डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘उभ्या पिकातलं ढोर’ : अंतर्मुख होणंही कठीण करणारे पुस्तक

दांभिकता, खोटेपणा, वैचारिक मागासलेपण याबद्दल लेखकाला मनापासून चीड आहे. सुशिक्षित म्हणवणारा समाज मागे-मागे जाताना पाहून तो मनातून हबकून आणि हादरून जातोय. ते तो इथे मांडतोच, शिवाय,शिक्षणाची सद्य:स्थिती, राजकारणाची अवस्था, साहित्य-क्षेत्रातील भामटेगिरी, भाषेचे भवितव्य, गरीब आणि श्रीमंत यामध्ये वाढत जाणारी दरी, मैत्री- नातेसंबंध यामध्ये सैल होत जाणारे धागे त्याला अस्वस्थ करतात. समाजाला आरसा दाखवण्याचे काम हे पुस्तक करते.  सामाजिक पर्यावरण हा केंद्रबिंदू ठेवून यातील लेखन झाले असल्यामुळे मुद्दे व विषय यांमध्ये काही ठिकाणी तोचतोपणा आला आहे, तरीही लेखनशैली आणि त्यातील प्रामाणिकपणा यामुळे हे किरकोळ दोष पुस्तकाच्या आशयावर मात करत नाहीत. 
 

अवधूत परळकर हे नाव मराठी वाचकांना नवे नाही.  दहा वर्षांपूर्वी त्यांनी साधना साप्ताहिकात सातत्याने पाच-सात वर्षे सदर लेखन केले. ‘आवाज’ या विनोदी दिवाळी अंकात अनेक वर्षे सातत्याने लिहिणारे लेखक म्हणून ते परिचित आहेत. पण मार्मिकपणे सौम्य विनोदाची पखरण करत केलेल्या, विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या सामाजिक आशयाच्या लेखनाचेही वाचकांनी चांगले स्वागत केले. ‘अंतर्नाद’ या मासिकात त्यांनी ‘अनवधानाने’ या सदरात लिहिलेले लेख याचे साक्षीदार आहेत. याच सदरात प्रसिद्ध झालेल्या 28 निवडक लेखांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. ‘उभ्या पिकातलं ढोर’ हे या लेखसंग्रहाचं नाव. यातील पीक म्हणजे आपल्या आजूबाजूचं समृद्ध जीवन, नव्या तंत्रज्ञानाने लाभलेले पर्यावरण, आपल्या आयुष्याची चौकट आणि ढोर म्हणजे आपले मन. या रूपकाचा चपखल वापर करून हे ढोर किती भयंकर आहे आणि ते काय काय उद्‌ध्वस्त करत जाते, याचा लेखाजोखा लेखकाने यात मांडला आहे. यातील काही शीर्षके वाचली तरी आपल्याला यातील वैविध्यपूर्ण लेखनाची कल्पना येते. ‘की बदलून गेली आहे व्याख्या बदलाची’, ‘जातपात आवडे सर्वांना’, ‘लहान-सहान बलात्कार’, ‘सर्वसामान्य मराठी माणूस’, ‘लुळी-पांगळी श्रीमंती’, ‘यादीतून वगळलेली माणसे’ अशा शीर्षकांच्या लेखांतून सामाजिक वर्तणुकीवर लेखक नेमका प्रकाशझोत टाकतो.

खरे म्हणजे मनात येणारे काहीबाही विचार याबद्दल आपणही बऱ्याच वेळा चिंतन केलेले असतेच की. या लेखातील अनेक मुद्दे, घटना आपल्या अनुभवाशीही तंतोतंत जुळतात. पण फरक एवढाच की, हा लेखक ते अतिशय मुद्देसूदपणे-प्रवाहीपणे मांडतो. शिवाय यात प्रबोधन व्हावे हा आग्रह नाही, ना प्रवचनाचा सोस. त्यामुळे आपण हे कोणताही अनावश्यक ताण न घेता वाचत जातो.

‘जिथे पुरोगामी ही शिवी आहे’ या शीर्षकाकडे पाहतानाच आपण कॅमेरा कुठे ठेवला आहे, हे लेखक सांगून टाकतो. पुरोगामित्व यावर समाजमाध्यमात तुंबळ युद्ध सुरू असलेले आपण नेहमीच पाहतो. पण या लेखात पुरोगामी मंडळींची होणारी वंचना मांडताना हा हातात तलवार न घेताही अतिशय टोकदारपणे पुरोगामित्व म्हणजे काय ते सांगतो. पुरोगामित्वाचा जयजयकार न करताही त्याचे मोल वाचकांच्या लक्षात आणून देण्यात लेखक यशस्वी झाला आहे. वस्तुनिष्ठतेवर आधारित विचारधारा असली म्हणजे आपल्याला काय म्हणायचे आहे, हे नक्की माहिती असते आणि ते सांगताही येते. असे लेखन वाचकांपर्यंत बऱ्यापैकी पोहोचू शकते याचा अनुभव हे पुस्तक वाचताना येतो. अतिशय सोप्या-साध्या शब्दांतून, विचारवंताचा कोणताही आव न आणता केलेलं हे लेखन आहे. शेजारच्या घरात एखादा जाणकार माणूस चार भल्या गोष्टी सांगत आहे आणि त्या आपल्या कानांवर पडल्या तर काय होईल? अगदी त्याच सहजतेने या गोष्टी या पुस्तकातून आपल्या गळी उतरतात. कथनाची शैली असली म्हणजे छापील शब्दही ध्वनी बनून आपल्या कानांशी गुजगोष्टी करतात याचा रोकडा प्रत्यय यात येतो.

‘मी चोवीस तास’सारख्या लेखातून सतत सेल्फी काढण्यात मग्न असलेल्या, मी-मी करणाऱ्या मंडळींबद्दल लेखक सांगू पाहतो. पण यात तो त्यांची टर उडवत नाही, तर सहानुभूतीने या मानसिकतेकडे पाहतो. माणसात असणार वैगुण्य, स्वभावदोष, माणसाची वृत्ती यासाठी तो सर्वस्वी त्याला जबाबदार ठरवत नाही; तर त्याच्या आजूबाजूच्या संस्कृतीचा, संस्कारांचा त्यावरचा प्रभाव त्याला मान्य आहे. एखादा माणूस दारुडा आहे म्हटले की, 99 जण त्याला शिव्याशाप देतात. पण एखादा माणूस त्यामागची शास्त्रीय कारणे मान्य करत त्यातून याची सुटका शास्त्रीय पद्धतीने कशी करता येईल, याचा विचार करतो. लेखकाची ही समजून घेण्याची, समुपदेशनाची भूमिका यातील लेखांना एक वेगळे परिमाण देते. ‘न सांगता येण्यासारख्या गोष्टी’, ‘दगडाचे ज्याच्या हाती वेगाने होते फूल’ अशा आकर्षक शीर्षकांचे लेख यात आहेत. बऱ्याच वेळा शीर्षक आणि आशय यात विसंगती आढळते. पण इथे मात्र तशी फसवणूक होत नाही. उत्तम शीर्षके आणि शीर्षकांना न्याय देणारा तेवढ्याच ताकदीचा आशय हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

दांभिकता, खोटेपणा, वैचारिक मागासलेपण याबद्दल लेखकाला मनापासून चीड आहे. सुशिक्षित म्हणवणारा समाज मागे-मागे जाताना पाहून तो मनातून हबकून आणि हादरून जातोय. ते तो इथे मांडतोच, शिवाय शिक्षणाची सद्य:स्थिती, राजकारणाची अवस्था, साहित्यक्षेत्रातील भामटेगिरी, भाषेचे भवितव्य, गरीब आणि श्रीमंत यामध्ये वाढत जाणारी दरी, मैत्री-नातेसंबंध यामध्ये सैल होत जाणारे धागे त्याला अस्वस्थ करतात. समाजाला आरसा दाखवण्याचे काम हे पुस्तक करते. पण यापुढे जाऊन त्यावर उपाययोजना सुचवण्याचे, त्यातून सोडवणूक कशी करावी हे सांगण्याच्या भानगडीत हे पुस्तक पडत नाही आणि हेच या पुस्तकाचे एक वेगळेपण म्हणत येईल.

लेख नेमक्या शब्दांत असला की, त्यातील मार्मिकता छान टिकते. पण सदरासाठी लिहिताना कमीत कमी शब्द हेसुद्धा ठरलेले असतात, त्याचा थोडा दुष्परिणाम यातील काही लेखांवर झाला आहे. सामाजिक पर्यावरण हा केंद्रबिंदू ठेवून यातील लेखन झाले असल्यामुळे मुद्दे व विषय यांमध्ये काही ठिकाणी तोचतोपणा आला आहे, तरीही लेखनशैली आणि त्यातील प्रामाणिकपणा यामुळे हे किरकोळ दोष पुस्तकाच्या आशयावर मात करत नाहीत. आपण कसे दिसतो आणि कसे दिसले पाहिजे, याचे भान आरसा दाखवल्यानंतरही आपल्याला येणार नसेल, तर ‘उभ्या पिकातलं ढोर’ तिथेच कायम ठाण मांडून बसणार, ही भावना हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला अधिक अस्वस्थ करते.

उभ्या पिकातलं ढोर
लेखक : अवधूत परळकर
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
पृष्ठे : 184 (पुष्ठा बांधणी); मूल्य : रु. 200

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

केशव साठ्ये
keshavsathaye@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके