डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वठलेल्या झाडाखाली नव्या पालवीचा शोध घ्यायचा नसतो तर त्याला मानवी रंग द्यायचा असतो. आजूबाजूच्या  पाला-पाचोळ्यात तक्रार न करता तडजोड साधायची असते. ‘सुख-दु:खे समे कृत्वा’ हे अंगात मुरवायचे असते. आपल्या स्वातंत्र्याला क्षितिजसमांतर पाहायचे असते. जगाचे चक्र सतत फिरते असते. कुणालाच ते रोखता येत नाही, तसेच कुठे व किती फिरते ते सांगता येत नाही. त्यामुळे कुठे केव्हा थांबते, हे कोडे अजूनही सुटले नाही. अति पिकले म्हणजे फळ नासून जाते, त्याचे अध:पतन केव्हा होईल हे ध्यानी-मनी नसते. निसर्गातला अनुक्रम पाहता येतो, मोजता येतो; मात्र स्वत:चे वातचक्र अजमावता येत नाही. आशा-निराशेच्या खेळात कुठे लपायचे, कुठे सापडायचे याचे अज्ञान कुरवाळीत रहायचे. हाव सुटत नाही, घाव सोसत नाही आणि धाव मिटत नाही- हीच शिल्लक सांभाळायची असते.

वैद्यनाथाची परळी ही माझ्या अध्यापनाची कर्मभूमी. या नगरीतच माझ्या पंच्याहत्तरीनिमित्त माझ्या विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी मोठा कार्यक्रम घडवून माझा सत्कार केला. यात अनेक ठिकाणांहून माझे कौतुक व शुभेच्छा दर्शन घडले. मी निवृत्त झाल्यानंतरही याच गावी जवळपास पंधराहून अधिक वर्षे म.सा.प. शाखेच्या वतीने व इतर संस्थांच्या सहकार्याने अनेक वाङ्‌मयीन व सांस्कृतिक कार्यक्रमांत हातभार लावला. इथेच धावपळीत माझे पिकलेले म्हातारपण नवनवे रंग दाखवू लागले. पालवीने मोहारलेल्या वृक्षाकडून वठलेल्या झाडाखाली सावली घेत जगत राहिलो. पुढे या वठलेल्या झाडाच्या मुळ्या कुरवाळीत माझे पुढचे जगणे उजळू लागले. म्हातारपण हे कोरांटीचे खुरटे झाड आहे. कविवर्य तांबे यांनी याच झाडाच्या आठवणीत या झाडापासून गळणारा मध रसिकांना प्रत्यही दिला. पुढे त्यांनी त्यातून पुन्हा 40-45 भरलेले ‘मधुघट’ रसिकांना बहाल केले. इथेच आसक्ती व अनासक्तीचा रंगलेला नाटकी खेळ पुन:पुन्हा आठवत नोंदवत मी जगत आहे. खऱ्या हाडाच्या अध्यापकाची निवृत्ती ही क्षणभराची असते. याचे कारण अध्यापन ही वृत्तीच असल्याने ती सावलीसारखी त्याला जपते. अशा वेळी या निवृत्तीला नव्या नाटकाचे रंग अंगावर चढवायचे असतात. त्यातूनच जुने-नवे भोग भोगायचे असतात, तर आपले केलेले कर्म मागे वळून पुढे गिरवायचे असते. या म्हातारपणी आपल्या जगण्याचा खरा धागा  ‘सुटे वाद संवाद तो हितकारी’ असा हमरीतुमरीवर दाखवायचा असतो. इथे नाती जुळतात, पुन्हा तुटतात. म्हातारपण मात्र या नात्यांना जुळविताना आपली त्रेधा उडवून जाते.

म्हातारपण ‘अंतरंगी नाना कळा’ उजळून देते. समर्थ रामदासांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास ‘मृत्तिका खाणोनि घर केले। ते माझे ऐसे दृढ कल्पिले। परि ते बहुतांचे हे कळले। नाही तयासि।’ आणि दुसरे ‘पूर्वी देव नाही पूजिला। वैभव देखोनी भुलला। सुखी प्राणी पस्तावला। वृद्धपणी।’ (दासबोध, समास 3) तरीसुद्धा आटापिटा करण्यात आपण कुठेही कमी पडत नाही. म्हातारपण हे अनेक कडव्यांनी बांधलेल्या ‘जरा मरण व्याधीं’च्या एका गाण्याची मध्यवर्ती कल्पना असते. त्याला आपल्या परी गाण्याची सम गाठायची असते, तसेच यातील कडव्याशी आपले नाते सांधायचे असते. टप्प्याटप्प्याच्या वाटचालीत मृत्यूच्या पावलाची वाट पाहायची असते. त्याची चाहूल लागताच मानवी जगतातील सर्व लागेबांधे मोठ्या धीराने तोडून, माया-ममतेचा त्याग करून, ममत्वशून्य नि:संगपणे व समाधानाने जगाचा निरोप घ्यायचा असतो. हा तारेवरच्या कसरतीचा खेळ आहे. तो प्रत्येकाच्या वाट्याला येणारा असला तरी तो काळजीपूर्वक खेळायचा असतो. त्यातले सामान्य-असामान्य रूप सांभाळायचे असते. आपण फक्त एक लक्षात ठेवायचे- या सर्व परिस्थितीचे स्वागत करण्यास सज्ज राहण्याची वृत्ती म्हणजे म्हातारपण होय. त्यात मानवी जीवनाचा अंत, आत्यंतिक वियोग, सौंदर्य व वैभवाची क्षणभंगुरता लक्षात ठेवून मनात पिंजत ठेवायची असते. यात आपल्या उरलेल्या रागाची शून्यता नसून ती एक पूर्णता व सद्‌गती आहे. तो आपल्याकडे धावून आलेला आनंदाचा क्षण आहे. त्यात भाग्यविलास असून दुर्दैवविलास नाही.

आपले हे अंतर्मुखी दर्शन अनावर उत्कंठा वारंवार वाढवणारे आहे. इथे तुम्ही बहिर्मुखतेच्या हावरेपणातून बाहेर येत एकटेच उरलेले असता. हेच एके काळी अनुभवलेले प्रणयासक्तीचे व भावुकतेने सर्वत्र झिडकारलेले पुन:प्रत्ययाचे जगणे राहते. तसेच ते म्हातारपणीच्या गीताचे  शेवटच्या कडव्यातील आत्मानुभूतीचे गायिलेले गीत असते. डोळ्यांनी जी चित्रे-विचित्रे दिसतात, त्यात प्रणयासक्तीने धुंद झालेल्या लावण्यवतीच्या कळा आकर्षण निर्माण करतात. यात माझे पूर्ण जीवन आणि सहजीवन एकरूप झालेले असते. एरवी माझ्यापासून इष्ट, मित्र, आप्त हे सारे पांगलेले असतात. माझे एकटेपणदेखील एकाकीपणात अंतर्मुख झालेले असते. माझ्या एका हातात कृतज्ञता व दुसऱ्या हातात अंतर्मुखता अद्वैताच्या ओंजळीत ओसंडून वाहते, तितकीच ती पुन्हा रिकामीही होते. मला वाटते, ऐहिक पातळीवरचे सारे संघर्ष कणाकणाने, क्षणाक्षणाने मिटून जातायत.

म्हातारपण म्हणजे केवळ तोल सांभाळणे, तसेच ते एका संवेदनाक्षम ताटस्थ्याला पूर्णविराम नसते. ती एका उणावल्या गर्दीची आणि गुणावलेल्या एकाकीपणाची गाठ असते. म्हातारपणी आपण वठलेल्या झाडाखाली ‘विसरले’ आणि ‘आठवले’ या दोन गाठीने आपल्या दैवाचे गाठोडे बांधीत असतो. याच वयात सकाळची वाढीव उन्हे खात दुपारच्या अजीर्ण न होण्याकडे येणे-जाणे करायचे असते. अंगावरच्या सुरकुत्या मोजत बसायचे असते. थंडीमुळे वाढलेला गारवा सतत अंगाला झोंबणार नाही याची काळजी घ्यायची असते. ढगाळ वातावरणात भैरवी आळवीत मी-तूपणाची बोळवण करायची असते. जन्मभर कपड्याची ठिगळे लावीत केलेली पासोडी उबदार झाली का, याचे उत्तर शोधायचे असते. आपले जगणे ‘मातीवर एक थर नवा अंतीची’ किमया साधणे आहे. वातावरणात उल्हास नसल्याने आपल्या चैतन्याची ती दाणादाण उडवून देते. म्हातारपण हे भूतकाळातले परतून आलेल्या निष्पापाला बोलावलेले बालपण असते. त्याला निरागसतेच्या अंगाने, वाहत्या झऱ्याप्रमाणे वर्तमान जगायचा असतो आणि भविष्याच्या वाटेवर आयुष्य खेळकर वृत्तीने रमवायचे असते. इथेच मैत्र जपताना जीव घेणारे व जीव देणारे कोण, हे समजून घ्यायचे असते. त्यांना वाट गवसणे, वाट पाहणे व वाट लागणे यांचे गणित समजून घ्यायचे असते.

ना.सी.फडके यांनी विस्मरणाचे फायदे वर्णन करताना विद्यार्थ्यांना परीक्षेत नव्या खुणा करून दिल्या आहेत. म्हातारपणीचे विस्मरण ‘प्रतिभा साधना’ची नव्याने वाट पाहात, जगण्याचा उलटा-सुलटा पाढा वाचीत आपली रोजची सायंकाळ उजळीत आहे. तोच कित्ता प्रसिद्ध लघुनिबंधकार अनंत काणेकरांनी गिरवला आणि म्हातारपणाला विस्मरणाचा केंद्रबिंदू मानून जणू काही आपल्या जगण्याचे स्तोत्र गायिले. इथे ग्रंथसंग्रह गवसणे हा एक सुखद अनुभव, तसेच तो वाचण्याच्या आवर्तनात सापडणे हा रोजचा कार्यक्रम असतो. आपले वर्तमान काळातले आणि भूतकाळातले तसेच भविष्यकाळातले म्हातारपण परस्पर एकमेकांच्या कोसो मैल धावणारे असून ते आपल्या संगमाला विसरत जाणारे झाले आहे. दुर्गाबाई भागवतांना आपले म्हातारपण हे लीन पण सायंसाज चढवलेले दिसते. तो मरणाला बोलावणारा आणि थोपणारा नवा साज वाटतो. या वयात लेखणीला वळणदार वळणावर आणायचे असते. आपल्या लेखणीला मंद ज्योतीमधून जळत ठेवायचे असते, तसेच भडका उडणार नाही ना याची दक्षताही घ्यायची असते. संत तुकारामाला पडलेले ‘सोयरे धायरे दिल्या घेतल्याचे’ याचे कोडे म्हातारपणी अजूनही उलगडत नाही. अभ्यासात आपण काय विसरलो आणि कुठे घसरलो, हे समजत नसल्याने लहान मुलांचा नवा अभ्यास घेण्यातली आपली तारांबळ पाहावत नाही. ज्या घरात आपण लहानाचे मोठे झालो, त्या नव्या घरात जाताना वाल्मीकीऋषीचा आश्रम सुना-सुना कसा झाला असेल याचा ध्यास घेत असतो. हा एका डोळ्यातून पाणावलेल्या नजरेचा उत्सव असतो. इथेच कोरडेपणाच्या सांत्वनाला वाव नाही. म्हातारपण हे कुठेही ‘रिझर्व्ह’ असून बिनतक्रारीचे राहते. आपल्या घरात ‘असून अडचण नसून खोळंबा’ याचा पुन:प्रत्यय आल्याने म्हातारपण हे वेळीच शहाणपण घेत आपल्या अंतरंगांच्या सोईच्या कळा दाखवू पाहते.

वठलेल्या झाडाखाली नव्या पालवीचा शोध घ्यायचा नसतो तर त्याला मानवी रंग द्यायचा असतो. आजूबाजूच्या  पाला-पाचोळ्यात तक्रार न करता तडजोड साधायची असते. ‘सुख-दु:खे समे कृत्वा’ हे अंगात मुरवायचे असते. आपल्या स्वातंत्र्याला क्षितिजसमांतर पाहायचे असते. जगाचे चक्र सतत फिरते असते. कुणालाच ते रोखता येत नाही, तसेच कुठे व किती फिरते ते सांगता येत नाही. त्यामुळे कुठे केव्हा थांबते, हे कोडे अजूनही सुटले नाही. अति पिकले म्हणजे फळ नासून जाते, त्याचे अध:पतन केव्हा होईल हे ध्यानी-मनी नसते. निसर्गातला अनुक्रम पाहता येतो, मोजता येतो; मात्र स्वत:चे वातचक्र अजमावता येत नाही. आशा-निराशेच्या खेळात कुठे लपायचे, कुठे सापडायचे याचे अज्ञान कुरवाळीत रहायचे. हाव सुटत नाही, घाव सोसत नाही आणि धाव मिटत नाही- हीच शिल्लक सांभाळायची असते. लांब पल्ल्याच्या गाडीत बसल्यानंतर आपले स्टेशन कोणते? तिथे उतरताना पुढचे स्टेशन आठवून चालायचे. एवढेच. चालत्या गाडीत प्रश्न पडतो- आपण इथपर्यंत तरी सुरळीत आलो का? एरवी धावणे, दमून थांबणे, धाप बाजूला सारून श्वास घेणे... म्हातारपणाला हा क्रम सोसत नाही. फक्त बुरखा पांघरायचा असतो. उसणे अवसान परवडत नाही, थकल्याचे सोंग करता येत नाही.

मानवी शरीर रज, तम, सत्त्व गुणांनी जखडलेले असते. त्यातच विचार-विकार आणि आकार यांना त्यांनी ग्रासलेले असते. आपल्या सोईनुसार आपल्या अंगच्या त्रिगुणांची विभागणी करता येत नाही. जर केली तर सत्त्व गुणाचे अपरिहार्य ठिकाण म्हातारपण आहे. आपण अशा परिस्थितीत जगण्याचे व्रत घेतो आणि मरणाकडे पाठ फिरवितो. या लपंडावात आपली दमछाक होते. त्यातील वृत्ती आणि निवृत्ती यांचा खेळ आपण कधी जिंकतो व कधी हरतो याचा ठिकाणा लागत नाही. म्हातारपण हे राजकारणी पुरुष असते. जेवढे रंग शोभून दिसत नव्हते, ते आता उजळले जातात. राजकारणी आपल्या अनुभवसिद्ध परिपक्वतेची सीमारेषा ओलांडताच बाहेर फेकले जातात. इथे म्हातारपण अजिंक्य असल्याचा काही उपयोग नसतो. आपली चिंतनमग्नता आणि चिंता व मग्नता हे प्रमुख पैलू म्हातारपणाचे नवनवे उन्मेष असतात. ते पाहताना नव्या वठलेल्या झाडावर पाखरे येत नसतात याची ओळख, सतत टोचत असते. अशा वेळी दुरून डोंगर साजरे होताना पाहात पुन्हा पुन्हा हरतो.

म्हातारपण हे केवळ सत्त्वशील न होता, त्यात रजोतम गुणांची आपल्या नकळत सरमिसळ होऊन त्यातली नेमकी सत्त्वशीलता बाजूला पडते. याबाबत सर्व संत धीर देतात, आधार देतात. संत रामदासांनी जगण्याची जीवनशैली अचूक पद्धतीने सांगितली आहे. या शैलीचा आलेख टिपताना कुठेही आपला तोल जाऊ दिला नाही. शिवाय आजचे कठोर वास्तव आणि आपली होत असलेली दैनंदिन तडफड या संताला मागे करते. रामदासांनी ज्या काळात हा आदर्श समाजापुढे व्यक्त केला, तो आजही- किंबहुना त्याहून जास्त समाजसन्मुख आहे. तो श्लोक असा...

            ‘उपासनेला दृढ चालवावे

            भूदेव संताशी सदा लवावे

            सत्कर्म योगी वय घालवावे

            सर्वामुखी मंगल बोलवावे’

रामदासांच्या या श्लोकात त्यांनी जी जगण्याची जीवनशैली दाखविली आहे, त्यातील शेवटची क्रियापदे द्वंद्वशील आहेत. रामदास स्वत:बरोबर इतरांनाही आपलेसे करतात. चालवावे, घालवावे, बोलवावे आणि लवावे ही क्रियापदे बहुअर्थी, बहुगुणी आहेत. यात समग्र मानवजातीला ठासून दिलेला आदर्श आहे. मानवाला नुसता विचार करायचा नाही, तर त्याला आचारापासून तोडायचे नाही. ही सारी जीवनशैली सत्कर्मात डुबली पाहिजे, ही खरी गोम आहे. समग्र श्लोकाची शैली अथपासून इतिपर्यंत पल्लेदार झाली आहे. अखिल मानवता केवळ शब्दांत न अडकता आचरणबद्ध झाली पाहिजे. संत हे केवळ टाळकुटे नव्हते, तर ते तुमचे-आमचे मार्गस्थ दीपस्तंभ होते. म्हातारपणाला नवा उजाळा देणारा हा सुखी जगण्याचा एक मंत्र आहे.

Tags: मराठी साहित्य ना सी फडके रामदास लघुनिबंध ललित मधु जामकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Arun Bhalerao- 30 Aug 2021

    अप्रतीम विचार. कुठे लपायचे व कुठे सापडायचे हा खेळ मला खूप आवडला. तू माझा वर्गमित्र आहेस ह्याचा अभिमान आहे. असो.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके