फ्रेंचमधले प्रसिद्ध भाषांतरकार कळवळून म्हणतात की भाषांतराकडे जरा नव्या दृष्टिकोनातून पाहा. भाषांतरकार मूळ पुस्तकाला स्वतःच्या अन्वयातून जे परिमाण देतो ते पाहा. एका प्रसिद्ध लेखकाला एकदा कोणीतरी म्हणाले की अलीकडे तुम्ही तुमची शैली बदलती आहे काय? त्यावर तो म्हणाला, ‘‘नाही. मी माझा भाषांतरकार बदलला आहे.’’ साने गुरुजींच्या भाषांतरांना यांपैकी कितीतरी विधाने लागू पडतात. त्यांच्या भाषांतरांचे ऋण मोठे आहे.
पूज्य साने गुरुजी यांनी एकूण 124 लहान-मोठी पुस्तके लिहिली. त्यांच्या अनेकविध कामातून त्यांनी इतकी पुस्तके लिहिली यावरून त्यांचे लेखनावरील प्रेम कळते. यांपैकी 14 पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले. गोड गोष्टींचे 10 भाग म्हणजे उत्तम इंग्रजी आणि भारतीय भाषांतील कादंबऱ्यांची मुलांसाठी केलेली संक्षिप्त रूपांतरे होती. इंग्रजीतून प्रौढ वाचकांसाठी जी पुस्तके त्यांनी अनुवादित केली, त्यात ‘कला म्हणजे काय?’, ‘मानवजातीची कथा,’ 'राष्ट्रधर्म', 'दिल्ली डायरी', 'कुरल', 'जात ना खेद', 'ॲमिलची चिंतनिका', 'कल्को’ अथवा ‘संस्कृतीचे भवितव्य’ हे महत्त्वाचे अनुवाद आहेत. मुलांसाठी त्यांनी ज्या कथांचे पुनर्निवेदन केले त्यापाठीमागे त्यांचे निश्चित हेतू होते. मुलांच्या मनावर त्यांच्या जडणघडणीच्या काळात सुसंस्कार व्हावेत हा प्रधान हेतू होता. मुलांचे मनोरंजन करताना ‘आपले प्रभूंशी नाते जडले जाते,’ असे त्यांना मनोमन वाटत असे. ही त्यांची नितांत श्रद्धा असल्याने या संदर्भात अन्य शास्त्रीय अगर तर्कशास्त्रीय निकष लावण्याचा प्रयत्न करणे मूलतःप्रस्तुत अप्रस्तुत ठरते. या छोट्या पुस्तकांत गुरुजींनी ज्या प्रस्तावना लिहिल्या आहेत, त्या अर्थवाही आहेत. पहिल्या भागाच्या प्रस्तावनेत ते लिहितात, ‘‘या भागात ज्या लोककथा मी देत आहे त्या बंगालमधील आहेत. त्यातील अनेक गोष्टी मी मुलांना वेळोवेळी सांगितल्या आहेत. त्या गोष्टी मी सांगे तशा लिहून काढल्या आहेत. त्यामुळे हे भाषांतर असे नाही. प्रत्येक समाजात लोककथा असतातच. जगातील लोककथांत पुष्कळसे साम्य आढळते.’’
येथे एक मुद्दा नोंदवला येतो. तो म्हणजे ही भाषांतरे नव्हेत. प्रादेशिक कथांवर आधारलेली ही मुलांच्या रुचीनुसार केलेली सुबोध, संक्षिप्त निवेदने आहेत. या कथा परिचित आहेत आणि मानवी आयुष्याच्या सनातन समस्या, परिस्थितीचे चित्रण करणाऱ्या आहेत. दुसऱ्या भागाच्या प्रस्तावनेत ते लिहितात, ‘‘गोष्टी जरी मी माझ्या भाषेत मधून मधून नवीन कल्पनाविचार घालून मांडल्या असल्या तरी या गोष्टींचे श्रेय मला नाही. ते श्रेय मूळव्या कल्पक लेखकांचे आहे.’’ याचा अर्थ असा की पुनर्निवेदनात गुरुजींनी आवश्यक व अनुरूप असे स्वातंत्र्य घेतले होते. गुरुजींनी गोड केलेल्या या गोष्टी होत्या. मुलांवरील प्रेमामुळे आणि त्यांच्यावर सुसंस्कार करण्याच्या उद्देशाने त्यांनी या कहाण्या सांगितल्या. त्या केवळ मुलांनाच सांगितल्या असे नव्हे, तर गावकऱ्यांना, तुरुंगातील कैद्यांना, बायाबापड्यांना, सवंगड्यांना, नातेवाइकांना, सर्वांना ऐकवल्या आहेत. या पद्धतीने रंजक, उद्बोधक कहाण्या ऐकण्याचे, सांगण्याचे संस्कार त्यांच्या मनावर लहानपणापासून झालेले होते. त्यांचे अवघे घर संस्कारसंपन्न होते.
गोड गोष्टीचे जे दहा भाग गुरुजींनी लिहिले, त्या संबंधी प्रास्ताविकात आणखी काही उल्लेखनीय निवेदने आहेत. ‘‘ ‘चिनी संस्कृती व इतिहास’ यावर अनेक ग्रंथ मी तुरुंगात वाचीत होतो. चिनी वाङ्मयाच्या प्रकरणात एका प्रख्यात चिनी नाटकाची दोन-तीन पानांत संक्षिप्त गोष्ट होती. या नाटकात कर्तव्यपालन शिकविले आहे. मी त्या दोनपानी संक्षेपाचा पाऊणशे पाने विस्तार केला आहे. चिनी व भारतीय हृदय एकरूपच आहे. काही कथांत संक्षेप आहे, तर या कथेत विस्तार आहे. याउलट ज्या दोन बृहत कादंबऱ्यांचा त्यांनी संक्षेप केला आहे त्या मुळात प्रचंड विस्ताराच्या आहेत. फ्रेंच कादंबरीकार व्हिक्टर ह्यूगो याची ‘ला मिझारायबल’ या कादंबरीचा ‘दुःखी कष्टी’ असा संक्षेप केला. 1930 मध्ये त्रिचनापल्लीला असताना मी सत्याग्रहींना ही गोष्ट तीन रात्र सांगत होतो. 'मनूबाबा' ही दुसरी कथा, जॉर्ज इलियट या लेखिकेच्या 'सिलास मार्नर’ या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारलेली. गुरुजी प्रास्ताविकात लिहितात, ‘‘समोर पुस्तक न ठेवता ती गोष्ट आठवून ही कथा मी लिहीत आहे. 'सिलास मार्नर' या कादंबरीत व्यक्तित्वाचा विकास कसा होतो हे सुंदर रीतीने दाखविले आहे. बेबी सरोजा ही जेलमधल्या एका तामिळी मित्राने सांगितलेली गोष्ट सांगितलेली गोष्ट आठवून, तीत फेरफार करून थोडीफार भर घालून देत आहे.’’
त्रिचनापल्लीचा सेंट्रल जेल हा दक्षिण भारतातला मोठा तुरुंग. तेथे 300 कैदी ठेवता येत. ते तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रांतांतले असत. या जेलमध्ये गुरुजींना आंतरभारतीचे दर्शन झाले. पुढे 1949 ला पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनात गुरुजींनी आंतरभारतीचा ठराव मांडला. अमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिरात चंद्रोदय भट्टाचार्य या बंगाली मित्रामुळे त्यांचा बंगाली भाषेशी परिचय झाला. त्रिचनापल्लीच्य कानडी मित्राकडून त्यांनी कानडीचे धडे घेतले. तामिळी मित्राने ‘बेबी सरोजा’ची गोष्ट सांगितली. ह्यूगोच्या कादंबरीवरील ‘दु:खी’ याच तुरुंगात अवतरली. तिथेच तिरुवल्लूर या तामिळी पंडिताच्या 'कुल' या ग्रंथाचा अनुवाद त्यांनी केला. तो अय्यर यांच्या इंग्रजी अनुवादावरून केला होता. या ग्रंथाला ‘तमीळ वेद’ म्हणतात 1945-46 व्या बोर्डी येथील वास्तव्यात त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ व कृष्णा हाथीसिंग यांच्या 'वुइथ रिग्रेट्स’चे भाषांतर केले. 'भारताचा शोध’ प्रसिद्ध झाला नाही. तसेच त्यांनी मादाम क्युरीच्या चरित्राचा 500 पाने अनुवाद केला होता, तो देशमुख कंपनी प्रसिद्ध करणार होती. तोही प्रसिद्ध होऊ शकला नाही.
नाशिकच्या तुरुंगात पुष्कळ साहित्यनिर्मिती झाली. भगिनी निवेदिताच्या 'रिलिजन अॅन्ड धर्म’मधल्या निबंधांचा अनुवाद केला तो ‘'राष्ट्रीय हिंदुधर्म’ या नावाने प्रसिद्ध झाला. याबद्दल त्यांनी लिहिले आहे. ‘‘मी केवळ भाषांतर केले नाही. हा मोकळा अनुवाद आहे.’’ भगिनी निवेदिता यांच्या कलेवरील निबंधांचे भाषांतर ‘कला आणि इतर निबंध' या नावाने प्रसिद्ध झाले. रवींद्रनाथांच्या निबंधांचा अनुवादही याच काळात झाला. गुरुजींना सारे रवींद्र साहित्य मराठीत आणण्याची इच्छा होती. तशी परवानगीही त्यांनी घेऊन ठेवली होती. प्रिन्स क्रोपा यांच्या तरुणांना समाजवादी दृष्टी देणाऱ्या या पुस्तकाचे भाषांतरही गुरुजींनी केले. पुढे ते ‘साधने’च्या चार अंकांतून ‘युवकांस नवदृष्टी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले. गांधीजींच्या काही लेखांचा अनुवादही गुरुजींनी याच काळात केला. त्यांची 'खेड्यात जाऊन काय कराल?’ ही पुस्तिका प्रसिद्ध झाली. किशोरीलाल मश्रूवाला यांच्या ‘केळवणीना पाया’ या शिक्षणशास्त्रावरील ग्रंथाचा अनुवादही याच काळात झाला.
धुळ्याच्या तुरुंगात असताना 21/3/34 ते 5/4/34च्या दरम्यान गुरुजींनी टॉलस्टॉयच्या ‘व्हॉट इज आर्ट?' या ग्रंथाचे भाषांतर केले. हे भाषांतराचे काम आपण का हाती घेतले या संबंधी त्यांनी भाषांतराच्या प्रास्ताविकात निवेदन केले आहे. ‘‘मूळ ग्रंथाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात 'कला म्हणजे काय’ हा बृहद निबंध आणि दुसरे काही निबंध. मी या सर्वांचे भाषांतर दिले नाही. 'कला' हा लघुनिबंध व मोपासावरील लेख यांचे भाषांतर मी दिले नाही. (जे संस्कारात बसणारे नव्हते ते त्यांनी बाजूला ठेवले.) पुस्तकातला दुसरा भाग म्हणजेच महर्षी टॉलस्टॉयचा हा भावनोत्कट व विचारात्कट असा बृहद निबंध होय. या निबंधातील 13 व्या प्रकरणाचे भाषांतर मी दिले नाही, ते संगीतप्रचुर नाटकाविषयी आहे. या प्रकरणाशी मी समरस होऊ शकलो नाही. ते मला समजेना. टॉस्टॉयने परिशिष्टात जे दुर्बोध काव्याचे मासले दिले आहेत त्यांचे भाषांतरही मी केले नाही. या ग्रंथाचे भाषांतर करताना मला परकेपणा वाटला नाही. हे भाषांतर करताना मी अपार आनंद अनुभवीत होतो. हे भाषांतर सौंदर्याच्या व्याख्या वगैरेंचा भाग सोडून इतरत्र कोठेही क्लिष्ट व कृत्रिम वाटणार नाही अशी मला आशा आहे.’’
या ग्रंथाचे सार सांगताना से प्रास्ताविकात म्हणतात, ‘‘कलेने सर्व मानवांना जोडणाऱ्या थोर धार्मिक भावना, सर्व मानवांचे ऐक्य, सर्वत्र बंधुभाव या भावना किंवा रोजच्या संसारातीलही सुंदर व सहृदय भावना याव्यात. कलाकृती उत्कृष्ट व्हायला आणखी काही गोष्टीची आवश्यकता आहे. कलाकार ज्या थोर भावना देणार त्या त्याच्या हृदयातून आल्या असाव्यात. त्या भावनांत त्याची तळमळ हवी. ती कृती कलावानाची औरस संतती असावी, दत्तक नसावी. थोर भावना ही पहिली गोष्ट, दुसरी म्हणजे भावना स्पष्ट आणि स्वच्छ असाव्यात. आपल्या साहित्यशास्त्रात ध्वनी हा काव्याचा आत्मा मानला आहे. परंतु ध्वनी हा पुष्कळ वेळा गूढ असतो. तो लक्षातच येत नाही. टॉलस्टॉयचे असे म्हणणे आहे की भावना सर्वस्पर्शी करणे हे पहिले काम. त्यानंतर नादमाधुर्य किंवा इतर आनुषंगिक गोष्ट. टॉलस्टॉयच म्हणतो की त्या त्या काळात जे महापुरुष असतात त्यांची दृष्टी थोर समजावी. त्या थोर पुरुषांनी दाखविलेल्या मार्गाने सत्कलेने जावे. पण थोर पुरुष तरी कोण? सर्व मानवांचे ऐक्य व्हावे म्हणून झटणारा, सर्वत्र बंधुभाव, हेच ज्याचे ध्येय, ज्याला आपपर नाही. सर्व मानव जातीच्या हितमंगलासाठी जो उभा आहे; ज्याला भेद अमंगळ वाटतात, प्रेम हीच ज्याची शक्ती, त्याग हे ज्याचे वैभव तो महापुरुष होय.
केवळ बलवान हा टॉलस्टॉयचा आदर्श नाही. नित्झेचा पुरुषोत्तम हा टॉलस्टॉयचा पुरुषोत्तम नाही. सकल मानवजातीचे प्रेमाने ऐक्य करू पाहणारा तो महापुरुष होय. सर्व कलांनी स्वत:ला उजेड मिळावा म्हणून या महापुरुषांभोवती फिरले पाहिजे. टॉलस्टॉय म्हणतो की, कलावानाने बहुजन समाजाचे झाले पाहिजे. महापुरुष हा बहुजन समाजाचा असतो. महापुरुषाच्या पाठोपाठ कलेने गेले पाहिजे ही गोष्ट या कलाविलासवादी लोकांना पटत नसते. कला कोणाची दासी नाही. महापुरुषांनी दाखविलेल्या ध्येयाची दासी तिने का व्हावे? कलेसाठी कला हे आमचे ब्रीदवाक्य आहे असे हे स्वैराचारी म्हणत असतात. या देशातील महापुरुष एका बाजूला जात आहेत व कलावान दुसऱ्या बाजूला जात आहेत. ज्या देशातील महापुरुष आणि कलावान यांच्यामध्ये मेळ नसतो, त्या देशाच्या दुर्दैवाना सीमा नाही.’’ टॉलस्टॉयचे विचार विशद करताना गुरुजींनी या विषयावरील आपली तळमळ भरभरून व्यक्त केली आहे. त्यामुळेच त्यांनी म्हटले आहे की भाषांतर करताना मी अपार आनंद अनुभवीत होतो. उत्तम भाषांतरासंबंधी जी मते मांडण्यात आली आहेत त्यानुसार गुरुजींचे भाषांतर कसे वठले आहे याचा बराच काळ लोटल्यानंतर विचार केला तर काय म्हणता येते? भाषांतर शब्दश: केलेले असू नये. तसे केले तर ते वाचताना बेढब तर वाटतेच, पण नीट अर्थबोध होण्यात अडचण निर्माण होते. या संदर्भात इंग्रजी विधानाचा नेहमी उल्लेख केला जातो.
Translation if it in accurate it is not fair, and if it is fair, it is not accurate' हे जमेला धरूनदेखील भाषांतरकाराने मूळ पुस्तकाचे प्राणतत्त्व जर शैलीदार भाषेत मांडले तर ते अचूक नसण्याचा दोष फार मोठा, असे मानता येणार नाही. टॉलस्टॉयच्या निबंधाचे मुख्य विवेचन गुरुजींच्या अंतःकरणाला भिडणारे होते. पण त्यात केलेला युक्तिवाद आणि दिलेले संदर्भ सर्व भाषांतरासाठी स्वीकारावेत असे त्यांना वाटले नाही, त्यामुळे त्यांनी आपल्या मताप्रमाणे त्यातून निवड केली. असे स्वातंत्र्य घेणे हा भाषातरातील तत्त्वतः दोष मानावा का? दुसरी गोष्ट म्हणजे हा एक तात्त्विक स्वरूपाचा निबंध आहे. त्यात भाववृत्तीला आवाहन करणारा काही भाग नसला तरी काही भागात तात्त्विक विवेचन येते. त्याचा भावानुवाद करणे नेहमीच शक्य होत नाही. असा भाग एक तर वगळावा लागतो किंवा त्याचे शब्दश: भाषांतर करताना येणारा ओबडधोबडपणा स्वीकारावा लागतो. गुरुजींच्या आर्जवाप्रमाणे हे गोड मानून घ्यावे लागते. अगदी वरवरचे उदाहरण द्यावयाचे असेल तर कलावंतासाठी गुरुजींनी कलावान हा शब्द वापरला आहे. तो आणखी कुणी वापरला नसेल. त्यात डोकावणारी अधिक्षेपाची छटा गुरुजींना अभिप्रेत असणे शक्य नाही. आता पहिला प्रकरणातला परिच्छेद घ्या. मुळात वाक्ये आहेत ती अशी : Take up any one of our ordinary newspaper, and you will find a part devoted to the theatre and music. In almost every number you will find a description of some art exhibition or some particular picture, and you will always find reviews of new works of art that have appeared, of volumes of poems, of short stories or of novels.
याचे भाषांतर कसे झाले आहे ते पाहा. कोणतेही वर्तमानपत्र अगर मासिक घ्या. ('ऑर्डिनरी’चे भाषांतर नाही. 'नेहमीचे’ चालले असते. 'अ पार्ट’चे भाषांतर ‘थोडीतरी’ असे आहे. Some art exhibition or some particular picture चे भाषांतर विशेष चित्राचे अगर प्रदर्शनाचे (कलाविषयक हवे) Volumes चे भाषांतर 'संग्रह’ हे आले नाही. Novels ला नवलकथा असे दिले आहे. पुढच्या पानावर कादंबरी हा शब्द वापरला आहे. पृष्ठ दोनवर मूळ वाक्य Newspapers consider their duty to give their readers detailed account of these artistic productions.. यातील शेवटच्या शब्दाचे भाषांतर या ‘कलाप्रसूतीची’ असे केले आहे. 'कलाकृतीची' हवे. शिवाय दुसऱ्या परिच्छेदाचे भाषांतर संक्षिप्त झाले आहे) भाषांतर तुरुंगातल्या वातावरणात एका महिन्याच्या अवधीत पूर्ण केले असल्याने घाई झाली असण्याची शक्यता आहे.
काही प्रसंगी भाषांतरात अभिनिवेश आल्याने ते विस्तारले आहे. मूळ परिच्छेद The ballet, in which half-naked women make voluptuons movements, twisting themselves into various sensual writhings, is simply a lowd performance' याचे भाषांतर.... ‘असल्या संगीत नाटकात अर्धवट नग्न अशा स्त्रिया कामोद्दीपक हावभाव करीत असतात. शरीराला नाना प्रकारचे आळेपिळे देऊन नाना अवयव दाखवीत असतात व भावना उद्दीपित करतात; प्रेक्षकांच्या मनात भोगेच्छा व विषयवासना बेफाम जागृत करणे अशासाठी हे नाटक असते. असले नाटक म्हणजे प्रत्यक्ष नरकदर्शन होय. हे नाटक म्हणजे विषयविलासाचे प्रदर्शन होय. कामुकतेचा नंगानाच होय.’ गुरुजींच्या सात्त्विक संतापाचे हे निदर्शक आहे.
तिसऱ्या प्रकरणात सौंदर्याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्यांचे भाषांतर सुबोध होत नाही असा गुरुजींचा अनुभव, मूळ इंग्रजी, Beauty is defined by Baumgarten as a correspondence, that is an order of parts in their mutual relationship to each other and in their relation to the whole. The aim of beauty itself is to please and excite a desire. याचा अनुवाद 'सोंदर्य’ म्हणजे मेळ, प्रमाणबद्धता अशी बामगर्टची व्याख्या आहे. अवयवांचा परस्परांशी व अवयवीशी असणारा मेळ म्हणजे सौंदर्य होय. (Whole साठी ‘अवयवी’ असा शब्द वापरला आहे.) यानंतरच्या भाषांतराची प्रकरणे सरस उतरली आहेत. त्यांची शैली प्रवाही आणि सुबोध बनली आहेत. त्यात अनावश्यक भाषांतरकर्त्याचा विस्तार आलेला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे टॉलस्टॉयचे कलेविषयीचे आणि कलेच्या प्रयोजनाविषयीचे विचार हे गुरुजींना मनापासून पटलेले विचार आहेत. त्यामुळे हे भाषांतर एक प्रकारे स्वतंत्र लेखन आहे.
'कुरल' या तमीळ ग्रंथाचा अनुवाद असाच सरस झालेला आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ सदाचाराची संहिताच आहे. त्याला तमीळ वेद म्हटले जाते. विषय अर्थात गुरुजींच्या अंतःकरणाला स्पर्श करणारा. ग्रंथकर्ता तिरुवल्लवर म्हणजे बल्लव जातीतील महापुरुष. तो इसवी सनाच्या पहिल्या शतकातला असावा. तिरुवल्लवर म्हणजे वल्लव जातीतील महापुरुष. वल्लव जात म्हणजे अस्पृश्य जात. तो कोणत्याही धर्मपंथाचा दिसत नाही. तो सर्व धर्मांतील नीतितत्त्वांचा संग्राहक आहे. ग्रंथात 1330 कविता आहेत.
यांसारखाच गुरुजींना अगत्य असलेला, त्यांनी भाषांतरित केलेला छोटा ग्रंथ म्हणजे डॉ.राधाकृष्णन यांचा 'Kalki or the Future of Civilization' - 'संस्कृतीचे भवितव्य' या नावाने तो प्रसिद्ध झाला. प्रास्ताविकात वर्णन केलेली परिस्थिती आजही तशीच आहे. किंबहुना अधिक बिकट झाली आहे. ‘जग बाह्यत: एकरंगी होत चालले असले तरी त्यामुळे आंतरिक एकता झाली आहे असे नाही. या ग्रंथात धर्मासंबंधी जे विचार प्रकट झाले आहेत ते गुरुजींच्या मनातले विचार आहेत. कोणत्याही धर्माचे लोक असोत, जे खरे धार्मिक असतात त्यांची दृष्टी या वृत्ती सर्वत्र तीच दिसून येते. संत कोणत्याही धर्माचा असो. साऱ्या संतांचे जीवन एकरूपच असते. भगिनी निवेदिता यांच्या 'Religion and Dharma' या लेखसंग्रहाचा अनुवाद गुरुजींनी 'राष्ट्रीय हिंदुधर्म' या नावाने केला. त्यातील सर्व विषय गुरुजींच्या जिव्हाळ्याचे असल्यामुळे हा अनुवादही सरस उतरलेला आहे.
‘दिल्ली डायरी'त म. 10-9-47 ते 30-1-48 दरम्यानच्या प्रार्थनोत्तर प्रश्नांचा अनुवाद आहे. हा काळ प्रचंड जातीय तणावाचा आणि गांधीजींच्या तत्त्वांच्या सत्त्वपरीक्षेचा होता. या प्रवचनात त्यांचे स्पष्ट पडसाद आहेत. एका प्रवचनातले विचार, ‘अल्पसंख्याक लोक देशद्रोही होतील अशा भीतीने त्या सर्वांना हद्दपार करू पाहणे बहुसंख्याकांना शोभत नाही. तो केवळ भित्रेपणा होय. अल्पसंख्य जमातींच्या हक्कांचे निरपवाद रक्षण करण्यातच बहुसंख्याकांचा मोठेपणा आहे.’ या विषयावरील भाषांतराच्या गुणवत्तेचा प्रश्नच उद्भवत नाही.
शेवटचा अनुवाद विचारात घ्यावयाचा तो कृष्णा हाथीसिंग यांच्या 'With No Regrets' या आत्मचरित्राचा. नेहरू घराण्याबद्दल गुरुजींना अत्यंत आदर होता. कृष्णा आणि राजा हाथीसिंग हे रसिक, काव्यप्रेमी जोडपे. या आत्मचरित्रात प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभी काव्यवचने उद्धृत केली आहेत. गुरुजींनी त्यांचा अनुवाद तन्मयतेने केला आहे. एकूणच ते ग्रंथरंगी रंगलेले आहेत. पुस्तकाला पुरस्कार सरोजिनी नायडू यांनी लिहिला आहे. तो काव्यमय प्रेमळ शैलीत आहे. अमिया चक्रवतींनी आपल्या प्रस्तावनेत असे विचार व्यक्त केले आहेत. 'वर्ण्य विषयाशी एकरूप होणे, त्याविषयी आपलेपणा वाटणे, नव्या वस्तूचे सम्यक ज्ञान असणे याहून अधिक काय पाहिजे?
'All, all are gone, the old familiar faces,' या चार्ल्स लॅबच्या ओळी मात्र अनुवादात आपली नादमयता हरवून बसतात. बाकीची मूळ अवतरणे सुंदर आहेत, अनुवादात मात्र त्यांचे सौंदर्य टिकले आहे असे वाटत नाही. ‘बाहेरच्या जगाला प्रेम नि सौंदर्य यांची मेजवानी आहे. परंतु येथे आम्हांला फास आणि शृंखला फक्त आहेत.’ गालीब. - येथे ‘फक्त’ हा शब्द चुकीच्या ठिकाणी पडला आहे. ‘तेथे तुला मी प्रथम पाहिले आणि तेव्हाच तुझ्याशी लग्न करण्याचे ठरविले, असे राजा दाव्याने सांगत असतो.’ येथे ‘दाव्याने’च्याऐवजी ‘शपथेवर’ हा शब्द योग्य. ‘याच मुशाफिरीत खरा जवाहर मी पाहिला,’ येथे ‘मुशाफिरीत’ ऐवजी ‘प्रवासात’ हा शब्द अधिक बरा. ‘पडलेल्या बर्फावरून घरंगळत जाण्याचा मोह’ येथे ‘घसरत' अधिक योग्य. अशा बारीक जागा शोधता आल्या आणि त्या सापडल्या तरी एकूण अनुवाद यथार्थ आणि सुखद झाला आहे असेच म्हणता येते.
गुरुजींनी अनुवादासाठी त्यांच्या ध्येयाला आणि प्रेमाला पोषक अशा पुस्तकांची निवड केली. ज्या संस्कारावर आणि मनावर त्यांची श्रद्धा होती, त्याला अनुरूप अशी शैली त्यांनी अंगीकारली, शब्दश: भाषांतर करण्याचा अट्टाहास दाखविला नाही. उलट हवे तेवढे स्वातंत्र्य घेतले; पण मूळ ग्रंथाचा प्राण दुखावणार नाही अशी दक्षता घेतली, भाषांतर स्वैर होऊ दिले नाही, नवनिर्मितीचे रूप त्याला दिले व भाषांतराचा एक अनोखा नमुना निर्माण केला. महाराष्ट्र टाइम्सच्या 22 डिसेंबरच्या अंकात भाषांतरे व भाषांतरकार यांच्यासंबंधी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. ट्रान्सलेटर्स असोसिएशनचे गॉर्डन फिल्डेन म्हणतात, ‘‘भाषांतर म्हणजे इकडच्या शब्दाला तिकडे प्रतिशब्द देणं नसतं. किंबहुना भाषांतरकार दोन्ही भाषांचं वजन आणि लय तोलत, जणू एक नवी कलाकृतीच घडवीत असतो. जितक्या वेळा एखाद्या पुस्तकाचं भाषांतर होतं, त्या वेळी प्रत्येक भाषेत ते जणू नव्यानं जन्म घेत असतं."
फ्रेंचमधले प्रसिद्ध भाषांतरकार कळकळून म्हणतात की भाषांतराकडे जरा नव्या दृष्टिकोनातून पाहा. भाषांतरकार मूळ पुस्तकाला स्वतःच्या अन्वयातून जे परिमाण देतो ते पाहा. एका प्रसिद्ध लेखकाला एकदा कोणीतरी म्हणाले की अलीकडे तुम्ही तुमची शैली बदलती आहे काय? त्यावर तो म्हणाला, ‘‘नाही. मी माझा भाषांतरकार बदलला आहे.’’ साने गुरुजींच्या भाषांतरांना यांपैकी कितीतरी विधाने लागू पडतात. त्यांच्या भाषांतरांचे ऋण मोठे आहे.
Tags: इंग्रजी व प्रादेशिक भाषा ‘कुरल’ आणि इतर ‘गोड गोष्टी’ ‘मानवजातीची कथा’ ‘कला म्हणजे काय?’ अर्थपूर्ण भाषांतरे साने गुरुजी english & regional languages भाषांतरित साहित्य 'kural' & many more gode goshti' 'manavjatichi katha' 'kala mhanaje kay?' meaningfull sane guruji translated literature weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या