डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सीमाप्रश्न आणि नानासाहेब

नानासाहेबांच्या निधनाने सीमावासीयांचा एक आधारवड कोसळला आहे. सीमालढ्याला समाजवादी विचारांचा आणि नीतिमूल्यांचा आधार देऊन या लढ्यामध्ये त्यांनी जे योगदान केले ते सीमावासीय कदापिही विसरणार नाहीत.
 

'सीमा प्रश्नावर काही ठरल्याप्रमाणे जागृतीचे कार्य सुरू होणार काय? त्या भागातील मंडळींनी कारवारपासून पदयात्रा तरी पाऊस संपताच सुरू करावी. 100 सभा घ्याव्यात. असे कार्यक्रम स्थानिक लोकांनी केले नाहीत तर तो प्रश्न लोकांच्या डोळ्यांसमोरुन नाहीसा होत जाईल.

हे सगळे मी येथे आरामात बसून लिहितो आहे. तुम्हांला तेथे काम करायचे आहे, हे मी जाणून आहे. म्हणून येथेच थांबतो, असे नानासाहेबांनी मला पिट्सबर्ग येथून 11-2-1992 च्या पत्रात लिहिले आहे. अमेरिकेत लेकीकडे असतानाही सीमेचा ध्यास त्यांचा कमी होत नाही. उलट काही कार्यक्रम घ्यावेत ज्यान्वये हा प्रश्न सतत लोकांच्या डोळ्यांसमोर राहील असे नानासाहेबांना वाटे.

श्री. शरद पवारांनी 1986 पासून या प्रश्नात विशेषत्वाने लक्ष घातले. 1986 साली कोल्हापूर येथे सीमापरिषद झाली. या परिषदेतील ठरावाप्रमाणे श्री.एस.एम.जोशी यांच्या नेतृत्वाखाली सीमाभागात सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला. श्री. शरद पवारांनी पहिल्या तुकडीचे नेतृत्व केले, यावेळच्या गोळीबारात बेळगावचे सातजण मरण पावले. त्यानंतर निहाल अहमद, रा.सु.गवई आदीच्या नेतृत्वाखालील नुकत्यांनी सत्याग्रह केला. तेव्हापासून सीमाप्रश्न सोडविण्यासाठी जे प्रयत्न झाले त्यांत शरद पवार आघाडीवर राहिले, अलीकडेच 22 फेब्रुवारी 14 रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र समिती व महाराष्ट्र एकीकरण समिती, आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांची एक बैठक झाली, सीमाभागाचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा यासाठी वाटाघाटी कराव्यात, सल्लामसलत करावी, यासाठी श्री. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीत श्री. शिवाजीराव देशमुख, रा. सु. गवई, एन. डी. पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे वसंतराव पाटील, गोपीनाथ मुंढे, मधु दंडवते, अहिल्या रांगणेकर, सदाशिवराव मंडलिक, मी व अन्य सदस्यांची समिती नेमली आहे.

या सर्वांमुळे सीमाभागात आता विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शरद पवार हा प्रश्न सोडतील अशी सीमा भागातील जनतेला खात्री वाटू लागली आहे. वाटाघाटी म्हणजे देवाणघेवाण आलीच. अशावेळी तत्वच्युती होऊ न देता खंबीर व स्पष्ट भूमिका घेऊन वाटाघाटी करणाऱ्या कणखर नेतृत्वाची गरज असते, अशावेळी नानासाहेबांची उणीव तीव्रतेने सर्वांनाच भासते. त्यातही सीमावासीयांना नानासाहेबांच्या निधनाने आपला फार मोठा आधार कोसळल्यासारखे वाटते.

एसेमांच्या निधनानंतर नानासाहेबांनी सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी खंबीर नेतृत्व दिले. ते सीमावासीय बांधवांना सांगत 'आम्ही स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांच्याविरुद्ध लढलो; त्यात यशस्वी झालो. पोर्तुगीजांविरुद्ध गोव्यात लढा दिला त्यातही यशस्वी झालो. आता सीमाप्रश्नासाठी शासनाविरुद्ध लढत आहोत. शासनाला आपले म्हणणे मान्य करावेच लागेल' नानासाहेबांचा हा विश्वास सीमाभागातील जनतेमध्ये एक चैतन्य निर्माण करीत असे.

एसेम, नानासाहेब, मधु दंडवते यांची भाषिक प्रांतरचनेच्या तत्त्वांशी बांधिलकी होती. म्हणून सीमा भागात आपल्या पक्षाचे उमेदवार एकीकरण समितीच्या उमेदवाराविरुद्ध उभे असतानाही स्वपक्षाच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार करून एकीकरण समितीचे उमेदवार निवडून आणण्याची त्यांनी पराकाष्ठा केलेली आहे.

सीमा प्रश्नावर जनता पक्षाचे रामकृष्ण हेगडे आणि बोम्मई मुख्यमंत्री असताना, सीमाभाग महाराष्ट्राला मिळणार नाही अशा त्यांनी वल्गना केल्या तेव्हा नानासाहेबांनी स्वपक्षीय मुख्यमंत्र्यांना खडसावून सांगितले, 'सीमाभाग म्हणजे, हेगडे, बोम्मई आपली खाजगी मालमत्ता समजतात काय?' अर्थात समाजवादी चळवळीत पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ ते कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या शब्दाला वजन होते.

नानासाहेबांनी अनेक चळवळीत भाग घेतला. कारावास भोगला. आता त्यांना ध्यास लागला होता सीमाप्रश्नाचा. आपल्या हयातीत हा प्रश्न सुटावा माणून ते प्रयत्नशील होते. त्यांच्यात वैचारिक स्पष्टता होती. तात्विक बैठक होती. तत्व स्वीकारून प्रश्न सोडवावा असा त्यांचा आग्रह होता. 'पाटसकर निवाडा' सर्व राज्यांना भारत सरकारने लावला नाही. मद्रास, आंध्र यांचा सीमाप्रश्न सोडवण्यासाठी 'पाटसकर निवाडा' मान्य करण्यात आला. खेडे हे घटक, भौगोलिक सलगता आणि भाषिक बहुसंख्या ही त्रिसूत्री योजना जी मद्रास व आंध्रने स्वीकारली ती सर्व देशाला लागू करायला हवी होती असे नानासाहेबांना वाटे. ही योजना स्वीकारली असती तर या देशातले सीमेसंबंधीचे सर्व प्रश्न सुटून गेले असते आणि अस्थिरता नाहीशी झाली असती. हे नानासाहेबांनी राज्यकत्यांना अनेक वेळा सांगितले. अर्थात तसे घडले नाही म्हणून पंजाब काही काळ अतिरेक्यांच्या आहारी गेला.

सीमा प्रश्नावर लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीतही अनेक वेळा बेदिली निर्माण झाली. पण सीमा भागातील नेत्यांत ऐक्य निर्माण करण्यासाठी नानासाहेबांनी आटोकाट प्रयत्न केले, त्यांच्यामुळेच महाराष्ट्र एकीकरण समितीत ऐक्य टिकले.

श्री. भाऊसाहेब महागावकर यांच्या अकाली निधनाने बेळगाव शहरात पोटनिवडणूक झाली. नानासाहेबांनी 2-6-92 रोजी बेळगावच्या मतदारांना आवाहन करणारे पत्र लिहिले. त्या पत्रात ते म्हणतात, 'तुम्ही सर्वांनी प्रथम लक्षात ठेवले पाहिजे की ही निवडणूक साधीसुधी निवडणूक नसून सीमा भागातील मराठी जनतेने गेली 35 वर्षे अखंडपणे चालू ठेवलेल्या मराठी भाषा व मराठी संस्कृती यांच्या संवर्धनासाठी चालविलेल्या लढ्याचा भाग आहे. या लढ्यातील मागणी इतकी साधी व सोपी आहे की तिला कन्नड भाषिकांनी किंवा कन्नड शासनाने विरोध का करावा हेच समजत नाही. आमच्या कन्नड मित्रांना, बंधूंना आणि भावांना आमचे सांगणे एवढेच आहे की तुम्ही जसे कन्नड शासनाखाली सुखी आहात तसेच आम्हांला महाराष्ट्रामध्ये आणि मराठी शासनाखाली सुखेनैव जाऊ द्या, मराठी आणि कन्नड भाषांची भाषिक राज्ये भारतीय शासनाने एकदा मान्य केल्यानंतर मराठी भाषिकांना महाराष्ट्रात जाण्याला इतके अडथळे कन्नड बंधूंनी आणि कर्नाटक शासनाने निर्माण करीत राहावे, ही कोणालाही न समजण्यासारखी गोष्ट आहे.

यातून नानासाहेबांची समतोल दृष्टी व संयमही दिसून येतो. टीका करतानाही नानासाहेबांचा कधी तोल जात नाही हे विशेष होय. श्री. शंकरराव चव्हाणांनी संसदेत सीमेच्या विषयावर प्रश्न निघाला असता, 'हा प्रश्न अजून निकाली निघाला नाही' असे स्पष्ट उत्तर दिले.श्री. बोम्मई यांनी उपप्रश्न विचारला असता 'मी गृहमंत्री म्हणून बोलत आहे' असे त्यांनी विधान केले, तेव्हा नानासाहेबनी 19-2-92 रोजी श्री. शंकरराव चव्हाणांना पत्र पाठवून 'आपली विधाने आम्हांला आश्वासक वाटली' असे लिहिले व समाधानही व्यक्त केले. 'अशुभस्य कालहरणम्' करण्यापेक्षा ज्या भागातील जनतेने कर्नाटकच्या विधानसभेत आपले प्रतिनिधी पाठवले आहेत. त्या जनतेचे मत या प्रश्नावर अजमावणे उचित होईल असे मला वाटते, असेही त्या पत्रात नानासाहेबांनी लिहिले. तेव्हापासून जनमत चाचणीमुळे लोकेच्छा स्पष्ट होतील व हा प्रन्न सुटेल अशी मागणी मूळ धरू लागली व आज ती प्रमुख मागणी झाली आहे.

नानासाहेबांनी अशा प्रकारे चळवळीला केवळ गती दिली नाही तर प्रश्न सोडवण्याचा महत्त्वपूर्ण मार्गही दाखवला तेव्हा श्री. बोम्मई यांनी काश्मीरचा प्रश्नही जनमतावर सोडवावा लागेल असे जाहीर केले. तेव्हा नानासाहेबांनी प्रेसनोट काढून श्री. बोम्मई यांची हजेरी घेतली. दोन राज्यातील प्रश्न आणि दोन राष्ट्रातील प्रश्न एक नव्हेत याची जाणीव त्यांनी करून दिली.

नानासाहेब अशाप्रकारे अतिशय क्रियाशील होते. श्री, नरसिंहरावांना विस्तृत पत्र लिहून या प्रश्नाचा इतिहास, मागणीचे स्वरूप आणि निश्चित तत्त्व स्वीकारून हा प्रश्न सोडवावा असे नानासाहेबांनी सुचविले. नानासाहेबांचे प्रयत्न सीमाभागातील जनतेला आश्वासक वाटत असत.

बेळगावच्या तरुण भारतने नानासाहेबांच्या निधनानंतर एक खास पुरवणी प्रकाशित केली. त्यांत श्री.ग.गो.राजाध्यक्ष यांनी नानासाहेब गोरे आणि सीमा प्रश्न असा लेख लिहिला आहे.. त्यात ते लिहितात, 'नानासाहेब गोरे यांची भाषा मृदू स्वरूपाची होती. ते तत्त्वचिंतक असल्यामुळे तत्त्वाला सोडून ते कधी बोलत नसत. प्रत्येक वाक्य जबाबदारीने बोलत असत. जहाल भाषा ते टाळायचे, पण जहाल कृती करण्याचे ते संदेश देत. लोकशाहीमध्ये सत्ताधीशांचे लक्ष वेधून घेण्यासाठी जहाल कृतीची आवश्यकता आहे' असे त्यांचे ठाममत होते आणि 'लोकशाहीमध्ये चळवळीशिवाय कोणताही प्रश्न सुटत नाही. यासाठी सतत चळवळ केली पाहिजे' असे आग्रही प्रतिपादन ते करीत. असंतोष सतत टिकवून धरून चळवळ जागती ठेवली पाहिजे, तरच प्रश्न तेवत राहील, असे ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत. नानासाहेबांच्या निधनाने सीमावासीयांचा एक आधारवड कोसळला आहे. सीमालढ्याला समाजवादी विचारांचा आणि नीतिमूल्यांचा आधार देऊन या लढ्यातील त्यांनी जे योगदान केले ते सीमावासीय कदापिही विसरणार नाहीत.

हा परिच्छेद मी मुद्दाम दिला आहे. सीमावासीयांना नानासाहेबांच्याबद्दल किती विश्वास आणि आधार वाटत होता याचे ते द्योतक आहे. नाथ पैंच्यापासून मी सीमावासीयांच्याबरोबर आहे, त्यांच्या सुख दुःखात मी सतत सहभागी होतो.सीमावासीयांची नाडी मी थोडीफार ओळखतो. सतत त्यांच्याशी संपर्कात असतो, नानासाहेब, एसेम, मधु दंडवते यांचे सीमा भागातील दौरे आखणे, कार्यकत्यांचे मेळावे घेणे आदी उद्योग मी नेहमी करीत आलो आहे. नानासाहेबांच्या निधनाने एक प्रकारचे पोरकेपण या चळवळीला आले. प्रामुख्याने वाटाघाटीच्या वेळेला ज्यांच्या शब्दांना वजन होते आणि मान होता ते नानासाहेब आता ऐनवेळी, प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली असताना आपल्यामध्ये नाहीत याचे सीमावासीयांना अतीव दुःख झाले आहे.

शब्दांकन : बासू देशपांडे

Tags: गोपीनाथ मुंडे. शरद पवार सीमापरिषद किशोर पवार Gopinath Munde Sharad Pawar Seema Parishad #Kishore Pawar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके