Diwali_4 ग्रंथ पुरस्कार । वैचारिक मनोगत
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

ग्रंथ पुरस्कार । वैचारिक मनोगत

वीस वर्षे इंग्रजी पत्रकारितेत व गेली पंधरा वर्षे मराठी पत्रकारितेत वावरलेल्या कुमार केतकर मांनी ‘महाराष्ट्र टाइम्स', ‘लोकमत' व ‘लोकसत्ता' या तीनही प्रमुख मराठी दैनिकांचे मुख्य संपादकपद भूषविले आहे. कार्ल मार्क्स, महात्या गांधी, बर्ट्रांड रसेल व जे. कृष्णमूर्ती या चौघांच्या विचारांचा विशेष प्रभाव असलेल्या केतकरांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक या चारही दृष्टिकोनातून आणि 'राष्ट्रीय व आंतर'राष्ट्रीय परिप्रेक्षातून कोणत्याही प्रश्नाकडे पाहण्याची वृत्ती अंगी बाणवली आहे. ज्वालामुखीच्या तोंडावर, कथा स्वातंत्र्याची, विसाव्या शतकाचे महानिर्वाण, शिलंगणाचं सोनं, ओसलेले वादळ, मोनालिसाचे स्मित व विश्वामित्राचे जग ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘बदलते विश्व' या पुस्तकातील वैचारिक निबंध प्रखर वास्तवाचे भान करून देतानाच नैतिकता, समाजसन्मुखता, धर्मनिरपेक्षता व विश्वात्मकता यांच्या दिशेने प्रवास करण्याची प्रेरणा देतात. 

आकलनाचा आनंद

लौकिक अर्थाने ‘बदलते विश्व' हे एखाद्या विशिष्ट विषयावरचे वा खास काही संशोधनसदृश अभ्यास करून लिहिलेले पुस्तक नाही. दैनिक वृत्तपत्रीय धबडग्यामध्ये  जगातील अनंत विषयांवरच्या, व्यक्तींसंबंधातल्या आणि देश-विदेशातील घटनांच्या बातम्या अक्षरश: धबधब्याप्रमाणे कोसळत असतात. बहुतेक वेळेस त्यातून नीर-क्षीर-विवेक करणे अशक्य असते. अनेकदा अगदी सवंग, अर्थशून्यू  निव्वळ वावड्या - अशाही बातम्या अ'लातून मांडणीसहित पहिल्या पानावर आकर्षकपणे झळकतात. बाबा-बुवांपासून बॉलीवूडपर्यंत आणि माफीयापासून मनोरंजनापर्यंत सर्व काही वृत्तपत्रांमध्ये, दूरचित्रवाणी वाहिन्यांमार्फत आणि इंटरनेटद्वारे सतत प्रसृत होत असते.

तथाकथित ‘माहिती-स्फोट' झाल्यानंतर आणि माध्यम-विस्ताराचे क्षितिज रुंदावल्यानंतर अर्थशून्यतेच्या अफाट कचऱ्यातून अर्थपूर्ण शोधणे तर अधिकच जिकीरीचे होऊ लागले आहे. ते अपरिहार्यही आहे. विसाव्या शतकापर्यंतच्या अधिक पटींनी ते इतिहासात जग जितके व जितक्या वेगाने बदलले, त्यापेक्षा अधिक पटींनी ते पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात म्हणजे एकूण 1900 ते 1950 या 50 वर्षांत बदलले. त्यानंतरच्या 50 वर्षांत म्हणजे 1950 ते 2000 या काळात तो वेग अधिकच भन्नाट झाला. गेल्या काही वर्षांत तर तो वेग जणू आपल्या निमंत्रणाच्या पलीकडे गेला आहे, असे वाटण्यासारखी स्थिती आली आहे. या शतकाच्या उर्वरित 90 वर्षांत ती स्थिती अधिकच ‘हाताबाहेर' जाईल, अशी भीतीही अनेकजण व्यक्त करतात.

या प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जगाची गती आणि  संगती समजावून घेण्याचा प्रयत्न वृत्तपत्रांतूनच व्हायला  हवा, असे मला वाटत होते. माहितीच्या धबधब्यातून त्या गती-संगतीचे निकष आणि अन्वय समजले, तर तो धबधबा असा अंगावर कोसळत आहे, असे वाटणार नाही. धबधबा जसा भीतिदायक भासतो, तसाच अद्‌भुत आणि चैतन्यदायीही असतो. पाणी धबधब्याचे असो, वा नदीचे संथ वाहणारे - दोन्हीचे मुख्य घटक तेच : H2 O! त्या पाण्याचे घटक समजून घेतानाच त्या बेभान कोसळणाऱ्या पाण्याचे चैतन्यही उमजले आणि संथ वाहणाऱ्या पाण्याची अथांग ‘आध्यात्मिकता'ही लक्षात आली, तर आकलनाचा आनंद घेता घेतो; हा अनुभव वाचकांपर्यंत न्यावा असा अगदी ढोबळ हेतू या स्तंभलेखनामागे होता.

 ‘जगाचा - विश्वाचा - अर्थ अनेक तत्त्वज्ञांनी लावला आहे; वा लावायचा प्रयत्न केला आहे, पण आता गरज आहे जग बदलण्याची', असे भाष्य कार्ल मार्क्स मांनी दीडशे वर्षांपूर्वी केले होते. अर्थातच, तोपर्यंत जग बदलायचा प्रयत्नच कुणी केला नव्हता, असे मार्क्सला  म्हणायचे नव्हते. मार्क्सला  म्हणायचे होते, की तोपर्यंत अवगत झालेल्या  ज्ञान-विज्ञानाच्या आधारे सर्वंकष अशा विचारसरणीच्या माध्यमातून जग बदलणे शक्य आहे. ते तातडीचेही आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक सुख व आनंद, समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी जग बदलणे शक्य आणि आवश्यक आहे. प्रत्यक्षात मार्क्सचे ते स्वप्न अजूनही पूर्ण झालेले नसले, तरी तो आदर्श निर्माण व्हावा, असे अगदी कट्टर ‘ॲन्टि-कम्युनिस्टां'नाही वाटेल!

परंतु जग बदलण्यासाठी विचारसरणी हवी आणि विचारसरणी विकसित करण्यासाठी जग समजायला हवे. दोन्ही एकसममावच्छेदे करून व्हायला हवे. परिवर्तनाचे तत्त्वज्ञान अपरिवर्तनीय कसे असेल ? दुर्दैवाने, हे साधे सूत्र त्याच्या अनेक अनुयायांना समजले नाही आणि बिचाऱ्या मार्क्स-एंगल्सचे तत्त्वज्ञान पोथीरूप झाले. असो. ‘बदलते विश्व'चा विषय तो नाही; पण ‘बदलत्या विश्वाचे अंतरंग' (त्या स्तंभाचे मूळ नाव) समजून घेण्याचा प्रयत्न म्हणून हे साप्ताहिक सदर सुरू केले. या सदरात अनेक विषयांवर प्रकट-चिंतन रूपाने मी लिहिले - सर्वज्ञतेचा आव आणून नव्हे; तर वृत्तपत्र माध्यमातून चर्चा-संवाद व्हावा म्हणून! वाचकांनीही प्रचंड प्रतिसाद दिला. या साप्ताहिक स्तंभ- निबंधमालेत कुटुंब व्यवस्थेपासून धर्मकारणापर्यंत, टेक्नोलॉजीपासून आयडियॉलॉजीपर्यंत, इतिहासापासून राजकारण-सत्ताकारणापर्यंत, अर्थशास्त्रापासून सौंदर्यमीमांसेपर्यंत असे अनेक विषय आहेत. दैनंदिन वृत्तपत्रीय लेख - अग्रलेखापासून जरा दूर जाऊन एकूण मानवी इतिहासाकडे - सिव्हिलायझेशनकडे कटाक्ष टाकणारे, त्यातील ‘गूढ' बाबींकडे लक्ष वेधणारे असे हे निबंध आहेत. तेही वर म्हटल्याप्रमाणे वृत्तपत्रीय धबडग्यात लिहिलेले.

मार्क्स, डार्विन, फ्रॉईड अशा अनेकांनी जे वैचारिक विश्व एकोणिसाव्या शतकात तेज:पुंज केले, त्याचे तेजोकण आजही आपले जीवन उजळून टाकतात. विसाव्या शतकाला ज्याप्रमाणे लेनिन, गांधीजी, आइनस्टाईन, रसेल आणि नेहरू वा अशांनी आकार व आशय दिला; त्याचप्रमाणे हिटलर, मुसोलिनी, निक्सन-किसींजर व पोल पोट यांनी विश्वच विस्कटून टाकायचा विध्वंसक प्रयत्न केला. विज्ञान-तंत्रज्ञानाचे सर्जनशील रूप आणि विध्वंसक आविष्कार विसाव्या शतकातच प्रकट झाले.

साम्राज्यशाहीचा एकोणिसाव्या शतकातील विस्तार आणि विसाव्या शतकातील अस्त, समाजवादी/साम्यवादी क्रांतीचा स्फूर्तिदायी उदय आणि तिचा विदारक अंत, अस्मितावादाचा अतिरेकी आविष्कार आणि दहशतवादाचे हिंस्र रूप, सर्वांगीण विकासाची शक्यता दाखविणारे अर्थज्ञान आणि तरीही सर्वंकष नैसर्गिक-पर्यावरणीय भकासपण निर्माण करणारे लोभाचे ऐहिक तत्त्वज्ञान अशा अनेकविध अंतर्विरोधांनी हे विश्व, ही सिव्हिलायझेशन, आपले जीवन वेढलेले आहे.

पुढील काही वर्षांत ठरणार आहे - एकविसावे शतक हे विध्वंसक असेल की विधायक व विलोभनीय! या शतकाअखेरीस आपण नसलो, तरी हे विश्व असणारच आणि ते सतत बदलतही राहणार. त्या भविष्याचा वर्तमानातून घेतलेला शब्दवेध म्हणजे ‘बदलते विश्व'.

या निबंधांना वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रियांवरून हेही पुन्हा लक्षात आले, की वृत्तपत्रीय बातम्यांच्या महागर्दी व गोंधळातही विचक्षक वाचक, जगाचा अर्थ आणि अन्वयार्थही शोधत असतो. संपादक आणि प्रकाशकांना समाधान आणि सामर्थ्य देणारी ही गोष्ट आहे. ‘महाराष्ट्र फाउंडेशन'च्या पुरस्कारानेही तीच गोष्ट अधोरेखित झाली आहे.

Tags: वृत्तपत्र. बातमी महाराष्ट्र फौंडेशन 21st century कुमार केतकर newspaper news maharashtra foundation award kumar ketkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कुमार केतकर
ketkarkumar@gmail.com

पत्रकार, माजी संपादक- लोकसत्ता, दिव्यमराठी, खासदार- राज्यसभा 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात