डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

प्रा. वि.ह.कुलकर्णी आणि साहित्यिकांच्या सहवासात

एकदा आमचे नाना म्हणजे माझे वडील मर्ढेकरांच्या घरी गेले होते. सकाळची वेळ होती. मर्ढेकरांनी अत्यंत हळू आवाजात रेडिओ लावला होता आणि मर्ढेकर तल्लीन होऊन ऐकत होते. ते पाहून त्यांची समाधी भंग न करता नानांनी तिथून हळूच काढता पाय घेतला. घरी आले तेव्हा आमच्या घरातला रेडिओ खूप मोठ्या आवाजात चालू होता. नानांच्या मनात मर्ढेकरांच्या घरातील दृश्य होते. त्यामुळे नाना घरी आल्याआल्या आम्हा मुलींना म्हणाले, ‘केवढ्या मोठ्या आवाजात रेडिओ लावला आहे. तुमच्या घरात रेडिओ आहे हे इतरांना कळण्यासाठी म्हणून इतक्या मोठ्या आवाजात रेडिओ लावला आहे का?’ तेव्हापासून आम्ही हळू आवाजात रेडिओ लावायला लागलो.

‘दादरचे रावसाहेब रानडे’ हा किताब प्रभाकर पाध्ये यांनी माझ्या काकांना दिला होता. कारण रावसाहेब रानडे जसे समाजसेवकांना हाताशी धरून विधायक कामासाठी स्फूर्ती देत व विधायक कामाची उभारणी करीत त्याप्रमाणे वि.ह. कुलकर्णी होतकरू लेखकांना हाताशी धरून त्यांच्यातून लेखक निर्माण करण्याचे कार्य सहजतेने करीत. त्यांचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि वाङ्‌मय यांचा अभ्यास सूक्ष्म, चिकित्सक आणि नव्याचा शोध घेणारा होता.

अण्णांचा जन्म 1902 ला चिपळूणला झाला. वडिलांच्या बदल्यांमुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण कशेळी, देवगड, चिपळूण येथे व नंतरचे मुंबईला झाले. सेंट झेवियर कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण झाले. तेव्हा कॉ.श्री.अ.डांगे, पत्रकार त्र्यं.वि.पर्वते यांच्याबरोबर होते. प्रथम त्यांचे लेख रत्नाकर मासिकात येत. नंतर त्यांनी ज्योत्स्ना व प्रतिभा मासिकाचे संपादक म्हणून काम केले. त्यांची मुंबई आकाशवाणीवरही भाषणे होत. त्यांनी ‘ऑस्कर वाइल्डच्या लेडी विंडरमियर्स फॅन’चा ‘शोभेचा पंखा’ या नावाने अनुवाद केला.

वि.ह.कुलकर्णी हे मराठी व इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून विशेष नावारूपाला आलेले होते. प्रथम इस्माईल कॉलेजमध्ये व नंतर रुइया कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. अण्णांचे शिकवणे फारच सुंदर असायचे. त्यामुळे दुसऱ्या वर्गाचे विद्यार्थीही त्यांच्या तासाला बसत. एखाद्या मोठ्या समारंभात दंगा चालू झाला, तर वि.ह. कुलकर्णी नुसते उभे राहिले आणि त्यांनी मुलांकडे पाहिले तरी एकदम पिनड्रॉप सायलेन्स व्हायच्या व त्यानंतर एकदम हशा!

अण्णाकाका मिश्किल होते. विनोद तर त्यांच्या नसानसांत भरला होता. अर्थात त्यांच्या विनोदाची जातही जरा वेगळी होती. ऐकणारा सुबुद्ध असला तरच त्याला हसू येई. मुख्य सांगायचे म्हणजे, अण्णांनी मला संस्कृत न घेता फ्रेंच घ्यायला सांगितले होते. ते म्हणाले, ‘फ्रेंच घेतलंस तर पुढे मागे त्या भाषेला महत्त्व येईल व ट्रान्सलेटर म्हणून काम करू शकशील.’अण्णांचे साहित्यिकांचे वर्तुळ मोठे होते. त्यांनी ‘ज्योत्स्ना’ या नावाचे मासिक काढले. त्या वेळी त्यांचा कुसुमाग्रजांशी स्नेह जमला. त्यांच्यामुळेच घरात अनेक साहित्यिक जमत आणि साहित्यिकांची मैफिल रंगायची.

माझे वडील स.ह. कुलकर्णी हे जरी प्राध्यापक नव्हते, तरी त्यांचाही साहित्यिकांशी वेगवेगळ्या प्रकारे संबंध आला होता. त्यामुळे या साहित्य मैफिलीत भर पडायची. लग्न होण्यापूर्वी माझा अनेक मराठी साहित्यिकांशी संपर्क आला. वि.स.खांडेकर, कवी यशवंत, रा.भि.जोशी, ॲड.दौंडकर, कॉमरेड प्रभाकर पाध्ये, ग.त्र्यं.माडखोलकर, रविकिरण मंडळाचे सदस्य माधवराव पटवर्धन, बा.सी. मर्ढेकर अशा अण्णाकाकांच्या अनेक मित्रांची बैठक आमच्या घरी असायची.

त्यात कधी ना.मा.संत, इंदिरा संत, शांताबाई कशाळकर यांचीही उपस्थिती असायची. सर्वजण यायचे आणि घर विचारांनी, साहित्यिक गप्पांनी, वाद-विवादाने भरून जायचे. कविता वाचन नव्हे, तर काव्यगायनही व्हायचे. कारण कवी यशवंत कविता चालीवर गाऊन म्हणायचे. कवी यशवंत हे पुढे बडोद्याचे राजकवी झाले. 

वि.स.खांडेकर हे आमच्या घरीच उतरायचे. ते नॉनस्टॉप आलंकारिक बोलत. त्यांच्या पत्नी उषाताईही सोबत असत. उषातार्इंचा वावर अगदी स्वयंपाकघरातही असे. पाट्यावर चटणी वाटणारी त्यांची मूर्ती आजही मला आठवते. त्या स्वच्छतेच्या फार फार भोक्त्या होत्या. कोल्हापूरच्या वि.स.खांडेकरांच्या घरातील चकचकीत पितळेच्या भांड्यांचे ढीग अजूनही डोळ्यांपुढून हालत नाहीत. उषाताईंचा सर्व वेळ कुशल गृहिणीपदातच जायचा. त्यांना इतर कोणाचेच काम पसंत पडत नसे. खांडेकरांचे त्यांच्याकडे थोडे दुर्लक्षच असायचे. ते उषाताईंच्याबद्दल बेफिकीर असायचे.

त्या काळी ही सर्व मंडळी ट्रीप काढत. माझे काका, वडील आणि त्यांचे सर्व मित्र सायकलने, रविवारी दादर ते पार्ले ट्रीपला जात. एकदा आमचे अण्णाकाका सायकलवरून पडले. तेव्हापासून सायकल ट्रिपा बंद झाल्या, पण केव्हा तरी लांबची ट्रीप व्हायची. एलिफंटा केव्हज किंवा वजे्रश्वरी वगैरे ठिकाणी बायका- मुलांसह सगळे जायचे. खूप मजा यायची.

बा.सी.मर्ढेकरही नेहमी आमच्या घरी येत. मर्ढेकर फार कमी बोलत, परंतु ते वि.हं.बरोबर खूप बोलत. मर्ढेकर वि.हं.ना रेडिओवर नेहमी बोलवायचे. वि.हं.नी बऱ्याच वेळा ‘पुन्हा प्रपंच’ या कार्यक्रमासाठी खुसखुशीत लेखन केले होते. एकदा आमचे नाना म्हणजे माझे वडील मर्ढेकरांच्या घरी गेले होते. सकाळची वेळ होती. मर्ढेकरांनी अत्यंत हळू आवाजात रेडिओ लावला होता आणि मर्ढेकर तल्लीन होऊन ऐकत होते. ते पाहून त्यांची समाधी भंग न करता नानांनी तिथून हळूच काढता पाय घेतला.

घरी आले तेव्हा आमच्या घरातला रेडिओ खूप मोठ्या आवाजात चालू होता. नानांच्या मनात मर्ढेकरांच्या घरातील दृश्य होते. त्यामुळे नाना घरी आल्याआल्या आम्हा मुलींना म्हणाले, ‘केवढ्या मोठ्या आवाजात रेडिओ लावला आहे. तुमच्या घरात रेडिओ आहे हे इतरांना कळण्यासाठी म्हणून इतक्या मोठ्या आवाजात रेडिओ लावला आहे का?’ तेव्हापासून आम्ही हळू आवाजात रेडिओ लावायला लागलो.

नाना आम्हांला म्हणत, ‘तुम्ही जर खरोखर रेडिओ ऐकत असाल तरच लावत जा. कारण माणसांच्या संस्कृतीची कल्पना यावरून येते.’

पुढे अकरावीला मर्ढेकरांची ‘गणपत वाणी बिडी पिताना’ किंवा ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ इत्यादी कविता शिकवताना मला मर्ढेकर समोर दिसायचे. गोरा चेहरा पण हास्य नसायचे, कडक वाटायचे. मर्ढेकरांच्या पत्नी हेमा याही कधीकधी मर्ढेकरांबरोबर आमच्या घरी येत. त्या पारशी होत्या, कधीकधी त्या साडीही नेसायच्या.

रा.भिं.च्या पत्नी सुधाताई त्या काळच्या ग्रॅज्युएट, हुशार. वि.हं.ची पत्नी, माझी इंदिराकाकू त्यावेळच्या मानाने सातवी म्हणजे खूप शिकलेली, तशीच माझी आई, तिला सगळेजण चिमणाबाई म्हणत. ह्या सर्वजणी या साहित्यिकांच्या गप्पांमध्ये सामील व्हायच्या.

माडखोलकर खूप चेंगट होते. शंभर रुपये देऊन ते नानांना त्यांच्यासाठी हक्काने सामान आणायला सांगत आणि सामानाची यादी मोठी असे.

त्यावेळी त्यांनी ‘तरुण भारत’मध्ये महागाईबद्दल लेख लिहिला होता, पण नानांना मात्र एवढ्याशा पैशात सगळे सामान आणायला सांगत.  माडखोलकर खरे म्हणजे पत्रकार, टीकाकार होते, परंतु त्यांच्या पत्नी शांताबाईच्या उत्तेजनामुळे ते कादंबरी लिहायला लागले. शांताबाई बी.ए. शिकल्या होत्या. त्या काँग्रेसनिष्ठ होत्या, गांधीजींच्या सहवासात राहिलेल्या होत्या. याउलट माडखोलकर गांधीजींच्यावर टीका करणारे. शांताबाईंचे व्यक्तिमत्त्व विशेष आकर्षक होते. त्यांचे डोळे मोठे आणि सुंदर होते. उंचीही भरपूर होती, त्यांचा रंग गव्हाळ होता.

माडखोलकरांच्या पत्नीच्या म्हणजे शांताबाईंच्या मावसबहिणीशी माझ्या अण्णाकाकांचं म्हणजे प्रा.वि.ह. कुलकर्णींचं लग्न झालं आणि इंदिराकाकूच्या रूपाने एक कर्तबगार स्त्री घरात आली.

इंदिराकाकू बोलण्यात कुणाला हार जाणारी नव्हती. तिच्या जिभेवर सरस्वती नाचत असायची. कितीतरी कविता, नाट्यगीते, उखाणे तिला पाठ होते. विलक्षण प्रतिभा तिच्यात होती. अण्णांच्या बरोबरीने ती साहित्यिकांशी बोलायची. घरातही ती सगळे करायची. ती शिवण शिवायची. विहिरीवरून सर्वांचे कपडे धुऊन आणायची. आळस तर तिला माहीतच नव्हता. ती जरा लठ्ठ होती पण कामाला वाघ होती.

इंदिराकाकूंच्या हाताला चव होती. तिच्या चकल्या फार छान असत. तशा चकल्या आजही कुणाला जमतील असे वाटत नाही. तिच्या भाजणीचे खास वैशिष्ट्य होते, तिच्याकडून मीही भाजणीचे ते प्रमाण शिकून घेतले होते. गोल चकल्या सोऱ्याने पाडण्यात माझा हातखंडा होता. विभक्त झाल्यावर इंदिराकाकू चकल्या करताना मला बोलावून घ्यायची. तिच्यानंतर उत्तम चकल्या जर मी कोणाकडे खाल्ल्या असतील तर त्या वि.स.खांडेकरांच्या मुलीकडे, सुलभा कापडीकडे. इंदिराकाकूला लग्नानंतर दहा वर्षे मूल नव्हते, तरी तिने तिच्या पुतण्यांचे खूप केले आणि तेही मनापासून. काकू स्पष्टवक्ती होती. मुलांना त्या त्या वेळी सुनावले की मुले सुधारतात असे ती म्हणायची. पण जशी बोलायची तशी लाडही करायची. त्यामुळे मुले रागवत नसत. उलट अण्णांकडे जायला उत्सुक असत.

दादरच्या वनिता समाजात ती फार लोकप्रिय होती. तसेच अण्णांकडे येणारे सर्वजण तिला मानायचे. शाळेत कुठल्याही लेखकाचे साहित्य अभ्यासताना किंवा शिकवताना ही लेखकमंडळी आमच्या घरी येतात हे सांगताना मला खूप बालिश आनंद वाटायचा. साहित्यिकांचाच विषय चालला आहे तर जाता जाता इस्लामपूरला भेटलेल्या साहित्यिकांबद्दलही सांगते. लग्न होऊन मी इस्लामपूरला आले. इस्लामपूरमध्ये आल्यानंतरही मला बऱ्याच साहित्यिकांना जवळून पाहण्याचा, ऐकण्याचा, भेटण्याचा योग आला. इस्लामपूरमध्ये साहित्यप्रेमी खूप होते, आणि साहित्यिकही खूप होते.

देवदत्त पाटील ग्रामीण कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या जवळपास छत्तीस कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. त्यांच्या दोन कादंबऱ्यांवर सिनेमेही निघाले आहेत. शैला सायनाकर ही केवळ तिच्या कवितेमुळे प्रसिद्ध नव्हती, तर माणूस म्हणूनही खूप मोठी होती. आपल्या विद्यार्थ्यांना ती स्वत:च्या मुलांसारखे मार्गदर्शन करायची. आर्थिक मदत करायची आणि त्याचे करियर उभे करायची.

मधु कुलकर्णी तर अगदी आमच्या घराजवळच राहायचे. त्यामुळे मी बऱ्याच वेळा त्यांच्या घरी जायचे. तेव्हा आमच्या खूप साहित्यिक गप्पा व्हायच्या. मधु कुलकर्णींचा साहित्यिक मित्रपरिवराही मोठा होता. ते शिराळा कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांच्या कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला बरीच साहित्यिक मंडळी प्रमुख पाहुणे म्हणून येत आणि सर्वजण मधु कुलकर्णींकडेच राहायची. त्यामुळेही मला सर्वांना जवळून पाहण्याची, भेटण्याची संधी मिळाली. आज देवदत्त पाटील, शैला सायनाकर आणि मधु कुलकर्णी आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी मात्र खूप आहे.

मला इस्लामपूरला ज्या लेखक मंडळींना भेटण्याची संधी मिळाली, त्यांत शांता शेळके, वसंत बापट, मंगेश पाडगांवकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे इत्यादींचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. इस्लामपुरात सहा-सात माध्यमिक शाळा होत्या. त्यांच्यात स्पर्धा असे. त्यामुळे स्नेहसंमेलनाला मोठमोठे साहित्यिक आमंत्रित असत. त्यामुळे आमची मजा असायची. आम्हांला त्यांचे विचार आणि वक्तृत्व ऐकायला मिळायचे.

व्यंकटेश माडगूळकरांनाही मी ऐकले आहे. जागर साहित्यमंडळात चर्चा, व्याख्याने, संमेलने होत. त्या निमित्ताने खूप साहित्यिक इस्लापूरला येत. याशिवाय दर संक्रातीला औदुंबरला साहित्यसंमेलन होई. त्या निमित्ताने रा.चिं.ढेरे, तेंडुलकर, रामचंद्र देखणे वगैरे अनेक विचारवंतांचे विचार ऐकायला मिळायचे.

मी आणि माझे पती शक्यतो सर्व कार्यक्रमांस हजर असायचो. माझे आयुष्य घडविण्यात या साहित्यिकांचा मोठा वाटा आहे असे मला वाटते.

(शब्दांकन: वृषाली आफळे)

Tags: लीला जावडेकर वृषाली आफळे भालचंद्र नेमाडे विंदा करंदीकर मंगेश पाडगांवकर वसंत बापट शांता शेळके vrushali afale leela jawadekar Bhalchandra Nemade Vinda Karandikar Mangesh Padgaonkar Vasant Bapat Shanta Shelke weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके