डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दूरदर्शन : पाच दशकांचा दस्तऐवज

मुंबई दूरदर्शनच्या या पाच दशकांच्या वाटचालीचे चार ठळक टप्पे आपल्याला दिसतात. पहिला जडणघडणीचा 1972 ते 1982 वर्षांपर्यंतचा काळ हा कृष्णधवल कार्यक्रमांचा होता. यात केवळ ते प्रक्षेपण रंगीत नव्हते, एवढ्या मर्यादित अर्थाने ते घेता कामा नये- तर प्रगतीचा टप्पा सुरू व्हायच्या आधीचा काळ काही प्रयोग करण्याचा काळ या अर्थाने या दशकाकडे पाहावे लागेल. यात उत्साह होता, उमेद होती. नवलाई असल्यामुळे प्रेक्षक प्रतिसाद जबरदस्त होता. एकीकडे हिंदी चित्रपट, छायागीतसारखे बहुजनकेंद्रित कार्यक्रम- तर दुसरीकडे  ‘प्रतिभा आणि प्रतिमा’, ‘नाटक’, ‘गजरा’सारख्या  मध्यम वर्गीय सुशिक्षित मराठी प्रेक्षकांना भावणारे कार्यक्रम अशा दोन टोकांच्या घाटातील कार्यक्रमांच्या प्रवाहातून दूरदर्शन हे माध्यम कालक्रमण  करत होते. दुसऱ्या टप्प्यात  दूरदर्शन हे लोकप्रियतेच्या अत्त्युच्च शिखरावर विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळते.

मुंबई दूरदर्शनचा जन्म 2 ऑक्टोबर 1972चा. हे दूरदर्शन केंद्र आता सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. 15 सप्टेंबर 1959 रोजी प्रायोगिक स्तरावर सुरू झालेले हे माध्यम. त्यालाही नुकतीच 62 वर्षे पूर्ण झाली. 15 ऑगस्ट 1967  या दिवशी दिल्ली केंद्रावर 5 तासांचे नियमित प्रसारण सुरू करून दूरदर्शनने आपला  विस्तार करण्यास सुरुवात केली. पण खऱ्या अर्थाने भारतीय दूरचित्रवाणीची घोडदौड ही मुंबई दूरदर्शनच्या स्थापनेपासून झाली असे म्हणायला हरकत नाही. कारण मराठीबरोबर हिंदी-इंग्रजी बातम्या, गुजराती, सिंधी भाषांतील कार्यक्रम याच केंद्रावर प्रथम सुरू झाले. बहुभाषिक शहर, बॉलीवुडची राजधानी, आर्थिक राजधानी- अशी मुंबईची ओळख असल्यामुळे  भारतीय दूरदर्शनला जे ग्लॅमर लाभले ते मुंबई दूरदर्शनमुळे.

दूरदर्शन सुरू करण्यामागे काही विशेष उद्दिष्ट होते का, या देशाचे काही माध्यम धोरण होते का, आहे का, त्यात दूरचित्रवाणीला काय स्थान आहे, हे माध्यम आपण त्याच्या पूर्ण क्षमतेने वापरत आहोत का, कार्यक्रम तयार करणाऱ्यांना आणि प्रेक्षकांना या माध्यमाचे कितपत आकलन झाले? याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.  

दूरदर्शन हे माध्यम भारतात सुरू झाले ते योगायोगाने- असे म्हणायाल हरकत नाही. कारण  मुळात आपल्या  देशात टीव्ही सुरू करावा अशी कोणतीही भावना राज्यकर्त्यांची नव्हती; ना बाबू मंडळींची. एक प्रतिष्ठेचे, महागडे साधन म्हणूनच त्याकडे पाहिले जात होते. भारतासारख्या गरीब देशाला हे माध्यम परवडणारे नाही ही मानसिकता आणि पूर्व धारणा ठेवूनच टीव्ही या माध्यमाचा विचार केला गेला. देशासमोर उद्योग, व्यवसाय, शिक्षण या गोष्टी प्राधान्यक्रमात वरच्या  रांगेत असल्यामुळे टीव्हीसाठी काही आर्थिक तरतूद करण्याचा विचारही केला गेला नाही. टीव्ही भारतात आला त्याला एक घटना कारणीभूत ठरली.     

1955 मध्ये दिल्लीत एक औद्योगिक प्रदर्शन भरले  होते. तेव्हा तिथे दाखवण्यासाठी काही व्हिडिओ क्लिप्स तयार करायच्या होत्या. म्हणून फिलिप्स या कंपनीने  काही चित्रीकरण, प्रसारण उपकरणे मागवली होती. त्या प्रदर्शनात प्रथमच  टीव्हीचा छोटा पडदा कसा दिसतो याचे दर्शन काही तंत्रज्ञांना आणि अधिकाऱ्यांना झाले. ही उपकरणे परत न पाठवता ठेवून घ्यावीत असे सरकारी पातळीवर ठरले. 1956 मध्ये आपण यजमानपद भूषवलेल्या युनेस्कोच्या बैठकीत शैक्षणिक गरजांसाठी या माध्यमाचा उपयोग करण्यासाठी पथदर्शक प्रकल्पासाठी  20 हजार डॉलर्सच्या मदतीची तयारी युनेस्कोने दाखवली. यामुळे या माध्यमाच्या वापराबद्दल थोडे उत्साहवर्धक वातावरण तयार झाले.

उपलब्ध यंत्रणेच्या मदतीने 1958 मध्ये दृक्‌श्राव्य लहरी पाठवण्याचा प्रयोग दिल्ली आकाशवाणीच्या कल्पक इंजिनिअर्सनी सुरू केला. दोन-तीन तंत्रज्ञ मदतीला घेऊन 25 टीव्ही संच आणि एक ट्रान्समीटर यांच्या सहायाने श्री व्ही.जी.मुळे यांनी भारतीय दूरचित्रवाणीच्या या पर्वाचा श्रीगणेशा केला. 1959 च्या 26 जानेवारीची दिल्लीतील कवायतही या मंडळीनी दाखवली. मोजक्या दिल्लीकरांनी ती छोट्या पडद्यावर पाहिलीही. हा प्रवास निर्णायक टप्प्यावर येण्याचे संकेतही आणखी एका घटनेने दिले. ते म्हणजे एप्रिल 1959 मध्ये अमेरिकन सरकारने स्टुडिओ उभारणीचे काही साहित्य देणगीदाखल भारताला दिले. पुढेही असे अनेक संच अमेरिकेने आणि युनेस्को यांनी दिले. 15 सप्टेंबर 1959 या दिवशी भारतीय  दूरचित्रवाणी सुरू झाली; ती एक तासाच्या  बहारदार कार्यक्रमाने. वैजयंतीमाला हिचे नृत्य आणि काही सामाजिक माहितीपट यात दाखवले गेले. या कार्यक्रमाच्या निर्मितीची धुरा तेथील निर्माते असलेल्या पु.ल. देशपांडे यांच्या खांद्यावर होती. निर्मिती आणि तंत्रज्ञान या दोन्ही विभागांतील ही दोन मराठी माणसे ही भारतीय दूरचित्रवाणीच्या स्थापनेतील शिल्पकार ठरावीत हा एक सुखद योगायोग आहे. एकूण काय, तर अमेरिकेच्या परकीय देशातील  संस्थांच्या आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यामुळे ‘करून तर बघू या’ या मानसिकतेतून भारतीय दूरचित्रवाणीचा जन्म झाला. इंग्रजीत  Serendipity नावाचा एक चपखल शब्द आहे. त्याचा अर्थ अपघाताने, किंवा ठरवलेले नसताना अचानक झालेला लाभ. आपले  दूरचित्रवाणी हे माध्यम त्याचेच अपत्य आहे असे मानता येईल.

हे माध्यम सुरू करायचे असे काहीच नियोजन नसल्यामुळे कर्मचारी निवड, त्यांची अर्हता, त्यांचे प्रशिक्षण, कार्यक्रमांचा ढाचा, विषयव्याप्ती, प्रेक्षकांचा विचार यांवर तपशीलवार नियोजन याविषयी सर्वोच्च व्यवस्थापनाकडेही फारशी स्पष्टता  तेव्हा नसणे ओघाने आलेच. त्यामुळे वाटचाल थोडी चाचपडतच सुरू झाली. अर्थात एक चांगली गोष्ट झाली. ती म्हणजे सुरुवातीला भरती  केलेल्या निर्मिती आणि अभियांत्रिकी विभागातील मंडळींना तातडीने कार्यक्रम निर्मितीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली गेली. बी.बी.सी.चे अधिकारी आणि जया चंडीराम, भाटिया, जस्वानी यांसारख्या भारतीय प्रशिक्षकांनी दिल्लीच्या मंडी हाऊसमध्ये या नव्याने रुजू झालेल्या मंडळींकडून दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्मितीची मुळाक्षरे गिरवून घेतली. यात प्रामुख्याने तीन-चार कॅमेऱ्यांसह  (मल्टी कॅमेरा सेटअप) स्टुडिओत चित्रीकरण करताना कसे करायचे? बाह्य चित्रीकरण करताना कोणती काळजी घ्यायची? त्याची प्रक्रिया कशी असते? याचे रीतसर शिक्षण दिले. पुढे 1974 पासून पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आणि त्यानंतर अहमदाबादच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरमध्ये दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्मितीचे  प्रशिक्षण नियमित द्यायला सुरुवात झाली.

भारतीय दूरचित्रवाणी माध्यम शैक्षणिक कार्यक्रमासाठी सुरू झाले. पण एका विशिष्ट तत्त्वप्रणालीवर कार्यक्रम बांधणी होताना दिसली नाही. प्रबोधनासाठी टीव्ही नेमका कसा वापरायचा याचीही पुरेशी स्पष्टता दूरदर्शनने दाखवली असेही म्हणत येत नाही. जागतिक स्तरावरील टीव्ही माध्यम संस्कृती वैविध्यपूर्ण सिद्धान्त घेऊन उदयाला आलेली आपल्याला दिसते. युरोपात, रशियामध्ये हे माध्यम तेथील सांस्कृतिक परंपरांशी निगडित राहिलं. हे कार्यक्रम तेथील लोककथा, रूढी, लोकजीवन यांच्याशी नाते सांगणारे होते. ब्रिटिश, डच, इटालियन टीव्ही हा समाजाभिमुख कार्यक्रमांवर अधिक भर देत असे. लोकविकास आणि प्रबोधन ही या माध्यमाची  मुख्य जबाबदारी आहे, हे यांच्या कार्यक्रमांतून प्रतिबिंबित होत असे. अमेरिकन टीव्ही हा चोख व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून कार्यरत राहिला. कोणत्याही तत्त्वप्रणालीशिवाय, सिद्धांतांशिवाय भारतात टीव्ही माध्यम रुजवलं गेलं. माध्यमाची नेमकी दिशा ठरवण्यात प्रसार-भारतीची झालेली गोंधळलेली अवस्था हे याचेच फलित आहे.   

टीव्हीसारखे दृश्यमाध्यम या देशात नवीन असल्यामुळे सुरुवातीला टीव्हीचे मोठे भावंडे असलेल्या  आकाशवाणीमधल्या बऱ्याच मंडळींची इथे नेमणूक करण्यात आली. त्याचाच परिणाम म्हणून की काय कार्यक्रमाचा ढाचा चर्चात्मक कार्यक्रम यांवर भर देणारा राहिला. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत हे कानांनी पाहायचे असते. त्यामुळे रेडिओ माध्यमात ते खुलून येते. पण दृक्‌श्राव्य माध्यमात त्याचा फारसा प्रभाव पडत नाही हे लक्षात घेऊन  दूरदर्शनने संगीतविषयक कार्यक्रमांचे प्रमाण कमी ठेवणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. कार्यक्रम निर्मिती, थेट प्रसारण, बातम्या या प्रकारांबद्दल माहिती असलेल्या या रेडिओच्या मंडळींमुळे इथल्या कामात सुरळीतपणा येण्यास नक्कीच मदत झाली हे नक्की. याशिवाय नाटक, साहित्य, चित्रकला, ललित कला, फिल्म्स डिव्हिजन, एनएसडी यांमधील मंडळींनाही नोकरीची संधी इथे मिळाली. मुंबई दूरदर्शनच्या कुटुंबात अशा रीतीने बहुविध कला शाखांतील व्यक्ती सामील झाल्या. 

दूरदर्शन हे माध्यम प्रेक्षकांनाच काय- कर्मचाऱ्यांनाही नवीन असल्यामुळे कमालीची उत्सुकता दोन्ही बाजूंनी होती. तरीही प्रयोग करत, त्यातून काही शिकत कार्यक्रम तयार होत होते आणि मुंबईकर व आसपासचे नागरिक त्याचा आनंद घेत होते. 1973 च्या ऑक्टोबरमध्ये  पुण्यात सिंहगडावर नवा प्रक्षेपक बसवेपर्यंत मोजक्याच प्रेक्षक संख्येसमोर हे कार्यक्रम जात होते. त्यामुळे यातील बहुसंख्य कार्यक्रमांचा तोंडवळा शहरीच राहिला. अजूनही तो फारसा बदलला नाही. पण त्यामुळे हे माध्यम एका विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करते अशी ओळख निर्माण होऊ लागली. अर्थात ‘आमची माती आमची माणसं, ‘कामगार विश्व’, लोक संगीत, ज्ञानदीप अशा सर्व सामान्यांना व्यासपीठ देणाऱ्या कार्यक्रमांनी दूरदर्शनचा चेहरा थोडा बहुजन आणि सर्वव्यापी करण्याचा प्रयत्न केला. पण एकूण सत्ता मात्र अभिजनांचीच राहिली. याचे मुख्य कारण असे की, येथे तयार होणारे  बहुसंख्य कार्यक्रम हे त्या त्या निर्मात्याच्या आवडीनिवडीनुसार तयार होत होते. यामागे शहरी-ग्रामीण प्रेक्षक, त्यांची वैविध्यपूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमी याचा विचार फारसा झाला नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र क्वचितच या कार्यक्रमांतून प्रतिबिंबित झाला.

एखाद्या  कार्यक्रमाची निर्मिती का करायची, त्याचे उद्दिष्ट, त्याची व्याप्ती, संहिता यांवर वरिष्ठ व्यवस्थापनाने  अपेक्षित पर्यवेक्षण केले नसल्यामुळे वरवर लोकप्रिय वाटणारे कार्यक्रम म्हणावे तसे प्रातिनिधिक झाले नाहीत. निर्मितीचे स्वातंत्र्य दिलेच पाहिजे हे मान्य. पण ते माध्यमाच्या मुख्य धोरणाच्या परिघात असायला हवे. त्यातील आशय, अभिव्यक्ती, सादरीकरण, घाट यांची सखोल चर्चा  होऊन त्याला मंजुरी देणे अपेक्षित असते. पण तसे न होता अनेक कार्यक्रम सादर झाले. त्यामुळे बहुसंख्य प्रेक्षकांच्या आवडीनिवडींपेक्षा निर्मितीकारांनी तयार केलेले ‘स्वान्तसुखाय कार्यक्रम’ - असे स्वरूप त्यांना आले.

मुंबई दूरदर्शनच्या या पाच दशकांच्या वाटचालीचे चार ठळक टप्पे आपल्याला दिसतात. पहिला जडणघडणीचा 1972 ते 1982 वर्षांपर्यंतचा काळ हा कृष्णधवल कार्यक्रमांचा होता. यात केवळ ते प्रक्षेपण रंगीत नव्हते, एवढ्या मर्यादित अर्थाने ते घेता कामा नये- तर प्रगतीचा टप्पा सुरू व्हायच्या आधीचा काळ काही प्रयोग करण्याचा काळ या अर्थाने या दशकाकडे पाहावे लागेल. यात उत्साह होता, उमेद होती. नवलाई असल्यामुळे प्रेक्षक प्रतिसाद जबरदस्त होता. एकीकडे हिंदी चित्रपट, छायागीतसारखे बहुजनकेंद्रित कार्यक्रम- तर दुसरीकडे  ‘प्रतिभा आणि प्रतिमा’, ‘नाटक’, ‘गजरा’सारख्या  मध्यम वर्गीय सुशिक्षित मराठी प्रेक्षकांना भावणारे कार्यक्रम अशा दोन टोकांच्या घाटातील कार्यक्रमांच्या प्रवाहातून दूरदर्शन हे माध्यम कालक्रमण  करत होते. दुसऱ्या टप्प्यात  दूरदर्शन हे लोकप्रियतेच्या अत्त्युच्च शिखरावर विराजमान झालेले आपल्याला पाहायला मिळते. राज्यात वाढत जाणारी  टीव्ही संचांची संख्या, प्रक्षेपकांच्या संख्येत हळूहळू का होईना होणारी वाढ- त्यामुळे प्रेक्षकांची वाढती संख्या याला कारणीभूत ठरली. दूरदर्शनच्या कार्यक्रमांत मालिका नावाच्या अद्भुत अशा फॉर्म्सनी जोरदार मुसंडी मारल्यामुळे हा छोटा पडदा घराघरांतील एक लाडका सदस्यच होऊन गेला. 

तिसरा टप्पा मात्र आव्हानात्मक ठरला. नरसिंह राव सरकारने जागतिक स्पर्धेत उभे राहण्यासाठी उदारमतवादी धोरण स्वीकारले. त्यातून अनेक परदेशी वाहिन्याही  भारताच्या मातीत रुजू लागल्या. यातून सीएनएनसारख्या वृत्तवाहिन्या आणि स्टारचे ‘बोल्ड आणि ब्युटीफुल’ कार्यक्रम पाहून भारतीयांच्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाविषयीच्या अपेक्षा वाढल्या. त्या पूर्ण करण्याइतपत आपण सक्षम नसल्यामुळे आणि तोपर्यंत स्पर्धेची सवय नसल्यामुळे दूरदर्शन थोडे हडबडून गेले. त्यात अनेक वर्षे चर्चेत असलेली स्वायत्तताही 1997 मध्ये अस्तित्वात आली. प्रसार भारती नावाच्या तकलादू आणि कळाहीन संस्थेच्या पंखांखाली दूरदर्शनला आसरा घ्यावा लागला. स्पर्धेचे मोठे वादळ घोंघावत असताना या आभासी आडोशाखाली दूरदर्शनवर गारठून जाण्याची वेळ आली. खर्चाला कात्री आणि उत्पन्नवाढीचा धोशा या गजरात-मुंबई दूरदर्शनचे व्यक्तिमत्त्व झाकोळून गेले. 

चौथा टप्पा म्हणजे सुमारे 2010 पासूनचा. या टप्प्यात अनेक कर्मचारी, कार्यक्रम अधिकारी सेवानिवृत्त झाले. पण त्या जागी नवीन नेमणुका न करता अननुभवी कंत्राटी मंडळींच्या ताब्यात सूत्रे दिली गेली. गेल्या 10-12 वर्षांत कोणतीच भरती न झाल्यामुळे त्याचा  विपरीत परिणाम कार्यक्रम निर्मितीवर झाला. सामर्थ्य असलेल्या  कार्यक्रमांचे आपले क्षेत्र ओलांडून, गप्पा-गाणी-नाच यांत हे माध्यम बुडून गेले. ‘प्रतिभा आणि  प्रतिमा’सारख्या कार्यक्रमांना पुनरुजीवित करण्यात आले खरे. पण प्रतिभावान कोणाला म्हणायचे याची प्रगल्भता दाखवण्यात सातत्य न राहिल्याने मूळ कार्यक्रमातील ‘बौद्धिक धागा’ हा कळीचा मुद्दा लक्षात न घेतल्यामुळे एके काळचा गाजलेला कार्यक्रमही एक निव्वळ गोड गोड मुलाखतींचा कार्यक्रम झाला. 

दूरदर्शनने बराचसा वेळ हा प्रायोजकांना देऊन, केवळ पोस्टमनची भूमिका बजावण्यात धन्यता मानली. एवढे करूनही उत्पन्नवाढीचा मनसुबाही यशस्वी झालेला दिसत नाही. अगदी अलीकडचे आकडे पाहा.2017-18 मध्ये 607  कोटी रुपये उत्पन्न मिळाले. पुढे ते घसरून 2018-19 मध्ये 553 कोटींवर पोहोचले. 2019-20 ला तर 348 कोटींचा आकडा गाठता गाठता दूरदर्शनची दमछाक झाली. आपली प्रकृती न ओळखता कार्यक्रमाच्या रचनेत केलेले हे बदल दूरदर्शनला खाजगी वाहिन्यांच्या स्पर्धेत शेवटच्या बाकावर घेऊन गेले.

प्रेक्षक हा आपला सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. त्याला केंद्रस्थानी ठेवून कार्यक्रम तयार करताना शिक्षण, माहिती आणि मनोरंजन या क्रमाशी प्रतारणा न करता निर्मिती व्हायला हवी ही भूमिका दूरदर्शनने घेतली नाही. मनोरंजन म्हणजे धांगडधिंगा, मनोरंजन म्हणजे बाजारू विनोद ही समजूत पक्की करणारे कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांच्या अभिरुचीची परीक्षाच या एके काळच्या सुसंस्कृत माध्यमाकडून पाहिली गेली. प्रेक्षक संशोधन नावाचा विभाग केंद्रावर कार्यरत होता. पण एक व्यवस्थेचा भाग म्हणून, एक औपचारिकता म्हणूनच त्याचे अस्तित्व राहिले. सखोल राज्यव्यापी प्रेक्षक संशोधन प्रकल्प दूरदर्शनने कधी हाती घेतला नाही. कोणते कार्यक्रम किती पाहिले जातात याचे संशोधन सध्या दूरदर्शन करताना दिसते; पण यात ते काय पाहतात आणि त्यांच्या नेमक्या सांस्कृतिक शैक्षणिक गरजा काय आहेत याचे संशोधन होत नाही. त्यामुळे केवळ ‘डोकी मोजणे’ एवढेच काम या संशोधनातून होताना दिसते. 

निर्मितीच्या काळातच काही नियोजनबद्धता नसली की त्या संकल्पनेत काही त्रुटी राहून जातात. आणि ही कमतरता केवळ निर्मिती प्रक्रियेतील घटकांचीच नसते. तर ज्या तत्त्वावर, सिद्धांतावर ती उभी असते त्यांचीही असते आणि मग याचा त्रास आणि तोटा कायमस्वरूपी पिंगा घालत राहतो. हे केवळ वस्तूंना, उत्पादनांनाच लागू असते असे नाही. तर संस्था, प्रयोगशाळा, देशव्यापी मोठे प्रकल्प यांनाही ते तेवढेच लागू होते. आपल्या दूरदर्शनलाही काही प्रमाणात व्यवस्थापन निर्मिती आणि प्रेक्षक गरजा, संशोधन या बाबतीत या कमतरतेचा फटका सोसावा लागला.

खाजगी वाहिन्यांच्या सुळसुळाटामुळे या दृश्यमाध्यमाचे  व्याकरणच  आता  बदलून गेले आहे. बुद्धी, समज, वाचन, अवलोकन यांत सुमारांची सद्दी वाढल्यामुळे  एके काळचे  मनोरंजन  नावाचे  नवनीत  आता  ‘फुळुक पाणी’ ताक  होऊन पुढ्यात येते आहे.  गेल्या 10-15 वर्षांत ‘एक घर एक टीव्ही’ ही संकल्पना  बदललेली आपण पाहिली. दिवाणखान्यात एक टीव्ही, सोफासेट आणि त्याचा आनंद घेणारे कुटुंब- हे चित्र आता धूसर होऊ लागले आहे.

संगणक क्रांतीनं हे चित्र आता पूर्णपणे अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. आज नेट फ्लिक्स, प्राइम, हॉटस्टार, झी-5, यांसारखी तगडी व्यासपीठे  प्रेक्षकाभिमुख कार्यक्रम घेऊन येत आहेत. छोटा पडदा अजून छोटा झाला आहे. मोबाइल संस्कृतीने आपल्या सर्व जुन्या तांत्रिक चौकटींना हद्दपार केले आहे. यूट्यूबसारख्या संकेतस्थळाची समाजमानसाला पडलेली भुरळ आणि त्यातून उपलब्ध असलेले करमणुकीचे आणि ज्ञानप्राप्तीचे लाखो पर्याय हे टीव्हीसारख्या पारंपरिक माध्यमासमोर नव्याने आव्हाने उभी करत आहेत. 

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या देशात सांस्कृतिक धोरण नावाची गोष्टच अस्तित्वात नसल्यामुळे   जयंती साजरी करणे आणि शताब्दीला पोस्टाचे तिकीट काढणे या पलीकडे आपली संस्कृतीची व्याख्या जात नाही. संस्कृती हा सर्वव्यापी आणि शिक्षणाला  व  प्रबोधनाला प्रोत्साहन देणारा मुद्दा माध्यम-व्यवहारात, माध्यम-आशयात कधी समाविष्ट झालाच नाही. यातून थोडे भरकटलेपण या माध्यमांना सोसावे लागले आणि पर्यायाने आपल्या प्रेक्षकांनाही. 

अर्थात यामुळे  मुंबई दूरदर्शनने गेल्या 49-50 वर्षांत दिलेले  मोठे योगदान आपण विसरता कामा नये. अतिशय अविस्मरणीय असे कार्यक्रम या माध्यमाने दिले. साहित्य, संस्कृती, ललित कला, संगीत या विषयांवर उत्तम कलाकृती तयार केल्या; पण हे सगळे स्मरणरंजन म्हणून समोर येणे क्लेशदायक आहे. 

‘‘पूर्वी काय कार्यक्रम असायचे नाही दूरदर्शनवर..?’’ हे वाक्य अनेकांकडून ऐकताना आज तसे ते नाहीत हा त्यातून अप्रत्यक्षपणे व्यक्त होणारा उत्तरार्ध अधिक अस्वस्थ करणारा आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना मुंबई दूरदर्शनने आपल्या गतवैभवाच्या भांडवलावर समाधानी न राहता मराठी प्रेक्षकांसाठी अधिक अर्थपूर्ण, ज्ञान आणि मनोरंजन यांचा उत्तम मिलाप असलेला आशय सातत्याने द्यायला हवा. उत्पन्न मिळवण्याच्या सक्तीतून या माध्यमाला मुक्त करायला हवे. प्रेक्षकांना शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करणे  हे ध्येय ठेवले तर ‘डोळ्याने चघळण्याचे चुइंगम’ अशी त्याची ओळख पुसून एक सशक्त, कलात्मक, प्रगल्भ प्रबोधनाचे माध्यम म्हणून जनमानसात ते रुजवणे आजही शक्य आहे. 
 

Tags: दूरदर्शनचा इतिहास दूरदर्शन weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

केशव साठ्ये
keshavsathaye@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके