डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे, सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील १२ प्राथमिक शाळांतील ३१ प्राथमिक शिक्षकांना एकत्र आणून भाषा व गणित या विषयांच्या अध्यापनाविषयी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्या कार्यशाळेच्या संयोजकांपैकी एक असलेल्या फारूक काझी या तरुण प्राथमिक शिक्षकाने पाठवलेले हे चर्चा-मंथन…

खाजगी शाळांची संख्या वाढू लागली, कारण रूढीबद्ध, चौकटबंद शिक्षण देणाऱ्या शाळा अशी सरकारी शाळांची ओळख बनते आहे. सरकारी शाळांनी बदलण्याची गरज आहे, हे सांगणं अथवा लिहिणं खूप सोप्पं आहे, मात्र प्रत्यक्षात हे कठीण आहे. एवढ्या मोठ्या व्यवस्थेत हे थोडं अशक्यच वाटतं. सरकारी तंत्रांनी सर्व कामं राबवली जातात, त्यामुळे सरकारी शाळांच्या सर्जनशीलतेला गंज चढतो. नवीन काही घडण्याचं प्रमाण कमी होत जात. 

या चौकटीत राहूनही काहीजण नवनव्या अनवट वाटा शोधत आहेत. पण अशा शिक्षकांचे प्रयत्न इतरांपर्यंत पोचत नाहीत, प्रसारमाध्यमेही याबाबत थोडी निराशावाद आहेत आणि शिक्षकांच्या नावाने नेहमीच ओरड करणारे लोक ठोस उपाय सुचवत नाहीत.

अक्षरनंदन, गरवारे बालभवन, कमला निमकर, बालभवन अशा काही प्रयोगशील संस्था-शाळांना भेटी दिल्यावर तिथल्या रससरत्या अध्ययन-अध्यापन मागचं गमक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रकर्षाने जाणवलं की वर्षभर होणाऱ्या विविध प्रकारच्या कार्यशाळा-कृतीसत्रं ही या कृतिशील ते मागील एक महत्त्वाची प्रेरणा आहे. खाजगी शाळांतून हे सहज शक्य आहे. परंतु सरकारी शाळांचा विचार करता हे थोडं कठीणच काम! एखाद्यानं धाडस करायचं ठरवलं तरी अनेक अडचणी. कारण या कामी बदलावी लागते ती शिक्षकांची मानसिकता.

प्रशासनाचा फारसा सहभाग न घेता असं काही आपल्याला करता येईल का? कोण मदत करेल? असे प्रश्न मनात येत, परंतु महाराष्ट्रातील शिक्षणपद्धतीवर स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवलेल्या कोल्हापूरच्या प्राचार्य लीलाताई पाटील यांच्या पत्राने आशेचा किरण दाखवला. त्यांच्याच प्रेरणेने २ व ३ फेब्रुवारी २००८ रोजी सांगोला, जि.सोलापूर इथे सरकारी शाळांतील शिक्षक (जि.प.च्या शाळा) आणि उत्कर्ष प्रशाला, सांगोला येथील शिक्षकवर्ग यांची दोन दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली. प्राचार्य लीलाताईंनी भाषा विषयाचे आणि सृजन-आनंद विद्यालय, कोल्हापूर येथे गणित विषयाचं अध्यापन करण्याच्या अरुणाताई आपटे यांनी गणित विषयासाठी मार्गदर्शन केलं.

संगमनेरचे श्री.संजय मालपाणी यांच्या विशेष पाठबळामुळेच हे शक्य होऊ शकलं. ही कार्यशाळा म्हणजे पुढील अध्ययन अध्यापनाला मार्गदर्शक ठरेल असं टॉनिकच होतं.

कार्यशाळा आयोजनाचा हेतू

१. उपक्रमशीलता म्हणजे नेमकं काय या प्रश्नाला अनुसरून उपक्रमशीलतेची जवळून ओळख व्हावी.

२. आपण शिकवतो म्हणजे नेमकं काय करतो? या प्रश्नाच्या मदतीने स्वत:चं अवलोकन करण्याची संधी मिळावी.

३. आपल्या अध्यापनातील अडचणी, समस्या इत्यादींविषयी
उपाय शोधायला शिकणे.

४. शिक्षकांतील उर्मी जागवण्याचा प्रयत्न करणे. 

५. विशिष्ट घटक कसा शिकवावा हे न सांगता अध्यापनाची शैली आत्मसात करायला शिकणे.

६. खाजगी प्राथमिक शाळा- सरकारी प्राथमिक शाळा यांच्यात संवादाच्या देवाण-घेवाणीचा एक साकव तयार व्हावा.

७. धडपडणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना एकत्र आणून त्यांचे
विचार-उपक्रम- कृती यांचं आदान-प्रदान घडवून आणावं. 

८. वाड्यावस्त्यांवरील शाळांपर्यंत नवनवीन प्रयोग पोचावेत. 

९. चांगल्या शिक्षकांना एकत्र आणून त्यांचा एक गट कार्यरत
करणे. 

१०.शिक्षकांच्या कल्पकतेला पुरेपूर वाव देऊन त्यांना अनवट वाटा शोधण्यास प्रवृत्त करणे.

लीलाताईंची भूमिका

शिक्षकांमध्ये ऊर्मी जागवण्यासाठी काय करायला हवं, त्यासाठी कृतिसत्रांची गरज कशासाठी याविषयी स्वतः लीलाताईंची भूमिका महत्त्वाची ठरते.

प्रशिक्षण काळात काही पुस्तके व ठोकळेबाज विचार व कल्पना प्रशिक्षणार्थीच्या डोक्यात कोंबण्यावर भर असतो. उपक्रमशीलता, सृजनशीलता, प्रायोगिकता, कल्पकता, स्वतंत्र विचारशक्ती यांच्यापेक्षा पुस्तकी ज्ञान व ठरीव चाकोरीतून अध्यापनाचा सराव यांनाच अधिक महत्त्व दिलं जातं. एखादा नवा विषय कसा शिकवावा हे प्रशिक्षणकाळात माहीत होत नाही. शिक्षक व क्रमिक पुस्तकं यांच्याशिवाय विषय शिकता येतात याचा अनुभव प्रशिक्षणकाळात मिळाल्यास नवीन विषय समजून घेण्याच्या पद्धती शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षक पोचवू शकतील.

कार्यशाळा वृत्तांत

जि.प.च्या प्राथमिक शाळांतून अध्यापन करणारे शिक्षक आणि


उत्कर्ष प्रशाला, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडली.

प्रार्थना, प्रार्थनेचा अर्थ व संजय मालपाणी यांच्या मनोगताने कार्यशाळेला सुरुवात झाली. लीलाताईंनी चौथीच्या वर्गावर पाठ्यपुस्तकाबाहेरचा 'स्वरचिन्हे', भाषिक खेळ, अटी घालून भाषिक खेळ घेणे इत्यादी भागावरील पाठ घेतला. पाठाच्या शेवटी एका उत्सुकता वाढवणाऱ्या कवितेने मुलांना विचार करायला आणि बोलतं व्हायला भाग पाडलं. शिक्षकांच्या प्रतिक्रियाही विचारात घेण्यात आल्या.

पाठावरील शिक्षकांच्या बोलक्या प्रतिक्रिया 

० शिकवलं जातंय हा भाव अजिबात नव्हता. सहज संवादातून पाठ उलगडत केला.

० मुलांशी भावनिक जवळीकता साधणं विशेष वाटलं. 

० घोकंपट्टी कुठंही नव्हती- प्रत्यक्ष अनुभव, काय सुंदर कल्पना आहे.

० अप्रगत मुलांसाठी या पाठात कुठं जागाच नव्हती. 

० मुलांचा सहभाग थक्क करणाराच होता. परिचय नसताना मुलं बिनधास्त बोलत होती.

० पुस्तकाविना शिकवता येतं? पहिल्यांदा अनुभवलंय. विलक्षण आहे हे.

मुलांना वाचतं कसं करायचं?

कृतिसत्रातील भाषा विषयाच्या अंतर्गत हा महत्त्वाचा विषय होता. मुलांना वाचन शिकवणं हे आपलं काम असं आपण समजतो, मात्र आपण केवळ वाचायला शिकवतो त्याचा संस्कार मुलांवर करीत नाही.

याचाच अर्थ आपल्याला वाचनाचा आनंद लुटताच येत नाही. वाचन हे केवळ शाळा-परीक्षा यांच्या चक्रातच अडकून पडलंय. ते जीवनाला भिडतच नाही. त्यामुळे ते आपलंसं वाटत नाही. 

मुलांना वाचतं करण्यासाठी लीलाताईंनी काही मुद्दे मांडले. संदर्भ म्हणून लीलाताईंचे काही लेखही अभ्यासायला मिळाले. 

अक्षरं, स्वरचिन्हं, शब्द आणि वाक्य यांच्या रूपाने आजूबाजूला दिसणारे ऐकू येणारे, चाखायला मिळणार, जेव्हा मुलांच्या शिक्षणात प्रवेश करतं तेव्हा मुलाला ते शिकावंसं वाटतं. त्यातूनच वाचनाचे वेड लागतं. 

शिक्षकांनी स्वतः वाचनाचे पाठ मुलांना द्यायला हवेत. त्यातूनच मुलं वाचन करायला शिकतील, रटाळ वाचनामुळे वाचनातला प्राणच हरवून जातो. 

एका दृष्टिक्षेपात जास्तीत जास्त शब्द पकडण्याची खुबी मुलाला साधली की ते 'वाचतं होतं. वाचायला शिकवण्याचा हेतू अमूक एक पुस्तक मुलाला वाचता येणं आणि त्यातील प्रश्नांची उत्तरं मुलाला सांगता येणं हा नसून त्याला 'वाचतं' करून 'वाचवणं' हा आहे. 

मुलं जे वाचतात त्याचा स्वतः अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात.
अर्थ लागेपर्यंत परत परत वाचतात. फक्त त्यांना त्यासाठी योग्य तेवढा वेळ दिला पाहिजे.

लीलाताईंनी स्वत: शिक्षकांच्या वाचनाचे प्रात्यक्षिक घेतले. मुलांना वाचतं करण्याआधी शिक्षक स्वतः 'वाचता' झाला पाहिजे. त्यासाठी लीलाताईंनी सोबत आणलेली पुस्तकं शिक्षकांना वाचनासाठी म्हणून ठेवली.

मुलांना लिहितं कसं करायचं?

मुलांना 'वाचतं' करण्याबरोबरच त्यांना 'लिखित करण्यावरही लीलाताईंनी तितकाच भर दिला. मुलं आणि लेखन याविषयावर ‘लिहिणे मुलांचं शिकवणं शिक्षकांना' या पुस्तकात लीलाताईंनी सखोल चर्चा केली आहे.

शाळेतील मुलं लिहायचा कंटाळा करतात याची कारणे कोणती असू शकतात... 

१. आपल्याला सहजतेनं ८-१० ओळी लिहिता येतील असा आत्मविश्वास मुलांनी मिळवलेला नसतो. 

२. शिक्षकांचे तांबडे फराटे आणि चुकलेले शब्द दहा वेळा
लिहिण्याची शिक्षा याच्या भीतीपायी मुलं लिहायचं टाळतात तरी किंवा कमीत कमी लिहितात. 

३. त्यांची शब्दसंपत्ती कमी असते,

४. लिहायचा विषय त्यांच्या मनाला भिडलेला नसतो. 

मुलांना मनात येणारे विचार, भावना आणि कल्पना बोलून अथवा लिहून सांगायला त्यांना अवघड जाऊ नये, आत्मविश्वासाने सहजतेने त्यांनी बोलावं, लिहावं एवढंच नव्हे तर 'लिहिणं' म्हणजे स्वत:चं 'असणं' असं त्यांना कुठेतरी जाणवावं.

दिसण्याचं पाहण्यात, पाहण्याचं समजण्यात, समजण्याचं शिकण्यात आणि शिकण्याचं कृतीत रूपांतर होण्यासाठी आपण शिकायला हवं.

मुलं लिहिती रहावीत यासाठी मराठीच्या शिक्षकाने स्वत:च्या
अंगावर कोसळणारे अनेक जीवनानुभव झेलून त्यातलं नेमकं काय आपल्या मुलांच्या भाषाविकासासाठी उपयोगी पडू शकेल याचा विचार करायला हवा. प्राथमिक स्तरावर मुलांना भाषेचा लळा लागावा आणि येणारे अनुभव आतपर्यंत शोषून घेऊन लिहिण्यावाटे मांडण्याची आवड निर्माण झाली की मुलं लिहिती राहतात. 

मुलांना वाचतं करण्यासाठी जसं शिक्षकांनी वाचतं व्हायला हवं, तसंच मुलांना लिहितं करण्यासाठी शिक्षकांनी स्वतः लिहितं व्हायला हवं. त्यासाठी लीलाताईंनी शिक्षकांना दोन विषय लिखाणासाठी दिले. १. टेबल, २. मी एक कागदाचा कस्पट, शिक्षकांचं लेखन-वाचन यावर मिश्किल अशा प्रतिक्रिया देत लीलाताईंनी शिक्षकांनाही लिहितं केलं. टेबल व कागदाच्या कस्पटावर वेगवेगळ्या पद्धतीने लेखन करता येऊ शकतं याचा तो वस्तुपाठच होता.

वाचलेल्या पुस्तकांची टिपणे, प्रसंग वर्णन, कल्पनाशक्तीला चालना देणारे निबंध, विषय, कविता, संवाद, नाटकं एकांकिका इत्यादी लिखाणाचे अनुभव मुलांना द्यायला हवेत. सृजन-आनंद विद्यालयामधील विद्यार्थी आयती नाटकं बसवत नाहीत. ती मुलं स्वत: नाटकं लिहितात, रचतात व करून दाखवतात. हा अनुभव


सांगताना लीलाताई भारावलेल्या आवाजात बोलायला लागतात. हा अनुभव इतरत्रही येऊ शकतो. मात्र त्यासाठी शिक्षकांनी मुलांशी एकरूप व्हायला हवं. त्यांच्या अनुभवांची प्रेमाने 'शेअर करायला हवं. 

लीलाताईनी मुलांना लेखनासाठी काही आगळे-वेगळे विषय
सुचवले होते. 

१. झोपण्याच्या तर्हा, २. मोठी माणसं खोटं बोलतात, ३. सवयी, ४. चेंडू माझा मित्र, ५. खिडकी, ६. कचऱ्याच्या तक्रारी, ७. आभाळ माझ्याशी बोलतंय, ८. तक्रारीच तक्रारी, ९. बागेतील गंमती, १०. केस पिकायला लागले.

लेखनाची पूर्वतयारी घेताना दिलेल्या विषयावर मुलांची चर्चा घडवून आणायला हवी. त्यात लेखनासाठी दिशा निश्चित होते. मुलांचे अनुभव त्यात व्यक्त व्हायला हवेत आणि सहजसोप्या वाक्यात त्यांना लेखन करू द्यावं. मोठ्यांनी आपली मोठी वाक्ये त्यांच्यावर थोपवू नयेत. 

शिकणं आणि शिकवणं

शिकणं- जाणून घेणं, फुलणं, उमलणं, अनुभवणं, उपसणं, बदलणं, प्रश्न पडणे, तुलना करणे, समजणे, पारखणे इत्यादी... 

शिकवणं म्हणजे- नष्ट करणे, तुलना करणे, विचार करणे, सौंदर्याची ओळख करून देणं, कुतूहलपूर्ती करणे, आत्मविश्वास देणे, स्वत: विकसित होणं, स्वत:च्या व विद्यार्थ्यांच्या कृतीची अर्थपूर्णता पारखणं.

गणित किती मजेचं

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी सृजन-आनंद विद्यालय गणित विषयाचे अध्यापन करण्याच्या अरुणाताईंनी गणित विषयातली मजा अनुभवायला लावणारे काही खेळ घेतले. संख्याज्ञान ते गुणाकार भागाकार पर्यंतचा प्रवास इतक्या सहजपणे व कमीत कमी वेळात घेतला. गणितातील काही मूलभूत संकल्पनांविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

वर्गातील कॅलेंडर हे केवळ तारखा, वार, सण इत्यादी पाहण्यासाठीच आपण वापरतो, परंतु अरुणाताईंनी कॅलेंडर हे एकच साधन वापरून नानाविध खेळ घेतले.

१. सम-विषम संख्या, २. मूळ-संयुक्त संख्या, ३. एक अंकी दोन अंकी संख्या. ४. चढता-उतरता क्रम. ५. रेषेखालील-वरील संख्या, ६. दुप्पट-तिप्पट संख्या, ७. पाढे, ८. विभाज्य संख्या, ९. आधी-नंतर येणाच्या संख्या. १०. वर्ग-वर्गमूळ इत्यादी प्रकारच्या गणिती संकल्पना आनंददायी पद्धतीने, त्याही सहज उपलब्ध होणाऱ्या साधनांद्वारे समजावून देण्याविषयीचा अरुणा ताईंचे वस्तुपाठच दिला. या खेळाचा शिक्षकांनीही मनसोक्त आनंद लुटला.

कृतिसत्रावरील शिक्षकांच्या प्रतिक्रिया 

कार्यशाळा, कृतिसत्र म्हणजे नेमकं काय? हे पहिल्यांदा
समजलं. कारण प्रशिक्षणामधून आमच्या शंकांचे निरसन कधी होतच नाही. 

० आजवर काही प्रश्न मनात घर करून होते, या दोन दिवसांत
त्यातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली.

० भाषाविषय कसा शिकवावा याविषयी आम्ही कधी गांभीर्याने विचार केला नव्हता आणि ते कधी कुणी शिकवलंच नाही. आम्ही भाषा विषय शिकवताना किती भयंकर चुका करत होतो याची आज जाणीव होतेय. 

० गणिताच्या काही संकल्पना आम्हाला ठाऊक नव्हत्या, मुलांना कशा समजावणार? गणिताचा या कृतिसत्रातला भाग खूप काही शिकवून गेला.

० कॅलेंडर आजवर वर्गातली शोभेची वस्तू होतं, परंतु आज खेळताना जाणवलं की गणिताचा बराचसा भाग कॅलेंडरवरच घेता येतोय. आता कॅलेंडर भिंतीवर नाही लावणार, त्याची जागा मुलांतच.

० अचानक विषय दिल्यावर लिहिणं जमेल की नाही असं वाटत होतं, पण जमलं. वाचनाविषयीही तसंच. सरावाने मला आणि मुलांना जमेल असं वाटू लागलंय.

० मुलांना शिक्षा करू नका. काय अधिकार आहे आपल्याला? या लीलाताईंच्या वाक्यांनी मनाचा ठावच घेतलाय. पुन्हा अशी
चूक होणार नाही. 

० अप्रगत मुलांसाठी (गतिमंद) काही करता येईल का? या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं तर अधिक आनंद वाटला असता.

कार्यशाळेनंतर लीलाताईंनी व्यक्त केलेल्या अपेक्षा 

शिक्षकांचं भारावलेपण दोन दिवसांचं नको. त्यांनी आता नव्याने कामाला लागायला हवं. अनवट वाटा शोधायला हव्यात. 

मुलं वाईट नसतातच, आपणही वाईट नसतो. फक्त समजून घेणं कमी पडतं. समजून घ्यायला शिकायला हवं. मुलांत विश्वास निर्माण होईल हे पहा. त्यांच्या पंखांना बळकटी द्या.

मुलांना आयती उत्तरं देण्यापेक्षा प्रश्न शोधायला शिकवा. कौशल्यांना (स्वत:च्या व मुलांच्याही) खतपाणी घाला. 

शिकणं म्हणजे उमलणं आहे हे विसरू नका.

हेरंब कुलकर्णी-

सदर कृतिसत्रासाठी हेरंब कुलकर्णी उपस्थित होते; त्यांनीही
काही अपेक्षा व्यक्त केल्या.

० आपल्या उपक्रमांच्या नोंदी ठेवा.

० संशोधनात सहभागी व्हा.

० अशा प्रकारच्या धडपडणाऱ्या शिक्षकांची टीम प्रत्येक ठिकाणी कार्यरत व्हायला हवी. वाड्यावस्त्यांपर्यंत हे उपक्रम पोचायला हवेत.

शिक्षकांनी नवनवीन प्रयोगांचा स्वीकार करायला हवा.
 

Tags: language of mathematics weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके