डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

सक्तीने एकत्रीकरण करणारे लोक ‘पागलखाने’ निर्माण करतील!

आजचा आपला हिंदुस्थान म्हणजे छोटी पृथ्वीच आहे. किती वंश, किती रंग, किती धर्म, किती संस्कृती आहेत इथे! या सर्वांना एकत्र, एका माळेमध्ये गुंफावे लागेल. हे काम जुलूम-जबरदस्तीने, आग्रही वेडेपणाने, शक्तिप्रदर्शनाने होणारच नाही. देश निधर्मी असला पाहिजे आणि तोच एक मार्ग आहे एकत्र राहण्याचा. देश कोण्या एका धर्माचा नसावा, राज्य कोण्या एका धर्माचं नसावं- हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. अशा देशाचे दरवाजे सर्वांसाठी उघडे पाहिजेत. विविध वंशीयांच्या व अल्पसंख्याकांच्या भाषांना, त्यांच्या जीवनपद्धतींना आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण संस्कृतींना योग्य अशी जागा या नव्या राष्ट्रात देण्यात यावी; मगच एकात्मता आकाराला येईल. अल्पसंख्याकांना फुलू दिलं पाहिजे. त्यांना प्रगती करता येईल, असं वातावरण निर्माण केलं पाहिजे. त्यांना तशी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. यातूनच हिंदुस्थानचं सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवन सुदृढ आणि निरोगी राहील.

आपल्या देशात किती तरी धर्म अस्तित्वात आहेत. किती रंग, किती रूपं, किती संप्रदाय, किती चाली-रीती! या विविधतेचा आणि भेदांचा परकीयांनी पुरेसा फायदा करून घेतला आहे. पुढेसुद्धा फायदा घेणारच नाहीत याचा भरवसा नाही. म्हणून, या देशात ‘कौमी एकते’ची फार आवश्यकता आहे.

आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मतेसाठी यापूर्वीसुद्धा मोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या. सम्राट अशोकाच्या वेळेला एक चळवळ चालविली गेली, एकात्मतेसाठी. दुसरी, अकबराच्या वेळेला. तिसरी आता जवाहरलाल नेहरूंच्या वेळेस सुरू होते आहे. पहिल्या दोन चळवळी इतिहासजमा आहेत, दूरच्या भूतकाळातल्या आहेत. तिसरी आता चालू असलेली कौमी एकतेची चळवळ. ती यशस्वी झाली, तर आत्ताचीच नाही तर येणारी पिढीसुद्धा लाभान्वित होणार आहे. म्हणून या सद्य मोहिमेचे महत्त्व आहे. या चालू मोहिमेचे मूल्यमापन करावे लागेल, मागील दोन चळवळींच्या प्रकाशात! इतिहासजमा झालेल्या दोन चळवळींची वैशिष्ट्ये काय होती आणि त्यांचे दोष काय होते, हे पाहावे लागेल. हे सोपं काम नाही, कारण या मोहिमेवर विचार करणारे लोक वेगवेगळी मते बाळगताना दिसतात.

सम्राट अशोक आणि अकबर दोघांनी या देशात लष्करी बळाचा वापर करून ‘राष्ट्रीय एकता’ आणण्याचा प्रयत्न केला. पण अशोकाने कलिंग युद्धानंतर आणि अकबराने हळदीघाटीनंतर आपली धोरणं बदलली आहेत. त्यांच्या लक्षात आलं की, मनाच्या जोडणीवर लष्करी शक्तीचा वापर परिणामकारक सिद्ध होत नसतो. त्यांच्या लक्षात आलं की- माणसं वाकतात-मोडतात, पण त्यांची मनं बदलतं नाहीत. असंही लक्षात आलं की- माणसांना बदलायचं असेल तर, वापरायची धोरणं आणि साधनं बदलावी लागतील. ज्यांनी बळाच्या साह्याने ‘राष्ट्रीय एकता’ आणण्याचा प्रयत्न केला, त्यांना आपली मतं, आपली धोरणं बदलावी लागलेली आहेत. बळाच्या चुकीच्या वापराचं दुसरं नाव ‘जुलूम’ असं आहे. जुलमाचा संबंध आणि एकरूपता कबरस्तानाशी जोडली जाते, जीवनाशी नाही. जीवनातले रंग, फुलणारे बहर आणि सृजन याच्याशी जुलमाचा संबंध जोडला जात नसतो. बिस्मार्कने जर्मनीला एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. कारण त्याची पॉलिसी पोलादी अशी आणि बळावर आधारलेली होती. हिटलरने सगळ्या जगाला रक्ताने न्हाऊ घातले. रानटी आणि क्रूर अशी धोरणे त्याने राबविली. सात लाख ज्यूंच्या हत्येनंतरही जर्मनीचं भवितव्य बदलले नाही, कारण ते बदलणारे नव्हतेच. आता जर्मनीच्या विभाजनाची चर्चा ऐकू येतेय. जे देशोधडीला लागले त्यांनी मात्र ‘इस्राईल’ची स्थापना केली- स्वतंत्र सृजन केले.

म्हणून या देशात जोर-जबरदस्तीचा वापर करून शक्तिप्रयोग करून, दुराग्रह राबवून जी मंडळी ‘राष्ट्रीय एकात्मता’ आणण्याचा विचार करत असतील; ती मंडळी ‘एकात्मते’ची शत्रू आहेत, असं म्हणावं लागेल. आपल्या आदर्शवादी विचारांचे ते स्वत:च शत्रू बनून जातात.

या देशात पाच करोडच्या जवळपास मुसलमान राहतात. एक करोडच्या जवळपास ख्रिश्चन. तितकेच शीख, बौद्ध, जैन, यहुदी. तितकेच अन्य. यावर शक्तीचा आणि सक्तीचा बुलडोझर चालवून त्यांना कसे एक करणार? हे दगड-धोंडे वाटले का? प्रेमाच्या जादूनेच ते एकमेकांजवळ येऊ शकतात आणि त्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग उपलब्ध नाही.

मुघल सेना शिखांचा पराभव करू शकली नाही, शिखांची त्या वेळची संख्या कमी असतानाही. प्रचंड शक्ती असताना मराठ्यांना काबूत करता आलं नाही. आता तर आधुनिक काळ आला आहे. लोकसंख्याही वाढली आहे. आता बदलत्या परिस्थितीत शक्तिसामर्थ्याचा वापर करून ‘कौमी एकता’ आणणं कसं शक्य होणार आहे? जी मंडळी सक्तीने एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करतील, ती भोवताली ‘पागलखाना’ निर्माण करतील, हे नक्की.

अशोकाने बौद्धमत स्वीकारले. त्याआधारे त्याने कौमी एकतेची पायाभरणी केली. अकबराने नवा धर्म स्थापन केला- ‘दीन-ए-इलाही’. यामार्फत हिंदू-मुलमानांना धार्मिक कारणांसाठी एकत्र आणण्याचा त्याने प्रयत्न केला. पण एका धर्माच्या आधारे सर्वांना एकत्र आणणं त्याही वेळेस अशक्य झालं आणि आज तर ते मुळीच शक्य नाही. एका मुसलमान मित्राने म्हटलं की- त्याच वेळेस सगळा हिंदुस्थान मुसलमान झाला असता, तर पाकिस्तान बनलाच नसता! हिंदूंचं हेच म्हणणं आहे, उलट्या पद्धतीने. जर सगळा देश हिंदू झाला, सगळ्या रीतिभाती हिंदू पद्धतीने पाळल्या गेल्या; तर कौमी एकतेचा प्रश्न मिनिटात सुटेल!

पण हा काही मिनिटांचा ‘मसला’ नाहीच. या देशावर मुसलमानांची सत्ता आठशे वर्षं राहिली आहे. अधिकार, धर्मसत्ता इत्यादी सर्व मार्ग उपलब्ध असतानाही मुसलमानांची संख्या दहा कोटींपेक्षा जास्त वाढू शकली नाही. आणि आज या देशात हिंदूंची संख्या तीस कोटींपेक्षा जास्त आहे. या तीस कोटी हिंदूंवर इस्लाम लादण्यासाठी किती आठशे वर्षं लागतील, याचा हिशेब करावा लागेल. आज मुसलमानांकडे पूर्वी होती तशी कथित शक्ती नाही, लष्कर नाही, सामर्थ्य नाही. त्यामुळे बळाच्या साह्याने ते इस्लाम लादू शकत नाहीत. हिंदू मित्रांचं म्हणणं त्या उलट असतं. त्यांच्यासमोर तीस कोटी ही संख्याच फक्त असते. पण हे सगळे एकत्र, एकजिनसी, एक विचारांचे आहेत का? त्यांच्यात आपसात भेदभाव आहेत, मतभेद आहेत. जी (हिंदू) मंडळी आपल्याच बांधवांना दूर ढकलतात, ती राष्ट्रीय एकात्मता कशी साधू शकतील? अडचण ही आहे. पण दोन्ही बाजूंनी पक्ष मांडला जातोय, हे मात्र खरे. वास्तव असे आहे की, ‘कौमी एकते’चा आणि धर्माचा काही संबंधच नाही. धर्माच्या नावावर राष्ट्रीय एकतेचे सूत्र सांगणे म्हणजे जनतेची फसवणूकच. या देशात मतभेदांचं भांडवल करणं आणि द्वेषाला विस्तारत नेणं अगदी घातक असंच असणार आहे.

ज्या देशात दहा धर्म आणि पंधरा भाषा असतील, त्यापेक्षा जास्त संप्रदाय असतील, त्यापेक्षा जास्त चाली-रीती असतील आणि या चाली-रीती सुंदर असतील, आध्यात्मिक पण असतील, शेकडो वर्षांच्या परंपरा व संस्कृती (कल्चर)ने बद्ध अशा असतील, देशाला प्राचीनत्वाचा वारसा मिळालेला असेल, इतिहास व वाङ्‌मयाचा प्रवाह अखंड वाहता असेल; त्या देशाच्या एकात्मतेबद्दल आपल्याला बोलायचं आहे. अनेकांनी या देशाला समृद्ध बनवलं आहे. मदुरेचं मंदिर ज्यांनी बनवलं, वेरूळचं शिल्प आणि अजिंठ्याची चित्रं ज्यांनी बनवली, ताजमहलचे घुमट ज्यांनी साकार केले, प्राचीन चर्च आणि गुरुद्वारा ज्यांनी बनवले, अबूची सुंदर मंदिरं अन्‌ सांची व सारनाथचे स्तूप ज्यांनी बांधले-घडवले; त्यांनी ‘विविधतेतली एकता’ प्रवाहित केली आहे. या ठिकाणांहून एका धर्माचा, एकाच विचाराचा दिवा कसा  पेटता राहील? पण राजकारण? या मंडळींना कोण सांगणार? ही मंडळी या देशाला द्वेषातून, नफरतीच्या प्रोत्साहनातून आत्मघातकी परिस्थितीत लोटत आहेत.

मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की, अशा विविधतेतून राष्ट्रीय एकात्मतेचं स्वरूप कसं असेल? उघडच दिसतं की, या एकात्मतेत विविधता असणार आहे. एक भाषा, एका धर्माचं वर्चस्व, विशिष्ट वर्ग किंवा जातीचं वर्चस्व इथे या एकात्मतेत असणार नाही. कॅनडात इंग्रज आणि फ्रेंच एकत्र राहत आले आहेत. दोन्ही भाषा बोलल्या जातात समाजात. दोघेही ‘कॅनेडियन’ समजतात स्वत:ला. त्याचा अभिमान बाळगतात. आपापल्या भाषांवर प्रेम करतात आणि देशावर प्रेम करतात, प्राण देण्याची तयारी ठेवतात. रशियात वीसपेक्षा जास्त भाषा आहेत आणि तितकीच राज्यं आहेत, वंश आहेत, विविधता आहे. रंगारंग असं समाजजीवन आहे. असं असतानाही तिथे राष्ट्रीय एकता आहे, युनिटी आहे. हे सद्य काळातलं एक उदाहरण!

आम्ही नुकतेच स्वतंत्र झालोत. आपण या देशातल्या एकात्मतेचा अभ्यास केला पाहिजे. ही उदाहरणे नजरेसमोर ठेवली पाहिजेत. आजचा आपला हिंदुस्थान म्हणजे छोटी पृथ्वीच आहे. किती वंश, किती रंग, किती धर्म, किती संस्कृती आहेत इथे! या सर्वांना एकत्र, एका माळेमध्ये गुंफावे लागेल. हे काम जुलूम-जबरदस्तीने, आग्रही वेडेपणाने, शक्तिप्रदर्शनाने होणारच नाही. देश निधर्मी असला पाहिजे आणि तोच एक मार्ग आहे एकत्र राहण्याचा. देश कोण्या एका धर्माचा नसावा, राज्य कोण्या एका धर्माचं नसावं- हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. अशा देशाचे दरवाजे सर्वांसाठी उघडे पाहिजेत. विविध वंशीयांच्या व अल्पसंख्याकांच्या भाषांना, त्यांच्या जीवनपद्धतींना आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण संस्कृतींना योग्य अशी जागा या नव्या राष्ट्रात देण्यात यावी; मगच एकात्मता आकाराला येईल. अल्पसंख्याकांना फुलू दिलं पाहिजे. त्यांना प्रगती करता येईल, असं वातावरण निर्माण केलं पाहिजे. त्यांना तशी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. यातूनच हिंदुस्थानचं सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवन सुदृढ आणि निरोगी राहील. अल्पसंख्याकांना समान दर्जाही मिळेल. पण हे काम कसरत करण्यासारखं राहील. अवघड आणि मुश्कील असं. संकुचित दृष्टिकोन न बाळगता, मनाचा कोतेपणा आड न येऊ देता, राजकीय-पक्षीय स्वार्थ बाजूला ठेवून, आग्रहाचे चष्मे उतरून ठेवूनच हे अवघड काम करता येईल. ‘छोट्या दिला’ने घेतलेले निर्णय छोट्या राष्ट्राला निर्मित करतील. मोठ्या राष्ट्रनिर्मितीसाठी ‘मोठं हृदय’- ‘बडा दिल’ आपल्याकडे असायला हवा.

खोलात जाऊन बघितलं तर या देशात एक अंतर्गत अशी एकात्मता आहेच. ही खोल अशी भावना सामान्यांच्या हृदयात वसलेली असते. मतभेदाची वरवरची खळबळ-वरवरचा गोंधळ सोडला, तर अंतस्थ असा समुद्र या जनसामान्यांच्या हृदयात खोलपर्यंत पसरलेला असतो. तुम्ही बंगाली किंवा मल्याळी असाल, पण तुम्ही हिंदुस्थानी आहात- ही भावना खोल समुद्रासारखी आहे. तुम्ही हिंदू किंवा मुसलमान असाल, पण तुम्ही हिंदुस्थानी आहात- ही जाणीव आश्वासक. तुम्ही तमिळ आणि मराठी बोलाल, पण तुम्ही हिंदुस्थानी आहात. नृत्य-गायनादी प्रकारांत तुम्ही व्यक्त व्हाल. लावणी गाल, भांगडा नाचाल, पण तुम्ही हिंदुस्थानी आहात. आणि ही जाणीव- हा ‘एहसास’ आतून येतो, तो समुद्रासारखा खोल आहे. ही जाणीव मोठी आश्वासक आहे. या सगळ्या सौंदर्याचा एकत्रित आविष्कार म्हणजे हिंदुस्थान आहे. हिंदुस्थान म्हणजे दिल्लीच नाही, तर मद्रास पण आहे. मदुराईचं मंदिर म्हणजे हिंदुस्थान नाही, तर दिल्लीतील जामा मशीदसुद्धा आहे. धृपदच नाही, तर खयाल पण आहे. महाकवी कालिदासच, नाही तर गालिब पण आहे. कबीर पण आहे, टागोर पण आहे. ही जाणीव हिंदुस्थानच्या जनतेच्या मनाच्या कोपऱ्यात अस्तित्वात आहे!

ही जाणीव मजबूत केली पाहिजे. सर्वच घटक, सर्व नागरिक, त्यांचे प्रदेश, त्यांच्या भाषा आणि कल्चर यामध्ये समान धागा शोधला पाहिजे. एक धागा गरिबीचा आहे, भाकरीचा आहे. बेरोजगारी आणि बिमारीचा आहे. या समस्येवर तोडगा म्हणजे परस्परद्वेष नाही. एकमेकांशी भांडणे हाही तोडगा नाही. गरिबी आणि विषमता भांडणाने-द्वेषाने दूर होणार नाही. यासाठी समृद्धीप्राप्ती हाच उपाय आहे. जास्त दौलत निर्माण करावी लागणार आहे, आणि हे काम एकत्र येऊनच होऊ शकते.

सर्वांनी एकत्रितपणे धनसंपदा, समृद्धी निर्माण करावी लागेल. अर्थात, या संपत्तीवर, उपभोगावर आणि विनियोगाच्या हक्कावर सर्वांचा समान हक्कही असावा लागेल. विषमता संपवावी लागेल. काळा-गोरा, स्त्री-पुरुष, हिंदू-मुसलमान असा काही भेद करता येणार नाही. समृद्धीचा माग सर्वांसाठी अबाधित ठेवावा लागेल. सुंदर असं जगणं उपलब्ध करावं लागेल. हरिजनाला मान खाली घालावी लागणार नाही. व्यर्थ अहंकारही पोसले जाणार नाहीत. जीवनमूल्ये सुंदर असतील, मौल्यवान असतील. सर्वांना उपलब्ध असतील. भारतीयत्वाचा हिंदुस्थानी असण्याचा समान धागा घट्ट करून जनतेच्या हृदयात जाणीव प्रसारित करावी लागेल. तरच, ‘कौमी एकता’- राष्ट्रीय ऐक्य शक्य आहे. हे काम आपण सर्वांनी मिळून करायचं आहे!

अनुवाद: भारत सासणे 

(‘प्रगतिशील लेखक संघ’ नावारूपाला आणण्यात ज्या लेखकांचा सहभाग होता, त्यात एक नाव कृष्ण चंदर यांचेही होते. त्यांना वगळून प्रगतिशील लेखक संघाच्या कार्याबद्दल बोलताच येणार नाही. उर्दू भाषेला- विशेषतः उर्दू कथेला- एका उंचीवर नेण्यात त्यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी भरपूर लिहिले. हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांमधून सारख्याच अधिकाराने लिहिले. त्यांच्या आयुष्यावर प्रगतिशील साहित्याचा फार मोठा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. प्रगतिशील लेखक संघाने त्यांच्या लेखनाला एक नवी दिशा दाखवली. त्या रस्त्यावर ते मरेपर्यंत चालत राहिले. त्यांच्या बहुतेक कथा समाजवादाने प्रेरित आहेत. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे दीन-दुबळ्यांचे दु:ख, पराजय, आशा-आकांक्षा यांचेच चित्रण केले. सांप्रदायिकता आणि धार्मिक कट्टरता यांवर नेहमीच प्रहार केला.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कृष्ण चंदर

(1914 - 1977) हिंदी व उर्दू लेखक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात