डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सध्या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असलेले लक्षीकांत देशमुख 2007-08 या काळात महाराष्ट्र राज्याचे क्रीडा संचालक होते. त्याच काळात पुणे येथे राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीकांत देशमुख यांचा ‘नंबर वन’ हा कथासंग्रह साकेत प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित झाला होता. त्या कथासंग्रहातील ‘द रिअल हीरो’ ही कथा, पुढील महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभमीवर पुनर्मुद्रित करणे औचित्यपूर्ण वाटते. - संपादक

‘‘सर, आय स्वेअर. मी वर्ल्ड बँडमिंटन फेडरेशनचा टेक्निकल ऑफिसर म्हणून जगभर हिंडलोय! अनेक ठिकाणची बॅडमिंटन कोर्टस्‌ पाहिली आहेत; पण हे जगातलं सर्वोत्तम कोर्ट बनतंय. फॉर दॅट, क्रेडिट गोज टु यू ॲण्ड माय ओल्ड फ्रेण्ड शांताराम!’’ आपले सहकारी, अधिकारी व बॅडमिंटन फेडरेशननं ज्यांच्यावर कोर्टाचं बांधकाम आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार होण्याची जबाबदारी सोपवली आहे, त्या गिरीश प्रधान व इतर काही खेळाडूंसह चंद्रकांत झपाट्यानं पूर्णत्वास जाणाऱ्या बॅडमिंटन कोर्टाची पाहणी करत होता. पुण्यात तिसऱ्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडानगरीत विविध खेळांसाठी क्रीडा सुविधा निर्माण करण्याचं काम युद्धपातळीवर चालू होतं. राज्याचा क्रीडा संचालक म्हणून चंद्रकांत दर पंधरा दिवसांनी खेळांच्या तज्ज्ञ व्यक्तींसह पाहणी करायचा. आजही पाहणी करत असताना गिरीशनं दिलेल्या ग्वाहीमुळं त्याचा ऊर अभिमानानं काहीसा भरून आला होता. पण गिरीशच्या बोलण्यात शांतारामचा उल्लेख होता. त्यामुळे चंद्रकांत त्याच्या आठवणीने काहीसा उदास झाला होता.

‘‘पण सर, या महिन्याभरात शांतारामचा पत्ता नाही, त्याचा फोनही लागत नाही. कळत नाही, कुठं गायब झालाय तो. एक आठवडा काशी यात्रेसाठी जाणार होता. जाण्यापूर्वी मला तो बोलला जातो. मात्र त्यानंतर संपर्कच नाही.’’ पाहणी करताना सतत उत्साहानं बोलणारा चंद्रकांतही आता चूप झाला होता. त्याला गिरीशच्या बोलण्याला कसा प्रतिसाद द्यावा, हे कळत नव्हतं. शांताराम हा एक आठवड्यासाठी म्हणून दीड महिन्यापूर्वी चंद्रकांतच्या परवानगीनं कौटुंबिक व धार्मिक यात्रेसाठी काशी-आलाहाबादला गेला होता. त्या वेळी चंद्रकात म्हणाला होता, ‘‘हे पहा, आता परवानगी देतो; पण यापुढं राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा संपन्न होईपर्यंत नो सुट्टी. मुख्य म्हणजे आपलं सर्वांत मोठं बॅडमिंटन उभारणीचं चॅलेंजिंग काम तुम्ही आव्हान म्हणून स्वीकारलं आहे, त्याकडं दररोज लक्ष दिलं पाहिजे.’’

मागच्या वर्षी शांताराम क्रीडा खात्यातून सहसंचालक म्हणून निवृत्त झाला होता; पण शासनानं त्याची पुण्याच्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेची कामं गतिमान करण्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून एका वर्षासाठी नियुक्ती केली होती. त्यानं क्रीडानगरीतील बांधकामासाठी चंद्रकांतला मदत करायची होती. तो ती मनापासून करत होता.

‘‘सर, मी तुमच्या आदेशाप्रमाणे सर्व काही करेनच; पण मी बॅडमिंटन खेळाडू आहे. 1970 च्या दशकात एन.आय.एस. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस्‌) पतियाळाच्या बॅडमिंटनचा कोर्स केलेला महाराष्ट्रातला एकमेव खेळाडू आहे. नोकरीत महाराष्ट्र विनर झाल्यावर आलो, हे तुम्हाला माहिती आहेच. बॅडमिंटन केवळ माझं वेड नाही, ध्यास आहे. त्यामुळं इथं निर्माण होणाऱ्या बॅडमिंटन कोर्टाची जबाबदारी माझी. ते जगातलं सर्वोत्तम कोर्ट होईल, असं निर्दोष व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण काम मी करून घेईन.’’ शांतारामनं असं म्हणून बॅडमिंटन कोर्टाच्या बांधकामाची जबाबदारी स्वत:हून मागून घेतली होती आणि यातील आठ महिने त्याची दररोज बॅडमिंटन कोर्टाकडं फेरी असायची. तिथं तो दिवसाचा अर्धा वेळ खर्च करायचा.  अपवाद होता तो गेल्या दीड महिन्याचा. या काळात एकदाच चंद्रकांतची व त्याची घरी भेट झाली होती. तेव्हा तो त्याही परिस्थितीत हसतमुखानं म्हणाला होता. ‘‘आय विल कम बॅक विदीन अ मंथ सर. आय प्रॉमिस!’’

तेव्हा चंद्रकांत शांतारामच्या आत्मविश्वासानं व लढाऊ वृत्तीनं चकित झाला होता; पण त्याला मनोमन वाटत होतं की, काही खरं नाही. शांताराम परत कामावर येईल, याची त्याला खात्री वाटत नव्हती. ‘‘आणखी एक सर. या महिन्यात मी कुणाशीही संपर्क ठेवणार नाही, तुमच्याशीही; पण आणखी एक प्रॉमिस करतो, मी एक ते सव्वा महिन्यात तुम्हाला बॅडमिंटन कोर्टावरच भेटेन!’’

त्या भेटीला महिना होऊन गेला होता.

‘‘बरं ते जाऊ दे गिरीश,’’ चंद्रकांतनं विषय बदलत विचारलं, ‘‘या स्पर्धेनंतर ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप घ्यायची आहे ना, बॅडमिंटन फेडरेशनला इथं या कोर्टावर? त्याचं पत्र देणार होतास मला आणून, त्याचं काय झालं?’’ ‘‘ऑफ कोर्स सर, मी आज ते पत्र आणलं आहे. तुम्ही मला ॲडिशनल कोर्टासाठी परवानगी दिली आणि रोलेबल सिंथेटिक सरफेस व पोल्सची व्यवस्था केली. त्यामुळं मागील आठवड्यात जकार्ताच्या बैठकीत ही चॅम्पियनशिप पुण्यात घेण्याचा निर्णय वर्ल्ड फेडरेशननं घेतला आहे,’’ गिरीश म्हणाला.

‘‘गुड, व्हेरी गुड.’’

आणि त्याच वेळी आवाज आला.

‘‘हाय,’’ गिरीश!’’

तो परिचित आवाज ऐकून गिरीश काहीसा उत्तेजित होत म्हणाला, ‘‘सर, हा आवाज नक्कीच शांतारामचा. पठ्‌ठ्या दीड महिन्यानं उगवतोय! त्याच्याकडून चांगली पेनल्टी घेतली पाहिजे.’’

शांताराम व गिरीश हे अनेक वर्षांपासूनचे जुने जिगरी मित्र. त्यामुळं तो सहजतेनं म्हणाला. त्यानं व त्याचबरोबर चंद्रकांतनं पाठीमागं वळून बॅडमिंटन कोर्टाच्या प्रवेशद्वाराकडं पाहिलं. तिथं शांताराम वॉकरसह उजवा पाय दमदारपणे टाकत हळुवारपणे येत होता, डाव्या पायाची पॅन्ट गुडघ्याखाली पाय कापल्यामुळे गुंडाळली असली तरी चार-दोन इंच लोंबकळत होती. चंद्रकांत थक्क होऊन शांतारामकडं पाहत राहिला. त्यानं दिलेलं वचन पाळलं होतं. काशीयात्रेवरून आल्याआल्या त्याला दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागलं होतं. त्याच्या डाव्या पायाला काशीयात्रेच्या वेळी जखम झाली होती. अनेक वर्षांपासून तो मधुमेही होता. त्यामुळं जखम चिघळत गेली. धार्मिक यात्रेच्या नादात त्याचं त्याकडं काहीसं दुर्लक्ष झालं; पण त्यानंच घात झाला होता.

पुण्याला परतल्यावर त्याला तातडीनं दवाखान्यात भरती व्हावं लागलं होतं. तिथं डॉक्टरांना त्याचा तो पाय नाइलाजानं कापावा लागला होता. दवाखान्यातून घरी आणल्यावर त्याला भेटायला चंद्रकात गेला होता. तेव्हा एक विकलांग, पराभूत माणूस व खेळाडू आपण पाहू असं चंद्रकांतला वाटलं होतं; पण व्हीलचेअरवर बसलेल्या हसतमुख व प्रसन्न शांतारामला त्यानं पाहिलं. खरं तर चंद्रकांतला त्याला धीर द्यायचा होता; पण शांतारामच त्याला म्हणाला, ‘‘सर, जे झालं ते झालं. नो रिग्रेटस्‌; पण मी यातून शंभर टक्के बाहेर येईन. एका महिन्यात वॉकरसह चालू शकेन आणि जयपूर फूट बसविल्यानंतर मी र्नॉमल माणसाप्रमाणं चालूही शकेन!’’

चंद्रकांत त्याच्या या झुंझार लढवय्या वृत्तीला मनोन सलाम करत म्हणाला होता, ‘‘हॅटस्‌ ऑफ टु यू शांतारामजी! तुम्ही नक्की चालू शकाल एवढंच काय; पण पुन्हा माझ्याशी बॅडमिंटन खेळूही शकाल!’’

‘‘सर, सर.’’

‘‘तुम्हाला सुधा चंद्रन ही सिनेमा व टी.व्ही सीरिअलमध्ये काम करणारी नटी माहीत आहे ना? तिचाही एक पाय असाच एका अपघातात गेला; पण जिद्दीनं ती उभी राहिली आणि आज ती कृत्रिम पायासह गेल्या वीस वर्षांपासून शास्त्रीय नृत्याचे जाहीर कार्यक्रमही करते.’’

चंद्रकात त्यांच्या मनात एक आशेचा दीप पेटवण्यासाठी व त्याची लढवय्यी वृत्ती पाहिल्यामुळं त्या वृत्तीला बळ देण्यासाठीच म्हणाला, ‘‘यू आर फायटर, तुम्ही तिचे भाऊ शोभता.’’

‘‘येस सर, मी एवढं होऊनही हिंमत हरलो नाहीय! पण आज तुमच्या प्रेरणादायी शब्दांनी मला सहस्र हत्तींचं बळ आलंय, मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्याशी बॅडमिंटन जरूर खेळेन आणि महिन्याभरात कामावर येऊन बॅडमिंटन कोर्टाचं कामही पुन्हा पाहायला व त्यावर देखरेख करायला सुरुवात करेन!’’

शांताराम आत्मविश्वासानं म्हणाला. त्याचा निरोप घेऊन परतल्यावर चंद्रकांत आपल्या विभागातील सहकाऱ्यांना म्हणाला होता, ‘‘शांतारामजींच्या हिमतीचं व आत्मविश्वासाचं कौतुक वाटतं; पण ते परत कामावर येतील असं वाटत नाही, इट इज नेक्स्ट टु इम्पॉसिबल. त्यांचा डायबेटिस त्यांच्यासाठी स्टम्बलिंग ब्लॉक ठरणार.’’

पण आज शब्द दिल्याप्रमाणे शांताराम वॉकरसह आपल्या एका पायावर चालत येत होता. चेहरा तसाच हसतमुख व प्रसन्न होता. त्यामुळे चंद्रकांतला आश्चर्याचा आनंदमिश्रित धक्का बसला होता. गिरीशला त्याच्या आजारपणाची व पाय कापल्याची माहिती नव्हती. त्यामुळं तो अवाक्‌ होऊन पाहत होता. ‘‘मित्रा हे काय झालं? मी हे काय पाहतो आहे?’’ असं आवेगानं म्हणत तो पुढे झाला आणि शांतारामचे दोन्ही खांदे धरून ते घुसळत पुढं रागानं म्हणाला. ‘‘मला खबर पण केली नाहीस? लाज नाही वाटत मित्राला न कळवल्याबद्दल?’’

‘‘गिरीश तुला माहीत आहे ना, मला एका गोष्टीची तीव्र चीड आहे. मला कुणी माझी कीव केलेली आवडत नाही. म्हणून मी सर सोडले तर कुणालाच कळवलं नाही. प्लीज, त्याबद्दल माफ कर मला!’’   

‘‘अरे पण, झालं तरी काय होतं?’’ ‘‘मी तुला ते नंतर घरी जाताना सांगेन, सविस्तरपणे...’’ शांताराम म्हणाला व चंद्रकांतकडे वळून म्हणाला. ‘‘सर, मी माझं प्रॉमिस पाळलंय. पुन्हा महिन्याभरातच कामावर रुजू झालोय. आता हे काम मी पुन्हा पाहणार आहे व वेळेत पूर्ण करून घेणार आहे. ‘‘तुम्ही बरे आहात व इथं पुन्हा आलात हे पाहून फार छान वाटलं!’’ चंद्रकांत त्यांची पाठ थोपटत म्हणाला!

‘‘आता काम पूर्ण होईपर्यंत मी दररोज येईन.’’ शांताराम म्हणाला, ‘‘फक्त मध्ये पंधरा दिवस कृत्रिम पाय बसवल्यावर येता येणार नाही बस्स्‌. त्यानंतर मी खेळाची प्रॅक्टिस सुरू करणार व कोर्ट पूर्ण झाल्यावर तुमच्याशी पहिला गेम खेळणार.’’

‘‘मला आता खात्री वाटते शांतारामजी, तुम्ही नक्कीच माझ्याशी बॅडमिंटनचा खेळ पूर्वीप्रमाणे खेळू शकाल.’’ चंद्रकांत मोकळेपणानं दिलगिरी व्यक्त करत पुढं म्हणाला, ‘‘त्या दिवशी तुमच्या घरी तुम्हाला व्हीलचेअरवर बसलेलं पाहिलं, तेव्हा मनात चर्र झालं होतं. असंही वाटलं की, आता तुमचं काही खरं नाही, तुम्हाला ऊर्वरित आयुष्य अपंगावस्थेत घालवावं लागणार. दररोज खेळणाऱ्या एका खेळाडूवर असा प्रसंग ओढवणं किती क्लेशदायक आहे, या जाणिवेनं मनात काहीशी कालवाकालव झाली होती; पण आज तुम्ही इथं आलात. वॉकरच्या मदतीनं का होईना आलात, खूप बरं वाटलं!’’

‘‘प्लीज सर, माझ्या या अवस्थेबद्दल तुम्हाला मनापासून हळहळ वाटते, हे मी जाणतो. तुमच्या भावना सच्च्या व प्रामाणिक आहेत; पण इतरांच्या नजरेतील सहानुभूतीची मला कीव वाटते. ती मी सहन नाही करू शकत.’’ शांताराम म्हणाला, ‘‘म्हणून आता आपण टॉपिक बदलू या, कामाचं बोलू या.’’

‘‘वेल, वेल, आय रिस्पेक्ट युवर सेंटिमेंटस्‌,’’ चंद्रकांत म्हणाला, ‘‘मी एवढंच म्हणेन की, तुम्ही आज मला ऑस्कर पिस्टोरियसची आठवण करून दिलीस.’’

‘‘कोण हा ऑस्कर सर?’’

‘‘ज्या दिवशी माझ्याशी बॅडमिंटन खेळाल, त्या दिवशी खेळानंतर मी तुम्हाला सांगेन. तेव्हा माझ्या स्वरात सहानुभूती किंवा कीव नसेल, तर तुमच्याविषयी आदर व अभिमान असेल!’’

‘‘ओके सर’’ शांताराम म्हणाला, ‘‘आपण बॅडमिंटन कोर्ट पूर्ण करण्याची डेडलाईन 15 ऑगस्ट दिली आहे ना कॉन्ट्रॅक्टरला. मग त्या दिवशी मी आपणाशी बॅडमिंटनचा एक गेम जरूर खेळेन आणि हा गिरीश अम्पायरचं काम करेल!’’

‘‘डन? डन? डन!’’ चंद्रकांत व गिरीश दोघंही थक्क होत म्हणाले. शांतारामच्या गोल सावळ्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची प्रभा होती आणि ओठांवर मंद स्मित!

‘‘गिरीश, मी ओढून-ताणून चंद्रबळ तर आणलं नाही ना?’’ गिरीश शांतारामला सोडायला घरापर्यंत आला होता, तेव्हा ‘‘चल चहा पिऊन जा’’ म्हणाला, म्हणून तो त्याच्या घरात आला. त्यालाही मधल्या काळात घडलेलं सारं जाणून घ्यायचं होतं. स्वत:बद्दलचा आत्मविश्वास व दुरभिमानाची सीमा क्वचितप्रसंगी गाठणाऱ्या स्वाभिमानामुळे शांताराम पाय कापायच्या घटनेपासून सारं मन:सामर्थ्य एकवटून हसतमुखानं घरी वावरत होता. व्हीलचेअरवर बसून वेळ जायचा नाही. झोपावं म्हटलं तर बेडसोअरचा होणारा त्रास चैन पडू द्यायचा नाही, पण पत्नी मुलांचा धीर खचू नये म्हणून शांताराम मनातली खदखद, बेचैनी व स्वत:बद्दल वाटणारा हताशपणा ओठांआडच दडवून वावरत होता. पण गिरीशसोबत चहा पिताना त्यांच्या मनाचा बांध फुटला होता. बालमित्र व बॅडमिंटन खेळाडू असं दुहेरी नातं त्यांच्यात होतं. गिरीशला घडलेला प्रकार सांगताना शांतारामचं मागील महिन्याभराचं एकट्यानं मुक्तपणे सोसणं डोळ्यात पाणी होऊन आलं होतं.

‘‘गिरीश, मी आयुष्यभर अपंगत्वाचा तिटकारा करत आलो होतो. जातिवंत खेळाडू असूनही अपंग क्रीडास्पर्धांना मी चुकूनही गेलो नाही. कारण शारीरिक अपंगत्व मी पाहू शकत नाही. आय रिअली हेट इट. कारण अपंगत्वाच्या खुणा केवळ शरीरावर होत नसतात, तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनून जातात आणि मोजके अपवाद वगळता इतरांकडून कीव करून घेणं व सहानुभूती मिळविणं अपंगांना त्यांचा हक्क वाटतो; पण आज दैवानं मलाही अपंगत्व बहाल केलंय आणि माझ्यावर चांगलाच सूड उगवलाय. मी काय करू मित्रा? तुझ्यापुढं आज मी फार विकल व असहाय झालोय रे!’’

‘‘शांताराम शांत हो! अरे, तू एवढा विवेकी व धीराचा, असा का हतबल होतोस?’’ गिरीश त्याचा हात हातात घेत म्हणाला, ‘‘यू आर बॉर्न फायटर. तुझ्यात यावरही मात करण्याची क्षमता आहे.’’ शांताराम प्रत्युत्तरादाखल विमनस्क हसला. ‘‘अरे, तू आज संचालक महोदयांना वचन दिलंस ना, येत्या 15 ऑगस्टला त्यांच्याशी बॅडमिंटनचा सामना खेळशील म्हणून. तुझा तो आत्मविश्वास कुठं गेला?’’

‘‘कसं सांगू मित्रा, काल व आज दोन्ही दिवस कृत्रिम पाय बसविण्यासाठी मी दवाखान्यात गेलो होतो; पण अजूनही जमत नाहीय. भारी त्रास होतोय रे!’’

‘‘मानवी शरीर बाह्य वस्तू सहजासहजी स्वीकारत नाही, हे तुला माहीत आहे ना?’’ गिरीश म्हणाला, ‘‘होईल सारं व्यवस्थित हळूहळू.’’

‘‘डॉक्टरही मला असाच दिलासा देत होते.’’ शांताराम म्हणाला, ‘‘पण माझा डायबेटिस आड येतोय. आई-वडिलांनी अनेक चांगल्या गोष्टी मला वारसा म्हणून दिल्या, त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे; पण त्याचबरोबर हा मधुमेहपण दिलाय. मी पन्नाशीपर्यंत व्यायाम व खेळाच्या जोरावर तो रोखला होता; पण नंतर तो झालाय आणि आज कृत्रिम पाय बसविण्याच्या आड येतोय!’’ गिरीश शांतपणे त्याचं ऐकत होता. त्याच्याबद्दल खोलवर तीव्र कणव वाटत होती; पण स्वाभिमानी शांतारामला ते आवडत नाही म्हणून चुपचापपणे तो त्याची खदखद ऐकत राहिला.  शांतारामही अनावर झाला होता. त्याच्या मनात दडलेल्या सच्च्या अनुच्चारित भावनांनी गिरीशच्या उपस्थितीत शब्दरूप धारण केलं होतं.

‘‘मित्रा, माझ्या क्रीडा विभागाचं ब्रीदवाक्य आहे,’’ ‘‘साऊंड माइण्ड इन साऊंड बॉडी.’’ माझं मन कितीही खंबीर असलं तरी शरीराला अपंगत्व आलं आहे. त्यात ‘मधुमेहामुळं चार-पाच तासांपेक्षा जास्त वेळ कृत्रिम पाय लावता येत नाही,’ असं डॉक्टर म्हणतात. त्यामुळं पूर्ण बरा झालो तरी चालणं, फिरणं यावर बंधन येणार. कृत्रिम पाय ॲडजस्ट झाला तरी खेळणं फार दूरचं डिस्टन्ट ड्रीम झालं!’’

‘‘नाही शांताराम, असा निराश होऊ नकोस.’’ गिरीशनं काहीसं सुचल्यासारखं म्हटलं, ‘‘उद्या मी तुझ्याकडं येतो. आपण एका ठिकाणी जाणार आहोत. तिथं तू जे पाहशील, त्यानंतर असा निराश पुन्हा नाही होणार तू कधी. आय प्रॉमिस.’’

‘‘असा कुठला तलिस्मान सापडलाय तुला माझ्यासाठी? आय मीन गंडा, ताईत किंवा परीकथेतील जादूची छडी, जी फिरवताच सारं दु:ख नाहीसं होईल?’’

‘‘तसंच काही समज!’’

‘‘अरे पण.’’

‘‘थोडा सस्पेन्स राहू दे ना. जीवनाची लज्जत वाढायला त्याचाही उपयोग होतो मित्रा!’’ ‘‘माझ्या जीवनात आता सस्पेन्स राहिला नाही. उरलंय ते एक कटुसत्य. मी आता अपंग झालो आहे. लंगडा.’’

‘‘शांताराम, तूच म्हणतोस ना की तुला कीव वा सहानुभूती आवडत नाही. मग स्वत:ची अशी का कीव करतो आहेस? आणि मघाशी तुझं संचालक चंद्रकांत सरांसमोरचं आत्मविश्वासपूर्ण दर्शन खोटं होतं? तू क्रीडानगरीतील बॅडमिंटन कोर्ट तुझ्या देखरेखीखाली ‘द बेस्ट इन द वर्ल्ड’ करणार, हा तुझा शब्द फुकाचा होता? 15 ऑगस्टला त्यांच्याशी तुला बॅडमिंटनचा एक डाव खेळायचाय हे तुझे शब्द पोकळ होते? तुला केवळ त्यांच्यापुढं तुझं खोटं हीरोचं, झुंजार लढवय्याचं रूप दाखवून त्यांना व जगाला फसवायचं होतं?’’

‘‘नाही, नाही गिरीश. मघाचा शांतारामही तेवढाच खरा होता. त्याचं ते रूप मुळीच नकली, उसन्या अवसानाचं नव्हतं!’’ तीव्र स्वरात शांताराम काहीसा किंचाळत म्हणाला. आपण मारलेला बाण अचूक लक्ष्यवेध करून गेला, हे गिरीशला जाणवलं. आता शांतारामचं खरं रूप प्रकटेल. ते रूप रिअल हीरो व झुंजार लढवय्याचं असेल की, पराभूत व हताश, अपंगत्व आलेल्या व जीवनाची लढाई हरलेल्या, कच्च्या दिलाच्या माणसाचं, याच्या साक्षात्काराचा क्षण आला होता.

‘‘त्या बारा कोर्टस्‌ असलेल्या बॅडमिंटनच्या विशाल छत्राखाली आज सुमारे महिन्यानंतर आलो होतो गिरीश. या काळात ते जवळपास पूर्णत्वापर्यंत पोहोचलं होतं! एका सर्वश्रेष्ठ बॅडमिंटन हॉलच्या बांधकामाचा मी पण एक शिल्पकार म्हणून तो बॅडमिंटन कोर्टाचा विशाल अवकाश नजरेत सामावून घेताना माझ्या अंगावर रोमांच उठले. एक बॅडमिंटन खेळाडू म्हणून, एक क्रीडा अधिकारी म्हणून माझ्या अवघ्या अस्तित्वाचं सार्थक झालं असं वाटलं आणि एक अपूर्व उत्साह अंगी संचारला. त्या भरात मी सरांना त्यांच्यासोबत बॅडमिंटन कोर्ट पूर्ण झाल्यावर खेळेन असं वचन दिलं.’’

‘‘ते तुला पोकळ वाटतंय? जमणार नाही असं वाटतंय?’’

‘‘नाही. माझी मनोदेवता सांगतेय की, मी खरंच पुन्हा खेळू शकेन.’’ शांताराम म्हणाला; ‘‘पण कृत्रिम पाय ॲडजस्ट होत नाहीय व मधुमेहामुळं फार काळ लावून वावरता येत नाही, ही पण एक वस्तुस्थिती आहे. त्या जाणिवेनं जोर धरला आणि मी तुझ्यापुढं विकल व हतबल स्वरूपात पेश झालो.’’

‘‘शांताराम, इट इज बट नॅचरल; पण आता जे बोललास तो खरा शांतारामचा मूळचा स्वभाव आहे. यू पझेस ए स्ट्राँग फायटिंग स्पिरीट ॲण्ड पॉझिटिव्ह लाईफ ॲटिट्यूड. तो जप. नव्हे तो अधिक वाढव. म्हणजे तू पुन्हा चालू शकशील व खेळू पण शकशील!’’

‘‘फार बरं वाटलं मित्रा, असं वाटतंय, मनावरचं मळभ दूर झालंय.’’

‘‘उद्या माझ्यासोबत ते पाहशील ना, त्यानंतर तुझ्या मनात सदैव आत्मविश्वासाचा प्रकाश झगमगता राहील. बिलीव्ह मी ॲण्ड कीप गेसिंग टिल टुमारो व्हॉट आय विल शो यू, बाय!’’ गिरीश त्याचा निरोप घेताना म्हणाला.

रोज रात्री झोपण्यापूर्वी शांताराम ऋषी प्रभाकरांच्या ‘‘सिद्ध समाधी योगप्रणालीप्रमाणे सुखा-समाधानात डोळे मिटून मन स्वैर सोडायचा. अशा वेळी मनात दिवसभराच्या अनुभवाचे पडसाद उमटायचे. मग हळूहळू मन शांत होत जायचं आणि सारे ताणतणाव नाहीसे व्हायचे. आज तर कमालीचा ताण पडलेला. शांतारामनं व्हील चेअरवरच डोळे मिटून दोन्ही हातांची घडी पोटावर ठेवून मन स्वैर सोडलं!

सकाळी दवाखान्यात कृत्रिम पाय बसवताना झालेल्या वेदना व अपंगत्वाच्या कल्पनेनं वाटलेली खिन्नता. मग दुपारी संचालक चंद्रकांतला महिन्यापूर्वी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी शिवछत्रपती क्रीडानगरीत जायचा केलेला निश्चय आणि पूर्णत्वाकडं जाणारा भव्य बॅडमिंटन हॉल नजरेत सामावताना मनात दाटून आलेला अभिमान व आनंद. चंद्रकांतशी झालेल्या गप्पांतून 15 ऑगस्टला त्याच्यासमवेत पूर्ण बरं होऊन बॅडमिंटनचा एक गेम खेळण्याचं त्याला दिलेलं अभिवचन; पण परत घरी गिरीशसमोर उन्मळून पडणं. हताश, विकल होणं! मन स्वैर भरकटत होतं आणि शांताराम डोळे मिटून व्हील चेअरवर शांतपणे निश्चिंत बसून होता. सहजयोगात. मात्र, मनावर कशामुळे ताण पडला व कोणत्या गोष्टीनं ते फुलारून आलं, याचाही विचार तो करत होता आणि मग हळूहळू त्यानं बॅडमिंटन कोर्टावर मन केंद्रित केलं!  

दुपारी शांताराम क्रीडानगरीतील भव्य विशाल बॅडमिंटन हॉलच्या प्रवेशद्वारातून आत आला व व्हील चेअरवरून उठून हातात वॉकर घेऊन पाऊल पुढं टाकण्यापूर्वी नजरेच्या टप्प्यातलं पूर्ण बारा कोर्टांचं नव्वद बाय साठ मीटरचं क्रीडांगण त्यानं पाहिलं. त्याची भव्यता, तो अथांग सागरासारखा पसरलेला भिंती, छत व पायऱ्यांचा निळा रंग, चकचकणारं वूड फ्लोअर आणि मॅट फिनिशच्या निळ्या खुर्च्या, प्रतिध्वनी होऊ नये म्हणून केलेलं तंत्रशुद्ध ॲकॉस्टिक आणि ते जाणवावं म्हणून लावलेली संगीताची सुरेल धून आसमंतात आनंद लड्या सोडत होती! जातिवंत बॅडमिंटनपटू असणाऱ्या शांतारामचा ऊर खोल गाढ समाधानानं भरून आला होता. ‘‘याचसाठी केला होता अट्टाहास’’ अशी कृतार्थ भावना मनाला स्पर्शून गेली. वाटलं, पूर्वीसारखं स्पोर्टस्‌ शूज घालून बॅडमिंटनची रॅकेट गरगरा फिरवत कोर्टवर जावं आणि शटल कॉक रॅकेटच्या जाळीवर नाचवत अंदाज घेत सर्व्हिस करावी व प्रतिस्पर्ध्याचा शॉट परतून लावताना उडी मारून स्पॅश मारत गुण मिळवावेत, मग विजय.’’ आता या क्षणी सहजयोगात मनाला पुन्हा तीच भावना, तोच आनंद स्पर्शून गेला. शांतारामनं अनेक वर्षांच्या सिद्ध समाधी योगाच्या रियाजातून तो क्षण पकडला आणि खोल अंत:करणात पाझरू दिला. काही क्षणात हलकंफुलकं अंतराळी विहरू लागल्याच्या केवलानंदाच्या जाणिवेनं शुद्ध आनंदलहरी त्याच्या मन:सागरात उसळू लागल्या. रात्रभर झोपेत शांताराम अबोध जाणिवेची स्वप्नं पाहात होता; पण एवढी जाणीव लख्ख होती की, ती सारी बॅडमिंटन खेळाशी, नव्या कोर्टाशी स्वत:च्या जिंकलेल्या असंख्य सामन्यांशी निगडित होती. आपल्याला केवळ पंख नव्हे तर पायही फुटत आहेत, अशी वेडी सुखावणारी भावना अंगावर हळुवार रोमांच आणत होती!

‘‘आज काही स्पर्धा वा कुठला तरी उद्‌घाटन समारंभ आहे का इथं? मला यायचं नाही गिरीश. गाडी मुकाट मागं फिरवं, हवं तर तुझ्या घरी जाऊ.’’ जेव्हा कार पुणे महानगरपालिकेच्या बाबूराव सणस मैदानासमोर गिरीशनं थांबवली, तेव्हा शांताराम किंचित घुश्शानं म्हणाला. ‘‘नाही मित्रा, तू उतर खाली कारमधून.’’ गिरीश हसत म्हणाला, ‘‘माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला त्रास होईल असं करेनच कसं काही?’’

‘‘ओके. ओके.’’ शांताराम कृत्रिम पायावर कारमधून उतरल्यावर उभा राहिला.

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यानं त्याचं स्वागत केलं व ते तिघं गेटमधून मैदानात आले. समोर मैदानात शंभर सव्वाशे मुलांचा घोळका आपापसात हसत- खिदळत होता. काही मुलं व्हील चेअरला वेग देत एकमेकांशी स्पर्धा करत धावत होती. तर काही गोळाफेक, भालाफेक करत होती. सारेजण अपंग होते, काही अंध, काही मूकबधिर तर काहीजण अस्थिव्यंगामुळं व्हील चेअरवर बसलेली. त्यातही मतिमंद मुलं-मुली त्यांच्या हालचालींना व नजरेतील हरवलेल्या भावनांनी उठून दिसत होती; पण त्या विशाल मैदानात सकाळच्या कोवळ्या उन्हात व मघाशी श्रावणसरींनी भिजलेल्या मैदानात ताजा थंड वारा चेहऱ्यावर घेत ती सारी आनंदानं बागडत होती.

‘‘सर’’, गिरीशनं इशारा करताच जिल्हा क्रीडा अधिकारी शांतारामला म्हणाला, ‘‘आपल्या क्रीडा संचालक चंद्रकांत सरांची ही कल्पना आहे. शिवछत्रपती क्रीडानगरीत खेळाडूंसाठी क्रीडा प्रबोधिनी सुरू करायची. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अपंग खेळाडूंच्या व खेळाची क्षमता असणाऱ्या अपंगांच्या क्रीडा नैपुण्य चाचण्या आयोजित केल्या आहेत. आज त्याची सुरुवात पुण्यापासून होत आहे. तुमच्या हस्ते त्याचं औपचारिक उद्‌घाटन करून आपण चाचण्या सुरू करू या सर!’’ अवघ्या अर्ध्या तासासाठी म्हणून गिरीशनं शांतारामला आणलं होतं.

भान हरपून शांताराम त्या मुला-मुलींत मिसळला होता. त्यांना क्रीडा चाचणीत उत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी प्रोत्साहित करत होता. त्यांना पळताना उड्या मारताना चिअरअप करत होता! समोर अपंगांची एक अनोखी दुनिया उलगडली जात होती. त्यात शारीरिक अपंगत्व असलं तरी खंबीर, अभंग मन आणि त्याहून जास्त चिवट अशावाद व सळसळतं नवचैतन्य होतं. तेथे शुद्ध क्रीडानंद होता, जोश-जल्लोष होता. त्या साऱ्यांना आपल्या अपंगत्वाचा विसर पडला होता. मूकबधिर मुलं नजरेनं व बोलक्या चेहऱ्यावरील उत्स्फूर्त भाव प्रतिसादानं संवाद साधत होती. अंध मुलं इतर ज्ञानेंद्रियांच्या मदतीनं मैदानावरील क्रीडा टिपत दाद देत होती. व्हीलचेअरवरील मुलं उत्तम परफॉर्मन्सला दाद देण्यासाठी व्हीलचेअरच्या दांड्यावर ताल धरत होती. दोन कृत्रिम पाय लावलेली अर्ध्या चड्डी-शर्टमधील मुलं चक्क भांगडा करत होती! शांताराम त्यांच्याजवळ गेला आणि त्यानं त्यांची पाठ थोपटली. आपली पॅन्ट किंचित वर करून त्यांना आपणही त्यांच्या बिरादरीचे आहोत हे जाणवून दिलं. ती चक्क हसली. त्यांनी शांतारामचे हात धरून ओढलं व तिघांचं रिंगण तयार झालं. पाहता पाहता त्या मुलांसोबत शांताराम तालावर भांगडा नृत्य करू लागला!

‘‘थँक्स गिरीश’’ परत जाताना शांताराम गिरीशचा हात किंचित दाबत मनापासून म्हणाला, ‘‘मित्रा, ही अभंग मनाची अपंग मुलं पाहिली, त्यांचं चैतन्य पाहिलं आणि माझ्या दुबळेपणाची लाज वाटली बघ. अरे, माझी तर ही जीवनाची सेकंड इनिंग, पोस्ट रिटायरमेंट सुरू झालीय. त्या मुलांपुढं अख्खं आयुष्य आहे. तरीही किती सळसळतं चैतन्य त्यांच्या नसानसांत भरून आहे. त्यांच्यासाठी अपंग क्रीडा प्रबोधिनी खरंच ग्रेट कल्पना आहे. त्यांचं न्यूनत्व क्रीडा व फिटनेसनं भरून येईल! थोडं थांबून तो पुढं म्हणाला, ‘‘आता मी कधीच अपंगत्वाच्या जाणिवेनं बेचैन होणार नाही आणि यापुढं स्वत:ला मी पॅराऑलिम्पिक चळवळीला वाहून घेईन. तसंच चंद्रकांत सरांनी संधी  दिली, तर अपंग क्रीडा प्रबोधिनीत ऑनररी काम करेन! आणि अनेक उत्तमोत्तम अपंग क्रीडापटू घडवेन! ‘‘तथास्तु’’ गिरीश म्हणाला.

देखणा, विशाल व सुसज्ज बॅडमिंटन हॉल. संपूर्ण वातानुकूलित. शांतारामची अंकराशी पाच असल्यामुळं पाच क्रमांकाच्या कोर्टावर एका बाजूला शांताराम पांढरी शुभ्र हाफपॅन्ट व टी-शर्ट, शूज घालून आपल्या कृत्रिम पायांसह मैदानावर उभा होता. समोर चंद्रकांत होता आणि अम्पायर चेअरवर गिरीश. दहा मिनिटं सामना चालला. फारशा हालचाली न करता शांताराम बेसलाईनवरून फटके अडवत खेळत होता. जेव्हा शांतारामनं पहिला गुण वसूल केला, तेव्हा डाव्या हातानं रॅकेटवर थाप मारत चंद्रकांतनं चिअर अप केलं व म्हणाला, ‘‘तुम्ही जिंकलात शांतारामजी.’’

गेमनंतर खुर्चीवर विसावा घेताना शांतारामनं कृत्रिम पाय काढून घेतला. ‘‘फार दुखतं का?’’

‘‘थोडंसं सर. हा डायबेटिस आहे ना. त्यामुळं सतत पाय लावून ठेवता येत नाही.’’

‘‘पण सर...’’ गिरीश म्हणाला, ‘‘शांतारामनं डाएट करून चांगलं नियंत्रण ठेवलं आहे डायबेटिसवर.’’

‘‘येस, म्हणून मला वाटतं गिरीश, ऑस्करप्रमाणे शांतारामजी पण एक दिवस एव्हरेस्ट होतील.’’

‘‘त्या दिवशी मी तुम्हाला विचारलं होतं व आजही पुन्हा तेच विचारतो, शांताराम उत्सुकतेनं म्हणाला, ‘‘कोण हा ऑस्कर?’’

‘‘मी त्या दिवशी म्हणालो होतो, जेव्हा तुम्ही या शिवछत्रपती क्रीडानगरीत, पूर्ण सुसज्ज झालेल्या क्रीडानगरीत माझ्याशी बॅडमिंटनचा गेम खेळाल, तेव्हा मी तुम्हाला त्याबाबत सांगेन.’’ किंचित हसून चंद्रकांत म्हणाला, ‘‘आणि हेही म्हणालो होतो की, मला त्याबाबत सांगताना तुमच्याबद्दल सहानुभूती किंवा कीव वाटणार नाही, तर अभिमान व आदर वाटेल!’’

शांताराम त्याच्याकडं पाहत होता, तो काय सांगतो ते ऐकण्यासाठी. ‘‘आज तुम्ही माझा तुमच्याबद्दलचा अभिमान व आदर शंभर टक्के संपादन केला आहे. तुम्ही जरूर एक दिवस ऑस्कर पिस्टारियसप्रमाणे खेळातलं एव्हरेस्ट व्हाल. तेवढी तुची क्षमता आहे. मुख्य म्हणजे यासाठी लागणारं अभंग मन आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूट आहे तुमच्याकडे!’’

आता साऱ्या उपस्थितांची उत्सुकता चंद्रकांत काय सांगतोय याकडं लागून राहिली होती. ‘‘बीजिंगला लवकरच ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होतील. त्यांतल्या मैदानी खेळांच्या स्पर्धेमध्ये कदाचित एक नवा इतिहास लिहिला जाईल आणि तो हा ऑस्कर पिस्टोरियस लिहील, जर तो त्याच्या आफ्रिकेतून ॲथलेटिक्स टीमसाठी निवडला गेला तर! कारण प्राथमिक चाचणी फेरीत इतर धडधाकट धावकांसोबत पळणारा हा अपंग कृत्रिम पायाचा खेळाडू असणार आहे.

‘‘ओ माय गॉड. हे सारं विलक्षण आहे सर.’’

‘‘नक्कीच. ऑस्कर हा जन्मापासूनच व्यंग घेऊन आला आहे. नडगीचं हाड नसलेल्या स्थितीत त्याचा जन्म झाला. अवघ्या अकरा महिन्यांचा असताना त्याचे गुडघ्याच्या खालील दोन्ही पाय कापावे लागले; पण खेळाची प्रचंड आवड व ओढ असल्यामुळे कृत्रिम पायासह तो शालेय जीवनापासून खेळू लागला. त्यानं अनेक पॅराऑलिम्पिक स्पर्धांत भाग घेऊन सुवर्णपदकं मिळवली आहेत. तो आईसलॅण्डच्या ओस्सूर कंपनीचे चित्ता फ्लेक्स नावाचे कृत्रिम पाय लावून खेळतो. त्याला ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा आहे; पण त्याला कृत्रिम पायामुळं पळताना कमी ऊर्जा लागते व चित्ताफूटमुळं त्याला ॲडव्हांटेज मिळतं, म्हणून 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास अपात्र ठरवण्यात आलं; पण ऑस्करनं या निर्णयाच्या विरोधात लवादाकडं अपील केलं व लवादानं त्याला पात्र घोषित करून, ‘त्याच्या देशानं त्याला पाठवलं, तर ऑलिम्पिकमध्ये तो धावू शकेल’ असा निर्णय दिला. त्याचा हा आभाळाएवढा उत्तुंग विजय होता. एव्हरेस्ट चढण्याचा पराक्रम होता!’’ चंद्रकांत रसाळपणे ऑस्करची महानता सांगत होता. त्याच्या भाषाप्रभुत्वामुळं साऱ्यांच्या नजरेसमोर ऑस्कर मूर्तिंत साकारला होता! ‘‘आज शांतारामजींनी अवघ्या अडीच महिन्यांत बॅडमिंटनचा गेमखेळून आपण ऑस्करचा भाऊ असल्याचं सिद्ध केलं आहे. म्हणून मी म्हणालो, वेल सेड सर! या राष्ट्रकुल युवास्पर्धेत पदक जिंकणारे सर्व खेळाडू हीरो आहेतच. पण शांतारामजी हे असली हीरो, रिअल हीरो असतील. नव्हे आहेतच.’’

चंद्रकांत टाळ्या वाजवत म्हणाला, ‘‘आपण सारे या ‘रिअल हीरो’ला क्रीडा सलाम करू या!’’ शांतारामच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते. कृत्रिम पायातही ठासून चैतन्य भरलं असल्याची सुखद जाणीव त्याला होत होती.

तो सद्‌गदित स्वरात एवढंच म्हणाला. ‘‘थँक्यू. थँक्यू व्हेरी मच!’’ बॅडमिंटन कोर्टात ॲकॉस्टिक केल्यामुळे आवाजाचा इको नव्हता; पण साऱ्यांच्या मनात चंद्रकांतचे शब्द इकोप्रमाणे पुन्हापुन्हा उमटत होते. ‘‘रिअल हीरो, द रिअल हीरो!’’

क्रीडासंस्कृतीच्या यज्ञकुंडात एक समिधा

‘‘नंबर वन’’ या पुस्तकातील सर्व दहा कथा खेळाडूंच्या क्रीडा जीवनाशी निगडित आहेत. एका अर्थाने हा ‘‘थीम बेस्ड’’ कथासंग्रह आहे. माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा भागल्यानंतर त्याला समृद्ध जीवन जगण्यासाठी कला व क्रीडा या गोष्टी लागतात. प्रत्येक माणूस हा काही कलावंत वा क्रीडापटू होऊ शकत नाही; पण त्याचा आस्वाद जरूर घेऊ शकतो. आपले जीवन या कला व क्रीडाविषयक करमणुकीद्वारे तो संपन्न व अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून त्याला कलावंत व खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनाबद्दलही अपार कुतूहल व आकर्षण असते. त्यातून ‘‘हिरो वर्शिप’’चा जन्म होतो. ही एक मानवी प्रवृत्ती आहे. मूलभूत मानवी भावभावना सर्वत्र समान असतात, त्यामुळे कलावंत व खेळाडूमध्येही त्या असणार हे उघड आहे. पण ही माणसे प्रतिभेचे धनी असतात, कला व क्रीडेची साधना करताना आपले आयुष्य उधळून लावतात आणि सामान्य माणसाला स्तिमित करणारे कला-क्रीडेचे अत्युच्च शिखर गाठतात. त्यांचा प्रवास खडतर असतो, त्यात जय-पराजयाचे अनेक चढउतार असतात. पराभवामुळे तळ गाठला जातो, तर विजयाने शिखर. पुन्हा हे सारे जगाच्या नजरेसमोर होत असते. ही कलावंत व खेळाडू मंडळी ‘‘पब्लिक फिगर’’ असतात. त्यांच्या जीवनात वैयक्तिक असं फार कमी उरतं. ‘‘लार्जर दॅन लाईफ’’ अशा प्रतिमेुळे त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया, भावनिक आंदोलने व उद्रेक सामान्य माणसांपेक्षा तीव्र व ‘‘मेलो ड्रामॅटिक’’ असतात. म्हणूनच ‘‘मॅच फिक्सिंग’’चा आरोप झाल्यावर टी.व्ही. कॅमेऱ्यासमोर कपिलदेव ढसाढसा रडतो, तर पन्नाशी गाठली तरी ‘‘संजू बाबा’’ असलेला संजय दत्त सार्वजनिक जीवनात बालकाच्या निरागसतेने वागताना दिसतो.

कलावंताचा हक्क म्हणून, समाजाने दिलेले प्रिव्हिलेज म्हणून अनेक कलाकार स्वैर, वादळी व समाजमान्य नीतीनियमांच्या चौकटीत न बसणारे जीवन खुलेआम व बिनधास्तपणे जगताना दिसून येतात. हे असे का होते? हे कलावंत व खेळाडू त्यांच्या इमेजच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. आपल्या ‘‘लार्जर दॅन लाईफ’’ प्रतिमेचा त्यांना कधीही विसर पडत नाही. यामुळे ही मंडळी सामान्य माणसाहून अलग व तीव्र संवेदनशील असतात. त्यांचे समग्र जीवन, त्यातील हर्ष-खेद, जय-पराजय, प्रेम व प्रेमभंगही ‘‘पब्लिक स्क्रुटिनी’’ला उपलब्ध असते व त्याचे त्यांना भान असते. त्यामुळेच त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळ्या असतात. एक लेखक म्हणून वरील कारणांसाठी मला कलावंत व खेळाडूंच्या जीवनाविषयी अनिवार आकर्षण आहे.

माझ्या क्रीडाविषयक कथालेखनाची सुरुवात ‘‘ब्रदर फिक्सेशन’’ या कथेपासून झाली. ती कथा दोन महान ‘‘ऑलटाईम ग्रेट’’ क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक नातेसंबंधाची व क्रिकेटचे विक्रम त्यात कसे बाधा आणतात या विषयावरची होती. तिला ‘‘तरुण भारत’’ पुण्याच्या वासंतिक अंक कथास्पर्धेत पारितोषिक मिळालं होतं. तसेच ‘‘साप्ताहिक सकाळ’’च्या कथास्पर्धेतील बक्षीसविजेती कथा ‘‘अखेरचे षटक’’ हीसुद्धा दोन अष्टपैलू क्रिकेटर्सच्या संघर्षाची व त्यांच्या जीवनात आलेल्या स्त्रीच्या भावविश्वाची कथा होती. नोकरीचा भाग म्हणून भारतीय प्रशासन सेवेत (आय.ए.एस.मध्ये) संचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, म्हणून काम करताना पुणे येथे झालेल्या तिसऱ्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेची जबाबदारी मला मिळाली. ती मी आनंदाने व एक आव्हान म्हणून स्वीकारली. अक्षरश: काळ व वेगाशी स्पर्धा करत प्रचंड अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नऊ खेळांच्या क्रीडा सुविधा-स्टेडियम, प्लेग्राऊंड व हॉल बांधायचे काम स्वत:ला झोकून देऊन केले. पूर्वलिखित व प्रकाशित सहा कथांच्या जोडीला कामाच्या धावपळीत आणखी नव्या चार कथा लिहून ‘नंबर वन’ हे पुस्तक सज्ज केले व ते राष्ट्रकुल क्रीडा युवा स्पर्धेच्या आधी काही दिवस मराठी वाचकांपुढे आणले.

या कथा वाचकांना खेळाडूंच्या जीवनाचे रोमांचक दर्शन घडवतील. त्यांचे जय-पराजय आणि क्रीडेशी निगडित वैयक्तिक जीवनासोबत एकूणच क्रीडाजगताचे अनोखे व तुमच्या-आमच्या कुतूहलाची पूर्ती करणारे भावविश्व पुस्तकातून उलगडेल. भारत आर्थिक महासत्ता बनत असताना अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांप्रमाणे क्रीडा महासत्ता का नाही? भारताला ऑलिम्पिक पदक का दुर्मिळ आहे? या प्रश्नांचाही विचार होणे आवश्यक आहे. भारतात खऱ्या अर्थाने क्रीडा संस्कृती रुजलेली नाही, हे याचे मूळ कारण आहे. ‘‘लिखेंगे, पढेंगे तो राजा बनेंगे. खेलेंगे, कुदेंगे तो खाक रहेंगे’’ या एकेकाळच्या लोकप्रिय हिंदी गीतामध्ये आपल्या क्रीडा क्षेत्रातील खंत वाटणाऱ्या दुर्दैवाचे बीज दडले आहे, पण आज चित्र बदलत आहे. या सर्व देशी खेळाडूंच्या कथा आहेत. ते आपले ‘‘रिअल हीरो’’ आहेत. त्यांना ‘‘आयकॉन’’चा दर्जा प्राप्त होईल, तेव्हा भारताने क्रीडासंस्कृती आत्मसात केली असे म्हणता येईल. जेव्हा अशी क्रीडासंस्कृती तळागाळापर्यंत रुजेल तेव्हा भारत क्रीडा महासत्ता जरूर होईल. तो दिवस जवळ यावा यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होण्याची गरज आहे. मी व्यवसायाचा एक भाग म्हणून क्रीडा संचालक या नात्याने शासनाच्या आदेशाने क्रीडानगरी उभारून क्रीडा सुविधा निर्माण केली, तसेच या पुस्तकातून क्रीडासंस्कृतीच्या प्रचाराच्या यज्ञकुंडात एक समीधा टाकली आहे.

लक्ष्मीकांत देशमुख

(‘नंबर वन’ या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेतून)  

Tags: oskar pisterious ऑस्कर पिस्टोरियस kridanagari क्रीडानगरी girish pradhan गिरीश प्रधान laxmikant deshamukh लक्ष्मीकांत देशमुख the real hero रिअल हीरो weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in

भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके