श्री. मधू देशपांडे हे गुरुजींचे एक अंतेवासी. 'चले जाव' चळवळीत भूमिगत असताना सुमारे सहा महिने देशपांडे साने गुरुजींबरोबर राहिले. या काळातील त्यांची काही संस्मरणे पुढे दिली आहेत.
1942 च्या भूमिगत चळवळीत कार्यकर्त्यांच्या राहण्याच्या जागेचा उल्लेख सांकेतिक भाषेमध्ये केला जात असे. ती नावे सर्वजण जाणत के असत. आज 'मूषक महाला’ त तर उद्या ‘राजगडा’ वर तर परवा ‘संतवाडी' आणि तेरवा 'प्रतापगड’ ही भेटीची आणि निवासाची ठिकाणे होती. या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांना साने गुरुजींकडून आईची माया मिळाली आणि वडिलांचे मार्गदर्शनहीं! 'राजगडा’ वर एकदा सर्व मंडळी जमली होती. वेळ दुपारची होती. सर्वजण गप्पा मारत बसले होते. दुपारची जेवणे झालेली होती. पान खाण्याची हुक्की एकदोघांना आली. चार मजले उतरून कोणी जायचे असे चालले होते. सर्वजण एकमेकांवर ढकलत होते. असे चालू असता गुरुजी हळूच खाली गेले - पानपट्टीच्या ठिकाणी पाने घेऊ लागले - पानपट्टीवाला विचारत होता : सुका कात बारीक सुपारी, ओला कात, खांड सुपारी, गुलकंद.. वगैरे वगैरे.
गुरुजींना काहीच कळेना, कारण कधी त्यांनी पान वगैरे खाल्लेच नव्हते! शेवटी, मसाला पान दे, म्हणून 7-8 पानपट्टया करून त्यांनी वर आणल्या आणि सर्वांच्या पुढे पाने ठेवली. सर्वजण आश्चर्यचकित झाले व वरमलेही कारण शेवटी गुरुजींनी पाने आणली. त्या वेळी गुरुजींनी पानपट्टीवाल्याकडे कशी फजिती झाली ते सांगितले. भूमिगत असताना 'संतवाडी’ मध्ये एकदा अच्युतराव पटवर्धन साने गुरुजींना भेटावयास आले होते. चळवळीबाबत बराच वेळ चर्चा चालू होती. येताना ते एकाच्या मोटारीमधून आले होते. तेव्हा चर्चा संपल्यावर त्या मोटारीने जावयास निघाले. परंतु मोटार सुरू होईना म्हणून परत वर आले व त्यांनी मला गाडी ढकलण्यास बोलावले. माझ्याबरोबर गुरुजी पण नको नको. म्हणत असता आले आणि खुद्द अच्युतराव, मी व गुरुजी गाडी ढकलू लागलो. मोठ्या रस्त्यावर मोटार आली तरी चालू होईना. लोकांची गर्दी झाली.
एक-दोन पोलिसही आले, पण शेवटी परत मोटार ढकलल्यावर सुरू झाली. अच्युतराव बसले आणि गेले. कोण हे पारशी गृहस्थ म्हणून लोक चौकशी करू लागले. आम्ही दोघे मुकाट्याने परत ‘संतवाडी' त आलो.'संतवाडी 'त छोटासा संसारच मांडला गेला होता.' एक तवा परात, स्टोव्ह, दोन पातेली, लाटणे, 2-4 वाट्या आणि स्वयंपाकाचे निरनिराळे सामान - कणीक, डाळ, तांदूळ, मीठ, मिरची, मसाला... सर्व कागदाच्या पुडयांमधून ठेवलेले. गुरुजी जवळ जवळ 8-10 माणसांचा स्वयंपाक करीत. भात. पोळ्या व एखादी डाळभाजी असा मेनू असायचा. परंतु सर्व स्वयंपाक चविष्ट व रुचकर असावयाचा. तेथे अनेक वेळा वसंत बापट, राजा सरंजामे (बाळ अभ्यंकर), नलू बापट, रामदास फेणे, निळू लिमये, मधू लिमये, शिरुभाऊ, एस.एम., विठू पटवर्धन व मी अशी माणसे आळीपाळीने जेवावयास असावयाची.
जेवणास पत्रावळी असत, म्हणजे ताटे घासण्याचा प्रसंग नसायचा. गुरुजी स्वयंपाकास कोणाला हात लावू देत नसत, जी थोडी भांडी असत, ती तेच घाशीत असत. क्वचित प्रसंगी मला घासण्याचा चान्स मिळावयाचा एकदा रात्री गप्पागोष्टीत भांडी घासण्याची सर्वांमध्ये पैज लागली. उद्या जो कोणी सकाळी उठून आधी भांडी घासेल त्याने सर्व स्वयंपाक करावयाचा, सर्व घर झाडावयाचे अशी ही विचित्र पैज होती. मला पहाटे 3 वाजता जाग आली. इकडे तिकडे पाहिले तर सर्वजण गाढ झोपलेले होते. गुरुजींच्या ठिकाणी ते पण झोपलेले दिसले. मी हळूच उठून खोलीचे दार उघडून स्वयंपाकघराचे दार उघडून आत गेलो. पाहतो तर गुरुजी मोरीमध्ये भांडी विसळत होते! घासून झाली होती.
मला पाहताच एकदम म्हणाले, मी पैज जिंकली! मी पैज जिंकली! त्यांच्या जागेवर दोन उशा ठेवून त्यांनी त्यावर चादर टाकली होती व झोपल्याचा भास निर्माण केला होता. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी इतर कोणास कसलेच काम करू दिले नाही. ते म्हणत, अरे, तुम्ही बाहेरची कामे करून दमता - मी तर घरीच असतो - तेव्हा मी ही कामे केली तर काय बिघडले? गुरुजी असे प्रेमळ व सर्वाना लळा लावणारे होते. संतवाडी मध्ये मी मधू देशपांडे, विठू पटवर्धन, राजा सरंजामे, रामदास फेणे व निळू लिमये नेहमीच वस्तीवर असू. तेव्हा गुरुजींनी 'धूठूजासळू' असे सांकेतिक नाव ठेवले व त्या एकाक्षरी नावाने हाका मारीत. 'ठू' केव्हा येणार, 'जा' आज आला नाही, 'स' त्याच्या घरी गेला असेल, असे संबोधीत असत. अनेक प्रकारे आमच्या सर्वांचे मनोरंजन ते करीत असत.
त्यांचा बराचसा वेळ काम करण्यात जायचा आणि मोकळा वेळ असला की तो बुलेटीन लिहून देण्यात जात असे. मोठी मंडळी जरी आली तरी ते दुसऱ्याच खोलीत चिंताग्रस्त स्थितीत बसायचे. ते अत्यंत लाजाळू होते व तितकेच प्रेमळ होते. त्यांना कधी रागावताना मी पाहिले नाही. पण व्याख्यान देताना जोराजोरात त्वेषाने संतापत भाषण करीत आणि हृदयाचा ठाव घेणारे बोलत असत. असेच एकदा 'कू' (निळू लिमये) घाईघाईने रात्रीच्या वेळी ‘संतवाडी' वर आले आणि पाहतो तर काय निळूभाऊंचे तोंड विद्रूप झाले होते. चेहऱ्यावर भाजल्याच्या खुणा दिसत होत्या काय झाले ते कळलेच नाही. गुरुजींनी विचारपूस केली तेव्हा कळले, एके ठिकाणी बॉम्ब बनविण्याचा प्रयोग चालू असताना स्फोट झाला व अॅसिड वगैरे निळूभाऊंच्या अंगावर सांडले. कपड़े पण थोडे जळाले.
निळूभाऊ मग ‘संतवाडी’ त 10-12 दिवस राहिले गुरुजींनी त्यांची सेवा केली आणि मग तोंडावरील डाग कमी झाल्यावर परत ते काम करू लागले ‘प्रतापगड’ ची जागा मुद्दाम भाड्याने घेतलेली होती. ती जागा लॅमिग्टन रोड पोलीस स्टेशनच्या समोर होती. मला व गुरुजींना तेथे जाऊन 4 दिवस राहावे लागणार होते. तेथे 2 सतरंज्या, 2 गाद्या, चादरी व 3 चटया होत्या व इतर सामानही होते. आम्ही रात्री 8-8 ॥ वाजता पोहोचलो- बाहेर जेवून आलो व अंथरूण टाकून झोपलो. जयप्रकाशजी दुसऱ्या दिवशी राहावयास येणार होते. रात्री 11-11॥ वाजता दारावर टकटक झाले. आम्ही जागे झालो व वाटले आता पोलिसांनी आम्हांस पाहिले. आता पकडले जाणार म्हणून आपसांत बोलत होतो. परत टक टक वाजले. शेवटी दार उघडले.
तर दोन माणसे झटकन आत आली, त्यातील एकाने म्हटले. अरे मधू, दार लवकर का उघडत नाही? केवढी जबाबदारी घेतली! तुला माहिती आहे का, हे कोण आहेत ते? मग आमच्या डोक्यात उजेड पडला. ते जयप्रकाशजी व त्यांचे चिटणीस प्रताप शहा होते. शहा नंतर लगेच निघून गेले जयप्रकाशजी एका गादीवर बसले. समोर आम्ही दोघे बसलो. इकडची माहिती गुरुजींनी कथन केली. नंतर आम्ही त्यांची गादी व्यवस्थित टाकली. दुसरी गादी तेथेच जवळ टाकली. तेथे गुरुजींना झोपाव्यास मी सांगितले. परंतु गुरुजी आत दुसऱ्या खोलीत निघून गेले तेथे एक चटई आंधरून एक धोतर त्यावर टाकून गुरुजी झोपून गेले. मला.. म्हणाले. तू जयप्रकाशजींच्या पलीकडच्या गादीवर जाऊन झोप. गुरुजींना विनंती करूनही ते उठले नाहीत.
मला मग दुसऱ्या गादीवर जाऊन झोपावे लागले. एक तर संकोची स्वभाव व दुसरे म्हणजे गादी फक्त एकच शिल्लक. ती मला देऊन गुरुजी फक्त चटईवर झोपले! दुसऱ्या दिवशी सकाळीच गुरुजींनी हॉटेलमधून कॉफी ब्रेड-लोणी आणवून घेतले व जयप्रकाशजींना दिले आणि असाच क्रम तेथे चार दिवस चालला. तेथेच गुरुजींनी सहा कोऱ्या वह्या विकत आणून घेतल्या, शाई-पेन वगैरे साहित्य आणवून घेतले आणि चार दिवस लिखाण चालू केले. झोप न घेता रात्रभर व दिवसभर लिखाण चालू होते आणि एकेक वही पूर्ण होत होती. दररोज प्रताप शहा येऊन जयप्रकाशजींना घेऊन जात असत. चार दिवसांनी गुरुजीनी मला बोलावून घेतले आणि मला सांगितले की, मधू, या 'गोड गोष्टी चे 5 भाग केशव भिकाजी ढवळे यांना नेऊन दे आणि ते देतील ते पैसे पेऊन ये. त्याप्रमाणे मी 5 वह्या घेऊन केशव भिकाजी ढवळे यांच्या गिरगावातील घरी गेलो व साने गुरुजींकडून आल्याचे त्यांना सांगितले तेव्हा ते प्रथम जरा घाबरलेच.
कारण गुरुजी भूमिगत असल्याचे त्यांना माहीत होते. त्यांनी गुरुजींची चिट्ठी व 'गोड गोष्टी’ च्या पाच वह्या पाहिल्यावर मग मला बसण्यास सांगितले. त्या वह्या चाळल्या आणि गुरुजीचे हस्ताक्षर पाहून मग ते आत गेले व जरा वेळाने बाहेर आले आणि माझ्याजवळ त्यांनी पाचशे रुपये दिले. गोड गोष्टींच्या पाच भागांचे फक्त पाचशेच रुपये दिले व कायमचे अधिकार मिळवले. गुरुजींना चक्क लुबाडलेच म्हणता येईल त्याच पुस्तकांवर ढवळे यांनी लाखो रुपये कमावले आहेत. मी ते पाचशे रुपये घेऊन गुरुजींना दिले. त्यांनी ते ठेवून घेतले पण काहीच बोलले नाहीत सर्व गोष्टी एक टाकी, कसलीही खाडाखोड नाही आणि चार दिवस मान-पाठ एक करून लिहिल्या होत्या; पण त्याची कदर ढवळे यांना नव्हती.
दुसऱ्या दिवशी रामभाऊ भोगे अमळनेरहून आले. ते भेटावयास आले होते आणि अमळनेरच्या कार्यकर्त्यांची अडचण पाहून त्यातील एकही रुपया न ठेवता सर्व पैसे गुरुजींनी चळवळीसाठी देऊन टाकले. केवढा स्वार्थत्याग केवढा देशाभिमान! मोठ्या माणसांनी मोठया देणग्या दिल्या की त्याचे कौतुक जास्त होते. परंतु एका सामान्य माणसाने सर्वस्व दिले तरी त्याचे कौतुक क्वचितच केले जाते. अशा रीतीने जवळजवळ 6- 6॥ महिने आम्ही मूमिगत अवस्थेत एकत्रित काढले आणि निरनिराळ्या प्रसंगांना तोंडही दिले.
Tags: केशव भिकाजी ढवळे निळू लिमये रामदास फेणे राजा सरंजामे विठू पटवर्धन साने गुरुजी मधु देशपांडे Keshav Bhikaji Dhawale Nilu Limaye Raja Saranjame Vithu Patawardhan Sane Guruji Madhu Deshapande weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या