डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

1991 च्या जनगणनेत स्त्री साक्षरतेत परभणी जिल्हा खूप मागे होता. म्हणजे राज्यात खालून दुसऱ्या की तिसऱ्या क्रमांकावर होता. म्हणून ‘पुढच्या जनगणनेपर्यंत साक्षरतेचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या आसपास आलं, तर ते आपल्या कामाचं सार्थक होईल. त्यामुळं, हे काम मागं पडायला नको’, अशी विनंती मी सर्वांना विजयोत्सवात केली. त्यानंतर माझी बदली झाल्यावर परभणीच्या साक्षरतेचा 2001चा रिपोर्ट आला (तेव्हा मी अकोल्यात मनपा आयुक्त होतो) परभणीचं साक्षरतेचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अर्धा टक्का जास्त झालं होतं. तेव्हा तिथल्या एका रशीद नावाच्या माजी नगराध्यक्षाचा मला एका रात्री फोन आला. ते म्हणाले, ‘आज आकडेवारी आली आहे आणि आपला जिल्हा राष्ट्रीय आकडेवारीपेक्षा पुढं आहे. हे आपलं श्रेय आहे. तुम्ही आम्हा मुस्लिमांना साक्षरतेच्या प्रवाहात आणलं, त्याबद्दल तुम्हाला आम्ही कधी विसरू शकणार नाही.’ मला समाजाच्या- खास करून मुस्लिम स्त्रियांच्या जीवनात थोडं तरी परिवर्तन साक्षरतेच्या माध्यमातून घडवून आणता आलं, याचं आजही अपार समाधान आहे.

प्रश्न - तुम्ही परभणीला सर्वाधिक काळ होतात, असे तुमच्या बोलण्यात येते, काय आठवणी आहेत तिथल्या? तिथं तुम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष होतात, त्याविषयीही सांगा.

- माझ्या सनदी सेवेच्या कारकिर्दीतील सर्वाधिक काळाची पोस्टिंग परभणीतील, साडेतीन वर्षांची राहिली. त्यापूर्वीच्या सर्व पोस्टिंग सहा महिने, वर्ष-दीड वर्ष, अडीच वर्षे अशाच राहिलेल्या होत्या. त्यातल्या त्यात जास्त लातूरची पावणेतीन वर्षाची राहिली. तिथेदेखील निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे एवढा काळ मिळाला होता. या पार्श्वभूमीवर परभणीला सलग जास्त काळ मिळाल्यानं खूप चांगलं काम करता आलं. खूप चांगली माणसं या काळात भेटली. आरडीसी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार पाहात होतो. सुदैवानं एस.एस. संधू हे चांगले कलेक्टर मला लाभले. आरडीसी ही जबाबदारी अशी असते की, त्यामध्ये कलेक्टरशी रोज संबध येतो. त्यामुळं संधूसाहेबांशी रोज संबंध येत होता. ते उर्दू साहित्याचे उत्तम अभ्यासक होते. त्यांच्यात आणि माझ्यात काही साम्य होतं. ते असं की, माझ्याप्रमाणेच हिंदू-मुस्लिम एकतेचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनाही गरिबांप्रती कळवळा होता. तसंच दलितांप्रती त्यांच्या मनात कमालीची कणव होती. या तिन्ही गोष्टी आमच्यात समान होत्या. त्यामुळे पहिल्या दोन महिन्यांतच आमचे सूर खूप छान जुळले गेले.

त्यावेळी परभणी जिल्ह्यात साक्षरता अभियानाचं काम सुरू होतं. एके दिवशी त्यांच्या दालनात नियमित कामाचा भाग म्हणून गेलो होतो; तर त्यांच्याकडे प्रौढ साक्षरता अभियानाची बैठक सुरू होती. ती बैठक सुरू असल्यानं परत जायला निघालो तर कलेक्टरसाहेबांनी मला बसायला सांगितलं. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, परभणी जिल्ह्यात 16 तालुके आहेत आणि साक्षरता अभियनाचं काम परभणी व वसमत या दोन तालुक्यांत सुरू होतं. परंतु, ते म्हणावं तितकं यशस्वी झालं नव्हतं. त्यामुळे कलेक्टरही निराश होते. हे मला माहीत होतं. आधीचे आरडीसी त्यामध्ये जास्त सहभागी नव्हते. त्यात त्यांचं फारसं शिरस्त्याप्रमाणं चुकत नव्हतं. कारण आर.डी.सी.ने कलेक्टर ऑफिस सांभाळायचे असते, असा रिवाज व पद्धत होती.

मग मी बैठकीतच न राहवून ‘साक्षरता अभियानात मला रस आहे, माझी यात पुढाकार घ्यायची इच्छा आहे’, असं म्हणालो. ते म्हणाले, ‘काय  करणार? ते सांगा.’ मी म्हणालो, ‘मी याचा थोडा अभ्यास केला आहे. मी संपूर्ण माहिती घेतली आहे. तुम्ही वर्षभर फक्त दोन तालुक्यांत हे काम सुरू केलंय, ते पूर्ण जिल्ह्यात कसं व किती काळात होणार?’ संधूंनी मला मग सर्वंकष आराखडा करण्यासाठी सांगितले. दोन दिवस विचार करून मी एक योजना तयार केली. दोन-दोन तालुके करण्यापेक्षा आपण एकदम सगळीकडे हे अभियान सुरू करू यात. ‘स्टार्ट टू फिनिश’ अशा पद्धतीनं एका वर्षात अभियान पूर्ण करायचं.

त्यासाठी तीन पाठ्यपुस्तकं आहेत. त्यातलं प्रत्येक पुस्तक तीन महिन्यांत पूर्ण करायचं. याप्रमाणं नऊ महिन्यांत अभ्यासक्रम संपवायचा. आपण अधिकचा एक महिना गृहीत धरला तरी एका वर्षात आपण हे अभियान यशस्वीरीत्या पूर्ण करू शकतो. ते म्हणाले, ‘जिल्ह्यात अडीच लाख प्रौढ निरक्षर आहेत. त्यामध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. ते येत नाहीत, शिकत नाहीत. तसेच जमीनदारी असल्यानं पाटलाच्या घरातील स्त्रिया येत नाहीत. या प्रमुख अडचणी आहेत.’ तेव्हा मी आत्मविश्वासानं म्हणालो की, ‘त्याची मला कल्पना आहे. त्यावर मात करता येईल. त्यासाठी आपण मला थोडा अधिकार व मोकळीक द्या.’ ती त्यांनी दिली. माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला.

मी त्यांना म्हणालो, ‘सर्व स्तरातील म्हणजे प्राथमिक, माध्यमिक व प्रौढ शिक्षणाधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी अशा 16 प्रमुख अधिकाऱ्यांना सोळा तालुक्यांचे प्रमुख समन्वयक नेमून त्यांना पूर्ण अधिकार व जबाबदारी देऊ या.’ संधूंनी हे मान्य केलं. मी स्वत: परभणी शहर व तालुका घेतला, तर कलेक्टरसरांनी गंगाखेड तालुका घेतला. प्रत्येक आठवड्यात दोन दिवस तालुक्यात मुक्काम करून साक्षरतावर्ग सुरू करणे, भेटी देणं व स्वयंसेवकांच्या बैठका घेणं आणि त्यासाठी प्रत्येक आठवड्याची कामं आम्ही नियोजन करून देत गेलो. आठवड्यातून एकदा जिल्हास्तरावर आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली. या कामी मी ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करीत खूप नावीन्यपूर्ण गोष्टी केल्या. अधिकारी, शिक्षक व स्वयंसेवक यांना सातत्यानं मोटिव्हेशन देण्याचं काम केलं. आपण स्वत: साक्षरता वर्गात शिकवायचं, आपल्या डिपार्टमेंटची माहिती द्यायची आणि अभ्यासक्रमाचा काही भाग शिकवायचा, हे सर्वच खात्याच्या अधिकाऱ्यांना अनिवार्य केलं. कलेक्टर स्वतः रसाळपणे शिकवायचे.

प्रौढांची प्रगती जाणवण्यासाठी दरमहा चाचणी घेण्यास आम्ही सुरुवात केली. पाठ्यपुस्तकापलीकडे जात काही उपक्रम राबवले. उदा. राष्ट्रगीत पाठ करणं व इतर असंच. तसंच शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, स्वामी रामानंद तीर्थ यांचं कार्य व विचार प्रौढांना माहीत व्हायला हवं, म्हणून एक-दोन पानांचे लेख तयार केले. तेव्हा नुकताच लातूरला भूकंप होऊन गेला होता. त्यामुळे आम्ही भूकंप का होतात, घरं कशी असायला हवी, याची माहिती देऊ लागलो. अशा प्रकारे आम्ही वर्षभरात प्रौढ निरक्षरांना साक्षरतेसोबत अशी जीवनोपयोगी माहितीही देण्याचा प्रयत्न केला. या कामात सर्वांत मोठा अडथळा होता मुस्लिम समाजाचा, त्यांना मराठी नको होतं. मग मी स्वत: पुढाकार घेऊन मराठी पाठ्यपुस्तकं दिल्लीतील जामिया मिलियाकडून उर्दूत भाषांतरित करून घेतली. मग मुस्लिमांचे साक्षरता वर्ग सुरू झाले. बुरखाधारी बायका यायच्या नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी वेगळा वर्ग सुरू केला. रेड लाइट एरियात आम्ही महिला कार्यकर्त्यांसोबत जायचो. मी पत्नीलाही सामील करून तिथं तिच्यासह जायचो.

पाटलाच्या, सरपंचांच्या बायका पण मानपानाच्या कल्पनेमुळं वाडा सोडून साक्षरता केंद्रात येत नाहीत. म्हणून आम्ही पोलिस पाटील, सरपंच, पाटलांच्या वाड्यातच साक्षरता केंद्र सुरू करून शिकवायला सुरुवात केली. अशा रीतीनं एक वर्षभर आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी मिशन मोड मध्ये काम केलं. आर.डी.सी.ला दौरा नसतो; पण त्या वर्षात मी 200 दिवस- नव्हे सायंकाळी-रात्री साक्षरता वर्ग तपासणं, शिकवणं यासाठी दौरा केला. त्या एका वर्षात मी स्वतःला या कामी झोकून दिलं होते. कलेक्टर संधू पण जास्तीत जास्त वेळ देत होते व सर्वांना प्रोत्साहित करत होते. अशा रीतीनं एका वर्षात आम्ही साक्षरता मिशनच्या नियमाप्रमाणे तीन पाठ्यपुस्तके शिकवून व त्यांना त्याचं पूर्ण आकलन झालं किंवा कसं हे पाहण्यासाठी चाचणी परीक्षा घेऊन व काम पूर्ण केलं.

या वर्षभरात काही नावीन्यपूर्ण उपक्रम आम्ही राबवले. किमान 50 एक गावं तरी साक्षरतेसह इतर माहितीचा ज्ञान- ज्याला कार्यात्मक सारक्षरता म्हणतात, त्या सह आदर्श बनवली. या विशेष प्रतिसाद देणाऱ्या गावातील महिलांना आम्ही आवाहन केलं, म्हणून नागपंचमीच्या सणाला माहेरी न जाता त्यांनी साक्षरता वर्ग बंद पडू दिला  नाही. त्यांनी तसं आम्हाला पत्रानं कळवलं. मला व कलेक्टरांना ‘तुम्हीच आमचे भाऊ, तेव्हा ओवाळून घ्यायला या आमच्याकडून’ असं कळवणारी एका गावातील 85 महिलांची पत्रं आली. त्या गावी आम्ही आवर्जून गेलो होतो. त्यांचं ओवाळणं व पुरणपोळी खाऊ घालणं आजही माझ्या लक्षात आहे, ती कृतार्थतेची भावना न विसरता येणारी आहे.

त्यावेळी शासनानं जिल्ह्यात किती साक्षरता साध्य झाली, हे तपासण्यासाठी पुण्याच्या ‘कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ची नियुक्त केली होती. प्रा.अंजली मायदेव व एम.एस.डब्ल्यू. शिकणारे शंभर विद्यार्थी परभणी जिल्ह्यात आले. खरंतर बाह्य मूल्यमापन करणारी यंत्रणा रँडम पद्धतीनं जिल्ह्यातील पाच गावं निवडते व तेथील साक्षरता तपासून ती जिल्ह्याची आहे, असं जाहीर करते. पण आमच्या विनंतीवरून कर्वे इन्स्टिट्यूटनं 150 गावात जाऊन मूल्यमापन केलं व जिल्ह्याने 88 टक्के साक्षरता साध्य केल्याचा निष्कर्ष काढला, तसा शासनाला अहवाल दिला. आमचं साक्षरता अभियान यशस्वी झालं होतं. एक वेगळं आव्हानदायी काम आम्ही केलेलं होतं. त्यामुळं पूर्ण जिल्ह्यात एकच जल्लोष झाला. ठिकठिकाणी माझे व कलेक्टरांचे सत्कार झाले. त्या रम्य आठवणी माझ्या समाधानाचा अक्षय ठेवा आहेत.

1991 च्या जनगणनेत स्त्री साक्षरतेत परभणी जिल्हा खूप मागे होता. म्हणजे राज्यात खालून दुसऱ्या की तिसऱ्या क्रमांकावर होता. म्हणून ‘पुढच्या जनगणनेपर्यंत साक्षरतेचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या आसपास आलं, तर ते आपल्या कामाचं सार्थक होईल. त्यामुळं, हे काम मागं पडायला नको’, अशी विनंती मी सर्वांना विजयोत्सवात केली. त्यानंतर माझी बदली झाल्यावर परभणीच्या साक्षरतेचा 2001चा रिपोर्ट आला (तेव्हा मी अकोल्यात मनपा आयुक्त होतो) परभणीचं साक्षरतेचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अर्धा टक्का जास्त झालं होतं. तेव्हा तिथल्या रशीद नावाच्या माजी नगराध्यक्षाचा मला एका रात्री फोन आला. ते म्हणाले, ‘आज आकडेवारी आली आहे आणि आपला जिल्हा राष्ट्रीय आकडेवारीपेक्षा पुढं आहे. हे आपलं श्रेय आहे. तुम्ही आम्हा मुस्लिमांना साक्षरतेच्या प्रवाहात आणलं, त्याबद्दल तुम्हाला आम्ही कधी विसरू शकणार नाही.’ मला समाजाच्या- खास करून मुस्लिम स्त्रियांच्या जीवनात थोडं तरी परिवर्तन साक्षरतेच्या माध्यमातून घडवून आणता आलं, याचं आजही अपार समाधान आहे. पण जिल्हा साक्षर करण्याचं खरं श्रेय आमच्या शिक्षकांचं आहे.

या अभियानानंतर माझा शिक्षण क्षेत्रावरील विश्वास खूप वाढला. मला वाटतं, 70 ते 80 टक्के शिक्षक चांगलंच काम करतात. त्यांना प्रेरणा देण्याची गरज असते, एवढंच! परभणीच्या साक्षरता अभियानातील एक प्रसंग मला कधीही विसरता येणार नाही. एक मॅट्रिक पास मुस्लिम मुलगी. ती पोट भरण्यासाठी भांडी घासायची, ती एका साक्षरता केंद्राची प्रमुख झाली होती. ती मुस्लिम महिलांना मनापासून शिकवायची. साक्षरता अभियान संपल्यानंतर तिचं लग्न ठरलं. तिचा भाऊ मला आमंत्रण द्यायला आला. मी (तिला विसरून गेलो होतो.) पण लग्नाच्या दिवशी तिचा भाऊ घरी आला आणि आज बहिणीचं लग्न असल्याचं सांगितलं. ‘जोपर्यंत देशमुखसाहेब येत नाहीत, तोपर्यंत लग्न करणार नाही,’ असा हट्ट तिनं धरला होता. मी ताबडतोब उठलो आणि लग्नाला गेलो. मी तिला असं काय दिलं की, तिनं आपल्या विवाहप्रसंगी मी यावं म्हणून विवाह तासभर थांबवला? मला वाटतं- कदाचित मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध होतो, त्यामुळं तिनं मला आपला मोठा भाऊ मानलं असेल!

मुस्लिम महिला व पुरुषांनी उर्दूत शिकावं म्हणून, त्या समाजातील मॅट्रिक पास तरुण-तरुणींना त्यासाठी स्वयंसेवक म्हणून नियुक्त केलं होतं. त्यांनीही खूप रस घेत आपल्या लोकांना शिकवलं. त्या साऱ्यांशी माझं छानपैकी कौटुंबिक नातंच जडत गेलं. मुस्लिम पुरुष स्वयंसेवकांना व्यवसायासाठी छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यासाठी बँकेचं कर्ज मिळवून दिलं. वीस-पंचवीस जणांना ऑटो रिक्षा मिळवून देताना मी गॅरेंटर झालो. त्यांनी ते लोन नंतर परत फेडलं नसतं, तर काय झालं असतं? अशा गोष्टींचा नुसता विचार केला तरी भीती वाटू शकते. बरं, ती रक्कम काही कमी नव्हती. मी पुढाकार घेतलेला पाहून बँकवालेही लगेच लोन द्यायचे. (पुढं काही वर्षांनी एक मुस्लिम तरुणी मी अकोल्यात आयुक्त असताना नवऱ्यासह मला भेटायला आली होती. दोघं पती-पत्नी माझ्या पाया पडले. ती मला म्हणाली, ‘आम्हाला आशीर्वाद द्या. माझ्या भावाला तुम्ही परभरणीला ऑटो रिक्षासाठी कर्ज मिळवून दिलं होतं. त्याचं चांगलं झालं. माझ्या पतीलाही इथं लोन मिळवून द्याल का?’ मी अकोल्यात होतो. ती वाशिमला राहात होती. मग मी वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. तिथंही मीच गॅरंटर झालो.  लोन मंजूर झालं. आपल्याला ती इतकं मानते तर आपणही तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही भावना होती म्हणून प्रयत्न केले एवढंच.)

साक्षरता अभियान हे माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचं काम आहे. कारण एक जिल्हा पूर्ण साक्षर झाला होता. मुख्य म्हणजे महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण वाढलं होतं. जवळपास अडीच लाख प्रौढांना साक्षर करण्यात मी जो पुढाकार घेतला तो माझ्या यशस्वी वाटचालीचा सोनेरी भाग आहे. माझी जडणघडण ग्रामीण भागातील असल्याने, अशिक्षित असण्याचा तोटा मला माहीत होता. त्यातच प्रौढ वयात शिकायची भूक असणारे खूप असतात, त्यांच्या आयुष्यात परिवर्तनाचा आनंद पाहता व अनुभवता आला, याचं समाधान मला आजही आहे. या कामात शिक्षक खऱ्या अर्थानं प्रेरित व चेंज एजंट झाले होते. त्याचं एक उदाहरण मला आजही आठवतं. एके रात्री वर्गतपासणीसाठी एका गावात गेलो. रात्री 11 वाजता तिथं पोचलो. माझी गाडी ओळखून दोन महिला पुढं आल्या. त्या शिक्षिका होत्या व त्या गावी साक्षरतेचा वर्ग आटोपून परत जायला निघाल्या होत्या, पण शेवटची बस निघून गेली होती. त्यांचं हे डेडिकेशन व कार्यतत्परता पाहून मी थक्क झालो. मी म्हणालो, ‘मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो.’ रात्री 11 वाजता दोन महिला एका गावात फिरतात ही केवढी मोठी प्रेरणा त्यांच्यात होती. पण त्या आमच्यावर विश्वास ठेवत या कामासाठी रात्रीचा दिवस करीत होत्या. या प्रसंगानं मी भारावून गेलो. त्यानंतर मी कधीच जिल्हा परिषदेचे शिक्षक काम करीत नाहीत, असं म्हणालो नाही की मानलं नाही. म्हणून उत्तम असली तरी रमेश इंगळे-उत्रादकरांची ‘निषाणी डावा अंगठा’ ही कादंबरी मला आवडत नाही. कारण त्याच्या विरुद्ध परभणीमध्ये आम्ही आदर्शवत असं साक्षरतेचं खरंखुरं काम केलं होतं! पण ते असो.

परभणीच्या कारकिर्दीत एक महत्त्वाची गोष्ट घडली होती, ती म्हणजे मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराची. पूर्वी 1978 साली यावरून मोठी दंगल झाली होती, त्यामुळं मराठवाड्यात नामविस्ताराच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखायचं मोठं आव्हान होतं. परभणी या दृष्टीनं अत्यंत संवेदनक्षम होतं. पण या काळात आमचं प्रौढ साक्षरता अभियान चालू होतं. त्यात कार्यात्मक साक्षरतेच्या नावाखाली आम्ही साक्षरता वर्गात शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार व मोठेपण सांगत होतो. त्यामुळे सामान्यांपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार विशेषतः संविधान निर्मितीमध्ये त्यांचे सर्वात मोठे असलेले योगदान पोचवण्यात यशस्वी झालो होतो. त्यामुळं नामविस्ताराच्या वेळी परभणीत आम्ही शांतता-सुव्यवस्था राखू शकलो. याचं श्रेय साक्षरता अभियानाकडं जातं, हे कर्वे इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षणातून पुढं आलं होतं, त्याचं मला अपार समाधान आहे. कारण साक्षरता केंद्र चालवणाऱ्यांपर्यंत व त्यांच्याद्वारे प्रौढ निरक्षरांपर्यंत महापुरुषांचे विचार पोचवायचे, ही माझी कल्पना होती. त्याचा असा सकारात्मक फायदा झाला.

1995 साली 68 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परभणीत झाले, हा माझ्यासाठी माझ्या प्रशासकीय व साहित्यिक कारकिर्दीमधला महत्त्वाचा टप्पा ठरला, असं आज मागं वळून पाहताना वाटतं. कारण या संमेलनाचा मी कार्याध्यक्ष होतो. परभणीस संमेलन घेण्याची कल्पना माझे सर्वांत जुने साहित्यिक मित्र देविदास कुलकर्णी यांची. त्यांनी माझ्यापुढं ही कल्पना मांडली व नव्या गोष्टी करण्याची आवड असल्यामुळं तयार झालो. तोवर मी फक्त एकच साहित्य संमेलन (बार्शीचे) वाचक/रसिक म्हणून पाहिलं-ऐकलं होतं. परभणीला असताना माझी ‘अंधेरनगरी’ ही कादंबरी प्रसिद्ध होऊन गाजायला सुरू झाली होती. त्यामुळं साहित्य संमेलनाचं आयोजन  करण्याचं आव्हान स्वीकारण्याचं मी ठरवलं. खरंतर परभणीला मोठी हॉटेल्स फारशी नव्हतीच, त्यामुळं साहित्य महामंडळाला निवासाच्या संदर्भात शंका होती. पण राम शेवाळकर व सुरेश द्वादशीवार - जे महामंडळाचे तेव्हा अध्यक्ष होते- यांच्यापुढं आम्ही संमेलन कसं घेऊ, याचा आराखडा सादर केला. आणि त्या आधारे संमेलन परभणीला देण्यात आलं. माजी मंत्री व सुसंस्कृत नेता रावसाहेब जामकरांना आम्ही स्वागताध्यक्ष केलं होतं.

परभणी संमेलनाच्या पूर्वतयारीचे सहा महिने हा माझ्यासाठी मंतरलेला कालखंड होता. रोज सायंकाळी आमची कार्यकारी समिती एकत्र जमायची. मी ऑफिसमधून थेट तिथं बाकी मंडळी आली की जायचो. मग दोन तास चर्चा, कामाची आखणी, फोनाफोनी आणि एक एक कामाचं नियोजन व्हायचं. अनेकदा मध्यरात्र व्हायची; पण आम्हाला भान नसायचं. परभणीला अध्यक्ष म्हणून निवडणुकीत आनंद यादवांचा पाडाव करून कविवर्य नारायण सुर्वे निवडून आले होते. संमेलनाच्या उद्‌घाटनासाठी मी त्या तोलामोलाचा भारतीय भाषिक कवी असावा, असं ठरवून औरंगाबादचे प्रसिद्ध कवी चंद्रकांत पाटलांना बाबा भांड यांच्यामार्फत भेटलो. मला संमेलनात काही नवीन प्रयोग करायचे आहेत, हे त्यांना सांगितलं. त्यांना माझी कल्पना आवडली.

चर्चेमध्ये उद्‌घाटनासाठी दोन नावं ठरवली. - उडिया कवी सीताकांत महापात्रा व हिंदी कवी अशोक वाजपेयी. महापात्रा त्या काळात परदेशी जाणार असल्यानं अशोक वाजपेयींना आमंत्रित केलं. त्यांना मी व चंद्रकांत पाटील दिल्लीस जाऊन भेटलो. त्यांनीही उद्‌घाटक म्हणून संमेलनात सहभागी होण्याची तयारी दर्शविली. संमेलनात पाटलांच्या मदतीने मला बहुभाषिक साहित्य संमेलन भरवता आलं. हिंदी, मल्याळी, पंजाबी, उर्दू आदी सात भाषांतले कवी बोलवण्यात आले. हे बहुभाषी कवी संमेलन व आंतरभारती परिसंवाद - ‘भारतीय साहित्य और मेरी भाषा’ या नावाचा- हे परभणी संमेलनाचं वैशिष्ट्य ठरलं, जे आजही रसिकांच्या चांगलं स्मरणात आहे. ते मला करता आलं, याचं कारण माझं हिंदी व इंग्रजीमध्ये असलेलं भारतीय भाषातलं साहित्य वाचन आणि मुख्य म्हणजे तोवर साहित्य संमेलनापासून फटकून राहणाऱ्या चंद्रकांत पाटलांचं यासाठी सहकार्य मिळवणं, यामुळं मला शक्य झालं!

या संमेलनाच्या वेळी काही अभिनव कल्पना आम्ही राबवल्या, त्यातली एक म्हणजे प्रत्येक घरी साहित्य गुढी उभारणे. किमान दहा हजार घरांवर संमेलनाच्या प्रथम दिवशी साहित्यिक गुढी उभारली गेली असेल. गुढीवर तांब्याऐवजी पुस्तक लावण्यात आलं होतं. तसंच संमेलनात मी ऑटोरिक्षावाल्यांना सहभागी करून घेऊ शकलो. संमेलनाच्या काळात कुठूनही दहा रुपयांत संमेलन स्थळी ऑटोरिक्षा चालक साहित्य रसिकांना आणून सोडत. त्यांच्या रिक्षात निमंत्रणपत्रिका आम्ही ठेवल्या होत्या. त्यातून आज काय कार्यक्रम आहेत, हे लोकांना कळत होतं. संमेलनाच्या निधी संकलनाच्या वेळी कोणाकडूनही मोठी देणगी घेतली नाही. अगदी दहा रुपयांपासून देणग्या घेतल्या होत्या. कुणाला सक्ती केली नाही. काहींना हजार रुपये भरून स्वागत समिती सदस्य होण्यास सांगितलं. छोट्या देणग्यांतून अधिकाधिक लोकांपर्यंत जात आम्ही सुमारे 31 लाख रुपये जमा केले. राज्य शासनाने 10 लाख दिले, ते आम्ही खर्च न करता बचत करून ठेवले. संमेलनाचा खर्च केवळ 28 लाख रुपये आला होता. कारण अत्यंत काटकसरीने पण कुठंही कमतरता न ठेवता संमेलन घडवून आणलं. उत्तम व्यवस्था केली, तरीही एवढा कमी खर्च आला. म्हणून मी आजही म्हणतो की, योग्य नियोजन व काटकसर केली तर संमेलनाचा खर्च आटोक्यात राहू शकतो.

मी कार्याध्यक्ष म्हणून जी जबाबदारी पार पाडली त्याचं सर्वत्र कौतुक झालं. संमेलनात ठोकळेबाजपणा नव्हता,  अतिशय नेमकं नियोजन केलं अशी भावना त्यावेळी सर्वांनी व्यक्त केली होती. त्यातच अशोक वाजपेयी या हिंदीतील कवीला आम्ही बोलावल्यानं मराठी साहित्य संमेलनात इतर भाषेतील मान्यवरांना बोलावण्याची चांगली परंपरा सुरू झाली. संमेलनकाळात माझं ‘अंतरीच्या गूढ गर्भी’ हे पुस्तक प्रकाशित झालं. पुढे त्याला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला. त्यामुळं वाङ्‌मयीन विश्वात माझी एक ओळख निर्माण झाली होती. या संमेलनाच्या वेळी विधानसभा निवडणुका लागल्या होत्या व मी परभणी मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकारी होतो. संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप करायचं होतं. 24 जणांनी अर्ज भरल्यामुळं चिन्ह वाटपाला मला वेळ लागला. पाच वाजता उद्‌घाटन होते. मी साडेचार वाजेपर्यंत चिन्हच वाटप करत होतो. त्यामुळं घरी जायला वेळ मिळाला नाही म्हणून उद्‌घाटनासाठी सफारी ड्रेस शिवला होता, तो ऑफिसला मागवून घेतला. बायकोला पुढं पाठवलं व ऑफिसमध्येच कपडे बदलून सर्वांत उशिरा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलो.

वेळेवर उद्‌घाटन समारंभ सुरू करता आला. त्यावेळी निवडणुकीचे जबाबदारीचे काम व त्याच वेळी संमेलनाचं शिवधनुष्य पेलणं, यामुळं रात्रीचा दिवस करणं म्हणजे काय, याचा अनुभव घेतला. त्यासाठी कमाल कार्यक्षमता दाखवावी लागली. दोन्ही जबाबदाऱ्या पेलता आल्या, याचं समाधान होतं! (संमेलन आजही मराठी रसिकांच्या स्मरणात आहे, हे यावर्षी मी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवताना प्रचारादरम्यान वारंवार लक्षात आलं. त्याचाही माझ्या विजयात महत्त्वाचा वाटा आहे, हे नक्की!)

परभणीला मी आर.डी.सी. म्हणून साडेतीन वर्षे होतो. या काळात पदाची सर्व कामं कार्यक्षमतेने करत होतो. इथंच माझी ‘रुक्ष शासकीय कामास मानवी स्पर्श देणारा कार्यक्षम अधिकारी’ अशी प्रतिमा तयार झाली, जी पुढं मला शासनाचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देऊन गेली. त्याची खऱ्या अर्थानं पायाभरणी नांदेड व परभणीला झाली. परभणीला मला मराठवाड्याचे श्रेष्ठ कवी बी. रघुनाथ यांचे पाऊण कोटी रुपयांचे देखणे स्मारक उभारता आले. हे माझ्या साहित्यिक व प्रशासकीय प्रतिभेच्या सुरेख संगमामुळं साकार करता आलं, असं मला वाटतं! संमेलनातच अशोक वाजपेयी व नारायण सुर्वेंच्या शुभहस्ते त्याचा आम्ही भूमीपूजन समारंभ घडवून आणला. त्यावेळी भाजप-शिवसेना युतीचं सरकार होतं आणि दिवाकर रावते मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्याशी कामानिमित्तानं चांगलाच परिचय झाला होता. त्यांना मी स्मारकाला मदत करण्याची विनंती केली. त्यांना बी. रघुनाथांचं संमेलनात (श्रीकांत उमरीकर व इंद्रजित भालेरावांनी संपादित केलेलं) तीन खंडाचं साहित्य वाचायला दिलं माझ्यासाठी हा प्रशासकीय जीवनातला दुर्मिळ असा योग होता की, रावतेंनी स्मारकासाठी शासनाचे सत्तर लाख रुपये विशेष मंजुरी म्हणून बांधकाम सुरू होण्यापूर्वी दिले. त्यामुळंच हे स्मारक बांधता आलं.

पुढं अकोल्याला आल्यावर रावतेंच्या हस्ते व कविवर्य ग्रेस, ना. धों. महानोर व रा. रं. बोराडे यांच्या उपस्थितीत बी. रघुनाथांचा अर्धपुतळा बसवून लोकार्पण केलं. हे माझं लेखकीय कर्तव्य होतं, ते मला निभावता आलं, याबाबत आजही कृतार्थतेची भावना आहे. साक्षरता अभियानामुळं माझं नाव झालं होतं, साहित्य संमेलनानं खूप प्रसिद्धी दिली. साडेतीन वर्ष पूर्ण झाली होती. बदली होणं क्रमप्राप्त होतं; पण त्याच वेळी मी अप्पर जिल्हाधिकारी पदाच्या पदोन्नतीसाठी पात्र होतो, व ऑगस्ट 1996 मध्ये ती मिळणार होती. तरीही एक महिना राहिला असताना जुलैलाच आयुक्तांनी माझी बदली केली. मी विभागीय आयुक्तांना म्हटलं की, एक महिना माझी बदली थांबवा, ते शक्य नसेल तर मी रजा घेतो. पण प्रशासनाला ते रुचलं नाही. माझी बदली झाली व प्रमोशनपूर्वी केवळ 15 दिवसांसाठी मला बदलीवर भूसंपादन अधिकारी म्हणून नांदेडला रुजू व्हावं लागलं. प्रशासनात सब घोडे बारा टक्के असतात, हेच खरं! तुमची कार्यक्षमता अशा वेळी विचारात घेतली जात नाही, हा धडा मला या बदलीनं मिळाला.

प्रश्न - परभणीनंतर पुन्हा औरंगाबाद-तिथले अनुभव व पुढची साहित्यिक वाटचाल कशी राहिली?

 - मला पदोन्नती मिळाली तेव्हा पुण्याची प्रशिक्षण संस्था यशदासाठी अर्ज केला. तिथं एक पोस्ट होती, ती मला मिळाली; पण औरंगाबादच्या कमिशनर ऑफिसला दोन रिक्त पदं होती. तिथं मला सांगून घेतलं, आयुक्त रमेश कुमार यांनीच. मी त्यांना सांगितलं, ‘मला हे पद नको म्हणून.’ पण ते म्हणाले, ‘तिथं यशदात काय आहे? प्रशिक्षण देण्याचं प्राध्यापकी काम. इथं विभागीय स्तरावर  काम करा. मोठी यंत्रणा आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या अंतर्गत असतील.’ त्यामुळं मला औरंगाबादला उपायुक्त पुरवठा या पदावर रुजू व्हावं लागलं. तिथं मी कार्यालयीन कामही मनापासून केलं. काही कठोर निर्णय घेतले. विभागातील सगळ्या जिल्ह्यात धाडी टाकण्यापासून सर्व प्रकारची कामं करत गेलो. माझी धडाडीनं काम करण्याची पद्धत आयुक्तांना आवडली, म्हणून त्यांनी मला सांगून पुनर्वसनाचं अतिरिक्त काम दिलं. त्यानंतर वर्षभर महसूलचाही पदभार सांभाळला. तेही मी आनंदाने केलं. उपायुक्त पुरवठा विभाग, पुनर्वसन व महसूल, असे तीन वर्ष तिथे काढले.

त्याच काळात माझ्या साहित्य लेखनानं गती घेतली होती. त्या एका वर्षात सहा दिवाळी अंकांत कथा लिहिल्या. औरंगाबादला असताना माझा ‘पाणी! पाणी!’ हा कथासंग्रह आला. त्याला राज्य पुरस्कार, मसाप पुणे व मसाप औरंगाबाद पुरस्कार मिळाले. परभणीला संमेलन यशस्वीपणे घेतलं म्हणून औरंगाबादच्या साहित्य परिषदेनं मला स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं. तिथंही मी जमेल तेव्हा साहित्यिक उपक्रमात भाग घेत होतो. 1998 हे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष होतं. भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, पण मराठवाड्यास व तेलंगणास 17 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ॲक्शननं निजामाचा पाडाव केल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. त्याचा समारंभ मुस्लीम अनुनयासाठी हैद्राबादला फारसा झाला नाही, पण महाराष्ट्रात युती सरकारच्या पुढाकारानं दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा मुक्ती संग्राम मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय झाला. त्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांनी माझ्यावर टाकली. ती मी नवं आव्हान म्हणून स्वीकारली.

मराठवाडा मुक्ती संग्रामाची स्मृती म्हणून मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांत स्मृतीस्तंभ उभारण्यात आले. त्यासाठी शिल्पकार उत्तम पाचरणे यांच्यासोबत तासन्‌तास चर्चा करून, त्याचे डिझाईन व आराखडा निश्चित केला. तज्ज्ञ इतिहासकारांकडून त्यास मान्यता घेतली. आज हे स्मृतीस्तंभ पाहताना माझं मन त्या मंतरलेल्या आठवणीनं भावूक होतं! त्या स्तंभांवर ‘मराठवाडा गीत’ कोरलेलं आहे. ते मी लक्ष्मीकांत तांबोळी यांच्याकडून खास लिहून घेतलं होतं, त्याला संगीतकार नाथ नेरळकरांनी सुरेल चालही दिली होती.

दिवाकर रावते व आयुक्तांपुढे मी एक कल्पना मांडली की, या निमित्तानं मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा रोमहर्षक इतिहास तरुण पिढीपर्यंत पोचविण्यासाठी एक ग्रंथ निर्माण करावा. रावतेंना ती कल्पना आवडली आणि तो ग्रंथ मला प्रा.वि.ल.धारुरकरांच्या सहकार्यानं संपादित करता आला. त्याच्या प्रती आम्ही सर्व शाळा-कॉलेजला दिल्या. 17 सप्टेंबर 1998 ला त्याचा मुख्य शासकीय समारंभ मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते नांदेडला झाला. तिथं या ग्रंथाचं प्रकाशन त्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांसोबत लेखक/ संपादक म्हणून मंचावर बसता आलं. या ग्रंथाच्या संपादनाच्या वेळी मला या संग्रामाचे नेते गोविंदभाई श्रॉफ यांचा सहवास लाभला. तो माझ्यासाठी फार मोठा लाभ होता.

याच वेळी माझ्या मनात हैद्राबाद मुक्तीसंग्रामावर एक कादंबरी लिहावी, असा विचार आला, अजूनही त्याला मूर्तरूप आलेलं नाही. असो. आणि अशा रीतीनं माझी औरंगाबादची कारकीर्द संपली व पुणे इथं बदली झाली. पण याच काळात परभणीला लिहायला सुरू केलेली ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’ ही कादंबरी इथंही दमादमानं लिहीत होतो. त्याचं कथाबीज परभणीला असताना सुचलं होतं. निमित्त होतं, 1996 साली अफगाणिस्तानचे कम्युनिस्ट राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाहला यांना भर चौकात दिलेली फाशी व मुलाहिदीन नेता रब्बानीचे सत्तेवर येणे. याबाबत संमेलनात ओळख झालेल्या शंकर सारडा यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, ‘फारच छान विषय आहे कादंबरीसाठी. तू लिही’दर महिन्याला ‘लिहायला सुरुवात केली की नाही’, असं ते विचारायचे. मला त्यांनी त्यासाठी काही रशियन पुस्तकं पाठवली. आणि मग मी मनावर घेऊन कादंबरी लिहायला सुरू केली.

परभणीला शिवाजी कॉलेजचे उपप्राचार्य किशन चोपडे माझे मित्र होते. राज्यशास्त्राचे प्राध्यापक असल्याने त्यांनी मला अनेक संदर्भ उपलब्ध करून दिले. रिसर्च कसा करावा, अभ्यास कसा करावा, हे त्यांनी शिकवलं. परभणीला सुरू झालेली कादंबरी औरंगाबादला असताना साठ टक्के लिहून झाली, नंतर पुण्यात आल्यावर ती पूर्ण झाली. (क्रमश:)

Tags: साहित्य संमेलन साक्षरता अभियान पाणी पाणी इन्किलाब विरुद्ध जिहाद sahitya sammelan saksharata abhiyan pani pani inkilab viruddh jihad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in

 भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात