डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

(स्थळ : दिल्ली येथील कमलकुंज बिल्डिंगचा ग्राऊंडफ्लोअर. मालकाचं ऑफिस)

वेळ/ काळ : सद्य/ सकाळ

(ऑफिस दिसतं. भिंतींना नव्यानेच सफेदी केली आहे. विजेची तार खिडकीतून बाहेर जाताना दिसते. सूचित होतं की, बिल्डिंगमध्ये अजून वीज आलेली नाही. कोपऱ्यात लाकडी फळ्या, रंगांचे डबे आणि सिमेंटचं पोतं दिसतं. सूचित होतं आहे की, बिल्डिंग नव्याने तयार झाली आहे आणि अजून कामं बाकी आहेत. मध्यभागी गणेशाचं चित्र, मोठ्ठं असं. फुलांचे सुकलेले हार दिसतात. त्या खाली रिव्हॉल्‌व्हिंग चेअरवर पंडित रामदयाळ बसलेले दिसतात. समोर टेबल. टेबलावर फायली, फोन वगैरे. रामदयाळ यांच्या कपाळावर टिळा लावलेला आहे. डाव्या बाजूला एक रिकामी खुर्ची. छोटे टेबल, टाईपरायटर इत्यादी. तिथे टायपिस्ट बसलेला दिसतो. त्याचं नाव मिर्झा अर्शद. तो पान खातो आहे. एक पाटी, त्यावर तपशील. काही खुर्च्या इकडे-तिकडे. पडदा उघडतो तेव्हा पंडित पान खात आहेत, डब्यातून काढून. टायपिस्ट टाईप करता-करता थांबून, वेगळ्या डब्यातून पान काढतो आणि खातो. दोघांची ॲक्शन एकाच वेळेला होत राहते. त्यातून एक लय साध्य होते. समोर चपराशी उभा. पंडित त्याला पाहतात.)

पंडित :  हो ऽ हो ऽ!... लगेच पाठवा आत. उशीर नको.. पाठवा... पाठवा.

     (चपराशी जातो. पंडित टायपिस्टकडे पाहत)

     ...हांऽ, मिर्झाजी, किती फ्लॅट गेले?

  मिर्झा :      वीस!

  पंडित :      उरले किती?

  मिर्झा :      नऊ

  पंडित :      मला वाटतं, आज उरलेले पण जातील!... त्यांची ॲग्रिमेंट पण करायची  असतील ना?

  मिर्झा :      तेच करतोय.

 (एक पुरुष आणि एक स्त्री येते. पुरुष चाळीसच्या आसपासचा. स्त्री तीस- पस्तीस. पुरुषाने पाश्चिमात्य पद्धतीचा सूट घातलाय. स्त्रीने साडी परिधान केलीय.  कपाळावर कुंकू. पुरुषाचा चेहरा गंभीर. दोघंही नीटनेटके, सुखवस्तू असे दिसताहेत.)

  पुरुष   :      राम, राम.

  पंडित :      राम, राम! बसाऽ बसा ऽ...बसा ना!

  पुरुष   :      पंडित रामदयाळ आपणच ना?

  पंडित :      हो ऽ!

  पुरुष   :      या बिल्डिंगचे मालक आपणच?

  पंडित :      हो ऽऽ!

  पुरुष   :      ही जाहिरात तुम्हीच दिलीत?

     (एक वृत्तपत्र देतो)

  पंडित :      हो, होऽ! आम्हीच दिली होती जाहिरात.

  पुरुष   :      आम्हाला एक फ्लॅट पाहिजे होता.

  पंडित :      किती खोल्यांचा?

  पुरुष   :      चार, चार खोल्यांचा फ्लॅट.

  पंडित :      चार खोल्यांचे फ्लॅट तर सगळे गेले.

  पुरुष   :      गेले?

  स्त्री    :      (निराशेने) हंऽऽ!

  पुरुष   :      (स्त्रीला उद्देशून) तीन खोल्यांचा पण चालेल ना, सावित्री?

  स्त्री    :      (सुस्कारून) हंऽ, काय करणार? ...चालेल, तीन खोल्यांचा घ्या.

  पुरुष   :      (पंडितला उद्देशून) तर मग पंडितजी, आम्हाला तीन खोल्यांचा फ्लॅटच द्या. पण जरा लवकर व्यवस्था करा.

  पंडित :      आजच घ्या, महाराज! पण... आमच्या अटी तर तुम्हाला माहीत आहेत ना?

  पुरुष   :      हो, होऽ! माहीत आहे ना! तीनशे रुपये भाडं आणिऽऽ (पेपर कटिंग पाहून) फर्निचर बाइंग इसेन्शियल! हे फर्निचर बाइंग काय आहे?

  पंडित :      अर्थ असा महाराज की, तुम्हाला फ्लॅट भाड्याने घेताना आमच्याकडून  फर्निचरसुद्धा विकत घ्यावं लागेल.

  स्त्री    :      फर्निचर तर आम्हाला विकत घ्यावंच लागणार आहे. मग बाहेरून घेणार नाही  आम्ही, तुमच्याकडूनच घेऊ.

  पुरुष   :      मग, कोणकोणतं फर्निचर घ्यावं लागेल?

  पंडित :      प्रत्येक खोलीत एक खिडकी, एक दरवाजा आणि एक स्टूल.

  स्त्री    :      (गोंधळून) एक खिडकी, एक दरवाजा,  एक स्टूल- प्रत्येक खोलीत?

  पंडित :      बरोबर, अगदी बरोबर.

  स्त्री    :      म्हणजे तुम्ही खिडकी आणि दरवाजाला फर्निचर म्हणता?

     (पंडित फक्त मान हलवतो. संमतिदर्शक अशा अर्थाने)

  पुरुष   :      तुला आश्चर्य वाटतंय सावित्री? जर घरांची कमतरता अशीच राहिली तर, एके  दिवशी खोलीच्या चार भिंतीसुद्धा फर्निचरमध्ये समाविष्ट होतील!

  स्त्री    :      अरे देवा ऽ!

  पुरुष   :      बरं, तर पंडितजी- किती मधे पडेल फर्निचर आम्हाला?

  पंडित :      चार हजार रुपये.

  स्त्री    :      काऽय? चार हजार रुपये? एक खिडकी, एक दरवाजा, एक स्टूल... चार हजार  रुपये? म्हणजे कोणत्या वस्तूनी बनवलंय हे फर्निचर, म्हणते मी?       चांदी, सोनं की  वाघाचं कातडं?

  पुरुष   :      सावित्री... हे फर्निचर माणसाच्या कातडीपासून बनवलं जातं! पण वाद  करणं अगदीच व्यर्थ आहे.

  पंडित :      बरोबर! इकडं हाच नियम आहे.

  पुरुष   :      ऐकलंस? ऐकलंस सावित्री? इकडला हाच नियम आहे. आता तुला घर पाहिजे असेल तर भाड्याचे तीनशे रुपये आणि फर्निचरचे चार हजार रुपये तुला वेगळे  काढून ठेवावे लागतील. स्टूल... खिडकी आणि दरवाजा.

  स्त्री    :      चार हजार रुपये- एका खिडकीचे! मेंदूतल्या सगळ्या खिडक्या उघडल्या  आहेत जणू! पण उपाय काय आहे? घर तर पाहिजे ना, स्वत:ला लपवण्यासाठी?  दोन महिने झाले हॉटेलमध्ये राहतो आहोत.

  पुरुष   :      मग टाईप करा ॲग्रीमेंट, पंडितजी!

  पंडित :      तुम्ही तीनशे रुपये भाडं द्याल?

  पुरुष   :      देऊ.

  पंडित :      आणि चार हजार?

  पुरुष   :      देऊ.

  पंडित :      आपलं तीन महिन्यांचं डिपॉझिट?

  पुरुष   :      देऊ, तेही देऊ!

  पंडित :      आणि चालू महिन्याचं भाडंसुद्धा...

  पुरुष   :      होऽ चालू महिन्याचं भाडंसुद्धा!!

  पंडित :      तर मग मिर्झाऽऽ

     (मिर्झा दचकतो. दोघं एकाच वेळेवर पानं काढतात, एकाच वेळेस तोंडात ठेवतात.  मिर्झा डबा बंद करतो.) यांचं ॲग्रीमेंट टाईप करा.

  मिर्झा :      बेहतर है।

  पंडित :      तुमचं नाव?

  पुरुष   :      अं? नाव? कृपाराम भारद्वाज... ही माझी धर्मपत्नी सावित्री.

     (पंडित नमस्कार करतो.)

  पंडित :      राहणारे कुठले?

  पुरुष   :      भोजपूर.

  पंडित :      (खूश होऊन) भोजपूर? तिथे तर माझे मामा राहतात- पंडित दीनदयाळ, मघी  मोहल्लेवाले! तुम्ही ओळखता त्यांना?

  पुरुष   :      त्यांना कोण ओळखत नाही?

  पंडित :      गोरे, बुटके-

  पुरुष   :      गोरे, बुटके! कधी-कधी जोराने हसतात. हा...हा... हाऽ!

     (मिर्झा जोरात हसतो. पंडितही हसतो. एक बोटाने दाखवत)

  पंडित :      तेच, तेच असणार... माझे मामा! मिर्झा यांचं ॲग्रीमेंट लगेचच टाईप कराऽ...  फास्ट. (घुटमळत) विसरलोच विचारायचं... तुम्ही काय करता?

  पुरुष   :      एका कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सायंटिस्ट आहे मी. तिथे संशोधन  करतोय. कॅन्सर म्हणजे समजलं का? नासूऽर... कर्करोग.

  पंडित :      भारद्वाजसाहेब, कर्करोग फार वाईट रोग असतो... त्यावर इलाज सापडला  पाहिजे.

  पुरुष   :      एक ना एक दिवस अवश्य सापडेल. माझ्यासारखे अनेक जण त्या प्रयत्नात आहेत. आमची नवी लॅबोरेटरी तयार झालीय. क्वार्टर्स पण तयार होताहेत     आमच्यासाठी, पण अजून दोन-तीन वर्षं लागतील पूर्ण व्हायला.

  पंडित :      हरकत नाही... इथे राहाऽऽ! तीन वर्षं... तीस वर्षं! चालेल आम्हाला. हा... हा... हा! भारद्वाजजी, या घराला आपलंच घर समजा तुम्ही. आता तर तुमच्याशी आमचं नातं जुळलं ना! भोजपूरचे ना तुम्ही... मऽ गऽ... आमच्या मामाच्या  गावचे तुम्ही!

  पुरुष   :      धन्यवाद.

  पंडित :      पण एक वचन द्यावं लागेल...

  पुरुष   :      कोणतं?

  पंडित :      दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पूर्ण भाडं द्यावं लागेल.

  पुरुष   :      हो, हो- वचन दिलं... अहोऽ

     ‘रघुकुल रीत सदा चली आई ऽऽ

     प्राण जाए ऽ पर वचन न जाएऽ’

     (पंडित खूप खूश होतो. आनंदाने हात मिळवतो. त्याच वेळेला एक लहान

         मुलगा  येतो, पुरुषाच्या पायाला मिठी मारतो. (रुसक्या आवाजात)

  मुलगा :      अब्बू... अब्बू... शकुरा आम्हाला आइस्क्रीम घेऊन देत नाही.

  पंडित :      (आश्चर्याने) अब्बू?

  मुलगा :      आणि अम्मी कुठाय?

  पंडित :      अम्मी?

  मुलगा :      अम्मी, शकुरा म्हणतोय की, ईदमध्ये आइस्क्रीम चालत नाही. पण अम्मी, ईद  तर एक महिन्याने आहे ना?

  पंडित :      (आश्चर्याने) ईद?

     (पाठोपाठ शकुरा येतो. हा नोकर आहे. हा मुलाला पकडण्याचा प्रयत्न करतो. हा पकडा-पकडीचा खेळ अल्पकाळ चालतो. ‘आई’ रागाने नोकराला म्हणते)

  स्त्री    :      तुला सांगितलं होतं ना मी- मुलाला आत येऊ द्यायचं नाही म्हणून...? लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना?

  शकुरा :      बेगमसाहिबा, ऐकतच नाही तो. हात सोडून पळाला. फारच खोडकर  झालाय...

  स्त्री    :      सैतान कुठला! थांब, दाखवते तुलाऽ (मारायला धावते.) चल बाहेर,  माझ्याबरोबर! तुला चांगलं आइस्क्रीम खायला देतेऽ (मुलाला पकडून बाहेर नेते.      खोलीत शांतता.)

  पंडित :      तर, तुम्ही मुसलमान आहात?

     (पुरुष गप्प उभा राहतो.)

     आणि तुमची धर्मपत्नीसुद्धा? होऽ ना?

     (पुरुष गप्प उभा राहतो) ...म्हणजे तुम्ही दोघांनी मला खोटं  सांगितलंत... वाऽ! काय ड्रामा केलात माझ्याशी. मी तर तुमच्यावर विश्वास    ठेवला होता. खोटारडा, विश्वासघातकीऽ!

   (हे सगळं बोलणं चालू असताना पुरुष फेऱ्या मारत राहतो. मग थबकतो. गंभीर आवाजात बोलू लागतो. दरम्यान स्त्रीसुद्धा शांतपणे आत येऊन उभी राहते.)

  पुरुष   :      हो, मी खोटं बोललो तुमच्याशी. माझं नाव कृपाराम भारद्वाज नाही, करीम उल्ला आहे. म्हणजे कृपारामच नाही का? मी भोजपूरचा राहणाराही नाही, फरिदाबादचा  राहणारा आहे मी! माझ्या पत्नीचं नाव सावित्री नाही, साजदा आहे. म्हणजे  त्याचा अर्थ तोच नाही का?...ती   सावित्रीपेक्षा कमी नाही, पण आम्ही दोघांनी का खोटं सांगितलं असावं?

स्त्री    :      (पुढे येते. मंचावर मध्यभागी) तीन महिन्यांपूर्वी आम्ही कॅनडात होतो आणि हे कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च करीत होते. आम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांचं विधान वाचलं. त्यांनी म्हटलं होतं की, बाहेरच्या देशामधून काम करणारे आणि संशोधन करणारे जे हिंदुस्तानी सायंटिस्ट असतील, त्यांनी आपल्या देशात परत यावं- इथे योगदान द्यावं, इथे काम करावं... या देशाच्या प्रगतीच्या कामात हातभार लावावा. या अपिलाचा इतका परिणाम झाला आमच्यावर की, आम्ही इथं आहोत तुमच्यासमोर!  कॅनडात पगार खूप होता, इथे कमी आहे;  पण हो, आम्ही आमच्या देशात आहोत! कॅनडात हे ‘हेड ऑफ दी डिपार्टमेंट’ होते, इथे त्यांचा दर्जा कमीच आहे त्यामानाने. कॅनडात आमच्याकडे सहा खोल्यांचं घर होतं, इथे आम्ही हॉटेलात राहतो आहोत. पण तुम्हाला सांगते- मी समजावलं मनाला. म्हटलं की- हरकत नाही, जे  लोक आपल्या देशावर प्रेम करतात, ते पैसे आणि पोझिशनवर प्रेम करीत  नसतात...

  करीम उल्ला   :  पण मी हॉटेलात कायम राहू शकत नाही. मला घर पाहिजे. सुख आणि  समाधान पाहिजे. मला बायको आणि दोन मुलं आहेत. आम्हाला घर पाहिजे, म्हणून आम्ही घराच्या शोधात होतो. आणि या शहरात घरं शिल्लक नाहीत, असंही नाही. या तुमच्या कमल-कुंजमध्ये फ्लॅट रिकामा आहे. शेजारच्या इमारतीत रिकामा आहे. रस्त्याच्या पलीकडच्या बिल्डिंगमध्ये रिकामा आहे. आणि असंही नाही की, माझ्याकडे पैसे नाहीत. मी तीनशे रुपये भाडं देऊ शकतो. तीन महिन्यांचं डिपॉझिटही देऊ शकतो. चालू महिन्याचं भाडं पण देऊ शकतो आणि एक खिडकी, एक दरवाजा अन्‌ एका स्टूलसाठी चार हजार पण देऊ शकतो. (पुढे येऊन वेदनेने) पण तरीही, मला घर मिळत नाही! तीन महिन्यांपासून प्रयत्न करतो आहे, पण घर मिळत नाही. घरं रिकामी आहेत... जाहिराती प्रकाशित  होत आहेत; पण मी जेव्हा बिल्डिंगमध्ये जातो, चौकशी करतो, तेव्हाही घरं रिकामीच असतात. पैसे देण्याची चर्चा होते, तेव्हाही घरं रिकामीच असतात. ॲग्रीमेंट टाईप करताना नाव सांगावं लागतं, तेव्हा मात्र घरं रिकामी नसतात! ती अचानक नाहीशी होतात... खिडकी, दरवाजा आणि स्टूलसहित! (उपहासाने) आता ही घरं रिकामी नाहीत, उपलब्ध नाहीत. अहोऽ ती तर कालच दिली गेली नाऽ! भोजपूरच्या मामासाठी ठेवलाय फ्लॅट. मुलाच्या लग्नासाठी ठेवलाय फ्लॅट... अमुकसाठी-तमुकसाठी. हो,  कालपर्यंत रिकामा होता, आता नाही! माझं नाव कृपाराम नाही, करीम उल्ला आहे... माझ्या बायकोचं नाव सावित्री नाही, साज़दा आहे- म्हणून फ्लॅट रिकामा नसतो... इथेही मिळणार नाही.

  साज़दा :      चार हजार मैलांचा प्रवास करून आम्ही जेव्हा स्वत:च्या देशात आलो, तेव्हा आमच्या मनात नवे इरादे, नव्या इच्छा उमलल्या होत्या. नवी उमेद आणि नवे  अंकुर मनात निर्माण झाले होते. आम्ही नव्या उत्साहाने आलो होतो आपल्या देशात. (नवऱ्याकडे पाहून) यांनी  कॅन्सरवर इलाज शोधला, तर फक्त  मुसलमानांनाच फायदा होणार आहे का?   हिंदुस्थानाला जडलेला कर्करोग दूर होणार आहे... हिंदू, ख्रिश्चन, शीख  आणि पारशी... सर्वांचा रोग बरा होईल! ज्ञान  आणि विज्ञान हे जातपात, धर्म, वंश- सर्वांपलीकडे पाहत असतं. मानवतेच्या दृष्टीने उपयोग असतो या ज्ञानाचा. असं असेल तर ईश्वराने निर्माण केलेल्या या  पृथ्वीवर हा भेदभाव का?

  करीम :      पंडित रामदयाळ, किती शरमेची गोष्ट आहे ना ही? छत मिळविण्यासाठी  माणसाला नाव, धर्म, संस्कृती बदलावी लागते! त्याला मजबूर करण्यात येतं,   यापेक्षा भयानक गोष्ट कोणती? बघा, मी अखेर तुमचा भाऊच आहे ना? या अस्तित्वाने मला आणि तुम्हालाही बनवलंय ना? या देशात माझी मुळंआहेत, हा माझा देश आहे. मी इथे राहू इच्छितो. इथे राहून मला माझ्या देशाची सेवा करायचीय. पण मला घर मिळत नाही. मग मी जायचं तर कुठं जायचं? सांगाऽ

  पंडित :      (रागावून) मी काय सांगू? जाऽ कुठेही जा! उर्दू बाजारमध्ये जा, जामा  मशिदीच्या चौकात जा, खुदाबक्शच्या वस्तीत जा... पुष्कळ ठिकाणं आहेत   तुमच्यासाठी... इथेच माझ्या डोंबल्यावर  बसण्याची गरज आहे का? (धुसमुसत)    मेंदूचं पार खोबरं करून टाकलं. टाळकं उठवलं... जा, इथे फ्लॅट रिकामा नाही.

     (हाताने त्यांना जायची खूण करतो. टेबलाच्या खणातून तेलाची बाटली  काढतो. तेल हातावर ओतून डोक्याला मालिश करायला लागतो आणि डोळे     मिटून बसून राहतो. करीम उल्ला आणि साज़दा निराश होऊन हळूहळू निघून जातात. त्याच वेळेला पंडित दीनदयाळचा मुलगा कमलकांत आत येतो आणि     खुर्चीवर बसतो. हा तरुण, आधुनिक असा. याने करीम उल्लाचे बोलणे ऐकलंय.  करीम उल्ला निघून गेल्यानंतर हा आपल्या वडिलांशी बोलायला लागतो.)

  कमलकांत     :      बाबाऽ बाबाऽ!

  पंडित :      (डोळे उघडून) आलास? सिनेमा पाहिलास? त्याशिवाय काही काम सुचत   नाही का?

  कमलकांत     :      (हसून) ज्याच्या वडिलांकडे आठ इमारती असतील, त्याने काय काम   करायचं?

  पंडित :      यासाठी तुला विलायतेला पाठवलं होतं?

  कमलकांत     :      मी बॅरिस्टर कसा झालो, कुणास ठाऊक?   तिथंही मी काही काम करायचो      नाही... पण ते जाऊ द्या बाबा, माझे तुमच्याकडे जरा जरुरीचं काम आहे.

  पंडित :      सगळे शिल्लक फ्लॅट भाड्याने दिल्याशिवाय कोणतंही काम होणार नाही       दुसरं...

  कमलकांत     :      पण आत्ताच एक सभ्य गृहस्थ इथून गेले ना? त्यांना का दिला नाही फ्लॅट?

  पंडित :      म्हणजे काय? मी मुसलमानाला का बरं देईन फ्लॅट? (मिर्झा खोकतो. पंडित   चमकतो. थोडं वरमतो. गडबडीने-)  म्हणजे मला असं म्हणायचं आहे की, मी   काही मुसलमानांचा द्वेष करत नाही... माझे किती तरी मित्र मुसलमान आहेत.       आता मिर्झांचंच उदाहरण घ्या! दहा वर्षांपासून मुनीम आहेत इथं, माझ्याकडे.       तुम्हाला कधी त्रास झालाय माझ्याकडून?

  मिर्झा :      कधीच नाही.

  पंडित :      कधी आम्ही भांडलो तुमच्याशी?

  मिर्झा :      कधीच नाही.

  पंडित :      मी तर मुसलमानांचा मोठा हितचिंतक आहे. पण घराची गोष्ट वेगळी! ही हिंदूंची       वसाहत आहे. इथली गोष्टच निराळी. इथल्या लोकांचे स्वभाव, राहणीमान     वेगळं आहे. काळजी घ्यावी लागते. नाही तर मोठी गडबड होऊन जाते. तू अजून     बच्चा आहेस कमलकांत. तू समजू शकणार नाहीस या गोष्टी. या मिर्झांनाच    विचार ना... ते खुदाबक्ष मोहल्यात राहतात. विचार त्यांना- त्या मोहल्ल्यात       कोणी हिंदू राहतं का, विचार.

  मिर्झा :      (नकारार्थक मान हलवत) नाही! खुदाच्या मेहेरबानीने त्या वस्तीत अजून कोणी काफिर... अंऽ म्हणजे मला म्हणायचंय     कीऽऽ कोणी हिंदू राहत नाही तिथे! (गडबडीने पानाचा डबा उघडतो. पंडितला देतो.) घ्या... पान    घ्या!

   (त्याच वेळेस एक पेशावरी हिंदू पठाण आपल्या बायकोसह आणि ‘लच्छू’  नावाच्या दलालासह प्रवेश करतो. पठाणाचा पठाणी वेश, त्यावर कोट    घातलाय. टाय पण घातलाय. पेशावरी चप्पल. बोटांत अंगठ्या इत्यादी. श्रीमंती  दिसते आहे. बायको आणि पठाण आपापसात बोलत येतात. कोणाकडेही न   पाहता येऊन बसतात. एकमेकांसमोर खुर्च्यांवर बोलत राहतात.)

लाल

  आफताब राय   : (बायकोला) एक नक्की- फ्लॅट चांगला आहे, बालूऽ

  बायको :      कपडे धुवायला मोठी जागा नाही.

  राय    :      ते जाऊ दे- हॉल पाहिला? किती मोठा आहे! त्यात तर नाच-गाणी पण होतील.

  बायको :      नाच-गाणी? आधी घर तर घ्या!

  राय    :      ठीक आहे... अरे लच्छू, घराबद्दल जरा बोलणी सुरू कर. (पंडितकडे वळून)   अरे, जरा मालकाला बोलाव.

  लच्छू :      (घाबरून) अहो, हेच मालक आहेत. यांची आठ दुकानं आहेत.

     (पठाण जोरात हातमिळवणी करतो. पंडितला बाजूला घेऊन लच्छू म्हणतो-)

लच्छू :      सगळ्यात वरचा फ्लॅट पसंत आहे त्यांना. पठाण बारा हजार पागडीही देईल आणि      बाराशे रुपये भाडंसुद्धा. सात खोल्या आहेत ना, म्हणून! लवकर ॲग्रीमेंट करा    शेठजी... माझं पण दोन महिन्यांचं कमिशन राहिलंय.

  पंडित :      पण हे शेठ आहेत तरी कोण?

  लच्छू :      खूप मोठे शेठ आहेत. रेस्टॉरंट आहे आणि काय काय...

  पंडित :      हिंदू आहेत ना?

  लच्छू :      होऽ होऽ! हिंदू आहेत. मी कसा आणीन इतरांना तुमच्याकडे?

     (इकडे पठाण आणि बायको यांचं संभाषण सुरूच आहे.)

  पंडित :      महाशय, तुमचं नाव?

  राय    :      मला महाशय म्हणू नका. आमच्या     पेशावरला एक महाशय होता, पण तो पिशव्या विकायचा...

  पंडित :      (लच्छूला) नाव विचारलं तर इतका राग?

  लच्छू :      (पठाणाला) तुमचं नाव विचारतायत...

  राय    :      आमचं नाव आफताब राय आहे. ही माझी पत्नी. यांचं नाव इकबाल बाई असं       आहे. विचारा, अजून विचारा काय विचारायचं असेल ते.

  पंडित :      आफताब... इकबाल? हिंदू आहात ना?

  राय    :      हो, होऽ भाया! डोक्यापासून पायापर्यंत हिंदू आहोत आम्ही! आणि आत्ता नाही    काही... सात पिढ्यांपासून हिंदू आहोत.

  पंडित :      पण ड्रेस तर पठाणी आहे तुमचा?

  राय    :      मग, पठाण आहोत आम्ही. पेशावरला सगळेच हाच पोशाख वापरतात. हिंदू     असो, नाही तर मुसलमान. पण आम्ही हिंदू आहोत. तुमचा फ्लॅट घेतल्यानंतर       त्यात एका खोलीत देवघर असेल.

  पंडित :      (आनंदाने) खरंच? वाऽ वाऽऽ! मिर्झाजी, आजकाल असे धार्मिक भाडेकरू कुठे     मिळणार? लगेच त्यांचं ॲग्रीमेंट टाईप करा.

  मिर्झा :      जी हुजूर.

  राय    :      कितीचा चेक लिहू?

  पंडित :      कोणता फ्लॅट घ्यायचाय?

  राय    :      सात खोल्यांचा, वरच्या मजल्यावरचा.

  पंडित :      पण तुम्ही तर मियाॅं-बिबीच आहात ना? मग सात खोल्या कशाला?

  राय    :      शाब्बास! तुम्हाला कोणी सांगितलं? खरं तर मला तीन बायका आहेत आणि सात      मुलं आहेत.

  पंडित :      (घाबरून) तीन बायका? हे राऽम!

  लच्छू :      (घाईघाईने) तीन बायका त्यांच्या आहेत. ते सांभाळतील ना, तुम्ही का घाबरताय?

  पंडित :      बरं... तर ठीक आहे. (पठाणाकडे वळून) बरं, तुम्ही मांस-मच्छी तर खात नाही      ना?

  राय    :      कोण म्हणतं नाही खात म्हणून? मांस, मच्छी, मुर्गी- सगळं खातो आम्ही. आम्ही तुमच्यासारखं नरक भोगायला या जगात आलेलो नाही! रात्री तंदुरी मुर्ग    संपवत नाही, तोपर्यंत झोपसुद्धा येत नाही आणि सोबत व्हिस्की पाहिजेच...

  पंडित :      म्हणजे दारू पण पिताऽऽ?

  राय    :      होऽऽ! कव्वाली किंवा बाईच्या नाचाचे कार्यक्रम पण करतो घरी...

  पंडित :      हे राऽम! मी हे काय ऐकतोय? लच्छूऽऽ यांना इथून बिल्डिंगच्या बाहेर घेऊन जा,   नसता हार्टफेल होईल माझा. अरे देवाऽ, डोकं गरगरायला लागलं.

     (लच्छू पठाणाच्या कानात काही सांगतो.)

  लच्छू :      चला शेठजी... घर तर आधीच गेलं आहे. दुसऱ्याला दिलं आहे.

  राय    :      आत्ता दिलं? आम्ही तर हेच घर घेणार.

  इकबाल       :      चला होऽ! कपडे धुवायला जागा नव्हती, नाही तरी.

  राय    :      चलाऽ जाऊ या... पण घर चांगलं होतं. (लच्छूसह दोघेही जातात.)

  कमलकांत     :      तुम्ही पण कमाल करता बाबा... असे गिऱ्हाईक दररोज येतात का? बारा हजार पागडी आणि बाराशे रुपये भाडं... असे शेठजी रोज-रोज मिळणार नाहीत.

  पंडित :      पण तू ऐकलंस ना? तो मांस-मच्छी सगळं खातो.

  कमलकांत     :      परदेशात सगळे खातात.

  पंडित :      मग मी परदेशी माणसाला ठेवणार नाही.

  कमलकांत     :      सगळे काश्मिरी खातात.

  पंडित :      मग मी काश्मिरीला माझ्या बिल्डिंगमध्ये  ठेवणार नाही.

  कमलकांत     :      बंगाली लोक रोज मच्छी खातात.

  पंडित :      मग मी बंगाल्याला पण इथे घुसू देणार नाही.

  कमलकांत     :      मासळी तर मद्रासी पण खातात, मल्याळी       खातात.

  पंडित :      तर मग मी मद्रासी आणि मल्याळी यांना पण घर देणार नाही.

  कमलकांत     :      आणि पंजाबी लोकसुद्धा मटण खातात.

  पंडित :      मग मी पंजाब्यांना पण घर देणार नाही. (तेवढ्यात पगडी घातलेला सरदारजी येतो. हा सुतार आहे. हातात हत्यारं)        काय झालं सरदारजी?

  सरदार :      अकरा आणि बारा नंबरच्या फ्लॅटचे दरवाजे व खिडक्या तयार झाल्यात.

  मिर्झा :      एक दिवस आधीच काम पूर्ण केलंत तुम्ही. वाऽ!

  सरदार :      काम करायचं असेल तर एक दिवस आधी काय आणि नंतर काय! पण ते  जाऊ दे... लाकूड संपलंय. अलमारी आणि वॉर्डरोबसाठीसुद्धा लकडी लागेल    आताऽ

  पंडित :      आता सरदार गुरुदयालसिंगला फोन लावतो.

  सरदार :      लवकर मागवा लाकूड. मी बसलोय नुसता.

     (सरदार सुतार निघून जातो आणि मागोमाग दोन मल्याळी मजूर येतात. काही न बोलता कोपऱ्यातले रंगांचे डबे घेऊन निघून जातात. पंडित आणि मिर्झा      पान खातात.)

  मिर्झा :      हा सरदारजी किती कामसू आणि हुशार सुतार आहे, नाही?

  पंडित :      अगदी एक नंबरी! अच्छा आणि सच्चा! लाकडाचा तुकडा पण इकडचा तिकडे   होत नाही. अगदी प्रामाणिक...

  मिर्झा :      हे मल्याळी मजूऽर...

  पंडित :      ते पण चांगले मिळालेत आपल्याला. दिवस-रात्र कामात गुंग असतात!

  मिर्झा :      हेही मेहनती असतात. (दोघं पान खातात.)

  पंडित :      विजेचं काय? बिजली येणार की नाही? बिल्डिंगमध्ये अजून वीज आली नाहीये-  तो इन्स्पेक्टर तुमचा मित्र आहे.

  मिर्झा :      कोण? गुप्ता?

  पंडित :      नाही... तो पोरगेलासा जवान. काय नाव त्याचं?

  मिर्झा :      अंऽऽ डिसुझा?

  पंडित :      हां... तोच. डिसुझा. त्याच्याकडे फाईल घेऊन जा तुम्ही.

  मिर्झा :      (बाहेर पाहत) ऊन खूप आहे म्हणा...

  पंडित :      जवळ तर आहे. पायी जाल तर दहा    मिनिटांत पोहोचाल. जा ऽ तर मग...

     (मिर्झा उठू लाग तो, तेवढ्यात सिल्कचा पायजमा-कुर्ता घातलेला माणूस येतो.    मिर्झाला पाहून ओळखतो. उत्साहाने-)

  माणूस :      अच्छन मियाँ! (हात मिळवतो.)

  मिर्झा :      अरेऽ मुन्नू मियाँ... तुम्ही इथे कसे? तुम्ही तर लखनौला होता ना?

  माणूस (मुन्नू) :      लखनौत होतो, पण आता दिल्लीला आलो        आहे.

  मिर्झा :      इथे?

  मुन्नू   :      आपल्या धंद्याची ब्रँच काढायचीय चांदणी चौकात. चाळीस हजार पागडी देऊन एक दुकान मिळवलंय.

  मिर्झा :      म्हणजे आता दिल्लीत राहणार?

  मुन्नू   :      इन्शा अल्ला!

  मिर्झा :      घरी सगळं ठीक? मिसेस आणि मुलगा?

  मुन्नू   :      तो आता दहा वर्षांचा झालाय. देवाची कृपा! काही वर्षांत दुकानावर पण बसेल.

  मिर्झा :      मी ऐकलं होतं की, तुम्ही मुंबईला जाणार होतात. फिल्म कंपनी उघडण्याचा पण विचार होता म्हणे!

  मुन्नू   :      असा काही विचार नाही. सात पिढ्या झाल्या, चौकात आम्ही तंबाखू विकतो...       तेच करणार आहोत.

  मिर्झा :      मग?

  मुन्नू   :      राहण्यासाठी घर नको? फ्लॅट पाहिजे. इथे रिकामा आहे म्हणे. मिळवून द्या.

  मिर्झा :      हे आमचे मालक. कमलकुंज बिल्डिंगचे मालक. मालक, हे आमचे बालमित्र...      मनसुख नाव आहे यांचं. यांना एक फ्लॅट जरूर द्यावा.

  पंडित :      पण... पण हे तर उर्दू बोलतायत.

  मिर्झा :      (भोळेपणाने) मग काय झालं? उर्दू तर मीही बोलतो!

  पंडित :      तुम्ही बोलता... हेही बोलतात, म्हणून तऽर...

  मिर्झा :      म्हणून तर काय?

  पंडित :      आता तुम्हाला तर सगळं माहीत आहे. आपण इथे कोणाला फ्लॅट देत असतो, हे   सांगायला का पाहिजे? हे तर... हे तर मुन्नू मियाँ आहेत.

     (मियाँ शब्दावर जोर देतात)

  मिर्झा :      समजलं. पण शेटजी, यांचं खरं नाव महेश आहे. आम्ही त्यांना बालपणापासून मुन्नू म्हणतो! माथूर यांचं आडनाव. हे हिंदू आहेत.. हिंदूऽऽ

  पंडित :      (संशयाने) पण बोलतात उर्दू?

  कमलकांत     :      मग काय झालं? उर्दू बोलणं हिंदूंसाठी गुन्हा आहे का? बाबाऽ अहो, लाखो हिंदू या देशात उर्दू बोलतात, लिहितात... हीच त्यांची संस्कृती! उर्दू शायरीवर लाखो लोक बेहद्द खूश असतात.

  मुन्नू   :      काय करणार साहेब? आमच्या लखनौची संस्कृतीच अशी! आठशे वर्षांतच त्यांचे   शब्द आमच्या जिभेवर आले. सहवासाचा परिणाम. आणि आमचेही शब्द त्यांच्या जिभेवर चढले, हाही परिणाम. मेल-जोल    म्हणतात ना त्याला... यात वाईट काय?

  पंडित :      पण हे खुदाचं नाव घेतात... मी ऐकलंय ना! ते इन्शाल्ला म्हणाले मघाऽ! मला     फसवू नका तुम्ही... सकाळी तो अनुभव आला अन्‌ आता...

  मुन्नू   :      जरूर ऐकलं असेल. मी खुदाची शपथ घेतो...  आणि देवाची... म्हणजे हिंदू     देवाची पण घेतो. दोन्ही मला  प्रिय आहेत. पण मी शपथेवर सांगतो की, मी   हिंदूच आहे. खुदा की कसम...

     (पंडित आश्चर्याने आणि शंकेने पाहताहेत)

  मिर्झा :      माझ्यावर विश्वास ठेवा, मी याच्या खानदानाला ओळखतो.

  मुन्नू   :      चीफ कमिशनरचं पत्र आणू का, माझ्या फोटोसहित? म्हणजे ओळखपत्र?

  पंडित :      नाही, त्याची गरज नाही. तुम्ही म्हणताय आणि मिर्झा सांगतायत म्हणून मी      विश्वास ठेवतो आणि तुम्हाला फ्लॅट देण्याचा निर्णय घेतो. पण...

     (इकडे दोघांचं आनंदाने हात मिळवणं वगैरे सुरू आहे. ते एकदम थबकतात.)

  मुन्नू   :      पण?

  पंडित :      माझ्या काही अटी आहेत.

  मुन्नू   :      जाहिरातीत त्या दिल्याच आहेत. दरवाजा... खिडकी... स्टूल... आणखी कोणत्या?

  पंडित :      मटण घरात येणार नाही.

  मुन्नू   :      मी स्वत: रक्तमांसाचा पिंड आहे. मीच घरात यायचं नाही का?

  पंडित :      तसं नाही, आहाराचं म्हणतो आहे मी! मटण आणायचं नाही... पकवायचं नाही.

  मुन्नू   :      ठीक आहे. नाही पकवणार... बाहेरून मागवू?

  पंडित :      बाहेरून पण आणता येणार नाही.

     (मुन्नू मिर्झाच्या हातातून हात सोडवू पाहतो, पण मिर्झा त्याला थांबवतो. खूण   करतो.)

  पंडित :      ठीक... ठीक! बाहेरून पण नाही आणणार.

  पंडित :      आणि मच्छी पण नाही.

     (मिर्झा खूण करतो.)

  मुन्नू   :      ठीक. मच्छी पण पकणार नाही. ठीक?

  पंडित :      अंडी पण नाही.

  मुन्नू   :      ठीक.

  पंडित :      लसूण आणि कांदा पण चालणार नाही.

  मुन्नू   :      अहो, गोळी मारा त्यांना! आम्ही नाही खाणार.

  पंडित :      घरात कव्वाली होणार नाही.

  मुन्नू   :      कव्वाली? नाही... नाही... होणार नाही.

  पंडित :      मुजरा.

  मुन्नू   :      नाही होणार!

  पंडित :      व्यभिचार होणार नाही. वाईट... दुराचार पण नाही.

  मुन्नू   :      मी आचार पण खायचं नाही?

  पंडित :      तसं नाही... तसं नाही. वाईट काम होणार नाही.

  मुन्नू   :      मग तुम्हाला पण माझ्याकडून चार हजार पागडी घेता येणार नाही... तीन महिन्यांचं डिपॉझिट पण घेता येणार नाही... तीनशे रुपये भाडं पण तुम्हाला घेता येणार नाही.    दोन महिन्यांची दलाली पण देता येणार नाही. हे सगळे लुटण्याचे धंदे आहेत.

  पंडित :      (रागाने) मी लुटण्याचे धंदे करतो?

  मुन्नू   :      होऽ आणि ब्लॅकमार्केटिंग पण... वाईट   काम होणार नाही म्हणालात, मग हे   चांगले काम आहे का?

  पंडित :      ब्लॅक? उफ्‌...

  मुन्नू   :      तुम्ही स्वत: दुराचारी आहात. जर मुजरा आणि कव्वाली ऐकणं, लसूण आणि   कांदा खाणं, मांस खाणं हे दुराचाराचं लक्षण आहे; तर चार हजार पागडी,  दोनशे रुपये महिना भाडं- हे काय? प्रत्यक्षात ते साठ रुपयांवर असू नये नियमाप्रमाणे... झालंच तर दोन      महिन्यांची दलाली तुमच्या लच्छूला का    द्यायची? झालंच तर ॲडव्हान्स पण द्यायचा? हे सगळं दुराचाराचं लक्षण नाही?

  पंडित :      उफ्‌... उफ्‌... माझं औषध... माझ्या हृदयविकाराचं औषध...

     (अस्वस्थ. कमलकांत चटकन उठून ड्रॉवर शोधतो. गोळ्यांची बाटली काढतो. गोळी देतो. पाणी देतो. पंडित बसकण मारून खुर्चीवर बसतात. गोळी घेतात.   सगळे त्यांच्याकडे पाहताहेत, भोवती गोळा होतात. पंडितना बरं वाटतं आहे. ते   मानेने आणि हाताच्या इशाऱ्याने सांगतात.)

  कमलकांत     :      बरंय आता?

  पंडित :      हंऽऽ!

  कमलकांत     :      स्वस्थ बसा जरा... बोलू नकाऽ

  मिर्झा :      बिचारे! ब्लडप्रेशरचा आजार आहे यांना. तुम्ही आता काही बोलू नका. मीच वेळ-      प्रसंग पाहून, मूड पाहून त्यांच्याशी बोलेन.

  मुन्नू   :      नाही... मिर्झाजी, तुम्ही त्रास घेऊ नका माझ्यासाठी. मलाच इथे घर घ्यायचं नाही... मलाच इथे राहायचं नाही... हे करू नका, ते करू नका, हे खाऊ नका...   यांच्या ढोंगबाजीबद्दल... हिप्पोक्रसीबद्दल बोललंच पाहिजे. आणि आम्हाला असं सांगणारे हे असतात तरी कोण?

  मिर्झा :      जरा शांत...

  मुन्नू   :      (हात मिळवतो) मी जातो. पुन्हा भेटू. (बाहेर निघून जातो.)

  पंडित :      आज काही चांगला दिवस दिसत नाही. कोणी योग्य गिऱ्हाईक येतच नाही    वाटतंऽऽ

     (कपाळाला हात लावून बसतो. थोडा वेळ शांतता.)

  कमलकांत     :      (हळू आवाजात) बाबाऽ, तुम्ही पण कमाल करता! या बिल्डिंगमध्ये अखेर तुम्हाला ठेवायचंय तरी कोणाला? लसूण     आणि कांदा नको, मांस-मच्छी नको. कव्वाली ऐकणारा तुम्हाला पसंत नाही, उर्दू बोलणारा तुम्हाला पसंत नाही! पंजाबी, बंगाली तुम्हाला नको, मल्याळी नको... मग या घरात राहणार कोण? अर्धा हिंदुस्तान तर बहिष्कृत केलाय तुम्ही...

  पंडित :      कमलकुंज बिल्डिंगमध्ये फक्त मर्यादावादीच राहतील. ज्यांना आपल्या प्राचीन संस्कृतीचा आणि संस्कारांचा अभिमान आहे, तेच राहतील!

  कमलकांत     :      अभिमान तर मलाही आहे.. आणि या देशात राहणाऱ्या सगळ्यांनाच आहे. पण हा काळ विक्रमादित्य आणि सम्राट हर्षचा आहे का? आता आधुनिक युग सुरू झालं आहे. काळानुसार सभ्यता आणि संस्कृती दोन्ही बदलत असतात. या देशात निग्रोही आले, द्रविडही आले, आर्यही आले. मग मंगोल आले, मग मुसलमान आले... इंग्रज आले. आता ॲटमबॉम्ब यायचाय! इतकी संमिश्रता असताना, एक धर्म सर्वांसाठी लागू करता येणार नाही तुम्हाला!

  पंडित :      पण इथे, या बिल्डिंगमध्ये जे मी ठरवेन,  तेच चालेल. जसं आजपर्यंत जुन्या   बिल्डिंगमध्ये होत आलं, तसं.

  कमलकांत     :      पण ही नवी इमारत आहे... नव्यानं    बनली आहे. (याच वेळेस दोन मद्रासी येतात. एकाचं नाव बिल्लू आहे, तर दुसऱ्याचं नाव         रंगाचारी)

  बिल्लू :      अवाऽई यों यों! अंदा बिल्डिंग नरम बम नालाता ने! (ही बिल्डिंग खूप चांगली आहे.)

  पंडित :      (रंगाचारीला) हे काय बोलताहेत?

  रंगाचारी       :      अमाऽ राऽ शेठ बोलता है कि... तुमची बिल्डिंग खूप चांगली आहे.

  बिल्लू :      ये हिंदू होता?

  रंगाचारी       :      हां ऽ हां ऽ!

  बिल्लू :      अंगल मोटा चाबडा?

  पंडित :      ये मोटा अंगल... काय बोलतात हे?

  रंगाचारी       :      आमचे शेठ विचारतायत की, तुम्ही अंडी तर खात नाहीत ना?

  पंडित :      राऽम रा ऽ म!

  रंगाचारी       :      नाही खात.

  बिल्लू :      आगे पूछोऽ

  रंगाचारी       :      मांस-मच्छी?

  पंडित :      छे... छे... नाही, कधीच नाही.

  रंगाचारी       :      लसूण-कांदा?

  पंडित :      नाही हो, कधीच नाही. (रागाने) पण हे विचारणारे तुम्ही कोण? (कमलकांत इथे  सूचक हसतो. रंगाचारी बिल्लूला ‘इल्ले इल्ले’ असं म्हणतो.)

  पंडित :      तुम्ही मला इल्ले-इल्ले म्हणता? भाडेकरू आहात तुम्ही! मी या बिल्डिंगचा मालक       आहे... प्रोप्रायटर! समजलं?

  रंगाचारी       :      मला माहीत आहे! आमच्या शेठची खात्री करायची आहे ना- त्यांना हिंदू बिल्डिंगवालाच पाहिजे! पंडित मान हलवतो) ...हे धर्म-कर्मवाले शेठजी आहेत. तिकडे त्यांच्या गावात त्यांनी तीन लाख खर्च करून मंदिर बनवलं आहे.

  पंडित :      (नमस्कार करून) जय रामजी कीऽऽ!

  बिल्लू :      (हात जोडून ) नमस्कारम्‌!

  पंडित :      तुम्ही काय करता?

  रंगाचारी       :      म्हणजे? तुम्ही आमच्या शेठला  ओळखलं नाही? त्यांचं कलकत्त्याला मद्रासी हॉटेल आहे. नागपूरला मद्रासी  हॉटेल आहे... लखनौला मद्रासी हॉटेल आहे. पटणा आणि दिल्लीतसुद्धा हॉटेलं आहेत.

  मिर्झा :      आणि मद्रासमध्ये पण मद्रासी हॉटेल आहे का?

  रंगाचारी       :      काय? मद्रासमध्ये मद्रासी हॉटेलची गरजच काय? मद्रासबाहेर आमची पंधरा   हॉटेल्स आहेत.

  पंडित :      (आनंदाने) जय रामजी की!

  बिल्लू :      नमस्कारम्‌!

  पंडित :      कोणता फ्लॅट पाहिजे तुम्हाला?

  बिल्लू :      अमकोऽ सब फ्लॅट मंगता है...

  पंडित :      आँ?

  रंगाचारी       :      म्हणजे शिल्लक असलेले सगळे.

  पंडित :      सगळे शिल्लक फ्लॅट तुम्हाला पाहिजेत?

  रंगाचारी       : शेठ खूश आहेत. ते तुमचे सगळे फ्लॅट घेतील स्वत:साठी... त्यांच्या       भावासाठी... मॅनेजरसाठी... असिस्टंट मॅनेजरसाठी...

  पंडित :      आणि पागडी... भाडं... डिपॉझिट?

  रंगाचारी       :      देणार! सगळं काही देणार, अटींप्रमाणे- अगदी फर्निचरच्या अटींसहित! मी सांगून   ठेवलंय ना, शेठना.

  पंडित :      मिर्झाजी, ऐकलंत? ऐकलंस का कमलकांत? तुला गंमत वाटते, विनोद वाटतो; नाही का? बघा आताऽऽ तो वर बसलेला सगळं ऐकत असतो. धर्म- कर्मवाल्यांची व्यवस्थाही करत असतो. बघा आताऽऽ! नऊच्या नऊ फ्लॅट गेले!! (आनंदाने) भाडेकरू मिळावा तर असाऽ धर्म-कर्माचा पक्का! सदाचारी... शुद्ध, सात्त्विक भोजन करणारा!

  रंगाचारी       :      आणि बालब्रह्मचारीसुद्धा आहेत.

  पंडित :      ऐकलंत मिर्झाजी, नाही तर तुम्ही!

     (कमलकांत इथे जरा गडबडतो. पण मग स्वत:ला सावरतो. म्हणतो-)

  कमलकांत     :      वाऽ वाऽ! किराया वसूल करायचाय की योग्यांचा मठ उभा करायचाय?

  पंडित :      चूप! बसाऽ... बसाऽ... तुमच्यासाठी काय मागवू? सोडा- लेमन?

  बिल्लू :      नाही... नाही. नको.

  पंडित :      चहा?

  बिल्लू :      नाही. माझा उपवास असतो.

  पंडित :      अरे, मी तर विसरलोच होतो. आज नागपंचमीचं व्रत आहे. पाहिलंत मिर्झाजी, कमलकांत? पंधरा हॉटेलचा मालक- आजसुद्धा नागपंचमीचं व्रत ठेवतो. वाऽ! बघाऽ असा असतो खरा हिंदुस्थानी! ही आहे आमच्या देशाची संस्कृती... हे संस्कार! हा आमचा आदर्श... जय रामजी कीऽऽ

  बिल्लू :      नमस्कारम्‌!

  (रंगाचे डबे ठेवायला आलेल्या एका मद्रासी मजुराकडे बिल्लूचं लक्ष जातं आणि    तो त्याला ओळखतो. आनंदानं ओरडतोच...) अरेऽ अरेऽ मानकुट्टी- तू इथे? मानकुट्टी

  मजूर   :      अय्योऽ! बिल्लू?

     (दोघं एकमेकांना भेटतात)

  बिल्लू :      तू इथे कसा?

  मानकुट्टी     :      आठ वर्षं इथे दिल्लीत आहे. बिल्डिंगला रंगरंगोटीचं काम करतो. पण तू इथे कसा?

  बिल्लू :      म्हणजे काय? माझं... आपलं मद्रास हॉटेल नाही का दिल्लीत?

  मानकुट्टी     :      मला कळलं होतं, तू खूप मोठा झालास म्हणून... अय्यो, किती वर्षांनी भेटतोय आपण, नाही?

  बिल्लू :      खूप वर्षांनी.

  पंडित :      (पुढे सरसावून) मारकुट्टी, तू यांना ओळखतोस?

     (त्यांनी बिल्लूच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला आहे.)

  मानकुट्टी     :      (अभिमानाने) म्हणजे काय- ओळखत नाही का? ओळखतोच! याचं नाव बिल्लू.      माझ्या गावचा मुलगा. माझ्या गावाच्या चांभाराचा मुलगा! गाव सोडून बाहेर पडला आणि त्याने किती प्रगती केली... किती मोठा आणि श्रीमंत झालाय! बिल्लूला कोण ओळखत नाही? हा पण माझ्यासारखाच चांभाराचा मुलगा आहे.

  पंडित :      (खांद्यावरचा हात झटकून) बिल्लू...चांभाराचा मुलगा?

  रंगाचारी       :      (त्वरित पुढे येऊन) होऽ हो! हरिजन... हरिजन.

  पंडित :      (दूर होऊन) हरिजन...

  बिल्लू :      होऽ आम्ही हरिजन आहोत. मग काय झालं? आमच्या हॉटेलचे मॅनेजर ब्राह्मण        आहेत.

  पंडित :      मॅनेजर ब्राह्मण असले म्हणून काय झालं, तुम्ही स्वत: तर हरिजन आहात?

  बिल्लू :      माझ्या हॉटेलचे आचारी सगळे ब्राह्मण आहेत.

  पंडित :      कुक ब्राह्मण असले म्हणून काय झालं,   तुम्ही स्वत: हरिजन आहात नाऽऽ?

  कमलकांत     :      बाबाऽ हे हिंदू आहेत. मांस-मच्छी खात नाहीत. धर्म-कर्म करणारे बालब्रह्मचारी आहेत.

  पंडित :      पण हरिजन आहेत ना! आणि मी त्यांना स्पर्श करून चुकलो आहे. आता मी   अपवित्र झालोय... आता मला स्नान करायला जावं लागेल.

  कमलकांत     :      ही कोणती मनोवृत्ती? माणसाने माणसाला स्पर्श करण्यामुळे माणूस अपवित्र होतो?  ही मनोवृत्तीच गंगेत बुडवून टाकली पाहिजे... अगदी कायमची!

  पंडित :      बेटा, समजून घे जरा. हा माणूस हरिजन आहे. म्हणजे अस्पृश्य आहे... नीऽच!

  बिल्लू :      (उदास, गंभीरपणे) म्हणजे मी नीच! होऽ होऽ... मी हरिजन! म्हणजे मी झाडू तुमच्या घरातला? रस्त्यावरचा दगड? बाजारातला कुली? रेल्वेचं चाक पण...        कारखान्यातला हात पण... शेतातला नांगरसुद्धा... माझ्यावाचून तुम्ही एक दिवससुद्धा जिवंत राहू शकत नाही... मग तुम्ही माझा तिरस्कार का करता... नफरत    का करता?

  पंडित :      कारण पाच हजार वर्षांपासून आम्ही तुम्हाला भरडतो आहोत. तुम्हाला खातो  आहोत. आम्ही तुमच्या उपकारांचं ऋण मान्य करायचं ठरवलं, तर तुमचं शोषण        कसं करता येईल?

  बिल्लू :      या घरात माणसंच राहतात ना? का माणसं खाणारे मगरमच्छ?

  कमलकांत     : ओह्‌! इट इज ऑफुल बहुधा मला वेड लागणार, हे सगळं ऐकून.

  पंडित :      तुझी फिलॉसॉफी तू स्वत:जवळ ठेव, समजलं? इथे चर्चा वगैरे व्यर्थ आहे. या  बिल्डिंगमध्ये कोणी हरिजन राहू शकत नाहीत. इथे मी जे सांगतो, तेच होईल...

  रंगाचारी       :      म्हणजे तुम्ही आमच्या शेठजींना फ्लॅट देणार नाहीत तर?

  पंडित :      (रागाने) फ्लॅट? जर पुन्हा एखाद्या हरिजनाला इथे घेऊन आलास, तर मारून-मारून तुला ‘फ्लॅट’ करून टाकीन...

  रंगाचारी       :      मोठा आलाय मारणारा! आमच्या शेठजींकडे तुमच्यापेक्षा जास्त पैसा आहे.

  बिल्लू :      आणि तुम्ही मला तुमच्या बिल्डिंगमध्ये जागा देत नसाल, तर मग मी वेगळी बिल्डिंग बांधेन! तुमच्यापेक्षा जास्त उच.जास्त मोठी बिल्डिंग! जास्त चांगली... तिथे मी तुम्हाला घुसू देणार नाही...  

   (पंडित एका हाताने नाक दाबून ठेवतो, जणू दुर्गंध येतो आहे. दुसऱ्या हाताने  जाण्याचा इशारा करतो.)

  पंडित :      जाऽ जाऽ इथून.

  बिल्लू :      चल रंगाचारी.

  रंगाचारी       : चला शेठ!

  पंडित :      जय रामजी कीऽ

  बिल्लू :      नमस्कारम्‌!

     (दोघं जातात. पंडित पान खातो)

  पंडित :      खस कम्‌ जहान पाक... (इडा-पीडा टळो.) 

  मिर्झा :      अरे, तुम्ही तर एकदम फारसी बोलायला लागलात!

  पंडित :      संगतीचा दोष- दुसरं काय!

     (इकडे कमलकांत आपला राग लपवण्यासाठी तोंडासमोर मासिक धरतो.   त्याच्याकडे पाहून) मी जरा प्लंबिंगचं काम पाहून येतो. मुखर्जींनी फ्लोरिंगचं  काम पण सुरू केलं आहे, त्यांचा निरोप आला होता. तर मी वर जाऊन बघतो. जर कोणी गिऱ्हाईक आलंच, तर    सांभाळून घेऽ!

  कमलकांत     :      काळजी करू नका. मी आहे इथे. मी आहेच!

     (पंडित जातो. पाठोपाठ एक सुंदर मुलगी आत येते. नटलेली, आधुनिक, मोहक  हसणारी. तिचं हसणं पाहून कमलकांत गडबडतो. उठून उभा राहतो.)

  मुलगी :      (हसत पुढे येते) डॅडी आलेत का?

  कमलकांत     :      डॅडी? तुमचे?

  मुलगी :      अर्थात, माझे! तू माझ्या डॅडीला ओळखलं नाहीस का? तू त्यांना भेटला नाहीस?

  कमलकांत     :      (हसत) तुला पाहिल्यानंतर तुझ्या डॅडींना  भेटण्याचं कारणच नाही. दुर्दैवाने माझी न्‌ त्यांची भेट झाली नाही अजून.

  मुलगी :      इट इज व्हेरी सरप्राइजिंग! त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की, ते मला इथे भेटतील. कमलकुंजमध्ये... हे कमलकुंजच आहे ना?

  कमलकांत     :      होऽ तेच आहे.

  मुलगी :      ही जाहिरात तुमचीच?

  कमलकांत     :      हो.

  मुलगी :      आम्हाला एक फ्लॅट पाहिजे. माझे वडील डॉक्टर आहेत. आम्ही कलकत्त्याहून आलो आहोत.

  कमलकांत     :      (विरघळून, हसून) कलकत्ता सुंदर शहर   आहे.

  मुलगी :      पण गर्दी खूप झालीय हो तिथे... नॉइझी आहे अगदी!

  कमलकांत     :      नॉइझी... अगदी बरोबर...

  मुलगी :      तुम्ही गेला होतात कलकत्त्याला?

  कमलकांत     :      (जरा ओशाळून) गेलो तर नव्हतो, पण मित्र सांगतात ना...

  मुलगी :      माझ्या डॅडींना की नाहीऽ गोंधळ-गडबड अजिबात पसंत नाही. त्यांना शांतता  आवडते.

  कमलकांत     :      (हसून) मला पण पसंत नाही.

  मुलगी :      पण मला पसंत आहे. मला ते जिवंतपणाचं प्रतीक वाटतंऽ

  कमलकांत     :      (चापलुसी करत) अगदी बरोबर! जिवंतपणा... चहल-पहल, रौनक! कुणाला पसंत नसणार जिवंतपणा, नाही?

  मुलगी :      (घड्याळ पाहत) अजून आले नाहीत डॅडी.

  कमलकांत     :      येतील... येतील.

  मुलगी :      मला म्हणाले की, ते एका पेशंटला पाहून इकडेच येणार आहेत. पण बिल्डिंगमध्ये  फ्लॅट रिकामा आहे ना? नाही तर मी उगाचच टाइम वेस्ट करणार नाही.

  कमलकांत     :      नऊ-नऊ फ्लॅट रिकामे आहेत.

  मुलगी :      तुम्ही जोक करताय?

  मिर्झा :      नाही... नाही. खरंच!

  मुलगी :      त्यापैकी मला एक फ्लॅट मिळेल का?

  मिर्झा :      का नाही? नक्की मिळेल.

  मुलगी :      (मिर्झाशी हात मिळवते.) थॅंक्यू... थॅंक्यू. (ते पाहून कमलकांत बेचैन होतो. त्याला   जरा असूया वाटते.) थॅंक्यू. दोन दिवसांपासून आम्ही बाप-बेटी घराच्या        शोधात आहोत. पण अखेर इथे मिळाला फ्लॅट! (मिर्झाला उद्देशून) मला तर असं   वाटतंय की, मी तुमचं चुंबन घ्यावं...

  मिर्झा :      आँ? काय?

  मुलगी :      चुंबन... किस्‌! तुमचं नाव काय?

  मिर्झा :      (ऐटीत) तसं तर माझं नाव मिर्झा इर्शाद हसीन चंगैझी इल्तीहनस अली लखनवी   आहे. पण तुम्ही मला फक्त ‘अच्छन’  म्हटलं तरी चालेल...

  मुलगी :      अच्छन! किती गोऽड, नाहीऽ... आणि तुम्ही कोण आहात इथे? (कमलकांतला    विचारते.)

  कमलकांत     :      मी या बिल्डिंगच्या मालकाचा मुलगा आहे.

  मुलगी :      हाऊ स्वीऽट! हाऊ नाईस... नाव?

  कमलकांत     :      कमलकांत.

  मुलगी :      मला एक फ्लॅट पाहिजेच आहे. द्याल ना!

  कमलकांत     :      कोणताही एक पसंत कराऽ, नऊ रिकामे आहेत.

  मुलगी :      ते तर मी नंतरही करू शकते. आधी मी माझं सामान हॉटेलमधून मागवून घेते.

  कमलकांत     :      पण...

  मुलगी :      म्हणजे, मला डॅडींना सरप्राईज करायचंय ना...

  कमलकांत     :      ओके.

  मुलगी :      थॅंक्यू. (त्वरेने फोन करते) गिव्ह मी रूम नंबर 250. हॅलो, कोण अंकल  रामभरोसेऽ? माझं सामान घेऊन या ना इथे, कमलकुंजला... तुम्हाला माहीतच        आहे कमलकुंज. जवळच आहे. लवकर   या हं!

     (रिसिव्हर ठेवते आणि सुटकेचा नि:श्वास टाकते.)

  कमलकांत     :      चलाऽ फ्लॅट दाखवतो तुम्हाला. बघा, पसंत करा.

  मिर्झा :      (चापलुसी करत) तुम्ही कशाला त्रास घेता? मी आहे ना, मी दाखवतो.

  कमलकांत     :      मला वाटतं, तुम्ही डिसुझांना भेटून या. वीज आलेली नाही अजून.

  मिर्झा :      (हसत) आणि लाकूड अजून आलं नाही. संपलंय! तुम्ही सरदार गुरुदयालसिंगच्या दुकानी जाऊन आलात, तर बरं होईल. दरवाजे बनायचे आहेत अजून!

  कमलकांत     :      बाबा सांगून गेलेत, वीज आली नाही. बिजली-घर जाऊन याऽ! चला, मी  दाखवतो फ्लॅट.

     (दोघे जातात. मिर्झा एकटाच राहतो.पाहत, चडफडत)

  मिर्झा :      आणि इकडे आम्ही फ्लॅट! चांगलाऽ मी दाखवत होतो तर... (फाईल आपटतो)  लानत है...! कसली नोकरी ही? (फाईल उचलत, बदललेल्या आवाजात) पण      काय करणार? नोकरी आहे, जावं लागेल. जातो, झालं! चांगला दाखवत  होतो फ्लॅट... पण नाही...  (जातो त्वरेने. पाठोपाठ रामभरोसेचा आवाज)

  रामभरोसे      :      बल्लू...

     (मंचावर कोणी नाही. थोडा वेळ मंचावर शांतता. मग विंगेतून पुन्हा आवाज येतो.)

     बल्लू... बेटा, आहेस कुठे?

     (मध्यमवयीन रामभरोसे सूटकेस इत्यादी घेऊन येतो. त्याच्यामागोमाग एक मजूर  आणखी काही सामान घेऊन येतो.)

  रामभरोसे      :      अरे, इथे तर कोणी दिसत नाही...

  मजूर   :      पण कमलकुंज तर हेच आहे!

  रामभरोसे      :      ठीक. मग सगळं सामान इथेच ठेव. बेटी कुठे तरी इथेच असेल. येईल आता...

  (पाठोपाठ आणखी दोन मजूर गडबडीने अन्य सामान आत आणतात. रामभरोसे खुर्चीवर बसतात.) हे घ्याऽ (पैसे देतात.)

  मजूर   :      कमी आहेत साहेब!

  रामभरोसे      : (आणखी पैसे देत) खूश? झालं ना आता?

  मजूर   :      हो मालक! राम राम!

   (तिघं जातात. ते गेल्यानंतर रामभरोसे काही क्षण फिरत्या खुर्चीवर बसून थोडं     जागच्या जागी हलत विश्रांती घेतात आणि पाठोपाठ डॉक्टर येतात. हातात   मेडिकल बॅॅग. कोटाच्या खिशात स्टेथास्कोप. येताच त्यांची नजर आपल्या    सामानावर पडते. मग ते डोळे झाकून बसून झोके घेणाऱ्या रामभरोसेकडे    पाहतात. त्याच्याकडे आणि आपल्या सामानाकडे आश्चर्याने पाहतात. मग रामभरोसेला उठवतात. तो दचकून उठतो.)

  डॉक्टर :      रामभरोसे... तू इथे काय करतोस? आणि आपलं सामान इथे कसं?

  रामभरोसे      :      आपल्या बल्लू बिटियाने फोन केला होता,  सरकार. सामान घेऊन लगेच इथे यायला सांगितलं होतं, मी घेऊन आलो...

  डॉक्टर :      बल्लूने फोन केला होता?

  रामभरोसे      :      हो, सरकार.

  डॉक्टर :      म्हणजे तिला फ्लॅट मिळाला असणार, नाही तर ती चुकीचा निरोप देणारच नाही.   मी पेशंटमुळे उशिरा आलो जरा. बल्लू कुठे आहे?

  रामभरोसे      :      मी आलो, तेव्हा त्या नव्हत्या इथे. मला माहीत नाही. पण कमलकुंज हेच आहे, हे नक्की.

  डॉक्टर :      बिल्डिंग तर नवी आहे... फ्लॅट पण चांगले असतील...

  रामभरोसे      :      बिटिया चांगलाच फ्लॅट निवडेल ना!

     (पंडित रामदयाळ आणि मुखर्जी येतात. चर्चा चालली आहे)

  पंडित :      मुखर्जीसाहेब, तीन दिवसांत फरशी लावण्याचं काम पूर्ण झालं तर चांगलं...

  मुखर्जी :      बंगाली माणसाचा शब्द आहे पंडितजी. होईल, होऊन जाईल.

     (चालता-चालता सामानामुळे अडखळतात. आश्चर्याने)

  पंडित :      अरे, हे सामान कोणाचं आहे?

  डॉक्टर :      आमचं आहे. आणखी कोणाचं मग?

  पंडित :      आणि तुम्ही कोण?

  डॉक्टर :      आणि तुम्ही कोण?

  पंडित :      ते तर मी नंतर सांगेन... पण आधी हे सांगा की, तुम्ही कोण आहात? आणि   तुम्हाला सामान आणण्याची परवानगी कोणी दिली?

  डॉक्टर :      सामान तर भाडेकरूच आणणार ना? माझ्या मुलीने इथे फ्लॅट भाड्याने घेतला   आहे.

  पंडित :      असं? कदाचित घेतला?

  डॉक्टर :      (रागाने) कदाचित नाही, नक्कीच. तिला खात्री नसती, तर तिने नोकराला फोन  करून सामान आणायला कशाला सांगितलं असतं?

  पंडित :      पण मुलगी कुठे आहे?

  डॉक्टर :      तेच तर मी विचारतोय तुम्हाला- माझी मुलगी कुठे आहे?

  पंडित :      मी काय तुमच्या मुलीचा रक्षक आहे का?

  डॉक्टर :      पण तिने आत्ता इथून टेलिफोन केला होता. काय रामभरोसे?

  रामभरोसे      :      जी मालक. म्हणून तर मी आलो सामान  घेऊन.

  डॉक्टर :      आणि तुम्ही म्हणता की, तुम्हाला काही माहीतच नाही... You wicked old man!! (एकदम पुढे होऊन पंडित रामदयाळच्या शर्टाची कॉलर पकडतो.) माझी मुलगी कुठे आहे? नाही तर आत्ता पोलिसांना फोन करेन...

  पंडित :      आऽ... आऽ... आऽ

     (मुलीचा आवाज येतो)

  मुलगी :      डॅडी... डॅडी... डॅडी ऽ!

     (डॉक्टर वळून पाहतात. त्याच वेळेला    मुलगी बल्लू आणि कमलकांत येताना  दिसतात. डॉक्टर कॉलर सोडतात. पंडित  धापा टाकतो आहे. मुलगी धावत डॉक्टरकडे येते.) डॅडी, मी फ्लॅट पाहून, पसंत करून आले आहे. It is a very nice flat! Two big bedrooms, two big bathrooms and a big hall! A big kitchen and a big pantry... lovely flat!किराया फक्त सातशे रुपये!

  डॉक्टर :      तू नक्की केलंस?

  मुलगी :      ही चावी बघा ना! म्हणजे नक्की झालंच ना?

  पंडित :      (कमलकांतला उद्देशून) तू यांना फ्लॅट दिलास?

  कमलकांत     :      हो बाबा!

  पंडित :      पण हे आहेत तरी कोण?

  कमलकांत     :      (घाबरून) पण मी... मी विचारलंच  नाही.

  पंडित :      नावसुद्धा विचारलं नाही आणि भाड्याने फ्लॅट देऊन टाकलासऽ?

  कमलकांत     :      यांचं नाव बल्लू आहे वाटतं!

  पंडित :      बल्लू? बिमला? बलवंत कौर? बतौल? नक्की काय?

  कमलकांत     :      मी विचारलं नाही आणि माझ्यासाठी बल्लू  पुरेसं आहे.

     (मुलगी आणि कमलकांत एकमेकांकडे पाहून हसतात.)

  मुलगी :      मी सांगते, माझं नाव अजाबयिला आहे. म्हणून बल्लू! हे माझे वडील- डॉक्टर   आयडोर उकोईलो. हिंदुस्थानातले प्रसिद्ध  हार्ट स्पेशालिस्ट!

  पंडित :      (मोठ्याने) आयडोर उकोईलोऽ? म्हणजे ख्रिश्चन? (बाप आणि मुलगी होकारार्थी  डोकं हलवतात) हे भगवान... माझा धर्म भ्रष्ट झाला! (रागाने) चलाऽ निघून जाऽ      निघून जा इथून... बदमाश...! माझ्या घरातून निघून जाऽ

  कमलकांत     :      बाबाऽऽ?

  पंडित :      मी त्यापेक्षा मरून जाईन, पण तुम्हा लोकांना बिल्डिंगमध्ये घुसू देणार नाही.  समजलं? निघून जा... निघून जा इथून...

     (मिर्झा फाईल घेऊन येतो. आश्चर्याने पाहत उभा राहतो.)

  डॉक्टर :      जातो. पण आपण कोर्टात भेटू. आधी हो म्हणून नंतर नाकारलं म्हणून दंड वसूल करीन- पन्नास हजार रुपये! समजलं?

  पंडित :      जाऽ! लाखो वसूल कर... पण इथे, या बिल्डिंगमध्ये राहता येणार नाही. जाऽ...    जाऽऽ... आऽऽ

     (एकदम छातीला हात लावून विव्हळत   कोचावर पडतो.)

  कमलकांत     :      बाबाऽ (धावतो. सावरण्याचा प्रयत्न  करतो.)

     (मुखर्जी आणि मिर्झासुद्धा घाबरतात.)

  मिर्झा :      बहुतेक हार्ट ॲटॅक...

  डॉक्टर :      चल बेटा, जाऊ आपण.

     (डॉक्टर बल्लूला घेऊन जाऊ लागतात. ती वळून पाहते आहे. मात्र कमलकांत धावत येतो.)

  कमलकांत     :      डॉक्टरसाहेब... डॉक्टरसाहेब...

  डॉक्टर :      माझा हात सोड...

  कमलकांत     :      हार्ट ॲटॅक आहे... बघा, ते कसं  करताहेत-

  डॉक्टर :      मग मी काय करू?

  कमलकांत     :      दया करा... त्यांना वाचवा!

  डॉक्टर :      मी ख्रिश्चन आहे. मी स्पर्श केल्याने त्यांचा धर्म भ्रष्ट होईल... मला जाऊ देऽ

  कमलकांत     :      चलाऽ परत चला, डॉक्टरसाहेब... त्यांना वाचवा! वृद्ध आहेत, जुन्या विचारांचे आहेत... पण बाबा आहेत माझे. त्यांना माफ करा. ते बोलले असतील, पण त्यांना माफ करा... त्यांना वाचवा.      चलाऽ प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे...

  (डॉक्टर मुलीकडे पाहतात. मुलगी सहमतीपूर्ण नजरेने पाहते. डॉक्टर परत येतात. पंडितच्या भोवताली थांबलेले लोक मागे सरकतात. डॉक्टर पंडितला पाठीवर नीट झोपवतात. तपासणी करतात. मग बॅगेतून इंजेक्शन काढून ते देतात. मुलगी मदत करत राहते. पंडित अगदी बेशुद्ध पडलाय. डॉक्टर घड्याळ पाहत राहतात. मंचावर गंभीर शांतता. मग पंडित हालचाल करतो. हळूहळू तो डोळे उघडतो. हळूहळू उठू पाहतो.)

  डॉक्टर :      उठू नका, पडून राहा.

  पंडित :      नाही, मला उठून बसवा.

  कमलकांत     : डॉक्टरसाहेबांनी तुम्हाला वाचवलंय बाबाऽऽ

     (पंडित उठून बसतो.)

  मिर्झा :      ज्यांनी तुम्हाला वाचवलं, त्यांचे आभार   तरी माना शेठजी... गप्प का?

  डॉक्टर :      निसर्गाचा हा चमत्कारच मानला पाहिजे. एका मिनिटापूर्वी तुमची नाडी बंद पडली होती... हृदय पण बंद होतं... श्वास थांबला होता...

  पंडित :      पण मी मेलो नव्हतो डॉक्टर... मला वाटलं की, मी एखाद्या दूरच्या प्रवासाला  निघालो आहे.  (पंडित हळूहळू उभा राहतो. मध्यभागी येतो. उचित संगीत आणि पंडितवर प्रकाशवर्तुळ)

  डॉक्टर :      अंऽऽ!

  पंडित :      आणि रस्त्यात मला आपल्या बिल्डिंगचा आत्मा भेटला!

  डॉक्टर :      बिल्डिंगचा आत्मा?

  पंडित :      (गंभीरपणे) हो डॉक्टर, बिल्डिंगचा आत्मा! प्रत्येक माणसाचा जसा आत्मा   असतो ना, तसा प्रत्येक बिल्डिंगचा पण एक आत्मा असतो. प्रत्येक वंशाचा   आत्मा असतो, प्रत्येक देशाचा आत्मा असतो... बिल्डिंगचाही असतो. आपल्या    बिल्डिंगचा आत्मा मला त्या अदृष्टाच्या     दीर्घ प्रवासात वाटेत भेटला. मी म्हटलं-   चल, मिळून जाऊ प्रवासाला...

  कमलकांत     :      अं! मग?

  पंडित : मी म्हटलं- चल, तुझा आणि माझा रस्ता एकच आहे. तर म्हणाला, नाही. या रस्त्याने जाऊन तू आणि मीही मुक्कामाला पोहोचू शकणार नाही!

  कमलकांत     :      मग?

  पंडित :      तो म्हणाला की, हा रस्ता आता जुना झाला आहे. हा रस्ता कुठेच घेऊन जात   नाही, जाणार नाही! मी म्हटलं, मग पुढे जाण्याचा मार्ग तरी कोणता? तो गंभीरपणे म्हणाला की- जी माणसं आपल्या मागे घरांचे दरवाजे उघडे ठेवतात ना, तीच  माणसं पुढे जाऊ शकतात. ते ऐकल्यानंतर मी परत आलो. (खिशातून चाव्यांचा     गुच्छ बाहेर काढतो.) कमलकांत, ह्या चाव्या तुला द्यायला मी परत आलो. (चाव्यांचा गुच्छ देतो.) तू या चाव्या घे आणि आपल्या बिल्डिंगचे सगळे दरवाजे सताड उघडे ठेव.

  कमलकांत     :      अं?

  पंडित :      आपल्या बिल्डिंगचा नकाशा एका बंगाल्यानं बनवलाय. राजस्थानी मजुरांनी विटा रचल्यात. मल्याळी कारागिरांनी   बिल्डिंगला रंग लावलाय. पंजाबी सुतारांनी याचे दरवाजे आणि खिडक्या बनवल्या आहेत. मुसलमानांनी फरशा बसवल्या आहेत. डिसुझा ख्रिश्चन आता या बिल्डिंगमध्ये वीज आणेल. अब्राहम प्लंबिंगचं काम करेल, रुस्तुम संट्री संरक्षण करेल. ही बिल्डिंग... हे घर सगळ्यांनी मिळून बांधलंय! हिंदू, मुसलमान, शीख, इसाई, बौद्ध, पारशी, यहुदी... सर्वांनी मिळून हे घर बनवलंय!    या घरात जर सगळे मिळून एकत्र राहिले नाहीत, तर हे घर आबाद कसं होईल?     सुजलाम्‌-सुफलाम्‌ कसं होईल? या घराची प्रगती कशी होईल? या घराचा    झेंडा आकाशात फडकायचा असेल, उंच लहरायचा असेल तर- सर्वांचं योगदान मान्यच करावं लागेल! म्हणून मी त्या अदृष्टाच्या प्रवासातून परत आलो...    म्हणून या चाव्या, हे भवितव्य मी तुझ्या ताब्यात देतो आहे, कमल बेटा! आता या  घराचे सगळे दरवाजे, सगळी बंद दारं उघड- उघडून टाक! या बिल्डिंगच्या  उभारणीसाठी ज्यांचे हात लागले, त्या सुपुत्रांना बोलावून घे! करीम उल्ला     सायंटिस्टना, आफताब रायना, बिल्लू आणि रंगाचारींना, मिर्झाच्या मित्राला   आणि गुरुदयालसिंगना... आणि सगळ्या सगळ्यांना बोलावून घ्याऽ! ज्यांनी ही    बिल्डिंग उभी केली, हा देश उभा केला- त्या साऱ्यांचा हा देश, साऱ्यांची ही     इमारत- ही बिल्डिंग! ज्यांनी या भिंती उभारल्या, ज्या आडोशाला अश्रू वाहू     दिले, त्यांची आहे ही बिल्डिंग... या परिसरात मानवी आकाक्षांना पालवी फुटली आहे, स्वप्नांनी आकार घेतला आहे! ज्यांनी माणूस म्हणून इथे अस्तित्व पेरलं, त्यांची आहे ही इमारत... ही बिल्डिंग! हा देश! आता ही बिल्डिंग एकट्या पंडित रामदयाळची नाही... हे घर आता तुम्हा सर्वांचं आहे. सर्वांचं       योगदान आहे इथे... इथे कोणाचा द्वेष नाही... नफरत नाही... ही बिल्डिंग   इथल्या सर्वांची आहे. बोलवा सर्वांना आणि बंद दरवाजे उघडाऽऽ दरवाजे खोल    दोऽऽ!

 (हळूहळू ती बिल्डिंग बनवणारे मजूर, कामगार, सुतार, रंगारी, या घरात  भाड्याने राहू इच्छिणारे भाडेकरू, आधीयेऊन गेलेली सगळी पात्रं, सगळे नोकर,   मिर्झा, मुखर्जी- सगळे पंडितच्या भोवती गोळा होतात. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद   आणि उल्हास. आनंदी असा एखाद्या गीताचा स्वर हळूहळू ऐकू येतो आणि    वाढत जातो. त्या पाठोपाठ पडदा हळूहळू खाली येतो.)

अनुवाद: भारत सासणे 

(1964 मध्ये ‘कौमी एकता’ चळवळीचा भाग म्हणून लिहिले गेलेल्या ‘दरवाजे खोल दो’ या उर्दू नाटकाचे प्रयोग त्या काळात प्रायोगिक मंचावर  झाले. त्यानंतर हे नाटक रेडिओवरूनही सादर केले गेले. मराठीत मात्र या नाटकाचे प्रयोग कधी झाल्याचे वा या नाटकाचा अनुवाद पूर्वी कधी  झाल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत.)

Tags: अंतरभारती अनुवाद नाटक दरवाजे खोल दो कृष्ण चंदर भारत सासणे translation natak play antarbharati krushn chandar bharat sasane weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कृष्ण चंदर

(1914 - 1977) हिंदी व उर्दू लेखक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात