Diwali_4 प्रास्ताविक आणि अनुवादकाचे मनोगत
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

प्रास्ताविक आणि अनुवादकाचे मनोगत

हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस या प्रकाशन संस्थेकडून गेल्या वर्षी ‘इस्लाम अँड फ्युचर ऑफ टॉलरंस’  या मोठ्या नावाचे अगदीच छोटे पुस्तक प्रकाशित झाले, त्याचा मराठी अनुवाद आता साधना प्रकाशनाकडून ‘इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य’ या नावाने आला आहे.  हे संपूर्ण पुस्तक संवाद फॉर्म मध्ये आहे. ही चर्चा जरी इस्लामला समोर ठेवून केलेली असली तरी, यातील विवेचन विश्लेषण कमी अधिक प्रमाणात सर्वच धर्मांना लागू होणारे आहे. सर्वाधिक महत्त्वाची बाब अशी की, या पुस्तकातील भूमिका हमीद दलवाई व मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या खूप जवळ जाणारी आहे. आणि आणखी विशेष हे आहे की, हे संवाद वाचताना नरहर कुरुंदकर व हमीद दलवाई यांच्यात झालेल्या संवादांची कल्पना येऊ शकते. या पुस्तकाचा अनुवाद करुणा गोखले यांनी केलेला आहे. या निमित्ताने त्यांनी पुस्तकासाठी लिहिलेले प्रास्ताविक व अनुवादकाचे मनोगत येथे प्रसिद्ध करीत आहोत. यावरून पुस्तकाचा गाभा व आवाका याची कल्पना काही अंशी तरी येऊ शकेल.

...संपादक

प्रास्ताविक

हॅरिस आणि नवाझ या दोघांची विचारधारांच्या बाबतीत कोणे एके काळी ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’ अशी अवस्था होती. हॅरिस निरीश्वरवादी, अमेरिकन, गोरे आणि ख्रिश्चन तर नवाझ पाकिस्तानी कौटुंबिक वारसा असलेले ब्रिटनचे नागरिक, धर्माने मुस्लिम आणि कट्टरतावादी. हॅरिस एक यशस्वी, उच्चशिक्षित, सुस्थित, व्यासंगी प्राध्यापक, तर नवाझ वयाच्या सोळाव्या वर्षी शाळा-कॉलेज सोडून कट्टर इस्लामवादींच्या प्रभावाखाली येऊन जगभर अतिरेकी संघटनेची सदस्यसंख्या वाढवण्याच्या उद्योगाला लागलेला आणि त्यापायी इजिप्तमध्ये तुरुंगाची हवा खात बसलेला विशीतला तरुण. पण ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही संस्था त्याच्या कोवळ्या वयाकडे बघून त्याला पंखाखाली घेते, त्याचे प्रदीर्घ काळ समुपदेशन करून त्याला कट्टरतावादाच्या विळख्यातून सोडवते आणि पुनश्च उच्च शिक्षण घेण्यास उद्युक्त करते. अशा युवकाबरोबर सॅम हॅरिस का सुसंवाद साधतात असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. त्याचे उतर आहे नवाझ यांच्यामध्ये घडून आलेल्या हृदयपरिवर्तनात. उच्च शिक्षण पूर्ण करून नवाझ यांनी इंग्लंडमध्ये क्विलिअम ही संस्था स्थापन केली आहे व त्याद्वारे ते इस्लाममधील आणि मुस्लिमांमधील कट्टरता दूर व्हावी या दृष्टीने संघटित प्रयत्न करत आहेत. उदारमतवाद, मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य यांना इस्लाममध्ये स्थान मिळावे, यासाठी ते झगडत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी सॅम हॅरिस त्यांच्याबरोबर खुली चर्चा करत आहेत. या चर्चेत इस्लाममधील कोणत्या संकल्पना मुस्लिमेतरांना अनुदार किंवा कडव्या वाटतात, हे कुठलाही आडपडदा न ठेवता ते नवाझ यांच्यासमोर मांडतात. ते करताना अपराधीही वाटून घेत नाहीत आणि इस्लामला आरोपीच्या पिंजऱ्यात उभेही करत नाहीत. त्यावर नवाझसुद्धा स्वसमर्थनाचा पवित्रा न घेता चर्चा पुढे नेतात; बाजू उलटवण्याचा प्रयत्न करत ख्रिश्चन धर्मावर प्रतिहल्ला चढवत नाहीत. ‘इस्लाम अँड द फ्यूचर ऑफ टॉलरन्स’ हे पुस्तक म्हणजे हॅरिस आणि नवाझ यांनी केलेल्या चर्चेचे शब्दश: परिलेखन आहे.

मला या चर्चेची चार वैशिष्ट्ये महत्त्वाची वाटतात-

1. आपल्यावर मुस्लिमद्वेषाचा आरोप होईल याची तमा न बाळगता हॅरिस इस्लाममधील त्यांना काय खटकते आणि जे खटकते, ते उदारमतवादाच्या कसे विरोधात आहे, हे स्पष्टपणे मांडतात.

2. हॅरिस ख्रिश्चन धर्मातील विसंगतींवरसुद्धा बोट ठेवतात.

3. नवाझ त्यांच्यावर कुठलेही आरोप न करता, मुस्लिमांच्या रोषामागची आणि इस्लामच्या अतिरेकीकरणाची कारणे शोधू बघतात. पण ते करताना ख्रिश्चन धर्मीयांनीसुद्धा कसे खूप काही चुकीचे केले आहे, याची यादी देत बसत नाहीत.

4. इस्लामचे इतर धर्मांशी वितुष्ट का आले, याच्या इतिहासात फार काळ न अडकता यापुढे सर्वच धर्मांनी उदारमतवाद, परस्पर-सहकार्य, मानवतावाद, व्यक्तिस्वातंत्र्य, मूलभूत मानवी हक्कांचे पालन आणि स्त्री-पुरुष समानता यांना किमान सामायिक मूल्ये मानून आपापल्या धर्मांत ती अंतर्भूत करावीत, असे हॅरिस आणि नवाझ ठामपणे प्रतिपादन करतात. 

पुस्तक वाचल्यावर एक उणीव मात्र जाणवते. नवाझ मतपरिवर्तन होऊन इस्लामवादी भूमिकेपासून दूर गेले हे खरे आहे. तरीसुद्धा इस्लाममधील कोणते पैलू आजही त्यांना भावतात, यावर ते स्वत:पण काही बोलत नाहीत आणि हॅरिसपण त्यांना बोलते करत नाहीत. तसे त्यांनी केले असते, तर हा संवाद अधिक अर्थपूर्ण झाला असता असे वाटून जाते. अर्थात हॅरिस त्यांच्या इतर लेखनातून धर्मांच्या उपयुक्ततेविषयीच वारंवार प्रश्नचिन्ह उठवत असतात. त्यामुळे ते नवाझ यांना असा काही प्रश्न विचारतील हे थोडेसे असंभव आहे. परंतु नवाझ धर्मांची उपयुक्तता डावलत नाहीत. त्यामुळे ते आपणहून इस्लाममधील त्यांना काय पटते, याविषयी बोलले असते, तर ते भारतीय संदर्भात मोलाचे ठरले असते.

या पुस्तकात एक ख्रिश्चन धर्मीय एका मुस्लिम व्यक्तीसोबत इस्लामची चिकित्सा करतो आहे. साहजिकच त्यांच्या चर्चेत मुख्यत्वे इस्लाम आणि थोड्या प्रमाणात ख्रिश्चन धर्मांचे संदर्भ येतात. पण त्यांच्या चर्चेमागची भावना सर्वच धर्मीयांना उपयुक्त ठरावी. (हे पुस्तक वाचताना आणि अनुवादताना शशी थरूर यांच्या ‘व्हाय आय ॲम अ हिंदू’ आणि कांचा इलैय्या यांच्या ‘व्हाय आय ॲम नॉट अ हिंदू’ या दोन पुस्तकांची वारंवार आठवण येत होती. या दोन लेखकांमध्ये हिंदू धर्माबाबत असाच खुला संवाद घडला, तर तो भारतीयांसाठी मौलिक ठरेल असे तीव्रतेने वाटून गेले.)

भिन्न धर्मीय, भिन्न वंशीय किंवा भिन्न भाषिक समूहाविषयी अविश्वास आणि भीती वाटणे, ही उत्क्रांतीमधील आदिम मानवी भावना आहे. तीमागे अज्ञाताचे भय आणि स्वसंरक्षणाची प्रेरणा होती. म्हणूनच मानवाचा इतिहास हा भिन्न धर्मविचारांमधील, प्रदेशांमधील आणि भाषांमधील संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे. पण आता उत्क्रांतीचा तो टप्पा आपण कधीच मागे टाकला आहे. आज, माहिती-विस्फोटाच्या युगात, पृथ्वीतलावरील कुठलीच भाषा, वंश किंवा धर्म अज्ञात राहिलेला नाही. उपजत कुतूहलाच्या आधारे अपरिचित घटिताबाबत आवश्यक ती माहिती प्राप्त करून आपण आदिम भीतीवर मात करू शकतो. शिवाय परस्पर सहकार हेसुद्धा उत्क्रांतीत यशस्वी ठरलेले एक शाश्वत धोरण आहे. मानवाने आदिमतेपासून सुरू केलेला आणि आधुनिकतेच्या दिशेने जाणारा हा प्रवास अधिक सुकर, सुखकारक आणि सौहार्दपूर्ण व्हावा असे वाटत असेल, तर भिन्न धर्मीयांमध्ये निकोप चर्चा होणे आवश्यक आहे.

अशी चर्चा शक्य आहे, हे या पुस्तकातून फार प्रभावीपणे समोर येते. भारतात अशा चर्चांची विशेष आवश्यकता आहे, कारण आपण स्वत:ला धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्र मानतो आणि विविधतेत एकता हे स्वत:चे वैशिष्ट्य समजतो. केवळ भारतातच नाही, तर जगात सर्वत्र विविध धर्म, पंथ, जाती, भाषिक समूह यांमध्ये शांतिपूर्ण सहजीवन शक्य करायचे असेल, तर नवाझ आणि हॅरिस यांमध्ये झालेल्या चर्चेपासून आपणही प्रेरणा घ्यायला हवी.

अनुवादकाचे मनोगत

‘इस्लाम अँड द फ्यूचर ऑफ टॉलरन्स’ या पुस्तकाचा अनुवाद मला का करावासा वाटला याची कारणे खणून काढणे भागच पडले, कारण पुस्तकासोबत अनुवादकाचे मनोगत येणे ही प्रथा आहे. एका परीने ती चांगली आहे; तिच्यामुळे अनुवादक स्वत:च्या मनातील खळबळीचा धांडोळा घेत तिच्या मुळाशी जाऊ शकतो. मलापण तो घ्यावा लागला. गेले अनेक दिवस मला काही प्रश्न छळत होते. त्यांवर मी माझ्या परीने उत्तरे शोधत होते. माझ्या या शोधयात्रेला ‘इस्लाम अँड द फ्यूचर ऑफ टॉलरन्स’ने दिशा दिली. म्हणून मी त्याच्या अनुवादाचा प्रपंच मांडला. त्याला निमित्त मात्र एक छोटीशी घटना झाली.

काही महिन्यांपूर्वी दलित नेते राजा ढाले यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर विविध वृत्तपत्रांनी अग्रलेख तर लिहिलेच, पण नंतरही आठवडी पुरवण्यांत त्यांच्या विचारांची आणि कार्याची चिकित्सा करणारे अनेक लेख प्रकाशित झाले. त्यांत अर्थातच त्यांनी केलेल्या गीता दहनाचे उल्लेख आले होते. त्यानंतर कधी तरी एकदा मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात मी म्हणाले की, गीता हा काही अगदी जाळून टाकण्याच्या लायकीचा टाकाऊ ग्रंथ नाही. यावर एकाने तत्काळ प्रतिक्रिया दिली, ‘‘हे काय नवीनच, तुला कधीपासून धर्मग्रंथांचं प्रेम आलं?’’ दुसऱ्या एकीला माझे हे वाक्य दलित चळवळीच्या विरोधात आहे असे वाटले. (इथे गीता दहनामागच्या ढाले यांच्या भूमिकेची चर्चा करण्याचे कारण नाही, कारण तो काही मूळ मुद्दा नाही.)

या प्रसंगानंतर माझ्या मनात अनेक प्रश्न उठले. गीतेतील वर्णव्यवस्थेचे उल्लेख स्वीकारार्ह नाहीत, हे मान्य करूनही गीतेत अनेक उत्तम गोष्टी आहेत ही वस्तुस्थिती (माझ्यापुरती तरी) उरतेच. गीतेचे साहित्यिक मूल्य, भाषा सौष्ठव, तीमध्ये येणारी वैयक्तिक स्वसमुपदेशनाची अप्रतिम तत्त्वे यांबद्दल गीतेचे कौतुक केल्याने मी हिंदुत्त्ववादी, स्वधर्माभिमानी, किंवा दलित चळवळीची विरोधक कशी काय होते? कुठल्याही चळवळीतील एखाद्या नेत्याच्या भूमिकेतील एखादा अंश पटला नाही, म्हणून आपला संपूर्ण चळवळीला विरोध असतो का? किंवा गीतेतील काही भाग आवडतो म्हणून मला तीमधील वर्णव्यवस्थासुद्धा मान्य आहे, असा निष्कर्ष काढणे कितपत सयुक्तिक ठरते? ‘सगळंच स्वीकारा किंवा पूर्णपणे नाकारा’ ही जबरदस्ती का? कुठल्याही विचारधारेतील एखादा भाग पटतो म्हणून ती विचारधारा पूर्णपणे स्वीकारायलाच हवी का? त्यातील काही अंश कालमानानुसार आक्षेपार्ह वाटतात, तेव्हा ती पूर्णपणे टाकाऊ ठरते का?

दुसरा एक प्रश्न मला नेहमी छळत आला आहे. स्वत:च्या धर्मातील दोष उघडपणे मान्य केले, तर मी वस्तुनिष्ठ, उदारमतवादी, पुरोगामी तरी ठरणार किंवा परधार्जिणी तरी. या उलट  दुसऱ्याच्या धर्मातील दोषांवर बोलले तर परधर्मद्वेष्टी ठरणार. हे कसे काय? आपण स्वत:च्या धर्मातील दोषांवर पोटतिडिकेने बोलतो, त्यामागे आपला धर्म अधिकाधिक समन्यायी, सहिष्णू व्हावा ही तळमळ असते की नाही? त्यात परधार्जिणेपणाच असणार असे का गृहीत धरायचे?  आपण दुसऱ्या धर्मांमधील खटकणाऱ्या गोष्टींवर बोट ठेवले, तर त्यामागेपण हीच तळमळ असणार असे का नाही समजायचे? तेथे लगेच परधर्मद्वेषाचा आरोप का व्हावा?

सच्चर आयोगाचा अहवाल प्रकाशित झाल्यावर स्त्री प्रश्नांच्या संदर्भात मी म्हणाले होते की, ज्या समाजातील मोठा हिस्सा स्वत:च्या घरातील निम्म्या सदस्यांना शिकूच देत नाही, अर्थार्जन करू देत नाही, त्यांच्यामधील अंगभूत कौशल्ये विकसित होऊ देत नाही, त्यांच्यातील बौद्धिक क्षमता निद्रिस्त ठेवतो, तो समाज एकचाकी सायकलवर स्वार होऊन शर्यतीत उतरला आहे असे समजावे; मग तो कोणत्याही धर्माचा असो. आपण आर्थिक, शैक्षणिक, सामाजिकदृष्टया मागास राहिलो, यात समाज म्हणून आपल्यापण काही चुका झाल्या का, हा विचार मुस्लिमांनी करायला पाहिजे. माझ्या या विधानात मुस्लिमांनी समाज म्हणून आत्मपरीक्षण करण्याची इच्छा जरूर होती, पण मुस्लिमद्वेष होता असे मला वाटले नाही. याचे कारण मुस्लिम स्त्रीचे त्रास कमी व्हावेत अशीच माझी इच्छा होती. स्त्रीवरील तर्कदुष्ट बंधनांबाबत आत्मपरीक्षण करण्याची मोठी गरज तर मी इतर धर्मीयांसमोरपण; विशेषत: ग्रामीण भागात फिरत असताना बोलून दाखवत असते. तरीसुद्धा हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांतील माझ्या काही परिचितांना माझ्या विधानात मुस्लिमद्वेष दिसला.

असे वारंवार होऊ लागले, तर माणूस मनापासून जे वाटते, ते बोलायला कचरू लागतो. माझी विधाने कदाचित अपुऱ्या माहितीवर आधारित असतील, त्यांवर माझ्या नैसर्गिक प्रवृत्तींचा प्रभाव असू शकेल, कदाचित ती फार व्यापक प्रमाणार लागू होणारी नसतीलही. त्यामुळे त्यांची चिकित्सा जरूर व्हावी, पण मला मुस्लिमद्वेष्टी, भोंदू पुरोगामी किंवा छुपी धर्मपरायण अशी लेबले लावणे कितपत समर्थनीय होईल? मुद्दा माझा नाहीच. एकूणच समाजात विविध विचारसरणीचे लोक धर्म, धार्मिक स्वातंत्र्य, धर्मसुधारणा, धर्म आणि हिंसा यांवर बोलतात, तेव्हा त्यांना न घाबरता स्वत:चे मत मांडता येईल इतपत समंजस श्रोते आपण होणार की नाही, हा आहे. तसेच, आपली विधाने जर कुणी खोडून काढत असेल, तर प्रत्युत्तर म्हणून त्याची उणीदुणी काढण्याचा मोह आपण आवरणार की नाही, हापण मुद्दा आहे.

इस्लाम अँड द फ्यूचर ऑफ टॉलरन्स या पुस्तकात शब्दबध्द झालेला संवाद साधताना सॅम हॅरिस आणि माजिद नवाझ हे दोघेही समंजस श्रोते म्हणून वाचकांपुढे येतात. त्यांनी आपल्या सुसंवादात एकमेकांची उणीदुणी काढण्याचा मोह कटाक्षाने टाळला आहे. त्याचबरोबर ‘राजकीय प्रस्तुततेच्या’ (political correctness) नादात दुसऱ्या धर्मातील काय खटकते, त्याविषयी बोलणे टाळलेही नाहीय. व्यक्ती असो वा समाज, चुकीच्या वर्तनामागे चुकीच्या धार्मिक शिकवणीचा मोठा हात असतो, असे सॅम हॅरिस यांचे स्पष्ट मत आहे. ते व्यक्त करताना ते ताकाला जाऊन भांडे लपवत नाहीत. इतर कुठल्याही धर्मापेक्षा जगभर मुस्लिम समाज दिवसेंदिवस अधिकाधिक कडवा होताना दिसतो आहे, त्याचा थोडा तरी दोष इस्लाममधील काही धर्मतत्त्वांना जातो, असे ते मोकळेपणाने बोलून दाखवतात. नवाझसुध्दा इस्लामवर टीका करण्याचा सॅम हॅरिस यांचा हक्क मान्य करून चर्चा पुढे सुरु ठेवतात. त्यांच्या संवादामागचा हेतू ‘आपण जिंकणे; समोरच्यास हरवणे’ हा नसून दोघांनी मिळून समस्येच्या मुळाशी जाणे, ती सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना समजून घेणे आणि मदत करणे हा आहे. आज आपल्या देशात विचारी लोकांनी एकत्र येऊन असे संवाद साधण्याची गरज तीव्रतेने भासते आहे. ती पुरी करण्याचा मार्ग या पुस्तकातून सापडू शकेल असे वाटले, म्हणून मी ते मराठीत आणण्याचा प्रयत्न केला.

इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य

लेखक : सॅम हॅरिस आणि माजिद नवाझ

अनुवादः करुणा गोखले

पृष्ठे- 128, किंमत 150/-

साधना प्रकाशन, 020-24459635.

 

Tags: साधना प्रकाशन ‘इस्लाम अँड फ्युचर ऑफ टॉलरंस इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य करुणा गोखले translation anuvad islam ani sahishnuteche bhavitavya karuna gokhale islam and future of tolerance weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

करुणा गोखले
karunagokhale@gmail.com


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात