डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

ताण निर्माण करणं आणि तो सैल करणं आणि पुन्हा निर्माण करणं- असा खेळ, नट आणि प्रेक्षक दोघंही खेळत असतात. तो खेळ रंगण्यासाठी दोघांनीही खेळात मनापासून उतरलं पाहिजे. खेळ रंगविण्याची जबाबदारी दोघांची. कोणी लहान-मोठा नाही, कोणी आश्रयदाता - मायबाप नाही, कोणी आश्रित नाही. दोघेही बरोबरचे.

खरं तर कोणी तरी एक सोंग घेणारा, कोणी एक ते सोंग पाहणारा व त्या दोघांना एकत्र आणणारी एक जागा - एवढ्या तीनच गोष्टी असल्या की रंगभूमी निर्माण होते. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, रंगभूषा, वेशभूषा - हे सगळं असलं, तर उत्तमच. आपण त्याला रंगभूमीची भाषा असंच म्हटलं आहे. पण या सगळ्या गोष्टी गाळल्या समजा, तरी रंगभूमीचं अस्तित्व असणारच आहे. पण आपण नट आणि प्रेक्षक यांनाच वगळलं, तर रंगभूमी असणारच नाही. प्रयोगाच्या दरम्यान, नट आणि प्रेक्षक यांच्यामधे जे काही घडतं, ती रंगभूमीची खासियत म्हटली जाते. नाट्यप्रयोगावेळी तिसरी घंटा झाल्यापासून, नटमंडळी- किंवा नाट्यप्रयोग सादर करणारी मंडळी म्हणूया पाहिजे तर प्रेक्षकांवर ताण निर्माण करायला सुरुवात करतात. प्रेक्षागृहातले दिवे क्रमाक्रमानं विझवले जातात. समोरच्या मखमली दर्शनी पडद्यावरचा प्रकाशझोत तेवढा राहतो. आता प्रेक्षकांची नजर त्या पडद्यावर स्थिरावते. त्या पडद्याआडची दुनिया पाहायला ते कोण उत्सुक असतात! पडदा बाजूला होईल तर बरं, असं त्यांना वाटत असतं. पण नाही. आत्ता कुठे श्रेयनामावलीची घोषणा होत असते. संस्थेचं नाव, नाटकाचं शीर्षक, नाटककार कोण आहे, नट नटी कोणकोण आहेत... ती घोषणासुद्धा धीरगंभीर आवाजात करतात. प्रेक्षकांच्या अवघ्या वृत्ती आता रंगमचाकडे वळाव्या हाच हेतू त्यामागे असतो. श्रेयनामावली सांगून झाली की दर्शनी पडद्यावरचा तो प्रकाशझोतही काढून घेतला जातो. क्षणभर संपूर्ण प्रेक्षागृह काळोखात असतं. आपल्या शेजारी प्रेक्षागृहात आपली पत्नी असो, पती असो, नातेवाईक, मित्रमंडळी, कोणीही असोत- मनानं आपण आता एकटे असतो. आपण काही आपण होऊन नसतो मनानं एकटे झालेले. आपल्याला प्रयोग करणाऱ्यांनी एकटं केलेलं असतं.

- मग पडदा दुभंगतो. रंगमंचावर प्रकाश पाझरायला लागतो. एकदम लख्ख प्रकाश पडला आहे, असे सहसा होत नाही. - आपण रंगमंचावरच्या नेपथ्यावरून नजर सरकवायला लागतो. त्यावरून आणि पडणाऱ्या प्रकाशावरून, ते कोणते ठिकाण असावं, ती वेळ कोणती असावी, तिथे कोणाची ये-जा असावी, वगैरे अंदाज आपण करायला लागतो. आणि त्या रंगमंचावरच्या अवकाशात येतात नटनटी- त्यांच्या नखशिखान्त अभिनयातून, ते त्या अवकाशातलं भावविश्व आपल्याला ओळखीचं करून देतात... त्यांच्या अभिनयातून आणि नेपथ्य, प्रकाश, संगीत यांमधून एक जीवनानुभव नाटयानुभवात परिणत होत रहातो. प्रेक्षागृहातले हशे, हुंदके, टाळ्या, निःश्वास आणि कधी कधी जाणवणारी प्रगाढ शांतता- हे सगळं नाटयानुभवाचाच भाग असतं. नाट्यप्रयोग सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या मनावर बुद्धीवर निर्माण केलेल्या ताणांची प्रयोगभर एक साखळीच तयार होते. प्रेक्षकांवर असे ताण जोपर्यंत निर्माण केले जात असतात, तोपर्यंत नाट्यप्रयोग नीट त्याच्या रस्त्यानं चालला आहे, हे नटनटींना माहीत असतं.

पण रंगभूमीतले ताण असे एकतर्फी नसतात. ते दुतर्फी असतात. अगदी प्रेक्षागृहात प्रवेश केल्यापासून नटनटी व एकूणच प्रयोगकर्ते यांच्यावर प्रेक्षकही ताण निर्माण करीत असतात. रंगमंचावर अजून नेपथ्य-रचना होत असते. तिथे ठाकठोक सुरू असल्याचं ऐकू येतं; दिव्यांची उघडझाप होत राहते. नटनटी रंगभूषा - वेशभूषा आटोपण्याच्या गडबडीत असतात अशा वेळी केव्हातरी प्रेक्षकांना प्रेक्षागृहात येऊ दिल्याचं नटनटींना, त्यांच्या मदतनीसांना कळतं. कसं कळतं? प्रेक्षकांच्या पादत्राणांची खसखस ऐकू येते. प्रेक्षकांची कुजबूज कानावर पडते. खुर्च्यांचे फट्फट् आवाज येत रहातात... आणि ‘प्रेक्षक आले आहेत' या जाणिवेबरोबर छातीचे ठोके जलद होतात. रंगमंचावर तिकडे नटनटी व इतर एकमेकांना 'शुभेच्छा’ देतात; पडद्यासमोर प्रार्थना करतात; कोणी नुसतेच येरझाऱ्या घालतात; कोणी डोळे मिटून, चित्त एकाग्र करतात; कोणी हातपाय हलवून मोकळे करून घेतात; कोणी एकमेकांना शेवटच्या सूचना देतात - ‘ते आले ना', या तीन शब्दांनी बालगंधर्वांच्या प्रेक्षकांच्या चित्तवृत्ती जशा उचंबळत असतील, तसंच ‘प्रेक्षक आले ना' या शब्दांनी नटनटी व पडद्यामागचे कलाकार यांचं होतं. एक कसली तरी हुरहुर त्यांना लागते. कोणता तरी ताण त्यांना थोडा तरी अस्वस्थ करतो - प्रत्यक्ष प्रयोग सुरू झाल्यानंतर देखील प्रेक्षक काय नटनटींना सोडतात की काय ?

नटनटी बोलतात, हालचाली करतात, त्या त्या प्रत्येक क्षणाला त्यांना जाणवत असतं की एकेका प्रेक्षकाचे दोन-दोन डोळे असे दीडदोन हजार डोळे त्यांच्यावर स्थिरावले आहेत! बाप रे! अशा वेळी काही गफलत झाली, विस्मरण झालं, जिभेनं दगा दिला तर? -दिवा ऐनवेळी विझवायचाच राहून गेला तर? - प्रयोगभर प्रेक्षकही, प्रयोग करणाऱ्यांना असे ताणाखाली ठेवत असतात- प्रयोगकर्त्यांना अपेक्षित असणारा परिणाम साधल्याच्या खुणा असतात. प्रेक्षक टाळ्या देतात, हसतात, मुसमुसून रडतात, तर कधी एकदम गप्प रहातात... अशा वेळी प्रयोग करणाऱ्यांच्या मनावरचा भार हलका होतो. ताण निर्माण करणं आणि तो सैल करणं आणि पुन्हा निर्माण करणं - असा खेळ, नट आणि प्रेक्षक दोघंही खेळत असतात. तो खेळ रंगण्यासाठी दोघांनीही मनापासून उतरलं पाहिजे. खेळ रंगविण्याची जबाबदारी दोघांची. कोणी लहान-मोठा नाही, कोणी आश्रयदाता -मायबाप नाही, कोणी आश्रित नाही. दोघेही बरोबरचे. एकमेकांना सोबत करीत जाणारे. प्रेक्षक व प्रयोगकर्ते यांना सजण - सखी कोणी म्हटलं आहे. त्यांचा हा खेळ रतिक्रीडेसारखाच जबाबदारीचा असतो, असंही म्हटलं गेलं आहे. (अशा वेळी निदान झोपी न जाणं ही तर किमान अपेक्षा असावी की नसावी?)

Tags: परीक्षण समीक्षा नाटक सिनेमा drama Theatre Movie Review Movies #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव वझे
vazemadhav@hotmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके