डिजिटल अर्काईव्ह (2010-2020)

मुलांच्या भाषेत शिकताना-शिकविताना

‘श्रमिक सहयोग’ ही संस्था गेल्या वीस-बावीस वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील वंचित घटकांच्या शिक्षणाचे काम करीत आहे. या कामाचा मुख्य भर औपचारिक शिक्षणाची परंपरा नसलेल्या समाजातील मुलांच्या शिक्षणपद्धतीविषयक मांडणीवर आहे. ज्या समाजाचे रोजचे पोट शारीरिक श्रमावर अवलंबून आहे, ज्यांच्याकडे शारीरिक श्रम आणि त्यावर आधारित कौशल्यांखेरीज अन्य कोणतीही जगण्याची साधने नाहीत- कोणत्याही मालमत्ता नाहीत, ज्यांना जगण्यासाठी आपले शरीर रोज जाळावे लागते, तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहासोबत वावरत असूनसुद्धा स्वतःची अशी स्वतंत्रपणे जगण्याची रीत आहे, ज्यांचे निसर्गासोबतचे नाते अगदी पक्के आहे; अशा समाजातील मुलांच्या शिक्षणाचा असा हा प्रयास आहे.

सन १९९२ ते २००३ या प्रारंभीच्या टप्प्यात चिपळूण तालुक्यातील विविध वाड्यांवर शाळा चालविल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सन २००४मध्ये ‘श्रमिक सहयोग’ या संस्थेने कोळकेवाडी या गावातील सह्याद्रीच्या कुशीतील चौथा टप्पा या परिसरात ‘प्रयोगभूमी’ हे निवासी शिक्षण केंद्र सुरू केले. ‘प्रयोगभूमी’त सध्या येणारी बहुतांश मुले कातकरी समाजातील आहेत. मात्र सुरुवातीच्या काळात म्हणजे सन २००४ ते २००९ या दरम्यान इथे मुख्यतः धनगर समाजातील मुले येत असत. अलीकडे बहुतेक धनगरवाड्या सरकारी शाळेशी जोडल्या गेल्या आहेत, त्यामुळे धनगरांची मुले आता इथे फारशी येत नाहीत. सध्या इथे येणारी कातकरी समाजातील मुले छोटी-छोटी असतानाच दाखल होतात- अगदी चार वर्षांचीसुद्धा. बहुतेक पालकांची परिस्थिती हलाखीची असते. त्यांचे हातावरचे पोट आहे. मोलमजुरी, मासेमारी, राना-वनात हिंडणे असे त्यांचे व्यवसाय असतात. कुटुंबे विस्कटलेली असतात. कोणाची आई नाही, तर कुणाचे वडील नाहीत. व्यसने तर नेहमीचीच. जगणे हा या समाजाचा एक मोठा दैनंदिन संघर्ष असतो. अशा अत्यंत अस्थिर आणि संघर्षमय वातावरणातच त्यांची मुले मोठी होत असतात. त्यामुळे शिकून-सवरून आपल्या वंचितपणावर मात करणे, हे या समाजातील मुलांसाठी एक प्रकारचे दिवास्वप्नच ठरते. अशा परिस्थितीतील काही मुले प्रयोगभूमीत दाखल होत असतात. येथे राहून शिकणाऱ्या मुलांची एकूण संख्या ३०-३५ इतकी मर्यादित असते.

इतक्या लहान वयात येथे येणाऱ्या मुलांना बोलते, शिकते करणे हे मोठे आव्हानच असते. मी काही प्रशिक्षित शिक्षिका नाही. माझे पती मंगेश मोहिते हे या संस्थेत सन १९९२पासून कार्यरत आहेत. आमचे लग्न २००२मध्ये झाले. माझे शिक्षण ग्रामीण भागातच झाले. मी दहावीपर्यंत शिकले. इथे येईपर्यंत मला सार्वजनिक कामाची अजिबात माहिती नव्हती. शाळेत कसे शिकवावे, तेसुद्धा माहीत नव्हते. पण इथल्या १२ वर्षांच्या वास्तव्यात मुलांसोबत मी शिकत गेले आणि शिक्षिकासुद्धा झाले. सुरुवातीला मी येथे मंगेश यांची पत्नी म्हणूनच आले. आमच्या लग्नानंतर दोन वर्षे मी सासरच्या घरी राहत असे. दरम्यान, म्हणजे सन २००४मध्ये मंगेश यांची प्रयोगभूमीतील शिक्षक म्हणून निवड झाली. त्यामुळे त्यांच्यासोबत मी येथे राहायला  आले. ती प्रयोगभूमी शाळेची सुरुवातच होती. त्या वेळी येथे २१ मुले-मुली आणि आम्ही दोघे असे एकूण २३ जण १५ x ३० फूट आकाराच्या इमारतीत एकत्र राहत असू. त्यात १५ x २२ फूट जागेत मुलांचा, तर १५ x ८ फूट जागेत म्हणजे खरे तर किचनसाठी बांधलेल्या छोट्या खोलीत आमच्या दोघांचा संसार थाटला होता.

दिवसभर मुलांचा अभ्यास चालत असे. मंगेश आणि इतर शिक्षक मुलांना शिकवीत, तेव्हा मी ते बघत असे. तेव्हा शिकविणे हे सोपे काम आहे, असे मला मनातून वाटायचे. मंगेश जेव्हा कामासाठी बाहेर जात, तेव्हा ते मला मुलांवर लक्ष ठेवायला सांगत. अशा वेळी मात्र माझी तारांबळ उडे. मला वाचायची आवड असल्याने मुलांना मी मोठ्या आवाजात धडा वाचून दाखवायची. पण जे वाचायचे त्याचा अर्थ मात्र मला सांगता येत नसे. तरीही मी असे वाचन चालूच ठेवले. मुलांना मात्र माझ्या वाचण्याचे, कुतूहल वाटत असायचे. त्यामुळे ती माझ्यासोबत छान रुळायची. माझ्याशी गप्पा मारायची. मुले मला गाणी, म्हणी, गोष्टी सांगत. मला शिकविण्यात रुची आहे, हे पुढेपुढे व्यवस्थापनाच्या लक्षात येत गेले आणि माझ्याकडे छोट्या मुलांची जबाबदारी सोपविण्यात आली. त्या वेळी योगेश, महेश, पुष्पा, माया, अशोक अशी पाच-सहा छोटी मुले माझ्यासोबत शिकत असायची.

मोठ्या वर्गांसाठी इथे पूर्णवेळ दोन शिक्षक होते. त्यांच्याकडे शिकविण्याव्यतिरिक्त शाळेच्या कारभाराची जबाबदारीही असायची आणि छोटी मुले माझ्याकडे सोपवली जायची. सुरुवातीला माझ्याकडील मुले खूप गोंधळ करायची. त्यातून मार्ग काढण्यासाठी मी मुलांशी गप्पा मारायची. त्यांची आपुलकीने चौकशी करायची. मी मुलांना गाणी म्हणायला, नाचायला सांगायची. त्यात वेळ निघून जायचा. त्यातूनच माझा आत्मविश्वास हळूहळू वाढत गेला. आमच्या गटात शिकण्या-शिकविण्याच्या पद्धतीबाबत चर्चा व्हायची. मुलांना त्यांच्या भाषेत सांगत, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करीत-करीत त्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण करायची, असे आमचे सूत्र ठरलेले होते. काही वेळेला बाहेरील तज्ज्ञ मंडळी येऊन आम्हाला मार्गदर्शन करीत असत. यातूनच प्रयोगशील शिक्षणपद्धतीबाबतची माझी समज विकसित होत गेली.

प्रयोगभूमीत सध्या २७ मुले आहेत. ती येथेच आमच्यासोबत राहतात. या मुलांचे बालवर्ग ते आठवीपर्यंतचे शिक्षण येथेच घडते. येथे आम्ही पूर्णवेळ तीन शिक्षक आहोत. त्याशिवाय दर शनिवार-रविवारी काही तज्ज्ञ शिक्षक येत असतात. सध्या माझ्याकडे छोटा वर्ग म्हणजे बालवर्ग ते चौथीपर्यंतची मुले आहेत. त्यांची संख्या १२ ते १५ इतकी आहे. चौथीपर्यंत शिकून पाचवीत जाणाऱ्या मुलांच्यात शिक्षणातील प्राथमिक गुणवत्ता निर्माण करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. या कामात  मला इतर सर्वांची मदत मिळते. लेखन, वाचन, अंकज्ञान, परिसराबाबतचे भान, एक जागी स्थिरपणे बसण्याची सवय, शिक्षणाबाबतची गोडी या किमान अपेक्षा माझ्याकडील गटाबाबत आहेत. यापेक्षा जास्तीच्या अपेक्षा या मुलांकडून बाळगता येत नाहीत, कारण मुळातच ही या समाजातील शिकणारी अशी पहिलीच पिढी आहे. त्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेत स्थिरावणे, हेच या टप्प्यावर महत्त्वाचे असते.

आमचा वर्ग सकाळी दहा वाजता मोठ्या हॉलमध्ये भरतो, तो संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालतो. बसायची जागा कायम नसते. कधी व्हरांड्यात, कधी मंडपात, तर कधी किचनसमोरील मोकळ्या जागेत- अशा रीतीने आमच्या सोईने जागा बदलत असतात. शिवाय अभ्यासाच्या सहा-सात तासांइतकाच आमचा सहवास असतो असे नाही. सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत मुलांबरोबर माझा सहवास असतो. इथे येणाऱ्या मुलांना शाळेचा अनुभव नसतो. एके जागी बसायची सवय त्यांना अजिबात नसते. खरे तर कुटुंबात असतात, तेव्हा ती सतत घराबाहेरच हुंदडत असतात. पालक मजुरीला किंवा मासेमारीला गेलेले असतात. त्यांच्या माघारी मुले रानावनात फिरत असतात. स्वच्छतेचा अजिबात मागमूस नसतो. रोज अंघोळ करण्याची सवय त्यांना नसते. एक- दोन दिवसांआड पालकांसोबत मासे पकडायला गेल्यावर नदीत तासन्‌तास डुंबणे, एवढीच काय ती अंघोळ. पाण्याबाहेर आल्यावर कपडे अंगावरच सुकतात किंवा तसेच पिळून पुन्हा घातले जातात. खाण्या-पिण्याचीसुद्धा अशीच आबाळ असते.

इथे येणारी सर्व मुले एकमेकांशी स्वतःच्या भाषेत म्हणजेच ‘काथोडी’त बोलतात. शिक्षकांशी बोलताना मात्र सुरुवातीला बुजतात. ही भाषा समजायला तशी सोपी आहे. काही शब्द आपल्या ओळखीचेच असतात. मुले बोलत असतात तेव्हा ऐकताना मात्र आपला गोंधळ होतो. सुरुवातीला आपसात बोलताना ती नेमके काय बोलतात, ते मला अजिबात कळत नसे. मुले एकमेकांशी अगदी भरभर बोलतात, थांबत नाहीत. त्यांचे उच्चार आपल्याला स्पष्ट ऐकू येत नाहीत. त्यामुळे त्यांचे बोलणे समजायला मला कठीण जात असे. मुले एकमेकांशी बोलली की, ती नेमके काय बोलली ते पुन:पुन्हा विचारावे लागे. शिवाय एकाच समाजातील असली तरी ती वेगवेगळ्या भागांतून आलेली असल्यामुळे त्यांच्या काही-काही शब्दांच्या उच्चारात फरकदेखील असतो. उदा.- ‘मी दमलो’ असे म्हणताना काही मुले ‘मा भांगना’ असे, तर काही मुले ‘मा भांगायज’ असे म्हणतात.

मला सुरुवातीला त्यांचे बोलणे अजिबात कळत नसे. ही भाषा माझ्यासाठी एकदमच नवी होती. पण या १२ वर्षांच्या सहवासात मी त्यांची भाषा कधी शिकले, ते मलाच कळले नाही. मुलांबरोबर वावरताना त्यांचे बोलणे मला कळले नाही की, ‘काय बोललात’ ते मी त्यांना पुन:पुन्हा विचारीत असे. मग मुलेच मला त्यांची भाषा शिकवू लागली. मला काही अडले-चुकले तर मला मार्गदर्शन करू लागली. मला काथोडी भाषा आवडायला लागली. या भाषेत मी मुलांशी गप्पा मारू लागले. मग या भाषेतील सर्व बारकावे माझ्या लक्षात येत गेले. मुलांशी बोलताना त्यांच्याच भाषेत बोलण्याची मला सवय लागली. अशाच रीतीने ही भाषा मी हळूहळू बऱ्यापैकी अवगत केली आहे, असे आज म्हणता येईल.

इथे येणारं नवखं मूल बोलतं करायला त्याच्याशी त्याच्या भाषेत मैत्रीपूर्ण संवाद करावा लागतो. त्यांची भाषा शिकून घेतल्याचा मला येथे फायदा झाला. त्यांच्या रोजच्या जगण्यातले अनुभव, त्यांचा परिसर, त्यांच्या घरातील परिस्थिती, नदीतील मासे पकडतानाचे, रानात पाखरु पकडतानाचे अनुभव मी टिपत गेले. त्यामुळे या छोट्या मुलांशी माझी जवळीक निर्माण झाली. तुला रानामा हिंडूला आवडह काय? तठ जमिनिमा रहत ती मूळ खाऊला आवडह काय? चिडू पकडूला आवडह काय? अशा आवडी-निवडीविषयी विचारले की, मुले माझ्याशी पटापट बोलू लागतात. घरच्या गप्पा काढल्या की, ती अधिक खुलतात.

तुमना घरामा कोण रह?

- अहास, बहास, बारीकली बीहीनीस रह.

तुमी घरामा काय काय करंह?

- काम करंह, नईवर जाहा, मासे लोदंह, डुबकी मारंह, तटच आनज शिजवी खाहा.

मग अंगळूला साबण रह की नाहे?

- साबण नाहे, इसाच डुबकी मारह पोहजत.

सकाळी कोड्या वाजता उठहत?

- ८-९ वाजता उठहत. रातभर टी.वी. हेरत. (टीव्ही जवळच्या वाडीतील इतर समाजाच्या घरात असतो) पिच्चर आवडह. आमना रान हिंडूला आवडह. रानामा जा सगळ्या झाडांनी माहिती मिळह. कना झाड औषधाना  आहा ती समजह. आमना नाहे समजना तदवा बहास आकंह.

बाजारांना फिरुला आवडह काय?

- है, मासा मिलनात तर विकुला लिहीन जाहात. एक वाटा १०० रुपये देह. मग आमी त्या पैशाना राजच्याला जेवण करुला वस्तू लागहत ते लिदहत. माडी, खाऊ लिदहत.

घरी आनात तदवा काय करं ह?

- दिसभर नयवर मजा करहत. रातंनी आनात कि, आमी मस्ती करहत, गानी बोलहत. बहास दारू पीइन आनात कि, आमी कोपरयामा बिसह, मस्ती करंह. तो बहास आरडह. सारका बोलह जेवूला य वं, काय करह? मरहस रं? मग आमी बहास जवळ पैसा मागंह, खाऊ खाऊला. तदवा बहास आरडह, पैसा नाहे रं मापा, उगाच रह तट.

मी मुलांना खाण्याबाबत विचारते. शाळेत रह जेवण तसा घरामा रह काय?

सुरुवातीला मुलं लाजतात. मग मी म्हणते, सिन-सिन आकुला, खोट नाहे बोलुला. मग मूल बोलू लागते...

. चकनी-भात रह. नाहे तर मासा भूजून खाहा. सकलनी उठहत कोणी मुह नाहे धुवूला, दात नाहे घासुला. उठनात का पहिला तंबाक खाऊला. मग भात फक्त करीन. रातचं सालन रहत, त्याने बरोबर खाहत. मग नयवर जाऊला.

आमनामा कोन मरी जाहा तदवा त्याना मैत लिहीन जाहत. त्याना जागेवर दिवा लावी ठेविहत. तदवा आमना तट भूत दिसह. ती तट येह. नाच करी दाखवह. दारू मागह. आयसने, बाहासने अंगामा येह. तदवा ती घुमायज. माना ये हवायज, तंबाकू हवायज इसा आकह. तदवा आमना समजह की भूत आना.

हे सारं बोलता-बोलता मुले आपल्या घरचं, परिसराचं चित्र उभं करतात. त्या चित्रात रमता-रमता मुले शाळेत रुळतात. अशा रीतीने पहिल्या काही दिवसांत मुलांना बोलतं केल्यावर पुढचा टप्पा असतो तो मुलांना शिकतं करण्याचा. शिकण्याची सुरुवातसुद्धा अशा गप्पांतूनच होते. त्यामुळे वर्गातसुद्धा मुले मोकळेपणाने वावरू लागतात. मग गप्पा, गाणी, गोष्टींत रमल्यावर सतत बाहेर खेळायला जाणारी मुले एका जागेवर बसायला लागतात. पुस्तकातले चित्र दाखवून ‘याला काय म्हणतात?’ असे विचारले आणि ते जर पक्ष्याचे चित्र असेल, तर मुले त्याला आपल्या भाषेत ‘भिंगरूट’, ‘चिडा’ असे म्हणतात. मग मी प्रश्न विचारते, नईवर काय रह? मासा रह. माशांनी वर काय रह? टकलं रह? (माशाचं डोकं).

भूक लागनी तदवा काय खाहत? आनज खाहत?

अशा चर्चातून त्यांच्या ओळखीचे शब्द घेऊन फळ्यावर लिहून मी अक्षराकडे येते.

उदा. अ- आनज, भ- भिंगरूट, च- चिडा, म- मासा, ट- टकलं, न- नई, अशा रीतीने मुलांची अक्षर-ओळख सुरू होते.

अमूर्त अक्षरांची ओळख मूर्त स्वरूपातील अनुभवांच्या आधाराने झाली की, मुले लिखित भाषा जलद गतीने शिकू लागतात. हे लक्षात घेऊन शैक्षणिक तक्त्यातील, अंकलिपीतील मुलांना अनोळखी वाटणाऱ्या शब्दांऐवजी त्यांच्या वापरातील भाषेतील शब्द, त्यामागचे कडू-गोड अनुभव टिपत अक्षर-ओळख करण्यावर आमचा भर असतो. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, क, ख, ग, घ या मुळाक्षरांसाठी मी मुलांच्या वापरातील शब्दांचा उपयोग करते.

उदा. अ- ‘आये बहासला आकह तो अय’,

आ- ‘आयस’, ‘आये’,

इ- (चड्डी) ‘इजार’,

ई- मोटली मोटली ‘ईमारत’ रह ती,

उ- पोशीनी (मुलगी) नाव ‘उषा’ रह ती,

‘कपामा’ चाय पिहत तो क
‘पाटीवर इसा लिहुला तो 'खडू’
अंगनानी म्होर हिरव हिरव काय रह ते ‘गवत’,
आपन ज्यामा रहत ती ‘घर’,
आनज ढवळत ती ‘चमचा’,
छ- पाऊस येह तदवा लीदत ती ‘छत्री’

ज- तट ‘ज’व इसा आकत त्याना,

झ- लोटी काडहत ती ‘झाडू’

अशा पद्धतीने मुलांच्या भाषिक अनुभवांचा आधार घेत घेत, गप्पा मारत-मारत अक्षर-ओळख सुलभ होते. या रीतीने माझा काथोडी भाषेचा अभ्यास तर होतोच, शिवाय कातकरी जीवनाबद्दलचा अभ्यासदेखील घडत जातो.

इथे आपण ‘मंगल’चं उदाहरण पाहू. मंगल सुरुवातीला वर्गात बसल्यावर फक्त हसायची. आत-बाहेर करीत राहायची. ती आत आल्यावर मी हसायचे. मग तीच मला म्हणायची, दीदी काय करहस? काहे नाहे, मूलं बिसनाहत हेर, तू पण बीस अट. मी किचनमध्ये काम करीत असेन तर- मा कांदा सोलू दे वं दीदी, असे बोलत असे. मग मीही ती माझ्याजवळ आल्यावर लगेच बोलायला सुरुवात केली. तू घरी पळून का जातेस? (सुरुवातीला शाळेत  आल्यावर मंगल कुणाला न सांगता, सहा कि.मी.वरील आपल्या घरात कुठल्याही वेळेला अनवाणी पायांनी निघून जात असे) ती म्हणाली, घरी जाहा इशीच, मानी बहिनीस आहा घरामा म्हणून जाहा मा. घरी जाईन तू काय काय करहस? नयवर हिंडूला जाहा, बाजारामा जाहा. आईस- बहास दारू पीईन आनात की, बहास कुटहं, तदवा मा पळी-पळी जाहा, रडी-रडी रह, तटच मातीमा बीसी रह.

मंगल वर्गात बसली की, पुस्तक घेऊन पान उलटत चित्र बघत बसते. पूर्ण वर्गात फिरत बसते. छोट्या मुलांना फळ्यावर वाचायला शब्द दिले की, ते शब्द कानांवर पडल्यावर तीही बोलू लागते. दीदी मा पण वाचुला आहा. एक-दोन शब्द सांगितल्यावर माझ्या मागून बोलू लागते. मात्र मी दाराकडे बोट दाखवून ‘दार’ म्हटले की, ती तिच्या भाषेत ‘बार’ म्हणते. इतर मुलांना शब्द गिरवायला दिले की, तीही गिरवायला मागते. ‘क’ अक्षर दिले. म्हटले, ही काय आहा? तर म्हणते नाहे ठावा. ई ‘क’ आहा. कप ठावा आहा? काय करहत कपाकून? चाय पिहत. त्या कपाना येह तो ‘क’ ‘आहा’. असे समजावल्यावर तिला अक्षर समजू लागते. अशा प्रकारे मंगलचे शिक्षण सुरू आहे. ती आता पाच-सहा महिन्यांतच अक्षरं ओळखू लागली आहे. स्वतःचे नंव सांगू लागली आहे. इतर मुले सरावासाठी इंग्लिश भाषेत नाव सांगतात, ते ऐकून मंगलही आपले नाव इंग्लिशमध्ये सांगू लागली आहे.

रोहित अबोल आहे. त्याला गप्पा मारायला फारसे आवडत नाही, थोडा तोतरादेखील बोलतो. त्यामुळे मी त्याला काहीशा सक्तीने पाटीवर अ, आ, इ, ई ही मुळाक्षरे गिरवायला सांगत असे. सुरुवातीला तो कंटाळा करीत असे. पण पुढे-पुढे इतर मुलांकडे पाहून दीदी अक्षर गिरवूला द्या, असे म्हणू लागला. ई ला काय आकहत (याला काय म्हणतात), असे प्रश्न विचारू लागला. इतर मुलांना मी शिकवू लागले की, स्वतः अक्षरे गिरवीत मला दाखवू लागला. मग, माना अंक येह लीवूला... मा अ, आ, इ, ई काडू काय दीदी?... दीदी मा इ अक्षर काडहत ती बराबर आहा काय? अशा रीतीने माझ्याशी संवाददेखील करू लागला. मी त्याच्याकडून अक्षरे आणि अंक बोलून घ्यायची. तू आक, चुकना तरी चालेल, बोलत का नाहेस? असे बोलले की, तो नुसता हसायचा. मी बोलण्याचा सतत आग्रह करीत असल्याने त्याची बोलण्याची भीती हळूहळू कमी होत गेली. तो काय बोलतोय ते मला कळत नसल्याने परत-परत विचारायची, तेव्हा तो लाजून नुसताच हसायचा. तेव्हा मी म्हणायची की- लाजशील नको, तुला जी बोलुला येहेल तिसा आक. असा सततचा आग्रह केल्यावर तो बोलू लागला. रविता, रोहित, रोशन या भावंडांशी अभ्यास करता-करता एकत्र बसून मी त्यांच्या कुटुंबाविषयी चौकशी करायचे. तेव्हा मात्र ती भावंडे भरभर बोलू लागायची. सांगताना दुसऱ्याचे काही चुकले तर इसा नाहे, असे म्हणत एकमेकांना दुरुस्त करीत असायची. या गप्पांत रविताचा अधिक पुढाकार असायचा आणि अर्थातच रोहितचा कमी.

भाषाशिक्षणाच्या पुढच्या टप्प्यावरील प्रवास पुढे-पुढे पाठ्यपुस्तकांच्या आधाराने विस्तारत जातो. ज्यात भरपूर चित्रे आहेत, अशी अभ्यासक्रमातील तसेच गोष्टीची पुस्तके मुलांना दिली जातात. मुले पुस्तकातील चित्रांकडे पाहतात, ते पाहिल्यावर त्यांच्या भाषेतील शब्द उच्चारतात, पुस्तकातील शब्द वाचतात आणि तुलना करतात. पुस्तकातील शब्दाचा अर्थ समजला नाही, तर मला विचारतात. पुस्तकातील शब्दांचा अर्थ आणि त्यामागील पार्श्वभूमी समजून घ्यायला ती उत्सुक असतात. या पद्धतीने मुलांचे मराठी वाचन सुधारते. बऱ्याचदा वाचन करताना त्यांना अर्थ समजत नसला तरी, नीटपणे वाचता येते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना समजेल अशा रीतीने अक्षरओळख झाल्याने त्यांचे वाचन सफाईदार झाले आहे. मुले जसजशी मोठी होत जातात तसतशी मराठी आणि इतर- इंग्लिश, हिंदी या भाषा वाचायला-समजून घ्यायला उत्सुक असतात. अशा रीतीने मुले पुस्तकातील भाषा अवगत करू लागतात. औपचारिक शिक्षणाचे भय वाटून घेता आत्मविश्वासाने सामोरे जाऊ लागतात.

एकूणच, प्रयोगभूमीतील मुलांचा आणि माझा भाषाशिक्षणाचा प्रवास अत्यंत समृद्ध होत गेला आहे, असे मला आज जाणवते. मी मुलांची भाषा शिकत गेले आणि मुले त्यांच्या भाषेत शिकत गेली. या दोन्ही बाबी निश्चितच मुलांना व मला ताकद देणाऱ्या ठरत आहेत.

Tags: श्रमिक सहयोग रेखा मोहिते मुलांच्या भाषेत शिकताना-शिकविताना शिक्षणविश्व काथोडी भाषा कातकरी समाज धनगर समाज प्रयोगभूमी कोळकेवाडी Katkari Samaj Shepherd Community Education World Kathodi Language Rekha Mohite Prayogbhumi Mangal Kathodi Bhasha Kaatkari Samaj Dhangar Samaj Kolakewadi Shramik Sahayog Bhasha weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रेखा मोहिते
shramik2@rediffmail.com


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात