजी-संभाजीने सगळ्या जाती- जमातींना एकत्र कसं केलं, ते सांगत होते. मागे बसलेल्या संभाजी म्हणवणाऱ्या भिडेंचा पारा त्यामुळे चढत होता. ते तडक उठले आणि निघून गेले. सांगली-मिरज दंगलीमागे कुणाचा हात होता, हे लपून राहिलेलं नाही. सांगली, सातारा, कोल्हापूर हेच त्यांचं कार्यक्षेत्र आहे. पश्चिम महाराष्ट्राचा हाच पट्टा त्यांनी का निवडला? गांधीहत्येनंतर हिंदुत्ववाद्यांची घरं लोकांनी जाळली ती याच पट्‌ट्यात.

सत्यशोधकी विचारांचा प्रभाव असलेले हे तीन जिल्हे. क्रांतिसिंह नाना पाटील यांची पत्री चळवळ आणि भाई माधवराव बागल यांचा सत्यशोधकी संग्राम यांनी हे जिल्हे भारले होते. फुले- आंबेडकरांना साथ देणारी ब्राह्मणेतर चळवळ जोरात होती. त्यामुळे गांधीहत्येनंतरची सर्वांत तीव्र प्रतिक्रिया याच पट्‌ट्यात उमटली. हिंदुत्ववादी सांप्रदायिक शक्तींना त्यांनी अक्षरशः हद्दपार केलं. त्याचा राग इतकी वर्षे मनात दबा धरून होता. नाव बदलून संभाजी झालेल्या मनोहर भिडेंच्या माध्यमातून सत्यशोधकी तटबंदी भेदण्यामध्ये ते गेल्या काही वर्षांत यशस्वी झाले. आर.आर. पाटील गृह खाते सांभाळत होते. त्या काळात गुप्तचर विभागाने या सगळ्या कारवाया रिपोर्ट केल्या होत्या.

काँग्रेसराष्ट्रवादीतल्या नेत्यांची रसद घेत त्यांच्याच ‘बुडाखालचं’ सिंहासन बाजूला करण्यात भिडे संप्रदाय यशस्वी झाला. जिथे संघाची शाखा दुर्बिणीतून शोधावी लागत होती, तिथे आता भाजपचे पाच आमदार आहेत. एक खासदार आहे. कोल्हापूरच्या छत्रपती शाहूमहाराजांना वेदोक्त मंत्र नाकारण्यात आले होते. त्या कोल्हापूर गादीवरचे छत्रपती संभाजीराजे शाहू यांना राज्यसभेवर नामनियुक्त करण्यात आलं आहे. राजारामशास्त्री भागवत शाहूमहाराजांच्या पाठी उभे होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री हे यशवंतराव चव्हाणांच्या सोबत होते. वि.स. पागे अन्‌ बाळासाहेब भारदे यांनी वसंतदादा आणि शरद पवारांनाही साथ दिली. त्यांची जागा भिडे अन्‌ एकबोटेंनी घेतली. चव्हाण, दादा, पवारांना मानणारे काही नेते भिडे-एकबोटेंना रसद पुरवत होते, म्हणूनच त्यांना ताकद मिळाली.

सांगली, सातारा, कोल्हापूरच्या प्रयोगानंतर आता भीमा, भामा आणि इंद्रायणीचा संगम हे केंद्र करण्यात आलं आहे. हा संगम महाराष्ट्राच्या आध्यात्मिक एकतेचं केंद्र आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या राजाच्या बलिदानाचं अन्‌ समाधीचं स्थळ आहे. पेशवाईवर विजय मिळवलेल्या दलित अस्मितेचं शौर्यस्थळ आहे. या संगमावर, बलिदानाच्या वेदीवर आणि विजयस्तंभावर हल्ला चढवण्यात आला. या संगमस्थळाची निवड हेतुपूर्वक करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गलितगात्र दलित समाजात शौर्य आणि स्वाभिमानाची ज्योत पेटवण्यासाठी भीमा कोरेगावच्या जयस्तंभाला अभिवादन करून समता-विजयाची नवी परंपरा सुरू केली. पेशवाईने ज्यांच्या गळ्यात अस्पृश्यतेचं मडकं बांधलं होतं, त्या महार वीरांनी पेशवाई संपवण्यासाठी भीमा कोरेगावच्या महासंग्रामात प्राणांची बाजी लावली. त्यांचं शौर्य निर्विवाद आहे. पण त्या संग्रामात महारांच्या सोबतीने मराठे, राजपूत, शीख, अहिर यादव, माळी  यांच्यासारख्या अनेक ओबीसी जाती, मीना आदिवासी आणि मुसलमानही पेशवाईच्या विरोधात लढले होते, हे आवर्जून सांगायला हवं.

स्थानिक ग्रामस्थ पेशवांच्या बाजूने नाही, ब्रिटिश सैन्याला मदत करत होते. शहिदांमध्ये या सर्वांचा समावेश आहे. पेशव्यांविरुद्ध लढताना 98 भारतीय मारले गेले, तर 13 ब्रिटिश युरोपियन. दुसऱ्या बाजीरावाच्या कथा, त्याचा रमणा इतिहासाला ठाऊक आहे. पण पेशव्यांच्या काळात खुद्द छत्रपतींचा छळ होत होता. त्यामुळे सगळेच मावळे संधीची वाट पाहत होते. 865 जवानांच्या तुकडीने पेशवाई संपवली, त्यात 830 हे सगळे नेटिव्ह होते. जॉन वेलीने हे लिहून ठेवलंय. चंद्रकांत पाटील नावाच्या पत्रकाराने तो सगळा लेखी पुरावा शोधून काढला आहे. महार, मराठे, मुसलमान व ओबीसी एकजुटीने लढले; म्हणून भीमा कोरेगावचा जय स्तंभ सांप्रदायिकांच्या डोळ्यात सतत खुपत होता. गांधीहत्येनंतर सांगली- कोल्हापुरात जळलेल्या घरांची राख हिंदुत्ववाद्यांच्या मनात जशी धगधगत होती, तसाच हा जयस्तंभ.

जे समाज एकत्र लढले, त्यांच्यातच भांडण लावून देण्यात आलं. भांडण किती विकोपाला गेलं आहे, ते दोन्ही बाजूच्या व्हॉट्‌सॲपवरचे मेसेज पाहिले की कळून चुकतं. जे एकत्र लढले, ज्यांनी शिवाजी-संभाजी राजांवर प्राणापलीकडे प्रेम केलं; त्या जाती-जातीतले तरुण इतिहासातल्या शौर्याचा कैफ बारुदासारखा डोक्यात भरत आहेत आणि परस्परांना डिवचत आहेत. सांप्रदायिक शक्तींनी सनातनी राग मनात ठेवत किती अचूक हल्ला केला आणि किती द्वेषाचा विखार पेरला, त्याचं दर्शन भीमा कोरेगाव व नंतरच्या घडामोडीतनं स्पष्ट दिसतं. हल्ला पूर्वनियोजित होता. या घटना काही एकाएकी घडत नसतात. कधी नव्हे ती महाराष्ट्रात भाजपला सत्ता मिळाल्यामुळे सांप्रदायिक शक्तींना नवं बळ मिळालं. पण तयारी खूप आधीपासूनची आहे.

डॉ.भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला झाला, पुण्यातला दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलवण्यात आला, राम गणेश गडकरींचा पुतळा हटवण्यात आला; तेव्हाच या हल्ल्याची तयारी सुरू होती. एका व्यापक कटाचा तो भाग होता. जेम्स लेन प्रकरणात जिजामातेच्या बदनामीने मराठा समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. अत्यंत अश्लाघ्य, बेसलेस, तद्दन खोटी माहिती पेरून शिवरायांची आणि महाराष्ट्रमातेची बदनामी करण्यात आली. डॉ.भांडारकर हे पुरोगामी, सत्यशोधकी विचारांचे. पुढे इन्स्टिट्यूटचा ताबा भलत्याच लोकांनी घेतला. जेम्स लेनला माहिती देणारे ब्राह्मण होते. ब्राह्मणांची संस्था या समजातून इन्स्टिट्यूटवरच हल्ला झाला. डॉ.भांडारकर काही ब्राह्मण नव्हेत. सारस्वत. पण ब्राह्मण विरुद्ध मराठा असा अकारण वाद पेटला. हल्ल्यामुळे सारस्वतही नाराज झाले. माध्यमंही विरोधात गेली.

या सगळ्यांचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बळ महाराष्ट्रातील सांप्रदायिक शक्तींना मिळालं. अभिनव भारत, सनातन संस्था, भिडे संप्रदाय, एकबोटींची हिंदू एकता, हिंदू जनजागरण, हिंदू चेतना या आघाड्या गोडसेवादी सांप्रदायिक शक्तींचेच आक्रमक आविष्कार आहेत. डॉ.दाभोलकर, पानसरे, डॉ.कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या गोडसेवादी शक्तींनीच केल्या. चारही खुनांमधली हत्यारं आणि मारण्याची पद्धतही एक आहे. दाभोलकरांची हत्या झाली त्यामागे अंधश्रद्धा निर्मूलन हे कारण सांगितलं जातं, हे तितकंसं खरं नाही. गोडसेवादी संघटनांना ज्यांच्याकडून बळ मिळत होतं, त्या बुवा-महाराजांवर दाभोलकर हल्ला चढवत होते. गोडसेवाद जोपासणाऱ्या सनातन संस्थेलाच ते आव्हान देत होते. दाभोलकर सारस्वत ब्राह्मण. पण म्हणून ते वाचू शकले नाहीत. रामायणात एका ब्राह्मण चार्वाकाची हत्या पुरोहितांनी केल्याचा दाखला आहे. अशीच घटना महाभारतात युधिष्ठिराच्या दरबारातही दिसते.

महात्मा बसवेश्वरांचं बंड मध्य युगातलं. ब्राह्मण जातीत त्यांचा जन्म होता. पण ब्राह्मण्याच्या आणि वर्णवर्चस्वाच्या विरोधात त्यांनी युद्ध पुकारलं. आंतरजातीय विवाह ते घडवून आणतात म्हणून पुरोहितांनी बल्लभराजाकडे तक्रार करून, प्रधानमंत्री असलेल्या बसवेश्वरांच्या शिरच्छेदाचा आदेश मिळवला. दाभोलकर नावाच्या आधुनिक चार्वाकालाही म्हणून शहीद व्हावं लागलं. गोविंद पानसरे हे जातीने मराठा. खरा शिवाजी महाराष्ट्राला ते सांगत होते. गोडसेवादी सनातन्यांच्या मार्गातला ते मोठा अडथळा होते. त्या नि:शस्त्र म्हाताऱ्या माणसावर गोळ्या चालवण्यात आल्या. कलबुर्गी आणि गौरी लंकेश दोघंही लिंगायत. सनातन वैदिक धर्म आणि हिंदुत्वापेक्षा महात्मा बसवण्णांच्या लिंगायत धर्माची शिकवण वेगळी आहे, हे ते ठासून सांगत होते. लिंगायत धर्माला धर्म म्हणून मान्यता मिळण्याच्या मागणीला व्यापक समर्थन मिळू लागलं, म्हणून या दोघांची हत्या झाली. लिंगायत धर्माची मागणी हिंदुत्ववाद्यांना किती  जिव्हारी लागली आहे, याचा ताजा पुरावा भिडे गुरुजींनी लिंगायत धर्माविषयी जी गरळ ओकली आहे, त्यातून पुन्हा समोर आला आहे.

कारस्थान कुणाचं हे स्पष्ट असताना भीमा कोरेगावच्या हल्ल्याचं खापर जिग्नेश मेवाणी आणि उमर खलिदवर फोडण्यात आलं. हल्ला दलितांवर झाला, केला भिडे संप्रदायाने; पण आरोप झाला मराठ्यांवर. चिथावणीचा आरोप झाला जिग्नेश आणि उमरवर.

प्रकाश आंबेडकरांच्या सभेत या दोघांची शनिवार-वाड्यावर आदल्या रात्री भाषणं झाली. त्या भाषणात एकही शब्द चिथावणीचा नाही. भाषा पूर्ण सांविधानिक आहे. संविधानाच्या रक्षणाची आहे. उमरचं भाषण तर पूर्ण वैचारिक आहे. पण तो मुसलमान असल्यामुळे त्याला अतिरेकी ठरवणं सोपं आहे. तो काश्मिरी मुसलमान असल्याचा आणि त्याने देशविरोधी घोषणा दिल्याचे दोन्ही आरोप तद्दन खोटे आहेत.

उमर मूळचा आपल्या अमरावतीचा. त्याचे वडील त्यांच्या तरुणपणी सिमी संघटनेत होते. म्हणून उमरला आरोपी कसं करता येईल? तो तर धार्मिकही नाही. विचाराने डावा आहे. मुस्लिम धर्मांधतेच्या विरोधातही त्याची भूमिका ठाम आहे. कन्हैया, उमर किंवा त्यांचे सगळे साथीदार नास्तिक, निरीश्वरवादी, भगतसिंगवाले आहेत. ते देवाचं नाव घेत नाहीत, तर इन्शाल्लाहचे नारे कशाला लावतील? ‘भारत तेरे तुकडे होंगे’, या घोषणा ज्या पाच जणांच्या टोळक्याने दिल्या, त्यातल्या एकालाही मोदी सरकारने अजून पकडलेलं नाही. कसे पकडतील? ती सरकारचीच माणसं होती, पेरलेली. जिग्नेशच्या भाषणात काही सापडलं नाही म्हणून जाती- अंताची लढाई सडकेवर लढावी लागेल, या त्याच्या वाक्याला धरून त्याला झोपडण्यात आलं. ज्यांनी हल्ला केला, तेच उमर आणि जिग्नेशचं नाव घेत आहेत. प्रकाश आंबेडकरांवर आरोप करण्याची त्यांची हिम्मत नाही, कारण ते थेट आंबेडकर आहेत. उमर, जिग्नेशवरचा आरोप गडद करण्यासाठीच छात्र भारतीच्या मुंबईतील 4 जानेवारीच्या संमेलनावर सरकारने ऐनवेळी बंदी आणली. नंतरच्या आठवडाभरात हिंदू चेतना नावाने संघ, भाजप परिवाराच्या महाराष्ट्रात 255 सभा बिनदिक्कत झाल्या. त्याची बातमीही होणार नाही, याची काळजी घेण्यात आली.

भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर प्रकाश आंबेडकरांनी बंद पुकारला. त्यावरही काहींचे आक्षेप आहेत. महाराष्ट्र बंदमुळे भीमा कोरेगावची आग खेड्यापाड्यात पोचली, हा तो आक्षेप आहे. दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकरांनी बंदची घोषणा केली नसती, तर राज्यभर उद्रेक झाला असता. आपल्या शौर्याच्या अस्मितेवर हल्ला झाला आहे, ही ती चीड होती. त्या रागाचा, असंतोषाचा निचरा दुसऱ्या दिवशीच्या बंदमुळे झाला. हल्ला मराठा समाजाने नव्हे तर एकबोटे-भिडे संप्रदायाने केला, असा ठोस मेसेज आंबेडकरांनी दिला. मराठा समाजातल्या सगळ्या संघटनांनी त्या बंदला साथ दिली. कोणतीही विपरीत घटना घडू दिली नाही. संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, सकल मराठा क्रांती मोर्चा यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत संयमित आणि धीरोदात्त होत्या. जाती-विद्वेषाची आग भडकू न देण्यासाठी मराठा आणि अन्य दलितेतर समाजाने घेतलेली काळजी कौतुकास्पद आहे. बाबासाहेब आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल या सर्व गटांमध्ये आदराची भावना आहे. मराठा आरक्षण डॉ.आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावरच मिळणार आहे, हे अवघ्या मराठा समाजाला माहीत आहे.

त्यामुळेच की काय, मनोहर ऊर्फ संभाजी भिडे मीडियासमोर आले. मराठ्यांवर खापर फोडून, लिंगायतांवर आग ओकून मोकळे झाले. दलितांना शत्रू ‘जमात’ म्हणून अधोरेखित करते झाले. त्या वेळी मनोहर भिडेंची प्रतिमा एक वयोवृद्ध महामानव साधू अशी उभी राहील याची काळजी घेतली जात होती. मनोहर भिडे त्या मुलाखतीत आणखी एक वाक्य बोलले आहेत- ‘लोकशाहीत सोनं बुडतं, लेंडकं तरंगतात.’ मनोहर भिडेंची भाषणं युट्यूबवर आहेत. त्यांना ऐकणारा जमाव बहुजनच असतो. त्यांना दरडावताना ते एक शब्द वापरतात, ‘ए लेंडक्या’. लेंडकंचा अर्थ इथे देता येणार नाही. भिडेंची भाषा किती ‘घाण’ आहे, एवढंच सांगितलं पाहिजे. लोकशाहीबद्दल आणि शेतकऱ्यांच्या पोरांबद्दल भिडे संप्रदायाच्या मनात घृणा किती ठासून भरली आहे. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्राने ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद पाहिला; आता मराठा-मराठेतर, दलित-दलितेतर असे नवे वाद निर्माण करण्यात येत आहेत. महाप्रयासाने शिवलेला महाराष्ट्र उसवण्याचा किती घोर प्रयत्न सुरू आहे.

Tags: Tolstoy. mahatma gandhi suresh dwadashiwar gandhiji ani Tolstoy gandhiji ani tyanche tikakar gandhiji ani tyanche tikakar 17 sadhana weekly sadhana 03 february 2018 sadhana saptahik महात्मा टॉलस्टॉय गांधी सुरेश द्वादशीवार गांधीजी आणि टॉलस्टॉय गांधीजी आणि त्यांचे टीकाकार गांधीजी आणि त्यांचे टीकाकार : 17 साधना साधना साप्ताहिक अंक 03 फेब्रुअरी 2018 साधना साप्ताहिक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कपिल पाटील,  मुंबई, महाराष्ट्र
kapilhpatil@gmail.com

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात