डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

प्रभा सांगायची, ‘‘लेखन सांगताना कुणी आले तर ते गेल्यानंतर मामा पुन्हा त्याच वाक्यापासून मजकूर सांगायला सुरुवात करायचे.’  मामा डिटेक्टिव्ह पुस्तकांचा अनुवाद करण्यासाठी माथेरानला प्रभालाही घेऊन गेले होते. ते माथेरानला आठ दिवस राहिले होते. तिथे खाण्यापिण्याची रेलचेल असायची. चिंतामणराव कोल्हटकर, मो.ग.रांगणेकर, जोत्स्नाबाई भोळे अनेकजण मामांकडे येत. मामा राहत होते हाजी कासम वाडीत. तिथे खूप कलाकारही राहायचे. तिथे ‘भटाला दिली ओसरी’ या नाटकाची तालीम बघायला प्रभा जायची. मामा वरेरकर खासदार म्हणून दिल्लीला गेले तेव्हा त्यांनी प्रभाला सांगितलं, ‘आत्तापर्यंत तू माझी गरिबी पाहिलीस, आता माझं वैभव पाहायला दिल्लीला ये.

आमच्या आईला मुलगा नव्हता, तीन मुलीच. त्या वेळी माझ्या दोन्ही काकू गरोदर होत्या.

आजीला वाटे, त्यांतल्या एकीला तरी मुलगा होईल. परंतु अण्णाकाका म्हणजे वि.ह.कुळकर्णी आणि इंदिराकाकू, धाकटे अप्पाकाका आणि नलिनी काकू दोघांनाही मुलीच झाल्या. त्यामुळे जेव्हा आम्ही एकत्र राहत होतो, तेव्हा आम्ही पंचकन्या होतो.

मी- लीला- सर्वांत थोरली म्हणून माझे फार लाड झाले. मी अण्णा दिसले की दाराच्या मागे दडून बसे. आणि ते आले की मी ‘भो’ करून ओरडे.

मग ते म्हणत, ‘मला घाबरवू नकोस मी तुला काय आणलंय बघ.’ आणि माझ्या हातात चॉकलेट पडे.

माझी दोन नंबरची बहीण उषा. वडिलांच्या बदलीमुळे तिचं शिक्षण नीट झालं नाही. ती मॅट्रिकनंतर एक वर्ष कॉलेजला गेली होती. तिला वाचनाची आणि संगीताची खूप आवड. ‘हसले मनी चांदणे’ किंवा ‘मधु मागशी माझ्या’ ही गाणी ती खूप सुंदर म्हणायची. आज ऐंशीव्या वर्षीही तिचा आवाज सुंदर आहे.

उषा स्पष्टवक्ती आहे. कुणाची चूक असेल तर ती दाखवून खडसावायला कमी करत नाही. उषाचे पती त्या काळी जर्मनीला जाऊन रबर टेक्नॉलॉजी शिकून आले. त्यांनी रबराच्या वस्तू बनविण्याचा कारखाना काढला. चप्पलांचे सोल, टेनिसच्या रॅकेटस्‌, कुकरच्या रिंग वगैरे वस्तू ते बनवत.

तिसरी बहीण प्रभा हर्डीकर. ती लेखन करते. तिच्या बऱ्याच कथांना बक्षीसं मिळाली आहेत. ती ‘मिळून साऱ्याजणी’मध्ये उपसंपादिका म्हणून काम करत होती. प्रभा विल्सन कॉलेजमधून बी.ए. ऑनर्स झाली. तिनं आपलं शिक्षण स्वकमाईवर केलं.

प्रभा रुईया कॉलेजला शिकत होती. तेव्हा आर्थिक अडचण होती, फी भरण्यासाठी कुठेतरी नोकरी करणं महत्त्वाचं होतं. परंतु इंटर झालेल्या मुलीला नोकरी कोण देणार?

त्याच वेळी पेपरमध्ये ‘लेखनिक पाहिजे’ची जाहिरात आली. प्रभाने नोकरीसाठी प्रयत्न करायचं ठरवलं. पेपरमध्ये पोस्ट बॉक्स नंबर होता.

चौकशी केली तेव्हा कळलं की प्रसिद्ध लेखक मामा वरेरकरांना लेखनिक हवा आहे. परंतु अण्णाकाका म्हणजे वि.ह.कुळकर्णींचा याला कडाडून विरोध होता. कारण मामा वरेरकर हे शिवराळ भाषेत बोलतात, त्यांच्या तोंडात नेहमी शिव्या असतात, ते हलके विनोद करतात अशी त्यांची उगाचच ख्याती होती.

अशा माणसाकडे प्रभाने नोकरीला जाणं अण्णांना मान्य नव्हतं. आणि वडिलांनी तर मतच दिलं नाही. परंतु फीसाठी नोकरी गरजेची होती. म्हणून प्रभाने मामा वरेरकरांकडे लेखनिकाची नोकरी स्वीकारली.

इथं हे आवर्जून सांगितलं पाहिजे की, मामा वरेरकरांच्या शिवराळ भाषेचा अनुभव प्रभाला मात्र कधीच आला नाही. तिच्यासमोर इतरांशी बोलतानासुद्धा मामा वरेरकरांची भाषा सुसंस्कृत असायची.

आम्ही राहायचे दादरला, तर वरेरकर राहायचे ग्रँट रोडला. म्हणून वरेरकरांच्या घरापासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर असलेल्या विल्सन कॉलेजमध्ये प्रभाने प्रवेश घेतला.

त्याचं आणखी एक कारण होतं, ते म्हणजे प्रा.वा.ल.कुलकर्णी विल्सन कॉलेजमध्ये शिकवायला होते. प्रभा प्रा.वा.ल.कुलकर्णींची आवडती विद्यार्थिनी होती.

मामा वरेरकरांनी प्रभाला त्यांच्या कुटुंबातीलच एक मानलं. मामांचे कपडे, जेवण, वागणं एकदम स्वच्छ. त्यांची झोपही हुकमी होती. 

प्रभा सांगायची, ‘‘लेखन सांगताना कुणी आले तर ते गेल्यानंतर मामा पुन्हा त्याच वाक्यापासून मजकूर सांगायला सुरुवात करायचे.’

मामा डिटेक्टिव्ह पुस्तकांचा अनुवाद करण्यासाठी माथेरानला प्रभालाही घेऊन गेले होते. ते माथेरानला आठ दिवस राहिले होते. तिथे खाण्यापिण्याची रेलचेल असायची.

चिंतामणराव कोल्हटकर, मो.ग.रांगणेकर, जोत्स्नाबाई भोळे अनेकजण मामांकडे येत. मामा राहत होते हाजी कासम वाडीत. तिथे खूप कलाकारही राहायचे. तिथे ‘भटाला दिली ओसरी’ या नाटकाची तालीम बघायला प्रभा जायची.

मामा वरेरकर खासदार म्हणून दिल्लीला गेले तेव्हा त्यांनी प्रभाला सांगितलं, ‘आत्तापर्यंत तू माझी गरिबी पाहिलीस, आता माझं वैभव पाहायला दिल्लीला ये.’

प्रभाचे यजमान रत्नाकर हर्डीकर शेतीतज्ज्ञ असून गांडूळखत आणि मातीविना शेती वगैरे प्रकल्प त्यांनी यशस्वी केले आहेत.

माझी चार नंबरची बहीण मीनाक्षी हिचा जन्म आम्ही विभक्त राहायला लागल्यावर झाला. आमची आई साठीनंतर अधूनमधून मानसिक आजारी पडत असे. ॲटॅक आला की चार चार दिवस बसूनही राही. तिच्या आजारपणात मीनाला आईचं सर्व करावं लागे. त्यामुळे मीना कॉलेजला जाऊ शकली नाही. पिंगेज क्लासमध्ये जाऊन ती बी.ए. झाली. शांता शेळके तिला शिकवायला होत्या.

लग्नानंतर ती बडोद्याला स्थायिक झाली. बडोदा कॉर्पोरेशनमध्ये ती स्टेनो होती. ज्या काळात स्त्रिया फारशा कार चालवत नसत त्या काळी मीना कार चालवत असे. तिचे पती अरविंद आगटे हे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून सुरुवातीला बडोद्याला ‘ज्योती’ कंपनीत आणि नंतर मुंबईत काम करून निवृत्त झाले. कुणालाही मदत करणं, अडीअडचणीच्या वेळी धावून जाणं आणि न बोलता सेवा करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.

नावापासून वेगळी असणारी इरावती वि.ह.कुळकर्णींची एकुलती एक मुलगी. ब्रह्मदेशातील नदीच्या नावावरून इरावती हे नाव ठेवलं. तेव्हा नदीचं नाव ठेवण्याची फॅशन होती. काही बायका तिला ‘इरावती’च्या ऐवजी ‘हिरावती’ म्हणत. तेव्हा मजा वाटायची.

ती बॅडमिंटनपटू होती. रुईया कॉलेजमध्ये शिकत असताना प्रसिद्ध बॅडमिंटनपटू नंदू नाटेकरच्या नेतृत्वाखाली ती कॉलेजतर्फे खेळायची. सुरुवातीला ती रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होती.  बँकेतर्फे खेळताना तिला गव्हर्नरच्या हस्ते ट्रॉफी मिळाली होती.

इरावतीमध्ये तिच्या वडिलांचा साहित्याचा आणि खेळाचा वारसा आला आहे. अण्णाकाका आणि अप्पाकाका बॅडमिंटन खेळायचे. कुठं माहीत आहे? माधुरी दीक्षितच्या आईच्या ब्लॉकच्या पाठीमागे. मी जेव्हा वर्षभर काकूकडे राहत होते तेव्हा मीही तिथे खेळायला जात असे.

इरावती स्पष्टवक्ती, चिकित्सक आणि उत्तम टीकाकार आहे. तिला कितीतरी साहित्यिकांचा सहवास लाभला आहे. त्याबद्दल तिनं लिहिलं आहे. तिचं मत ती निर्भीडपणाने मांडते याचं मला कौतुक वाटतं. मला ते जमत नाही.

इरावतीने वीस वर्षे पार्ल्याच्या महिला संघात नोकरी केली. ती ऑफिस सुपरिटेंडेंट होती. तिचा पैशाचा हिशोब पारदर्शी होता. संस्थेशी व्यवहार करण्यासाठी संघटना असतात. पण जोपर्यंत इरावती होती तोपर्यंत तिथे कामगार युनियन निघाली नाही. इतका विश्वास तिने निर्माण केला होता.

इरावतीचं वैशिष्ट्य म्हणजे, तिचे यजमान बाळासाहेब यांच्या आजारपणात तिने त्यांची मनोभावे सेवा केली. पडल्याचं निमित्त झालं आणि काही दिवसांत बाळासाहेबांचं फिरणं बंद झालं, ते बोलेनासे झाले. सांपत्तिक स्थिती उत्तम असूनही सेवेसाठी इरावतीने गडी ठेवला नाही. बाळासाहेबांच्या स्मरणार्थ इरावतीने ‘पालक स्मृती ट्रस्ट’ला एक लाखाची देणगी दिली आहे.

माझी दुसरी चुलत बहीण, अप्पाकाकांची मुलगी मंदाकिनी फडणीस. मंदाकिनी एक वर्षाची असताना तिला मुडदूस झाला होता. आमची नलिनीकाकू तिला कॉडलिव्हर ऑईल पाजायची. कसले तरी तेल लावून मसाज करायची आणि कोवळ्या उन्हात बसवायची. मंदाकिनी दोन महिन्यांत सुधारली. मंदाकिनी पदवीधर झाली. रेल्वेत नोकरी करून सध्या ती निवृत्त जीवन जगत आहे.

माझ्या आणखी दोन चुलत बहिणी रजनी आणि कल्पना. कल्पना गोव्याला असते. ती आणि तिचा मुलगा आकाशवाणीवर कार्यक्रम करतात. कल्पना लेखनही करते.

रजनीचे यजमान लवकर वारले. तेव्हा तिची मुलं लहान होती. रजनीचं कौतुक म्हणजे तिनं नोकरी करून दोन्ही मुलांना स्वत:च्या पायावर उभं केलं. मुलांचा संसार मांडून दिला. आता सर्व सुखात आहेत.

सर्वच बहिणींचे विवाह उत्तम प्रकारे झाले. सगळ्या बहिणींच्या घरातील माणसं सुस्वभावी आहेत. त्यामुळे सासरचा जाच नाहीच. उलट कौतुकच वाट्याला आलं. एकूण काय कुळकर्ण्यांच्या घरातील अष्टकन्या सुखात आहेत.

आता एकविसाव्या शतकात स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण पाहिलं की ऐंशी वर्षांपूर्वी, आमच्या पालकांनी आम्ही मुली असूनसुद्धा आम्हांला किती सक्षम बनवलं याचा अभिमान वाटतो. या अष्टकन्याशिवाय इरावतीचे तीन भाऊ आहेत. आम्हां सर्व भगिनींवर ते सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम करतात.

अशोक आणि त्यांची पत्नी फ्लोरिडाला असतात. अशोक हा आर्किटेक्ट आहे. त्याची पत्नी गुजराथी आहे. तिने अशोकला उत्तम साथ दिली आहे. हेमंत आणि मीरा मिलवॉकीला राहतात. हेमंतचा स्वतंत्र व्यवसाय आहे. आणि त्याच्या क्षेत्रात तो यशस्वी आहे. जयंत आणि वीणा न्यूयॉर्कला राहतात.

जुन्या आणि दुर्मिळ हिंदी गाण्यांच्या रेकॉर्डस्‌ जमा करणे हा जयंतचा छंद आहे. त्याच्याकडच्या रेकॉर्डस्‌ पाहिल्या की आश्चर्य वाटतं. त्याचा हा खजिना अनमोल आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदामुळे मोठमोठे संगीत दिग्दर्शक अण्णांच्या घरी येऊन गेले आहेत. खुद्द लता मंगेशकरांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी जयंताला यामुळेच मिळाली. 

जयंताजवळ असलेल्या एकेका रेकॉर्डची एक एक कहाणी आहे. ती रेकॉर्ड त्याने कशी मिळवली, त्या गाण्याचा गीतकार, संगीतकार, गायक, त्यांच्या आठवणी सांगत सांगत तो गाणी ऐकवतो. असे त्याने भरपूर कार्यक्रम केले आहेत.

त्याच्या या छंदाविषयी त्याने ‘सुन जा दिल की दास्तां’ या पुस्तकात लिहिले आहे. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी खास न्यूयॉर्कमध्ये जाऊन जयंताची मुलाखत घेतली होती.

भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्षं झाली म्हणून पुण्याला नुकतंच एक प्रदर्शन भरवलं गेलं. त्यामध्ये जयंताने काढलेली आणि त्याच्या संग्रही असलेली छायाचित्रंही ठेवण्यात आली होती. एकूण एकशेसाठ छायाचित्रं त्या दालनात मांडली होती.

त्यामध्ये दादासाहेब फाळकेंपासून आताच्या नवीन कलाकारांपर्यंतची छायाचित्रं होती. तसेच पार्श्वसंगीतकार, गायक, दिग्दर्शक अशा सगळ्यांचे फोटो होते. ते फोटो इतके दुर्मिळ आहेत की, प्रदर्शन पाहायला आलेल्या कलाकारांनीही त्यांची ही छायाचित्रं कधी पाहिलेली नव्हती. ह्या प्रदर्शनातलं जयंताचं दालन खूपच प्रसिद्ध झालं आहे. असा हा जयंताचा वेगळा छंद. आमच्या सर्वांच्याच आईवडिलांना कुठलाही रोग म्हणा, व्याधी म्हणा काही नव्हतं. त्यामुळे आम्ही सर्व बहिणी-भावंडं या वयातही निरोगी आहोत.

(शब्दांकन : वृषाली आफळे)

Tags: वृषाली आफळे लीला जावडेकर दादासाहेब फाळके दिग्दर्शक गायक छायाचित्रं कलाकार vrushali afale lila jawadekar leela jawadekar director singer photographer artist Dadasaheb Phalke weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात