या पिढीला हे सर्व मिळाले ते गेल्या पाच-सात वर्षांत! आपल्या हातात जणू अल्लाउद्दीनचा दिवाच आला आहे आणि त्यातून जन्माला आलेला हा उदार व दयाळू राक्षस आता आपले सर्व प्रश्न सोडवील- नोकरीपासून छोकरीपर्यंत! अशा भ्रमाने या ‘युवा’वर आता गारूड केले आहे. परंतु अल्लाउद्दीनचा तो मदतशील राक्षस हां-हां म्हणता विद्रूप आणि काहीसा क्रूर व उग्र रूप धारण करू लागला.
सध्या अर्थशास्त्रज्ञ आणि विचारवंत मंडळी असे आवर्जून सांगत आहेत की, पुढील दशकात भारतातील तरुणांची संख्या जगात सर्वांत जास्त असेल. ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ म्हणजे लोकसंख्येतील हा लाभ देशाला प्रगतिपथावर नेईल- कदाचित चीनच्या बरोबरही आपण जाऊ शकू! याच काळात चीनमधील तरुणांची संख्या व एकूणच त्यांची लोकसंख्या ‘आटोक्यात’ राहील आणि भारत त्यातही पुढे जाईल. काही भाष्यकार तर पुढे जाऊन म्हणतात की, इतक्या मोठ्या प्रमाणावर श्रमशक्ती असलेला देश म्हणजे जगातील एक भव्य बाजारपेठ होईल. या बाजारशक्तीमुळे अवघे जग भारताकडे आकृष्ट होईल आणि भारत महासत्ता होण्याच्या दिशेने प्रवास सुरू करू शकेल!
संघ परिवार (आता मोदी परिवार!) असे मानतो की, भारतात पूर्वी जसा सोन्याचा धूर निघत असे, तशीच अचाट सुबत्ता भारताला प्राप्त होईल! विश्व हिंदू परिषदेच्या अध्वर्यूंना तर असे वाटते की, प्रत्येक हिंदू स्त्रीला दहा मुले (म्हणजे मुलगे!) व्हायला हवीत. पूर्वी ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ असा आशीर्वाद देत. आता विहिंपने त्या हिंदू स्त्रीला ‘दशपुत्रा सौभाग्यवती भव’ असा आदेश दिला आहे. प्रत्येक स्त्रीला दहा मुलगे झाले तर इतक्या मुलांना मुली कशा मिळणार आणि मुली मिळाल्या नाहीत तर त्या मुली पुढे ‘दशपुत्रा’ कशा होणार- या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे आहे का, हे माहीत नाही! एकूणच विहिंप नेत्यांनी अंकगणिताचा अभ्यास पुन्हा करण्याची गरज नक्की आहे. त्यात अजूनही एक मुद्दा आहे. सरसंघचालक मोहनराव भागवतांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्व जण ब्रह्मचारी किंवा ‘अर्ध-ब्रह्मचारी’ आहेत. परिवारातील अनेक जण विवाहविरहित राहावेत, असाही एक संकेत आहे. म्हणजे दर पुरुषामागे एक ‘बॅकलॉग’ तयार होत राहणार. कारण ते कोणत्याही स्त्रीला ‘दशपुत्रा’ होण्याचे पुण्य प्राप्त करू देणार नाहीत. आता जर असे ब्रह्मचर्य वा अर्ध- ब्रह्मचर्य व्रत पाळून देशातील श्रमशक्ती पुरविणारे तरुण व पर्यायाने बाजारशक्ती कशी निर्माण होणार? पुढील 56 महिन्यांत (साठ महिन्यांपैकी चार महिने पूर्ण झाले) या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील, अशी अपेक्षा आहे.
पण सरकारने ‘नियोजन आयोग’ बंद केला आहे. त्यांना ‘प्लॅनिंग कमिशन’ म्हणजे ‘फॅमिली प्लॅनिंग कमिशन’ वाटत होते की काय, माहीत नाही. पण तसा अभ्यास नियोजन आयोगच करू शकले असते. हे सर्व प्रश्न वरवर हास्यास्पद, अनाठायी वा निरर्थकही वाटू शकतील; पण तसे ते नाहीत. कारण युवाशक्ती प्रचंड प्रमाणात असेल; पण त्या युवाशक्तीला व्यवसाय, नोकरी, सेवाक्षेत्र उपलब्ध नसेल तर ती युवाशक्ती कशी भरकटू शकते, याची अनेक उदाहरणे जगभर आहेत. भारतातही बलात्काराचे वाढलेले प्रमाण, तरुणांच्या बहकलेल्या टोळ्यांचे धिंगाणे, सोशल मीडियाद्वारे सुरू झालेले सांस्कृतिक-राजकीय अराजक, गर्दचे वाढते प्रमाण ही सर्व चिन्हे समाजस्वास्थ्याला धोक्याची आहेत. बेफाम गाड्या चालविल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही तरुणांमध्येच जास्त आहे. कुटुंबांमध्ये वाढत असलेले तणाव आणि तरुणांचा मोठ्यांशी व अगदी शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी होत असलेला विसंवाद या सर्व गोष्टी पण चिंता वाटणाऱ्या आहेत. त्यामुळे एकूण लोकसंख्या वाढणे म्हणजे बाजारपेठ वाढून आर्थिक सुबत्ता येणे नव्हे आणि तरुणांची संख्या प्रचंड झाल्यामुळे श्रमशक्ती वाढून देश महासत्ता होणे नव्हे.
आता आपण या गेल्या 25 वर्षांत तारुण्यात आलेल्या पिढीकडे वळू या. पंचवीस वर्षांपूर्वी जन्माला आलेली मुले- मुली, म्हणजे 1989 मध्ये अवतरलेली पिढी. ही तरुण पिढी अजून 25 वर्षांनंतर 50 वर्षांची होईल; म्हणजेच ते सर्व जण त्या तथाकथित ‘डेमोग्राफिक डिव्हडंड’चा भाग असतील. म्हणजेच फक्त या 25 ते 50 वयोगटात देशाची जवळपास अर्धी लोकसंख्या तेव्हा म्हणजे 2029/30मध्ये असेल. त्यात त्या वेळेस 18 ते 25 वयोगटात असलेले तरुण एकत्र केले की देशाची सुमारे 65 टक्के लोकसंख्या 18 ते 50 वर्षे या वयोगटात असेल. तोपर्यंत प्रगत झालेल्या आरोग्यविज्ञानामुळे आयुष्यमान वाढलेले असेल आणि निवृत्ती वय 60 वरून 70 पर्यंत नेण्याची मागणी येईल. म्हणजे श्रमशक्तीचा विचार करताना 18 ते 70 वयोगटातील माणसांना अर्थकारणात आणावे लागेल.
परंतु, या अंकाचा विषय ‘युवा’ असल्यामुळे तोपर्यंत 18 ते 35 असलेली पिढी आणि आणखी 25 वर्षांनी त्या वयोगटात असलेली पिढी यांना डोळ्यांसमोर ठेवून ‘तरुण पिढीचे आजचे आणि उद्याचे योगदान’ याचा विचार करावा लागेल. या वेळच्या निवडणुकीत ‘तरुणाई’ आणि त्यांच्या आक्रमकपणे व्यक्त झालेल्या आशा-आकांक्षा- (विशेषत: फेसबुक, टि्वटर, व्हॉट्ज्ॲप इ. ‘सोशल मीडिया’मधून-) याचे प्रचंड स्तोम माजविले गेले. ‘सोशल मीडिया’ आणि ‘ड्रग ॲडिक्शन’ यात बरेच साम्य आहे. दोन्ही मुख्यत: व्यसने आहेत. दोन्हींचे आकर्षण मुख्यत: 15-16 व्या वर्षी (कधी कधी वयाच्या आठ ते बारा) लागते. आकर्षणाचे व्यसन व्हायला दोन वर्षे खूप झाली. गर्दच्या आहारी गेलेला/ गेलेली तरुणाई जशी नॅरकॉटिक न मिळाल्याने अस्वस्थ होतात, मनाने भरकटून जातात आणि कसेही करून ते ड्रग मिळविण्याचा प्रयत्न करतात; तसेच काहीसे ‘सोशल मीडिया’चे व्यसन झालेल्यांचे होते. ‘टचफोन मोबाइल’ गहाळ झालेल्यांची मन:स्थिती पाहिली आहे? त्यांना जणू आपण या जगातच नाही, असे वाटू लागते. आजूबाजूचे जग अर्थशून्य वाटू लागले. हातात सेल फोन नाही, फेसबुक ग्रुप नाहीत, व्हॉट्स्ॲप बघता येत नाही, एसएमएस करता येत नाही, कोणाशी बोलता येत नाही, कोणी आपल्याशी बोलू शकत नाही... गूगल सर्च करून प्रियंका चोप्रा कोणाशी लग्न करणार आहे, शाहरुखची नवी फिल्म कोणती, हे समजत नाही. त्याहीपेक्षा काही गंभीर व महत्त्वाचे मुद्देही असतात.
उदाहरणार्थ- हिंदूंवर हिंदुस्थानात कसा अन्याय होत आहे किंवा ब्राह्मणांची कशी कोंडी होत आहे किंवा मराठ्यांना रिझर्व्हेशन का द्यायला हवे किंवा दलितांना आता आरक्षणाची काय गरज आहे किंवा गांधीजींनी देशाला कसे अहिंसेच्या नावाखाली निकम्मा बनवले किंवा नेहरूंनी देशाचे कसे वाटोळे केले- असे अगोदरच उत्तरे माहीत असलेले किंवा उत्तरांची काय गरज असे प्रश्न तीच मते असणाऱ्यांच्या ग्रुपबरोबर ‘शेअर’ करण्यात वा ‘लाईक’ करण्यात इतका वेळ जातो की, काही चांगले, वाचनीय, गंभीर वा भविष्यवेधी वा ऐतिहासिक वाचायला वेळच मिळत नाही! खरे म्हणजे, तसे काही वाचण्याची गरजच काय?- हा तरी प्रश्न कुठे पडतो? तसा प्रश्न पडण्यासाठी लागणारे कुतूहल केव्हाच हरवून गेले आहे.
आता फक्त एकच महत्त्वाचा प्रश्न उरला आहेहरवलेला टचफोन कसा मिळवायचा आणि न मिळाल्यास नवा कधी घ्यायचा? हल्ली काय तीन-चार हजार रुपयांपासून तीस-चाळीस हजार रुपयांपर्यंत एकदम टॉप, विथ लेटेस्ट ॲप्स सेल मिळतात. प्रश्न उरतो की- गेलेला डेटा, मुख्यत: फोन नंबर्स, फोटो, सेल्फीज, जोक्स अशा गोष्टी परत कशा मिळवायच्या! इतक्या गंभीर समस्या भेडसावत असताना देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले, नेहरूंना नवभारताचे शिल्पकार का म्हणतात, देशाची स्वातंत्र्याच्या वेळची 35 कोटी लोकसंख्या आता 135 कोटी झाल्यावर कोणती नवी आव्हाने आहेत... अशा फालतू प्रश्नांकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे? तो नरेंद्र मोदी सगळे प्रश्न सोडवेल; देशाला काँग्रेसच्या, नेहरू-गांधींच्या शृंखलांमधून मुक्त करील; सेक्युलॅरिझमऐवजी प्राचीन व संपन्न हिंदू संस्कृती पुन:प्रस्थापित करून देशाला ‘हिंदुस्थान’ बनवील... मग कशाची चिंता आपण का करायची? कुणी तरी नरेंद्र दाभोलकर (हा कोण दुसरा नरेंद्र?) मेला, त्याच्या चांभारचौकशा कशाला करायच्या? आपल्यासमोर मूलभूत समस्या आहे गहाळ झालेला तो ॲन्ड्रॉईड फोन कसा मिळवायचा, ही!
बरोबर 10 वर्षांपूर्वी आजची 18 ते 25 वर्षांची तरुण मुले आठ ते 15 वयोगटात होती. त्यांच्याकडे मोबाइल फोन नव्हते, कारण ते महाग होते किंवा नेटवर्क इतके विशाल झाले नव्हते. फेसबुक म्हणजे काय हे कानावर पडत होते; पण सेलफोनच नाही, तर फेसबुक फॅसिलीटी असली काय आणि नसली काय! तेव्हा तर टि्वटर आणि व्हॉट्स् ॲप उदयालाच आले नव्हते. त्यामुळे या पिढीला हे सर्व मिळाले ते गेल्या पाच-सात वर्षांत! आपल्या हातात जणू अल्लाउद्दीनचा दिवाच आला आहे आणि त्यातून जन्माला आलेला हा उदार व दयाळू राक्षस आता आपले सर्व प्रश्न सोडवील- नोकरीपासून छोकरीपर्यंत!
अशा भ्रमाने या ‘युवा’वर आता गारूड केले आहे. परंतु अल्लाउद्दीनचा तो मदतशील राक्षस हां-हां म्हणता विद्रूप आणि काहीसा क्रूर व उग्र रूप धारण करू लागला. सुरुवातीला त्या राक्षसाकडे मागणी करण्यात गंमत होती. दिव्यातील तो राक्षसही मोठ्या आनंदाने मागू ते मिळवून द्यायचा. पण हळूहळू त्या उदार राक्षसाचीच बुद्धी फिरली. आता तो आदेश देऊ लागला आणि ही तरुणाई त्याच्या आदेशावर नाचू लागली. सेलफोनप्रमाणे दिवा हरवला आणि त्या राक्षसाने तरुणाईला व्यसनाचे गुलाम केले. आता दिव्यातील तो राक्षस हाच वेताळाप्रमाणे तमाम तरुणाच्या खांद्यावर बसून त्याला/तिला काहीही सांगू लागला. दिवा ऊर्फ सेल हरवलेला तरुण तो फोन परत मिळाल्यानंतरही त्या राक्षसाच्या पूर्ण आहारी गेला होता. त्या व्यसनामुळे स्वत:ची विचारशक्ती, विवेकबुद्धी, संवेदना आणि आपले माणूसपण हरवल्यामुळे स्वत:ची ओळख ऊर्फ आयडेंटिटीच्या शोधात असलेली ही पिढी स्वत:ला कधी हिंदू, कधी ब्राह्मण, कधी मराठा, कधी अन्य कुणी- इतकीच स्वत:ची ओळख देऊ लागली. इतिहासाचे संबंध हरवले, वर्तमानकाळ फोनप्रमाणे गहाळ झाले अन् भविष्य हरपले!
‘द्विटर’च्या 140 आद्याक्षरांपलीकडे विचार व्यक्त करण्याची क्षमता त्याबरोबर नाहीशी झाली. प्रत्यक्ष माणसांपेक्षा कधीही न पाहिलेली, न भेटलेली, न ओळखणारी माणसे आपल्या भावनिक जीवनात आपल्याला न विचारता घुसू लागली. खऱ्या माणसांऐवजी ही तथाकथित ‘व्हर्च्युअल’ माणसे आपल्याबरोबर ‘गरबा’ करू लागली. आपणही त्या गरब्यात धुंद होऊन केव्हा स्वत्व आणि अस्तित्व गमावून बसलो, हेही त्या तरुणाईला कळले नाही. या कोऱ्या होत चाललेल्या मनावर नरेंद्र मोदींनी केव्हा कब्जा केला, हेच या पिढीला कळले नाही. आता या धुंदीतून बाहेर आल्यावर जेव्हा खरे प्रश्न भेडसावतील; तेव्हा त्यांना सामोरे जाण्याची विचारक्षमता, संवेदनक्षमता आणि कुतूहल संपलेले असेल. पण ते ‘ॲडिक्शन’ एका तरुण पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे इतक्या वेगाने जात आहे की, आणखी 25 वर्षांनी काय होईल हे सांगणे कठीण आहे. विचार व संवेदना आणि सदसद्विवेकबुद्धी लयाला गेली की, उरते ते फक्त ‘युवा’पण! त्या रिक्त ‘युवा’ स्थितीत जन्माला येते हिंसा. मग त्या हिंसेचे रूप कधी होते उग्र बेदरकारीचे. खोट्या हिंदुत्ववादी, ब्राह्मणी, मराठा, दलित वा अन्य कुठच्या तरी आयडेंटिटीत मग भारतीयत्व लोप पावते.
सध्या आपण त्या विलक्षण टप्प्यात येऊन पोचलो आहोत. ‘युवा’ म्हणजे फक्त शहरी/ग्रामीण सुस्थित मध्यमवर्गीय तरुण नाही, वा त्या मध्यमवर्गाचे अनुकरण करण्यात मश्गूल झालेला उप-मध्यमवर्गीय वा गरीब वर्गातील तरुण नाही. हा ‘युवा’ जसा उग्र हिंदुत्ववादी होऊ शकतो, तसाच नक्षलवादीही होऊ शकतो, तमिळ अतिरेकी होऊ शकतो वा मुस्लिम अतिरेकीही होऊ शकतो. मराठी वा मराठा अभिमानी होऊ शकतो वा पंजाबमध्ये खलिस्तानीही होऊ शकतो.
आपली खरी ओळख हरवून टाकणाऱ्या त्या दिव्याने आणि त्या अल्लाउद्दीनच्या दिव्यातील राक्षसाने आपल्याला अस्तित्वहीन करून टाकले आहे. दोष त्या दिव्यातील राक्षसाचा नाही; आपला आहे.
Tags: कुमार केतकर युवा दिवाळी अंक तरुण youth kumar ketkar yuwa diwali ank weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या