डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

माझ्या मनात क्षोभाच्या अंगाराच्या ‘तासीर’ला (प्रभाव) शब्द दिला दुष्यंत कुमारांनी आणि अर्थ व दिशा दिली ती त्यांच्या गझलांमधून प्रकट होणाऱ्या विचारांनी. म्हणून सत्तरच्या दशकात हे पुस्तक मला कमालीचं प्रभावित करून गेलं होतं. मधला काळ जमेस धरून आज एकविसाव्या शतकातील तिसऱ्या दशकाच्या प्रारंभीपण  ‘साये में धूप’ मला पुन्हा पुन्हा वाचावसं वाटतं. कारण 1970च्या दशकातील तेव्हाची खदखद, तेव्हाची अस्वस्थता व वाटणारे कन्सर्न्स आजही कायम आहेत. नव्हे, त्यांची तीव्रता कितीतरी पटीनं वाढली आहे. तेव्हाची सामान्य माणसाची विवशता, बेचैनी, व्यवस्थेबद्दलचा असंतोष आणि ती बदलता येत नसल्याची जाणीव व होणारी दारुण निराशा आजही कायम आहे.

माझा अनुभव कितपत सार्वत्रिक आहे, मला सांगता येणार नाही. पण मला ठामपणे वाटतं की, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली स्वत:बद्दलची आणि जगाबद्दलची जी समज असते, आपले जे तीव्र अनुभूतीचे विषय असतात आणि परिवर्तनाच्या व आदर्श समाजाच्या जाणिवा असतात, त्यांची पूर्तता करणारं पुस्तक प्रभावित करून जातं. पण ते नंतरच्या काळात तेवढं प्रभावी वाटत नाही. कारण आपण तोवर बरेच बदललेले असतो. जगही बदललेलं असतं आणि आपल्या जीवनाविषयीच्या जाणिवा व धारणाही. तरीही काही पुस्तकं कालातीत असतात, त्यांचा प्रभाव नंतरही कायम राहतो. कारण आपला जीवनप्रवास अशा पुस्तकांच्या विचारांच्या प्रकाशात किमानपक्षी नेणिवेच्या स्वरूपात तरी पुढे अग्रेसर होत असतो!

या कसोटीवर दुष्यंत कुमार यांचे ‘साये में धूप’ हे अवघ्या बावन्न गझलांचं हिंदी पुस्तक माझ्यापुरतं तरी उतरलेलं आहे. तसं तर नारायण सुर्वे यांचं ‘माझे विद्यापीठ’, भाऊसाहेब पाटणकरांची ‘मराठी शायरी’, हिंदीमधलं हरिवंशराय बच्चन यांचं ‘मधुशाला’ आणि उर्दूमधील प्रगतिशील शायर कैफी आझमी यांचं ‘आवारा सजदे’ आणि साहिर लुधियानवी यांचं ‘तलखियाँ’ ही पुस्तकं माझ्या तरुण वयापासून आजवर (चाळीस-पंचेचाळीस वर्षे) मनावर प्रभाव टाकून आहेत. पण मी वैयक्तिकपेक्षा सामाजिक प्राणी जास्त आहे, म्हणून या सहा कायमस्वरूपी प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकांपैकी ‘साये में धूप’ हा दुष्यंत कुमारांचा गझलसंग्रह अधिक महत्त्वाचा वाटतो.

‘साये में धूप’ हे पुस्तक 1975 मध्ये प्रकाशित झालं, त्याच वर्षी माझ्या वाचनात आलं, तेव्हा मी वयाच्या विशीत होतो. त्याच वर्षी लोकशाहीची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारी आणीबाणी लादण्यात आली होती. वाढती गरिबी, महागाई, बेरोजगारी यामुळे भारतीय समाज खदखदत होता. भ्रष्टाचार, जातीय व धार्मिक दंगे, मूल्याधिष्ठित राजकारणाचा होत असलेला ऱ्हास देशाला अस्वस्थ करत होता. या साऱ्यांमुळे माझं मन अस्वस्थ होतं, खदखदत होतं. त्याला वाट मिळाली ती जयप्रकाशजींच्या नवनिर्माण आंदोलनानं, अमिताभ बच्चनच्या ‘अँग्री यंग मॅन’ साकार करणाऱ्या ‘अंडर डॉग’ नायकाच्या रुपेरी पडद्यावरील साधनशुचिता गुंडाळून मिळवलेल्या (खोट्या खोट्या) विजयानं आणि दुष्यंत कुमारच्या ‘साये में धूप’ या गझलसंग्रहानं. पण जेपी हे अप्राप्य आदर्श होते, तर अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’ हा स्वप्नरंजनाचं क्षणिक तीन तासांचं समाधान देणारा होता. त्यामुळे मला जे वाटत होतं, जे व्यक्त करावंसं वाटत होतं, त्याला शब्द व विचार दिला (तोही लोकांच्या भाषेत) तो दुष्यंत कुमारांनी. तेव्हा ‘साये में धूप’नं मी केवळ भारावून गेलो नाही. वाटलं, मलाही हे आणि असंच वाटतं, जगात जे चाललं आहे त्याबद्दल! दुष्यंत कुमारांच्या शब्दांत सांगायचं झालं तर,

‘हाथों में अंगारों को लिए सोच रहा था,
कोई मुझे अंगारों की तासीर बताएँ।’

माझ्या मनात क्षोभाच्या अंगाराच्या ‘तासीर’ला (प्रभाव) शब्द दिला दुष्यंत कुमारांनी आणि अर्थ व दिशा दिली ती त्यांच्या गझलांमधून प्रकट होणाऱ्या विचारांनी. म्हणून सत्तरच्या दशकात हे पुस्तक मला कमालीचं प्रभावित करून गेलं होतं.

मधला काळ जमेस धरून आज एकविसाव्या शतकातील तिसऱ्या दशकाच्या प्रारंभीपण ‘साये में धूप’ मला पुन्हा पुन्हा वाचावसं वाटतं. कारण 1970च्या दशकातील तेव्हाची खदखद, तेव्हाची अस्वस्थता व वाटणारे कन्सर्न्स आजही कायम आहेत. नव्हे, त्यांची तीव्रता कितीतरी पटीनं वाढली आहे. तेव्हाची सामान्य माणसाची विवशता, बेचैनी, व्यवस्थेबद्दलचा असंतोष आणि ती बदलता येत नसल्याची जाणीव व होणारी दारुण निराशा आजही कायम आहे. फरक पडला असेल, तर तो एवढाच आहे की, आज समाजात एक सुन्न बधिरता आहे. कारण पुन्हा दुष्यंतजींचे शब्द उसने घेऊन सांगतो,

‘देख, दहलीज से काई नहीं जानेवाली
ये खतरनाक सच्चाई नहीं जानेवाली।’

समाज व राज्यव्यवस्थेनं सामान्य माणसाचं जगणं कठीण करणारी ‘खतरनाक सच्चाई’ जोवर पलायनवादी शहामृगी वृत्तीच्या समाजमनाला शब्दांच्या तीव्र बाणांनी जखमी करत सांगणार नाही, तोवर जाग कशी येईल? तसेच जनकल्याणासाठी आवश्यक असणारी सामाजिक लोकशाही भ्रष्ट राजकारणी व गरिबांचं शोषण करणाऱ्या भांडवलशाहीमुळे साकार होत नाही, हे शायर सांगणार नाही तोवर जाग कशी येणार?

‘हम को पता नहीं था, हमें अब पता चला
इस मुल्क मे हमारी हुकूमत नहीं रही’

दुष्यंत कुमारांनी दाखवलेली देशाची ही ‘खतरनाक सच्चाई’ त्यांच्या धारदार गझलेतून वाचताना व स्वत:शीच मोठ्या आवाजात म्हणताना मला त्या कॉलेजजीवनात जाणवत होती.

तसा मी उस्मानाबादसारख्या निमशहरी व बहुतांश ग्रामसंस्कृती असणाऱ्या शहरात मॅट्रिक झालो होतो. त्या काळात आमच्यासारख्या कनिष्ठ मध्यमवर्गीयांना, रेशनवर मिळणाऱ्या ‘मिलो’नामक (अमेरिकेतून पी. एल. 480 नामक बदनाम करारानुसार येणाऱ्या) गव्हावर पोटासाठी अवलंबून राहावं लागायचं. 1971च्या बांगलादेश निर्मितीच्या देदीप्यमान यशानं काही काळ देश व समाज भारावून गेला होता. पण युद्धामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली होती आणि भूक व बेरोजगारीचे चटके समस्त भारतीयांना बसू लागले होते. त्या काळात नांदेडला कॉलेजजीवनात माझ्या अस्वस्थ मनाला दिशा मिळावी म्हणून मी युक्रांदमध्ये सामील झालो. कॉलेज फीवाढविरोधी आंदोलनं व नंतर मराठवाडा विकास आंदोलनातही सामील झालो होतो. हा माझा जसा स्थितिवादी दैव-शरण वैयक्तिकतेकडून जे.पीं.च्या संपूर्ण क्रांती व नवनिर्माणाकडे वैचारिक व काही प्रमाणात प्रत्यक्ष सहभागाने सामाजिकतेकडे प्रवास होत असताना, माझ्या प्रश्नांना व विचारांना दुष्यंत कुमारांनी ‘साये में धूप’मधून शब्द व आवाज दिला होता.

पुढे मी प्रशासनाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचं काम म्हणजे बालमजुरी निर्मूलन, स्त्रीभ्रूण हत्या रोखणे व भ्रष्टाचारविरहित प्रशासन याद्वारे माझ्या परीने केलं. हे जरा मी स्वस्तुतीचा दोष पत्करून सांगतो, पण त्यामागे व माझ्या सामाजिक वा समस्याप्रधान लेखनामागे ‘साये में धूप’ची तसंच ‘तलखियाँ’, ‘आवारा सजदे’ आणि ‘माझे विद्यापीठ’ आदी पुस्तकांची प्रेरणा आणि प्रभाव नि:संशय आहे. मी स्वत:ला ‘प्रेमचंद परंपरेचा पाईक’ आणि उर्दू-हिंदी भाषेतल्या 1940 ते 70च्या दशकात भारतीय साहित्यावर प्रभाव टाकणाऱ्या प्रगतिशील लेखक चळवळीचा प्रॉडक्ट मानतो. त्यामुळे माझ्या लेखनप्रवासात प्रेमचंद, नारायण सुर्वेे, अण्णा भाऊ साठे, के. ए. अब्बास, साहिर, कैफी यांच्याप्रमाणे दुष्यंत कुमार हे मार्गदर्शक दीपस्तंभ होते, हे कबूल करण्यात मला संकोच नाही तर अभिमान वाटतो.

असा हा दुष्यंत कुमार तरुण वयात मला भेटला आणि त्याच्या बेबाक व बेडर गझलांनी व त्यातील (आज ज्यांना सुभाषितांचा दर्जा प्राप्त झाला आहे) काही शेरांनी मनावर खोलवर प्रभाव टाकला. या संग्रहातील पहिल्याच गझलचा पहिलाच शेर पाहा, म्हणजे भूक आणि बेरोजगारीनं काळवंडलेलं जीवन दुष्यंत कुमार कसं दोन ओळींतून अंगावर शहारा येईल अशा प्रभावीपणे व्यक्त करतो, हे समजून येईल.

‘कहाँ तो तय था चिरागाँ हरेक घर के लिए
कहाँ चिराग मयस्सर नही शहर के लिए’

दुष्यंत कुमारांचं काव्यलेखन 1957 मध्ये सुरू झालं, ते स्वातंत्र्योत्तर काळातील लोकशाही व समाजवादाप्रति सामान्य माणसांच्या जीवनात काही परिवर्तन घडत नाही, या तीव्र भ्रमनिराशेच्या कालखंडाचे प्रॉडक्ट होते. आणि जेव्हा मी-मी म्हणणारे कलावंत आणीबाणीमध्ये अभिव्यक्तीच्या तलवारी म्यान करून बसले होते, त्या वेळी दुष्यंत कुमारांनी परिणामाची पर्वा न करता अभिव्यक्तीचा झेंडा उंच फडकत ठेवला. त्यांच्या एका गझलेचे पुढील दोन शेर इंदिरा गांधी व जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल आम आदमीची भावना पाहा कशी प्रकट करतात.

इंदिरा गांधी

‘एक गुडिया की कई कठपुतलियों में जान है
आज शायर, ये तमाशा देखकर हैरान है।’

जयप्रकाश नारायण

‘एक बूढा आदमी है मुल्क में या यों कहो-
इस अंधेरी कोठरी में एक रौशनदान है।’

आणीबाणीच्या वेळी मी कॉलेजशिक्षण घेत होतो, व नांदेडला नरहर कुरुंदकरांची ‘इसापनीती’च्या माध्यमातून आणीबाणीवर सूचक टीका करणारी व्याख्यानं ऐकत होतो. त्या काळी माझे दोन नातेवाईक- एक मामा व एक काका- आणीबाणीत अठरा महिने स्थानबद्ध होते व त्यांना भेटताही येत नव्हते. पूर्ण देश एक कैदखाना झाला होता. सामान्य माणसांच्या हालअपेष्टांचं विचारू नका. त्याला वाचा फोडणारा दुष्यंत कुमारांचा पुढील शेर वाचताना मी व माझ्यासारखे असंख्य व्यक्त होत होते.

‘कल नुमाइश में मिला वो चिथडे पहने हुए
मैंने पूछा नाम तो बोला कि हिंदुस्तान है।’
‘थे सारा जिस्म झुककर बोझ से दुहरा हुआ होगा
मैं सजदे में नहीं था, आप को धोखा हुआ होगा।’
‘अब नयी तहजीब के पेशे-नजर हम
आदमी को भूनकर खाने लगे हैं।’

अशा वेळी आपल्या अस्वस्थतेला कशी वाट करून द्यावी, त्याचं उत्तरही दुष्यंत कुमार असं देतात,

‘गिडगिडाने का यहाँ कोई असर होता नहीं
पेट भरकर गालियाँ दो, आह भरकर बददुआ।’

जेव्हा लोकशाहीचा संकोच होतो आणि देशाचे भाग्यविधाते स्वत:ला देशाचे एकमात्र तारणहार समजू लागतात, तेव्हा सामान्य माणसाच्या दु:ख, हताशतेला दुष्यंत कुमार व्यंगाचा वापर करत किती निर्भीडपणे वाचा फोडतात, ते पाहण्याजोगं आहे.

‘वो आदमी नहीं है मुक्कमल बयान है
माथे पे उस के चोट का गहरा निशान है।’
‘सामान कुछ नहीं है फटेहाल है मगर
झोले में उसके पास कोई संविधान है।’
‘वो आदमी मिला था मुझे उसकी बात से
ऐसा लगा की वो भी बहुत बेजुबान है।’

आता ‘साये में धूप’च्या गझलांना लिहून पन्नास वर्षे झाली आहेत, पण त्या वेळी माझ्या मनावर त्यांचा जो परिणाम झाला होता, तो आजही कायम आहे. नव्हे तो अधिक वाढला आहे. कारण आज पुन्हा देशात 1975 सारखंच सामान्य माणसांना चूप करणारं वातावरण आहे. नवं काय आहे, तर उन्मादी राष्ट्रवाद आणि पांघरलेलं असहिष्णू धार्मिकतेचं वस्त्र आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद, जो माणसाला जाती व धर्मांत विभाजित करतो. अल्पसंख्याकांना राजकारणातून व समाजजीवनातून बेदखल तर दलित-आदिवासींना धर्माच्या नावाने भ्रमचित्त करत सीमांतिक (मार्जिनलाइन) करत आहे. त्यामुळे ‘साये में धूप’ची प्रासंगिकता आज कितीतरी वाढली आहे.

आज केंद्रात व अनेक राज्यांत भाजप सत्तेवर आहे. धार्मिक ध्रुवीकरण तसेच सोशल इंजिनिअरिंगच्या गोंडस नावानं, विविध जातींची मोट हिंदू धर्माच्या नावानं बांधणं ही निवडणूक जिंकण्याची रणनीती आहे. ती यशस्वी होत असल्यामुळे केंद्राचे आर्थिक क्षेत्रातले अपयश, कोविडकाळात झालेली सामान्यांची ससेहोलपट आणि महागाई-बेरोजगारी कमी न करता येणं, हे सर्व दुष्यंत कुमारांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, ‘मेरे पास कविताओं के मुखौटे नहीं है। मैं एक साधारण आदमी हूँ और इतिहास और सामाजिक स्थितियों के संदर्भ में साधारण आदमी की पीडा, उत्तेजना, दबाव, अभाव और उस के संबंधों के उलझनों को जीता और व्यक्त करता हूँ।’

दुष्यंत कुमार केवळ सामान्य माणसाचं दु:ख, वेदना, विवशता आणि सत्ताधाऱ्यांची मगरुरी व गरिबांप्रतिच्या अनास्थेवर बोट ठेवत नाहीत, तर लढण्यासाठी सामान्यजनांना प्रेरीत करतात ते असे-

‘कैसे आकाश में सुराख नहीं हो सकता
एक पत्थर तो तबियत से उछालो यारों।’

आणि आपल्या सर्वाधिक लोकप्रिय गझलेमधून ते परिवर्तनाची हाक देत म्हणतात-

‘हो गई है पीर पर्वत-सी निकलनी चाहिए
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिये
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही
मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।’

आणि खाली दिलेला शेर त्यांनी 1970च्या दशकात लिहिला, पण तो आजच्या परिस्थितीला किती लागू होतो नाही?

‘अब तो इस तालाब का पानी बदल दो
ये कँवल के फूल कुम्हलाने लगे हैं।’

म्हणजे आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाअभावी लोकशाही आज एक साचलेलं डबकं किंवा तलाव झाला आहे. त्यावर तरंगत राज्य करणारं कमळाचं फूल कोमेजलं जात आहे, त्यामुळे विषारी व मृत पाणी बदलून तलाव सजीव केला पाहिजे... हा व्यापक अर्थ या दोन ओळींच्या शेरमध्ये भरून दुष्यंत कुमारांनी काय कमाल केली आहे...!

परिवर्तनाच्या लढाईसाठी जसं नेतृत्व व आंदोलन लागतं, तशी वैचारिक दिशा लागते. ती केवळ तत्त्वज्ञ, कलावंत व शायरच देऊ शकतात. पण असे कलावंत दुर्मिळ असतात. दुष्यंत कुमार अशा दुर्मिळांतले एक कलावंत तत्त्वज्ञ आहेत. ते आपल्या कलावंताचा इगो (आत्मविश्वास - अहंकाराचं उन्नत रूप) जपत अभिमानानं सांगतात,

‘मुझ में रहते हैं करोडो लोग चूप कैसे रहूं,
हर गझल अब सल्तनत के नाम का एक बयान है।’
‘मेरे जुबान से निकली तो सिर्फ नज्म बनी
तुम्हारे हातों मे आयी तो एक मशाल हुई।’

अशी विचारांची दीप्तिमान मशाल घेऊन अन्याय व शोषणरूपी अंधार संपवायचा असेल, तर सामान्य माणसानंच आता पुढे आलं पाहिजे, बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे.

असं हे ‘साये में धूप’चं काव्यविश्व आहे. ते भारताच्या सामाजिक परिस्थितीचं आणि सामान्य माणसाच्या हताश व विवशतेचं नेमकं वर्णन करतं, सत्ताधाऱ्यांवर मर्मभेदक व्यंगरूपी बाण सोडतं आणि परिवर्तनाचा विचार देत सामान्य माणसाला हिंमत देतं, क्रांतिप्रवण बनविण्याचा प्रयत्न करतं. त्या अर्थानं दुष्यंत कुमार ‘ॲक्टिव्हिस्ट आर्टिस्ट’ होते-आहेत. मी लेखक म्हणून ही भूमिका मानतो.

Tags: मराठी साहित्य पुस्तक दिन मराठी पुस्तके साहित्य वाचन influential favourite book marathi books Good books in marathi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मीकांत देशमुख
laxmikant05@yahoo.co.in

भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष


Comments

  1. Manoj Sahare- 29 Apr 2022

    अप्रतिम !

    saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके