डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

प्रगतिशील लेखक-नाट्य चळवळ आणि अण्णा भाऊ साठे

प्रलेस आणि इप्टाच्या चळवळीत मराठीतले अण्णा भाऊ साठे हे एकमेव साहित्यिक-कलावंत सहभागी होते. इप्टाशी संलग्न 1944 मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या शेतकरी अधिवेशनात ‘लाल बावटा’ हे कलापथक स्थापन झाले. त्यात अण्णा भाऊ साठेंसोबत अमर शेख व द.ना. गवाणकर हे तीन शाहीर होते. या त्रिमूर्तीनं पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढीत मार्क्सवादाचा वर्गविग्रहाचा सिद्धांत आणि शोषक-शोषितांचा संघर्ष लोककलेच्या माध्यमातून- पोवाडे व तमाशाच्या माध्यमातून- सामान्य गरीब बहुजन वर्गापर्यंत पोचवला.  गिरणी-गोदीत काम करणाऱ्या कामगारांना कम्युनिस्ट पक्षाशी जोडण्याचं महत्त्वाचं काम ‘लाल बावटा’ कलापथकानं केलं!

अण्णा भाऊ साठे यांच्या या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे जीवन, साहित्य आणि कार्यकर्तृत्व यावर विविध अंगांनी वेध घेणारे लेख व साहित्य विपुल लिहिले गेले आहे आणि त्याद्वारे त्यांचं मोठेपण व देश-समाजाला त्यांनी दिलेल्या योगदानाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे; पण माझ्या मते, त्यात एक भाग राहून गेला आहे. तो म्हणजे- त्यांचं भारतीय साहित्यातील पुरोगामी वळणाचे ‘प्रगतिशील लेख संघ’ (प्रलेसं) आणि कलेचा प्रबोधनासाठी वापर करण्यासाठी निर्माण झालेले ‘जननाट्य मंच’ अर्थात ‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) या दोन कम्युनिस्टप्रणीत संस्थांतलं त्यांचं स्थान, योगदान आणि त्यांच्या विचार-तत्त्वज्ञानाला दिलेलं नवं वळण. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनातल्या या एका रोमहर्षक पर्वाकडे दलित चळवळीनं जसा काणाडोळा केला तसंच इंग्रजी-हिंदी-उर्दूमध्ये प्रगतिशील लेखक संघ (प्रलेसं) आणि इप्टाबाबत झालेल्या विपुल लेखनातही अण्णा भाऊ साठेंचे नाव जरूर येतं, संदर्भ पण येतात; मात्र पुरेशा तपशिलानं त्यांचं योगदान त्यातही शब्दबद्ध झालेलं नाही. स्वत: अण्णा भाऊंनी पण त्यावर काही लिहिलं नाही- अगदी त्यांच्या ‘माझा रशियाचा प्रवास’ या (भारतीय साहित्यानं नोंद घ्यावी अशा) पहिल्या दलित प्रवास- वर्णनातही त्याबाबत काही मजकूर नाही. त्यामुळे विविध पुस्तके व लेख-आठवणींत (तेही प्रामुख्याने इंग्रजी-हिंदी भाषेतील लेखात) अण्णा भाऊ साठे यांचे जे काही संदर्भ आले आहेत, त्या आधारे आणि त्यांच्या साहित्याचा मागोवा घेत प्रलेसं व इप्टाशी त्यांचा असलेला संबंध व योगदान यावर हा लेख लिहीत आहे.

त्यासाठी प्रथम संक्षेपानं ‘प्रगतिशील लेखक संघ’ (प्रलेसं) आणि ‘इप्टा’ या दोन्ही संस्थांचा इतिहास, साहित्य व नाट्यकलेला त्यांनी दिलेलं नवं वळण समजावून घेणं आवश्यक आहे. 1917 ची मार्क्स विचारधारा शिरोधार्य मानणारी बोल्शेव्हिक क्रांती सोव्हिएत युनियनमध्ये झाली आणि जगातील अनेक तरुण, विचारवंत आणि कलावंतांचं तिनं लक्ष वेधून घेतलं. वर्गविहिन, शोषणमुक्त व खऱ्या अर्थानं स्वतंत्र असं ‘साम्यवादी जग’ निर्माण होण्याची सोव्हिएत युनियनमधील क्रांती ही सुरुवात होती आणि जगातले सारे कामगार एक होऊन निर्घृण व शोषण करणारी भांडवलशाही नष्ट करतील, याचा हा प्रारंभ आहे- अशी भावना जगभरातील बुद्धिजीवी डाव्या विचारांच्या माणसांत निर्माण झाली होती. युरोपात शिकलेल्या व इतिहासाचं डोळस भान असणाऱ्या उदारमतवादी पंडित नेहरूंनाही त्या भावनेची मोहिनी पडली होती. त्यामुळे भारतात कम्युनिस्ट चळवळ रुजणं स्वाभाविक होतं. पुन्हा पी.सी. जोशी या द्रष्ट्या कम्युनिस्ट नेत्यानं मार्क्सवादी कलाविचार हा मानवमुक्तीच्या लढ्यासाठी कलावंतांमध्ये भरवून, सामान्यांच्या मनात रुजवून त्यांना क्रांतिप्रवण करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह रायटर्स मूव्हमेंटचा- प्रगतिशील लेखक चळवळीचा- पाया घातला आणि उर्दू-हिंदीमधील एक फार मोठा लेखक-कवींचा वर्ग या चळवळीत सामील झाला.

प्रेमचंदसारखा दिग्गज लेखक 1936 मध्ये लखनौमध्ये झालेल्या पहिल्या प्रगतिशील लेखक संमेलनाचा अध्यक्ष होता. त्यांनी ‘साहित्य का उद्देश’ या शीर्षकाचं जे अध्यक्षीय भाषण केलं, ते आज ऐंशी वर्षे झाली तरी प्रासंगिक आहे. या चळवळीला पंडित नेहरू व गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचा पाठिंबा होता. त्यामुळे प्रगतिशील लेखक चळवळीचा दबदबा व मार्क्सचा कलाविचारदेशभर  वाढत गेला. कलावंतांनी सामान्य कष्टकरी जनतेच्या आवाज बनून त्यांची दु:खं सहृदयतेने समजून घेत प्रगट केली पाहिजेत व त्यांना जगण्याचं बळ दिलं पाहिजे, हा नवा मार्क्सप्रणीत साहित्यविचार भारतीय साहित्यात दृढ झाला. प्रेमचंदांनी ‘हमे खूबसुरती का मय्यार बदलना होगा’ असं म्हणत श्रमिक कामगारांच्या घामात सुगंध आणि अहर्निश काम करणाऱ्या स्त्रीच्या राठ पडलेल्या तळहातांवरील रेषांच्या जाळ्यात सौंदर्य पाहणं म्हणजे सौंदर्यबोध- असं नवं पुरोगामी तत्त्व प्रस्थापित केलं. त्यामुळे गरीब शेतकरी, शोषणाला बळी पडणारा कामगार आणि पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे दुय्यमत्व भोगणाऱ्या स्त्रीचं दु:ख, वेदना व संघर्षाचं प्रतिबिंब भारतीय साहित्यात- खासकरून उर्दू साहित्यात- जोरकसपणे पडायला प्रारंभ झाला होता.

या चळवळीनं उर्दूसोबत हिंदी साहित्याला नवं वळण दिलं. तसेच तिचा प्रभाव पंजाबी, बांगला आणि दक्षिणेतील मल्याळम या भाषांतील साहित्यावर पडला होता. त्यातून ‘समाजवादी वास्तवता’ (सोशलिस्टिक रिॲलिझम) या तत्त्वज्ञानाच्या आधारे समाजातील मूलभूत अंतर्विरोधाचा अचूक आणि समग्र वेध घेणारे साहित्य निर्माण झाले. प्रेमचंदांनी जो ‘साहित्य का उद्देश’ सांगितला होता, तो विचार अंतरंगी मुरवून (इंटर्नलाईज करून) 1935 ते 1960 या कालखंडात वैश्विक भान असलेले सकस साहित्य लक्षणीय संख्येने निर्माण झाले.

पण या प्रगतिशील लेखक संघाच्या चळवळीत महाराष्ट्र प्रलेसचे मुख्य केंद्र मुंबईत असूनही अण्णा भाऊ साठे यांचा (आणि काही प्रमाणात मामा वरेरकरांचा) अपवाद वगळता अन्य लेखकवर्ग सामील झालेला नव्हता. त्या वेळी 1940 च्या दशकात मराठी साहित्यात दोन वाद गाजले होते. पहिला वाद म्हणजे ना.सि. फडके विरुद्ध वि.स. खांडेकरांचा ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला?’ हा लुटीपुटीचा व अंतिमत: रंजनवादी साहित्याचीच री ओढणारा वाद होय. दुसरा वाद म्हणण्यापेक्षा नवकथा-काव्याची चळवळ एका ठरावीक वर्तुळात फिरणारी- मनोविश्लेषणवादी, अनुभूतीची टोकदार अभिव्यक्ती या परिभाषेत अडकलेली. दलित-वंचित-पीडित समाज, जो भारतात बहुसंख्य- बहुजन आहे त्याला या दोन्ही साहित्यप्रवाहांत अभावानंच स्थान होतं. हे असं का घडलं असावं? एकच कारण संभवतं. तत्कालीन साहित्यिकांना फुले विचार, आंबेडकरी चळवळ, मार्क्सवाद आणि गांधीप्रणीत भारतीय विचार (या चारही विचारांनी तत्कालीन भारतीय साहित्य प्रभावित होत असताना) यांची वाटणारी ॲलर्जी किंवा त्याकडे पाठ फिरवण्याची रंजनवाद- शरण अभिजनवृत्ती. मराठी साहित्याची ही कोंडी फुटायला 1960 चं दशक उजाडावं लागलं, जेव्हा दलित साहित्य जोरकसपणे अवतरलं- जे माझ्या मते समाजवादी वास्तवाचं प्रतिबिंबित झालेलं- एक प्रकारे प्रलेस विचारातलं साहित्य आहे.

मार्क्सवादप्रणीत दुसरी महत्त्वाची चळवळ म्हणजे जननाट्य मंच- पीपल्स थिएटर, अर्थात इप्टा. तिची बीजं प्रलेस चळवळीत दिसतात. 1940 मध्ये स्थापन झालेली कलकत्त्याची ‘युथ कल्चरल इन्स्टिट्यूट’, बेंगलोरचं पीपल्स थिएटर इ. 1942 च्या बंगालच्या लाखो लोकांचा उपासमारीनं बळी घेणाऱ्या दुष्काळानं सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या तत्कालीन कलावंतांनी बंगालच्या दुष्काळासाठी नाट्यप्रयोगातून भरीव निधी जमा केला. त्यासाठी देशभरात विविध प्रांतांत कला-सांस्कृतिक पथकं स्थापन झाली. तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस पी.सी. जोशी हे द्रष्टे नेते होते. त्यांची साहित्य व सांस्कृतिक जाण विलक्षण होती. मानवमुक्तीचा मार्ग हा शोषणमुक्तीनेच साध्य होतो आणि त्यासाठी शोषित हा पेटून उठला पाहिजे व कृतिप्रवण झाला पाहिजे. त्यासाठी त्याला सुबोध भाषेत मार्क्सवाद समजावून सांगण्यासाठी भारताच्या समृद्ध लोककलेचे माध्यम उपयुक्त ठरेल, हे त्यांनी अचूकपणे ओळखलं. पुन्हा बंगालला मदत करण्यासाठी देशभर जे कलापथक सामाजिक बांधिलकीनं निर्माण झालं होतं; त्यांना एका मार्क्सप्रणीत कला-साहित्य विचारात गुंफून देशव्यापी नाट्य-कला चळवळ उभारण्याची आवश्यकता पी.सी.ना वाटली आणि मुंबईच्या मारवाडी हायस्कूलच्या प्रांगणात देशभरच्या कलावंतांच्या सहभागानं संपन्न झालेल्या एका खास अधिवेशनात ‘इप्टा’ची स्थापना 25 मे 1943 रोजी झाली. जननाट्य मंच (पीपल्स थिएटर) हे नाव जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ होमी भाभांनी दिलं, जे त्यांना रोमा रोलाँडच्या ‘पीपल्स थिएटर संकल्पना’ विशद करणाऱ्या पुस्तकावरून सुचलं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते बंगालचे प्रा. हिरेन मुखर्जी. त्यांनी या वेळी एक प्रेरक संदेश सर्व कलावंतांना दिला. ते म्हणाले, ‘‘या सर्व लेखक-कलावंतांनो, अभिनेते व नाटककारांनो- जे-जे हात आणि मेंदूने काम करतात, ते सारे-सारे या आणि स्वत:ला सामाजिक न्याय व स्वातंत्र्य देणाऱ्या एका नव्या धाडसी जगाच्या निर्मितीसाठी स्वत:ला वाहून घ्या.’’ ('Comewriters and the artist, come actor and the playwriter,come all who work by hand or by brain, dedicateyourself to the task of building a brave world offreedom and social justice.') इप्टाचं मिशन स्टेटमेंट- घोषवाक्य होतं, ‘जननाट्य मंचाचे तारे लोक आहेत.’ (Peole's Theatre stars the People.) आणि लोगो होता दोन्ही हातांनी ड्रम किंवा ढोलकं वाजवणारा कलावंत. कारण हलगी वाजवत गावात खबर देण्याची परंपरा होती, तिचं हे आधुनिक आविष्करण पीपल्स थिएटरसाठी सार्थक होतं!

प्रलेस आणि इप्टाच्या चळवळीत मराठीतले अण्णा भाऊ साठे हे एकमेव साहित्यिक-कलावंत सहभागी होते. इप्टाशी संलग्न 1944 मध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या शेतकरी अधिवेशनात ‘लाल बावटा’ हे कलापथक स्थापन झाले. त्यात अण्णा भाऊ साठेंसोबत अमर शेख व द.ना. गवाणकर हे तीन शाहीर होते. या त्रिमूर्तीनं पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढीत मार्क्सवादाचा वर्गविग्रहाचा सिद्धांत आणि शोषक-शोषितांचा संघर्ष लोककलेच्या माध्यमातून- पोवाडे व तमाशाच्या माध्यमातून- सामान्य गरीब बहुजन वर्गापर्यंत पोचवला. प्रामुख्याने मुंबईत देशावरून- खास करून पश्चिम महाराष्ट्र व कोकणातून आलेल्या व गिरणी-गोदीत काम करणाऱ्या कामगारांना कम्युनिस्ट पक्षाशी जोडण्याचं महत्त्वाचं काम ‘लाल बावटा’ कलापथकानं केलं! पण ही शाहीर त्रिमूर्ती आणि एक नाटककार मामा वरेरकर वगळता या जननाट्यमंचच्या चळवळीशी मराठी कलावंत व नाटककार जोडले गेले नाहीत, हा इतिहास आहे.

दि.1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णा भाऊ साठे यांचा जन्म वाटेगाव, जिल्हा सांगली येथे झाला. अनुसूचित जातींमधल्या मातंग समाजात जन्मलेले अण्णा भाऊ यांना दारिद्र्यासोबत वर्णव्यवस्थेचे चटके बालपणापासूनच सोसावे लागले होते. अनुदार व जात्यंध्य शिक्षकामुळे ते शाळेत केवळ दीडच दिवस टिकले, पण गावकुसाबाहेरच्या संघर्षपीठात आणि पुढे वयाच्या अकराव्या वर्षी मुंबईला आल्यावर वास्तव्य असणाऱ्या लेबर कॅम्पच्या कामगारपीठात त्यांचं खरं शिक्षण झालं. जनार्दन वाघमारेंनी कामगारांसाठी प्रसिद्ध असलेल्या (आता ज्याचं टोलेजंग इमारती व मॉल्समध्ये रूपांतर झालं आहे) गिरगावचा संदर्भ देत ‘अण्णा भाऊ साठे गिरणगाव विद्यापीठात शिकले, ज्याचे कुलगुरू मॅक्झिम गॉर्की होते’ असं सार्थ वर्णन केलं आहे.

भाकरीच्या शोधात अण्णा भाऊ साठे यांचे वडील अन्य कुटुंबीयांसह मुंबईला आले आणि मुंबईत लेबर कॅम्पमध्ये राहू लागले. इथेच वयाच्या अकराव्या वर्षी अण्णा भाऊंनी मार्क्सवादाची वैचारिक बांधिलकी स्वीकारत कम्युनिस्ट पक्ष जवळ केला. शेवटपर्यंत ते कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड होते, हे आज बहुसंख्य साठेप्रेमी जनतेला माहीत पण नाही. ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : निवडक वाङ्‌मय’ या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत संपादकीय लिहिताना कविवर्य अर्जुन डांगळे यांनी अण्णा भाऊंच्या या कालखंडावर आणि वैचारिक जडण-घडणीवर थोडासा प्रकाशझोत टाकला आहे, त्यातला काही भाग खाली उद्‌धृत केला आहे :

‘कॉम्रेड शंकर पगारेंचा लोककलेतून कम्युनिस्ट चळवळ कामगारवर्गात रुजविण्याचा विश्वास अण्णा भाऊंनी आपल्या शाहिरीनं सार्थ केला, हा इतिहास आहे. पाठपुरावा, उत्तेजन व बक्षीस देणे या आयुधांचा वापर करून अण्णा भाऊ साठेंमधला लोककलावंत पगारेंनी फुलवला आणि त्यांच्याकडून बरीच वगनाट्य लिहून घेतली. अण्णा भाऊ साठे यांनी त्यांचा मावसभाऊ बापू साठे यांनी सांगितलेल्या एका लोककथेच्या आधारे लेबर कॅम्पमध्ये कामगारजीवन जगत असताना ‘अकलेची गोष्ट’ हा पहिला वग लिहिला. त्याचा प्रयोग परळला कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय जिथे होते, त्या दळवी बिल्डिंगच्या गच्चीवर झाला. त्या प्रयोगाला कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज नेते कॉ.गंगाधर अधिकारी, बी.टी. रणदिवे आणि मुख्य म्हणजे पी.सी. जोशी- जे त्या वेळी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते, ते उपस्थित होते. त्या सर्वांना अण्णा भाऊ साठेंच्या लेखणीचे सामर्थ्य जसे जाणवले, तसेच त्यांची तमाशा व लोककलेवरची हुकूमत जाणवली. तो प्रयोग सामान्य कामगार प्रेक्षकांचं मनोरंजनासोबत प्रबोधन करणारा होता, हे पी.सी. जोशींच्या कलावान सांस्कृतिक नजरेनं हेरलं आणि पुढे त्यांच्यामुळे अण्णा भाऊ साठे प्रथम कम्युनिस्ट पक्षात आले, मग प्रलेस व इप्टामध्ये लेखक-शाहीर म्हणून काम करू लागले.

पण त्यांच्या मनात मार्क्सवादाचं बीजारोपण गावी असताना पत्री सरकारफेम क्रांतिवीर नाना पाटल यांच्या भाषणामुळे झालं होतं. त्याचाही रोचक किस्सा- खरा घडलेला आहे. मुंबईत आल्यावर कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करण्यापूर्वी वडिलांच्या निधनानंतर काही काळ अण्णा भाऊ गावी आले होते आणि बापू साठेंसोबत तमाशा प्रयोग करीत होते. एका प्रयोगाच्या वेळी मंचावर नाना पाटील अचानक आले आणि त्यांनी ब्रिटिश सरकारच्या शोषणकारी धोरणावर त्यांच्या खास रांगड्या शैलीत टीका करीत गिरणी कामगारांच्या होणाऱ्या पिळवणुकीबाबत भाष्य केलं, तसंच नवभांडवलदारवर्गाची निर्भर्त्सना केली. त्यांच्या भाषणाचा अण्णा भाऊ साठेंवर खोल परिणाम झाला होता. त्याची परिणिती 1942-43 मध्ये ‘अकलेच्या गोष्टी’मुळे पी.सी. जोशी, रणदिवे, पगारे आदींच्या प्रयत्नातून सहजपणे कम्युनिस्ट पक्षात सामील होण्यात झाली.’

आता विविध आठवणींवजा लेख, संदर्भ आणि जाता-जाता केलेल्या उल्लेखांतून जी माहिती मिळते, ती जोडून मी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रलेस व इप्टाच्या कालखंडावर वस्तुनिष्ठ प्रकाश टाकायचा प्रयत्न करणार आहे.

कम्युनिस्ट पक्षाची मुंबईजवळ (बहुतेक) टिटवाळा येथे 1944 मध्ये शेतकरी परिषद भरली होती. त्या वेळी मराठी माणसांच्या प्रबोधनासाठी आणि त्या माध्यमातून कम्युनिस्ट चळवळीची विचारधारा प्रसुत करण्यासाठी ‘लाल बावटा’ या कलापथकाची स्थापना झाली. तिथे अण्णा भाऊ साठे, अमर शेख व द. ना. गव्हाणकर हे तीन शाहीर एकत्र आले. त्यांनी कम्युनिस्ट चळवळ कामगार-शेतकऱ्यांत रुजवण्यासाठी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. पुढे या त्रयीचं संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील योगदान सर्वश्रुत आहे.

प्रगतिशील लेखक संघाचं पहिलं अधिवेशन 1936 मध्ये प्रेमचंदाच्या अध्यक्षतेखाली भरलं होतं आणि त्याद्वारे प्रगतिशील लेखक चळवळीचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला, असं मानलं जातं. प्रलेसचं चौथं अधिवेशन मुंबईला 1945 मध्ये संपन्न झालं, ते अनेक अर्थानं ऐतिहासिक ठरलं. त्याचं कारण म्हणजे, मुंबई ही बहुभाषिक नगरी असल्यामुळे इथे हिंदी, उर्दू, मराठी, कन्नड व मल्याळी भाषेतले लेखक-कवींचं एकत्र बसणं, गप्पागोष्टी करत वैचारिक व कला-साहित्य विचारांचं आदान-प्रदान सज्जाद जहिर व अली सरदार जाफरी प्रलेसंच्या मंचाखाली जाणीवपूर्वक घडवून आणत होते. त्यामुळे 1945 च्या अधिवेशनामध्ये उर्दूसाठी जोश मलिहाबादी, हिंदीसाठी पंडित राहुल सांकृत्यायन, बंगालीसाठी सत्येन मुजुमदार, तेलुगूसाठी पेचाइया आणि मराठीसाठी प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते व शैलीदार लेखक श्रीपाद अच्युत डांगे यांची प्रदेश भाषाध्यक्ष म्हणून निवड केली आणि या अधिवेशनात पाच अध्यक्षीय भाषणे झाली. त्यात डांगे यांनी इंग्रजीत भाषण करताना ‘मराठी भाषा व साहित्यविकास’ यावर मूलभूत स्वरूपाचं, आजही लेखक-कवींना मार्गदर्शक ठरेल असं अध्यक्षीय भाषण केलं. ते भाषण या अधिवेशनाचा सर्वांत संस्मरणीय भाग ठरला. त्यांच्या भाषणाची नंतर पुस्तिकाही प्रकाशित झाली. एका अर्थाने पुढे 1950 च्या दशकात साने गुरुजींनी आंतरभारतीचा प्रयोग सुरू केला, त्याची ही पूर्वावृत्ती म्हणता येईल.

या अधिवेशनाला अर्थातच अण्णा भाऊ हे प्रलेसचे सदस्य लेखक म्हणून उपस्थित होते, तसेच त्यापूर्वी 25 मे 1943 मध्ये स्थापन झालेल्या इप्टामध्ये पण ते सामील झाले होते.

प्रलेसचे संस्थापक-सचिव व आयुष्यभर ज्यांनी या चळवळीसाठी काम केलं, त्या सज्जाद जहिरांनी आपले उर्दू पुस्तक ‘रौशनाई : तरक्कीपसंद तहरिक की यादे’मध्ये अण्णा भाऊ साठेंच्या प्रलेसमधील सहभागाबद्दल संक्षेपानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे, ते असं आहे :

‘अण्णा भाऊ साठे ने इस जमाने में कई पवाडे (पोवाडे) लिखे। ये मजदूरों के हजारों के मजमे मे (मेळाव्यात) गाए जाते थे और बेहद मकबूल (प्रभावी) थे । स्टालिनग्राड की जंग और उस में हिटलरी फौजों की हार पर जो पवाडा था, उसे खास तौर पर मकबुलियत हासिल हुई।’

या काळात अण्णा भाऊ प्रामुख्याने पोवाडे व तमाशा-वग लिहायचे. त्यांचे ‘स्टालिनग्राडचा पोवाडा’, ‘बर्लिन विजय पोवाडा’, ‘बंगालची हाक’ तसेच ‘मुंबई गिरणी कामगार’ हे पोवाडे आणि ‘मुंबईची लावणी’ आदी शाहिरी वाङ्‌मय याच काळातले. ते स्वत: गाऊन आपल्या रचना हजारो कामगारांपुढे सादर करायचे. पुढे त्यांनी ‘तेलंगणाचा संग्राम’, ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ हे पोवाडे लिहिले. त्यांचा शाहिरी वाङ्‌मयाचा गाभा होता कामगार-शेतकऱ्यांचं होणारं शोषण. त्यासाठी कम्युनिस्टप्रणीत साम्यवादी क्रांती, द्वितीय महायुद्धातला हिटलर-मुसोलिनीच्या फॅसिझमचा सोव्हिएत युनियननं केलेला पराभव व त्यातून जगाची केलेली सोडवणूक, हिंदू-मुस्लिम एकता आणि शेतकरी-कामगार हेच आपल्या श्रमातून देश घडविणारे निर्माते आहेत, त्यांना सन्मानानं जगता आलं पाहिजे- हे प्रलेस चळवळीचे विचार व श्रद्धा होती. अण्णा भाऊंची सुबोध पण प्रभावी मराठी भाषा, पोवाडा काव्यप्रकारावरची हुकूमत व तिच्या सर्व सामर्थ्याचा वापर करून श्रोत्यांना प्रबोधन करीत रिझवणं, या दृष्टीने अण्णा भाऊ हे मराठीतले पहिले क्रांतिकारी व पुरोगामी शाहीर ठरतात!

अण्णा भाऊ साठे यांचा ‘नानकिंग नगरापुढे’ हा चीनचा मार्क्सवादी फौजेच्या विजयाचा पोवाडा आज उपलब्ध नाही. मात्र 1942 मध्ये लिहिलेल्या ‘स्टालिनग्राडचा पोवाडा’नं अण्णा भाऊंना कम्युनिस्ट वर्तुळात लोकप्रिय बनवलं आणि त्यातूनच पुढे स्थापन झालेल्या ‘लाल बावटा’ या कलापथकात ते सामील झाले. स्टालिनग्राडच्या लढाईत नाझी भस्मासुराचा दारुण पराभव झाला. या युद्धाचं तपशीलवार वर्णन करणारा हा पोवाडा आहे. त्याची सुरुवात लक्षवेधक आहे. रशियाकडे दलितांचा आशाकिरण या स्वरूपात पाहत अण्णा भाऊ पोवाड्याची सुरुवात अशी करतात-

दलितांचा आशाकिरण रशियाचा प्राण

जंगजंगी जान लढविले

रोस्तो आणि खार्को, रक्षिले लेनिनग्राड मास्को

नाझीचा काळ तिमेंशेंक। जीऽ जीऽऽ जीऽऽऽ

या पोवाड्याबाबत बाबूराव गुरव यांनी ‘अण्णा भाऊ साठे : समाजविचार आणि साहित्यविवेचन’ या पुस्तकात मार्मिक मत नोंदवले आहे. ते असे आहे-

‘‘आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीला अभिमान वाटावा असा कम्युनिस्टांच्या गौरवशाली विजयाचा पोवाडा अण्णा भाऊंनी मुंबईच्या कामगारांसाठी रचून गायला. पोवाड्याची धावती रचना, ओघवती भाषा आणि मांडणीतला वेग यामुळे हा पोवाडा आकर्षक बनला आहे. ‘फितुरीची डाकीण’सारखी प्रतिमा, विजयोन्मादाने दारूची नशा चढल्यामुळे रूळ बदलून गडगडा लोळणारी रेलगाडी, गनीम होऊन पाठीमागे लागलेले ओढे-नाले, झाडे, जंगले आणि दिव्यावर पतंगाने झडप घालावी, तसे स्टालिनग्राडवर झडप घालणारे नाझी- अशा काही प्रतिमांमधून अण्णा भाऊंचे प्रभावी भाषेचे वेगळेपण जाणवते. आंतरराष्ट्रीय वर्गाशी अनुबंध जुळवू पाहणारा हा पोवाडा त्यांच्या व्यापक विचारविश्वाची सखोल जाण स्पष्ट करतो.’’

‘बर्लिनचा पोवाडा’ हाही सोव्हिएत युनियनचा विजय व हिटलरचा पाडाव सांगणारा आहे. बाबूराव गुरवांच्या मते, ‘‘आज जरी हे दोन्ही पोवाडे गद्यप्राय वाटत असले, तरी त्या काळी मुंबईच्या कामगारांसाठी त्यांची निर्मिती झाली होती. हे दोन्ही पोवाडे प्रचारी व प्रबोधनपर होते आणि आज ते कालबाह्य झाले आहेत, तरी साहित्याच्या इतिहासाने त्यांची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी एवढे ते महत्त्वाचे दस्तावेज स्वरूपाचे आहेत.’’

स्वतंत्र भारताच्या तेलंगणातील शेतकऱ्यांचा सशस्त्र लढा हा जमीनदारीविरुद्ध कसणाऱ्या शेतकरी कुळांचा कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला होता. प्रथम तो निजाम राजवट असताना सुरू झाला, नंतर तो 1951 पर्यंत सुरू होता. पण भारत सरकारनं तो निर्घृणपणे चिरडून टाकला. या तेलंगणाच्या शेतकरी लढ्यावर अण्णा भाऊ साठेंच्या ‘तेलंगणचा संग्राम’ हा पोवाडा आहे, तो शेतकरी लढ्याच्या ऊर्ज्वस्वल रूपाचं वर्णन करणारा आहे. मात्र त्यांनी नंतर हा लढा चिरडून टाकला होता, त्यावर काही लिहिलं का नाही, याचं नवल वाटतं.

अण्णा भाऊंचा ‘तेलंगणचा संग्राम’ हा तेथील कष्टकरी जनतेने दिलेल्या अभूतपूर्व लढ्याला साथ देण्याचं आवाहन करण्यासाठी लिहिलेला ओजस्वी पोवाडा आहे. ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा करावा व सर्व शेतीचे कसणाऱ्या शेतकऱ्यांना वाटप करावं, यासाठी तेलंगणचा शेतकरी लढा होता. ऐकणारा संतापाने पेटून उठावा, असे निजामाच्या व रझाकारांच्या अत्याचारांचे प्रभावी वर्णन या पोवाड्यात अण्णा भाऊ करतात. पुढे लढणारा बहाद्दर शेतकरी डगमगला नाही की भयभीत झाला नाही, हे सांगताना शाहीर अण्णा भाऊ म्हणतात,

परी शेतकरी तेलंगणचा गहूभर नच नमला

सागरापरी निजामावरी उसळुनी वर आला

लोकशाहीसाठी जनतेनं। एक होऊन। लढा उभारिला।।

बेबंद या सुलतानीचा। नाश करण्याचा। पुकारा केला।।

जमीनदारी आणि साहुकारी। क्रूर जहागिरी। चूर करण्याला।।

त्याने निजामाच्या तक्ताला। हैदराबादेला। हादरा बसविला।।

निजामी राज्य बरबाद । दुमदुमला नाद।

उमटे पडसाद । तेलंगण लाले लाल झाला।

वरंगळ नारगोंडा जिल्हा।

सूर्य पेठेत जोम भरला।

चारी बाजूंना उठला शेतकरी । देऊनी ललकारी।

बाबूराव गुरव यांनी पोवाड्यांचं महत्त्व उलगडून दाखवताना असं लिहिलं आहे की-

‘हा लढा म्हणजे केवळ तेलंगणमधला उठाव नसून, संस्थानाच्या चाळीस लाख जनतेचा तो मुक्तिसंग्राम आहे. कष्टकरी माणसांच्या अस्मितेचा आणि आकांक्षांचा हा नवा लढा म्हणजे पेटता पलिता आहे, अशा पद्धतीने तेलंगण संग्रामाला वर्गयुद्धाचे शास्त्रीय स्वरूप देण्याचा ते प्रयत्न करतात. जिथे जिथे शोषणमुक्तीचा आवाज उठेल, त्या आवाजाला संघटित वर्गलढ्याचे स्वरूप देण्याचा त्यांचा प्रयत्न हा प्रगतिशील लेखक चळवळीच्या तत्त्वज्ञानाचा, त्यांच्यावरील गाढ प्रभावाचा द्योतक आहे.’

अण्णा भाऊ साठेंनी शाहिरी काव्य विपुल लिहिलं. खासकरून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातलं ‘लाल बावटा’ पथकाद्वारे प्रचार करून दिलेलं त्यांचं योगदान न विसरता येण्याजोगं आहे. त्यांचे ‘महाराष्ट्राची परंपरा’, ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’, ‘मुंबई गिरणी कामगार’ आदी पोवाडे; ‘माझी मैना गावाकडे राहिली’सारखी लावणी आणि ‘जग बदल घालुनी घाव। सांगुनी गेले मज भीमराव’सारखे भीमगीत यातून त्यांची अस्सल एतद्देशीय शाहिरी फुललेली दिसून येते. ते सर्वार्थाने शाहीर होते. त्यांनी पारंपरिक पोवाड्यांपेक्षा वर्तमानकाळातील सर्वहारा वर्गाच्या प्रबोधनासाठी शाहिरी काव्य प्रसवले. त्या साऱ्याचा आढावा घेणे या छोट्या लेखाच्या मर्यादेत शक्य नाही; पण एवढं निष्कर्षरूपानं सांगता येईल की, अण्णा भाऊ हे खऱ्या अर्थाने प्रगतिशील लेखक चळवळीच्या तत्त्वज्ञानाचे प्रभावी भाष्यकार होतो. त्याचं हे साहित्यिक योगदान भारतीय पातळीवरचं आहे. प्रेमचंदांनी प्रगतिशील साहित्य म्हणजे काय, हे सांगताना 1936 च्या पहिल्या प्रलेसच्या गाजलेल्या आपल्या भाषणात म्हटलं होतं, ‘साहित्यकार का लक्ष्य केवल महफिल सजाना दर्जा और मनोरंजन का सामान जुटाना नहीं है । उसका अध्यक्षीय इतना मत गिराईए । वह देशभक्ती और राजनीती के पीछे चलनेवाली सच्चाई नही, बल्की उसके आगे मशाल दिखाती हुई चलनेवाली सच्चाई है।’ प्रेमचंदांच्या या प्रगतिशील लेखकाच्या व्याख्येत अण्णा भाऊ साठे शंभर टक्के बसतात, हे वेगळं सांगायला हवं?

‘इप्टा’मध्ये पण अण्णा भाऊ साठे हे महत्त्वाचे स्थान असलेले कलावंत होते. ते आधी उपाध्यक्ष, मग काही वर्षांनी इप्टाचे अध्यक्षपण बनले जे पद दिग्गज कलावंत पृथ्वीराज कपूर, शंभू मित्रा व बलराज सहानी आदींनी भूषवले होते. त्यांच्या मांदियाळीत अण्णा भाऊ आपल्या शाहिरी कलेनं मानाच्या स्थानी विराजमान होते.

बलराज सहानी त्यांचे खास मित्र होते. त्यांच्या व अण्णा भाऊंच्या संबंधांवर एका लेखात पी.सी. जोशींनी रोचक आठवण कथन केली आहे. ती अशी- ‘अण्णा भाऊ बलराज की हर बात को उत्सुकता से ग्रहण करते थे । और अन्य इप्टा साथी, महाराष्ट्र के साथियोंसे, बुद्धिजीवीयों से और मजदूर कामगार भाईयों से भी विचार विमर्श करते थे।’ हे निरीक्षण फार महत्त्वाचे आहे. ते यासाठी की, लौकिकार्थानं ते शिकले नव्हते; मात्र अनुभव व मित्र, नेत्यांशी व कष्टकरी मजुरांशी चर्चा करून आपली राजकीय जाण समृद्ध करीत गेले. जीवनसंघर्षातून मार्क्सवादाचे धडे त्यांनी गिरवले होते. मॅक्झीम गॉर्की हे त्यांचे साहित्यिक आदर्श होते. त्यांचा एक पुतळा त्यांच्या घरात होता. त्याखाली बसून ते लेखन करायचे, ही त्यांची साहित्यप्रेरणा सांगणारी सूचक घटना मानायला हवी.

अण्णा भाऊंनी प्रामुख्याने तमाशा-लोकनाट्य हा कलाप्रकार हाताळला. त्यांची दहा लोकनाट्ये साहित्य संस्कृती मंडळात प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या निवडक साहित्याच्या पुस्तकात समाविष्ट आहेत. त्यांनी एकच नाटक लिहिलं होतं, ते म्हणजे ‘इनामदार’. ते शेतकऱ्यांचं शोषण व संघर्षाचं दर्शन घडविणारं नाटक आहे. त्याचे मराठीत प्रयोग झाले नाहीत, मात्र इप्टामार्फत हिंदीमधले अनेक प्रयोग त्या काळी झाले आणि ते नाटक कमालीचे लोकप्रिय झाले. त्यात ए.के. हंगल काम करायचे.

आज अण्णा भाऊ आठवले जातात, ते त्यांच्या कादंबऱ्या व कथांसाठी. ‘फकिरा’च्या रूपाने त्यांनी मराठी साहित्यात प्रथमच दलित हीरो आणला. त्यांनी सर्व दलितांना- मग ते भटके-विमुक्त असू दे की बलुतेदार असू दे, त्यांना- नायकत्व-नायिकत्व बहाल केलं. त्या अर्थानं त्यांना मराठी दलित साहित्याचे जनक म्हटलं, तर वावगं ठरणार नाही.

अण्णा भाऊ साठेंनी पारंपरिक तमाशाला फाटा दिला आणि आपल्या विलक्षण प्रतिभेने आधुनिक लोकनाट्य या मुक्तनाट्याला जन्म दिला. गवळणीला फाटा देणं, गणात ईशस्तवनऐवजी देश व शिवाजीचं स्तवन करणं याबरोबरच वगनाट्यात आजच्या काळाचं कथानक व कष्टकरी- श्रमकरी पात्रं निर्माण करून त्यांनी आपल्या पुरोगामी व प्रगतीशील कलाविचारांचा पूूर्ण सामर्थ्याने प्रत्यय आणून दिला. आजचे लोककलावंत ते विसरून पुन्हा रंजन आणि पारंपरिक नाट्यात गुरफटलेले दिसतात. त्यांच्या कलाकृतीत पासंगालाही पुरोगामित्व नसतं!

अण्णा भाऊ हे शेवटपर्यंत कम्युनिस्ट होते. तरीही त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दलितमुक्तीच्या व जातिअंताच्या लढ्याचे महत्त्व- ते स्वत: दलित मांग समाजाचे असल्यामुळे- ओळखलं होतं, जे कम्युनिस्टांनी कधीच जाणलं नव्हतं. म्हणून त्यांच्या वाङ्‌मयात ‘लाल सलाम’सोबत ‘जय भीम’चा सुरेख संयोग झाला आहे. भारतात केवळ वर्गविहिन समाज निर्माण करून समता येणार नाही; तर जातविहिन समाजही निर्माण झाला, तरच समता व बंधुता येईल आणि शोषणमुक्त समाज होईल, हे त्यांनी जाणलं होतं. म्हणून ‘जग बदल घालुनी घाव । सांगुनी गेले मज भीमराव।’ असंही त्यांनी कवन केलं, हे लक्षात घेण्याजोगं आहे. त्यांच्या साहित्यात व शाहिरी वाङ्‌मयात प्रलेसप्रणीत प्रगतिशील-पुरोगामी विचार आणि वर्गविग्रहाच्या सिद्धांतासोबत मानवमुक्तीसाठी जातिअंताची लढाई आवश्यक आहे, असे प्रतिपादनही कथानकाच्या ओघात जोरकसपणे येतं. ते कसं येतं, ते किती प्रचारी- किती  कलात्मक आहे व त्याचा सकल एकत्रित परिणाम किती पुरोगामी आशयाच्या अंगाने वाचकांच्या मनावर ठसला जातो, यावर पीएच.डी. करणाऱ्या साहित्याच्या विद्यार्थी-संशोधकांनी पुढील काळात सखोल संशोधन केलं, तर त्यांच्या साहित्यातील प्रगतिशीलता व आंबेडकरप्रणीत विचारधारेचा परिणाम कळेल.

स्वातंत्र्योत्तर काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जातिअंताची लढाई केल्याखेरीज भारतात शोषणमुक्ती संभव नाही, याची अण्णा भाऊंना प्रत्यक्ष काम करताना व वाचन-चिंतनातून जाणीव झाली. त्यामुळे वर्ग आणि जात या दोन्हींची सांगड घालीत ‘कास्ट अँड क्लासलेस’ समाज निर्माण करण्यासाठी मार्क्सवाद व आंबेडकरवाद या दोन्हीचं मिश्रण असणारा सुवर्णमध्य मार्ग भारतानं अवलंबिला पाहिजे, हा त्यांचा दृढ व पक्व होत गेलेला विचार त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून प्रत्ययास येतो. पण त्यांनी त्यावर स्वतंत्र चिंतनशील लेखन न केल्यामुळे तो विचार समग्रपणे समाजापुढे आला नाही. खरं तर त्यांचा हा विचार उत्तरकाळात म्हणजेच साठोत्तरी कालखंडात प्रगतिशील लेखनास देशपातळीवर नया आयाम देऊ शकला असता. त्यांचं साहित्य, त्यांची काही भाषणे व ‘युगांतर’ व ‘युद्धभूमी’मधले लेख त्या काळी हिंदी-इंग्रजीमध्ये भाषांतरित झाले असते, तर हे होऊ शकलं असतं. मग प्रेमचंदानंतर प्रलेस व इप्टा चळवळीचा दुसरा मोठा भाष्यकार म्हणून के.ए. अब्बासऐवजी किंवा त्यांच्याबरोबरीनं अण्णा भाऊंचं स्थान व महत्त्व प्रस्थापित झालं असतं!

पण वैश्विक भान असणारे अण्णा भाऊ साठे हे ‘ग्लोबल’ म्हणजे एकाच वेळी लोकल (स्थानिक-जमिनीवरचे) व त्याच वेळी ‘ग्लोबल’ (वैश्विक- आकाशव्यापी) असे लेखक होते. कारण त्यांचं साहित्य सुमारे दोन डझन परदेशी व भारतीय भाषांत अनुवादाच्या रूपानं नंतरच्या काळात पोचलं. त्याची सुरुवात ‘लेनिनग्राडचा पोवाडा’, ‘चित्रा’ (कादंबरी) व ‘सुलतान’ (कथा)  या कलाकृतींच्या रशियन भाषांतरानं झाली होती. त्यामुळे जेव्हा ते रशियात आमंत्रित लेखक म्हणून चाळीस दिवसांच्या दौऱ्यावर गेले, तेव्हा त्यांचं साहित्य रशियन समाजात विस्तृत दूर पोचलं होतं, याची त्यांना पदोपदी जाणीव होत होती. त्यांना मोठा लेखक म्हणून मानाची वागणूक सर्वत्र मिळत होती. त्यांच्याइतका दुसरा कोणताच मराठी लेखक जगात दूरवर आजतागायत पोचला नाहीये, हे सत्य आहे.

त्यामुळे अण्णा भाऊ साठेंच्या अभ्यासकांनी त्यांचं प्रलेस व इप्टाला दिलेलं मौलिक योगदान आणि त्यांनी मार्क्सवाद व आंबेडकरवादाच्या विचारधारेतून वर्गसंघर्षाइतकीच जातिअंताची लढाई लढल्याखेरीज भारतात ‘वर्ग व जातविहीन समाज’ अर्थात ‘क्लास व कास्टलेस सोसायटी’ स्थापन होणार नाही, हा विचार समजून घेतला पाहिजे. जे जुने कम्युनिस्ट नेते आजही हयात आहेत किंवा त्यांची पुढील पिढी- ज्यांच्याकडे वाड-वडिलांकडून त्या काळाची माहिती आठवणी, लेख, पत्रे वा वृत्तपत्रीय कात्रणांतून आली असेल, त्यांच्याकडून मिळवून व अभ्यास करून अण्णा भाऊ साठेंचं योगदान व काम नव्या पिढीनं समजून घेऊन ते समग्रतेनं लिहिलं पाहिजे. त्यांच्या उपलब्ध साहित्यातली ही कमतरता भरून काढण्यासाठी कम्युनिस्ट पक्ष, मातंग समाज किंवा अण्णा भाऊ साठेप्रेमी विचारवंत-संशोधकांनी हे काम हाती घेतलं, तर हा अज्ञात इतिहास प्रकाशात येईल. त्याकडे दुर्लक्ष केलं, तर ते इतिहासात हरवून जाईल!

(लेखक व प्रशासकीय अधिकारी या दोन्ही भूमिका सारख्याच ताकदीने व तन्मयतेने निभावलेल्या लक्ष्मीकांत देशमुख यांनी कथा, कादंबरी व ललित वैचारिक या तिन्ही प्रकारांत विपुल लेखन केले आहे, ते बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in

 भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात