डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधेपणा हा गांधीयुगाचा परिणाम असला तरी यदुनाथजींनी त्याची कमाल गाठली होती. ते इस्त्रीचे कपडे घालत नसत. शुभ्र वस्त्रे हाच त्यांचा पेहराव. पायजमा व त्यावरील शर्ट बस्स! कायम शबनम सोबत. त्यांना स्कूटर वापरणे शक्य होते, तथापि तत्त्व म्हणून ते फक्त सायकल वापरत.  नानासाहेब गोरे व एस.एम.अण्णा यांचे ते शेवटपर्यंत निस्सीम भक्त राहिले. पडद्यामागे राहून समाजवादी संघटन कसे वाढवायचे, तरुणांना सत्तेच्या मोहापासून कसे आवरायचे, शुद्ध चारित्र्याच्या मागे कसे वळवायचे याची सिद्धी यदुनाथजींना साध्य झालेली होती. तसे ते अनाग्रही असत. त्या वेळच्या तरुणांना त्यांचा धाक किंवा दबाव वाटत नसे. ते भेटलेल्या प्रत्येक तरुणाच्या सुप्त शक्तीची जाण ठेऊन ती फुलवत. 

स्वातंत्र्य मिळून 15 वर्षे झाली होती. आम्ही म.गांधींना प्रत्यक्ष पाहिले नव्हते. गांधीयुगाचा परिणाम झालेली माणसं आजूबाजूला पाहायला मिळत. त्यापैकी एक यदुनाथजी थत्ते. कमालीची साधी राहणी आणि बोलण्यात सौजन्य. मी त्यावेळी बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होतो. यदुनाथजी साधना साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांची चौफेर नजर असे. नवे लेखक मिळवणे, तयार करणे यावर त्यांचा भर होता. 1967 साली लोकनायक जयप्रकाशजी पुण्यात आले होते. त्यांच्या आवाहनामुळे आम्ही सिनिअर मेडिकल विद्यार्थी बिहारमध्ये काम करायला गेलो होतो. पुण्यात रावसाहेब पटवर्धन, एस.एम.अण्णा यांच्या अवतीभोवती यदुनाथजींची भेटगाठ होई. त्यांनी आम्हाला हेरले होते. आमच्यातलं वेगळेपण आम्हाला जाणवत नव्हतं. पण त्यांनी मात्र ओळखलं होतं. बिहारहून आमची तुकडी मे महिन्यानंतर परत आली. पुढे सहा महिने मेडिकलच्या तुकड्या जात राहिल्या.

एके दिवशी भल्या सकाळी सायकलवर यदुनाथजी घरी आले. तेव्हा ते सायकलच वापरायचे. बिहारच्या अनुभवाबद्दल विचारू लागले. आम्ही हजार-पंधराशेचा रसोडा कसा चालवला, दवाखाना, तृवेल खुदाई याबद्दल सांगितले. आम्ही काम केले त्या गावाचे नाव रजोली. ते होते तत्कालीन गया जिल्ह्यात आणि आजच्या नवादा जिल्ह्यात. आमचे मदतकेंद्र एका सार्वजनिक संगतमधे (मठामध्ये) होते. तिथेच आमचा मुक्काम होता. स्वतःला सर्वोदयी म्हणविणारे गया बाबू सर्वोदय दुष्काळ रिलीफ समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा आमचा कसा टकराव झाला हेही यदुनाथजींना सांगितले.

ते म्हणाले, ‘तुमचा कामाचा अहवाल साधना प्रकाशित करील. तसेच इतर वृत्तपत्रेही प्रकाशित करतील. परंतु त्या रजोलीचे पाच हजार एकराचे जमीनदार आणि सर्वोदयातले पदाधिकारी गौरीसिंहबाबू यांच्याबद्दल तू साधनामधून आचार्य विनोबांना एक अनावृत्त पत्र लिही.’

खरे म्हणजे आम्ही विनोबांना त्याच वेळी बिहारमधील रामकृष्ण आश्रमात भेटलो होतो. त्यावेळी संकोचाने हा विषय काढला नव्हता. आयुष्यात मी कधी लेख लिहिला नव्हता. पण यदुनाथजी संधी देतायत म्हणून आचार्य विनोबा भावेंना मी एक दीर्घ अनावृत्त पत्र लिहिण्याची हिंमत केली. त्यामध्ये म्हटले होते की, ‘विनोबाजी आपण सूर्यासारखे आहात. आपल्याला अंधार दिसत नाही. पण अंधाराने तुम्हाला घेरलेले असते. तुम्ही मावळलात की अंधारच अंधार.’

त्या एका लेखाने माझी लिखाणाची आवड वाढली. प्रसिद्ध झालेले पत्र पुन्हा वाचावेसे वाटे आणि त्यात काय भर घालता आली असती, जी राहून गेली याचा विचार चालू असे.

मग यदुनाथजींचा घनिष्ठ परिचय वाढत गेला. नोव्हेबर 1967 मध्ये आम्ही युक्रांद संघटनेची स्थापना केली.  प्रत्येक गोष्ट यदुनाथजींना सांगत असू. त्यांना युक्रांदची संकल्पना आणि जयप्रकाशजींचे मार्गदर्शन या गोष्टी पसंत होत्या. शिवाय निवडणुकांच्या राजकारणात सहभागी होण्यापेक्षा काही वर्षे आम्ही बिगरसंसदीय क्षेत्रांत अन्यायाविरुद्ध सत्याग्रही मार्गाने संघर्ष करण्याचे ठरविले होते हे त्यांना फार भावले होते. एक दिवस मी त्यांना माझी अडचण सांगितली. मला युक्रांदचे पहिले शिबीर फार भव्य करायचे होते. आम्ही मेडिकल क्षेत्रातले विद्यार्थी, त्यामुळे बाळाचे जन्मवजन चांगले असले तरच बाळ पुढे निरोगी व खेळकर राहते, हे माहीत होते. अडचण अशी होती की हे भव्य शिबीर घ्यायला पैसा कसा उभा करायचा? श्रीमंतांकडून वर्गणी घेतली तर तेच बाळाचे बाप बनतील हा धोका. आमची अडचण समजून घेतल्यानंतर यदुनाथजींनी एक भन्नाट उपाय सांगितला. ते म्हणाले, ‘बाबा आमटे यांना सरकारने दोन हजार एकरांचे जंगल दिले आहे, तिथे त्यांना महारोगातून मुक्त झालेल्यांची वसाहत तयार करायची आहे. तुम्ही बाबांच्या भेटीला आनंदवनात जा. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा आणि तुमचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवा. आम्ही रोज तीन-चार तास श्रमदान करू. जंगलाची साफसफाई करू. आमच्या श्रमाच्या मोबदल्यात तुम्ही आम्हाला चहा-जेवण व स्टेज लाउडस्पीकर पुरवा. बाबा या प्रस्तावाला होकार देतील. यात उपकार घ्यावे लागणार नाहीत.’

त्यांच्या या बोलण्याने खूप हुरूप आला. आम्ही सात-आठ जणांनी नाताळच्या सुट्टीत विदर्भाचा दौरा केला. यदुनाथजींनी आमच्याबरोबर जवाहर कोटेचा या तरुणाला गाईड म्हणून दिले. आमचा पहिला मुक्काम नागपूर येथे झाला. मातृसेवा मंदिरात कमलाताई होस्पेट भेटल्या. त्यांनी आमच्या जेवण-खाण्याची राहण्याची सोय केली. त्यानंतर त्या मला नातू मानू लागल्या. मग आम्ही वर्ध्याला गेलो. तिथल्या सर्व गांधीवादी संस्थांना भेटी दिल्या. चार-पाच दिवसांत हा दौरा उरकून आम्ही आनंदवनात बाबांच्या भेटीला पोहोचलो. त्यावेळी आनंदवन हे जंगल चंद्रपूर जिल्ह्यात होते. आता ते गडचिरोली जिल्ह्यात आहे. तेथे बाबांबरोबर दोन दिवस दोन रात्री शेकोटीभोवती गप्पा झाल्या. आमच्यात असे ठरले की, आनंदवनाच्या हद्दीत आल्यानंतर आम्ही कुठलाही खर्च करायचा नाही. आनंदवनाच्या बाहेर मात्र प्रचाराचा खर्च युक्रांदने सोसायचा. आम्ही युक्रांदची माहिती देत दौरे केले. पहिले अधिवेशन 15 दिवसांचे आहे आणि ते 10 मे 1968 रोजी सुरू होऊन 25 मे रोजी संपेल. तेथे तीन ते चार तास श्रमदान करावे लागेल. कॉलेजमधील तरुणांना त्या जंगलातल्या जीवनाचे सुंदर वर्णन आम्ही करत असू, त्यामुळे 10 दिवसांच्या त्या शिबिरासाठी 1500 तरुण-तरुणी सहभागी झाले. त्यानंतर एवढ्या दीर्घकाळ आणि इतक्या संख्येचे शिबीर महाराष्ट्रात परत झाल्याचे ऐकिवात नाही.

युक्रांदच्या प्रत्येक आंदोलनाला साधनातून प्रसिद्धी मिळे, आम्हाला बैठका घ्यायला जागा नव्हती. लगेच यदुनाथजींनी आमची अडचण सोडवली. साधनाच्या तेव्हाच्या इमारतीत आंतरभारती हॉल होता. त्यात 200 लोकांची बैठक घेता येत असे. मग आमची साप्ताहिक बैठक साधनाच्या त्या आंतरभारती सभागृहात सुरू झाली.  होता होता युक्रांदला त्यांनी साधनाचे अंग बनवून टाकले. त्या वेळी युक्रांदचा सदस्य असलेल्या डॉ.अनिल अवचटचे लेख नियमितपणे साधनात प्रकाशित होत. त्यालाच त्यांनी पुढे कार्यकारी संपादक केले. त्या वेळी महाराष्ट्रात ठिकठिकाणी माझ्या सभा होत. माझ्याजवळ साधनाचे पावती पुस्तक असे. तरुण विद्यार्थ्यांना मी साधनाचे सभासद करून घेत असे. हे यदुनाथजींना सोपे नव्हते.

1968 मध्ये माझी पत्नी उर्मिला कच्छला जाणार होती. दौरा उंटावरून होता. कच्छ रणाचा काही भाग भारताने पाकिस्तानला दिला होता. त्याविरोधात आम्ही भूमिका घेतली होती. त्यासाठी पन्नालाल सुराणा, मधु लिमये, तुलसी बोडा, सुधा बोडा यांच्यासोबत उर्मिला दौऱ्यावर गेली होती. तिला गुजराती भाषा येत होती, त्यामुळे सोयीचे होणार होते. ती कच्छच्या दौऱ्यावरून परत आल्याबरोबर यदुनाथांनी तिला बोलवून घेतले. त्या तिला दौऱ्यावर आधारित लेख लिहिण्यास सांगितले. तो लेख साधनामध्ये प्रकाशित झाला.

त्यांचे जुने सहकारी आमच्या सहवासाबद्दल त्यांना थिल्लर म्हणत. वास्तव मात्र वेगळे होते. साधनात सर्वात जास्त नवीन भाषेत लिहिणाऱ्या लेखकांची फौज तयार होत होती. साधना लोकांशी नाळ जोडत होती. 1972 मध्येे साधनातल्या राजा ढाले यांच्या लेखावरून पुण्यात वादळ उठले. प्रतिगामी हिंदुत्ववादी संघटनांनी ‘साधना जला दो’ असा मोर्चा काढायचा निर्णय घेतला. त्या वेळी लगेच युक्रांदने ‘हमारी साधना नही जलेगी’ असा प्रतिमोर्चा घोषित केला. प्रतिगामी शक्तींच्या वाह्यातपणाला आम्ही शक्तीने उत्तर दिले. साधनाच्या तेव्हाच्या एका मुखपृष्ठावर दोन मोर्चे समोरासमोर आले आहेत असे चित्र छापले आहे.

यदुनाथजी नेहमी आमच्या घरी येत असत. मीही त्यांच्या घरी जात असे. त्यांच्या चिरंजीवाला आर्थिक दृष्ट्या स्थिर करण्यासाठी माझ्यासोबत त्यांनी एक योजना आखली होती. त्या वेळी मी विधानसभेचा आमदार होतो आणि माझ्या हातात श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याची सूत्रे होती. चिरंजीवाना टेम्पो घेऊन द्यायचा आणि साखर कारखान्याने त्याला महिनाभर सतत काम द्यायचे असे ठरले होते. पण यदुनाथजी त्यावेळच्या एकूण अनुभवाने हतबल झाले.

साधेपणा हा गांधीयुगाचा परिणाम असला तरी यदुनाथजींनी त्याची कमाल गाठली होती. ते इस्त्रीचे कपडे घालत नसत. शुभ्र वस्त्रे हाच त्यांचा पेहराव. पायजमा व त्यावरील शर्ट बस्स! कायम शबनम सोबत. त्यांना स्कूटर वापरणे शक्य होते, तथापि तत्त्व म्हणून ते फक्त सायकल वापरत. 

नानासाहेब गोरे व एस.एम.अण्णा यांचे ते शेवटपर्यंत निस्सीम भक्त राहिले. पडद्यामागे राहून समाजवादी संघटन कसे वाढवायचे, तरुणांना सत्तेच्या मोहापासून कसे आवरायचे, शुद्ध चारित्र्याच्या मागे कसे वळवायचे याची सिद्धी यदुनाथजींना साध्य झालेली होती. तसे ते अनाग्रही असत. त्या वेळच्या तरुणांना त्यांचा धाक किंवा दबाव वाटत नसे. ते भेटलेल्या प्रत्येक तरुणाच्या सुप्त शक्तीची जाण ठेऊन ती फुलवत. त्यांच्यामुळे लिहिता झालेला मी त्यांना मन:पूर्वक श्रद्धांजली वाहतो.

(युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष असलेले कुमार सप्तर्षी ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे संपादक असून, गांधी भवन, पुणे या संस्थेचेही अध्यक्ष आहेत.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कुमार सप्तर्षी

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष 


Comments

 1. Salil Joshi- 22 Oct 2021

  "त्यावेळी आनंदवन हे जंगल चंद्रपूर जिल्ह्यात होते. आता ते गडचिरोली जिल्ह्यात आहे." This is factually incorrect. Anandwan is still in Chandrapur district.

  save

 1. Salil Joshi- 22 Oct 2021

  "त्यावेळी आनंदवन हे जंगल चंद्रपूर जिल्ह्यात होते. आता ते गडचिरोली जिल्ह्यात आहे." This is factually incorrect. Anandwan is still in Chandrapur district.

  save

 1. Salil Joshi- 22 Oct 2021

  "त्यावेळी आनंदवन हे जंगल चंद्रपूर जिल्ह्यात होते. आता ते गडचिरोली जिल्ह्यात आहे." This is factually incorrect. Anandwan is still in Chandrapur district.

  save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके