डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

दशरथतात्या... समाजवादी लढवय्या !

हे सारे तात्यांचे गाठोडे दीर्घ काळाच्या कार्याची कमाई आणि तीच आमच्या वाटाड्यांच्या वाट्यास आली, हे आमचे किती मोठे भाग्य! तात्यांचा धुळे शहरातला- नव्हे, तर खानदेशातला प्रेमपसारा हळूहळू आमच्यासमोर फुलत गेला. धुळे-खानदेश हे त्यांचे कार्यक्षेत्र होतेच, पण त्यापलीकडेही ते राष्ट्र सेवादलाचे पूर्णकालीन कार्यकर्ते म्हणून पुणे जिल्ह्यापासून महाराष्ट्राच्या पातळीवरही त्यांचे कार्यसंबंध होतेच. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे यांसारख्यांच्या तालमीत घडलेला दशरथ हा विशीतच सेवादलाचा नाममात्र मानधनी आणि पूर्णकालीन कार्यकर्ता झाला. 20 वर्षे टिकून राहिला. सेवादलाच्या शाखा, शिबिरे यांच्या माध्यमातून तरुणांची फळी उभी करण्याबरोबरच कला पथकात, शेतकरी नृत्यातही तात्या रममाण होत राहिले.

 

नर्मदाकाठी मणिबेलीतील सत्याग्रह चालूच होता आणि दुसरीकडे धरणात पाणी भरायची तयारी- तीही मुंबईतील 18 दिवसांच्या उपोषणानंतर दिलेले ‘सरदार सरोवर प्रकल्पाच्या पुनर्विचाराचे’ आश्वासन मोडीत काढून. आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. डूब सुरू होणार म्हणून आम्ही ‘जलसमाधी’ जाहीर केली व भूमिगत झालो. पावसाळा सुरू झाल्याने पोलिसांचा फौजफाटा शोध घेऊ लागला. ते मणिबेलीत पोहोचून उभ्या पिकात आम्हाला हुडकत नासाडीही करू लागले. संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. तेव्हा धुळ्याहून डॉ रा. भ. चौधरींना त्यांच्याच गाडीतून घेऊन तात्यांची स्वारी नर्मदेकाठी पोहोचली. त्यांचा हट्टाग्रह होता की, ‘मी राहणार जलसमाधीच्याच पथकात’. आमच्या गुप्त संदेशवाहकाने हे मला कळवले, तेव्हा मी हादरलेच. महत्प्रयासाने ‘पुढच्या पथकात बघू.....’ वगैरे सांगून (खोटेच!) त्यांचा हट्ट मोडून कसा काढला ते आम्हालाच माहीत!

तात्यांचा असा आग्रही स्वभाव आणि सत्याग्रही वृत्ती ही अनेक वर्षे (1886-2001) आम्ही ठायी ठायी पाहत आलो आहोत. धुळे शासनाच्या आदेशाने झालेल्या गोळीबारात रेहमल वसादे नर्मदाकाठी शहीद झाला. त्यानंतरच्या मोर्चावर रवी देवांग. शेतकरी नेत्यासह दोनशे जणांना जखमी करणाऱ्या लाठी चार्जच्या प्रसंगीही तात्या खमकेपणाने आमच्या पाठीशी-खरे तर शेवटचा श्वास घेईपर्यंत-उभे होते. तेही एकट-दुकटे नव्हते धुळ्यातील सर्व पुरोगाम्यांची सामुहिक साथ उभी करत. हेच तात्यांचे वैशिष्ट््य होते आणि त्यांच्या कार्ये इतिहासातून कमावलेले धारिष्ट्यही!

दशरथतात्यांच्या घरात मी पहिल्यांदा पाऊल ठेवले, तेव्हा दुरून त्यांचे नाव काखेत मारून... जुने, सेवादलाचे, वडिलांना ओळखणारे म्हणून. नव्या क्षेत्रात नवा मुद्दा घेऊन विनाधार एकटीच पोहोचले होते. तेव्हा हा अंधार वाटून त्यांना गाठले आणि त्यांचे घर- कुटुंब, त्यांचे वात्सल्य व समर्थन सारेच आमच्या गाठीला बांधले गेले, ते अखेरपर्यंत! प्रत्येक मोर्चाच्या वेळची खिचडी, प्रत्येक शासनाची भेट, प्रत्येक वर्गणी जमावणीत पुढाकार, प्रत्येक निर्णयप्रक्रियेत सहभाग, आंदोलनाची चिंता, कार्यकर्त्यांसाठी खुले घरदार. त्यांचा वैचारिक पाठिंबा कणखर, तर कृती कार्यक्रमातला संघर्षशील सहभागही बाणेदार... हे सारे तात्यांचे गाठोडे दीर्घ काळाच्या कार्याची कमाई आणि तीच आमच्या वाटाड्यांच्या वाट्यास आली, हे आमचे किती मोठे भाग्य!

तात्यांचा धुळे शहरातला- नव्हे, तर खानदेशातला प्रेमपसारा हळूहळू आमच्यासमोर फुलत गेला. धुळे-खानदेश हे त्यांचे कार्यक्षेत्र होतेच, पण त्यापलीकडेही ते राष्ट्र सेवादलाचे पूर्णकालीन कार्यकर्ते म्हणून पुणे जिल्ह्यापासून महाराष्ट्राच्या पातळीवरही त्यांचे कार्यसंबंध होतेच. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे यांसारख्यांच्या तालमीत घडलेला दशरथ हा विशीतच सेवादलाचा नाममात्र मानधनी आणि पूर्णकालीन कार्यकर्ता झाला. 20 वर्षे टिकून राहिला. सेवादलाच्या शाखा, शिबिरे यांच्या माध्यमातून तरुणांची फळी उभी करण्याबरोबरच कला पथकात, शेतकरी नृत्यातही तात्या रममाण होत राहिले.

या अशा कार्यकर्त्याची जडण-घडण अर्थात शेतकरी कुटुंब व परिसरातीलच! खानदेश हा साने गुरुजींपासून मधु लिमयेंपर्यंतच्या समाजवाद्यांचा बालेकिल्लाचे आाहे. याची प्रेरणा व साथसंगत तात्यांना लाभली. दशरथतात्या घडला तो असा कार्यरत राहूनच. आगाखान पॅलेसमधल्या सत्याग्रही तुकडीसह ते थेट जेलमध्ये पोचले आणि त्यानंतर आणीबाणीच्या 1976-77 च्या संघर्षात तर 19 महिन्यांची जेल भोगली. या प्रत्येक वेळी मिळालेली सक्तमजुरीची शिक्षा हा त्यांच्या संघर्षाला मिळालेला पुरस्कारच. जेलमध्ये खारट भाकर दिल्यावर ती पाण्यात भिजत घालून मीठ व खारेपणा उतरवूनच खाता यायची, याचे हसत-हसत वर्णन करणारे तात्या आजही डोळ्या समोर आहेत. त्या जेलमध्येच एका काळात त्यांनी सेवादलाची दीक्षा घेतली अन्‌ दुसऱ्या जेलभेटीत समाजवादी पक्षाची. मात्र समाजवादाची कास तात्यांनी कधीच सोडली नाही आणि त्याच्या अंगीकारण्यातून भावलेली समाजाची साथ देण्यासही ते चुकले नाहीत.

सेवादलाचा व सर्व समाजवादी मंच मोर्चाचा खास विचार म्हणजे, संघर्षाचा व रचनेच्या समन्वयाचा. गांधीजी ते साने गुरुजी या परंपरेतील ही आचारधारा तात्यांनी अवलंबली नसती, तरच नवल! त्यांनी इस्राईलला सा. रे. पाटील या कोल्हापुरातील दांडग्या सहकारी नेत्यासह जाऊन सामूहिक शेतीचे शिक्षण घेतले. अगदी तळागाळातल्या मोरोणे या धुळे शहराजवळच्या गावात आपली शेतीभाती व दुभती जनावरे या नैसर्गिक साधनसंपत्तीत सहकार व सामुदायिकता आणणे हे तात्यांनी त्यापूर्वीच व त्यानंतरही साधले. त्यांच्या त्या कार्याची खडान्‌खडा माहिती असलेले आवर्जून सांगतात की, तात्या सहकारी संघाचे अध्यक्ष असतानाही प्रस्थापित धेंड न बनता कामगार-शेतकरी सदस्यांसह भाकरीचे भोजन घेत. साधेपणातून स्वावलंबन जगणे पसंत करत. या सहकारी संघाने खासगी व्यापाऱ्यांची अरेरावी मोडून शेकडो गावांतून एक लाख लिटर रोजचे दूध गोळा करण्यापर्यंतची मजल गाठली होती म्हणे! या सहकारी संघाला खरे तर मोठी डेअरी उभी करायची इच्छा होती. पण ते स्वप्न सर्वांच्या असहयोगाने साकार होऊ दिले गेले नाही. तरी या मोराणे परिसरात तात्यांचे अस्सल सहकारीपण व शेतकरीपण हे आज शेती विकून संपत चाललेली असतानाही लोकांच्या स्मरणात आहे ते आदरभावानेच!

अशा या तात्यांची करामत ही पक्षीय राजकारणात मात्र यशस्वी ठरू शकली नाहीच. राजकारण व समाजकारणाचा मेळ घालणारे, स्वच्छ नैतिक लढत देणारे, पैसा-दारू न वाटणारे, तुरुंग-फावड्यासहच मतपेटी स्वीकारणारे लोहियावादी वा प्रजा समाजवादी दोन्ही गट हे पक्षीय राजकारणात मागे पडणे हे नवे वा अनोखे नव्हतेच. तरीही लोहियावाद्यांनी एकदा जिंकलेला फड आणि त्यानंतर धुळे जिल्ह्यात जातभार्इंचा सिन्दखेडा सारखा एखादा मतदार- संघच तेवढा शाबूत राहिलेला. हे समाजवाद्यांच्या तडजोडविहीन नैतिकतेचेच फळ. तात्याही त्यांच्यातलेच. एकदा म्हणे- त्यांच्याच कुसुंबा मतदारसंघात प्रचाराला निघाले असताना, कार्यकर्ता दारू पिऊन आल्याचे कळताच त्यांनी गाडीही सोडली आणि प्रचारही! कसेबसे माफी मागून परत आणवले गेले म्हणे! तात्यांचे हे बळ. म्हणूनच संघर्षाचे अनेक वळही ते घेत असत स्वतः च्या पाठीवर.... कच्छ बचाव ते नर्मदा बचाव अशा आंदोलनांना ते स्वातंत्र्य चळवळ म्हणायचे, अगदी ऊर भरून!

मात्र संस्थांमधील, विविध कार्य नियोजनामधील समिती सदस्य म्हणून तात्यांचा सहभागही फार पसरलेला दिसतो. ते कारागृह सुधार समितीपासून ते रोजगार हमी समिती पर्यंत अनेक समित्यांमध्ये होते. ‘जेथे राजकारण संस्था-कारणाला वेठीस धरेल, तेथे तात्या नसेल’ अशी त्यांची भूमिका. म्हणून जवाहर सूतगिरणी पासून मात्र ते चार हात दूरच राहिले. यातही त्यांचा मोठेपणाच त्यांना वाचवत राहिला आणि योग्य असा समाजवाद्यांचा किल्ला लढवण्यात ते अगदी शेवटपर्यंत आपल्यापरीने सामील होत राहिले.

तात्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर या सर्व कार्यशीलतेची छाया पडत नसली, तरच नवल! तात्यांनी कमलबार्इंना टिपले ते पुरंदरे परिवारातून. त्यांच्या साऱ्या बहिणी डॉ. वीणा सुराणा, आशा गांधी वगैरे एकेका समाजवादी कार्यकर्त्याच्या सहचारिणी झालेल्या. तात्या आणि कमलबार्इंचा विवाह म्हणजे कुटुंबवर्गातलाच प्रेमविवाह! सेवादल अशा मंगलकार्याच्या मंडपाची भूमिका बजावण्याविषयी प्रसिद्धी पावलेली संघटनाच होती की!

त्यानंतर कमलतार्इंचे नर्सचे प्रशिक्षण व कुटुंबनियोजनाचे धुळ्यातील मोठे कार्य, याबरोबरच तात्यांच्या कुटुंबातील विशेष बाब म्हणजे क्रीडाविषयक ध्यास. स्वत:बरोबरच शामच नव्हे तर सुषमालाही तात्यांनी क्रीडापटू बनवले व स्वत:प्रमाणेच समाजवादी तत्त्वेही त्यांच्यात रुजवली. म्हणूनच तर सुषमा ही अनंतराव भालेरावांची सून झाली अन्‌ आजही कार्यरत आहेच, लेकीसकट... !

तात्यांचा एस. एम.च्या साक्षीने पण साधेपणाने झालेला विवाह हा काही अद्भुत नव्हता. दोन छोट्या खोल्यांच्या संसारातच त्यांनी अनेक मान्यवरांचे स्वागत केले! सकाळचा पहिला चहा घरच्या दुधाचा बनवणाऱ्या, कधी खारी बिस्किटे, ताजी भाजी वा खास मासळीसाठी पहाटे धडपडत जाणाऱ्या तात्यांचे आतिथ्य आम्ही भोगले आहेच!

शाम हा तात्यांच्या विश्वासाचा स्तंभ. मोराण्याच्या शेतीपासून ते पाणी व ऊर्जेच्या पर्यायी तंत्रज्ञान विकासा-पर्यंतचे कार्य शामभाऊने इंजिनिअर म्हणूनच नव्हे तर तात्यांचा वारस म्हणूनही आजतागायत सुरू ठेवले आणि ठेवायलाच हवे. तात्यांचे स्वतंत्र भारतात सुजलाम्‌- सुफलाम्‌ शेती करण्याचे स्वप्न, शाहीर लीलाधर हेगडे यांनी तात्या म्हणजे स्वत:च्या मित्रावर लिहिलेल्या ‘भगीरथ’ पुस्तकात वर्णिले आहे. तात्यांची ही शेतीविषयी प्रेमभावना त्यांच्या मनातील श्रमाची प्रतिष्ठा व कष्टकऱ्यांच्या मालकीवरची अपार निष्ठा यांच्याशी जोडलेली होती. मोराण्याच्या शेतावरून आमच्या आंदोलनात थकून परतलेले तात्या शेतमजुरांबद्दल भडभडून बोलताना मला सुचवायचे... ‘यांना पेन्शन का नाही? मी माझ्या मजुरांना उर्वरित आयुष्यातही साथ देणार-द्यायलाच हवी ना? यासाठी तुम्ही लढाच!’ आज अनेक संघटनांनी  मिळून चालवलेला पेन्शन परिषदेचा लढा एकीकडे आणि 144 श्रम कायदेच संपवण्याचा मोदी सरकारचा घाट दुसरीकडे. हे पाहायला तात्या नाहीत. असते, तर स्वस्थ बसलेच नसते. ते अखेरपर्यंत फुलटाइम म्हणून आत्मविश्वासाने आंदोलनात सामील होत. स्वतंत्रता- सेनानी तात्या आज शंभरी पार करूनही एकेका लढ्यात उतरलेच असते!

Tags: मृत्युलेख दशरथ तात्या दशरथ [पाटील मेधा पाटकर mrutyulekh dashrath patil medha patkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मेधा पाटकर

आंदोलनकर्त्या- नर्मदा बचाव आंदोलन, कार्यकर्त्या- सामाजिक चळवळ 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात