डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नानासाहेब वरून नेमस्त वाटत असले तरी आंदोलनाच्या बाबतीत जहाल वृत्तीचे होते?

आपण तत्त्वाची आणि माणुसकीची फारकत करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहांवर अन्याय झाला असेल तर तो आपण पाहू शकत नाही. उलट प्रत्येक समाजवाद्याने आणि मानवतावाद्याने शासनाकडून होत असलेला अन्याय दूर करून घेण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली पाहिजे असे नानासाहेबांचे मत होते. या दृष्टीनेच ते सीमावासीयांसाठी लढत होते.
 

नानासाहेब गोरे हे आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना एक प्रेरणास्थान होते. त्यांनी आपल्या जीवनात देशाकरिता आणि समाजाकरिता जे कार्य केले, तो आदर्श आमच्यासमोर आहे. नानासाहेबांना जाऊन एक वर्ष उलटले. या एक वर्षाच्या काळात आम्हा सीमावासीय कार्यकर्त्यांना पदोपदी त्यांची आठवण येत असते. सीमा चळवळीमध्ये त्यांचे अखंड मार्गदर्शन आम्हांला मिळाले आहे.

दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी पुकारून भारतीय घटनेने जनतेला बहाल केलेली सप्तस्वातंत्र्ये हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्यापासून अनेक लहानथोर विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांनी तुरुंगात डांबले. तथापि नानासाहेबांना अटक करण्याचे धाडस सरकारला झाले नाही. त्याच आणीबाणीच्या काळात माझे वडील कै. बाबूराव ठाकूर यांच्या जीवनावरील 'समरांगण हे जीवन ज्याचे' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी नानासाहेब गोरे बेळगावात आले होते. त्यावेळी भाषण करताना नानासाहेबांनी आत्मविश्वासाने सीमाभागातील लाखो मराठी भाषिकांना एक संदेश दिला. नानासाहेब आपल्या भाषणात म्हणाले, 'आम्ही भारतीय स्वातंत्र्यासाठी लढलो आणि अखेर भारत स्वतंत्र झाला, हैद्राबाद मुक्तीसाठी आम्ही निजामाशी झुंज दिली आणि हैद्राबाद मुक्त झाले. साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांच्या गुलामगिरीत जखडलेल्या गोमंतकासाठी आम्ही आंदोलन छेडले आणि गोमंतक देखील पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला. संयुक्त महाराष्ट्रासाठी आम्ही झगडलो आणि बऱ्याच अर्थी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. अजूनही महाराष्ट्राचा असलेला बेळगाव सीमाभाग अन्यायाखाली कर्नाटकात खितपत पडला आहे.त्याच्या मुक्तीसाठी आम्ही वर्षानुवर्षे लढत आहोत. आता हा सीमालढा देखील आम्ही जिंकून दाखवू. आज ना उद्या या मराठी भाषिकांना न्याय देणे सरकारला भाग पडेल.'

कै. नानासाहेबांच्या या प्रेरणादायी भाषणाने सीमावासीयांचे मनोधैर्य वाढले आणि सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी शेवटपर्यंत लढण्याचा सीमावासीयांनी निर्धार केला. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणे, त्यांच्या मनातील ध्येयवादाला फुंकर घालणे. त्याला सतत धीर देणे हे तर नानासाहेबांचे खास वैशिष्ट्य होते. विशेषतः एस.एम.जोशी गेल्याने संयुक्त महाराष्ट्र सीमा समितीचे कार्य थांबणार अशी विरोधकांची अटकळ होती. पण श्री. नानासाहेबांनी या समितीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन सीमाभागातील मराठी जनतेत नेत्याविना पोरके होऊ दिले नाही.

कै. नानासाहेब गोरे आणि बेळगावचा संबंध अत्यंत निकटचा होता. बॅ. नाथ पै यांच्यामुळे हा संबंध दृढ झाला होता. आणि कार्यकर्त्यांनी देखील नानासाहेबांशी जवळीक साधली होती. बॅ. नाथ पै यांची सीमालढ्यातील भूमिका, त्यांचे कार्य आणि तळमळ पाहून नानासाहेबांना सीमावासीयांबद्दल अधिकच कळवळा निर्माण झाला असावा. म्हणूनच बॅ. नाथ पै यांचे सीमाप्रश्न सोडवण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी एस.एम.जोशी, मधु दंडवते, किशोर पवार या नेत्यांच्या बरोबरीने नानासाहेबांनी देखील सीमालढ्याचा झेंडा हाती घेतला होता. सीमाप्रश्रासाठी सत्याग्रह असो, उपोषणादी कार्यक्रम असोत, दिल्ली मोर्चा असो किंवा कोणतीही निवडणूक असो, नानासाहेब गोरे सदैव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी राहिले. त्यांनी सीमा चळवळीला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि संयुक्त महाराष्ट्र सीमा समिती यांच्या वतीने जी जी शिष्टमंडळे पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्लीला गेली त्या त्या वेळी नानासाहेब गोरे अग्रभागी राहिले. पं. जवाहरलाल नेहरू यांच्यापासून विद्यमान पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधानांशी चर्चा करून हा सीमाप्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आग्रही मागणी केली. म.रा.समितीचा मोर्चा असो, शिष्टमंडळ असो, नानासाहेब आपली कामे बाजूला ठेवून सीमावासींबरोबर राहत. जेव्हा दिल्लीला धरणे मोर्चा झाला त्यावेळी तर ते आठ दहा दिवस दिल्लीतच राहिले होते.

विधानसभा निवडणुकीच्या काळात सीमावासीयांची आणि संयुक्त महाराष्ट्राची बांधिलकी ठेवून ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचाच प्रचार करीत असत. त्यांच्या जनता दल पक्षाचा समाजवादी उमेदवार जरी प्रत्यक्ष महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवाराविरुद्ध उभा राहिला असला तरी नानासाहेब महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवारांच्या प्रचारसभा घेत. कोणत्याही परिस्थितीत या मराठी सीमाभागावरील अन्याय दूर होईपर्यंत सर्वांनी आपला पक्षीय दृष्टीकोन बाजूला ठेवून सीमावासीयांवरील अन्याय दूर केला पाहिजे ही त्यांची ठाम भूमिका होती. 'जोपर्यंत सीमावासीयांवरील अन्याय दूर होणार नाही तोपर्यंत आपण महाराष्ट्र एकीकरण समितीच्याच उमेदवाराचा प्रचार करणार' असे ते आपल्या कन्नड बांधवांना ठणकावून सांगत असत. कर्नाटकातील समाजवादी आणि बुद्धिवादी म्हणवून घेणारे सीमावासीयांचे कन्नड हितशत्रू नानासाहेबांना म्हणत, 'नानासाहेब तुम्ही बुद्धिप्रामाण्यवादी आहात, मानवतावादी आहात, समतावादी आणि समाजवादी आहात, विचारवंत म्हणून तुमची ख्याती आहे.' असे असताना अशा क्षुल्लक सीमाप्रश्नात तुम्ही तुमची प्रतिष्ठा पणाला लावणे योग्य नाही. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला कमीपणा येतो.

असा उपदेश करणाऱ्यांत कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री आणि नानासाहेबांच्या जनता दल पक्षाचे नेते रामकृष्ण हेगडे हे देखील होते. अशा लोकांना नानासाहेब रोखठोक शब्दांत उत्तर देत, 'आपण तत्वाची आणि माणुसकीची फारकत करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहावर अन्याय झाला असेल तर तो आपण पाहू शकत नाही. उलट प्रत्येक समाजवाद्याने आणि मानवतावाद्याने शासनाकडून होत असलेला अन्याय दूर करून घेण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली पाहिजे,' असा नानासाहेब उपदेश करीत असत.आपल्या स्वतंत्र देशात एका भाषिक सत्ताधीशांकडून दुसऱ्या भाषेच्या बांधवांवर अन्याय होतो आणि त्या बांधवांना अमानुष छळ सहन करावा लागतो. त्याविरुद्ध झगडले तर बुद्धिप्रामाण्यवाद्याला, मानवतावाद्याला आणि समाजवाद्याला कमीपणा येण्याचे कारण काय, असा ते सवाल करीत. एकदा तर आपल्याच जनता पक्षातील कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांनी बेळगावबाबत हटवादी भूमिका घेणारे वक्तव्य केले असता नानासाहेबांनी 'बेळगाव हे हेगडेंच्या बापाचे आहे का?' असे संतापून उद्गार काढले होते.

नानासाहेब हे वरकरणी मृदू आणि नेमस्तपंथी वाटत असले तरी एखाद्या ध्येयवादी आंदोलनाच्या दृष्टीने जहाल होते. ते क्रांतिकारी विचाराचे होते याचा अनुभव आम्हा सीमावासीयांना आला आहे. त्यांची वागणूक आम्हाला पित्यासमान होती. आंदोलनापासून सर्वसाधारण जीवन व्यतीत करण्यापर्यंत आम्हा कार्यकर्त्यांना त्यांचा सल्ला मिळत असे. त्यांचे मार्गदर्शन आणि उत्तेजन आम्हांला सतत जाणवत होते. त्यांची उणीवही आम्हांला आज जाणवत आहे. नीतिमूल्यांचा आधार देऊन सीमालढ्यामध्ये त्यांनी जे योगदान दिले ते सीमावासी कधीही विसरणार नाहीत.

Tags: विधानसभा. मधु दंडवते इंदिरा गांधी किरण ठाकूर Vidhan Sabha Madhu Dandwate Indira Gandhi #Kiran Thakur weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके