जगांतील अत्यंत प्राचीन अशा देशांपैकी भारत हा एक देश आहे. साहजिकच अनेक प्रकारच्या मागासलेल्या वन्य जमाती, आणि भिल्ल, संताळ, गोंड इत्यादि टोळ्या करून रहाणारे लोक यांची वस्ती येथे भरपूर आहे.1939 च्या शिरगणतीनें भारतांत सुमारे दोन कोटींहून अधिक भरणा या प्राचीनांचा आहे हे दाखवून दिले.1941 ची शिरगणती लक्षांत घेतां असें दिसतें, की अंदाजे 2 कोटी 10 लक्ष प्राचीन जमातीचे लोक भारतांत आहेत.
भारतांत पसरलेल्या ह्या जमातीचे एकूण तीन वर्ग पडतील. पहिला आग्नेय भारतांतील जमातींचा, दुसरा दक्षिण भारतांतील व तिसरा मध्यप्रदेशांतील या तीनहि भागांतील जमातींत पुष्कळच साम्य आढळेल; परंतु संस्कृति, भाषा व जातिव्यवस्था यांत विशेषत्वाने फरक जाणवतो. वरील तीन वर्गापैकी मध्यप्रदेशांतील 'कोरकू ', या डोंगराळ भागांत रहाणाऱ्या जमातीचें आपण अवलोकन करूं.
1939 च्या शिरगणतीनें मध्यप्रदेश व वऱ्हाडमधील या जमातींची संख्या40,65,277 इतकी होती, आणि त्यांपैकी1,76,616 ही संख्या कोरकू टोळीची. सात पुड्याच्या रांगांत यांची वस्ती वसलेली, परंतु प्रामुख्यानें हुशंगाबाद, निगार, बेतुल व अमरावती या जिल्ह्यांतहि यांचा भरणा फार; एकट्या निमार जिल्ह्यांतील 'कोरकू ' जमातीची संख्या 52172इतकी आहे.
थोडा इतिहास
'कोळ' व 'संताळ ' या जमातींशी कोरकूंचे बऱ्याच बाबतीत साम्य दिसते. त्यांची उत्पत्ती आणि इतिहास याबद्दल फारच अल्प माहिती अवगत आहे. निमार भागांत पसरलेल्या सातपुड्यांच्या रांगांत आज कित्येक वर्षे ही जमात प्रामुख्याने रहात आहे. राजकीय, सामाजिक अशा अनेक आपत्तींमुळे जरी या जमातीच्या नशीबी अत्यंत डोंगराळ व निकृष्ट प्रतीच्या जमीनीवर जगण्याची पाळी आली, तरी इतर टोळ्यांच्या मानानें ही जमात पुष्कळच सुधारलेली दिसते. मराठ्यांच्या अमदानींत त्यांनी पेंढाऱ्यांशी संगनमत केलें.1817 साली लॉर्ड हेस्टिंगने पेंढाऱ्यांचा निःपात केला; आणि 'कोरकू' च्या नशीबीं सातपुड्यांतील डोंगराळ व जंगली प्रदेशांत परत फिरण्याची पाळी आली. ब्रिटीश आमदानीपासून मात्र हे चळवळे आणि बंडखोर 'कोरकू ' आपल्या प्रदेशांत स्थिर झाले आणि शांततेनेंच आपला जुनाट व मागासलेला जीवनक्रम आक्रमू लागले. नवीन राज्यकर्ते व आजूबाजूचे हिंदु लोक यांच्याकडून त्यांची दडपणूक व आर्थिक गळचेपी व्हावयास सुरवात झाली. अजूनहि त्याला पायबंद बसलेला नाहीं. त्यांचे दारिद्र्य व शारीरिक असमर्थताहि मोठी केविलवाणी आहे. सावकारांची मगरमिठी त्यांच्यावर बसली, आणि हातांतील मशागतीची जमीन हिंदु शेतकन्यांनी अनेक दुष्ट मार्गांनी काढून घेतल्यामुळे शेतमजुराचा ( field labourer ) दर्जा त्यांना प्राप्त झाला.
नवी जाणीव
'कोरकूंकडे पाहिले म्हणजे तो बांधेसूद व मजबूत दिसतो. आज तो भूमिहीन आहे. शिकारी लोकांनीं आपल्या शिकारीच्या धंद्यापायीं त्याला त्याच्या जीवनावश्यक गरजांची परवड केली. आणि जंगलांतील उपयुक्त वस्तूंचा उपयोग घेण्याचें त्याचें स्वातंत्र्य हिरावून घेतलें. याचा परिणाम सावकारीपाश त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला व हिंदूंचा छळ त्यांच्या कपाळीं बसला. त्याची सामाजिक घडी पार विसकटून गेली व नैतिक दर्जा खालावला. एकेकाळीं अत्यंत धडाडीचा व शूर म्हणून गणला जाणारा 'कोरकू ' आतां भित्रा, गरीब व गुलाम बनला. आज त्याला स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व नाहीं कीं, सामाजिक प्रतिष्ठाही नाहीं. परंतु भविष्यकाळाबद्दल जबर विश्वास मात्र त्याच्यापाशीं आहे. 'हम एका करागा तो ये सब हमारा पाँव पर आगा " हें तरुण कोरकू पोरांचें उद्गार मोठे आशादायी आहेत. स्वतः खपल्याशिवाय शेती अशक्य आहे हें त्यानें आतां पूर्णपर्णे जाणलें आहे. !
मामुली शेतमजूर
आज परिस्थितीनें कोरकूंचे स्वतंत्र जीवन संपुष्टांत आलें आहे. 'साली' म्हणजे एक मामुली शेतमजूर हीच आजची त्याची योग्यता ! कोरकू स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कामाला जातात व मुले शेतमालकांच्या गुरांची काळजी वहातात. ज्या कांहीं थोड्याफार कोरकूंजवळ जमीन आहे तेच फक्त हिंदु शेतकऱ्याप्रमाणे आपला दिनक्रम पार पाडूं शकतात. पावसाळ्यांत पहाटे 4-4॥ ला उठायचे व लगेच 5 वा. धन्याच्या घरीं वर्दी द्यायची आणि गुरांच्या वाड्यांत कामाला सुरवात करायची. गुरांचे मलमूत्र साफ करण्यापासून दूध काढीपर्यंत सर्व कामगिरी मुकाट्याने करायची. धनी उठतो तों बसल्याबसल्या खाटल्यावर त्याला ताज्या दुधाचा चहा प्यायला मिळतो. हे सर्व काम संपतें तों 9 वाजतात. नंतर अर्धातास विश्रांति न्याहारीच्या या वेळांत तो बायकोनें दिलेली भाकरी व चटणी खातो, व परत कामाला लागतो. दुपारी 2-2॥ वा. त्याला जेवणासाठी पुन्हा अर्धातास रजा मिळते. आणि सूर्य मावळला म्हणजे धन्याची शेतावरील कामगिरी संपवून तो घरच्या कामाला परत धन्याच्या घरीं हजर होतो. पुन्हां गुराढोरांना पाणी पाजणें, साफ- सफाई ही कामे होतात व साधारणतः रात्रीं 9-10 वाजतां तो आपल्या घरी परततो. हाच कार्यक्रम थोड्याफार फरकाने वर्षभर चालू असतो.16-17 तास धन्याची नोकरी ही बिकट कामगिरी ! त्याला ना रजा, ना सहानुभूतीचा एक शब्द ! कारणाशिवाय चुकून माकून त्यानें रजा घेतलीच तर त्याला आपल्याला मिळणाऱ्या दोन शेर ज्वारीला मुकावें लागते. कामापरी काम करायचे, पण पोटाची खळगी भरण्याची खात्री नाहींच ! ना सण ना सुदी ! त्याचे कामार्चे रहाटगाडगें अखंड चालूच.
स्त्रीस्वातंत्र्य
कोरकू स्त्री देखील कामाला जाऊन आपल्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या मदत करण्याचा प्रयत्न करते; त्यामुळे पुरुषांपेक्षां ती जास्त स्वतंत्र आहे. कोरकू स्त्री आपल्या नवऱ्याला केव्हांहि सोडून जाऊं शकत असल्यामुळे कोरकू नवरा हा नेहमींच धाकांत असतो. याचा परिणाम म्हणूनच की काय कोरकूंचे कौटुंबिक जीवन अगदीं विस्कळीत झाले आहे. निव्वळ परस्पर समजूत हाच एक त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा आधार आज राहिला आहे. त्यामुळे जीवनाबद्दल शाश्वती व सौख्य कमी व भांडण तंटे फार अशा परिस्थितीच्या पेचांत तो सांपडला आहे.
पेहराव
कोरकूंचा पेहराव व दागदागिने यांचे पुष्कळ बाबतींत हिंदु पेहरावाशीं व दागदागिन्यांशी साम्य आहे. गुडघ्यापर्यंत धोतर, अंगांत बंडी अगर जाकीट व डोक्याला पगडी हा कोरकू पुरुषाचा पेहराव. त्याच्या अंगांतील कपड्यांचा रंग मात्र पांढराच असतो. पांढऱ्या रंगाचे कपडे वापरण्यामागें कांहीं विशिष्ट हेतु आहे असें मात्र नाहीं. स्त्रिया मात्र भडक रंगांच्या साड्या नेसतात, व अंगांत चोळी घालतात. लहान मुले व मुली मात्र नागड्याच वावरतात. पेहराव्याच्या बाबतींत जरी हिंदूंचे अनुकरण असले तरी स्वच्छता व कपड्यांचा दर्जा यांत फारच फरक जाणवतो; केस स्वच्छ करण्यासाठी कोरकू काळ्या मातीचा उपयोग करतात. फत्रा-एक जंगली फळ हाच त्यांचा साबू. या फळाला साबणासारखा फेंस येतो. आपल्या कोयत्यानेंच ते आपली नखें काढतात.
आर्थिक शोषण
अनेक प्रकारचे मणी व शिंपा यापासून तयार केलेल्या दागिन्यांचे आकर्षण कोरकूंना नाहीं. आर्थिक परिस्थितीमुळे सोन्या चांदीचे दागिने ते वापरू शकत नसले तरी तांबे, पितळ, इ. धातूंचे विविध प्रकारचे दागिने कोरकू स्त्रिया मोठ्या हौसेनें वापरतात. दैनंदिन कामाच्या रगाड्यांत , घामामुळे, व अस्वच्छतेमुळें हे दागिने लवकरच घाण होतात, मळकट दिसतात व त्यामुळे शरीराची शोभा वाढविण्यास मदत होण्याऐवजी कुरूपतेंतच जास्त भर पडते. कातडीचे रोग ( skin diseases) निर्माण होण्याची भीति त्यापासून असते. हातांत बांगड्या, बोटांत अंगठ्या, पायांत कडी हे झाले सर्वसाधारण, स्त्रियांचे दागिने. हिंदू सोनार हे दागिने तयार करून भरमसाट किंमतीला ते यांना विकतात. दागिन्यांची हौस तर फार; त्यामुळे मिळेल त्या किंमतीला दागिने विकत घेऊन वापरणे खर्चाचे जाते. आर्थिक दृष्ट्या झालेली ही पिळवणूकच् होय !
शरिराच्या कोणत्याही भागावर गोंदून घेण्याची हौस कोरकू स्त्रीला फार आहे. पुरुषांच्या बाबतींत दागिन्यांची हौस मर्यादित आहे. तो आपल्या कपड्यावरच समाधान मानतो व दागिने घालायचेच झाले तर हातांच्या बोटांत अंगठ्या व हातांत कडी एवढ्यावरच खूप होतो.
खेड्याची रचना
अस्सल 'कोरकू खेडें' दाट अरण्य व डोंगराळ भाग सोडला तर क्वचितच पहायला मिळेल. अशा खेड्यांत दळणवळणांच्या साधनांचा अभाव, मलेरिया इ. तापांच्या साथी, रोगराई यांचेच प्रस्थ प्रामुख्याने दिसून येते. " रंगाई " हें एक कोरकू खेडे म्हणतां येईल. सुमारें 100 फूट उंचीच्या व 50 फूट रुंदीच्या टेकडीच्या माथ्यावर तें वसलेले आहे. झोपड्यांची रचना सरळ, एकमेकांना समांतर अशा चार रांगांत केलेली आहे. गांवाच्या मध्यभागांतून एक रुंद असा रस्ता जातो. या रस्त्याच्या दुतर्फा झोपड्यांची उभारणी केलेली आहे. झोपड्यांच्या या दोन रांगांच्या मार्गे तशाच प्रकारची आणखी एक एक रांग आहे. या दोन झोपड्यांच्या रांगामधून जाणारी गल्ली मात्र अत्यंत अरुंद अशी आहे. म्हणजे गांवच्या मध्यमार्गी मुख्य रस्ता, दोन्ही बाजूला दोन दोन मिळून एकंदर चार झोपड्याच्या रांगा व दोन अरुंद गल्या ही झाली गांवची एकंदर रचना. रस्त्याला लागून असलेल्या या झोपड्यांतून 'निहाळ' जमातीचे लोक रहातात. गांवांत एक मारुतीच देवालय आहे. रस्ता व गल्ल्या स्वच्छ आहेत.
झोपडीची रचना
कोरकूंच्या झोपड्या म्हणजे जणूं आगगाडीचे डबेच. लांबच लांब अशा जागेत भिंती घालून केलेली रचना म्हणजे कोरकूच्या झोपड्या. यामुळे घरांच्या दोन बाजू या कायमच्याच बंद असतात. झोपडीची पुढची बाजू मुख्य रस्त्याकडे व मागची बाजू गांवांतील जंगलाकडे उघडी असते. बांबू, गवत आणि लांकूड यांनी झोपडीची उभारणी होते. छप्पर पुढील व मागील बाजूला निमुळते होत जातें व अगदी शेवटी त्याची जमिनीपासूनची उंची अवघी 3-4 फूट असते. लांबून पाहिले तर वाटते की जणुं कांही जमिनीला भिडलेंच आहे! प्रत्यक्ष रहाण्याच्या जागेचे क्षेत्रफळ 20 फूट रुंदी, झोपडीच्या मध्यभागी उंची 15 फूट व लांबी 8 फूट एवढे ! अशा प्रकारच्या झोपडीच्या उभारणीला जवळ जवळ 100 रु. खर्च येतो. आणि ती साधारणतः 50वर्षे टिकते. छपराची दुरुस्ती मात्र दर वर्षी होते व दर पांच वर्षांनी ते बदलतांना झोपडींतील मधली खोली दोन भागांत विभागली जाते ती मातीच्या उंच उंच भांड्यांच्या रांगेनें. या विभागलेल्या खोलीचे आणखी दोन भाग करून एका भागांत स्वयंपाकघर व दुसऱ्या भागांत कोठीची खोली अशी व्यवस्था केली जाते. स्वयंपाकघर व कोठीची खोली ही भरदुपारच्या उन्हांत गडद अंधारांत गुरफटलेली असतात हे ह्या झोपड्यांचे वैशिष्ट्य. पोलीस, सावकार, पटेल यांच्या त्रासांतून सुटण्यासाठी केलेली ही योजना आहे. सर्व व्यवहार मागील दारानें चालू असतात. कोरकू कधीं घरांतील माणसाला बाहेरून हांक मारणार नाही. पुढील दरवाजा वाजला कीं पोलीस अगर तत्सम इतर कोणी आला या समजुतीने बायकामुळे स्वयंपाकघर व कोठी या काळोखाच्या खोलींत लपतात व पुरुष मागील दारानें मागील जंगलात पळून जातात. मागील दरवाजाने घरांत प्रवेश करणे हे कोरकूंचे वैशिष्टय आहे. घरांची ही रचना त्यांच्या पिळवणुकीची साक्ष आहे. गुरेढोरें व शेतकीची अवजारे घराच्या मागील बाजूला असलेल्या जागेंत ठेवली जातात. कुत्रा व कोंबडी हे कोरकूच्या कुटुंबाचे घटक, स्वयंपाकघर व कोठीची खोली पसंत करतात.
निमार जिल्ह्यांत 'कोरकू ' जमातीच्या दोन जाती दिसतात. 'राजकोरकू' व दुसरी 'पोथारी'. रजपुतांच्या व कोरकूंच्या संबंधांतून 'राजकोरकू' निर्माण झाले असे म्हणतात. 'राजकोरकू ' व 'पोथारी'यांच्यांत रोटीबेटी व्यवहार मात्र होत नाहींत. बैतुल जिल्ह्यांत कोरकूंच्या चार जाती आहेत. 'मोवारी', 'बावारी ' हे उच्चवर्गीय कोरकू व ' रुमास' व 'बोंडागस' हे कनिष्ठवर्गीय होत. वरील प्रत्येक जातीच्या आणखी छत्तीस उपजाती आहेत. त्यांचीं नांवें वनस्पती व जंगली श्वापदें यांच्यावरून पडलेली आहेत. या विषयीं दोन मनोरंजक आख्यायिका आहेत. "एकदां' कोरकू' जमातीचे पूर्वज देवाच्या दरबारी जमले. ज्या ज्या वस्तूंच्या जवळ ते बसले होते त्या त्या वस्तूंची नांवें देवानें त्यांना दिली. झाडाजवळ बसलेल्या माणसाला त्या झाडाचे, प्राण्याजवळ बसलेल्या माणसाला त्या प्राण्याचे आणि तींच नांवें आजपर्यंत चालू आहेत " दुसरी आख्यायिका अशी कीं " एका मोठ्या लढाईत कोरकूंचा पराभव झाला आणि सैरावैरा पळू लागले. त्यांनी ज्या ज्या वस्तूंचा लपण्यासाठी आधार घेतला त्या त्या वस्तूंची नांवें त्यांना पडली. "
देव दैवतें
कोरकूंच्या धर्माकडे वळले तर ' सूर्यमामा ' व चांदमामा’ही त्यांची दोन प्रमुख दैवतेंहोत. कोरकू ‘मामा’ हा मोठा सन्मानदर्शक समजतात. मृताच्या थडग्यावर देखील सूर्य-चंद्राची चित्रे ते काढतात. सूर्य व चंद्र यांची गणना देव व देवता या नात्यानेंहोते. सूर्य हे त्यांचे कुळदैवत. आज जरी सूर्य-चंद्रा विषयींची त्यांची परमेश्वरी भावना कमी झालेली असली तरी परंपरागत संस्कारामुळे ते अजूनहि त्यांना थोडा फार मान देतातच. कोरकूंचा ओढा आता हळूहळू हिंदू देवदेवतांकडे वळू लागला आहे. बैतुल जिल्ह्यांतील कोरकू ‘महादेवालाच' आतां आपला पूर्वज समजतात. निमार जिल्ह्यांतहि तीच परीस्थिति. शंकराचे उत्सवहि मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. शंकराच्या बरोबर रावणालाहि आज कोरकू मान देतात. होळीच्या प्रसंगी रावणाचा दरबार मोठ्या थाटाने भरतो, महादेव व रावण याशिवाय प्रत्येक खेड्यांत स्थानिक देवदेवता आहेतच. डोंगर देव हा त्यांतील एक प्रमुख. डोंगरांचा देव सर्वात उंच अशा टेकडीवर रहातो. दरवर्षी दसऱ्याच्या सुमाराला त्याची पूजा अर्चा होते. त्याला बकऱ्याचा नैवैद्य दाखविला जातो. वरुण राजाला खूष करून पाऊस पाडणें हे त्याचे कार्य, आणि इतर संकटा पासून कोरकूला वांचवणें हा त्याचा धर्म. ग्रामदेवता, महानदेव, मुठीयादेव इत्यादि देवदेवता रोगराई, इतर संकटे यापासून मुक्त करण्यासाठीं आहेतच. निमार जिल्ह्यांत अहान देवाचें महत्व फार आहे. अहानदेव म्हणजे गांवच्या वेशीजवळ 10-12 फूट उंचीच्या लाकडांवर हा कोरलेला असतो. त्याच्या डोक्यावर तांबड्या पांढऱ्यापताका फडकत असतात. हा भूतपिशाच्चांपासून आपले रक्षण करतो ही गांवकऱ्यांची समजूत. शेतीच्या हंगामांत याची पूजा अर्चा फार होते. निमार जिल्ह्यांतही आतां महादेवाचे प्रस्थ वाढत आहे व त्याबरोबर हनुमानाचे महत्त्वहि वाढतच आहे. कोरकूंच्या प्रत्येक खेड्यांत आज मारुतीचें देवालय दिसेल. हिंदु देवदेवतांबरोबर हिंदु पुजाऱ्यांचे वर्चस्वहि आतां हळू हळू वाढत आहे व त्याचबरोबर या धर्मभोळ्या लोकांची कर्मठ व अज्ञानी हिंदु पुजाऱ्यांकडून पिळवणूकहि होत आहे. गरीब हिंदु पुजाऱ्यांनी कोरकूंच्या धर्म वेडेपणाचा फायदा घेऊन जमीनजुमला, गुरेढोरे इ. संपत्ति मिळविली. कोरकूंचा हिंदु- धर्मावरील वाढता विश्वास त्यांच्या पिळवणुकीला मदतच करीत आहे. आणि या उलट हिंदूंचा कोरकूंच्या भूतापिशाच्च, जादूटोणा यांवर विश्वास बसत चालला आहे.
खुळ्या समजुती
'परिहार, ''भूमक' हे कोरकूंचे धर्मप्रमुख. कुटुंबांतील माणूस आजारी पडला कीं भूमकाला ' बोलावर्णे जाते. तो मूठभर , धान्य आजारी माणसाच्या वरून ओवाळून टाकतो आणि त्याची रास जमिनीवर ठेवून त्यावर बसून दोरीला दिवा बांधून त्याला झोके देतो व आजाऱ्याचे पूर्वज, ग्रामदेवता यांचा नामोच्चार करतो. दिवा झोके घ्यायचा थांबेल त्यावेळी ज्या देवदेवतेचे नांव उच्चारिलें जाईल तिची पूजाअर्चा करून तिला संतुष्ट करायचे म्हणजे आजारी माणूस बरा होतो अशी समजूत.
या परिहार व भूमक यांनाहि बाजूला सारून त्यांची जागा देखील हळूहळू हिंदु ब्राह्मण भिक्षु येईल असे आतां वांटू लागले आहे. कारण त्याने कोरकुंंचा भोळेपणा व दोष ओळखले आहेत व त्याचा फायदा आपण कसा करून घ्यायचा हे त्याला माहीत आहे. अंधश्रद्धा व अज्ञान यामुळे हिंदु धर्माकडे झुकलेल्या कोरकूंना अजून हिंदु सणांची पूर्ण माहिती नाहीं. त्यामुळे होळी, दिवाळी इ. सण साजरे झाले तरी ते नाममात्रच, व औचित्यभंग करून. उदा. होळीचा सण हिंदु, रंग उडवून परस्परांतील वैमनस्य व द्वेष जाऊन मैत्रीचे व सलोख्याचे संबंध निर्माण व्हावेत या हेतूने साजरा करतो, परंतु याची नीटशी कल्पना नसल्यामुळे होळीच्या सणाचा संबंध ते रावणाशी लावतात व आपल्या पद्धतीप्रमाणे नाच, गाणे, इ. प्रकारे साजरा करतात. होळी पेटवायची व जळत्या काड्या एकमेकांच्या अंगाला लावायच्या म्हणजे शरिरांतील भूतपिशाचे निघून जातात ही त्यांची कल्पना. यानंतर नृत्याला सुरवात होते.
विवाह पद्धति
कोरकूंच्या विवाह पद्धती 4 प्रकारच्या आहेत. पहिला प्रकार रीतसर विवाहाचा ( Regular Marriage ) परंपरागत पद्धतीप्रमाणे वरपक्षाकडून वधूची मागणी केली जाते. ती झिडकारली जाते. थोडीफार शिवीगाळ होते व शेवटीं लग्न ठरतें.
नंतर साखरपुडा वगैरे समारंभ होतात. त्यविळीं हुंडा म्हणून वरपक्षानें 200 रु.,1 बैल व 2 पोतीं धान्य ही वधूपक्षाला द्यायचीं असतात. मुलीला गूळ खोबरें व लाल साडी देऊन हा ‘सगाई’ चा समारंभ संपतो व महिन्याभरातच विवाह उकरतो.
दुसरा प्रकार म्हणजे ‘ लमसाना पद्धति ‘. मुलाला मुलीच्या वडिलांची 12 वर्षे सेवा करावी लागते. तेथेंच तो राहतो, खातो, पितो. गरीब कुटुंबांतील मुलगा हुंडा देणें कठिण असल्यामुळे हीच विवाहपद्धति पसंत करतो. या 12 वर्षाच्या काळांत मुलगा, मुलगी एकत्र राहिल्यामुळे साहाजिकच त्यांचे लैंगिक संबंध येतात व पुढे त्याची परिणति विवाहांत होते. कुटुंबांत जेव्हां एखादीच मुलगी असते, किंवा कुटुंब फार मोठे असल्यामुळे त्याची जबाबदारी घेणेंकुटुंबप्रमुखाला अशक्य होतें अगर गर्भ श्रीमंती असते अशाच मुलींचे बाप ही विवाह- पद्धति पसंत करतात. पहिल्या पद्धतीच्या खालोखाल ही पद्धति प्रचलित आहे.
प्रेमविवाह, अनैतिक संबंधामुळे होणारे विवाह हा तिसरा प्रकार व विधवाविवाह हा चौथा प्रकार.
या विवाहप्रकारानंतर अंत्य संस्काराकडे वळले तर असे दिसतें की कोरकू 3-4 फूट खोल खड्डा खणून त्यांत मृत देहाला पुरतात. पुरतांना त्या मृत देदाच्या तोंडांत निरनिराळे खाद्य पदार्थ ठेवले जातात व त्याच्या आवडीच्या कांही गोष्टी त्याच्याबरोबर पुरल्या जातात. नंतर माती लोटून त्यांवर 3 फूट लांबीचा दगड ठेवला जातो. कोरकू समजुती प्रमाणे मृताला शांति मिळावयास 10 वर्षे लागतात.
इतर टोळ्यांप्रमाणेच कोरकू टोळीतहि कुठलीहि सामाजिक संस्था अस्तित्वात नाही. त्याला अनेक कारणें दाखविता येतील. आर्थिक, सामाजिक, परंपरागत अशा अनेक कारणांमुळे कुठलीहि सामाजिक संस्था या टोळीधारी लोकांत मूळ धरुं शकत नाही. त्यामुळे ऐक्य, संघटन वगैरे गुणांची वाण फार दिसते. कोरकू समाजजीवनात मात्र स्त्रीला जास्त मान आहे.
कोरकूंच्या समाजजीवनाचा, आर्थिक स्थैर्याचा व सांस्कृतिक विकासाचा अभ्यास करण्यासाठी मध्यप्रदेशांतील या भागाला भेट देणे महत्त्वाचे आहे. भारतातील या प्रतिगामी, मागसलेल्या टोळीधारी लोकांचा प्रश्न जर आपल्याला सुरळितपणे सोडवायचा असेल तर सुधारलेली जनता व हे लोक यांचा सहकारी तत्त्वावर संबंध आला पाहिजे, टोळीधारी लोकांच्या व्यापक समाजशिक्षणाचा प्रश्नही योग्य तऱ्हेनेंहाताळला गेला पाहिजे. त्यामुळे सुधारलेल्या लोकांचा जीवनक्रम व संस्कृति यांची ओळख डोंगराळ व जंगली भागांत राहणाऱ्या, कधीहि वर्तमानपत्र न पाहणाऱ्या, आधुनिक, साधनसंपत्तीपासून वंचित असलेल्या या जनतेला होईल व तिची पावले प्रगतिपथावर.. पडतील.
'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सीस ही भारतांतील समाजशास्त्राचें शिक्षण देणारी एक प्रमुख संस्था आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी समाजशास्त्रांतील निरनिराळ्या अंगोपागांचे संशोधन करून त्यावर प्रबंध लिहून या संस्थेतून उत्तीर्ण होत असतात. समाजशास्त्राच्या अभ्यासाला भारतांत खूपच वाव आहे व त्या दृष्टीने वरील संस्थेने चालविलेलें कार्य स्पृहणीय आहे. “ Socio- Economic and Cultural Study of Masia and Korkes, of Madhya Pradesh ” ह्या श्री. दीनेशचंद्र दुबे यांच्या प्रबंधावरून “ सोबतचा लेख तयार केला आहे. या लेखांत फक्त ‘ कोरकू ‘ टोळीचाच परिचय दिला आहे. वरील प्रबंधास संस्थेतील प्राध्यापक डॉ. प्रभु यांचे कुशल मार्गदर्शन लाभलें होतें. या प्रबंधाचे लेखक श्री. दुबे हे आज भोपाल समाज विकास योजनेंत प्रमुख समाजशिक्षणाधिकारी आहेत. प्रस्तुतच्या प्रबंधावरून स्वतंत्र लेख तयार करण्याची परवानगी दिल्याबद्दल श्री. दुबे व टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सीस यांची साधना ऋणी आहे.
जसजसे दिवस जात आहेत तसतशा कॅम्पमधल्या बारीकसारीक गोष्टी विस्मृतीच्या गर्तेत गडप होत आहेत. कांहीं दिवसांनी ह्या स्मृति आणखीहि पुसट होतील. हा तीन महिन्यांचा काल आज दीर्घ वाटतो. उद्यां एक क्षण इतकेच त्याचे स्वरूप राहील. पण मला वाटतें आम्हां अनेकांच्या जीवनांतील हा एक अमर क्षण आहे.
Tags: similarity of Hindu Social life style हिंदू धर्म साम्य Korku cast समाजजीवन कोरकू जमात weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या