डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कणकवली नाट्य संमेलनात राजकारणी भाऊगर्दी होणार नाही व संपूर्ण संमेलन नाटकवाल्यांचेच असेल ही काळजी सुज्ञपणाने घेतली जावी... पैशाचे सोंग आणता येत नाही, पण पैशासाठी संमेलनच विकून टाकले जाऊ नये... लालन सारंग शहाण्यासारखे वागायला शासनला सांगतील आणि शासनही शहाणे होईल अशी अपेक्षा करू या…

---

माधव वझे हे नामवंत रंगकर्मी आहेतच, शिवाय एके काळच्या राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या ‘श्यामची आई' या सिनेमातील 'श्याम' ही आहेत. 'साधना' तील सदराने हे दोन्ही ऋणानुबंध अधिक बळकट होतील…

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कणकवली येथे होणाऱ्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निर्माती अभिनेत्री लालन सारंग यांची रीतसर निवडणूक होऊन, निवड झाली ही स्वागतार्ह घटना होय. नायिकाप्रधान नाटकांसाठी मराठी रंगभूमी प्रसिद्ध असली, तरी नाट्यसंमेलनाच्या प्रदीर्घ इतिहासामध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच रंगकर्मी स्त्रियांना अध्यक्षपदाचा मान आपल्या नाट्यपरिषदेने दिला, ही पुरेशी बोलकी घटना आहे, लोकप्रतिनिधी गृहांमध्ये स्त्रियांसाठी 30% आरक्षण असावे, या प्रस्तावाचे भिजत घोंगडे झाले असताना, निदान या वर्षी तरी स्त्री रंगकर्मीला आणि तेही एका लढाऊ रंगकर्मीला, नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला, हे सुचिन्ह. स्त्री-रंगकर्मीचा संमेलनामधील सहभागही वाढून, त्या अधिकाधिक परिसंवादांमध्ये बोलतील, हे आता परिषदेने, स्थानिक संयोजकांनी व अध्यक्ष या नात्याने लालन सारंग यांनी पाहिले पाहिजे.

महसूलमंत्री नारायण राणे हे कणकवलीचे. राजकीय वैमनस्याच्या परिणामातून कणकवलीमधील त्यांचे घर जाळले गेले ही काल-परवाची गोष्ट. कोकणातल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणल्यानंतर राणे यांचे राजकीय पुनर्वसन दणक्यात साजरे झाले आहे. एकेक प्यादे पुढे पुढे सरकवीत, राणे आता प्रधान आणि राजालाही शह देण्यापर्यंत येणार, असा कयास दिसतो.. तर मग कणकवलीमध्ये संमेलनाच्या वेळी राजकीय रणधुमाळी अनुभवाला येणार नाही, अशी शंका कोणाच्या मनात आली तर ते स्वाभाविक आहे. पडद्यामागे कोणी कोणी जबाबदारी सांभाळणारे असतात, म्हणून तर नाट्यप्रयोग सुरळीत पार पडतो, हे आपण सगळेच जाणतो आणि त्यामुळे पडद्यामागील कलाकारांबद्दल आपल्या मनात कृतज्ञताच असते. राणे यांनी पडद्यामागची जबाबदारी सांभाळून, मुख्य पात्रांना पडद्यापुढची जबाबदारी पार पाडू दिली तर ते उचित होईल. पडद्यामागे तुम्ही आहात आणि अनेक प्रकारचे साहाय्य तुम्ही केल्याने नाट्यसंमेलन सुविहितपणे पार पडले, अशी नोंद या निमित्ताने झाली, तर उत्तम पायंडा पडेल. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षांनाच त्यांचे भाषण करण्यासाठी आपण वेळ ठेवला नाही, हे सुसंस्कृतपणाला साजेसे झाले काय? राणे आले तर ते एकटे येतील काय? पदभाराने भूमी नमवीत राजा जसा रंगमंचावर प्रवेश करतो आणि त्याच्या पुढे-मागे भालदार चोपदार असतात, त्याप्रमाणे राणे यांच्यासमवेत त्यांचा ताफा येणारच; आणि राणे समारंभामधून उठून चालले की ते निष्ठावंतही निघणारच, हे कोठेतरी थांबेवले पाहिजे. 'दे दान गुप्त, उपकार करी, परी न बोले।’ असे शासनाचे आणि शासनाच्या प्रतिनिधींचे वर्तन का असू नये?

कणकवली संमेलनाच्या स्थानिक संयोजकांनीही सारासार विचार करून, राजकारणी भाऊगर्दी होणार नाही, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अधल्यामधल्या राजकीय दलालांशी तशी बोलणी न करता, थेट राणे यांनाच औचित्याचा मुद्दा सांगितला, तर शक्यता आहे की राणे सुज्ञपणाने संपूर्ण संमेलन नाटकवाल्यांचेच असेल अशी काळजी घेतील. राणे यांच्याशी थेट बोलू शकण्याचा अधिकार कोणाकडे आहे आणि ती व्यक्ती पुरेशी संवेदनशील आहे किंवा नाही, हे संयोजकांनी पाहिले पाहिजे.

नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनीही नाट्यसंमेलन म्हणजे 'इव्हेंट' नाही हे लक्षात घेतले पाहिजे. पैशाचे सोंग आणता येत नाही हे सगळेच जाणतात; पण पैशासाठी संमेलनच विकून टाकायचे नसते हे तुम्ही नाही, तरी आणखी कोणीकोणी जाणतात हे माहीत असू द्या! राजकारणी लोकांचा आब राखला जाईलच; पण त्याचबरोबर संमेलनाध्यक्षांचाही आब राखला जाईल, हे आपण पाहू; असे निर्वाचित अध्यक्षा लालन सारंग यांनी पुण्यामध्ये त्यांच्या मुलाखतीवेळी जाहीरपणे म्हटले आहे. ते परिषदेने व कणकवलीच्या संयोजकांनी ध्यानात घेतले पाहिजे व लालन सारंग यांच्या भावनांचा आदर राखला पाहिजे. नागपूरला होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण साधू यांनी, साहित्य संमेलनाच्या स्वरूपाबद्दल स्वत:चे मत सांगून टाकलेच आहे. लाखो रुपयांच्या अनुदानाचा विनियोग कसा होतो व त्या अनुदानाची कोणती किंमत मोजावी लागते, याचा विचार ‘आपण’ करणार की नाही?... आणि ‘आपण' म्हणजे नाट्यपरिषद व संमेलनाचे स्थानिक संयोजक.

इतक्यातच, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या सभेचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. शंभर-सव्वाशे सभासदांपैकी फक्त 28 सभासद आणि त्यातही 'नेहमीचे यशस्वी’च जास्त उपस्थित होते. ही घटना काय सांगते? खूपसे सभासद, सभेला उपस्थित राहण्याबद्दल उदासीन आहेत. ते का म्हणून उदासीन आहेत, याचा विचार संबंधितांना करावासा वाटतो की नाही? व्यावसायिक व समांतर रंगभूमीमध्ये आज 25 ते 50 या वयोगटातील रंगकर्मी पडद्यापुढे आणि मागे मोठ्या संख्येने दिसतात. नाट्य परिषदेच्या पुणे शाखेमधील पदाधिकाऱ्यांचे सरासरी वय आज किती? युवा रंगकर्मींना वर्षभराची वर्गणी भरून नाट्य परिषदेचे सभासद व्हावेसे वाटते काय? त्यांना सभासद करून घेऊन, त्यांच्या हाती कारभाराची सूत्रे देऊन, आपण केवळ सल्लागार म्हणून काम पाहावे, असे या भीष्म-द्रोणाचार्य यांना वाटते काय? की झारीतल्या शुक्राचार्याचीच भूमिका करीत राहायचे?

लालन सारंग यांनी पुण्यामधील मुलाखतीमध्ये जे विचार व्यक्त केले, ते त्या सोदाहरण, सविस्तर आणि स्पष्टपणाने त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्येही आणतील अशी आशा करू या. आविष्कार-स्वातंत्र्याच्या मुद्याबद्दल बोलताना त्यांनी प्रेक्षकांच्या वर्तनाचा उल्लेख केला आहे. प्रेक्षकांनी काय पाहावे, ते ठरविण्याचा हक्क कोणालाही नाही; आणि असे असेल तर प्रेक्षकांनीच खाजगी सेन्सॉरशिपला जाहीरपणाने व एकत्र राहून विरोध केला पाहिजे, असे लालन सारंग यांचे अनुभवांती मत... इथे आणखी एका मुद्याचाही विचार व्हावा असे वाटते. संस्कृतिसंरक्षक म्हणायचे, पण असंस्कृतपणे वागायचे, यामुळे आपण चेष्टेचा विषय होतो, हे संस्कृती रक्षणाचे स्वत:हून कंत्राट घेतलेल्यांना कळत कसे नाही? 'मारुती आणि शँपेन' या नाटकाचे शीर्षक आता ‘माकडाच्या हाती शँपेन' असे करून, आपले हसेच झाले- इतके तरी संस्कृती रक्षकांना कळावे की नाही?

बाल रंगभूमी व समांतर रंगभूमीसाठीच खरे तर शासनाने भरघोस साहाय्य दिले पाहिजे; व्यावसायिक रंगभूमीला अजिबात अनुदान देऊ नये आणि व्यावसायिक नाट्यप्रयोगांच्या स्पर्धाही शासनाने आयोजित करू नयेत, हेही मुलाखतीमध्ये लालन सारंग यांनी ठणकावून सांगितले. राज्य नाट्यस्पर्धा आणि बालनाट्य स्पर्धा यांचा दर वर्षी रतीब घातला की आपण मोकळे, असे शासनाने ठरवूनच टाकले आहे. बालरंगभूमीमध्ये आज जे पेरले जाईल, तेच काही वर्षांनंतर उगवेल हे शासनाला कळत नाही, की तसा विचार करणे कोणत्याच अर्थाने परवडत नाही? ज्यांचा त्या क्षेत्राशी अर्थार्थी संबंध नाही, अशीच माणसे शासनाला नेमकी कशी निवडावीशी वाटतात? शिबिरे असोत, स्पर्धांचे परीक्षक असोत, अभ्यासक्रम समितीचे सभासद असोत, अनुभव नाही, त्यामुळे काही तात्त्विक विचार नाही, आणि शासकीय अधिकाऱ्यांशी मिळतेजुळते घेऊन, काम निपटायचे, असे अनेकदा घडते. प्रयोगपूर्व परिनिरीक्षण मंडळ म्हणजे सेन्सॉर बोर्ड, याचे सभासद कोणाला, कोणत्या निकषावर केले जाते असा प्रश्न माहितीच्या अधिकारानुसार विचारला, तर त्यातून पुढे येणारी माहिती उद्बोधक ठरेल. राज्य नाट्यस्पर्धांच्या परीक्षकांबद्दल स्पर्धकांना तरी काही माहिती शासनाने द्यावी की नाही?... आज समांतर रंगभूमी, अगदी पुण्या-मुंबईपुरते पाहिले तरी... पुण्याला 'सुदर्शन' रंगमंचामध्ये आणि मुंबईला माहीम येथे नगरपालिका शाळेच्या सभागृहात अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड देत नाट्यप्रयोग करीत राहिली आहे. त्या दोन्ही रंगमंचांवर गेली कित्येक वर्षे निष्ठापूर्वक समांतर रंगभूमीची चळवळ सुरू ठेवण्याचे प्रयत्न होत असताना आणि वृत्तपत्रांमध्ये त्याबद्दल वारंवार अनुकूल अभिप्राय आले असताना, शासनाच्या सांस्कृतिक विभागाला त्याची आपण होऊन दखल घ्यावी आणि सहकार्याचा हात पुढे करावा असे वाटले नाही. ज्यांना आच आहे ते रंगकर्मी कार्य करीत राहतीलच; पण व्यावसायिकांसाठी निधी उपलब्ध करणाऱ्या या प्रगत राज्याच्या शासनाकडे, बालरंगभूमी आणि समांतर रंगभूमीसाठी पैसा नाही.

लालन सारंग यांनी हे सारेच अनुभवले आहे. शहाण्यासारखे वागायला त्या शासनाला सांगतील, अशी आशा करू या आणि शासनही शहाणे होईल, अशी अपेक्षा करू या.

Tags: अपेक्षा अध्यक्ष - लालन सारंग कणकवली नाट्य संमेलन अखिल भारतीय नाट्य परिषद व्यथा नाट्यकर्मींच्या expectations President - Lalan Sarang Kankavali Natya Sammelan Akhil Bharatiya Natya Parishad problems of dramatists weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव वझे
vazemadhav@hotmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके