Diwali_4 लोकसमजुतीचे पितळ उघडे पाडणारे नाटक!
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

लोकसमजुतीचे पितळ उघडे पाडणारे नाटक!

कृष्ण चंदरमध्ये आणखी दोन गुण दिसून आले. पहिला गुण हा की, नाटकातला सस्पेन्स प्रथमपासून अखेरपर्यंत कायम राहतो. दुसरा गुण असा की- नाटकातले संवाद धारदार, अर्थपूर्ण आणि पल्लेदार असे असतात. एक-एक संवाद म्हणजे फुलझडीच. पण ही आतषबाजी केवळ नेत्रदीपक, श्रवणमधुरच असते असं नाही. हे शब्द, त्यातले अर्थ मनाच्या आणि मेंदूच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात- विचार करायला लावतात, हे मोठंच सामर्थ्य आहे. नाटककाराची अर्थपूर्णता आहे. त्याचं यश आहे. कृष्ण चंदरसारख्या पुरोगामी लेखकाने ‘कौमी एकता’सारखा विषय निवडला, यशस्वीपणे हाताळला, हे आपलं चांगलं नशीबच म्हटलं पाहिजे. या नाटकात द्रष्टेपणा आहे. ‘दूरचा इशारा’ही आहे. ‘दरवाजे खोल दे’ हे शीर्षक बोलकं तर आहेत, पण सूचकही आहे. राजकीय व भावनिक भाष्यांपासून, विषयांपासून वेगळं होऊन हे नाटक माणुसकीबाबत आणि मायनॉरिटीच्या समस्यांबाबत खुबीने बोलतं. कृष्ण चंदर लेक्चर देत नाहीत, भाषण आणि सल्ले देत नाहीत. भ्रमाच्या व समजुतीच्या वजनदार फुग्याला फक्त टाचणी टोचतात आणि फुग्यातील हवा काढून घेतात.

: 1 :

पूर्वी माणूस पहाडाच्या गुहेत राहत असे. दिवसभर अन्नासाठी शिकार करायचा. थंडी-वाऱ्यापासून आणि पावसापासून संरक्षण म्हणून मग रात्री गुहेत येऊन झोपायचा, बायका-मुलांसह. गुहेला दरवाजा नसायचा. आत-बाहेर जाण्या-येण्यावर त्यामुळे बंधनही नसायचं. कालानुक्रमे नंतर माणसाने राहण्यासाठी झोपडी बांधली. चार भिंती, एक छत, एक दरवाजा, एक खिडकी- अशी योजना होती. रात्री भय असायचं जंगली श्वापदांचं, चोरांचं, हल्लेखोरांचं. म्हणून मग तो रात्री दरवाजे आणि खिडक्या बंद करायला लागला. पुढे पक्कं घर बनलं राहण्यासाठी, जे मोठंही होतं. उंच भिंती, दरवाजे आणि खिडक्या. पण इतकंच नाही, दरवाजांना कोयंडे पण लावले गेले. कड्या पण लावल्या गेल्या आणि कुलपंही आली. खिडकीला गज आले. आत जाणं मुश्किल, बाहेर येणं मुश्किल.

जसजसा माणूस प्रगती करीत राहिला, धनसंपत्तीचा विकास होत राहिला; तसतशी त्याच्यात ‘स्वामित्व भावना’सुद्धा विकसित होत राहिली. पाठोपाठ त्याच्या दरवाजांना मोठमोठी कुलपं लागली. चौकीदार आणि पहारेकरी नेमले गेले.

आणि आता तर इतकी प्रगती झालीय की, घरं एअरकंडिशन्ड झालीत आणि दरवाजे व खिडक्या बंद झाल्यात.

मला स्वत:ला एअरकंडिशन्ड खोल्यांची मोठी भीती वाटते. ती कल्पनाच रानटी आणि क्रूर वाटते. माझा तर श्वासच कोंडला जाऊ लागतो.

(अर्थात, जेल आणि वेड्यांची इस्पितळं एअरकंडिशन्ड करायला माझी हरकत नाही.) ज्यांना आपली घरं वातानुकूलित करायचीत, त्यांनी ती तशी करावीत; मात्र त्यांनी त्यांच्या मनाचे दरवाजे आणि मेंदूच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

: 2 :

मनाचे दरवाजे आणि मेंदूतल्या खिडक्या!

यांना बंद ठेवण्याच्या किती तरी जुन्या आणि नव्या तऱ्हा आहेत, पद्धती आहेत. जातीपातीची ढोंगं, अफेक्शन्स याबद्दल काय बोलायचं? (पण बोलायचं तर आहे.) हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र, हा अस्पृश्य... याने वेद ऐकले, तर त्याच्या कानांत वितळलेलं शिसं टाका. पण हा शेकडो  वर्षांपूर्वीचा हिंदुस्तानी समाज होता. म्हणजे जुन्या गोष्टी. पण अमेरिका? प्रगत आणि आधुनिक आहे ना? तिथे ‘निग्रो’ अस्पृश्यच नाहीत का? गोऱ्यांच्या शाळेत काळ्यांची मुलं एकत्र शिकू शकत नाहीत. मला असंही सांगण्यात आलं आहे की, इंग्लंडमध्ये हिंदुस्तानी काळे आणि वेस्ट इंडिजमध्ये काळ्यांना (आर्थिक क्षमता असूनही) राहण्यासाठी घरं मिळत नाहीत. जर्मनीत हिटलरचं ऐकून तिथल्या लोकांनी मनाची कवाडं आणि मेंदूतल्या खिडक्या बंद केल्या होत्या. म्हणजे मनही (संवेदना) बंद आणि मेंदूही  (विवेक)बंद! परिणाम आपल्याला माहीतच आहे. ज्यूंच्या भयानक कत्तली आणि त्यांच्या छळछावण्या व त्यांचं देशोधडीला लागणं- त्या आठवणी किंवा ती चर्चा नकोच.

हृदयातले दरवाजे आणि मेंदूच्या खिडक्या जेव्हा बंद होतात; तेव्हा तिरस्कार, द्वेष व नफरत जन्माला येते. हे विष नंतर सर्वत्र पसरायला वेळ लागत नाही. काय होत असेल त्यामुळे? हे दरवाजे आणि खिडक्या तर बंद करायला लावल्या जातात. त्यानंतर आणि त्यामुळे माणूस स्वत:चा म्हणून विचारच करू शकत नाही. त्याची बुद्धी बंदच होते. शंका अन्‌ संशय, मनाचा कोतेपणा आणि संकुचितपणा त्यानंतर वर्तनातून जन्म घेतो. हे विषाक्त जगणंच.

: 3 :

आता दारं-खिडक्या बंद झाल्यामुळे धर्माच्या अस्तित्वाचं काय होत असावं? उन्माद आणि ‘जोश-जुनून’च्या स्वरूपात धर्म प्रकटायला लागतो. असा धर्म माणसाला परमात्म्याकडे नेऊ शकत असेल का? परमात्मा तर दूरच, माणूसच माणसापासून दुरावतो. धर्मांधता मात्र शिल्लक राहते. ही धर्मांधता, हा धर्मोन्माद माणसांना नफरत करायला शिकवतो. एकमेकांशी लढायला प्रवृत्त करतो. कत्तली करायला शिकवतो. मनाची कवाडं बंद झाल्यानंतर (करवल्यानंतर?) धर्मोन्माद माणसाला हे सगळं करायला शिकवतो.

धार्मिक माणूस मनाचे दरवाजे उघडे ठेवतो तेव्हा तो राम-कृष्णाच्या, परमहंसांच्या, महात्मा गांधींच्या किंवा विवेकानंदांच्या जवळ जातो. विचारांनी बद्ध नसल्यामुळे तो कबीराच्याही जवळ जातो. नानकाच्याही जवळ जातो. अशोकाचा सेवाभाव आणि त्याचं परिमार्जन त्याला समजतं, त्याला अकबर पण समजतो. मग त्याचा धर्म कोणाला दु:ख देत नाही, कोणाचा अपमान करीत नाही, कोणाची नफरत करीत नाही. माणूस शुद्ध स्वरूपात माणूसच राहतो.

पण त्याउलट, माणूस मनाचे दरवाजे आणि मेंदूच्या खिडक्या जेव्हा बंद करतो, तेव्हा तो नथुराम गोडसे बनून जातो. लाखो माणसं जेव्हा मनाची कवाडं आणि विवेकाच्या खिडक्या बंद करतात; तेव्हा सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तानात जे झालं, ते घडत राहतं. त्याने लाखो माणसं मारली गेली. हजारो स्त्रियांवर अत्याचार झाले. करोडो माणसं बेघर झाली. ज्यांनी हे सगळं केलं-घडवलं ते मारेकरी, लुटेरे, पाशवी माणसं त्याच धार्मिक घोषणा आणि नारे देत फिरत राहिले, उद्याही राहतील. या घोषणा खरं तर आध्यात्मिक होत्या-

- हर हर महादेऽव

- अल्लाऽ हो अकबरऽ!

: 4 :

मी सन एकोणीसशे पस्तीसमध्ये मुंबईत आलो. मी ज्या वृत्तपत्रात काम करीत होतो, तिथले बुजुर्ग असलेले असिस्टंट एडिटर माझ्यावर माया करीत. ते माझ्यावर मेहेरबान होते. मला प्रेमाने वागवीत. ते महाराष्ट्रीय ब्राह्मण होते. गांधींच्या आश्रमात राहून आले होते. छूत-अछूत, जात-पात हे सगळं त्यांनी सोडून दिलं होतं. तांब्याच्या भांड्यातून पाणी पीत आणि त्याच भांड्यातून मलाही पाणी देत. आमचं दुपारचं जेवण एकत्र असे. एका रविवारी ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले. आपल्या कुटुंबीयांशी त्यांनी मला भेटवलं. सगळे मोठ्या प्रेमाने, अदबीने भेटले. दिवसभर मी त्यांच्या संगतीत राहिलो. जेवलो. दुपारी त्यांच्या बरोबरीनेच थोडी विश्रांती घेतली, चटईवर.

नंतर तर तो प्रघातच पडला. प्रत्येक रविवारी मी त्यांच्याकडे जायचो, त्यांच्यात मिसळायचो. त्या कुटुंबाबरोबर राहायचो. काही महिन्यांतच मी त्या कुटुंबाचा जणू सदस्यच झालो.

आणि मग एक दिवस अचानक मी माझ्या मानलेल्या आईच्या तोंडून ऐकलं,

‘‘किती चांगला आहे, हा आपला अब्बास! ...बिलकुल मुसलमान वाटत नाही!’’

म्हणजे ‘मुसलमान न वाटणाऱ्या’ माझ्यासारख्यासाठी त्यांनी मनाची कवाडं उघडली होती, इतर मुसलमानांसाठी मात्र नाही- ती बंदच होती. लाखो-करोडो हृदयांचे दरवाजे तेव्हाही बंद होते, आजही बंद आहेत.

लहानपणी ऐकलं होतं की, हिंदूंच्या दुकानांतून काही घेऊन खायचं नाही. ते काफिर असतात- म्हणून ते घाणेरडे असतात. असंच हिंदू मुलांना सांगितलं जायचं, कारण ते म्लेंच्छ असतात, म्हणजे त्याज्यच. गंमत पाहा. लहानपणी स्टेशनवर एकाच बादलीतून पाणी काढलं जायचं विहिरीतून. पण ते ‘अहमद’च्या भांड्यात पडलं की, ते ‘मुसलमान पाणी’ व्हायचं आणि ‘रामदयाळ’च्या भांड्यात पडलं की, तेच पाणी ‘हिंदू पाणी’ होऊन जात असे.

अस्पृश्यांसाठी मंदिराचे दरवाजे बंद होते, आताही आहेत. ती मंडळी उच्च जातीवाल्यांच्या विहिरीतून पाणी काढू शकायची नाहीत, आताही हे प्रतिबंधितच आहे. त्यांच्याबरोबर बसून जेवण करणं अशक्यच. अस्पृश्यांची मुलं उच्च जातीवाल्यांच्या मुलांबरोबर शिकू शकायची नाहीत, खेळू शकायची नाहीत. या बंद दारांना समाज अधिक मजबुतीने बंद करीत राहिला आणि मग राजकारणाने पूर्ण विभाजन तर आणलंच.

- ‘मुस्लिम आहेस ना, मग मुस्लिम लीगमध्ये येऽ’

- ‘हिंदू आहेस ना, मग हिंदू महासभेत येऽ’

महात्मा गांधींनी अस्पृश्यांसाठी मंदिराचे आणि मनाचे दरवाजे उघडण्यासाठी मोहीम हाती घेतली. पण त्यांनासुद्धा हे दरवाजे पूर्णत्वाने उघडता आले नाहीत. ‘वरच्या जाती’ची मंडळी मनोरुग्ण होत राहिली. त्यांच्या मनाची कवाडं बंदच राहिली. आपलं ‘स्वत:चं असं राजकारण आणि आपला समाज’ त्यांनी वेगळा राखला. महात्मा गांधींनी आणि अन्य मंडळींनी हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळा देश ‘हिंदू-मुस्लिम भाई-भाई’च्या नाऱ्यांनी दुमदुमला होता. पण हे नारे ‘मायनॉरिटी’वर परिणाम करू शकले नाहीत. उलट, हे नारे हिंदू आणि मुसलमान वेगवेगळे आहेत, हेच अधोरेखित करीत राहिले. दोघांचं राजकारणसुद्धा वेगळं राहिलं.

जमीनदारी- Feudalismचे परिणाम इतिहासात नोंदवले गेले आहेत. धार्मिक आणि वांशिक क्षेत्रात दिसून येणारा ‘मानसिक कोतेपणा’ हा भावनेचे ‘अपील’ किंवा धार्मिक संहिता यांमुळे नष्ट होत नसतो. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे हा कोतेपणा दूर होऊ शकतो. इंडस्ट्रियलायझेशनमुळे हा कोतेपणा दूर होऊ शकतो.

युरोपात रोमन कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट यांमधला संघर्ष तेव्हाच नष्ट झाला, जेव्हा दोघांना एकाच मालकाच्या कारखान्यात मजुरी करावी  लागली.

भारतात हे झालं आहे. जात-पात, छूत-अछूत आदी अवडंबरांवर मुंबई आणि कलकत्ता यासारख्या औद्योगिक शहरांतून पहिला प्रहार झाला. मजूर आपापल्या गावातून आपापल्या कुटुंबासह कारखान्यात भरती होण्यासाठी जेव्हा आले, तेव्हा जातीपातीचे प्रश्न गौण ठरले. त्यांच्या-त्यांच्या लहानशा गावातले संकुचित सामाजिक विचार इथल्या प्रचंड विस्ताराने गिळून टाकले. मुंबईची ‘इराणी हॉटेलं’ सामाजिक परिवर्तनाची ठिकाणं बनली. भारतीयांनी एकाच ठिकाणी जाऊन एकत्रितपणे खाणं-पिणं चालू ठेवणं (कारण तसंच करणं भाग होतं.) विलक्षण होतं. त्यामुळे प्रथमच वेगवेगळे समाज एकत्र आले, भाकरीच्या  निमित्ताने.

फार वेगाने नसले तरी बऱ्याच वेगाने हिंदुस्थानात औद्योगिकीकरण येते आहे. मोठमोठे कारखाने बनताना दिसताहेत. कालपर्यंत जी लाखो माणसं गावातून नांगर चालवीत होती, ती आता मोठमोठ्या कारखान्यात मोठमोठ्या यंत्रांबरोबर काम करीत आहेत. त्याच्या छोट्या गावातल्या छोट्या सामाजिक समजुती आणि रीती आता इथे लागू पडत नाहीत. आता आपल्या समाजात परिवर्तन घडतं आहे. पण तरीही फरक समजून घेतला पाहिजेच. यांत्रिकीकरणाने परिवर्तन अपरिहार्य होऊन लादलं जाणं आणि वैचारिक पातळीवर मेंदूतल्या खिडक्या उघडल्या जाणं, यात फरक असतो. मशीन चालवायला शिकता येतं तीन-चार महिन्यांत, पण बुद्धिवाद शतकांतूनसुद्धा अंगीकारता येत नाही. अर्थात, मनाची मशागत झाली आणि शिक्षणाचा प्रसार झाला, तर वैचारिक परिवर्तन  अशक्य नाही.

: 5 :

आताचा जमाना कसा विचित्र आहे पाहा. बुद्धिवाद, सहिष्णुता आणि मानवी बंधुभाव प्राप्त करण्याचे म्हणून जे मार्ग सांगितले असतील, ते सगळे जुने झाले आहेत. मात्र हितसंबंधांचे नवे मार्ग निर्माण झाले आहेत. हे आर्थिक हितसंबंधांचे मार्ग आहेत. आता मजूरसुद्धा एकसंघ राहिलेला नाही. त्यांच्यातसुद्धा फूट पाडली जातेय. हेसुद्धा हितसंबंधांसाठीच.

शहरांचं पाहा. माणसं जास्त, घरं कमी. मग घर- मालकांची ‘चांदी’ होणारच. भाडेकरूंचं शोषण होणारच. भाडेकरूसुद्धा एक नव्या ‘वर्गात’ रूपांतरित झाले आहेत. खुद्द हिंदुस्थानात माणसांसाठी किती तरी दरवाजे बंद केले जातायत. हे दरवाजे घरांचे आहेत. मनाचेसुद्धा आहेत. म्हणजे मनाचा कोतेपणा, कर्मठपणा, उथळ मनोवृत्ती नव्याने- नव्या मार्गाने डोकं पुन्हा वर काढत आहेत. ही उथळ मनोवृत्ती कित्येक वर्षांनंतरसुद्धा  प्रज्वलित होते आहे आणि आग लावायला सिद्ध होते आहे. जुने झगडे आणि विद्वेष यांच्यात वाढ होते आहे. हिंदू-मुस्लिम झगड्याबरोबर आता उत्तर-दक्षिणचे झगडे पण अस्तित्वात आलेत. हे सगळं स्वातंत्र्यानंतर त्वरितच घडतं आहे.

ही धोक्याची घंटाच आहे आणि उद्यासाठी सावध होण्याची सूचना. ती लक्षात घेऊनच आपल्या पंतप्रधानांनी- जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या नेतृत्वाखाली ‘कौमी एकते’ची- नॅशनल इंटिग्रेशनची मोहीम चालवली. या वेळेची ही सर्वांत महत्त्वाची मोहीम मानली पाहिजे. या मोहिमेचा हेतू ‘हिंदू-मुस्लिम भाई-भाई’ या जुन्या भावनिक घोषणेचं पुनरुज्जीवन करणं हा नाही, तर मायनॉरिटीचा पाया नव्या राष्ट्रवादाशी जोडून घेणे हा आहे. पण अडचणी आहेत. या मोहिमेची सूत्रं कोणाच्या हातात गेली आहेत, पाहा. यापैकी थोडीच माणसं जवाहरलाल नेहरूंसारखा विचार करतात, उर्वरित म्होरक्यांचं आयुष्य समाजात ‘वर्गवाद’ निर्माण करण्यासाठी खर्ची पडलं आहे. ही मंडळी जवाहरलालांच्या या ‘इंटिग्रिटी’च्या मोहिमेची सूत्रं चालवत आहेत. म्हणून, ज्या लेखकांना जवाहरलालांच्या या मोहिमेचा अर्थ नीट समजला आहे, त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडते. या लेखकांनी या मोहिमेचा योग्य अर्थ समाजाला सादर करावयाचा आहे. कृष्ण चंदरचं हे नाटक ‘दरवाजे खोल दो-’ याच भूमिकेतलं पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. ‘अंजुमन तरक्की उर्दू, मुंबई’ या संस्थेमार्फत हे नाटक मुंबईत मोठ्या उत्साहाने सादर होत राहिलं. हे नाट्यप्रयोग याच ‘राष्ट्रीय एकते’च्या संदर्भातल्या चळवळीचा भाग म्हणून सादर झाले आहेत.

लेखक म्हणून कृष्ण चंदरची ओळख करून देण्याची गरजच नाही. त्यांच्या कांदबऱ्या व कथा मागील वीस वर्षांपासून उर्दू अन्‌ हिंदीतच नाही, तर जगातल्या अन्य भाषांमध्येसुद्धा प्रकाशित होत आहेत आणि लोकप्रियही झाल्या आहेत. कृष्ण चंदर ‘तरक्की-पसंद’- पुरोगामी असे लेखक आहेत, हे आता सर्वांना माहीत झालं आहे. मायनॉरिटीच्या जीवनमूल्यांचा त्यांना चांगला परिचय आहे. म्हणून ते जे लिहितात, त्या लेखनाचा पाया याच अल्पसंख्याकांच्या जीवनमूल्यांशी संबंधित असतो. पण इतकंच नाही- ते माणसावर प्रेम करतात, त्याच्या जगण्यावर प्रेम करतात. माणूसपणावर प्रेम करतात, माणुसकीवर प्रेम करतात. एखाद्या नाटककारासाठी हा गुण खूपच महत्त्वाचा ठरतो. असा नाटककार आपल्या पात्रांच्या भल्या-बुऱ्या स्वभावाचा चांगला जाणकार असतो. तो आपल्या पात्रांबरोबर हसतो आणि रडतोसुद्धा. याव्यतिरिक्त कृष्ण चंदरमध्ये आणखी दोन गुण दिसून आले. पहिला गुण हा की, नाटकातला सस्पेन्स प्रथमपासून अखेरपर्यंत कायम राहतो. दुसरा गुण असा की- नाटकातले संवाद धारदार, अर्थपूर्ण आणि पल्लेदार असे असतात. एक-एक संवाद म्हणजे फुलझडीच. पण ही आतषबाजी केवळ नेत्रदीपक, श्रवणमधुरच असते असं नाही. हे शब्द, त्यातले अर्थ मनाच्या आणि मेंदूच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात- विचार करायला लावतात, हे मोठंच सामर्थ्य आहे. नाटककाराची अर्थपूर्णता आहे. त्याचं यश आहे. कृष्ण चंदरसारख्या पुरोगामी लेखकाने ‘कौमी एकता’सारखा विषय निवडला, यशस्वीपणे हाताळला, हे आपलं चांगलं नशीबच म्हटलं पाहिजे. या नाटकात द्रष्टेपणा आहे. ‘दूरचा इशारा’ही आहे.

‘दरवाजे खोल दे’ हे शीर्षक बोलकं तर आहेत, पण सूचकही आहे. राजकीय व भावनिक भाष्यांपासून, विषयांपासून वेगळं होऊन हे नाटक माणुसकीबाबत आणि मायनॉरिटीच्या समस्यांबाबत खुबीने बोलतं. कृष्ण चंदर लेक्चर देत नाहीत, भाषण आणि सल्ले देत नाहीत. भ्रमाच्या व समजुतीच्या वजनदार फुग्याला फक्त टाचणी टोचतात आणि फुग्यातील हवा काढून घेतात.

हिंदुस्थानात ‘कौमी एकता’ यशस्वी होत नाही याचं कारण मानसिक कोतेपणात- नॅरो माइंडेडनेसमध्ये शोधलं पाहिजे, असं कृष्ण चंदर यांनी नाटकातून सुचवलं आहे. आमच्या कल्पना, मान्यता, धारणा, समज-अपसमज, व्यर्थ अभिमानाचा बुरखा या सगळ्यांचा परामर्श घेऊन कृष्ण चंदर यांनी लोक-समजुतीचे पितळ उघडे केले आहे आणि म्हणून हे ऐतिहासिक कार्य कृष्ण चंदरच्या नावे नोंदवले जाईल.

आता वेळ आली आहे. आता सांगितलं पाहिजे की, ‘दरवाजे खोल दोऽ’-  उघडा, दारं उघडा आता. मुसलमानांसाठी, मांस खाणाऱ्या हिंदूंसाठी, मद्रासी-बंगाल्यांसाठी जे दरवाजे बंद होते- मनाचे दरवाजे- ते उघडण्याची वेळ आली आहे. त्याशिवाय एकात्मता कशी साधणार? सगळे ‘हम वतन’ आपलेच तर आहेत. मनाचे आणि बुद्धीचे दरवाजे आता उघडावे लागतील. कृष्ण चंदरनी हे नाटक लिहून गंजलेल्या आणि  करकरणाऱ्या जुन्या बंदिस्त दारांना हात लावला आहे. हे दरवाजे उघडले पाहिजेत!

अनुवाद : भारत सासणे

(पत्रकार, लेखक आणि दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या ख्वाजा अहमद अब्बास (1914-87)  यांचे उर्दू, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी आपल्या 72 वर्षांच्या आयुष्यात एकूण 74 पुस्तके लिहिली. त्यात 90 लघुकथा आणि 3000 लेख आहेत. सोबतच 40 चित्रपटांचे पटकथा लेखन वा दिग्दर्शनही केले. स्वतःला संवादक म्हणवून घेणे त्यांना आवडायचे. ‘समाजात सकारात्मक बदल घडवणे आणि मनुष्यातील मानवता जागवणे’ या एकाच ध्येयाने ते प्रेरित झाले होते. 1935 मध्ये बॉम्बे क्रॉनिकलमध्ये सुरू झालेला ‘लास्ट पेज’ हा त्यांचा साप्ताहिक स्तंभ पुढे ब्लिट्‌झ पत्रिकेत प्रकाशित होऊ लागला. हा स्तंभ त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे तब्बल चाळीस वर्षे अखंडपणे प्रकाशित होत असे. कृष्ण चंदर यांच्या ‘अन्नदाता’ या कादंबरीचे कथानक असलेला ‘धरती के लाल’ हा हिंदी चित्रपट अब्बास यांनी दिग्दर्शित केला होता.)

Tags: bharat sasane weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात