डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नानासाहेबांची उणीव फार काळ भासत राहणार!

भक्तिमार्गावद्दल नानासाहेबांनी अलीकडे असे विचार व्यक्त केले होते की भागवत धर्माचा आचार करणारे संतकवी सतत सामाजिक समतेचा संदेश देत आलेले असूनही खुद्द वारकऱ्यांमध्येसुद्धा - वारीचा परिपाठ सोडला तर दैनंदिन जीवनात सामाजिक समतेचा संदेश मनोमनी रुजलेला नाही., पण म्हणून हा प्रचार निरर्थक होतो का? तसे असते तर मार्क्सपासून साऱ्या शास्त्रीय व बिगरशास्त्रीय समाजवादी मंडळींनी केलेला सामाजिक समतेचा आणि वर्ग विग्रहाचा प्रचार तरी जनतेच्या पचनी कोठे पडला आहे?

1936. मी त्यावेळच्या काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे काम करू लागल्यापासून एस.एम. आणि नानासाहेब यांच्या समवेत पक्षाचे अनेक उन्हाळे पावसाळे मी अनुभवले. मी कामाला सुरुवात केल्यानंतर थोड्याच दिवसात एम.एन्.रॉय यांनी आपल्या अनुयायांना काँग्रेस सोशलिस्ट पार्टीच्या सभासदत्वाचा राजीनामा देऊन कोठल्याही पक्षाचे लेबल नसलेला सामान्य काँग्रेस सभासद म्हणून काँग्रेस अंतर्गत काम करण्याचा आदेश दिला. पुढे त्या आदेशाचा इतका अतिरेक झाला की रॉव साहेबांच्या आदेशानुसार काँग्रेस सोशलिस्ट पक्षातून बाहेर पडलेल्यांची संख्या मोठी दिसावी म्हणून काही रॉयवादी नव्या कार्यकर्त्यांना आधी काँ.सो. पार्टी सभासद करून नंतर त्यांना पक्षाचा राजीनामा देण्यास सांगत. बॅरिस्टर वि.म.तारकुंडे आणि एस.एम.जोशी हे त्यावेळी काँग्रेस सोशलिस्ट पार्टीच्या महाराष्ट्र शाखेचे संयुक्त चिटणीस होते. पैकी बॅ.तारकुंडे यांनी रॉयसाहेबांच्या आदेशानुसार कॉ.सो.पार्टीचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी एस.एम.जोशींच्या बरोबर संयुक्त चिटणीस म्हणून माझी नियुक्ती झाली. मी राजकीय काम करू लागल्यापासून पक्षाला बसलेला हा पहिला धका!

या धक्क्यातून सावरून पक्ष संघटना उभी करण्याचे आणि नव्या कार्यकर्त्यांना पक्षाची तात्विक भूमिका पटवून देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यानंतर काही दिवस करावे लागले आणि या कामात नानासाहेब आणि एस.एम. यांचा वाटा अर्थातच फार मोठा होता.

अचूक विचारसरणी आणि चारित्र्यसंपन्न नेतृत्व असूनही काँग्रेस समाजवादी पक्ष आणि त्यानंतर रूपांतरित समाजवादी पक्षापासून तो थेट आजच्या जनता दलापर्यंतचा पक्ष हा सदैव अंतर्गत पेचप्रसंगाने सतत झपाटलेलाच राहिलेला आहे. एका अडचणीवर मात करून स्थिरस्थावर होऊन जनतेवर त्याचा प्रभाव पडू लागतो न लागतो तोच फाटाफुटीचे दुसरे संकट पुढे उभे राहावे हा क्रम आजही सुरूच आहे.

आणीबाणीनंतर जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीची स्थापना झाली. आणि केंद्रात त्या पक्षाचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले तो पक्षाचा सर्वात भरभराटीचा काळ म्हणावा लागेल. नानासाहेबांवर यावेळी इंग्लंडमधील भारतीय आयुक्तपदाची जबाबदारी सोपविली गेली आणि त्या पदाचेही त्यांनी सोने केले. अनेक जुन्या काँग्रेसी प्रथांना खो देऊन त्यांनी लोकाभिमुख अशा नव्या परंपरा निर्माण केल्या पण केंद्रातील पक्षाची ही शान फार काळ टिकली नाही. कोणी वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेने झपाटले गेल्याने तर कोणी राजकारणाची खरी दिव्यदृष्टी आपल्यालाच आहे या अहंकाराच्या आहारी गेल्याने काँग्रेसच्या मदतीने जनता पक्ष फोडण्याच्या कारवाया सुरू झाल्या. साता समुद्रापलीकडे असलेल्या नानासाहेबांनी पक्षातील फूट टाळण्याचा दोनदा कसोशीचा प्रयत्न कसा केला ते मला माहीत आहे. पण तो यशस्वी झाला नाही आणि पक्ष दुभंगून चौधरी चरणसिंगांचे औट घटकेचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले. मोरारजीभाईंच्या स्वतःबद्दलच्या फाजील अहंकारापासून तो काँग्रेसच्या कुटिल कारवायांपर्यंतच्या सर्व दुष्ट प्रवृत्ती एकवटून जनता पक्ष केंद्रात अल्पमतात गेला. जनता पक्षाचे सरकार गेल्याबरोबर आदर्श लोकशाहीवाद्याप्रमाणे लोकशाहीच्या संकेतानुसार आपल्या उच्चायुक्तपदाचा राजीनामा देऊन नानासाहेब भारतात परत आले. आणीबाणीनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत जनता पक्षाला प्रचंड विजय मिळाला होता. लोकसभेत निर्विवाद बहुमत प्रस्थापित झाले होते. जनता पक्षाध्या तिकिटावर निवडून आलेल्या सर्व खासदारांनी म. गांधींच्या समाधीसमोर पक्षाशी आणि जनतेशी एकनिष्ठ राहण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्यांनी त्याचे विस्मरण होऊ दिले नसते, आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेला आळा घातला असता, आणि आपल्या 'व्हिजन'चा उपयोग पक्षापुढे पुरोगामी क्रांतिकारी कार्यक्रम ठेवण्याकडे केला असता तर पुढील पाच वर्षे जनता पक्षाचे राज्य सुखेनैव चालू राहिले असते आणि भारतीय राजकारणावर त्याचे अतिशय दूरगामी परिणाम घडून आले असते.

त्यावेळी मोरारजीभाईव्यतिरिक्त चौधरी चरणसिंग आणि जगजीवनराम हे आणखी दोघेजण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. परंतु नवनिर्वाचित खासदारांतून त्यांपैकी एकाची विधिवत् निवडणूक करण्याऐवजी पंतप्रधानांची नेमणूक करण्याचे सर्वाधिकार जयप्रकाश व आचार्य कृपलानी यांच्या हाती सुपूर्द करण्यात आले आणि त्यांनी मोरारजीच्या शिरावर पंतप्रधानपदाचा राजमुकुट बसविला. असे न होता त्या पदासाठी रीतसर निवडणूक झाली असती तर पंतप्रधानपदाची दिवास्वप्ने पाहणाऱ्यांना पक्षातील आपल्या खऱ्या सामर्थ्याची जाणीच झाली असती आणि स्वतःच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी त्यांनी केलेल्या पक्षद्रोही कारवायांना कदाचित कायमचा आळा बसला असता.

पण एकदा झालेल्या या चुकीपासून पक्ष अद्याप कोणताही धडा शिकलेला नाही. विश्वनाथ प्रताप सिंगांची लोकसभेतील पक्षनेते पदाची नियुक्ती झाली त्यावेळी चंद्रशेखरांचे बाबतीतही याचीच पुनरावृत्ती झाली. पुढे श्री. बोम्मई यांची पक्षाध्यक्ष म्हणून एकमताने निवडणूक व्हावी म्हणून असाच आटापिटा करण्यात आला आणि अगदी अलीकडील घटना म्हणजे गेल्या कित्येक वर्षात स्थानिक पक्षशाखांच्या निवडणुका झालेल्या नसल्याने एक प्रकारे कालबाह्य ठरणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने विश्वनाथ प्रताप सिंग यांची पक्षाध्यक्ष म्हणून नियुक्ती करून श्री. हेगडे यांच्या विरोधाचे मोहोळ निष्कारणच उठवून घेतले आहे. निवडणुकीऐवजी नियुक्तीची काँग्रेसवाल्यांची ही खोड पक्षाने सोडून दिली तर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही.

इंग्लंडहून परतल्यानंतर नानासाहेब हळूहळू राजकीय प्रश्नांपेक्षा सामाजिक आणि स्त्रियांच्या प्रश्नांवरच आपले लक्ष अधिकाधिक प्रमाणात केंद्रित करू लागल्याचे दिसून येत होते. सामाजिक प्रश्नांना त्यांनी कधी गौण मानले नव्हते. त्यांनी राजकारण आणि समाजकारण यांची फारकत कधीच केली नव्हती. प्रा. मधु दंडवते म्हणतात त्याप्रमाणे ते खऱ्या अर्थाने सत्यशोधक समाजवादी होते. हे सर्व जरी खरे असले तरी गेली काही वर्षे ते सामाजिक प्रश्नांवर आणि इहबादावर अधिक भर देत होते हे नाकारता येणार नाही. ऐहिक वादाबरोबर येणाऱ्या निरीश्वरवादाचाही ते मोठ्या हिरीरीने प्रचार करू लागले होते आणि त्यात काही ठिकाणी त्यांच्याकडून अतिरेक होत होता असे मला वाटले व मी त्यांना तसे बोलूनही दाखवले. 'कारागृहांच्या भिंतीत त्यांनी एक ठिकाणी म्हटले होते की वर्षानुवर्षे अनंत अडचणी सोसून निष्ठेने पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांकडे पाहिले की उन्मत्तपणाने विठ्ठलाच्या पायावर डोके न टेकण्याचा हेका हा एक प्रकारचा अहंमन्यपणाच नाही का? नानासाहेबांची अलीकडची भूमिका त्यांच्या या भूमिकेशी मला विसंगत वाटते. भक्तिमार्गाबद्दलही त्यांनी अलीकडे असे विचार व्यक्त केले होते की भागवत धर्माचा आधार करणारे संत कवी सतत सामाजिक समतेचा संदेश देत आलेले असूनही खुद्द वारकऱ्यांतही- वारीचा परिपाठ सोडला तर दैनंदिन जीवनात- सामाजिक समतेचा संदेश मनोमनी रुजलेला नाही. पण म्हणून हा प्रचार निरर्थक समजावयाचा का? तसे असेल तर मार्क्स पासून सारे शास्त्रीय आणि बिगर शास्त्रीय समाजवादी सामाजिक समतेचा आणि वर्गविग्रहाचा प्रचार करीत आलेले आहेत. पण त्यांची विचारसरणी तरी समाजाच्या कोठे पचनी पडली आहे, अशी शंका नेहमीच माझ्या मनात पचत राही, पण दुर्दैवाने त्याबाबत नानासाहेबांशी विस्तृत चर्चा करण्याचे कायमचेच राहून गेले आहे. पण हे विषयांतर सोडले तरी सामाजिक सुधारणांचे म्हणजेच परिवर्तनाचे प्रभावी हत्यार हे जर राजकीय सत्ता आणि ती ज्याच्या हाती आहे तो राजकीय पक्ष हेच असेल तर तो त्या दृष्टीने अधिकाधिक समर्थ बनवणे हे क्रमप्राप्त ठरते. त्या दृष्टीने आजचा 'जनता दल' पक्ष तितकासा प्रभावी नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ती पालटली पाहिजे असे नानासाहेबांना तीव्रतेने वाटे. पण पक्षात उणीवा आहेत म्हणून तो मोडीत काढून पुन्हा समाजवादी पक्षाची निर्मिती करणे नानासाहेबांना अजिबात उचित वाटत नसे. त्याऐवजी मधु दंडवते, जॉर्ज फर्नाडिस, सुरेंद्र मोहन आदीनी पक्षात आपली भूमिका ठोसपणे मांडून आणि तिचा आग्रह धरून पक्षाला योग्य मार्गावर आणणे जरूर आहे असे त्यांना वाटे, आणि वारंवार ते तसे बोलूनही दाखवीत. समाजवादी पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडला त्यावेळी पक्षाने कोणती भूमिका घ्यावी : पर्यायी की दुरुस्ती असा वाद झाला होता. त्यावेळी Alternative म्हणजे पर्यायी पक्षाची भूमिका योग्य ठरली असली तरी आजच्या परिस्थितीत आपण corrective चीच भूमिका घेतली पाहिजे असे त्यांनी कितीतरी वेळा बोलून दाखवले आहे.

नानासाहेबांच्या जीवनात उक्ती आणि कृती यांचा सुरेख संगम असे. आपण समाजाची बांधिलकी मानली पाहिजे. समाजाने जे आपल्याला दिले ते आपण समाजाला अर्पण केले पाहिजे असे ते नेहमी सांगत. त्यांनीच स्थापन केलेल्या आमच्या रचना ट्रस्टच्या वार्षिक सभेत केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले होते की, 'मी समाज-ॠण मानतो आणि देहदानाच्या रूपाने माझ्या देहापासून तो पैशापर्यंत आणि माझ्या घरापर्यंत सर्वाचे मी समाजाला दान करून टाकले आहे. काही तांत्रिक कारणांमुळे नानासाहेबांच्या निधनानंतर त्यांचा देहदानाचा संकल्प सिद्धीस जाऊ शकला नाही. परंतु त्यांचे नेत्रदान झाले. त्यांनी दिलेल्या पन्नास हजार रुपयांच्या पहिल्या देणगीतूनच रचना ट्रस्टचे 'सुमतीबाई गोरे आदिवासी विद्यार्थिनी वसतिगृह' उभे राहिले आहे. त्यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांचे पैसेही त्यांनी असेच निरनिराळ्या समविचारी संस्थांना वाटून टाकले आणि त्यांचा राहता बंगला त्यांनी समाजवादी महिला सभेच्या नावे करून दिल्याचे त्यांनीच मला सांगितले होते. त्यांची मुळची शुभा हिनेही नानासाहेबांना या कामी संपूर्ण साथ दिली आहे.

नानासाहेबांच्या वा विविधांगी नेतृत्व गुणामुळे त्यांची उणीव सर्वांनाच फार काळ भासत राहणार!

Tags: मोरारजीभाई. कॉंग्रेस सोशलिस्ट पार्टी माधव लिमये Morarjibhai Congress Socialist Party #Madhav Limaye weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके