डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साहित्यप्रेमीची नोंदवही (12 ऑक्टोबर 2002)

'डिजिटल लायब्ररी' हा प्रकल्प जगातील काही ग्रंथालयांमध्ये राबवला जातो. आपल्याकडे विद्यापीठांमध्ये तो सुरू करण्याचा पहिला मान पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाला मिळाला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन उच्च शिक्षणमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी अध्यक्षस्थानी असलेल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक कोळस्कर यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेमुळे ज्ञानार्जनाच्या रूढ संकल्पना बदलणार आहेत. डिजिटल लायब्ररी प्रकल्पात दहा लाख ग्रंथ उपलब्ध होणार आहेत.
 

1 सप्टेंबर 2002 :

साताऱ्याचे 'ऐक्य' म्हणजे पळणीटकर. 1924 मध्ये 'ऐक्य'ची स्थापना झाली, तेव्हापासून पळणीटकर घराणे 'ऐक्य'शी संबंधित. तेव्हाच्या चंडिराम हरी पळणीटकरांचे चिरंजीव सुरेशच आता ऐक्य चे व्यवस्थापक-संपादक होते. त्यांनी 'ऐक्य' अधिकाधिक वाचकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे निधन झाले.

2 सप्टेंबर :

'डिजिटल लायब्ररी' हा प्रकल्प जगातील काही ग्रंथालयांमध्ये राबवला जातो. आपल्याकडे विद्यापीठांमध्ये तो सुरू करण्याचा पहिला मान पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाला मिळाला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन उच्च शिक्षणमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी अध्यक्षस्थानी असलेल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक कोळस्कर यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेमुळे ज्ञानार्जनाच्या रूढ संकल्पना बदलणार आहेत. डिजिटल लायब्ररी प्रकल्पात दहा लाख ग्रंथ उपलब्ध होणार आहेत.

3 सप्टेंबर :

बंगळूरला बी. व्ही. कारंथ यांचे निधन झाल्याची बातमी तशी उशिराच समजली. कारंथ रंगभूमीवर केवळ दिग्दर्शक म्हणूनच वावरले नाहीत, तर लेखक, संगीतकार वगैरे म्हणूनही ते ओळखले गेलेत. 'नोकुमार स्वामी', 'हयवदन', 'चंद्रहास', 'सतावळा नेरालू', 'इडिपस' अशी काही नाटके म्हणजे कारंथच! बी. व्ही. कारंथ!

4 सप्टेंबर :

साताऱ्याचे नगर वाचनालय शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करते झाले. त्या वेळी तेथे झालेल्या समारंभात शिवाजीराव भोसले यांचा सत्कार करण्यात आला तेही आता पंचाहत्तर वर्षांचे झालेत म्हणून!

5 सप्टेंबर :

'सरकारी योजनांसाठी खुपच कमी पैशात काम करावे लागते', हा सततचा सूर सरकारच्या कानावर घालून साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष रा. रं. बोराडे यांनी खरोखरच काही करायचे ठरवलेले दिसते. ठोसच, म्हणजे मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या मराठी भाषेतील लेखनास दर हजार शब्दांमागे दिले जाणारे 100 रुपये मानधन आता 300 रुपये करण्यात आले आहे. अन्य भाषांसाठी हा दर 50 रुपये होता, तो 150 रुपये करण्यात आला आहे. परदेशी भाषांसाठी हा दर 60 रुपयांवरुन 200 रुपयांवर गेला आहे. असेच बरेच काही. नवलेखक अनुदान योजनेतील हस्तलिखिते नाखुषीनेच बघून दिली जातात; पण त्याप्रीत्यर्थच्या मानधनातही आता वाढ करण्यात आल्यामुळे ही हस्तलिखिते आता मनापासून तपासली जातील अशी आशा निर्माण झाली आहे.

6 सप्टेंबर :

इंडोनेशियात बारा वर्षे वास्तव्यास असलेल्या ज्योती दर्यानानी यांनी पंचतंत्राचे इंडोनेशियन भाषेत भाषांतर केले आहे. इंडोनेशियन दूतावासाने चंदीरामाजींच्या ह्या प्रकल्पाची खास दखल घेतली आहे. इ.स. पूर्व 200 सालच्या काळातला पंडित विष्णू शर्मा यांचा हा भारतीय कथांचा संग्रह कोठून कोठपर्यंत पोहोचला! पशुपक्ष्यांच्या रंजक कथांमधून जीवनाचे सार हे फक्त भारतापुरते मर्यादित राहिले नाही!

16 सप्टेंबर :

'खंत ना गत' ह्या कादंबरीसाठी राजन खान यांना आज मुंबईत जयवंत दळवी स्मृती पुरस्कार देण्यात आला. यंदा वि. पु. भागवत पुरस्कार मिळालेल्या आडबाजूच्या म्हणजे श्रीरामपूरच्या 'शब्दालय' प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. ह्या
समारंभासाठी अरुण साधू, रंगनाथ पठारे ह्यांना खास पाचारण करण्यात आले होते. आजच कवी ना. धों. महानोर यांनी आपल्या वयाची साठी पूर्ण केली. त्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केलेले मनोगत टिपण्यासारखेच - 'मागे वळून पाहण्याइतका काही मी मोठा झालेलो नाही. तरीही कवी म्हणून मी माझ्या राज्यात राजा आहे. तृप्त आहे. कोण कुठला मी? माझ्यासारख्या छोट्या माणसाला कवितेनं खूपच मोठं केलं. व्यापक पद्धतीनं जीवनाकडे बघायला शिकवलं. निसर्ग, स्रुष्टीचा  मी पुरेपूर आनंद लुटला, इतरांनाही तो कवितेतून देण्याचा प्रयत्न केला. अनेक पदं व पदव्या मिळाल्या. त्यापेक्षाही रसिकांचे प्रेम भरभरून मिळाले. तरीही कवी म्हणून काय केलं, या पेक्षा माणूस म्हणून, शेतकरी म्हणून माझ्या बांधवांसाठी मी काय केलं, याचाच विचार मनात येत राहतो. अजूनही कोरडवाहू शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले अश्रू थांबलेले नाहीत. त्यासाठी पाण्याचं नियोजन काटेकोर झालं पाहिजे. पीक पद्धतीत योग्य बदल केला पाहिजे. त्यासाठी काही करायचं आहे. त्याच विषयाला आता वाहून घेतलं आहे.'

17 सप्टेंबर :

'तुझ्या शेतामधून, तुझ्या घामामधून'- वसंत बापटही असेच म्हणत होते. त्यांनी कविता नुसतीच लिहिली नाही, तर ते सुद्धा कविता जगलेच. त्यांची कविता एकसुरी नव्हती, एकरंगी नव्हती, तीत जीवनाचे सारे रंग आले होते, कोणताही रंग त्यांच्या कवितेने आणि त्यांनीसुद्धा निषिद्ध मानला नव्हता. असे हे कविमन आपल्या मैफलीची सांगता हमखास करायचे, ते गीत होते, 'आम्ही जाणारच की कवातरी पट्दिशी' - दीड महिन्यांपूर्वी एसेम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या नव्या भव्य दालनात वयाची आठ दशके पूर्ण झाल्याबद्दल जी रंगत गेलेली मैफल झाली तेव्हा मात्र त्यांनी हे शब्द उच्चारले नव्हते. कदाचित मनातल्या मनात ते तेव्हा स्वतःशीच म्हणाले असतील, - आता जायाचंच की -

त्या समारंभावेळी कविवर्यांची तब्येत उत्तमच होती असे नाही, पण ती मैफल अशी काही झाली होती की कविवर्य इतक्या लवकर ही मैफल सोडून जातील आणि तो कार्यक्रम जेथे झाला त्याच वास्तूत आज त्यांचे अंत्यदर्शन घ्यावे लागेल असे मात्र तेव्हा किंचितही वाटले नव्हते. त्या वास्तूपासून जवळच असलेल्या 'वैकुंठ' स्मशानभूमीत शववाहिकेतून कविवर्यांना नेणे चालले होते, तेव्हा कवी मनमोहरांच्याच त्या ओळी पुन्हा पुन्हा आठवत होत्या 'शव हे कवीचे जाळु नका हो,
जन्मभरी तो जळतच होता, फुले तयावर उधळु नका हो, जन्मभरी तो फुलतच होता.'

18 सप्टेंबर :

राजे तर भर दरबारात भरल्या मैफलीतूनच उठून गेले - तडकाफडकी, ध्यानीमनी नसता, सहज लावलेल्या 'ई टीव्ही' वर ही बातमी जेव्हा ऐकायला मिळाली, तेव्हा हे काही चुकीचे तर सांगत नाहीत ना, असेच वाटत होते.

शिवाजीराव सावंत खरोखर राजासारखेच वावरत होते, बोलत होते. राजासारख्याच भिरभिरत्या नजरेने सारे काही टीपत होते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लाभावे, अशी त्यांची इच्छा होती. राजेप्रेमी इतरांनाही तसेच वाटत होते. 31 ऑगस्टला तर त्यांचा वाढदिवस साजरा झाला होता. त्या दिवशी अगदी बाबासाहेब पुरंदरेपासून अनेकांनी ही इच्छा बोलून दाखविली होती. आता ती लवकरच फलद्रूप होणार, असेच सर्वांना वाटत होते, पण झाले भलतेच! 'ह्या' संमेलनासाठी प्रचार करता करता राजे 'त्या' संमेलनात निघून गेले. 

19 सप्टेंबर :

शिवाजीरावांचा मृतदेह आज पहाटे पुण्यात आला. त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन आल्यावर आज दुपारी आणखीन एक तितकीच धक्कादायक बातमी मुंबईवरून आलेल्या दूरध्वनीने दिली, 'प्रिया तेंडुलकर गेली'

प्रिया तेंडुलकर गेली, खरेच वाटेना. पुन्हा पुन्हा विचारून खात्री करून घेतली आणि प्रियाच्या आजारपणाचे कळूनही तिला भेटायचे राहूनच गेले, ह्याची बोच फार फार तीव्रतेने जाणवली.

22 सप्टेंबर :

दिवाळी अंकाची नांदी म्हणजे आज 'पुष्पक' प्रकाशनाने दिवाळी अंक संच योजना सुरू केली. त्याच वेळी त्यांनी ह. मो. मराठे यांच्याशी गप्पा मारण्याचा बेतही जुळवून आणला. त्यांनी आत्ता आत्ताच 'मधलं पान' हे हमोंचे त्यांच्या संपादकीय वाटचालीवरचे खुसखुशीत पुस्तक प्रसिद्ध केले आहे. ते गप्पा गप्पांतूनच वाचकांपुढे ठेवले अशी त्यांची ही कल्पना होती, ह्यासाठीचे मुख्य गप्पक होते प्र. ना. परांजपे आणि शंकर सारडा.

मराठे इंद्रधनुष्य, पुढारी, तरुणभारत, किर्लोस्कर, लोकप्रभा, घरदार, पुन्हा पुढारी, मार्मिक, पुन्हा घरदार, पुन्हा किर्लोस्कर आणि मग नवशक्ती असा हा प्रवास करते झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या ह्या लेखनातून अनुभव मांडले जात असतानाच एकूणच या सृष्टीचेही विहंगम दर्शन होत आहे. त्यामुळेच हे वाचन माहिती देतानाच काही नवलाई ही देत आहे - ह्या गप्पाही त्याच स्वरूपाच्या होत्या. सध्या परदेशी गुंतवणूक ह्या क्षेत्रात येऊ पाहत आहे. त्याबद्दलही मराठेंनी प्रतिकूल मत व्यक्त केले आहे.

सप्टेंबरमध्येच संपादकीय भेटी आयोजित करूनही 'पुष्पक' ने दिवाळी अंक वातावरण निर्मिती करण्यास सुरुवातही केली आहेच.

24 सप्टेंबर :

सध्या साहित्यिक यमदूताच्या हिटलिस्टवरच आहेत की काय! अनेक भाषांवर प्रभुत्व असलेले, विशेषतः उर्दू, बंगालीचे चांगले जाणकार आणि आपल्या ह्या ज्ञानाचा कोशवाङ्मयासाठी उपयोग करून घेणारे श्रीपाद जोशी यांचे आज निधन झाले. अलीकडे त्यांच्या प्रकृतीने त्यांच्याशी असहकार पुकारला होताच; त्यातच त्यांनीही जगण्याच्या प्रयत्नाशीच असहकार सुरू केल्याने...

26 सप्टेंबर :

शिवाजीराव सावंत हे आगामी साहित्य संमेलनातील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतले एक उमेदवार होते. त्यांच्या निधनामुळे ती प्रक्रिया आता पुन्हा नव्यानेच सुरू करण्याचे साहित्य महामंडळाने ठरविले. त्यामुळे आता या पदासाठी एक नाव नव्याने पुढे आले आहे ते डॉ. जनार्दन वाघमारे यांचे. वाघमारे मराठीतील एक उत्तम विचारवंत समीक्षक तर आहेतच पण ते निग्रो साहित्याचे ही चांगले जाणकार आहेत. (आधीचे भेंडे, सुधा या लढतीत आहेतच.)

29 सप्टेंबर :

मराठी भाषा चांगली अवगत असलेल्या कन्नड लेखिका सुधा मूर्ती यांच्या एका कादंबरीचे (रुपांतर) पुण्यात समारंभपूर्वक प्रकाशन झाले होते. आज त्यांची 'महाश्रोता' कोल्हापुरात समारंभपूर्वक वाचकांपुढे आली आहे. त्यांच्या कन्नड लेखनात डोकावणारी इंग्रजी, गरिबांकडे पाहण्याची त्यांची नजर, परदेशातील कष्टमय जीवन इत्यादींबद्दल त्यांची एक मुलाखतही यावेळी तेथे घेण्यात आली.

30 सप्टेंबर :

पुण्यातील प्रभात-भांडारकर-आगरकर रस्ते जेथे एकत्र येतात तेथील जॉगिंग पार्कला 'कविवर्य वसंत बापट' यांचे नाव द्यायचे पुणे महानगरपालिकेने ठरवले आहे म्हणे!  'हिरवाई' चे संस्थापक अध्यक्ष असलेल्या कै. बापट यांचे हा पार्क हे एक स्वप्न होते !
 

Tags: मराठी साहित्य साहित्यप्रेमी साहित्य Marathi Language Marathi Literature Literature #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके