डिजिटल अर्काईव्ह

केशवराव ब्रिटनला गेले आणि नेमके त्याच काळात राजन हर्षे साधनाच्या आणि आमच्या ओळखीचे झाले. डॉ. हर्षे गेल्या वर्षभरात भेटले एकदाच, पण त्यानंतर त्यांनी बारा लेख लिहिले आणि त्या निमित्ताने त्यांच्याशी छत्तीस वेळा फोनवर बोलणे झाले. ते स्वतः कुलगुरू होते अलाहाबाद विद्यापीठाचे, त्यालाही 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' म्हटले जाते. आणि त्यांच्या लेखमालेतून आलेल्या पुस्तकाचे नाव ठरले 'पक्षी उन्हाचा सात विद्यापीठांच्या आवारात'. दोन आठवड्यांपूर्वी या पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि त्यावर चर्चाही झाली. तेव्हा केशवरांची आठवण जास्त तीव्रतेने झाली आणि मग ठरवलं, केशवरावाशी संपर्क करावा.

प्रिय वाचक,

डेक्कन कॉलेजच्या स्थापनेला 200 वे सुरू झाले तेव्हा म्हणजे 6 ऑक्टोबर 2020 च्या भल्या पहाटे डेक्कन कॉलेजच्या परिसरात केशवराव पहिल्यांदा भेटले आणि त्यानंतरचे दोनेक वर्षे अधून-मधून भेटतच राहिले. त्या भेटी भल्या पहाटे आणि एकांतातच व्हायच्या. त्याच वेळी त्या परिसरात अन्य कोणी फिरायला आलेले असेल तर केशवराव आम्हाला दिसायचेच नाहीत. आमच्या त्या अकरा भेटीतील संवाद या संपादकीय जागेवर आम्ही मुलाखत स्वरूपात प्रसिद्ध करीत राहिलो आणि वाचकांनाही ते बऱ्यापैकी रोचक वाटत राहिले. साहजिकच होते ते, वयाची दीडशे वर्षे कधीच पार केलेली असल्याने आणि कर्तव्यबुद्धी व विनोदबुद्धी अद्याप शाबूत असल्याने, मागील सव्वाशे वर्षांचा या देशाचा जिवंत पट केशवरावांच्या मनात घोळत असायचा, मात्र त्यांना रस असायचा तो वर्तमानात. वर्तमान राजकीय, सामाजिक घटनांच्या संदर्भात ते जे काही भाष्य करायचे किंवा बिटवीन द लाईन्स सांगायचे किंवा सूचित करायचे, ते मार्मिक असायचे. प्रश्नांची उत्तरे ते बहुतांश वेळा त्रोटकच द्यायचे, अनेक वेळा तर त्यांच्या उत्तरांत प्रतिप्रश्नच असायचे, पूर्वाश्रमीचे न्यायाधीश असल्याने कदाचित. पण तरीही त्यांची मुलाखत वेगळे समाधान देऊन जायची, विचार करायला प्रवृत्त करणारे असे काही तरी त्यातून मिळायचेच. तर असे हे केशवराव, 2022 च्या डिसेंबरमध्ये ब्रिटनला निघून गेले, आणि मग त्यांच्या भेटी थांबल्या. नंतरच्या वर्षभरात त्यांची आठवण अधून-मधून येतच राहिली; विशेषतः सभोवताली खूपच गोंधळाचे वातावरण असले तर वाटायचे, केशवरावांची एखादी मुलाखत घ्यावी आणि वाचकांना सादर करावी. त्यातून ठोस उत्तरे मिळतील असं नाही, पण थोडा रिलीफ मिळेल. अनेक वाचकांनाही अगदी तसेच वाटत असावे, कारण या वर्षभरात विविध ठिकाणच्या अनेक वाचकांनी आमच्याशी सहज बोलता बोलता केशवरावांची आठवण हळुवार मनाने काढली. तेव्हा आम्हाला कळले, आपण समजत होतो त्यापेक्षा जास्तच वाचकांच्या मनात केशवराव रुजलेत.

मात्र गेल्या महिन्यात त्यांची आठवण जरा जास्तच तीव्रतेने झाली. त्याला कारणही तसेच घडले. केशवराव ब्रिटनला गेले आणि नेमके त्याच काळात राजन हर्षे साधनाच्या आणि आमच्या ओळखीचे झाले. डॉ. हर्षे गेल्या वर्षभरात भेटले एकदाच, पण त्यानंतर त्यांनी बारा लेख लिहिले आणि त्या निमित्ताने त्यांच्याशी छत्तीस वेळा फोनवर बोलणे झाले. ते स्वतः कुलगुरू होते अलाहाबाद विद्यापीठाचे, त्यालाही 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' म्हटले जाते. आणि त्यांच्या लेखमालेतून आलेल्या पुस्तकाचे नाव ठरले 'पक्षी उन्हाचा सात विद्यापीठांच्या आवारात'. दोन आठवड्यांपूर्वी या पुस्तकाचे प्रकाशन झाले आणि त्यावर चर्चाही झाली. तेव्हा केशवरांची आठवण जास्त तीव्रतेने झाली आणि मग ठरवलं, केशवरावाशी संपर्क करावा. पण त्यांनी स्वतःचे संपूर्ण नाव आणि पुण्यातला पत्ताही कधी सांगितलेला नव्हता, तर मग ब्रिटनमधला समजण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र एक धागा हाती लागला, तो म्हणजे, जाताना ते म्हणाले होते, 'मी चाललोय पणतीकडे आणि ती असते ऑक्सफर्डमध्ये, गणिताची प्राध्यापक.' एका बेसावध क्षणी त्यांच्याकडून हे तपशील सांगितले गेले असावेत.

तर त्यांची पणती, ऑक्सफर्डमध्ये, गणिताची प्राध्यापक हा धागा लक्षात ठेवून आम्ही ऑक्सफर्डमधील गणिताच्या प्राध्यापक असलेल्या महाराष्ट्रीय व भारतीय महिला कोण आहेत याचा शोध घेतला आणि धडाधड मेल टाकले, भारतीय वंशाच्या अन्य प्राध्यापकांनाही मेल टाकले, केशवराव नावाची व्यक्ती तुमच्यापैकी कोणाची नातेवाईक आहे का? सर्व बाजूंनी नकारघंटा आली. नंतर लक्षात आले की, त्यांची पणती ब्रिटिश किंवा अन्य वंशाची असेल तर? आणि तो होरा बरोबर ठरला, आफ्रिकन अमेरिकन वंशाची आई आणि आशियाई युरोपियन वंशाचे वडील अशा कुटुंबातील एका प्राध्यापक महिलेने कळवले की, केशवराव तिचे पणजोबा आहेत. मात्र अधिक चौकशी करायला लागलो तर तिने सांगितले, 'पणजोबांना स्वतःचे खासगीपण सोडायचे नाही, म्हणून ते तपशील तुम्हाला सांगता येणार नाहीत.' आम्ही म्हणालो, 'ते ठीक आहे; पण ते व्यवस्थित राहताहेत ना तिथे?' तर ती बेसावध क्षणी म्हणाली, "ते पुन्हा भारतात आलेत, कालचा ख्रिसमस संपला आणि ते लगेच निघाले; आम्ही खूप आग्रह केला, थांबा आता इथेच, तर म्हणाले 2024 सुरू होण्यापूर्वी मला भारतात जायलाच हवे..."

आम्ही तो फोन तसाच ठेवला आणि पहाट होण्याची वाट पाहू लागलो. आणि मग 2023 वर्ष समाप्तीच्या आदल्या दिवशी भल्या पहाटे डेक्कन कॉलेजात गेलो, तर नेहमीच्या बाकड्यावर केशवराव दिसले. क्षितिजाकडे नजर लावून बसलेले, अगदी वर्षभरापूर्वी दिसले होते तसेच. गेलो, 'वेलकम केशवराव' असे मोठ्या आवाजात म्हणालो. तेव्हा ते थोडेसे दचकले, पण लगेच सावरले. त्यांनी हलकेसे स्मित दिले आणि मग झालेला संवाद असा...

प्रश्न: केशवराव, गेल्या वर्षी ब्रिटनमध्ये जाण्यापूर्वी भेटलात, तेव्हा आम्हाला वाटले होते की, बहुदा ही आपली शेवटची भेट. ब्रिटन खूप तुम्हाला आवडेल असाच अंदाज होता आणि ब्रिटनमध्येच मृत्यू होईल असेही वाटत होते आम्हाला...
उत्तर : ज्या ब्रिटनने या देशावर दिडशे वर्षे राज्य केले, तो देश आम्हाला इतका कसा आवडेल? आणि मरायचे असेल तर आम्ही आमच्या मातृभूमीत का मरू नये? 

प्रश्न : पण तुम्ही भारतात परतलात ते अतिशय कठीण काळात, 2024 हे वर्ष सुरू होते आहे आता. आणि या वर्षाच्या पोटात काय दडले आहे, या विचाराने अनेकांच्या पोटात गोळा येतो आहे.
उत्तर : देश अडचणीत असताना काही लोक देश सोडून जातात त्यात वावगे नाही वाटत आम्हाला, मात्र देश अडचणीत असताना आपल्या देशात थांबणे किंवा परत येणे हेच खऱ्या देशभक्तीचे लक्षण आहे असे नाही वाटत तुम्हाला?

प्रश्न : वाटते की, निश्चितच वाटते! पण आम्हाला वाटले, ब्रिटनमध्ये राहून इथल्या बातम्या वाचून तुम्ही वैतागून गेले असणार. आणि अशा देशात परत जाण्यापेक्षा मरण पत्करणे बरे असे तुम्हाला वाटले असेल.
उत्तर : तुम्ही आम्हाला इतके अर्धवट समजताय का? अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य मावळल्याचे पाहणारे आम्ही लोक, हे कसे विसरलात?

प्रश्न : तर सांगा ना मग, 2024 च्या पोटात दडलेय काय?
उत्तर : तुमच्यावर 'सामना' चित्रपटाचा नको तितका जास्त प्रभाव दिसतोय. 'या टोपीखाली दडलंय काय', हे गाणं आता कालबाह्य झालं आहे.

प्रश्न : आमच्यावर सामनाचा प्रभाव जरा जास्तीच आहे खरा, पण वयाच्या 18 व्या वर्षी पाहिलेल्या कलाकृतीचा राहतोच ना?
उत्तर : मग त्यातले मास्तरांच्या तोंडी असलेले वाक्य विसरलात वाटतं? 'जेव्हा कुठल्याही साम्राज्यावर सूर्य उगवतो तेव्हा तिथे तो केव्हा ना केव्हा मावळणार हे निश्चित असतं.'

प्रश्न : म्हणजे भारतीय राज्यावर आता जो काही सूर्य उगवला आहे तो मावळणार हे निश्चित?
उत्तर : हो, तो मावळणारच! पण तुम्ही शब्द जरा जपून वापरा, तुमचेच लोक भडकतील तुमच्यावर. किमान 'काळा सूर्य' असा तरी शब्दप्रयोग करा.

प्रश्न : बरे झाले, सावध केलेत. पण सांगा ना, हा काळा सूर्य 2024 या वर्षी मावळणार की 2029 मध्ये?
उत्तर : जनतेला पुरेसा तापदायक वाटत नाही, तोपर्यंत सूर्य मावळत नसतो. 

प्रश्न : तुम्ही तापदायक म्हणताय, प्रत्यक्षात तो दाहक झाला आहे; तुम्हाला काय जनतेने भाजून निघणे अपेक्षित आहे?
उत्तर : तुम्हाला आणि तुमच्यासारख्या मूठभरांना तसे वाटत असेल, कारण तुमची सहनशक्ती खूप कमी आहे.

प्रश्न : म्हणजे जनतेची सहनशक्ती जबरदस्त आहे असे म्हणायचेय का तुम्हाला?
उत्तर : म्हणता येईल तसे. पण अगदीच असह्य झाल्याशिवाय किंवा दुसरी बाजू अगदीच सुसह्य वाटल्याशिवाय जनता बदल करू इच्छित नसते.

प्रश्न : अच्छा, म्हणजे अगदी थेटच बोलायचे तर, आपले पंतप्रधान अद्याप 'असह्य' वाटत नाहीत आणि राहुल गांधी अद्याप सुसह्य वाटत नाहीत ?
उत्तर : जनतेला तसे वाटत असावे, आम्हाला नाही.

प्रश्न : पण 2024 मध्ये पुन्हा हेच सरकार आले तर?
उत्तर : आले तर, काय होईल यापेक्षा काय व्हावे यात आम्हाला जास्त रस आहे!

प्रश्न : पण भारतीय लोकशाहीचा कडेलोट होईल, हिंदू राष्ट्र अस्तित्वात येईल, संविधान गुंडाळून ठेवले जाईल, विरोधी पक्ष नेस्तनाबूत होतील, एकाधिकारशाही बोकाळेल, धार्मिक दुफळी माजेल... ही आणि अशी बरीच भीती अनेकांच्या मनात घर करून आहे.
उत्तर : ती भीती अगदीच निराधार नाही, पण अनेक सिंहासने लोक समजतात तेवढी बळकट नसतात. 

प्रश्न : पण दशकानुदशके नव्हे तर शतकानुशतके काही सिंहासने अढळ राहिली, असा इतिहासाचा दाखला आहे.
उत्तर : बरोबर, पण दीड शतक पारतंत्र्यात राहिलेल्या या देशाने पाऊण शतक अर्धी कच्ची का होईना लोकशाही अनुभवली आहे. आणि आपण आता एकविसाव्या शतकात आहोत.

प्रश्न : पण विद्यमान केंद्रीय सत्ता उलथवून टाकण्यासाठी अस्तित्वात आलेली 'इंडिया आघाडी' आताच गर्भगळीत झालेली दिसते आहे?
उत्तर : जनतेच्या मनातील अंडर करंट महत्त्वाचा ठरतो अशा वेळी.

प्रश्न : म्हणजे एप्रिल-मे 2004 मध्ये झाले तसेच 2024 मध्येही होईल असे वाटते तुम्हाला?
उत्तर : आम्हाला नाही वाटत तसे, पण अजिबातच शक्यता नाही असेही नाही.

प्रश्न : लोकसभा निवडणुकीची तयारी करायची सोडून राहुल यांनी आता 'भारत न्याय यात्रा' सुरू केलीय, याला काय म्हणावे?
उत्तर : निवडणुका लढवणे आणि जिंकणे हे अवघड काम आहे, जनतेमध्ये जाणे हे सोपे काम आहे. त्यांना जे चांगले जमते ते करताहेत ते.

प्रश्न : इंडिया आघाडीचा एक थोडा आशेचा किरण नितीश कुमार, त्यांचेही तळ्यात मळ्यात चालू आहे?
उत्तर : त्यांची चूक काहीच नाही, ते अपरिहार्यतेचे राजकारण करीत आलेत पावशतक. अन्य लोकच त्यांना उंच घोड्यावर बसवण्याचे स्वप्न पाहताहेत.

प्रश्न : केशवराव, तुम्ही गेलात तेव्हा शिवसेनेची वाताहात झाली होती, ती अजून सावरलेली नाही ते पुन्हा आपल्या नैसर्गिक मित्राकडे जातील?
उत्तर : नितीश कुमार जात राहिले तर हे का नाही जाणार?

प्रश्न : आणि तुम्ही तिकडे असताना इकडे महाराष्ट्रात शरद पवारांच्या पक्षाची वाताहत काय झाली. दोन्ही पवार पुन्हा एकत्र येतील?
उत्तर : त्यांनी एकत्र येऊ नये, त्यांच्या चाहत्यांचा राजकारणावर उरलासुरला विश्वास टिकून राहायचा असेल तर...

प्रश्न : राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या राजकरणात साम्य दिसायला लागले आहे काही लोकांना, तुम्हाला काय भवितव्य दिसते आहे त्या दोघांचे?
उत्तर : चला, उशीर झालाय, निघतो मी...

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Diwakar Ganjare- 08 Jan 2024

    प्रबोधन करणाऱ्या सा. साधना चे डिजीटल प्रारूप खूप आवडले...धन्यवाद

    save



साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी