डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अशी घटना 1995 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 26 डिसेंबरला घडली. बॉल फेकत असल्याच्या आरोपामुळे मुरलीला सातत्याने नोबॉल देण्याच्या त्या निर्णयाचे किती दूरगामी परिणाम होणार होते, हे फारच कमी जणांना त्या वेळेस लक्षात आले होते. या प्रकरणामुळे संपूर्ण श्रीलंकन राष्ट्र प्रक्षुब्ध झाले. मुरली आता एकटा नव्हता; त्याचे दु:ख, क्षोभ आणि बेचैनी सर्व देशाने आपली मानली. टीकाकारांनी काहीही म्हटले तरीही ज्या प्रकारे (ऑस्ट्रेलियात) अर्जुना आणि श्रीलंकन टीम मुरलीच्या पाठीशी उभी राहिली, त्यामुळे सर्व देशाला त्यांचा अभिमान वाटला.

माननीय अध्यक्ष,

इथे जमलेले प्रतिष्ठित नागरिक आणि सभ्य स्त्रीपुरुष हो...

मला 2011 चे कॉलिन कॉड्री भाषण देण्याची संधी दिल्याबद्दल मी सुरुवातीलाच एमसीसीचे आभार मानतो. हे भाषण द्यायला मिळणे, ही माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब आहे. विश्वचषक संपल्यानंतर मी भारतात असताना आमच्या संघव्यवस्थापकाने मला सांगितले की, ‘या वर्षीचे कॉलिन काँड्री लेक्चर तू देऊ शकशील काय, याबाबत CMJ ना मुझ्याशी बोलायचे आहे.’ मी सुरुवातीला त्याबाबत फारसा उत्सुक नव्हतो, कारण आम्ही त्या काळात इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका खेळणार होतो आणि मालिकेच्या मधेच हे भाषण द्यावे लागणार होते.

पण थोडा विचार केल्यावर माझ्या असे लक्षात आले की, हे आमंत्रण नाकारणे योग्य नव्हे. हे भाषण देणारा पहिलाच श्रीलंकन खेळाडू असणे ही केवळ माझ्या दृष्टीनेच नाही, तर माझ्या देशबांधवांच्या दृष्टीनेही अभिमानाची गोष्ट असणार होती. त्यानंतर मला माझा विषय निवडायचा होता. मला वाटते, तुम्ही असे गृहीत धरले असेल की, मी माझे भाषण सध्या ज्यावर खूपच उत्साहाने चर्चा होते आहे अशा विषयांवर देईन. उदा : तंत्रज्ञानाचे खेळातील स्थान, खेळाचे व्यवस्थापन, कसोटी क्रिकेटचे भवितव्य, क्रिकेटमधील भ्रष्टाचार- त्यातही स्पॉट फिक्सिंगचा शाप इत्यादी.

मित्रहो, हे सर्वच विषय महत्त्वाचे आहेत आणि मला खात्री आहे की, क्रिकेट खेळाबद्दल प्रचंड आस्था असणाऱ्या आणि या खेळातील एक लीजंड मानल्या जाणाऱ्या कॉलिन काँड्री यांचीही या विषयांबाबत अतिशय ठाम अशी काही मते असू शकली असती. आणि माझीही तशीच काही मते आहेत, हे मला इथे नोंदवणे आवश्यक वाटते. म्हणजे मला असे अतिशय प्रकर्षाने वाटते की, आपण क्रिकेट खेळाच्या इतिहासात एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. यापुढे आपण कसोटी क्रिकेट टिकवले नाही, तंत्रज्ञानाला उत्साहाने स्वीकारले नाही, खेळाच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनाला क्षुद्र-स्वार्थी हेतूंपासून वाचवले नाही आणि अतिशय कठोरपणे भ्रष्टाचार उखडून टाकला नाही; तर क्रिकेटचे भवितव्य अनिश्चित आहे.

पण मित्रहो, हे सर्व विषय अतिशय इंटरेस्टिंग असले तरी मला एक वेगळीच गोष्ट- श्रीलंकन क्रिकेटची गोष्ट- सांगायची आहे. एका अशा प्रवासाची गोष्ट- जी ऐकण्यात कॉलिनलाही खूपच रस वाटला असता. कारण  जगातल्या इतर कोणत्याही देशापेक्षा श्रीलंकेत ‘क्रिकेट’ या खेळाचे पोटेन्शियल केवळ एक खेळ असे राहिलेले नसून, त्यापेक्षा अधिक काही आहे, असे मला तीव्रतेने वाटते.  त्यामुळे हे भाषण क्रिकेटच्या स्पिरिटविषयी आहे आणि मला वाटते, त्या दृष्टीने पहिले तर श्रीलंकन क्रिकेटची गोष्ट अतिशय भुरळ पाडणारी आहे. श्रीलंकेत आता क्रिकेटचे स्थान केवळ एक खेळ म्हणून नाही, तर आनंद देणारा व लोकांना एकत्र आणणारा एक घटक असे बनले आहे. आता आमच्या समाजात त्याला उत्सवाचे स्थान प्राप्त झाले आहे इतका महत्त्वाचा हा खेळ झाला आहे.  

इतर देशांच्या तुलनेत अगदी अलीकडे आम्हाला परिचित झालेला हा खेळ आमचा राष्ट्रीय ध्यास कसा बनला, ही अतिशय उल्लेखनीय अशी गोष्ट आहे. आम्ही अक्षरशः वेडे होऊन, अतिशय प्रेमाने हा खेळ खेळतो आणि त्याला फॉलो करतो. हा खेळ माझ्या देशातील दैनंदिन जनजीवन ठप्प करतो. एवढेच नाही तर युद्ध आणि राजकारण यांच्या सीमारेषा ओलांडून पलीकडे जाण्याचे सामर्थ्य क्रिकेटमध्ये आहे. त्यामुळे मी असे ठरवले आहे की, मी आज श्रीलंकन क्रिकेटच्या स्पिरिटविषयी तुमच्याशी बोलावे.

श्रीलंकेचा इतिहास

सभ्य स्त्री-पुरुष हो,

माझ्या देशाचा इतिहास अडीच हजार वर्षांपेक्षा जुना आहे. हिंदी महासागरात अतिशय मोक्याच्या जागी वसलेले श्रीलंका नावाचे बेट जगाच्या आकर्षणाचा विषय पूर्वीपासून राहिलेले आहे. त्यामुळे आम्हाला काही फायदे आणि काही तोटेही झाले आहेत. श्रीलंका हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आणि नैसर्गिक साधन-संपत्तीने समृद्ध असा देश असून येथील लोक अतिशय संवेदनशील, उत्साहाने भारलेले आणि अगत्यशील आहेत. आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन घडवण्यात अंतर्गत व बाह्य अशा दोन्ही पातळ्यांवरील अस्थिर राजकारणाचा मोठा वाटा आहे. आमच्या इतिहासात जसा शांततेचा आणि समृद्धीचा काळ आहे; तसा युद्ध, हिंसा आणि उद्‌ध्वस्तता यांचाही काळ आहे. या अनुभवामुळे श्रीलंकन लोक कणखर झाले असून त्यांनी दाखवून दिले आहे की, ते एका सहनशील आणि मानी समाजाचे घटक असून त्यांचे जीवनावर कमालीचे प्रेम आहे. श्रीलंकन समाज हा अतिशय घट्ट एकजूट असलेला समाज आहे. ‘कुटुंब’ या घटकाचे सामर्थ्य आमच्या

समाजाचे स्पिरिट दाखवते. आम्ही चौकस आणि आनंदी माणसे असून, कठीण प्रसंगातसुद्धा सदैव हसत राहणारे आणि समृद्धीच्या काळात अतिशय उत्फुल्लपणे (जीवन) साजरे करणारे लोक आहोत. आम्ही उद्यासाठी नाही, तर पूर्णपणे ‘आजसाठी’ जगतो. आमच्या संस्कृतीचा आणि वारशाचा आम्हाला खूप अभिमान असून, सामान्य श्रीलंकन नागरिक त्याच्या आधारावर अतिशय ताठपणे उभा आहे. चारशे वर्षांहून अधिक काळातील पोर्तुगीज, डच व ब्रिटिश वसाहतावादालासुद्धा आमची दुर्दम्य इच्छाशक्ती मोडून काढण्यात किंवा त्यात काही बदल घडवून आणण्यात अपयश आले आहे; पण आमच्या नजीकच्या इतिहासावर व समाजावर ब्रिटिशांकडून आलेल्या क्रिकेटने टाकलेला प्रभाव आश्चर्यकारक आणि आवर्जून नोंद घ्यावी असाच आहे. श्रीलंकन लोकांनी आपल्या समाजाचे पाश्चात्त्यीकरण होण्याला शेकडो वर्षे विरोध केला; काही वेळा तर पाश्चात्त्य संस्कृती आणि प्रभावाला सरसकटपणे अनिष्ट व समाजविघातक असे संबोधले. पण आमच्या पाश्चात्त्यविरोधातूनसुद्धा क्रिकेट कसे तरी निसटले आणि आता ब्रिटिश वसाहतावादाची सर्वांत महत्त्वाची देणगी म्हणून त्याकडे आम्ही पाहतो.

श्रीलंकन क्रिकेटची पाळेमुळे

कॉलिन काँड्री आणि श्रीलंका यांच्या क्रिकेटप्रेमाचे मूळ एकच आहे- चहा. कॉलिनचे वडील अर्नेस्ट हे भारतात चहाच्या मळ्यांचे मालक होते. जरी कॉलिनचे शिक्षण इंग्लंडमध्ये झालेले असले तरी मला असे सांगण्यात आले आहे की, कॉलिन त्या मळ्यांमध्ये त्याच्याहून वयाने अनेक वर्षे मोठ्या असलेल्या भारतीय मुलांशी क्रिकेट खेळत असे...

श्रीलंकेत 1796 पासून पुढे दिडशे वर्षे ब्रिटिश राजवटीचा कालखंड होता. या काळात कॉलिनच्या वडिलांसारख्या चहामळेवाल्यांनी श्रीलंकेत क्रिकेट आणले. वसाहतवादी ब्रिटिश सरकारने श्रीलंकेत ख्रिश्चन मिशनऱ्यांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याची जबाबदारी दिली होती, त्यामुळे श्रीलंकेत क्रिकेट रुजवण्याचे खरे श्रेय मिशनऱ्यांना दिले पाहिजे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत अनेक श्रीलंकन कुटुंबे वसाहतवादी सरकारने दिलेल्या व्यापारी संधींचा फायदा घेऊन श्रीमंत झाली होती. परंतु या कुटुंबांना अतिशय कर्मठ अशा जातिव्यवस्थेमुळे कोणतेही उच्च सामाजिक स्थान मिळू शकले नाही. जातिव्यवस्थेमुळे तुम्ही ज्या जातीत जन्माला येता, त्याच जातीत आयुष्यभर राहावे लागते. या जाचातून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे, ब्रिटिश राजघराण्याशी एकनिष्ठ राहणे आणि वसाहतवादी शासनाला मदत करणे हा होता.

समोर दिसणाऱ्या या संधीचा फायदा घेऊन मिशनऱ्यांनी सर्व जाती-वंश आणि धर्माच्या लोकांसाठी भरपूर फी द्यावी लागेल अशा इंग्रजी शाळा मुख्यतः कोलंबोमध्ये उघडल्या. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत या शैक्षणिक संस्थामध्ये क्रिकेट अगदी सहजपणे येऊन स्थिरावले होते. कारण हा खेळ ब्रिटिश जीवनपद्धतीचा अविभाज्य घटक होता. त्याविषयी (प्रसिद्ध क्रिकेट लेखक) नेव्हिल काडर्‌स असे म्हणतो की, ‘क्रिकेटशिवाय त्या भूमीत उन्हाळा असूच शकत नाही.’ क्रिकेटला खेळाची मैदाने, खेळाचे साहित्य आणि प्रशिक्षक यांची गरज भासत असल्याने हा खेळ महागडा होता. ब्रिटिश मिशनऱ्यांनी काही शाळांना या सुविधा पुरवल्या. त्यामुळे या इंग्रजी शाळांमध्ये क्रिकेट फारच लवकर लोकप्रिय झाले. मात्र बहुसंख्य श्रीलंकन जनतेला क्रिकेट हे त्यांच्या आवाक्याबाहेरील वाटत होते, कारण तो खेळ श्रीमंतांच्या काही खास शाळांमध्येच खेळला जात असे.

काळाच्या ओघात मिशनऱ्यांनी आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा भरवल्या. त्यांना वृत्तपत्रांतून प्रसिद्धी मिळू लागली. त्यामुळे क्रिकेटचा खेळ सुट्टीच्या दिवशीचा एक लोकप्रिय ‘सोशल इव्हेंट’ बनला. त्या काळी वर्तमानपत्रांतून देशातील क्रिकेट स्पर्धांचे आणि इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटचे वार्तांकन केले जायचे. त्यामुळे शालेय क्रिकेट खेळणारी मुलेसुद्धा घरोघरी माहितीची झाली होती. त्यामुळे असे अनेकदा म्हटले जात असे की, इंग्लिश लोकांपेक्षा कौंटी क्रिकेटची जास्त माहिती श्रीलंकन लोकांना असते!

महागड्या शाळांमधून बाहेर पडणाऱ्या या मुलांसाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीस क्रिकेट क्लब्जची स्थापना केली गेली. या क्लब्जची नावेसुद्धा जनसमूहांवर आधारलेली होती. उदा. सिंहली स्पोर्ट्स क्लब, तमिळ युनियन, बर्घर रिक्रिएशन, द मूर क्लब इत्यादी. पण  एकत्रितपणे विचार केला तर असे दिसते की, ते सर्व इंग्रजी संस्कृतीत मुरलेले क्लब्ज होते. या विविध क्लब्जमध्ये केवळ मनोरंजनासाठी सामने खेळले जात असत. पण क्लब क्रिकेटमुळे स्थानिक उच्चभ्रूंना ब्रिटिशांमध्ये मिसळण्याची संधी मिळाली. परिणामी, 1948 मध्ये ब्रिटिशांनी देशाला स्वातंत्र्य दिले, तेव्हा क्रिकेट ही उच्चभ्रूंची आवड मागे राहिली. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हा इंग्रजाळलेला वर्ग संख्येने कमी असला तरी पाश्चिमात्यांच्या बाजूला झुकलेला असल्याने राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा होता. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर लगेचच झालेल्या निवडणुकांमध्ये उच्चभ्रूंचे हितसंबंध जपणारे सरकार अस्तित्वात आले.

लक्षात घ्या, आमचे पहिले तीन पंतप्रधान हे उच्चभ्रूंच्या कॉलेजात शिकलेले, क्रिकेट खेळलेले आणि सिंहली स्पोर्ट्स क्लबचे सदस्य होते. सन 1960 ते 1981 या काळात श्रीलंकेत क्रिकेटची लोकप्रियता हळूहळू वाढत गेली. आणि याच काळात श्रीलंकेतील राजकीय सत्तादेखील इंग्रजाळलेल्या उच्चभ्रू वर्गाकडून नव्याने उदयाला येत असलेल्या समाजवादी व राष्ट्रवादी गटांकडे हस्तांतरित होत गेली. 1965 मध्ये श्रीलंकेला आयसीसीने सहसदस्य बनवले. त्यामुळे मायकेल टिसेरा आणि अनुरा तेनाकून यांसारख्या खेळाडूंना अनधिकृत कसोटी सामने खेळायची संधी मिळाली. त्यांनी आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फलंदाजापेक्षा कुठेही कमी नाही, अशी छाप पाडली होती. 1981 मध्ये गामिनी दिसानायके यांच्या प्रयत्नांमुळे आयसीसीने श्रीलंकेला अधिकृत कसोटी देशाचा दर्जा दिला. त्यानंतरचे दीड दशक आमच्या क्रिकेटच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा काळ होता. कारण याच काळात क्रिकेटचे स्वरूप उच्चभ्रूंचा खेळ ते सर्वसामान्यांचा खेळ असे पालटत गेले.

वांशिक दंगली आणि रक्तरंजित संघर्ष

माझ्या बालपणीचा एक अतिशय महत्त्वाचा प्रसंग. मला तसा नीट आठवत नाही. मी तेव्हा फक्त पाच वर्षांचा होतो यामुळे असेल किंवा कदाचित आमच्या संवादात हा विषय येत नसल्यामुळे असेल; पण 1980 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तरेतील बंडखोरीने पूर्णपणे यादवी युद्धाचे स्वरूप धारण केले. आणि पुढील तीस वर्षे ही यादवी चालू राहिली. सन 1983 च्या रक्तरंजित वांशिक दंगली आणि तरुणांमधील अतिशय हिंसक कम्युनिस्ट बंडखोरी यामुळे माझ्या बालपणीच्या आठवणींवर व सर्व श्रीलंकन लोकांच्या आयुष्यावर कायमची गडद सावली पडली. आता मागे वळून पाहताना 1983 च्या दंगलींची भीषणता लक्षात येते; परंतु वयाची सहा वर्षेदेखील पूर्ण न केलेल्या मुलासाठी (माझ्यासाठी) मात्र तो काळ दिवसभर खेळण्याचा आणि मजा करण्याचा होता. मी हे अजिबात गमतीने बोलत नाहीये. कारण आमच्या आसपासच्या साधारण 35 तमिळ मित्रांनी आमच्या घरी आसरा घेतला होता. त्यांना राजकीय दृष्ट्या प्रेरित झालेल्या गुंडांपासून संरक्षण हवे होते आणि माझ्या वडिलांनी मोठा धोका पत्करून इतर विविध वंशांच्या अनेक धाडसी श्रीलंकन लोकांप्रमाणेच, आपल्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी (तमिळ लोकांसाठी) उघडले होते.

माझ्यासाठी मात्र हा असा काळ होता, जेव्हा माझे सर्व मित्र मला दिवसभर खेळण्यासाठी उपलब्ध होते. शाळा बंद होत्या आणि आम्ही घराच्या मागच्या बाजूला क्रिकेट, फुटबॉल, राउंडर्स तासन्‌तास खेळत असू. एका मुलाचे स्वप्न प्रत्यक्षात आल्यासारखेच होते हे. मला आठवते की, जेव्हा माझे आई-वडील आमचा खेळ अतिशय घाई-गडबडीने थांबवत असत आणि आम्हाला घराच्या आत वरच्या मजल्यावर बोलावून शांत बसायला सांगत, तेव्हा मला अतिशय राग येत असे. कारण तेव्हा आमच्या वस्तीतील इतर घरांची झडती गुंड घेत असायचे. ते गुंड आमच्या घरी आले असते आणि आमचे मित्र सापडले असते, तर काय भयानक प्रसंग ओढवला असता याची मला तेव्हा पुसटशीही जाणीव नव्हती.

अगदी अडीकडे माझ्या वडिलांनी मला अशी आठवण सांगितली की, त्या काळात मी एकदा त्यांना अतिशय भाबडेपणे असे विचारले होते की- हे दर वर्षी असेच होणार आहे का? कारण माझे सर्व मित्र आपल्या घरी राहायला येणे, ही माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट आहे.

सन 1980 च्या दशकाच्या शेवटच्या काळात जेव्हीपीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली कम्युनिस्ट बंडखोरीदेखील तितकीच भयानक होती. त्यांच्यामुळे शाळा, दुकाने आणि विद्यापीठे बंद होत असत. संध्याकाळी लोक क्वचितच बाहेर पडत असत. जळणारी प्रेते आणि नदीच्या पाण्यावर तरंगणारे मृतदेह हे दृश्य तर नेहमीचे झाले होते. जेव्हीपीचे आदेश धुडकावून लावणाऱ्या लोकांना भयावह परिणामांना सामोरे जावे लागत असे. जेव्हीपीवाल्यांनी एकदा सर्व शाळांतील मुलांना बाहेर काढून जेव्हीपीच्या समर्थनार्थ मोर्चा काढायला लावला होता. सुदैवाने मी ट्रिनिटी कॉलेजात होतो आणि जेव्हीपीचे आदेश न पाळणाऱ्या अतिशय थोड्या कॉलेजांपैकी ते एक होते. आमचे घर धर्मराजा कॉलेजच्या खालीच होते. तिथल्या विद्यार्थ्यांनी असा मोर्चा काढला आणि त्यांना अश्रुधुराचा सामना करावा लागला. त्यांच्यापैकी अनेक जण डोळे चोळत डोळे धुण्यासाठी आमच्या बागेतील नळाकडे धावत येत होते, हे मी पाहिल्याचे मला स्मरते.

डी.एच.डिसिल्वा हे माझे क्रिकेटचे पहिले गुरू. ते स्वभावाने अतिशय चांगले गृहस्थ होते. मुलांना क्रिकेट आणि टेनिसचे प्रशिक्षण ते मोफत देत असत. त्यांना बंडखोरांनी टेनिस कोर्टवर गोळ्या घातल्या होत्या. त्यांच्या पोटात दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर बंडखोरांनी गोळ्या घालायला आणलेली बंदूक त्यांच्या डोक्याजवळ नेताच जाम झाल्याने ते अतिशय आश्चर्यकारकरीत्या बचावले होते. इतर अनेकांप्रमाणे त्या काळात आणि नंतरही श्रीलंका सोडून गेलेल्या लोकांपैकी ते एक होते. नंतर ते ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. जसजसा काळ लोटला तसतसे उत्तर आणि पूर्वेतील संघर्षाने पूर्ण युद्धाचे स्वरूप धारण केले. श्रीलंकन सरकार दहशतवादी एलटीटीईशी लढत होते. या युद्धामुळे आमचा विकास अनेक दशके रखडला.

युद्धामुळे आमच्या पूर्ण देशावर अनेक प्रकारचे परिणाम झाले. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांनी देशासाठी मोठा त्याग केला. त्या कुटुंबांतून आलेले हजारो तरुण-तरुणी देशासाठी लढताना शहीद झाले. युद्धभूमीपासून लांब असलेल्या राजधानी कोलंबोमध्येही मोठी वाहने आणि आत्मघातकी पथके यांद्वारे होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे छावणीसदृश वातावरण नेहमीच असायचे. सार्वजनिक ठिकाणी सामान्य नागरिक आणि राजकीय महत्त्वाच्या व्यक्ती यांना लक्ष्य केले जाणारे बॉम्बहल्ले, हे श्रीलंकेतील जीवनाचे एक व्यवच्छेदक लक्षण बनले होते. कामावर जाणारे आई- वडील एकत्र न जाता वेगवेगळे जात असत; कारण त्यांच्यापैकी कोणी एक जर मारला गेला, तर दुसरी व्यक्ती कुटुंबाची काळजी घेऊ शकेल.

राजकारण, युद्ध आणि सत्ता यांविषयी जनतेचा भ्रमनिरास झाला होता. अनिश्चित भवितव्याविषयी लोकांना भीती वाटायला लागली होती. हिंसेचे चक्र कधी थांबणारच नाही, असे वाटत होते. श्रीलंकेची ओळख युद्ध आणि संघर्ष यासाठीच होऊ लागली होती. अशा या अंधाऱ्या काळात देशाला काहीएका प्रेरणेची गरज होती, ज्यामुळे आमची निराशा दूर होईल. आम्ही एक असलो तर आमच्या क्षमतांद्वारे काय करू शकतो, हे दाखवून देऊ शकू- अशा एका चमत्काराची गरज होती. ती प्रेरणा आम्हाला 1996 मध्ये मिळाली.

आयडेंटिटी क्रायसिस

श्रीलंकेने 1995 पूर्वीच्या काळात अनेक चांगले क्रिकेटपटू तयार केले, परंतु खेळ कसा खेळावा याबाबतच्या जुन्या वसाहतवादी मानसिकतेमधून तोपर्यंत आम्ही बाहेर पडलो नव्हतो.

कसोटी क्रिकेटचा दर्जा 1981 मध्ये मिळूनसुद्धा श्रीलंकन क्रिकेट आयडेंटिटी क्रायसिसमध्ये होते आणि ज्या प्रकारे आम्ही आमचा खेळ खेळत होतो ते पाहता, त्याच्यात फारच कमी असा ‘श्रीलंकन’ भाग होता. अर्थात, या नियमाला अपवादसुद्धा होते. मैदानावर आणि मैदानाबाहेरही रंगेल असलेला सदाशिवम नावाचा एक खेळाडू होता. त्याच्याविषयी बरेच बोलले जात असे. असे म्हणत असत की, त्याच्या हातात बॅटही जादूच्या कांडीप्रमाणे वाटते. सध्या आमच्या निवड समितीचे प्रमुख असलेले दुलीप मेंडिस हेसुद्धा अतिशय महत्त्वाचे खेळाडू होते. त्यांच्या खेळात रोमांचक असा साहसीपणा होता. परंतु असे काही अपवाद वगळले तर सर्वसाधारणपणे आम्ही जुन्या, पारंपरिक पद्धतीने क्रिकेट खेळत असू. आता आमची ओळख बनलेला ‘आत्ताचा विचार करा आणि हैप्पी गो लकी  असा दृष्टिकोन त्यावेळी नव्हता.

आमच्याकडे स्पर्धेत टिकू शकेल अशी टीम होती, क्षमता असलेले खेळाडू होते; तरीही आम्ही सौम्य, भित्रे होतो. आमचा एक खेळाडू म्हणून आणि एक टीम म्हणून आमच्याच क्षमतेवर विश्वास नव्हता. मला वाटते, आम्ही तेव्हा सुरुवातीच्या काळातील वेस्ट इंडीज क्रिकेट टीम्सप्रमाणे होतो : केलिप्सो क्रिकेटर्स, म्हणजे मनोरंजनासाठी खेळणारे आणि अनेकदा अतिशय ग्रेसफुली हरणारे. आम्हाला एका नेत्याची/कप्तानाची गरज होती.

असा कप्तान- जो सामान्य जनतेतून आलेला असेल, ज्याच्याकडे स्वत:च्या क्षमता आणि चारित्र्य असेल, ज्याच्याकडे व्यवस्था बदलण्याचे धैर्य असेल, प्रतिकूल परिस्थितीत ताठ उभे राहण्याचे धैर्य असेल, काही मोठ्या ध्येयासाठी स्वतः पुढाकार घेण्याची तयारी असेल. असा अतिशय गरजेचा नेता अर्जुना रणतुंगा याच्या रूपाने आम्हाला मिळाला. रणतुंगा अतिशय गुणवान आणि थोडासा लठ्ठ होता. त्याने आमच्या देशातील क्रिकेटचा चेहरा-मोहराच बदलला. आमचे प्रेम असलेल्या या खेळला त्याने दोन कोटी श्रीलंकन जनतेच्या मनातील एक ‘पॅशन’ बनवून टाकले. ज्याप्रमाणे लोक स्वत:च्या स्वप्नांवर प्रेम करतात, त्याप्रमाणेच लोक क्रिकेटवर प्रेम करायला लागले.

अर्जुनाचे नेतृत्व

आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाची टीम म्हणून उदयाला येऊ शकलो, याचे कारण त्या काळातील अर्जुनाचे नेतृत्व. क्रिकेट खेळण्याच्या आमच्या वसाहतवादी मानसिकतेच्या जोखडातून आम्ही का मुक्त व्हायला हवे, हे अर्जुनाला नेमके माहीत होते. तसेच आमच्या मूल्यांवर आधारित ‘श्रीलंकन आयडेंटिटी’ तयार करायला हवी, याचीही त्याला जाणीव होती. अशी आयडेंटिटी- जी सर्वसामान्य श्रीलंकन क्रिकेटप्रेमींच्या खेळाविषयी असणाऱ्या भावना आणि उत्साह यामध्ये आपले सामर्थ्य शोधू शकेल.

‘आनंदा कॉलेज’मधून सिंहली स्पोर्ट्स क्लब (एसएससी) मध्ये येणे हा अर्जुनासाठी एक सांस्कृतिक धक्काच होता. कोलंबोतील सेंट थॉमस आणि रॉयल या दोन अतिशय उच्चभ्रू कॉलेजमधील मुलांचे त्या काळी एसएससीवर वर्चस्व होते. क्लबचे सदस्यत्व, व्यवस्थापन आणि टीमची निवड यावर या ‘एलिट’ कॉलेजांचे पूर्ण वर्चस्व असायचे. अर्जुनाने स्वतः अनेकदा हे सांगितले आहे की, त्याला हे सर्व वातावरण किती परके होते आणि इथे जुळवून घ्यायला त्याला कसा अन्‌ किती संघर्ष करावा लागला. क्लबच्या नेट्‌समध्ये सराव करणाऱ्या 15 वर्षीय अर्जुनाला पाहून त्याची क्लबच्या एका वरिष्ठ सदस्याने चौकशी केली. जेव्हा अर्जुनने त्याला सांगितले की, तो कोणतेही ग्लॅमर नसलेल्या ‘आनंदा कॉलेज’मधून आला आहे; तेव्हा त्या वरिष्ठ सदस्याने अर्जुनाच्या गुणांची दखल न घेताच त्याला सुनावले की, ‘आम्हाला या क्लबमध्ये कोणीही ‘सारोंग जोनीज’ नको आहेत.

पुढे अर्जुनाने केवळ एसएससीचे अनेक वर्षे नेतृत्वच केले असे नाही, तर या उच्चभ्रू शाळा-कॉलेजांचे तेथील वर्चस्व पूर्णपणे संपवून टाकले. आपल्या टीमला आत्मविश्वास देणे, ताठ कण्याने उभे राहायला शिकवणे, स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणे; जेणेकरून प्रतिस्पर्धी संघाच्या नजरेला नजर देण्याचा आणि त्यांच्या बरोबरीने उभे राहण्याचा आत्मविश्वास टीममध्ये येऊ शकेल, हे त्याने प्राधान्याने केले. स्पर्धेत कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता  उतरणे, त्रासदायक ठरू शकणाऱ्या परंपरांचा त्याग करणे आणि स्वत:ची श्रीलंकन आयडेंटिटी स्वीकारणे ही त्याची ध्येये होती.

त्याने अतिशय निर्भयपणे आणि निर्विवादपणे देशाचे नेतृत्व केले. परंतु तसे करताना तो अतिशय शांत आणि अविचल असायचा. त्यामुळे त्याच्यावर ‘कॅप्टन कूल’ असा शिक्का बसला. 1996 मध्ये विश्वविजेते होण्याच्या दिशेने जाण्यासाठी आवश्यक अशा सर्वांत मूलभूत आणि महत्त्वाच्या गोष्टीचा पाया अर्जुनाकडून घातला गेला होता. या थोड्याशा जाड्या आणि किंचित अनफिट डावखुऱ्या फलंदाजाद्वारा श्रीलंकेकडे पहिल्यांदाच असा एक जनरल उदयाला आला होता, ज्याने गुणवान सैनिक/ खेळाडू शोधण्यासाठी देशाच्या सर्व दिशांना नजर फिरवली होती.

वैशिट्यपूर्ण खेळाडूंचा शोध

आपल्याला इतर टीम्सच्या तुलनेत काही वेगळे करण्याची गरज आहे ही बाब  इतर कोणाहीपेक्षा अर्जुनाला जास्त चांगली माहित होती. त्यासाठी त्याने गुणवान खेळाडूंचा शोध सुरू केला. ज्यांच्या कौशल्याला अधिक धार लावली तर आपल्या खेळाने ते प्रतिस्पर्धी संघाची परीक्षा पाहतील, त्यांना पराभूत करतील. क्रिकेटमध्ये ‘टायमिंग’ला फार महत्त्व असते, हे श्रीलंकन संघाबाबतसुद्धा खरे ठरले.

आम्ही एक देश म्हणून सनथ जयसूर्या आणि मुथय्या मुरलीधरन यांच्या आई-वडिलांचे कायम ऋणी राहायला हवे. कारण जेव्हा देशातील क्रिकेटला सर्वाधिक गरज होती, तेव्हा नेमके हे दोघे ‘लीजंड्‌स’ देशासाठी खेळायला उपलब्ध होते. ‘मातारा’ येथून आलेला सनथ जयसूर्या अगदी सामान्य कुटुंबातील होता. अतिशय गुणवान असलेल्या सनथच्या गुणांना अजून योग्य दिशा मिळायची होती. ते एक असे रसायन होते- जे अर्जुनाच्या नेतृत्वाखाली येताच अशा पद्धतीने बहरले की, ज्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात जगातल्या सर्वाधिक आक्रमक खेळाडूंपैकी एक म्हणून सनथ ओळखला गेला. यापूर्वी असे काही पाहण्यात आले नव्हते आणि आता त्याच्या निवृत्तीनंतर परत कधी पाहायला मिळणारही नाही.

दुसऱ्या बाजूला, मुरलीधरन मात्र कँडीच्या डोंगराळ भागातल्या, पण त्यातल्या त्यात बऱ्या घरातून आला होता. त्याने आपली सुरुवात जरी फास्ट बॉलर म्हणून केली असली, तरी नंतर तो स्पिनकडे वळला. त्याच्या हातात एक नैसर्गिक व्यंग होते, ज्यामुळे विचारही करता येणार नाही अशा आश्चर्यकारक कोनातून बॉल वळवण्याची कला त्याला साध्य झाली होती. त्याने (बोटांनी केल्या जाणाऱ्या) ऑफस्पिनला मनगटी  स्पिनची जोड दिली. अर्जुनाची अतिशय गुणवान खेळाडूंनी भरलेली टीम तयार झाली होती; मात्र सुरुवातीला त्यांच्यात संघभावना पुरेशी नव्हती. कारण जरी 1996 चा विश्वचषक जिंकणे हे त्यांचे उद्दिष्ट होते, तरी त्यांना एकत्र आणू शकेल असा घटक सापडला नव्हता; ज्यामुळे खेळाडू एक होऊन संघभावनेने खेळतील, ज्यामुळे टीमकडे सर्वांचे लक्ष वेधले जाईल, ज्यामुळे संपूर्ण देशाचासुद्धा टीमला आणि तिच्या प्रवासाला पाठिंबा मिळू शकेल.

अशी घटना 1995 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 26 डिसेंबरला (‘बॉक्सिंग डे’) घडली. बॉल फेकत असल्याच्या आरोपामुळे मुरलीला सातत्याने नोबॉल देण्याच्या निर्णयाचे किती दूरगामी परिणाम होणार होते, हे फारच कमी जणांना त्या वेळेस लक्षात आले होते. या प्रकरणामुळे संपूर्ण श्रीलंकन राष्ट्र प्रक्षुब्ध झाले. मुरली आता एकटा नव्हता; त्याचे दु:ख, क्षोभ आणि बेचैनी सर्व देशाने आपली मानली. टीकाकारांनी काहीही म्हटले तरी ज्या प्रकारे (ऑस्ट्रेलियात) अर्जुना आणि श्रीलंकन टीम मुरलीच्या पाठीशी उभी राहिली, त्यामुळे सर्व देशाला त्यांचा अभिमान वाटला. त्या क्षणीच श्रीलंकेने या क्रिकेटपटूंना ‘आपली मुले’ किंवा ‘आपे कोलो’ मानले.

आणि मग श्रीलंकन क्रिकेटप्रेमींची टीमविषयीची सुरुवातीची तुटकपणाची भावना कुठल्या कुठे निघून गेली, त्याची जागा या 15 खेळाडूंविषयीच्या प्रेमाने घेतली. ते खेळाडू आमचे भाऊ आहेत, आमची मुले आहेत अशी भावना तयार झाली. श्रीलंका त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि त्यांच्या कठीण प्रसंगी, दु:खात सहभागी झाली. मेलबर्नमध्ये मुरलीला नोबॉल देण्याचा निर्णय सर्व श्रीलंकन जनतेसाठी एक अपमान होता, ज्याचा बदला घेणे जरुरीचे होते. हा एक असा कारक घटक होता, ज्यामुळे श्रीलंकन खेळाडूंनी अशक्य मानली जाणारी गोष्ट शक्य करून दाखवली, 1996 चा वर्ल्ड कप अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून श्रीलंकेने जिंकला. आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व मिळाल्यावर केवळ 14 वर्षांत श्रीलंकेने वर्ल्ड कप जिंकला होता.

इथे हे सांगणे आवश्यक आहे की, 1981 पूर्वी राष्ट्रीय स्तरावरील 80 टक्के श्रीलंकन खेळाडू हे उच्चभ्रू इंग्रजी शाळांमधून आलेले होते; आणि 1996 चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीममध्ये त्या शाळांमधून आलेला एकही खेळाडू नव्हता.

1996 च्या वर्ल्ड कपचा परिणाम

1996 च्या वर्ल्ड कप विजयाचा परिणाम देशावर फार मोठा होता. एका बाजूला खेळाची पाळेमुळे अधिक खोल रुजणे आणि दुसऱ्या बाजूला श्रीलंकेतील सर्व समूहांना एक समान अशी ‘पॅशन’ देणे- असा तो परिणाम होता. पहिल्यांदाच सरकारी शाळांमधील, दुर्गम प्रदेशांतील मुलांना क्रिकेट आपलेसे वाटायला लागले. क्रिकेटची दारे सर्वसामान्य जनतेला खुली झाली. त्यामुळे क्रिकेटमध्ये यापूर्वी संधी मिळू न शकलेल्या गुणवान खेळाडूंना एक्स्पोजर मिळाले; इतकेच नव्हे, तर त्यांना क्रिकेटच्या सर्वोच्च पातळीवर खेळता येण्याची शक्यताही निर्माण झाली. या तळागाळातील समूहांतून आलेल्या खेळाडूंनी सर्वसामान्य श्रीलंकन जीवनाची वैशिट्ये आपल्या खेळात आणली. त्यामुळे यापूर्वी मैदानावर कधीच न दिसलेला खेळण्यातील आनंद, जिंकण्याची पॅशन आणि   स्पर्धात्मकता दिसू लागली.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे स्वरूपच बदलून टाकणाऱ्या आणि खेळताना पुरेपूर श्रीलंकन वाटणाऱ्या सनथ जयसूर्या, कालुवितरणा, मुरलीधरन, अरविंद डिसिल्वा यांचा खेळ श्रीलंकेतील लहान मुलांनी, तरुणांनी पाहिला होता. आम्ही आता भित्रे, सॉफ्ट किंवा दुर्लक्ष करण्याजोगे राहिलो नव्हतो. आम्ही जगातील सर्वोत्तम संघांशी खेळून त्यांना हरवले होते. आम्ही कोणताही आव न आणता किंवा कोणतीही लाज न बाळगता यश मिळवले होते. आमच्या खेळात आमची राष्ट्रीय मूल्ये, परंपरा, संस्कृती यांचे केवळ प्रतिबिंबच पडले होते असे नव्हे, तर आम्ही ते साजरेही केले होते.

हे अशा प्रकारचे क्रिकेट होते, ज्याला आम्ही अतिशय अभिमानाने आमचे स्वतःचे म्हणू शकत होतो. आमच्या परंपरेतील जे-जे चांगले आहे, त्याचे दर्शन घडवणाऱ्या आमच्या या खेळात एक स्थानिक स्पिरिट होते. वर्ल्ड कप विजयामुळे आम्हाला समाजातील क्रिकेटपटू म्हणून असलेले आमचे स्थान समजून घेण्यास नवी ऊर्जा/सामर्थ्य मिळाले. वर्ल्ड कपमुळे देशाला एक नवी सुरुवात करता आली, ज्याच्या आधारे श्रीलंकेच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहता येतील.

वेगवेगळ्या वांशिक, धार्मिक पार्श्वभूमीतून आलेले हे 15 खेळाडू होते. त्यांना आपल्या वैयक्तिक अस्मितेचा अभिमान तर होताच; पण त्यांची केवळ एक टीम तयार झाली असे नव्हे, तर जणू काही त्यांचे एक कुटुंबच झाले होते. एका समान राष्ट्रीय ध्येयासाठी ते खेळत होते. सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूंनी खरे श्रीलंकन असणे म्हणजे नेमके काय असते, याचे एक अतिशय झळाळते उदाहरण घालून दिले होते. 1996 चा वर्ल्ड कप जिंकल्यामुळे सर्व श्रीलंकन लोकांना आनंदाचा आणि आशेचा एक समान बिंदू सापडला होता, जो आमच्या विभागल्या गेलेल्या समाजाला खरी राष्ट्रीय ओळख देऊ शकेल.

हाच बिंदू सर्व सामाजिक समस्यांवरचा एक रामबाण उपाय होता. भयानक नैसर्गिक आपत्ती आणि दुर्दैवी यादवी युद्ध यांच्या काळात क्रिकेटचा देशाला चांगलाच उपयोग झाला. 1996 च्या विजयामुळे लोकांना आपल्या देशाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची प्रेरणा मिळाली. दहशतवाद आणि राजकीय अस्थिरता यांच्या पलीकडे क्रिकेट गेले होते. ही एक अशी गोष्ट होती, जी प्रत्येक जण आपल्या हृदयात जपून ठेवू शकत होता. तिच्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यांच्या आयुष्याचा संघर्ष सहन करत पुढे जाता येत होते. वेगवेगळ्या धार्मिक-वांशिक पार्श्वभूमीतून आलेल्या खेळाडूंनी बनलेली, एकमेकांविषयीचे आणि देशाविषयीचे पॅशन-आनंद-प्रेम शेअर करणारी श्रीलंकन टीम ही श्रीलंकन समाज कसा असायला हवा याचे एक छोटे प्रतीकच बनली. श्रीलंकेत अंतर्गत युद्ध चालू असतानादेखील आम्ही खेळत होतो. श्रीलंकेची टीम हा सर्व समाजघटकांना एकत्र आणणारा घटक बनला होता.

विश्वविजेते असल्याचे आर्थिक परिणाम

त्या ऐतिहासिक विजयानंतर श्रीलंकेतील क्रिकेटमध्ये अक्षरशः क्रांतीच घडून आली. क्रिकेट बोर्डाच्या तिजोरीत  टीव्ही प्रक्षेपणाचा पैसा यायला लागला. क्रिकेटच्या स्पर्धा प्रायोजित करता याव्यात, यासाठी मोठ्या राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. राष्ट्रीय टीमसाठी खेळताना मिळणारा पैसा आणि जाहिराती या माध्यमातून खेळाडू चांगले उत्पन्न कमवायला लागले. जाहिरातीच्या फलकांवर, टीव्हीवरच्या जाहिरातीत क्रिकेटपटू पहिल्यांदाच झळकू लागले. सॉसेजपासून सेल्युलर फोनपर्यंतच्या वस्तूंसाठीच्या जाहिराती खेळाडूंना मिळाल्या. क्रिकेट हा एक चांगल्या करिअरचा ऑप्शन बनला. क्रिकेटपटू हे आयकॉन्स आणि रोलमॉडेल्स बनले.

वैयक्तिक दृष्ट्या पाहू जाता, तो विजय माझ्यासाठी फारच महत्त्वाचा होता. तेव्हा मी 18 वर्षांचा होतो आणि तोपर्यंत देशासाठी खेळायचा विचार मी कधीही केला नव्हता किंवा तशी स्वप्ने पाहिली नव्हती. मात्र मी जेव्हा श्रीलंकेला केनियाविरुद्ध प्रत्यक्ष खेळताना पाहिले, तेव्हा यात बदल झाला. ते माझे शाळेतील शेवटचे वर्ष होते. आणि जेव्हा मी सनथ जयसूर्या, गुरुसिंघे व अरविंदा यांना आक्रमक बॅटिंग करताना पाहिले, तेव्हा आपण क्रिकेट खेळायला हवे, या विचाराचे बीज माझ्या मेंदूत व हृदयात रोवले गेले. त्यानंतर दोन आठवड्यांनी लाहोरमध्ये श्रीलंका व ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना बघताना या बीजाला पूर्णस्वरूप द्यायचे, असे ठरले. त्या फायनलच्या वेळेस कोण कोठे होता, हे श्रीलंकेतील प्रत्येकाला अगदी नेमकेपणे आठवते.

त्यावेळी कोणताही बॉम्ब किंवा स्फोट देशातील सेलिब्रेशनवर पाणी ओतू शकत नव्हता. अशा प्रकारे, त्या दिवशी क्रिकेट हा आमच्या राष्ट्रीय मनोवृत्तीचा सर्वांत महत्त्वाचा आणि मूलभूत असा घटक बनला. आमच्या जीवनातील सर्व गोष्टी आमच्या क्रिकेटमध्ये होत्या. उदा. आमची सुख-दु:खे, आमचे आतिथ्य- शीलता, उदारपणा, संगीत, खाद्यसंस्कृती इत्यादी. युद्धाने उद्‌ध्वस्त झालेल्या देशासाठी क्रिकेट हा आशा, प्रेरणा आणि एक सुरळीत परिस्थिती आणणारा घटक बनला होता. विविध वंश आणि धर्म यांनी समृद्ध झालेल्या आमच्या संस्कृतीचे प्रतिबिंब क्रिकेटमध्ये पडले होते. क्षुद्र राजकारण आणि भेदाभेद याचा आमच्या क्रिकेटला तेव्हा तरी स्पर्श झालेला नव्हता. पण ही खरोखरच किती खेदाची गोष्ट आहे की, आयुष्य हे क्रिकेटसारखे नाही. तसे असते, तर विसरण्याजोग्या युद्धाच्या भळभळत्या जखमा अजूनही ताज्या राहिल्या नसत्या.

क्रिकेटपटूंवरील नव्या आणि मोठ्या जबाबदाऱ्या

1996 नंतरचे क्रिकेट आणि क्रिकेटपटूंचे नवे स्थान पाहता, श्रीलंकन खेळाडूंवर मैदानावर चांगले खेळण्याबरोबरच आणखी काही जबाबदारी येऊन पडली. आम्ही मैदानाबाहेर सकारात्मक वृत्तीने वावरणे आणि समाजासाठी काही करत राहणे आवश्यक होते. जे लोक आम्हाला खेळताना पाठिंबा देतात, त्यांच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणे गरजेचे होते. म्हणजे आम्ही केवळ मैदानावरच नव्हे, तर मैदानाबाहेरही लोकांना प्रेरणा देणे अपेक्षित होते. 2004 मध्ये हिंद महासागरावर आलेले त्सुनामीचे संकट ही अशी एक महत्त्वाची घटना होती. तिच्यामुळे झालेले नुकसान आणि मनुष्यहानी हा असा धक्का होता, जो आमच्या देशाला सहन करणे कठीण होते.

त्या दिवशी आम्ही न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मॅच खेळत होतो. आम्ही वाईट खेळ केला होता आणि ड्रेसिंग रूममध्ये निराश मन:स्थितीत बसलो असताना सनथचा फोन वाजू लागला. आलेला एसएमएस वाचून त्याने सांगितले की, मायदेशात काही तरी विचित्र घडले आहे. समुद्रातून आलेल्या प्रचंड लाटांच्या तडाख्याने काही विभागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला आम्ही फार चिंतेत नव्हतो. असे वाटत होते की, एखादी विचित्र लाट आल्याने असे झाले असेल. परंतु जेव्हा आम्ही हॉटेलवर परत आलो आणि टीव्हीवर बातम्या पहिल्या; तेव्हा एकूण परिस्थितीचा, उद्‌ध्वस्ततेचा अंदाज आम्हाला आला. किनारी प्रदेशात उसळलेल्या लाटा आणि काही क्षणात हजारो आयुष्ये होत्याची नव्हती करून टाकणाऱ्या त्या त्सुनामीचे टीव्हीवरील फूटेज पाहणे हा भीतीदायक अनुभव होता.

जे घडले होते, त्यावर आमचा विश्वासच बसेना. नेमकी परिस्थिती जाणून घ्यायला आम्ही घरी फोन केले. आम्ही विचारत होतो- हे खरे आहे का? आम्हाला असा प्रश्न पडला होता की, हे फोटो खरे कसे असू शकतात? आता आम्हाला काहीही करून घरी जायचे होते आणि आमच्या कुटुंबांसोबत, आमच्या लोकांसोबत उभे राहायचे होते. मला आठवते, आम्ही दौरा सोडून 31  डिसेंबरला रात्री कोलंबो विमानतळावर उतरलो. सर्वसाधारणपणे 31 डिसेंबरची रात्र ही कोलंबोमध्ये रोषणाईची, संगीताची, हसण्या-खिदळण्याची रात्र असते. परंतु त्या रात्री शहर सुनसान आणि अंधारे भासत होते. लोक नैराश्यात होते आणि दु:खाने शांत होते. आम्ही असा विचार करत होतो की, आता काय करता येईल? अशा वेळी मुरलीधरनने आम्हाला प्रेरणा दिली.

मुरलीला करिअरमध्ये सर्व बाजूंनी धक्के पचवावे लागले आहेत; परंतु तो असा खेळाडू आहे की, जो त्याची टीम आणि त्याचा देश यांच्या बाजूने कायम उभा राहिला. कोणताही विलंब न लावता मुरली त्याच्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मित्रांशी बोलला. केवळ काही दिवसांत (युनोच्या) वर्ल्ड फूड प्रोग्रामबरोबर त्याने भीषण हानी झालेल्या प्रदेशांसाठी आणि तेथील लोकांसाठी अनेक कंटेनर भरून अन्न, पाणी व कपडे इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची तरतूद केली. आश्चर्य म्हणजे, या वस्तूंचे वाटप करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना न देता मुरलीने स्वतः यात सहभागी व्हायचे ठरवले. माझ्या सुदैवाने त्याने मलासुद्धा या काळात त्याच्याबरोबर काम करण्याची संधी दिली. माझी पत्नी येहाली, महेला जयवर्धने, रुचिरा परेरा, आमचे फिजिओथेरपिस्ट सी.जे.क्लार्क आणि अनेक स्वयंसेवक यांच्याबरोबर मी मदत घेऊन जाणाऱ्या कंटेनर्सबरोबर प्रवास केला. त्या अनुभवाने मी एक व्यक्ती म्हणून आमूलाग्र बदललो.

आम्ही दम्बुलाच्या उत्तरेला असणाऱ्या पोलोन्नारुवा या गावी तळ ठोकला. तिथून आम्ही त्सुनामीने उद्‌ध्वस्त झालेल्या त्रिंकोमाली, बत्तिकलोआ या गावांत जायचो. तसेच नंतर दक्षिणेकडील गोल आणि हम्बनतोता यांसारख्या गावांनाही भेटी दिल्या. आम्ही श्रीलंकन लष्कर व एलटीटीई यांच्याद्वारे स्वतंत्रपणे आणि काही वेळा संयुक्तपणे चालवल्या जाणाऱ्या मदतकेंद्रांना भेटी  दिल्या. अतिशय कडवेपणे एकमेकांशी संघर्ष करणारे हे दोन गट (लष्कर आणि एलटीटीई) या आपत्तीच्या काळाने एकत्र आणले होते. प्रत्येक छावणीत त्सुनामीच्या तडाख्याने काय झाले आहे याची चिन्हे तरुण आणि वृद्ध यांच्या चेहऱ्यांवर आम्ही पाहत होतो. दु:खाने भरलेले पण रिकामे असे त्यांचे डोळे होते. लाटांच्या माऱ्यात उद्‌ध्वस्त झालेल्या आपल्या घराची, जवळच्या माणसांची आठवण तेवणारी ती नजर होती. इतके असूनसुद्धा आम्हा क्रिकेटपटूंसाठी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते.

त्रिन्कोमालीच्या दक्षिणेला असलेल्या किन्निया छावणीत आम्ही गेल्यावर सर्वस्व गमावलेल्या लोकांचा पहिला प्रश्न असा होता की, तुमची कुटुंबे सुरक्षित आहेत ना? सनथ जयसूर्या आणि उपुल चंदना या दोघांच्याही आया जखमी झाल्याचे त्यांनी ऐकले होते आणि त्या दोघांची तब्येत कशी आहे याची त्यांनी चौकशी केली. त्या लोकांनी स्वतःचे दु:ख मोठेही करून दाखवले नाही, की त्याच्यात ते बुडूनही गेले नाहीत. आपल्या सभोवतीच्या सर्वांसाठी त्यांची काळजी समान होती. आम्ही भेट दिलेल्या प्रत्येक छावणीत हाच अनुभव आला. अशा या उद्‌ध्वस्ततेत श्रीलंकन लोकांचे कधीही हार न मानण्याचे स्पिरिट, प्रेम, उदारता, सहानुभूती, आतिथ्यशीलता आणि सुसंस्कृतपणा झळाळून निघाला. आमच्या देशाच्या या अतिशय कठीण कालखंडात एकमेकांवरील प्रेमाने देश एकत्रपणे आणि समर्थपणे उभा राहिला.

या सर्वाचा अनुभव घेताना मी मनाशीच प्रतिज्ञा केली की, लोकांनी मला दिलेल्या विशेषाधिकारांचा (मैदानावर त्यांचे इतके प्रेम असलेल्या खेळाचे प्रतिनिधित्व करताना जो सन्मान आणि जी जबाबदारी माझ्यावर आहे तिचा) मी कधीही गैरवापर करणार नाही. लोकांनी क्रिकेटपटूंवर दाखवलेला विश्वास, त्यांनी आपल्या वैयक्तिक पातळीवर त्सुनामीच्या काळात केलेल्या मदतकार्यामुळे सार्थच ठरवला. इथेही मुरलीचे वेगळेपण उठून दिसते. त्याने त्याचा व्यवस्थापक कुशील गुणसेखरा याच्या मदतीने एक हजार घरांचे पुनर्निर्माण करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. (या अमेझिंग प्रकल्पाला एमसीसीचीसुद्धा मदत होती, हे मला माहीत आहे.)

दहशतवादी हल्ला

माझ्या सुदैवाने मला श्रीलंकेत असताना हिंसाचाराचा सामना कधीही करावा लागला नव्हता. त्या काळात आमच्याकडे इतके बॉम्बस्फोट झाले होते, पण मी कधीही चुकीच्या जागी चुकीच्या वेळी नव्हतो. कोलंबोमध्ये कधी तरी होणारे बॉम्बस्फोट वगळता आयुष्य नेहमीप्रमाणेच चालू असायचे. लोकांना प्रत्यक्ष युद्धापासून अलिप्त राहण्याची सोय होती. मुले शाळेत जायची, माणसे कामावर जायची, मी माझे क्रिकेट खेळत असायचो; परंतु देशाच्या इतर भागांत माणसे रोजच त्यांचे आयुष्य धोक्यात घालत होती. कोणी आपल्या मातृभूमीसाठी लढत होते, तर कोणी युद्धभूमीच्या जवळ राहत असल्याने स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत असायचे. त्यांच्यासाठी बंदुकीच्या गोळ्या, तोफगोळे, सुरुंग आणि ग्रेनेड्‌स यांपासून वाचणे ही जगण्याची पूर्वअट होती. या अनुभवाशी मी रिलेट होऊ शकायचो नाही. मला त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती होती; मात्र त्यांच्या अनुभवाशी रिलेट होता येईल, असा कोणताही अनुभव माझ्याकडे नव्हता. सन 2009 च्या पाकिस्तानच्या दौऱ्यानंतर हे सर्व बदलले.

आम्ही कराची आणि लाहोरमध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी गेलो होतो. कराचीतील पहिली मॅच काहीही विशेष न घडता सुरळीतपणे पार पडली. दुसरी टेस्टही त्याच दिशेने चालली होती. आम्ही आमच्या पहिल्या डावात भरपूर धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाच्या खेळासाठी आम्ही ग्राऊंडकडे निघालो होतो. ‘पाकिस्तानी टीमच्या बसची वाट न पाहता ग्राऊंडकडे जा’ असे आम्हाला सांगण्यात आले. तो दिवस आमच्या बॉलर्ससाठी अतिशय खडतर असेल, या अपेक्षेत आम्ही होतो. बसच्या मागच्या भागात आमचे बॉलर्स मोठ्या आवाजात तक्रारी करीत होते. मला आठवते, थिलन तुषारा तर जास्तच मोठ्या आवाजात बोलत होता की, त्याची पाठ आताच तुटायला आली आहे. त्याने असा जोक केला की, जर एखादा बॉम्बस्फोट झाला तर आपल्याला लाहोर सोडता येईल आणि घरी जाता येईल. त्यानंतर तीस सेकंदही झाले नसतील, आम्हाला फटाके फुटल्यासारखे आवाज ऐकू आले. अचानकपणे पुढून आवाज आला, ‘खाली पडा, आपल्या बसवर गोळीबार  होत आहे’. अगदी तातडीने आम्ही खाली झुकलो. प्रत्येकाने सीटच्या सुखरूप किंवा बसच्या मधल्या भागात जाऊन स्वत:ला कव्हर करण्याचा प्रयत्न केला. अगदी कमी जागा असल्याने आम्ही सगळे एकमेकांच्या अंगावर पडून होतो. त्यानंतर गोळ्या आत येऊ लागल्या. पत्र्याच्या छपरावर पाऊस पडल्यावर कसे वाटते, तसे आम्हाला वाटत होते. बस रस्त्यात थांबली होती आणि त्यामुळे ते हल्लेखोरांसाठी अगदीच सोपे टार्गेट होते. बसवर गोळीबार होत होता, तेव्हा आम्ही शांत आणि स्थिर राहण्याशिवाय काहीही करू शकत नव्हतो. दुखापत होऊ नये किंवा मृत्यू होऊ नये यासाठी आम्ही प्रार्थना करीत होतो.

नेहमी बसच्या मागच्या भागात बसणारा महेला (जयवर्धने) ओरडला की, त्याच्या मते त्याच्या पायाला गोळी लागली आहे. मी थिलनच्या जवळच पडून होतो. त्याच्या मांडीच्या मागच्या भागाला गोळ्या लागल्याने तो वेदनेने कळवळत होता. जेव्हा मी त्याच्याकडे पाहण्यासाठी माझे डोके वळवले, तेव्हाच माझ्या कानाजवळून काही तरी गेल्यासारखे जाणवले... एक गोळी सीटच्या बाजूच्या भागात घुसली होती! तीस सेकंदांपूर्वी माझे डोके अगदी तिथेच होते. तितक्यात मला माझ्या खांद्यात काही तरी घुसले आहे, असे जाणवले आणि माझा खांदा बधिर झाला. मला हे माहीत होते की, मला गोळी लागली आहे. त्यामुळे मी थोडा निर्धास्त झालो होतो आणि प्रार्थना करीत होतो की, माझ्या डोक्यात गोळी लागू नये. आपल्या पहिल्याच दौऱ्यावर आलेला तरंगा परणविताना माझ्याजवळच होता. सगळ्या बाजूंनी गोळ्यांचा वर्षाव होत असताना तो उभा राहिला आणि रक्ताने माखलेली आपली छाती आवळत ओरडू लागला की, त्याला गोळी लागली आहे. नंतर तो त्याच्या जागेवरच कोसळला आणि त्याची शुद्ध हरपली. मी त्याला पाहतो आणि मनाशीच विचार करतो की, ‘अरे देवा, हा पहिल्याच डावात शून्यावर बाद झाला, त्यापुढच्या डावात रनआऊट झाला आणि आता याला गोळी लागली, किती भयानक पहिला दौरा आहे याचा.’ अशा प्रसंगी अगदी विचित्रपणे तुमचे विचार फार स्पष्ट असतात.

मला माझे आयुष्य माझ्या डोळ्यांसमोरून जाताना दिसले नाही. कोणतीही निरर्थक भीती तिथे नव्हती. उलट तिथे विचार अतिशय स्पष्ट होते आणि आजूबाजूला काय होतंय, याविषयी अवेअरनेस होता. मला बस पुन्हा सुरू होताना ऐकायला येते. तिलकरत्ने दिलशान ड्रायव्हरवर ओरडत असतो की, ‘ड्राईव्ह कर. ड्राईव्ह कर’. आमची बस वेग घेते, वळते आणि आम्ही स्टेडियमच्या आत सुरक्षित जागी पोचतो. बसमधून बाहेर पडायला एकच धावपळ होते. तरंगा परणविताना उभा राहतो. त्याच्या शरीरातून अजूनही रक्त वहात असते आणि त्याच्या छातीच्या हाडात गोळी हलकेपणे रूतून बसलेली असते. बसच्या सांगाड्यामुळे गोळीच्या वेगावर परिणाम झालेला असल्याने ती गोळी छातीत खोलवर घुसलेली नसते. थिलनला मदत देऊन बसच्या बाहेर काढले जाते. ड्रेसिंगरूम मध्ये राग, आनंद आणि सुटका या भावनांचे मिश्रण झालेले असते.

वैद्यकीय कर्मचारी खेळाडूंची आणि कोचिंग स्टाफची तपासणी करीत असतात, उपचार करीत असतात. थिलन आणि परणविताना या दोघांना ते गंभीर जखमी असल्याने हॉस्पिटलमध्ये नेले जाते. आम्ही सर्व जण ड्रेसिंग रूममध्ये बसतो आणि गप्पा मारायला सुरुवात करतो. जे काही घडले त्यावर बोलायला लागतो. काही मिनिटांतच हास्यविनोद सुरू होतात. आम्ही पहिल्यांदाच हिंसाचाराचे लक्ष्य झालेले असतो आणि त्यातून आम्ही वाचलेले असतो.

गेली तीस वर्षे आमचे काही श्रीलंकन नागरिक काय  भोगत असतील याची आम्हाला कल्पना आलेली असते. त्यांच्या धैर्यासाठी आणि स्वार्थ बाजूला ठेवण्याच्या वृत्तीसाठी एक नवा आदर आमच्या मनात उत्पन्न झालेला असतो. त्यामुळे हे आवर्जून संगाण्यासारखे आहे की, आम्ही खूप कमी काळात या हल्ल्यातून सावरलो. आमच्या शरीराला जखमा झालेल्या असल्या तरी आमची मने मात्र अधिक खंबीर झाली होती. हल्ल्यानंतर काही तासाने आम्हाला लाहोर मधील पाकिस्तानी वायुसेनेच्या विमानतळावर हवाई मार्गाने आणण्यात आले. डोक्याला झालेल्या जखमांमुळे डोकेभर बँडेज गुंडाळलेला अजंता मेंडीस पोकरचा (पत्त्यांचा एक रमीसारखा सिरियस खेळ) डाव टाकू या, असे सुचवतो. वेदनाशामक औषधे दिलेल्या (मात्र पूर्ण शुद्धीत असलेल्या) थिलनला परत आणलेले असते. आम्ही त्याच्यावर खूप जोक्स करतो आणि तो आम्हाला तसाच हसून प्रतिसाद देतो.

आम्हांवर गोळीबार झाला होता, ग्रेनेड्‌स फेकण्यात आलेले होते, आम्ही जखमी झालो होतो, मात्र तरीही आम्ही घाबरलो नव्हतो. आमची मने खचली नव्हती. आम्ही स्वत:शीच विचार करीत होतो की, आपण श्रीलंकन आहोत, आपण खंबीर आहोत आणि आपण सर्व प्रकारच्या अडचणी सोसून नव्याने उभे राहणार आहोत. आम्ही त्या हल्ल्यानंतर लगेचच दिलेल्या मुलाखतींमध्ये सर्व जगाने तेच पहिले. आम्ही शांत आणि विवेकी होतो, आमचा तोल ढळलेला नव्हता. आम्ही (खेळाचे-देशाचे) ‘अनधिकृत राजदूत’ या आमच्या भूमिकेला साजेशा पद्धतीनेच वागलो होतो.

आम्ही पाकिस्तानातून कोलंबोत परत आल्यानंतर साधारण आठवड्याभराने मी माझी गाडी चालवत होतो तेव्हा कोलंबो शहरातील एका चेकपोर्इंटवर माझी गाडी थांबवली गेली. एका सैनिकाने अतिशय अदबीने माझी चौकशी केली. मी त्याला म्हणालो, मी सुखरूप आहे. आणि त्याला असेही म्हणालो की, तुम्ही सैनिक जे नेहमीच अनुभवता ते आम्ही केवळ काही मिनिटांसाठी अनुभवले, परंतु त्या प्रसंगाविषयी आम्हाला खूप वृत्तपत्रीय प्रसिद्धी मिळाली. त्या सैनिकाने माझ्या डोळ्यात पहिले आणि तो उत्तरला, ‘‘जर मला मृत्यू आला तर ते चालू शकेल, कारण ते माझे कामच आहे. परंतु तू एक हिरो आहेस आणि जर तुझा मृत्यू झाला तर देशाचे फार मोठे नुकसान होईल.’’

ते ऐकून मला धक्काच बसला. हा माणूस कशाच्या आधारे माझ्या आयुष्याची किंमत त्याच्या आयुष्यापेक्षा जास्त ठरवत होता? अतिशय प्रामाणिकपणे तो बोलत होता. तेव्हा मला मी जमिनीवर आल्याची भावना अतिशय तीव्रपणे जाणवून गेली. क्रिकेट आणि क्रिकेटपटूविषयी ही भावना श्रीलंकन जनतेत आहे.

नव्या युगातील श्रीलंकेत क्रिकेटचे वाढलेले महत्व

जर आम्हाला संधींचे सोने करता आले तर श्रीलंकन क्रिकेटचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. आणि तसे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो. कारण आमच्या बेटाच्या भविष्यासाठी क्रिकेटचा रोल फारच महत्त्वाचा आहे. श्रीलंकेतील यादवी युद्धाच्या त्या अंधाऱ्या दिवसांत जेव्हा सर्वच समूहांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले होते, तेव्हा क्रिकेटने महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु आता इथून पुढील काळात आम्ही शांतता आणि एकात्मतेच्या दिशेने जाणार आहोत, समेट घडवून आणून झालेले नुकसान भरून काढू पाहत आहोत, त्या काळात क्रिकेटपटूंचा परफॉर्मन्स आणि वर्तन यांचे महत्त्व वाढतच जाणार आहे.

क्रिकेटसाठीही हा अतिशय रोमांचक काळ आहे. कारण उत्तर आणि पूर्वेतील (आतापर्यंत बाहेर राहिलेल्या) गुणवत्तेला नवी संधी प्राप्त होणार आहे. क्रिकेटचे स्पिरीट ही समाजासाठी काही चांगले घडवण्याची शक्ती असायला हवी. क्रिकेटपटूंनी लोकांना आनंद द्यावा, तसेच आपण आपली आयुष्ये कशी जगायला हवीत याचेही उदाहरण घालून द्यायला हवे. आता युद्ध संपलेले आहे. शांतता आणि समृद्धीच्या एका नव्या युगात श्रीलंका प्रवेश करीत आहे, याबद्दल मी कायमचा ऋणी आहे.

याचा अर्थ असा की, युद्ध आणि हिंसाचार हे माझ्या मुलांच्या आयुष्याचे नेहमीचे वैशिष्ट्य नसेल. ते युद्ध आणि हिंसाचारविरहित जगात मोठे होतील. या युद्धाविषयी ते इतिहासाच्या पुस्तकांत वाचतील किंवा आमच्या बोलण्यातून ऐकतील. परंतु आम्ही सध्या अनुभवत असलेल्या शांतता आणि सुरक्षेची किंमत म्हणून देशाने किती मोठा त्याग केला आहे, याची त्यांना जाणीव व्हायलाच हवी. आमच्या क्रिकेटमध्ये आम्ही एक वैशिष्ट्यपूर्ण स्पिरीट दाखवतो, असे स्पिरीट जे गेल्या अडीच हजार वर्षांच्या काळात आम्ही जे धडे शिकलो त्याचे प्रतिबिंब आहे. आमच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला आमच्या लोकांचे चारित्र्य, इतिहास, परंपरा, हास्य, आनंद, दु:ख, पश्चात्ताप यांचे दर्शन घडेल. भावना आणि गुणवत्ता यांनी समृद्ध असलेले क्रिकेट आहे हे.

एक श्रीलंकन क्रिकेटपटू म्हणून मी या सुंदर खेळाला समृद्ध करायला हवे, त्याच्यात भर घालायला हवी आणि आणखी समृद्ध अशी परंपरा मागे ठेवून जायला हवी. ते करताना मी माझी श्रीलंकन आयडेंटिटी नेहमी समोर ठेवेन, ज्यामध्ये निर्धाराने आणि यथायोग्य पद्धतीने खेळणे अनुस्यूत आहे. आम्ही एक असे माध्यम बनू की, ज्याद्वारे श्रीलंका जगाशी अभिमानाने आणि सकारात्मक पद्धतीने संवाद साधू शकेल.

माझी निष्ठा ही नेहमीच दोन कोटी सामान्य श्रीलंकन क्रिकेटप्रेमींकडे असेल. ज्यांचे या खेळावर निरतिशय प्रेम आहे आणि ज्यांची मने एक असल्याप्रमाणे आमच्या या बेटातील तालावर (ऱ्हीदम) धडधडतात. असे क्रिकेटप्रेमी जे विविध धार्मिक, वांशिक, जातीय पार्श्वभूमीतून आलेले असतील आणि जे एका कॉमन राष्ट्रीय उदिष्टासाठी विविधतेतील एकता साजरी करतात, ते माझे कुटुंबीय आहेत. तेच माझा आधार आहेत. मी त्यांच्यासाठी क्रिकेट खेळतो. त्यांचे स्पिरीट हे क्रिकेटचे खरे स्पिरीट आहे. माझ्या सर्व लोकांबरोबर मी तमिळ, सिंहली, मुस्लिम आणि बर्घर आहे. मी बुद्धिस्ट, हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन आहे. मी आज आणि नेहमीच एक अभिमानी श्रीलंकन आहे.

अनुवाद : संकल्प गुर्जर

नोट

क्रिकेट पहायला आणि त्याहीपेक्षा जास्त त्यावर वाचायला मला आवडते. त्यामुळे क्रिकेटशी संबंधित काही वेगळे लेखन येते आहे का याचा मी अनेकदा शोध घेत असतो. 2013 मध्ये असाच शोध घेताना अगदी अचानकपणे मला संगकाराचे ‘हे’ भाषण पहायला मिळाले. संगकाराविषयी तेव्हा फारसे प्रेम तर नव्हते. परंतु जसजसा मी क्रिकेटविषयी अधिक वाचत गेलो, तसतसे मला त्या भाषणाचे महत्त्व अधिकाधिक उलगडू लागले. संगकारा निवृत्त होणार हे कळले तेव्हा मी ते भाषण पहिल्यांदा मिळवून वाचले आणि ठरवले की यावर लेख लिहायला पाहिजे. त्याप्रमाणे मी तो लेख लिहिलाही.

त्यानंतर साधनाच्या संपादकांनी मूळ भाषण वाचले आणि मला सूचना केली की, या भाषणाचा अनुवाद कधी तरी छापला पाहिजे. त्यानंतर काहीच दिवसांनी त्यांनी असे सांगितले की, हे भाषण या वर्षीच्या युवा अंकात घ्यायचे आहे. हाताशी वेळ मर्यादित होता, भाषण मोठे होते. पण जसजसा अनुवाद करीत गेलो तसतसे भाषणावरील प्रेम वाढत गेले. वाचताना अनेकदा अंगावर काटा आला तर कधी मन अभिमानाने भरून आले. ऑस्ट्रेलियात मुरलीधरनला ‘नो बॉल’ देणे आणि त्यावरील अर्जुना रणतुंगाची भूमिका हे वाचताना तर न राहवून मी यु-ट्यूबवर गेलो. तेव्हाच्या काही क्लिप्स उपलब्ध आहेत, ते पाहिले. अगदी पुन:पुन्हा पाहिले. आक्रमक, चिडलेला रणतुंगा दोन्ही पंचांशी वाद घालतोय आणि कोपऱ्यात नवखा मुरली इतर खेळाडूंबरोबर उभा आहे हे दृश्य आवर्जून पाहावे असेच होते. त्या प्रसंगानंतर तीनच महिन्यांनी झालेल्या ‘वर्ल्ड कप’मध्ये श्रीलंकेने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून वर्ल्ड कप जिंकला.

कुमार संगकाराने आपल्या पंधरा वर्षांच्या (2000-2015) करिअरमध्ये 134 कसोटी तर 404 वनडे मॅचेस खेळल्या आहेत. त्याने कसोटीत साडेबारा हजार तर वनडेमध्ये चौदा हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. कसोटी, वनडे आणि ट्वेंटी ट्वेंटी या क्रिकेटच्या सर्व प्रकारामधील एकूण धावांचा विचार केला तर सचिन तेंडुलकरच्या 34000 धावांच्या पाठोपाठ कुमार संगकारा 28000 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. संगकाराने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजे 11 द्विशतकी खेळ्या केल्या असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही विकेटसाठीची सर्वांत मोठी 624 धावांची भागीदारी (2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध) त्याने महेला जयवर्धनेसोबत केली होती.

- संकल्प गुर्जर

Tags: युवा दिवाळी अंक 2015 श्रीलंका कॉलिन कॉड्री भाषण क्रिकेट कुमार संगक्कारा muralidharan shrilanka colin cowdrey lecture kumar sangakkara cricket weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कुमार संगकारा

श्रीलंका देशाच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके