डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मार्मिकतेचे मनोज्ञ दर्शन- पारख

नानासाहेबांच्या सर्वच प्रस्तावनांत व पुस्तक परीक्षणात त्यांनी दुर्मिळ असा समतोल साचलेला आढळतो. या सर्व प्रस्तावनांचे एक वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे नानासाहेबांच्या लेखणीचा प्रतिभाविलास हे होय.
 

मला कोणी आपल्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली, किंवा पुस्तक परीक्षण करण्याचा आग्रह धरला की मला संकटात सापडल्यासारखे वाटते. पुस्तक चांगले असेल तर त्याच्यासाठी प्रस्तावना लिहिणे अवघड वाटत नाही पण पुस्तक आवडले नाही किंवा त्यातले मुख्य विचारसूत्र मनाला पटले नाही तर परखडपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त करायला मन कचरते. लेखक दुखावेल अशी भीती वाटते. म्हणून प्रस्तावना लेखन व पुस्तक परीक्षण मी नेहमी टाळतो. पण नानासाहेबांच्या प्रस्तावना वाचल्यानंतर मला ग्रस्त करणाऱ्या संकटाने नानासाहेबांना भेडसावले असेल असे वाटत नाही. नानासाहेबांच्या ठायी रसग्रहणशक्ती, नीरक्षीर विवेक, डौलदार व अर्थवाही भाषाशैली आणि आवश्यक तो परखडपणा यांचा समुचित मिलाफ झाला असल्यामुळे त्यांच्या प्रस्तावना वाचनीय झाल्या आहेत. एकूण सर्वच प्रस्तावनांत व पुस्तक परीक्षणात त्यांनी दुर्मिळ असा समतोल साधलेला आढळतो.

या सर्व प्रस्तावनांचे एक वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे नानासाहेबांच्या लेखणीचा प्रतिभाविलास हे होय, आपल्या प्रस्तावनांत ते ग्रंथातील मुख्य विषयाचा सांगोपांग ऊहापोह करून आपले मत स्पष्टपणे व्यक्त करतात. ग्रंथकर्त्यांचा दोष दाखवायचा झालाच तर हे अप्रिय काम ते अत्यंत मृदू शब्दांत करतात. आश्चर्य हे की त्यांची बोचरी विश्लेषण शैली या प्रस्तावनांतून डोकावत नाही. नानासाहेबांच्या रसिकतेने वाचक मोहून गेल्याशिवाय राहत नाही. निरनिराळ्या प्रस्तावनांतील विवेचन डोळ्यांखालून घातले की त्यांची बुद्धी साहित्य, संगीत, इतिहास, राजकारण, व्यक्तिदर्शन इत्यादी अनेक क्षेत्रांत लीलया भ्रमण करते हे सहज लक्षात येते.

त्यांच्या या संग्रहातील सर्वात पहिली प्रस्तावना साने गुरुजीच्या सुंदर पत्रांसाठी लिहिलेली आहे. ही पत्रे गुरुजींनी आपली पुतणी सुधा हिला लिहिली होती. गुरुजींच्या निधनाची दुःखद बातमी बडोद्याला असताना नानासाहेबांनी ऐकली : त्यानंतर त्यांनी सुधाला जे पत्र लिहिले तेच प्रस्तावना म्हणून १९५० मध्ये छापण्यात आले होते. या आपल्या पत्राच्या प्रस्तावनेत गुरुजींच्या काही वैशिष्ट्यांचे नानासाहेबांनी सुंदर वर्णन केले आहे. वानगीदाखल एक दोन उदाहरणे देतो. नानासाहेब लिहितात 'सुधा, तुला अण्णांनी लिहिली तशी पत्रे मराठीत पूर्वी कोणी लिहिली नव्हती, आणि पुढेही कोणी लिहील असे वाटत नाही. काचेच्या पात्रात ठेवलेल्या सोनेरी माशांची प्रत्येक हालचाल ज्याप्रमाणे बाहेरून दिसते त्याप्रमाणे तुला लिहिलेल्या प्रत्येक पत्रातून गुरुजींचे, तुझ्या अण्णांचे मन स्पष्ट दिसून येत असे. त्यांच्या मनाचे सारे भाव पत्रांतून उमटलेले आहेत. त्यांचे आभाळाएवढे विशाल मन, शिरीषासारखे कोमल मन, धरित्रीसारखे उदार मन, द्राक्षासारखे रसाळ मन, विजेसारखे सचेत मन, गंगेसारखे पावन मन या पत्रांतून व्यक्त झालेले आहे.'

एका बैठकीत सबंध वही भरून काढणे गुरुजींना अवघड नव्हते. नानासाहेब म्हणतात त्याप्रमाणे त्यांना 'कोठे अडणे' माहीत नव्हते. 'कोठे खाडाखोड सापडायची नाही. मशिनीची जशी टीप पडत जाते तसे त्यांच्या लेखणीतून टपटप शब्द पडत जात. अक्षर बारीक अन् स्वच्छ, जिरग्याच्या तांदुळासारखे.'

गुरुजींचे वाचन अफाट होते. इतकेच नव्हे तर त्याला अद्भुत स्मरणशक्तीची जोड मिळाली होती. सुधाला लिहिलेली बेचाळीस पत्रे 'स्मृतिरत्नांनी भरलेले बेचाळीस रांजण आहेत' हे नानासाहेबांचे म्हणणे अगदी सार्थ आहे गुरुजी बोलू लागले की त्यांच्या वाणीचा अखंड ओघ जे सुरू होई. 'जशा श्रावणातल्या सरीच. इमर्सनच्या निबंधातले वाक्य, शेक्सपिअरची एखादी उक्ती, वेदातील कथा, भर्तृहरि राजाचा श्लोक, झानेश्वरांची ओवी, तुकोबारायांच्या अभंगातील चरण, टागोरांची भव्य भरारी.... काय काय त्यांना आठवे. आमची डोकी म्हणजे काळ-काम-वेगाच्या उदाहरणातले हौद. आत येणाऱ्या तोटीपेक्षा बाहेर जाणाऱ्या तोटीचे तोंड मोठे! गुरुजींचे तसे नसे.'

नानासाहेब संगीतप्रेमी होते. 1938 मध्ये त्यांचा माझा जेव्हा प्रथम परिचय झाला तेव्हाच त्याची मला जाणीव झाली होती. त्या काळात व्हायोलीन वाजवताना मी त्यांना पाहिले आहे. रामकृष्ण बाक्रे यांच्या बुजुर्ग या पुस्तकाला लिहिलेल्या छोट्या प्रस्तावनेतून हे त्यांचे संगीतप्रेम चांगलेच अभिव्यक्त होते. 'गानलुब्ध' एस. एम. यांना वाहिलेली ही श्रद्धांजली आहे. खूप परिश्रमाने हिंदुस्थानी संगीताचे हे 'स्निग्धच्छय वृक्ष' लेखकाने उभे केले आहेत, असे नानासाहेबांनी लिहिले आहे. ते युक्तच आहे. 'अल्लादियाखाँ, भुर्जीखाँ' अशा बुजुर्गांबद्दल लिहिताना आपल्या सहजप्राप्त गाण्याने भल्याभल्यांना विस्मित करणाऱ्या तानीबाईसारखीचा उल्लेख बाक्रे टाळीत नाहीत... खाँसाहेब अल्लादियाखाँ, भुर्जीखाँ यांच्याप्रमाणेच अंजनीबाई मालपेकर आणि जगन्नाथबुवा यांच्या संगीत क्षेत्रातील अमोल कामगिरीबद्दलही ते सारख्याच रसिकतेने लिहितात.

या संग्रहातील दोन प्रस्तावनांचा संबंध सामाजिक न्याय व समतेसारख्या ज्वलंत प्रश्नांशी आहे. प्रा. श्रीपाल सबनीस यांनी उगवतीचा क्रांतिसूर्य या आपल्या ग्रंथामध्ये डॉ. आंबेडकरांच्या सर्व उपलब्ध साहित्याचा व त्यांच्या कार्याचा परामर्श घेतल्याचे नानासाहेब सांगतात. त्यांच्या साक्षेपी दृष्टीची आपल्या प्रस्तावनेत नानासाहेबांनी मुक्त कंठाने तारीफ केली आहे. जाताजाता नानासाहेब स्वातंत्र्य चळवळीबाबतच्या डॉ.आंबेडकरांच्या भूमिकेचा उल्लेख करतात. 'स्वातंत्र्यसंग्रामापासून आपली पथके दूर ठेवण्यात कम्युनिस्टांच्याकडून जशी चूक झाली, तशीच ती डॉ. आंबेडकरांकडूनही झाली असे म्हणणे वावगे ठरू नये' हे आपले मतही ते स्पष्टपणे व्यक्त करतात. डॉ.आंबेडकरांच्याबद्दल स्वातंत्र्यपूर्व कालखंडात लोकांचे बरेच पूर्वग्रह होते. त्यांच्यावर विषारी टीकाही केली जात असे. आता जमाना बदलला आहे. प्रौढ मतदान पद्धतीमुळे निवडणूक राजकारणात दलितांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मतांच्या राजकारणाला सर्वस्व मानणारे काही लोक दुसऱ्या टोकाला जाऊन डॉ. आंबेडकरांना देव बनवत असून महात्मा गांधींच्याविरुद्ध खोटा प्रचार करीत आहेत. नानासाहेबांचे मूल्यमापन मध्यममार्गी आहे. जातीसंस्थेसंबंधींची डॉ.आंबेडकरांची मते त्यांना पूर्णपणे पटत. पण धर्मासंबंधीच्या डॉ.आंबेडकरांच्या दृष्टिकोनाशी त्यांचा मतभेद होता. महात्मा गांधींच्याप्रमाणे डॉ. आंबेडकरही समाज धारणेसाठी धर्म आवश्यक आहे, असे म्हणत. फक्त हा धर्म मानवामानवांत जन्माच्या आधारे भेदभाव करणारा नसावा असा त्यांचा आग्रह होता. पण नानासाहेबांना धर्माबाबतचे त्यांचे हे मत ग्राह्य वाटत नव्हते. आपली प्रतिक्रिया त्यांनी आडपडदा न ठेवता पुढील शब्दांत व्यक्त केली आहे. "माझ्या अल्पमती- प्रमाणे कोणताही धर्म जरी घेतला तरी त्याला संस्थात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याबरोबर त्यात पुरोहितवर्ग, दैवते आणि उपदैवते, शब्दप्रामाण्य ही किल्मिषे येतातच. बुद्ध धम्म जेथे जेथे फैलावला-मग तो ब्रह्मदेश असो, चीन-जपान किंवा नेपाळ असो- तेथे तेथे युद्धमंदिरे, युद्धाच्या मूर्ती आणि पीतांबरधारी भिख्खू हे आहे, असे आपण पाहतो. बौद्ध मताचा संस्थापक शाक्यमुनी हा एकच प्रेषित असा निघाला की ज्याने 'मी सांगतो तू मान' असे न म्हणता स्वतःच्या बुद्धीचा कौल मान, असे सांगितले. जैन धर्माची अवस्थाही वेगळी नाही. पण त्यांची ही परमोदात्त आणि परमोदार अशी शिकवण पुतळे आणि मंदिरे, पूजा आणि अर्चा, अशा कर्मकांडातच डांबली गेलेली दिसत नाही काय?"

सामाजिक समतेवरील दुसरे पुस्तक म्हणजे. डॉ. बाबा आढाव यांचे, 'सत्यशोधनाची वाटचाल' हे होय. या प्रदीर्घ प्रस्तावनेत नानासाहेबांनी बाबांच्या कार्याचा व त्यामागील विचारसरणीचा उत्कृष्ट आढावा घेतला आहे. 'डॉ. बाबा आढावांना हे कार्य अंगावर घेताना आपण हे एक बिकट काम स्वीकारीत आहोत, त्यातून ना धनलाभ, ना कीर्तिलाभ, हे पूर्णपणे लक्षात आलेले होते. यशाचे व कीर्तीचे वेगळे मार्ग त्यांना सहज उपलब्ध होते परंतु म.फुल्यांनी ज्याप्रमाणे तरुण वयातच समाजक्रांतीचा अत्यंत बिकट मार्ग स्वीकारला, त्याचप्रमाणे डॉ. बाबा आढावांनीही हा जोखमीचा रस्ता पकडला.' बाबांच्या तीन तपे चाललेल्या निरलस कार्याची दखल ज्याप्रमाणे नानासाहेबांनी घेतली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या आकर्षक भाषाशैलीची तारीफही त्यांनी केली आहे. नानासाहेब म्हणतात, 'अनुभवसिद्ध जीवना समर्थपणे व्यक्त करील अशी भाषासंपत्ती बाबांनी कमावली आहे. त्यांचे शब्द साधे असतात. वाक्यरचना सरळ व सोपी असते. परंतु अर्थभाराने ती जणू वाकलेली असते.' बाबांनी तळमळीला ज्ञानाचा भक्कम आधार दिल्याने त्यांचे लेखन मर्मग्राही तसेच तर्कशुद्ध बनलेले आहे. त्यात विद्वानांनाही त्रुटी दाखवणे सोपे जाणार नाही, असे त्यांनी जे म्हटले आहे, ते अगदी योग्य आहे.

जातीच्या कुंपणामुळे भारतामध्ये कोणीही गुणवंत- विशेषतः मागासलेल्या व दलित वर्गातले- सर्वांचे पुढारी बनूच शकत नाहीत याबद्दल नानासाहेबांनी खंत व्यक्त केली आहे. 'डॉ. बाबा आढावांचे हे पुस्तक वाचल्यावर मनाला उद्विग्नता येते व मन अंतर्मुख होते. भारतीय समाजाची म्हणा की मराठी समाजाची म्हणा, केवढी शक्ती या जातिकलहांपायी वाया गेलेली आहे आणि आजही जात आहे!' नानासाहेबांची प्रस्तावना वाचणारा वाचक बाबांचे मूळ पुस्तक वाचायला निश्चितपणे उद्युक्त होईल असे मला वाटते.

'लोकशाहीची आराधना' हा नाथ पै यांच्या भाषणांचा संग्रह आहे. वक्ता म्हणून नाथ पैंचा नानासाहेबांनी केलेला गौरव आपल्या समाजवादी साथीची भलामण करण्याचा प्रकार आहे अशी त्यांची भाषणे न ऐकलेल्या नव्या पिढीला कदाचित वाटेल. पण तसे नाही. नाथ पैंच्या वक्तृत्वशैलीचे नानासाहेबांनी केलेले चित्रण शंभर टक्के खरे आहे, याची ग्याही मी स्वतःच्या अनुभवाच्या आधारे देऊ शकतो.

नाथ पैंच्या आवाजात कमालीचा मोहकपणा होता.एकदा लोकसभेत संरक्षणाखात्याच्या मागणीवर ते बोलत होते. त्यांनी आपल्या वाणीतील मार्दवाने व आर्जवाने सभागृहाला व अध्यक्षांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकले होते, या प्रसंगाचा मी साक्षी आहे. तेव्हा भाषणांची वेळ पक्षाच्या संख्येनुसार नियमित होत असे. पण नाथ पैंच्या वक्तृत्वाच्या ओघात अध्यक्ष सरदार हुकुमसिंग इतके वाहून गेले की घंटा वाजवण्याचे भान त्यांना राहिले नाही. नानासाहेब म्हणतात त्याप्रमाणे 'नाथ पैंच्या भाषणात आरोह अवरोह असत. विश्रब्धालापासारखे कुजबुजणे असे, लाडिक आर्जवे असत, कठोर तराटण्या असत, प्रासानुप्रास असत, निव्वळ शब्दांची आरास व खेळ असे, कल्पनांची भरारी असे. एखाद्या कसलेल्या नटाने फेकावे तसे ते शब्द फेकीत.' नाथ पैंच्या वक्तृत्वकलेचा एक दोष नानासाहेबांनी दाखविला आहे. स्वतःचे भाषण ऐकता ऐकता ते तीन होऊन वेळेच भान विसरत. तसेच 'स्वतःपासच्या शब्दसंपत्तीची एवढी आढ्यता त्यांनी की त्याच अर्थाचे शब्दावर शब्द नाथ पै फेकीत राहत. मग त्यामुळे अर्थ पुढे सरकतो की नाही याची पर्वा ते करीत नसत.' कालमर्यादिमुळे लोकसभेतील नाथ पैंच्या भाषणात हा दोष नसे असे माझे मत आहे. अर्थात वक्तृत्व कला व लेखनकला या अगदी निराळ्या गोष्टी आहेत. उत्कृष्ट वक्ता उत्कृष्ट लेखक असेलच असे नाही. काही मसुदा वगैरे तयार करायची वेळ आली की नाथ मला म्हणत असे की 'मी बोलू शकतो, लिहीत नाही.' नाथला आपल्या गुणांची व कौशल्याची वास्तविक जाणीव होती. त्याने स्वतःसाठी काही मर्यादा घालून घेतल्या होत्या. स्वतः आखलेल्या या चौकटीतील त्याची भाषणे ही एक मेजवानी वाटे. आमच्या काळात लोकसभेतील इंग्रजी भाषेतील तो सर्वात प्रभावशाली वक्ता होता, असे मी म्हणूनच म्हणत असे. 

नानासाहेबांची रसिक वृत्ती सर्वात अधिक जर कुठच्या ग्रंथात रमली असेल तर ती वसंत बापटांच्या 'जिंकुनि मरणाला' या पुस्तकात, असे म्हटले तर ते चूक ठरणार नाही. वसंत बापटांचे वारा 'चरित निबंध' त्यानी अगदी सावकाश घुटके घेत घेत वाचले असे ते स्वतःच म्हणतात. त्याला त्यांनी दिलेली उपमा फार मार्मिक आहे.... दार्जिलिंगच्या लोपचू पत्तीचा चहा घ्यावा तसे. त्यातून मिळणारा स्वाद जिभेवर रेंगाळू देण्यात आणि त्यातून निघणाऱ्या वाफांची झिरझिरीत वलये अवकाशात विरत जाताना पाहत बसण्यात तर दार्जिलिंग चहाचे रहस्य आहे. तसला चहा ढोसायचा नसतो. प्यायचा सुद्धा नसतो, तो चाखायचा असतो. जिभेने, नाकाने, आणि कुरवाळायचा असतो डोळ्यांनी. मी वसंतरावांचे सगळे निबंध असे चाखले, हुंगले आणि कुरवाळले.

वसंत बापट यांचे सगळे निबंध नानासाहेबांना 'कसलेल्या नर्तकीच्या पदन्यासांप्रमाणे रूमझुमणारे' वाटतात. हवा तो भाव क्षणांत साकार करण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे हे नानासाहेबांना प्रकर्षाने जाणवले व यात आश्चर्य काही नाही. नूमविचे नाना नारळकर व मराठीत शैलीदार लेखन करणारे बापूसाहेब माटे यांची व्यक्तिचित्रे नानासाहेबांना आवडली हेही साहजिकच आहे. पण त्यांच्या दृष्टीने रावसाहेब पटवर्चन, नाथ पै व आवावेन देशपांडे यांच्यावरील निबंध हे- 'कमालीचे हृदयस्पर्शी आहेत.' रावसाहेबांवरील वसंताचा निबंध मी पूर्वी वाचला होता व त्यामुळे नानासाहेबांच्या उपरोक्त मताशी मी सहमत आहे.

वसंत बापटांच्या 'तेजसी' नावाच्या कविता संग्रहालाही त्यांनी छान प्रस्तावना लिहिली आहे. त्यांच्या काव्यविलासाची झलक नानासाहेबांनी काही काव्यपंक्ती उद्धृत करून दाखविली आहे. अनेक राजकारणी पुरुषांवरील रचलेल्या कविता या संग्रहात आहेत. जयप्रकाशजींवरील कवितेचा विशेष उल्लेख करण्याचा मोह मी टाळू शकत नाही.

अनिल अवचट यांच्या 'माणसं' या पुस्तकासाठी नानासाहेबांनी पत्ररुपाने प्रस्तावना लिहिली आहे. 'दि फोर्थ वर्ल्ड : हिक्टिम्स ऑफ ग्रुप ऑपरेशन' या ग्रंथाचा उल्लेख करून नानासाहेब म्हणतात की प्रत्येक देश कोणत्या तरी एका विभागाच्या माथी समाजातील सर्व दोष व घाण लादतो, त्याला सतत राबवून घेतो, त्याची हेटाळणी व क्रूर चेष्टा करतो. असे असले तरी आपल्याकडील दलित जमातीच्या शोषणाचे व उपेक्षेचे स्वरूप इतर देशांपेक्षा अगदी वेगळे आहे हे नानासाहेबांनी चांगल्या रीतीने दाखवून दिले आहे. 'जात व विटाळ' या दोन निबंधांनी येथील दलितांना जखडून टाकले आहे. ते म्हणतात, 'हे दोनपेडी दावे ज्या माणसाच्या गळ्यात एकदा अडकेल त्याची स्थिती ढोरहून, डुकराहून, कुत्र्याहून दयनीय समजावी. कारण ही कोणाला काढता येणार नाहीत की तोडता येणार नाहीत.' अनिलच्या पुस्तकाचा गौरव करताना नानासाहेब म्हणतात, 'तुमच्या भाषेत मनाला चटका बसेल अशी धग आहे. वाचकाला बरोबर ओढून नेईल असा तिचा ओघ आहे. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तिच्यापाशी परदुःख पाहून गहिवरणारे मन आहे.'

'आणीबाणीतील पत्रे' या अरुण लिमये व सुचित्रा भुरे यांनी संपादित केलेल्या ग्रंथाची समीक्षा करताना नानासाहेबांना समाजवादी व गांधीवादी कार्यकर्त्यांच्या पत्रांतून व्यक्त होणारा कणखरपणा सहज जाणवला, उलट बरेच संघीय कार्यकर्ते माफीखोर म्हणून बदनाम झाले होते. त्याचे मूळ संघनेत्यांच्या दुटप्पीपणात होते. संघाच्या अध्वर्यूनी इंदिराजींशी सख्य साधू पाहणारी जी गुप्त पत्रे लिहिली होती ती या संग्रहात घालायला हवी होती असे त्यांना वाटते. बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधी यांना लिहिलेली पत्रे येथे नानासाहेबांना अभिप्रेत असावीत.

प्रमिला संघवी, लीला पटेल, लीछा अल्वारीस या तीन महिलांच्या पुस्तकांसाठीही नानासाहेबांनी प्रास्ताविके लिहिली आहेत. प्रमिला संधींच्या पुस्तकाच्या प्रसंगाने 'मराठी भाषा स्त्रिया जशी अकृत्रिम पद्धतीने लिहितात तशी पुरुष लिहू शकत नाही.' असे विधान नानासाहेबांनी केले आहे. वाचल्यावर माझ्या मनातून लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतींचा चित्रपट अभावितपणे झरकन सरकला. 'पिताश्री एस. एम. यांच्यावरच्या निरतिशय प्रेमाला शब्दबद्ध करताना प्रमिलाताईंची लेखणी वाचकाला शांतरसाच्या दुनियेत घेऊन जाते' असे नानासाहेबांनी म्हटले आहे. एस.एम. च्या व्यक्तिमत्त्वाच्या कित्येक नव्या पैलूंचे दर्शन प्रमिला संघवींनी घडवले आहे. वस्तुतः एस. एम. नानासाहेबांचे बालमित्र. पण त्यांनाही त्यांतील काही पैलू माहीत नव्हते. ते आश्चर्याने लिहितात की अण्णांना परफ्यूम लावायची हौस होती आणि गब्बरसिंगाच्या 'अरी ओ सांबा' ची नक्कल करण्याची सवय होती हे त्यांना प्रथम प्रमिलाताईचे पुस्तक वाचून समजले. फादर प्रॉक्ट यांचे समर्थ शब्दचित्र 'एक कलंदर माणूस' या लेखातून प्रमिला संघवीनी उभे केल्याचे ते कौतुकाने सांगतात.

कमलाबेन पटेल यांच्या मूळ गुजरातीतील पुस्तकाचा विषय स्वातंत्र्याच्या सुप्रभाती पश्चिमोत्तर भारतात व पूर्व सीमेवर झालेला अमानुष मानवी संहार, जाळपोळ, लुटालूट, अपहरण, अपहृत स्त्रियांचा शोध आणि त्यांचे पुनर्वसन हा आहे. यासंबंधीच्या सत्य घटनांचे कमलाबेन यांनी सह्रदयतेने वर्णन केले आहे, अशी ग्वाही नानासाहेब देतात.कमलाबेन यांची तळमळीने लिहिलेली कथा गुजरातीतून तितक्याच तळमळीने लीला पटेल यांनी मराठीत अनुवादित केल्याबद्दल नानासाहेबांनी त्यांना धन्यवाद द्यावेत, हे योग्यच आहे.

तिसरे पुस्तक श्रीमती लीला अल्वारीस यांचे 'मुले व गुन्हेगारी' हे आहे. 'उनाड मुलांचा मी अभ्यासही केलेला नाही व अशा मुलांचा मला अनुभव नाही, आमच्या कुटुंबात कमी मुलांची परंपरा होती',असे थोडे गंमतीने नानासाहेब लिहितात. तथापि उनाड मुलांच्या या महत्त्वपूर्ण समस्येचा शास्त्रोक्त अभ्यास करून, त्यावर प्रकाशझोत टाकुन लीलाबाईनी मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली आहे, असे नानासाहेबांनी आपल्या प्रस्तावनेत नमूद केले आहे. नानासाहेबांना प्रथमपासून स्त्रीमुक्तीच्या चळवळीमध्ये रस होता. ज्या काळात विधवाविवाह विशेष प्रचलित नव्हते त्या काळात नानासाहेब एका विधवेशी - सुमतीबाईशी- विवाहबद्ध झाले होते. नरनारी समतेचे जोरदार समर्थक डॉ. लोहिया मला अनेक वेळा म्हणत की, "तुम्हारे नानासाहेब अकेले आदमी हैं जो सवेरे उठकर अपनी बीबी के लिये चाय बनाते हैं!" तेव्हा ग्रंथालीच्या अशोक जैन द्वारा संपादित उद्ध्वस्त क्षितिज या पुस्तकाचे नानासाहेबांना अप्रूप वाटावे यात काय आश्चर्य? या पुस्तकात आठ लेखकांनी स्त्रियांची रामकहाणी कथन केली आहे. निवेदकांची शैली भिन्न आहे. काही लेखात कलागुण आहेत, तर काही वृत्तपत्रीय अहवालांच्या धर्तीवर आहेत. या सर्वातून नारीह्रदयाचे नि:श्वास ऐकायला मिळतात. नारीह्रदयाची व्यथा तीव्रतेने जाणवते. नानासाहेब स्त्रियांच्या दुःस्थितीचे मूळ, प्राचीन काळापासून स्त्रियांना नावापुरते पूजनीय समजून वस्तुतः त्यांना घृणा, अवहेलना व उपहास यांचा विषय व पापाचे बीज बनविण्याच्या प्राचीन परंपरेत शोधतात. "भारतीय नारीची खरी शोकांतिका ही की मनुष्यकृत विटंबनेलाच ती विधिलिखित समजते." हे सर्व बदलण्यासाठी मानसिक व वैचारिक परिवर्तनाची सर्वांत जास्त आवश्यकता आहे असा नानासाहेबांच्या लिखाणातून निष्कर्ष निघतो व तो अमान्य होऊ नये असे मला वाटते.

'नाना (पुरोहित) एक आगळा माणूस' या प्रा. राम बिवलकरांच्या पुस्तकाचा नानासाहेबांनी थोडक्यात रसास्वाद घेतला आहे. नानांचा बेचाळीसच्या चळवळीत महत्त्वाचा वाटा होता. बेचाळीसच्या क्रांतीचे शास्त्रशुद्ध मूल्यमापन व्हायला पाहिजे असे नानासाहेबांना वाटते. माझ्या माहितीप्रमाणे अशा तर्हेने प्रयत्न फक्त दोन तीन व्यक्तींनी केलेला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने संघर्षाच्या व संक्रमणाच्या काळात प्रभावी नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती संक्रमणोत्तर काळात समाजाची सूत्रे हाती घेताना क्वचितच दिसतात, या सत्याकडे नानासाहेब वाचकांचे लक्ष वेधतात. हे असे का व्हावे, असा प्रश्न नानासाहेबांना पडतो. माझ्या मते याचे मुख्य कारण, नव्या अवस्थेत नेतृत्व करण्यासाठी लागणारे गुण निराळे असतात हेच आहे. अर्थात सर्व अवस्थांत पुढारीपण करणे जमले नाही तरी प्रत्येकाने 'माझ्या जीवनाचा सूर केव्हा ना केव्हा तरी टिपेपर्यंत चढला होता की नाही? चढला होता, बस! तर मग माझे जीवन कृतार्थ झाले, असे समाधान मानावे,' हे नानासाहेबांचे मत मला एकदम पटते. 'टिपेपर्यंत चढलेला सूर तेथेच कायम राहू शकत नाही व असा आग्रह धरणेही उचित नाही,' असे नानासाहेब सुचवितात ते अगदी बरोबर आहे. पण हे समजून समाधान मानणारे व आनंदी वृत्तीने राहणारे लोक विरळाच असतात. त्यांपैकी नाना पुरोहित आहेत.

'भ्रम आणि निरास' या नरेंद्र दाभोळकर यांच्या पुस्तकाचे विश्लेषण करताना आपल्या प्रस्तावनेत नानासाहेबांनी तरुण वयात माणसाचे मन संवेदनशील असते, त्याच्या मनाची जडणघडण होते, तेव्हा याच काळात त्याला बुद्धिप्रामाण्यवादी व अंधश्रद्धाविरोधी बनविण्याचा प्रयत्न करावयास हवा असे म्हटले आहे. हे नानासाहेबांचे म्हणणे कोणालाही पटण्यासारखे आहे. प्रगतिशील युवा चळवळीचे या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे असे मला वाटते.

ताओ ते चिंगच्या अनुवादाला लिहिलेल्या नानासाहेबांच्या स्वतःच्या प्रस्तावनेचा थोडा उल्लेख करावासा वाटतो. इस्लामचा विजय धर्मविजय नसून मुख्यत्वेकरून शस्त्रविजय होता; बळाच्या धाकाने धर्मप्रचार अथवा तत्त्वप्रचार हा प्रकार भारतीय तत्त्वचिंतनाप्रमाणे चिनी चिंतनातही दिसत नाही, असे नानासाहेबांनी लिहिले आहे. मला ही वाक्ये खटकली. इस्लाम समतावादी धर्म आहे असेही अनेक लेखक म्हणतात. मला ही सर्व विधाने निरपवाद वाटत नाहीत. भारतीय इस्लाममध्ये जातिसंस्थेचे अस्तित्व आहे हे शिरगणतीच्या जुन्या अहवालांवरून व काही मुस्लिम लेखकांच्या पुस्तकांतून दिसून येते. सर सय्यद अहमद यांना मागासलेली व्यक्ती मोठ्या अधिकार पदावर चढावी व तिने आपल्यावर सत्ता गाजवावी हे पसंत नव्हते.

श्रद्धेच्या क्षेत्रात हिंदू समाज साधारणतः सहिष्णु आहे हे विधान ढोबळमानाने खरे आहे पण पूर्णत्वाने नव्हे असे सांगावेसे वाटते. अशा सर्वच ऐकांतिक विधानांबद्दल माझ्यासारख्याला इतिहासवाचनाने साशंक केले आहे. ऐतिहासिक "अधर्मयुद्धा" बद्दलच्या माझ्या प्रबंधात याची मी सविस्तर चर्चा केली आहे. भारतीय इतिहासात जैन, बौद्ध, वैष्णव यांचा छळ केल्याची उदाहरणे सापडतात. सामाजिक संबंधांबाबत तर आपला समाज गुलाम प्रथेला मान्यता देणाऱ्या देशांपेक्षाही अनुदार होता हे सांगण्याची गरज नाही. चीनमध्येही बौद्ध धर्माच्या छळाची लाट आली होती. उलट इस्लामचा विजय केवळ शस्त्रबळाचा नव्हता. इंडोनेशियात, मलेशियात व फिलिपीन्सच्या काही भागात बळाच्या धाकाने इस्लामचा विस्तार झालेला नाही. मागासवर्गातील अनेक गट मुस्लिम झाले, हे वलयप्रयोगाचे द्योतक आहे काय? रावी नदीनंतर एकदम पूर्व बंगालमध्ये मुसलमानांची बहुसंख्या काय दर्शविते? नानासाहेबांच्या या विधानाबरोबर मर्यादित असहमती व्यक्त केल्याशिवाय मला राहवत नाही.

नानासाहेबांच्या इतरही प्रस्तावनाबद्दल बरेच काही लिहिता येईल पण विस्ताराच्या भयाने ही चर्चा आखडती घेतली पाहिजे. वा.न.राजहंस यांनी लिहिलेल्या जयप्रकाश यांच्या चरित्राच्या अनुषंगाने समाजवादी नेतृत्वाचे जे मूल्यांकन नानासाहेबांनी केले आहे ते विचारार्ह आहे. यशस्वी नेतृत्वाच्या आवश्यक गुणांची व नानासाहेबांच्या डोक्यात सतत घोळणाऱ्या राष्ट्रीयत्वाच्या विकाराच्या प्रश्नाची थोडीशी चर्चा करून मी ही प्रस्तावना संपवू इच्छितो.

"समर्थ कर्णधार" असा जयप्रकाशजींच्या नेतृत्वाचा नानासाहेब यथार्थ गौरव करतात. जेव्हा जेव्हा जयप्रकाशजींनी कटोर निश्चयाचे बळ दाखविले, तेव्हा तेव्हा त्यांच्या नेतृत्वाच्या, सामर्थ्याचा प्रत्यय देशाला आला व देशाने त्यांना दादही दिली. 1942 च्या चळवळीत, त्याचप्रमाणे विहारच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यात व आणीबाणीविरोधी संघर्षात जयप्रकाशजींनी आपल्या निर्धारशक्तीची चुणूक दाखविली. या संघर्षांत त्यांना अभूतपूर्व यशही आले. पण काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर पर्यायी पक्ष उभारण्यासाठी जी संकल्पशक्ती व चिकाटी त्यांच्याकडून अपेक्षित होती ती त्यांनी दाखविली नाही असे खेदाने म्हणावे लागते. हीच त्यांच्या नेतृत्वातील मोठी उणीव होती. त्यावर नानासाहेबांनी नेमके बोट ठेवले आहे. नानासाहेब म्हणतात, "खरे तर राजकीय पक्ष संघटित करण्याची उठाठेव राजीखुशीने व अक्कलहुशारीने करतात. त्यांना निवडणुकीतल्या काय किंवा संघर्षातल्या काय, पराजयाने खचून जाण्याची मुभाच नसते आणि रणांगण सोडून जाण्याची तर नसतेच नसते. 14 पराभव, प्रसाद, मानहानी, निष्फळ प्रयत्न यांची 'नमक-रोटी' खातखातच राजकीय नेत्यांनी व पक्षांनी आपली वाटचाल करीत राहायचे असते" वरिष्ठ समाजवादी नेत्यांमध्ये सत्तालोभाचा अंशही नव्हता, हा त्यांचा महान गुण म्हटला पाहिजे. तथापि राजशक्ती व लोकशक्ती यांच्या अन्योन्यसंबंधाबाबतचे या नेत्यांचे विश्लेषण वास्तववादापासून काहीसे दूर होते असा विचार माझ्या मनात कधी कधी येतो. ते काही असो, वज्रनिश्चय, दीर्घ योग, सातत्य, धीर व एकदिलाने काम करण्याची सवय या गुणांचा समाजवादी नेतृत्ववर्गात अभाव होता. यात काही शंका नाही. हा अभावच समाजवादी चळवळीचा अभिशाप ठरला. तथापि जयप्रकाशजींचे व्यक्तित्व अत्यंत विलोभनीय होते हे निःसंशय. त्यांच्या ठिकाणी असलेल्या ऋजुतेचा नानासाहेबांनी केलेला गौरव सर्वस्थी उचित आहे. त्यामुळेच एखाद्या चुंबकाप्रमाणे कार्यकर्ते जयप्रकाशजींच्याकडे खेचले जात. त्याविषयीचे समाजवादी कार्यकर्त्यांचे आकर्षण प्रेम कधीच आटले नाही.

'विश्रब्ध शारदेच्या' निमित्ताने लिहिलेल्या आपल्या त्रिखंडात्मक लेखात व 'गोमंतक' या सातोस्करांच्या तिसऱ्या खंडाच्या व जोगळेकर यांच्या 'युध्दशास्त्राची उपेक्षा' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत व इतरत्रही नानासाहेबांनी राष्ट्र व राष्ट्रीयत्वाच्या प्रश्नाची सम्यक् चर्चा केली आहे. पोर्तुगीजांची सत्ता 400 वर्षांपेक्षा अधिक काळ का टिकली; शिवाजी महाराज, संभाजी, बाजीराव या महाधुरंधर पराक्रमी वीरांनी पोर्तुगीज सत्तेला का उखडून टाकले नाही असे प्रश्न त्यांना पडतात. गत इतिहासाकडे भावनातीत दृष्टिकोनातून व तटस्य बुद्धीने पाहण्याची भारतीय सुशिक्षितांना सवय नाही अथवा तसे करणे त्यांना आवडत नाही या गोष्टीची त्यांना  टोचणी आहे. हे कोडे सोडवण्याचा त्यांचा सतत प्रयत्न दिसतो. सबंध भारताचे एक राष्ट्र आहे ही कल्पनाच देशी राज्यकर्त्यांच्या मनात अंकुरित झाली नव्हती असे या कोड्याचे उत्तर ते देतात. प्राचीन काळात व मध्ययुगीन भारतात सांस्कृतिक क्षेत्रात एकसारखेपणा असला तरी राजकीय ऐक्याची भावना नव्हती हे त्यांचे प्रतिपादन कोणाला अमान्य होऊ नये, भारतीय ब्रिटिशांनी आपले एकछत्री साम्राज्य प्रस्थापित केल्यानंतर भारत राष्ट्र बनू लागले असे नानासाहेबांना वाटते. पण केवळ एकछत्री प्रशासनाद्वारे एकराष्ट्रीयत्व सिद्ध होते काय? ऑस्ट्रियन साम्राज्य व विसाव्या शतकातील सोविएत, युगोस्लाव गणराज्यांत एकछत्री प्रशासन होते. पण त्यामुळे एक राष्ट्रीयत्वाची भावना या साम्राज्यांत व गणराज्यांत निर्माण होऊ शकली नाही हे निर्विवाद आहे. एकेकाळी रोमन कॅथलिक चर्चच्या वर्चस्वाखाली असलेले अथवा प्रॉटेस्टंट सुधारणा चळवळीने प्रभावित झालेले एकाच 'स्लाव' वंशाचे देशदेखील एकत्र नांदू शकले नाहीत, हा विसाव्या शतकाचा अनुभव काय दर्शवितो? स्लाव वंशीय क्रोशिया व स्लोव्हेनिया हे युगोस्लावियातून संस्कृतिभिन्नतेमुळे (हे दोन देश रोमन कॅथॉलिक व सर्विया ग्रीक ऑरथोडॉक्स आहे) फुटून बाहेर निघाले असे म्हणावे तर पाश्चिमात्य संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेले चेक व स्लोव्हाक समाज एकत्र का राहू शकले नाहीत? केवळ पंथभेदामुळे - एक प्रॉटेस्टंट व दुसरा कॅथलिक म्हणून अथवा एक बियर पिणारा व दुसरा वाईन पिणारा म्हणूनच ना?

ब्रिटिश एकछत्री सत्तेने राष्ट्रीयत्वाला खतपाणी घातले हे विधान पूर्णत्वाने खरे नाही. किंबहुना नवोदित राष्ट्रीय भावनेला तडे कसे पडतील यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अहर्निश प्रयत्न केला असे दिसून येते. प्रातिनिधिक संस्थांचा भारतामध्ये प्रारंभ होताच एकराष्ट्रीयत्वाची भावना खच्ची करण्याच्या पद्धतशीर कारवाया सुरू झाल्या. मोर्ले-र्मिटो सुधारणांच्या वेळी मुसलमानांना राखीव जागाच नव्हे तर विभक्त मतदार संघ देऊन एकराष्ट्रीयत्वाला सुरुंग लावण्याचे काम ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी केले. माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा अहवाल एकराष्ट्रीयत्वाच्या कल्पनेवर स्तुतिसुमने उधळतो, पण फक्त शाब्दिक. प्रत्यक्षात शीख व ख्रिश्चन यांनाही विभक्त मतदारसंघ देऊन- फक्त राखीव जागा नव्हेत आपले राष्ट्रीयत्व खंडित करण्याचा व्यूह त्या अहवालाने रचलेला दिसतो. 1932 साली अनुसूचित जातींनाही उदयोन्मुख राष्ट्रीयतेपासून वेगळे करण्याचा घाट घालण्यात आला होता. तो महात्माजींच्यामुळे फसला ही गोष्ट निराळी. एकराष्ट्रीयत्वाची बीजे जोपासण्याचे काम खऱ्या अर्थाने राष्ट्रीय सभेने व विशेषतः महात्मा गांधींनी केले असे मला वाटते. प्रादेशिक समर्थनाचा आधार असलेले प्रारंभीचे नेते खऱ्या राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेपासून किती दूर होते हे लोकभाषेतील साहित्याच्या अवलोकनाने स्पष्ट होते. फक्त बंगालचे पुढारीच "बंगाल हे राष्ट्र (नेशन) आहे." असे म्हणत, अशातला भाग नाही. प्रारंभीच्या काळात टिळकांसारखा लोकनायक देखील राष्ट्रीयत्वाच्या प्रश्नावर गोंधळलेल्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करतो हे सुतक नाही काय?

"मुंबई इलाख्यात सिंध, गुजरात, महाराष्ट्र व कर्नाटक अशी चार राष्ट्रे आहेत", असे टिळकांनी म्हटल्याचे आढळते. "हिंदू राष्ट्र" हा शब्दप्रयोगही त्यांच्या लिखाणात येतो. अखेरच्या काळात सर्व भारत हे भाषातीत व धर्मातीत एक राष्ट्र आहे या सिद्धांताचा ते हिरीरीने पुरस्कार करताना दिसतात हेही खरे आहे. महात्मा गांधींच्या मनात मात्र राष्ट्र, प्रांत या कल्पनांबाबत कधीही गोंधळ नव्हता. एकराष्ट्रीयत्वाच्या चौकटीत भाषावार राज्यरचनेचे ते पुरस्कर्ते होते. कारण एकराष्ट्रीयत्व म्हणजे केंद्रीकरण हे समीकरण त्यांना मान्य नव्हते.

राष्ट्र व राष्ट्रीयत्व या संबंधीच्या वैचारिक गोंधळाचे रहस्य महाभारतात व आपल्या प्राचीन ग्रंथांत सापडते. त्या काळात राज्य व राष्ट्र हे समानार्थी शब्द होते. कलिंग राष्ट्र, कुरुराष्ट्र, अंग राज्य, गांधार राज्य, पांचाळ राष्ट्र असे शब्दप्रयोग वरचेवर आढळतात. राज्य व राष्ट्र हे शब्द छोट्या राजसत्ताक राज्यांसाठी अथवा जनपदासाठी योजले जात. राजसत्ताक पद्धती न स्वीकारणाऱ्या जनपदांना संघ किंवा गण ही संज्ञा होती. "नेशन" या शब्दाचा जो आधुनिक अर्थ आहे तो त्या काळात "राष्ट्र" या शब्दाला नव्हता.

प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतीमध्ये स्वतःच्या नगरराज्यावरील भक्तीला व नागरिकांच्या कर्तव्यनिष्ठेला अनन्यसाधारण महत्त्व होते. प्राचीन ग्रीकांचे नगरराज्य हे तर आराध्य दैवत होते. धर्मनिष्ठाही त्यातच समाविष्ट होती असे गिल्बर्ट मरे यांनी 'फाईव्ह फेजेस ऑफ ग्रीक रिलीजन' या आपल्या ग्रंथात म्हटले आहे. प्राचीन ग्रीकांच्या प्रेमाचे व आशा आकांक्षांचे नगरराज्य हे सर्वश्रेष्ठ प्रतीक होते. हे नगरप्रेम अश्चिलस, साँफक्लीज, युरिपायडीज, प्लेटो यांच्या नाटकांतून आणि ग्रंथांतून व विशेषतः अथेन्सचा नेता पेरिक्लीज याच्या श्रद्धांजलीच्या भाषणातून उत्तम रीतीने अभिव्यक्त झालेले दिसते.

'द रोमन स्पिरिट' या पुस्तकात अलबर्ट ग्रेनियर यांनी म्हटले आहे की प्रत्येक रोमन व्यक्तीच्या जीवनात राज्यप्रेमाला अभूतपूर्व प्राधान्य होते. आपल्या नगरराज्यासाठी तो जगे, विवाहबद्ध होई व पुत्रप्राप्ती करी. नगरराज्यासाठी तो श्वास घेई व त्याच्या वैभवासाठी आपले प्राण बिनदिक्कतपणे वेची. शेत नांगरतानाही त्याच्या डोळ्यांपुढे नगरराज्याचे हित असे, आपली सारी मानसिक शक्ती, आपले शब्दसामर्थ्य तो सार्वजनिक हिताच्या रक्षणासाठी खर्च करी. रोमन लोक एखाद्या शिस्तबद्ध सेनेप्रमाणे होते. आपल्या नगरराज्याचा उत्कर्ष व त्याचे रक्षण हा रोमन नागरिकाचा ध्रुवतारा होता. भूमध्य सागराच्या आसमंतातील सर्व प्रदेशाला रोमनगरीने वर्चस्वाखाली आणून आपल्या विचाराने भारावून टाकले होते.

समकालीन भारतामध्ये राज्यनिष्ठा (राजनिष्ठा नव्हे) व नागरिक कर्तव्याबाबतची अशी तीव्र भावना व जाणीव होती का, असा प्रश्न साहजिकच मनात येतो. वासुदेवशरण अग्रवाल यांनी पाणिनीवरील आपल्या अमूल्य अध्ययनात 'जनपद भक्तीची' कल्पना संधीय व एकराज जनपदात अस्तित्वात होती हे सप्रमाण सिद्ध केले आहे.

क्रिश्च्यॅनिटीच्या उदयापूर्वी व विशेषतः नंतर नगरराज्यनिष्ठा हा संकुचित आदर्श आहे असे ग्रीक-रोमन जनतेला वाटू लागले. हळूहळू इहलोकीच्या नगरीपेक्षा पारलौकिक नगरीला अव्यभिचारी निष्ठा वाहणे अधिक श्रेयस्कर आहे, असा विचार ग्रीक-रोमन जगतात बळावला (सेंट ऑगस्टीन).

आपल्याकडेही असेच मानसिक परिवर्तन पाणिनी-उत्तरकाळात घडून आले व ते इतके प्रभावशाली ठरले की संकुचित जनपदनिष्ठेतून आधुनिक पद्धतीची भारतीय राष्ट्रनिष्ठा अगदी कालपर्यंत आपण विकसित करू शकलो नाही. आजही राष्ट्र, राज्य व सार्वजनिक जीवन यांबद्दल भारतीय लोकांत कमालीची अनास्था दृष्टोत्पत्तीस येते. आशावाद व इहलोक वादाकडून सबंध समाज अध्यात्माकडे वळला. मग राष्ट्ररक्षण व समाजसुधारणा यांकडे कोण लक्ष देणार? हा वृत्तिपालट महाभारतातील एका श्लोकातून प्रतिबिंबित झालेला दिसतो:
त्यजेदेकं कुलस्यार्थे प्रामस्यार्थे कुलं त्यजेत्।
ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत् ॥
हा श्लोक आदिपर्व, सभापर्व व उद्योगपर्व यांत तीन चार ठिकाणी तरी आला आहे. इतरही प्राचीन ग्रंथांत तो आढळतो. माझ्या मते आत्म्याच्या शोधार्थ पृथ्वीचा त्याग करण्याची- व्यवहारात निव्वळ स्वार्थ सिद्धीसाठी राष्ट्रहिताचा बळी देण्याची ही शिकवण आपल्या विनाशाला कारणीभूत झाली आहे.

भारत राष्ट्र व एकराष्ट्रीयत्व ही स्वातंत्र्य- चळवळीची देणगी आहे. या संदर्भात महात्मा गांधीचे ऐतिहासिक कार्य अपूर्व होते हे नाकारता येणार नाही. यासाठी "राष्ट्रपिता" म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना गौरविले होते. भा.ज.पा.चे कल्याणसिंगांसारखे नेते व बहुजन समाज पार्टीचे कांशीरामसारखे पुढारी "आम्ही महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानत नाही" असे जे म्हणतात ते आंधळ्या व्देषापोटी होय असे मला वाटते. या प्रश्नावरील निरनिराळ्या प्रस्तावनांतील नानासाहेबांचे विचार हे प्रक्षोभक आहेत. त्यामुळे वाचकांच्या विचारमंथनाला निश्चित चालना मिळेल अशी मला आशा वाटते.

नानासाहेबांच्या या प्रस्तावनांचा संग्रह प्रसिद्ध करून साधना प्रकाशनाने मराठी साहित्यात महत्त्वाची भर घातली आहे. त्याबद्दल प्रकाशकांचे अभिनंदन!

Tags: अनिल अवचट. म.फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर बडोदा मधु लिमये Anil Avchat M. Phule Dr. Babasaheb Ambedkar Baroda #Madhu Limaye weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मधु लिमये,  पुणे, महाराष्ट्र

जन्म : 1 मे 1922; मृत्यू : 1995

जेष्ठ समाजवादी नेते आणि विचारवंत. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि गोवा मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके