Diwali_4 मेरा नाम तेरा नाम, व्हिएतनाम-व्हिएतनाम!
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

मेरा नाम तेरा नाम, व्हिएतनाम-व्हिएतनाम!

मी त्या वेळी विद्यार्थी चळवळीत सामील होतो. तेव्हाच्या बहुतेक सर्व विद्यार्थी संघटना आणि चळवळी डाव्या विचारांच्या प्रभावाखाली होत्या. आमची विद्यार्थी संघटना कम्युनिस्ट पार्टीशी संलग्न होती. मॅडम बिन्ह यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जाण्याचा निरोप आम्हाला आमच्या नेत्यांकडून मिळाला होता. बिन्ह त्या वेळी कमानी एम्प्लॉइज युनियनच्या कुर्ला (उत्तर-मध्य मुंबईतले उपनगर) येथील सभागृहात येणार होत्या आणि तिथेच त्यांचा कामगार संघटनांच्या वतीने सत्कार होणार होता.

'रिडिफ डॉट कॉम’ वरील लेखाचा अनुवाद

मला अजूनही स्पष्ट आठवत आहे, जुलै 1970 मध्ये मॅडम बिन्ह मुंबईला (त्या वेळच्या ‘बॉम्बे’त) यायच्या होत्या आणि ते निमित्त होऊन वातावरण कमालीचे तणावाचे व संघर्षाचे बनले होते.

मॅडम नूयेन थी बिन्ह या दक्षिण व्हिएतनामच्या कम्युनिस्ट नेत्या होत्या. त्यांनी लाल झेंड्याखाली एकत्र आणलेले शेतमजूर अमेरिकी लष्कर आणि मीडियाच्या लेखी ‘व्हिएतकाँग’ होते. अमेरिकी माध्यमांत त्यांची खूप चर्चा होती. त्यामुळे आपल्याकडच्या वृत्तपत्रांमध्ये ‘मॅडम बिन्ह या मुंबई भेटीवर येणार’ अशा बातम्या आल्या, तेव्हा आम्ही अक्षरश: झपाटून गेलो होतो. दि. 30 एप्रिल, 1975 रोजी व्हिएतनाम मुक्त झाला, तेव्हा याच मॅडम बिन्ह त्या देशाच्या परराष्ट्रमंत्री बनल्या होत्या.

मी त्या वेळी विद्यार्थी चळवळीत सामील होतो. तेव्हाच्या बहुतेक सर्व विद्यार्थी संघटना आणि चळवळी डाव्या विचारांच्या प्रभावाखाली होत्या. आमची विद्यार्थी संघटना कम्युनिस्ट पार्टीशी संलग्न होती. मॅडम बिन्ह यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जाण्याचा निरोप आम्हाला आमच्या नेत्यांकडून मिळाला होता. बिन्ह त्या वेळी कमानी एम्प्लॉइज युनियनच्या कुर्ला (उत्तर-मध्य मुंबईतले उपनगर) येथील सभागृहात येणार होत्या आणि तिथेच त्यांचा कामगार संघटनांच्या वतीने सत्कार होणार होता.

पण हा सगळा कार्यक्रम विनाअडथळा पार पडण्याची सुतराम शक्यता नव्हती. कारण शिवसेना आणि जनसंघाच्या युवा संघटनांच्या वतीने बिन्ह यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार होता. ते आमच्या तुलनेत अधिक आक्रमक आणि मोठ्या संख्येने जमा झाले होते.

महिन्यापूर्वीच बंडखोर वृत्तीचे कम्युनिस्ट नेते आणि आमदार कृष्णा देसाई यांची शिवसेना कार्यकर्त्यांनी हत्या केली होती. स्थापनेनंतरची ती राज्यातली पहिली राजकीय हत्या होती. खरे तर शिवसेनेच्या स्थापनेला जेमतेम चारच वर्षं उलटली होती, परंतु अल्पकाळातच अत्यंत आक्रमक आणि हिंसक अशा प्रकारची शिवसेनेची प्रतिमा आकारास आली होती. शिवसेनेच्या त्या कार्यपद्धतीला काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचा छुपा पाठिंबाही होता.

प्रारंभी लुंगीवाले किंवा मद्रासींच्या (शिवसेनेसाठी सगळेच दाक्षिणात्य लोक ‘मद्रासी’ या कॅटेगरीत मोडत होते.) विरोधात शिवसेना होती. शिवसेनेने पहिला हल्ला माटुंगा परिसरात असलेल्या उडुपी हॉटेलांवर केला होता, मग आपला मोहरा राज्य शासनात नोकरीला असलेल्या मद्रासी कारकून आणि स्टेनोग्राफरकडे वळवला होता. त्यानंतर शिवसेनेने आपला पवित्रा बदलत मुंबई ‘कम्युनिस्टमुक्त’ करण्याचा चंग बांधला होता.

तसे करताना शिवसैनिक फॅक्टरींमधल्या संपावर असलेल्या कामगारांवर चालून जात, परळ-लालबाग परिसरात असलेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयांवरही हल्ला करत. परंतु, बचावात्मक पवित्र्यात असले तरी कम्युनिस्ट कार्यकर्तेही आपल्या जागी ठाम असत. शिवसैनिक जेव्हा रस्त्यावर उतरत, तेव्हा हिंसा अशी रस्त्या-रस्त्यांवर दृश्य स्वरूपात दिसे.

बाळ ठाकरे (ते बाळासाहेब खूप नंतर झाले) प्रत्येक जाहीर सभेत कम्युनिस्ट नेत्यांना आव्हान देत. मुंबईला ‘लाल भाई’मुक्त करणे हे त्यांचे त्या वेळचे उद्दिष्ट होते. मॅडम बिन्ह यांच्या विरोधातला शिवसेनेचा मोर्चा हा त्या कम्युनिस्टद्वेषातून आलेला होता. अर्थात, विरोध करणाऱ्या शिवसैनिकांना ना बिन्ह यांच्याबद्दलचे काही ज्ञान होते, ना त्या वेळी सुरू असलेला व्हिएतनाममुक्तीचा लढा किंवा दक्षिण-पूर्व आशियातल्या राजकीय संघर्षाशी देणे-घेणे होते.

जगभरातले- विशेषत: युरोप-अमेरिकेतले- तरुण युद्धविरोधी भूमिका घेत होते. त्यातला एक मोठा वर्ग 1968 मध्ये व्हिएतनामींनी अमेरिकी फौजेविरोधात आरंभलेल्या ‘टेट ऑफेन्सिव्ह’ (व्हिएतनामी कालगणने-नुसार 31 जानेवारी हा दिवस ‘नववर्षदिन टेट’ नावाने ओळखला जातो.) नावाने ओळखल्या गेलेल्या लढ्यानंतर व्हिएतनामचा सहानुभूतीदार बनला होता. या प्रत्युत्तरादाखल केलेल्या लढ्यात व्हिएतनामी मोठ्या प्रमाणात मारले गेले  होते, तरीही या घटनेने युद्धाचे वारे फिरण्यास मोठी मदत झाली होती.

युद्धखोर वृत्तीचा परिणाम म्हणून जवानांचे मृतदेह दर दिवशी अमेरिकत पोहोचत होते. मृत जवानांचे देह भरलेल्या बॉडीबॅग्ज, जखमी जवानांची विकल अवस्था हे सारे अमेरिकेत टीव्हीवर दिसत होते; ‘लाइफ’ मासिकातून युद्धात मारल्या गेलेल्या जवानांच्या उद्‌ध्वस्त कुटुंबांची छायाचित्रे प्रकाशित होत होती. निक्सन-किसिंजर जोडीचा युद्धखोरपणा दर दिवशी मीडिया उघड करत होता. या सगळ्या घटनांमुळे अमेरिकेतल्या विद्यापीठातला तरुण अस्वस्थ होताना दिसू लागला होता. व्हिएतनामी नेता हो चि मिन्ह आणि चीनमध्ये माओने घडवून आणलेल्या क्रांतीमुळे कम्युनिस्ट विचारसरणीबद्दलचे वाढते आकर्षण उजव्या विचारांच्या पक्ष-संघटनांपुढे आव्हान उभे करू पाहत होते.

असे असले, तरी मुंबईतले कम्युनिस्ट बचावात्मक पवित्र्यात होते. जगभरात मात्र डाव्या विचारसरणीकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत होती. साठच्याच दशकात न्यू लेफ्ट किंवा नवसाम्यवादी ही संकल्पना जन्माला आली होती.

सन 1965 ते 1975 हे दशकच बंडखोरीचे दशक बनले होते. बिटल्स ते चे गवेरा, हिप्पी ते एलएसडी, माओ ते माल्कम एक्स, मार्टिन ल्यूथर किंग ते कॉन बेन्डिट, सार्त्र ते नॉर्मन मिलर, काऊंटर कल्चर मूव्हमेंट ते स्टुडंट्‌स फॉर डेमोक्रॅटिक सोसायटी मूव्हमेंट, व्हिएतनामी संघर्ष ते नक्षलवादी चळवळ... अशा सर्व स्तरांत या बंडखोरीचे पडसाद उमटत होते.

सर्व जग जणू क्रांतीच्या नव्या आवर्तनातून मार्गक्रमण करत होते. आम्ही संख्येने कमी असलो, तरीही हाच जागतिक पातळीवरचा बदल आम्हाला मॅडम बिन्ह यांचे मुंबई विमानतळावर आवेशात जाऊन स्वागत करण्यासाठी आत्मविश्वास देत होता.

आमचा नारा ‘मेरा नाम तेरा नाम, व्हिएतनाम- व्हिएतनाम’ हा होता आणि शिवसैनिक ‘जला दो जला दो, लाल झंडा जला दो’, म्हणत आम्हाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत होते. ही नारेबाजी दंगलसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी पुरेशी होती. अर्थातच, शिवसैनिक आणि कम्युनिस्टांमध्ये संघर्ष होऊ नये, यासाठी पोलीस तैनात करण्यात आले होते.

हा असा भारावलेला माहोल बराच काळ टिकून होता. अमेरिकी व्यवस्थेचा आणि मुख्यत: युद्धखोर राजकीय नेत्यांचा पर्दाफाश करणारा अमेरिकी मीडिया आम्हाला उत्साह व प्रेरणा देत होता. नील शिहान, गोर विदाल, आय.एफ.स्टोन यांसारखे खमके पत्रकार; नोम चोम्स्की, वॉटरगेट प्रकरणाचा छडा लावणारे बॉब वूडवर्ड, कार्ल बर्नस्टिन, बेन ब्रॅडली हे सगळे आमच्या पिढीचे आयकॉन बनले होते.  

आमच्यातल्या अनेकांनी 1970 च्या दशकात पत्रकारितेत प्रवेश करण्यामागेसुद्धा वृत्तपत्र हे जग बदलण्यासाठीचे मुख्य अस्त्र आहे, हाच विचार होता. व्हिएतनामने हे दाखवून दिले होते की, जग खरोखरच बदलू शकते आणि सामान्य नागरिकांची ताकद राज्यसत्तेपेक्षा मोठी असते.

डॅनिएल एल्सबर्गने ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’मधून पेंटागॉन पेपर्स उघड केल्यानंतर आणि वॉटरगेट प्रकरणात निक्सन अडचणीत येत चालले असताना व्हिएतनाम युद्ध अपरिहार्यपणे शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचले होते. आता युद्धात व्हिएतनामचा विजय होणार याबाबत कुणाच्याही मनात शंका राहिलेली नव्हती.

जवळपास 30 लाख व्हिएतनामी नागरिक युद्धात मारले गेले होते. त्यांतले बहुतेक सगळे अमेरिकी हवाईदलाने केलेल्या बॉम्बफेकीचे बळी ठरले होते. शेकडो गावे उद्‌ध्वस्त झाली होती. मानवी अत्याचाराने परिसीमा गाठली होती, तरीही या घनघोर संघर्षात युद्ध जिंकण्याच्या मार्गावर व्हिएतनाम होते. एक आशा जिवंत होती आणि युद्धविरोधी संदेश देण्यासाठीचे प्रभावी माध्यम वृत्तपत्र ठरले होते. सबंध जग अमेरिकी अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि उद्दाम अमेरिकी सत्तेच्या विरोधात उभे ठाकले होते. विचारांची लढाई अमेरिकेतले प्रस्थापित हरले होते. निक्सन यांच्यापुढे राजीनामा देण्यावाचून पर्याय उरला नव्हता, तसा तो त्यांनी 9 ऑगस्ट 1974 रोजी दिला होता. इथून पुढे आठ महिन्यांनी म्हणजेच 30 एप्रिल 1975 रोजी अमेरिकेने व्हिएतनाममधून माघार घेत मानहानिकारक पराभव स्वीकारला होता.

पुढचा दिवस 1 मे... आंतरराष्ट्रीय कामगारदिन आणि व्हिएतनाम मुक्तीचा दिन म्हणून जुळून आला होता. ही घटना आम्हा सगळ्यांसाठी विलक्षण प्रेरणादायी ठरली होती. आमचा हा विश्वास होता की, याच आठवड्यात 30 वर्षांपूर्वी नाझी विचारसरणीचा झाला, तसा हा विचारांचा ऐतिहासिक विजय होता.

हिटलरने 30 एप्रिल, 1945 या दिवशी आत्महत्या केली होती, तर 30 वर्षांनी याच दिवशी अमेरिकी सैन्याला व्हिएतनाम सोडणे भाग पडले होते; सामान्य व्हिएतनामी नागरिकांनी 1953 मध्ये बलाढ्य अशा फ्रेंच लष्कराला पराभव पत्करण्यास भाग पाडले होते. परंतु याचीही त्या वेळी त्यांना जाणीव झाली होती की, अस्तित्वाचा त्यांचा लढा संपलेला नव्हता. कारण, फ्रेंचांनी माघार घेतल्यानंतर त्यांची जागा अमेरिकी फौजांनी घेतली होती आणि साठच्या दशकापासून युद्धाच्या आगीत व्हिएतनाम होरपळू लागला होता.

सन 1945 ते 1975 अशा तीस वर्षांच्या युद्धसंघर्षानंतर नवा व्हिएतनाम जन्माला आला होता. मुक्तीनंतर 25 वर्षांनी मी व्हिएतनामला भेट दिली होती. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतचा हनोईपासून सायगावचा प्रदेश पालथा घातला होता. युद्धानंतर जन्माला आलेली पिढी वयाच्या विशी-तिशीत आलेली होती. देशात एक प्रकारची उत्फुल्लता आणि अधीरता जाणवत होती, त्याला कारणही तसेच होते. अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या आगमनाची व्हिएतनाम मोठ्या आतुरतेने प्रतीक्षा करत होता. व्हिएतनामी नागरिकांमध्ये अमेरिकेबद्दल जराही कटुता जाणवत नव्हती. व्हिएतनामी टीव्हीवर डिस्ने व हॉलीवुडचे चित्रपट दाखवले जात होते आणि आवडीने बघितलेही जात होते. त्या क्षणी मला त्याचे थोडेसे आश्चर्यही वाटले होते.

 आधीच्या पिढीने अनुभव घेतला असल्यामुळे व्हिएतनामी तरुणांना अमेरिकेने लादलेल्या युद्धाबद्दल थोडीफार माहिती होती; परंतु त्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव नव्हता आणि युद्धसंघर्षाशी जोडलेल्या आठवणीही नव्हत्या. कोणत्याही विकसनशील देशात असावीत तशी तिथली शाळकरी मुले दिसत होती. त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहून कुणालाही असे वाटले नसते की; यांच्या आधीच्या पिढीने जग बदलून टाकले होते, जगाचे राजकारण बदलले होते. त्याच भेटीत हनोई ते हो चि मिन्ह दरम्यानच्या रेल्वे प्रवासात मला एक मध्यमवयीन गृहस्थ भेटले. मी त्यांना युद्धादरम्यानच्या अनुभवाबद्दल विचारले. ते गृहस्थ त्या वेळी वयाच्या विशीत होते. त्यांनी रक्ताचे वाहते पाट बघितले होते. अमेरिकी विमानांतून पडणारे बॉम्ब आणि त्यानंतर लोकांचा होणारा आक्रोश, बेचिराख झालेले गाव... असे सारे अनुभवले होते.

तोडक्या-मोडक्या इंग्लिशमध्ये ते म्हणाले, ‘‘आम्ही भूतकाळात रमत नाही, तो सतत आठवत राहणेही योग्य नाही. आम्ही भविष्याचा वेध घेणे पसंत करतो. आम्हाला गतकाळातल्या वेदनादायी आठवणींमध्ये अडकून राहायचे नाही. काळ पुढे सरकलेला आहे. नव्या पिढीचा भविष्यकाळ उज्ज्वल आणि सुखद आठवणींनी भरलेला असणार आहे.’’ हा गृहस्थ कवी नव्हता, पत्रकार नव्हता किंवा तत्त्वज्ञही नव्हता; पण त्याने मला अंतर्मुख होण्यास भाग पाडले होते.

अनुवाद: शेखर देशमुख 

Tags: बाळ ठाकरे मुंबई मॅडम बिन्ह शेखर देशमुख कुमार केतकर व्हिएतनाम-व्हिएतनाम! मेरा नाम तेरा नाम दृष्टिक्षेप Bal Thakare Mumbai Madame Binhai Shekhar Deshmukh Kumar Ketkar Vietnam-Vietnam Mera nam Tera nam Drushtikshep weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कुमार केतकर
ketkarkumar@gmail.com

पत्रकार, माजी संपादक- लोकसत्ता, दिव्यमराठी, खासदार- राज्यसभा 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात