डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

रिओ ऑलिम्पिकमध्ये आम्ही देशासाठी पदक जिंकू शकलो नाही, हे खरे असले तरीही इतकेच म्हणेल की- आमचे प्रयत्न प्रामाणिक होते. ऑलिम्पिकमधील सहभाग हा जीवन समृद्ध करणारा अनुभव होता. उसेन बोल्टसारखे अनेक पदके मिळविणारे खेळाडू असोत, अथवा पदके न मिळालेले खेळाडू, ऑलिम्पिकच्या क्रीडानगरीत सर्वजण एकत्र राहतात, एकत्र जेवण करतात, कुठलाही भेदभाव न मानता ‘वसुधैव कुटुम्बकम’ या वृत्तीने एकमेकांना प्रोत्साहन देतात.

नाशिक जिल्ह्यातील सावरपाडा नावाच्या लहानशा गावातील कविता राऊत यांनी एक धावपटू म्हणून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत अनेक पदके मिळवून आपल्या गावाच्या आणि देशाच्या गौरवात भर टाकली आहे. त्यांचा जीवनप्रवास त्यांच्याच शब्दांत-

प्रश्न - कविताजी, तुम्ही ग्रामीण पार्श्वभूमीतून ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय क्रीडास्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसे होते तुमचे बालपण?

- माझा जन्म 5 मे 1985 रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा या लहानशा पाड्यात झाला. गावात आज 400 ते 500 घरे आहेत. मी लहान असताना 300 ते 350 घरे असतील. वडील फॉरेस्ट खात्यात नोकरीला, आई गृहिणी. आम्ही तीन भावंडं, मोठा भाऊ, मी आणि एक लहान भाऊ. आमच्या गावात पाण्याचे नळ येऊन अद्याप वर्षही झालेले नाहीये. सात-आठ महिन्यांपूर्वीच गावात नळ आले. लहानपणी तर पाण्यासाठी फार वणवण करावी लागे. घरापासून एक- दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विहिरीतून पाणी आणावे लागे. घरात वीज होती ती फक्त प्रकाश देण्यासाठी, टीव्ही, फ्रीज अशी विजेवर चालणारी उपकरणे घरात आली ती आम्ही भावंडं नोकरी करू लागल्यानंतरच.

प्रश्न - तुमच्या गावात शिक्षणासाठी काय सोयीसुविधा होत्या?

- मूलभूत सुविधांप्रमाणेच गावात शिक्षणाचाही अभाव होताच. गावात फक्त बालवाडी असल्याने पहिल्या इयत्तेपासून ठाणपाडा गावातील आश्रमशाळेत प्रवेश घेतला. सावरपाड्यापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर ही निवासी आश्रमशाळा होती. इयत्ता सहावीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत घेतले. दर वर्षी शाळेत दिवाळीनंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हिवाळी क्रीडास्पर्धा व्हायच्या. चौथीत असल्यापासून मी धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. मात्र केवळ एक छंद, आवड म्हणून मी धावत होते. खेळात करिअर वगैरे करता येते, त्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायला हवे, ही गोष्ट तेव्हा मला ठाऊकही नव्हती.

प्रश्न - धावण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायला तुम्ही कधी, कशी आणि कुणाकडे सुरुवात केली?

- 1997 मध्ये इयत्ता सातवीसाठी मी हरसूलच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात प्रवेश घेतला. तेथे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय क्रीडास्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. पण त्यामागे काही ठोस, निश्चित उद्दिष्ट नव्हते. स्पर्धेच्या अनुषंगाने बाहेरगावी जाता येईल, मोठी शहरे, तेथील जनजीवन पाहता येईल, इतकीच माफक अपेक्षा त्याक्षणी मनात होती. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर खेळाडूंना पाहून स्पर्धेपूर्वी वॉर्म-अप कसा करायचा ते आम्ही शिकलो. 1998 मध्ये प्रवरानगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत मला दोन पदके मिळाली होती. या स्पर्धेदरम्यान माझी भेट माझे भावी प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्याशी झाली. ते नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत होते. राज्यस्तरीय स्पर्धेत दिवसभरात नाशिक जिल्ह्याला किती पदके मिळाली, याचा हिशोब ते सायंकाळी करीत होते. त्यांच्या हिशोबाप्रमाणे नाशिकची एकूण 17 पदके झाली होती. कुणी तरी म्हणाले, ‘पदके 17 नाहीत, 18 आहेत. ग्रामीण भागातील एका मुलीनेही नाशिकसाठी पदक मिळविलेय.’ ही मुलगी नक्की आहे तरी कोण या उत्सुकतेने सर दुसऱ्या दिवशी माझी 1500 मीटर शर्यतीची अंतिम फेरी बघण्यासाठी आले. या शर्यतीत मला कांस्यपदक मिळाल्यानंतर मी कोण, कुठली, कुठे सराव करते, याची चौकशी त्यांनी केली. जिंकण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायचे असते, पद्धतशीर, शिस्तबद्ध सराव करायचा असतो हे मला ठाऊकच नव्हते. सरांनी मला समजावले की, कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय, नियमित सरावाशिवाय जर मी राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्य, कांस्यपदके मिळवीत असेल तर शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्यास भविष्यात खूप प्रगती करू शकेल. त्या वेळेस मी त्यांचे बोलणे फारसे गांभीर्याने न घेता फक्त तोंडदेखला होकार दिला. कदाचित करिअरबद्दल गांभीर्याने विचार करण्याचे माझे ते वयही नव्हते.

पुढे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी माझी निवड झाली. त्यासाठीचे शिबीर पुण्यात आयोजित केले होते. तेथे विजेंदरसर मला पुन्हा भेटले आणि ते प्रशिक्षण घेण्यासाठी माझी समजूत घालत राहिले. सुरुवातीला भाषेचा अडसर जाणवायचा- कारण सर हिंदीत बोलायचे आणि मला मराठीही व्यवस्थित बोलता येत नव्हते. परंतु सरांनी हळूहळू मला आणि माझ्या आई-वडिलांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि 2000-2001 मध्ये नाशिकला सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्याचा निर्णय मी घेतला.

प्रश्न - नाशिकमध्ये तुमचे जीवन कसे होते? तेथील वास्तव्यात एक खेळाडू म्हणून कुठला सकारात्मक बदल तुमच्या जीवनात झाला?

- नाशिकमध्ये राहायचे कुठे हा यक्षप्रश्न माझ्यासमोर होता. विजेंदरसर आणि त्यांच्या पत्नीने मोठ्या मनाने मला त्यांच्या घरात कुटुंबातील सदस्याप्रमाणे सामावून घेतले. त्यांची दोन अपत्ये- एक मुलगा आणि एक मुलगी माझ्यापेक्षा लहान होते. त्या दोघांप्रमाणेच तू आमची तिसरी मुलगी आहेस असे ते मला म्हणाले. 2001 ते 2005 अशी चार वर्षे त्यांच्या घरीच राहत होते. 2005 मध्ये मला नोकरी लागल्यानंतर मी स्वतंत्र राहू लागले. नाशिकला आल्यानंतरच मला खऱ्या अर्थाने खेळाचे महत्त्व उमजले. सर भोसला मिलिटरी स्कूलजवळील कर्मचारी वसाहतीत (क्वार्टर्समध्ये) राहत असल्याने मी तेथील खेळाडूंना जवळून पाहू शकले. भोसलामध्ये अनेक राष्ट्रीय पातळीवरील विजेते (नॅशनल चॅम्पियन्स) खेळाडू सराव करीत असत. त्यांच्याप्रमाणेच आपणही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळावे असे त्यांना पाहून वाटायचे. त्यांचा तंत्रशुध्द सराव, व्यायाम पाहून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. दीर्घ पल्ल्याच्या शर्यती धावण्यासाठी कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा, आपले शारीरिक सामर्थ्य, स्टॅमिना कसा वाढवावा, कुठला आहार घ्यावा, अशा अनेक नवीन गोष्टी कळल्या. धावपटूंचे वजन अतिरिक्त वाढले की त्याचा परिणाम वेगावर होतो अन्‌ वजन खूप कमी झाले तर दुखापतींची शक्यता वाढते. त्यामुळे वजन प्रमाणात आणि आहार संतुलित ठेवावा लागतो. इतरांप्रमाणे जंक फूड खाण्याची कितीही इच्छा झाली तरी ते निर्धाराने टाळावे लागते. एक आठवडा सरावात खंड पडला तर तयारीत महिना-दीड महिना मागे पडल्यासारखे वाटते. त्यामुळे सरावात सातत्य राखणे अतिआवश्यक असते. नाशिकला मी करीत असलेल्या कठोर मेहनतीचे फळ मला लवकरच मिळाले. नाशिकला आल्यानंतर तीन महिन्यांतच गुजरातमधील गांधीनगर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत मी रौप्यपदक मिळविले. राष्ट्रीय पातळीवरील हे माझे पहिले पदक होते.

प्रश्न - राष्ट्रीय पातळीवर यश मिळविल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपण कधीपासून सहभागी व्हायला सुरुवात केलीत?

- 2004 मध्ये मी दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाले. माझी पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा ‘आशियाई क्रॉस कंट्री’ ही पुण्यातच संपन्न झाली. दुसरी आशियाई स्पर्धा ही मलेशियात होती. परदेशात जाण्याचा अनुभव माझ्यासाठी पूर्णतः वेगळा होता. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या मुलींसाठी विमानात बसणे, पंचतारांकित हॉटेलात राहणे हे अनुभव सर्वार्थाने नवीन अन्‌ सुखद होते. पहिल्या परदेशी स्पर्धेत कामगिरी अपेक्षेइतकी चांगली झाली नाही, परंतु देशोदेशीचे खेळाडू, त्यांच्या सरावपद्धती पाहून बरंच काही शिकायला मिळालं, अनुभवसमृद्ध झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल यश मिळालेले नसल्याने खेळातच करिअर करण्याबाबत मी पुरेशा गांभीर्याने विचार केला नव्हता. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे आणि सुखद होते. पहिल्या परदेशी स्पर्धेत कामगिरी अपेक्षेइतकी चांगली झाली नाही, परंतु देशोदेशीचे खेळाडू, त्यांच्या सरावपद्धती बघून बरंच काही शिकायला मिळालं, अनुभवसमृद्ध झाले. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्वल यश मिळालेले नसल्याने खेळात करिअर करण्याबाबत मी पुरेशा गांभीर्याने विचार केला नव्हता. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे नोकरी मिळेल, अर्थार्जन करून स्वावलंबी होता येईल अशीच उद्दिष्ट्ये त्या वेळी मनात होती. यादरम्यान मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. पदवी मिळविल्यानंतर 2005 मध्ये मला रेल्वेत टी.सी.ची नोकरी मिळाली आणि स्वतःच्या पायांवर उभे राहण्याचे माझे स्वप्न साकार झाले.

प्रश्न - नोकरी आणि खेळ यांत तुम्ही कसा समन्वय साधलात?

- नोकरीत असताना सकाळ-संध्याकाळ माझा नियमित सराव सुरूच होता. अर्थार्जन करणे आवश्यक असले तरीही खेळणे, धावणे यांत मला आत्मिक समाधान मिळत होते. पुढे 2006 ते 2014 अशी सलग आठ वर्षे मी पूर्ण वेळ भारतीय राष्ट्रीय संघाच्या शिबिरातच सराव करीत होते. खडतर सरावाचे फळ मला लवकरच मिळाले. 2008 मध्ये मला पहिले आंतरराष्ट्रीय पदक मिळाले. दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धेत 5000 मीटरमध्ये मला रौप्यपदक मिळाले. त्यानंतर 3000 मीटर इनडोअर शर्यतीतही रौप्यपदक मिळविले. 2008 मध्येच मला ONGC मध्ये  executive HR चे पद मिळाले. मे 2009 मध्ये मी बंगळुरू येथे 10 किलोमीटर रोड रनिंगमध्ये 34:32 ही वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळविले अन्‌ नवीन राष्ट्रीय विक्रम (नॅशनल रेकॉर्ड) प्रस्थापित केला, जो आजतागायत कायम आहे. त्यानंतर डिसेंबर 2009 मध्ये पुणे येथे संपन्न झालेल्या हाफ मॅरेथॉनमध्ये मी 1:12:50 ही वेळ नोंदवून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला जो आजतागायत कायम आहे.

प्रश्न - एक खेळाडू म्हणून आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक आनंददायक, अभिमानास्पद क्षण कोणता?

- ऑक्टोबर 2010 मध्ये दिल्लीत संपन्न झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम्समध्ये) 10,000 मीटर शर्यतीत जिंकलेले कांस्यपदक हा माझ्या कारकिर्दीतील सर्वाधिक आनंददायक अन अभिमानास्पद क्षण. राष्ट्रकुल स्पर्धेत 71 देश सहभागी झाले होते. इथिओपिया, केनियासारख्या आफ्रिकन देशांतील धावपटू शारीरिक दृष्ट्या अत्यंत काटक आणि कणखर असतात. ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च स्तरावरील जागतिक स्पर्धांमध्ये धावण्याच्या शर्यतीत हेच आफ्रिकन धावपटू अनेक सुवर्णपदके मिळवतात. त्यांच्याशी स्पर्धा करीत मी कांस्यपदक जिंकले तेव्हा मैदानावर उपस्थित लोकांचा क्षणभर विश्वासच बसला नाही. आमचे रशियन प्रशिक्षक डॉ.निकोलाय यांचाही ‘भारतीय धावपटूला पदक मिळालेय’ या वस्तुस्थितीवर विश्वास बसत नव्हता. शर्यत संपल्यानंतर मी हातात घेण्यासाठी तिरंगा शोधत होते. स्पर्धा दिल्लीत असल्याने मैदानात उपस्थित प्रेक्षकांपैकी बहुसंख्य प्रेक्षक भारतीयच होते. तरीदेखील कुणाजवळच तिरंगा नव्हता, कारण भारत या स्पर्धेत जिंकेल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळविणारी मी पहिलीच भारतीय महिला धावपटू ठरले. 1958 मध्ये कार्डिफ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 440 यार्ड शर्यतीत मिल्खासिंग यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकानंतर 50 वर्षांनी भारतीय धावपटूला या स्पर्धेत पदक मिळाले, या गोष्टीचा आनंद संपूर्ण देशाला होत होता. माझ्यामुळे देशाच्या गौरवात भर पडली ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानास्पद होती.

प्रश्न - राष्ट्रकुल स्पर्धेनंतर लगेचच संपन्न झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही तुम्ही दोन पदके मिळविलीत. ते अनुभव कसे होते?

- ऑक्टोबरमध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेनंतर नोव्हेंबरमध्ये चीनच्या ग्वांगझाऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. 45 आशियाई देश यांत सहभागी झाले होते. येथे आमचे प्रतिस्पर्धी आफ्रिकी देशातील धावपटू नव्हते, परंतु चीन, जपानच्या निष्णात धावपटूंशी आमचा सामना होता. आशियाई स्पर्धेत धावण्याच्या शर्यतींमधील सर्वाधिक पदके चीन, जपानच्याच धावपटूंना मिळत होती, परंतु राष्ट्रकुलमधील यशानंतर आमचाही आत्मविश्वास दुणावला होता. आमच्या प्रशिक्षकांनी माझी सहकारी धावपटू प्रिजा श्रीधरन आणि मला सांगितले की 10,000 मीटर शर्यत जिंकायची असल्यास धावताना अगदी सुरुवातीपासूनच पहिल्या 4 धावपटूंमध्ये राहायचे. आम्ही तसेच धावलो आणि 10,000 मीटरमध्ये प्रिजा दीदीला सुवर्णपदक आणि मला रौप्यपदक मिळाले. एकाच शर्यतीत दोन भारतीय धावपटूंनी सुवर्ण अन्‌ रौप्यपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर 5000 मीटर शर्यतीतही प्रिजा दीदीने रौप्य आणि मी कांस्यपदक मिळवून भारताचा तिरंगा उंचावत ठेवला.

प्रश्न - राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धांमधील यशानंतर तुम्ही ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ म्हणून महाराष्ट्रात आणि देशात प्रसिद्ध झालात. तुमची कामगिरी बघून तुमच्या कुटुंबीयांना कसे वाटले?

- खूप आनंद झाला. माझे कौतुक, सत्कारसोहळे बघून आई-वडिलांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. माझ्यामुळे आई-वडिलांना हे सुखाचे दिवस अनुभवायला मिळाले, या गोष्टीचे अतीव समाधान वाटते.

प्रश्न - कारकिर्दीतील सर्वाधिक आनंदाच्या क्षणांबद्दल तुम्ही सांगितले. आता तुमच्या कारकिर्दीतील सर्वाधिक निराशादायक क्षण कोणता होता त्याबद्दल सांगावे-

- आनंदाच्या, कौतुकाच्या क्षणांसोबतच आमच्यावरील वाढत्या अपेक्षांची, जबाबदाऱ्यांची जाणीवही झाली. ऑलिम्पिकमध्ये जगातील सर्वोच्च पातळीवरील स्पर्धात्मक खेळाचा अनुभव घेणे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यामुळे 2012 च्या लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे हे आमचे पुढील उद्दिष्ट होते. त्यासाठी भारत सरकारने केनियात सहा महिने आणि इटलीमध्ये तीन महिने आम्हा चार महिला धावपटूंच्या प्रशिक्षणाची सोय केली होती. मात्र परदेशात खडतर प्रशिक्षण अन्‌ अपार मेहनत घेऊनही आम्ही लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकलो नाही, हे दुःखद वास्तव अत्यंत वेदनादायक होते. माझ्या क्रीडा कारकिर्दीतील तो सर्वाधिक निराशादायक क्षण होता. देशाच्या, देशातील करदात्यांच्या पैशांतून आमचे प्रशिक्षण झाले होते. त्याची परतफेड कशी करता येईल हा विचार मनात यायचा. नोकरी मिळविणे, आयुष्यात स्थिरस्थावर होणे, ही उद्दिष्ट्ये तर प्रत्येक मनुष्याची असतात. पण ती उद्दिष्ट्ये पूर्ण झाल्यावर आपण समाजाचे देणे लागतो, समाजाने आपल्याला जे दिलेय त्याची परतफेड आपण करायला हवी हा विचार प्रबळ होतो. त्यामुळेच स्वतःच्या आणि देशवासीयांच्या अपेक्षांची पूर्तता न होऊ शकल्याचे नैराश्य अपरिमित होते. खेळ सोडून निवृत्त व्हावे, असे दुःखद विचार त्याक्षणी मनात येत होते.

प्रश्न - जीवनातील या निराशादायक कालखंडातून तुम्ही कसे सावरलात? त्यासाठी तुम्हाला कुणी मदत केली?

- 2012 मध्ये मला ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला. जवळपास 30 वर्षांनंतर माझ्या रूपाने महाराष्ट्रातील ॲथलिटला अर्जुन पुरस्कार मिळाला, याचे समाधान वाटले. दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराने मनाला उभारी मिळाली. 19 एप्रिल 2013 रोजी श्री.महेश तुंगार यांच्याशी माझा विवाह झाला. माझे पती MSEB मध्ये अभियंता आहेत. पती आणि सासरच्या लोकांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे जीवनातील नैराश्यावर मात करून नव्या जोमाने सराव करण्यास प्रारंभ केला.

प्रश्न - तुमचे अरेंज्ड मॅरेज की लव्ह मॅरेज?

- अरेंज्ड मॅरेज.

प्रश्न - विवाहानंतर तुमचे पती आणि सासरच्या कुटुंबीयांनी तुमचे करिअर घडविण्यास मदत केली का?

- हो, खूप मदत केली. विवाहानंतर आठ दिवसांतच मी राष्ट्रीय क्रीडा शिबिरात रुजू झाले. महत्प्रयासानेही माझ्या नेहमीच्या 5,000 मीटर (5 किमी), 10,000 मीटर (10 किमी)च्या शर्यतींमध्ये मला ऑलिम्पिक पात्रता फेरीची वेळ गाठता येत नव्हती. त्यामुळे 2015 मध्ये 5, 10 किमी शर्यतीत न धावता थेट दीर्घ पल्ल्याच्या 42 किमी मॅरेथॉनमध्ये धावण्याचा निर्णय घेतला. तिशी ओलांडल्यानंतर आपला नेहमीचा इव्हेंट बदलून मॅरेथॉन धावण्यासारखा मोठा निर्णय घेणे अत्यंत धाडसाचेच होते, पण ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे ध्येय गाठण्यासाठी स्वतःच्या कक्षा रुंदावून, परिघाबाहेर जाऊन विचार अन कृती करणे भागच होते. लोक दोन-तीन किलोमीटर चालून थकतात, आम्हाला तर सलग 42 किलोमीटर धावायचे असते, तेही विशिष्ट वेळमर्यादेत. मॅरेथॉन जणू व्यक्तीच्या शारीरिक अन्‌ मानसिक स्वास्थ्याची सत्त्वपरीक्षाच असते. मुंबई मॅरेथॉनमध्ये मी चौथ्या क्रमांकावर राहिल्याने थोडी निराश झाली होती. पण फेब्रुवारी 2016 मध्ये गुवाहाटी येथे संपन्न झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धेत मी मॅरेथॉन पूर्ण करताना 2:38:38 अशी वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळविले आणि त्या सुवर्णपदकासोबतच ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरले! आठ-नऊ महिने केनिया आणि इटलीमध्ये महागडे प्रशिक्षण घेऊनही ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे जे उद्दिष्ट्‌ मी 2012 मध्ये साध्य करू शकले नाही, ते मी 2016 मध्ये नाशिकमध्ये सराव करून साध्य केले. ते केवळ स्वतःच्या जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रमामुळे अन कुटुंबीयांच्या खंबीर पाठिंब्यामुळे.

प्रश्न - ऑलिम्पिक हा जगातील सर्वोच्च क्रीडासोहळा असल्याने ऑलिम्पिकच्या पात्रतेचे निकषही अतिउच्च असतात. जगातील मोजकेच सर्वोत्तम खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळण्याच्या सन्मानास पात्र ठरतात. कविताजी, तिशी ओलांडल्यावर तुम्ही आपला इव्हेंट बदलून मॅरेथॉनसारख्या आव्हानात्मक क्रीडाप्रकारात ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले ही वस्तुस्थिती अत्यंत प्रशंसनीय आहे. रिओ ऑलिम्पिकमधील तुमच्या अनुभवाबद्दल काय सांगू इच्छिता?

- ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि सर्वोच्च जागतिक स्तरावर आपण सर्वोत्तम कामगिरी करायला हवी, असेही प्रत्येक खेळाडूला वाटते. रिओ ऑलिम्पिकमध्ये आम्ही देशासाठी पदक जिंकू शकलो नाही, हे खरे असले तरीही इतकेच म्हणेल की- आमचे प्रयत्न प्रामाणिक होते. ऑलिम्पिकमधील सहभाग हा जीवन समृद्ध करणारा अनुभव होता. उसेन बोल्टसारखे अनेक पदके मिळविणारे खेळाडू असोत, अथवा पदके न मिळालेले खेळाडू, ऑलिम्पिकच्या क्रीडानगरीत सर्वजण एकत्र राहतात, एकत्र जेवण करतात, कुठलाही भेदभाव न मानता ‘वसुधैव कुटुम्बकम’ या वृत्तीने एकमेकांना प्रोत्साहन देतात.

प्रश्न - तुम्ही तुमच्या खेळाव्यतिरिक्त विरंगुळ्यासाठी इतर खेळ खेळता का?

- कधी तरी आम्ही व्हॉलिबॉल वगैरे खेळ खेळतो. पण खरं म्हणजे आमच्यासारख्या दीर्घ पल्ल्याच्या धावपटूंना इतकी मेहनत करावी लागते की आमचा endurance, strength, mileage कसा वाढेल याचाच आम्ही सराव करीत असतो. 100, 200, 400 मीटर अशा कमी पल्ल्याच्या धावपटूंसाठी अनेक पर्याय असतात. आम्हा दीर्घ पल्ल्याच्या धावपटूंना फारसे पर्याय नसल्याने मेहनत करणे अनिवार्य असते.

प्रश्न - खेळाव्यतिरिक्त तुमचे इतर काही छंद आहेत का?

- अनेक महिलांप्रमाणे मलाही स्वयंपाक आणि शॉपिंग करायला आवडते. टीव्ही बघायला मला पूर्वी वेळच नव्हता. पण आता मी मातृत्वामुळे करिअरमधून ब्रेक घेतल्याने थोडाफार रिकामा वेळ मिळतो. माझा मुलगा विहान 4 ऑक्टोबरला दोन वर्षांचा झाला. आता फावल्या वेळात टीव्हीवर काही मनोरंजक मालिका बघते.

प्रश्न - अमेरिका, चीनच्या तुलनेत भारतात खेळांची स्थिती फारशी चांगली नाही. देशात खेळांचा विकास होण्यासाठी काय करायला हवे, असे तुम्हाला वाटते?

- माझ्या मते पुण्यात 2008 मध्ये संपन्न झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेनंतर आणि दिल्लीत 2010 मध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेनंतर देशात खेळांबद्दलची जागृती वाढत आहे. ग्रामीण भागातील बालकांमध्ये प्रचंड प्रतिभा असते. या प्रतिभेला पैलू पाडणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत आपल्या देशात जिल्हापातळीवरील मोठ्या शहरांमध्येच सुसज्ज क्रीडासंकुले असतात. तालुकास्तरावर सुसज्ज क्रीडासंकुले आणि सुनियोजित प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. कारण प्रतिभा कितीही असली तरीही ग्रामीण भागातील प्रत्येक प्रतिभावंताला शहरात येऊन प्रशिक्षण घेणे शक्य नसते. तालुकास्तरावर क्रीडासंकुले उपलब्ध झाल्यास देशात भविष्यात अनेक उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होऊ शकतील.

प्रश्न - आपल्या देशात खेळांचा विकास व्हावा, यासाठी तुमच्या काही योजना आहेत का?

- 2011 पासून नाशिकमध्ये कविता राऊत फाउंडेशन या माझ्या क्रीडा अकादमीतर्फे आम्ही नवीन प्रतिभावंत धावपटूंचा शोध घेऊन त्यांच्या प्रतिभेस पैलू पडण्याचे कार्य करीत आहोत. नाशिकमध्ये ज्यांनी मला प्रशिक्षण दिले होते ते विजेंदर सिंग सर माझ्यासोबत या अकादमीत कार्यरत आहेत. मी स्वतः मला जितके शक्य होईल तितके फिरत असते. शाळांमध्ये, विशेषतः आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगर पालिकेच्या शाळांमध्ये जाणे मी कधीच टाळत नाही. जर माझ्याकडून कुणाला प्रेरणा मिळत असेल, तर माझ्या परिश्रमांचे सार्थकच झाले अशा भावनेने मी कार्यरत आहे. सध्या आमच्या अकादमीत 70 ते 80 उदयोन्मुख धावपटू प्रशिक्षण घेत आहेत. त्यातील काही धावपटू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकले आहेत. उदाहरणार्थ ताई बामणे. दर वर्षी माझ्या वाढदिवशी आम्ही टॅलेंट सर्च स्पर्धा आयोजित करतो. नाशिक जिल्ह्यातील दलपतपूर या आदिवासी पाड्यातील ताई बामणे ही प्रतिभावंत धावपटू या टॅलेंट सर्चमधून आम्हाला गवसली. आमच्या अकादमीत प्रशिक्षण घेऊन ती अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी अन विजयी झाली आहे. 2018 मध्ये अर्जेंटिना येथे संपन्न झालेल्या युवा ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली होती. भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकेल इतकी प्रतिभा तिच्यात आहे. वर्षा चौधरी, संजीवनी जाधव, केतन तडवी या आमच्या अकादमीतील सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेल्या धावपटूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे.

प्रश्न - कविताजी, आता तुम्ही आई झाला आहात. मातृत्वानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला?

- मातृत्वाचा अनुभव निश्चितच फार गोड आहे, परंतु खेळाडू म्हणून माझ्यात काही विशेष बदल झालेला नाहीये. जानेवारीपासून मी पुन्हा सरावाला सुरुवात केली आहे. मी आता 35 वर्षांची आहे. एखाद्या चांगल्या स्पर्धेत चांगली कामगिरी करूनच निवृत्त होण्याचे मी ठरविले आहे. निवृत्तीनंतरही मी खेळाशी संलग्न राहून माझ्या अकादमीच्या माध्यमातून नवीन खेळाडूंच्या प्रतिभेस पैलू पाडून त्यांना जगासमोर आणण्याचे काम करीत राहीन.

प्रश्न - आपल्या देशातील युवकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?

- युवकांना हेच सांगू इच्छिते की, आयुष्यात शॉटकटला यश नसते. त्यामुळे शॉटकट शोधण्याचा प्रयत्न न करता परिश्रम करून यशस्वी व्हा!

(कविताजी, अत्यंत प्रांजळपणे तुमचे मनोगत व्यक्त केल्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद! तुमचे विचार अत्यंत सुस्पष्ट आहेत. जागतिक कीर्ती गाठूनही तुमच्या व्यक्तिमत्त्वात विनम्रता आहे. तुमच्या यापुढील वाटचालीसाठी साधनाच्या सदिच्छा!)

मुलाखत व शब्दांकन : डॉ. प्रगती पाटील

Tags: क्रीडा प्रगती पाटील सावरपाडा ते रिओ ऑलिम्पिक मुलाखत कविता राऊत kavita raut pragati patil rio Olympic weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके