डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सप्रेम आठवणी आणि सादर भावांजली

मास्तरांच्या जन्मशताब्दिवर्षाच्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली आणि स्वरांजली वाहण्यासाठी सहृदय रसिकांची सभा दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रामध्ये भरली होती. 1953 च्या सुमारास ही संस्था डॉ. एस. एम. जोशी आणि संगीतप्रेमी बापूसाहेब बाक्रे यांनी स्थापन केली. संस्थेने पहिले दोन जलसे केले ते केसरबाई केरकर आणि मास्तर कृष्णराव यांचे होते. या दोघाही कलावंतांना गायनाचार्य भास्करबुवा बखले यांची चार महिने एकत्र तालीम मिळाली होती. निकोप चुरस लागावी तसे हे जलसे झाले. केसरबाईनी बडा ख्याल एक तास गायला तर मास्तरांनी दीड तास. यंदा योग असा आला होता की बापूसाहेबांचे चिरंजीव श्री. मधुकर बाक्रे याच संस्थेच्या मंचावर मास्तरांच्या पुण्यप्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित झाले होते. त्यांच्या भाषणावरून हा लेख तयार केलेला आहे.

1968 च्या जुलै महिन्यात बालगंधर्वांच्या पहिल्या पुण्यतिथीला अंधेऱ्या वादळी संध्याकाळी अनेक रसिकांसमवेत मी उपस्थित होतो. त्या वेळी मास्तरांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना आरामखुर्चीवरून सभेमध्ये उचलून आणलेले होते. त्या सभेत तास दीड तास मास्तरांनी बालगंधर्वांच्या हृद्य आठवणी सांगितल्या होत्या मला वाटते, की केवळ स्तुतिसुमनांची अंजली वाहणे एवढेच आपण करू नये. मोठया कलावंतांविषयी आदर दाखवणे म्हणजे 'अहो रूपम् अहो ध्वनिः' या थाटात भाटगिरी करणे नाही, उलट अशा प्रसंगी वास्तवदर्शी चौफेर नजरेने मूल्यमापन करावे आणि ते साधार असावे, न्याय देणारे असावे. माणूस म्हटले की, त्याच्या व्यक्तित्वात उजेड आणि अंधार म्हणजेच दिन-रजनी एकत्र नांदत असतात हे आपण विसरू नये. आज मी आपल्याशी संवाद करायला आलो आहे तेही काही आधारांच्या आधारेच. 

1968 साली भास्करबुवांच्या पुण्यतिथीला मास्तरांनी केलेले भाषण हा पहिला आधार. दुसरा आधार म्हणजे मास्टर मनहर बर्वे यांच्या क्लासमधील जलशाच्या वेळी मास्तरांनी सांगितलेले विचार, तिसरा आधार, पंडित कुमारगंधर्वांनी मास्तर आणि बालगंधर्व यांच्या गायकीचे म्हैसूर मुक्कामी केलेले मार्मिक विश्लेषण, त्याच्या तीन टेप्स माझ्याजवळ आहेत. चौथा आधार आहे, माझ्या मर्मबंधातली ठेव- म्हणजे माझ्या वडिलांनी मागे ठेवलेले कागदपत्र. आपल्या प्रतिभाशाली गायकीबरोबरच मास्तरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वात दोन गुण प्रकर्षाने नजरेत भरत. आपल्या गुरूविषयी त्यांना असणारा नितांत आदर हा एक, आणि दुसरा त्यांच्या स्वभावात - खरे म्हणजे त्यांच्या रोमरोमात- असलेला मिष्किलपणा. मास्तरांच्या मिष्किलपणाच्या तर अनेक गोष्टी आठवतात. 

मास्तर व्यवहारचतुर नसले तरी व्यवहार-दक्ष होते. बुवांचे बरोबर तंबोऱ्यामागे असतानासुद्धा बैठकीला कोण येते, कोण जाते, इकडे त्यांचे चौफेर लक्ष असे. मानधनाच्या बाबतीत मात्र त्यांच्यावर अनेक वेळा अन्याय होई. कला कितीही श्रेष्ठ मानली तरी तिचे व्यवहारी अंग असतेच ना! पण त्या बाबतीत मास्तरांचे अनुभव ऐकण्यासारखे असत. एकदा एकाने, ते तपकीर ओढत नसतानाही, त्यांना एक तपकिरीची डबी दिली! एरवीसुद्धा, फुलांपेक्षा फुलांची पाकळीच वाट्याला! मग वैतागून मास्तर म्हणायचे, "अहो, गाता गाता मी वृद्ध झालो, पण ह्यांच्या संस्था मात्र वर्षानुवर्षे बाल्यावस्थेतच! प्रभात स्टुडिओनेसुद्धा इतक्या चाली घेऊन ठरवलेली पूर्ण बिदागी क्वचितच पोहोचवली." त्यांचे व्यक्तिमत्त्व व संगीत हे दोन्ही इतके एकरूप झाले होते की चाळीस-पन्नास वर्षानंतरही, त्यांच्या बैठकीच्या टेप्स ऐकताना त्यांचा मिष्किलपणा जाणवतो.

एकदा 'स्वयंवर' नाटकाला नेहमी येणारा एक गुजराती प्रेक्षक मास्तरांना म्हणाला की, मला तुमच्या 'रुक्मिणी'ला फिरायला घेऊन जायचे आहे. मास्तरांनी कितीतरी वेळा त्याला सांगितले की, अहो.. ही रुक्मिणी बाई नाही. ते गंधर्व आहेत. परंतु तो मानेना. आता नेहमीच्या प्रेक्षकाला नाराज तरी कसे करायचे? तेव्हा मास्तरांनी तोडगा काढला-बालगंधर्वाना हळूच म्हणाले की, तुम्ही शालू नेसताना जरा दरवाजाकडे वळा. त्याला मी तेथे उभा ठेवतो. म्हणजे त्याची खात्री होईल की 'ती' म्हणजे तो आहे. अर्थात आधी त्यांच्याशी दहा रुपयांची लावलेली पैज मास्तरांनी जिंकलीच. 

एकूण आयुष्यात पावणेतीन हजार बैठकी गाजवणारा हा गायक असामान्यच म्हटला पाहिजे. खरोखरच मास्तरांना एकपात्री राष्ट्रीय संस्था म्हटले तर काही अतिशयोक्ती होईल का? गुरू म्हणून मास्तरांच्या कारकीर्दीचा आढावा घेताना, अनेक गोष्टी लक्षात ठेवणे उचित आहे. एक तर शिष्य ठरवून मिळत नसतो. शिष्य मिळणे ही योगायोगाची गोष्ट आहे आणि शिष्यत्व म्हणजे तरी काय? कुमार गंधर्व म्हणायचे की, 'गायकीला मान्यता देणे म्हणजे शिष्यत्व पत्करणे.' अशा अर्थाने मास्तरांनी अनेक शिष्य तयार केले. दुसरे म्हणजे गुरूकडून अपेक्षा काय? तासन्तास मेहनत घेण्यापेक्षा, दिशा दाखविणे, चांगले गाणे ऐकवणे, हे महत्त्वाचे नाही काय? कारण व्याकरण म्हणजे विद्या नव्हे; बाराखडी म्हणजे ज्ञान नव्हे; 'गंडाबंधन' म्हणजे विद्यार्जन नाही. आणि भक्तिभावाने लावलेला शेंदूर म्हणजे समज-उमज नव्हे.

तेव्हा शिष्यांना घराणेशाहीचा खोगीर बांधणे, 'व्हॉइस कल्चर' किंवा 'सौंदर्यशास्त्र', असले पुस्तकी संस्कार चढविणे म्हणजे ज्ञानदान नव्हे. मुलगा चांगला गात असतानाही, मास्तरांनी खाँसाहेब त्याला ओरडताना ऐकले तेव्हा ते खाँसाहेबांना म्हणाले. "उगाच का ओरडता? अहो तुमचा मुलगा चांगला गातो आहे." त्यावर खाँसाहेब म्हणाले, "बाप के जैसे करडे आवाज मे गाना चाहिए" असली दीक्षा काय कामाची? खरंच शिकवण्याची हातोटी ही एक आगळीच बाब असते, ती सर्वांना जमतेच असे नाही. उत्कृष्ट शिक्षक कला समर्थपणे सादर करतोच असे नाही आणि समर्थ कलाकार उत्तम शिक्षक असतोच असेही नाही. उदाहरणार्थ, ज्या श्री. रमाकांत आचरेकरांनी. सचिन तेंडुलकर कांबळी, आदी शिष्य तयार केले, ते स्वतः किती टेस्ट मॅचेस खेळले? 

एक जुनी म्हण आहे. ‘उत्तम गाना, मध्यम बजाना, कनिष्ठ नाचना, बिकट बताना.’ ज्या गायकाला सतत पुढे जायचे असते, नवीन काहीतरी घडवायचे असते, तो नुसता शेंदूर लेपून, मूर्तीप्रमाणे स्वायिक कसा होईल? संगीताशिवाय अन्य कुठल्या क्षेत्रात आपण 'किती शिष्य तयार केले' असे आपण कोणालाही विचारतो काय? राजशेखर कवीने आपल्या 'काव्य-मीमांसा' या संस्कृत ग्रंथामध्ये ज्ञानाचे तीन प्रकार नमूद केले आहेत- उपजत (Innate), स्व- अर्जित (Acquired) आणि शिकवलेले (Learnt). त्यामुळे किती शिष्य तयार केले यापेक्षा, संगीतरूपी ठेवलेला वारसा महत्त्वाचा. तरीसुद्धा, केवळ शिष्यच म्हटले तर मास्तरांनी राम मराठेंना विद्या दिली. पंचममध्ये 'शाहू छत्रपती के दरबार में' गाताना राम मराठे म्हणतात की, 'ह्या भास्करबुवांच्या जागा आहेत.' परंतु राम मराठे यांच्या जन्माआधी भास्करबुवा गेले. तेव्हा हे ज्ञान मास्तरांच्याचकडून त्यांच्याकडे आले, हे उघड आहे. 

गंडाबंधनाच्या वेळी किशोरी आमोणकरांना, मास्तरांनी 'महादेव की सुध बानी, सुनत आनंद भयो री' ही 'अजद हिंडोल’ची चीज शिकविली, ही गोष्टसुद्धा इतिहासात नमूद आहे. ‘शंकरा' रागाचा बालगंधर्वांना प्रथम परिचय मास्तरांनी 'सावित्री' नाटकात 'सन्निध जी सेवा' ह्या पदाच्या माध्यमाने करून दिला, ही वस्तुस्थिती आहे. प्रतिवर्षी पुण्याला सदाशिव पेठेत गणपतीची संगीतबद्ध आरती लहान बालकांकडून बसवून घेऊन मास्तरांनी कोवळ्या वयात त्या मुलांच्या मनात लय-सूर-ताल यांचे बीज पेरले, यालाही महत्त्व आहे. केवळ शिष्यांची आकडेवारी देण्यात काय हंशील? संख्याशास्त्रातसुद्धा केवळ आकड्यांचे तक्ते मांडण्याचे प्रयोजन काय? त्यांतून निष्कर्ष काढणे, Trends शोधणे, हे महत्त्वाचे आहे. म्हणजेच जे शिकविले. त्याचा दर्जा काय, ह्यातच सारे मर्म आहे.

माझ्याकडील एका टेपमध्ये मास्तर एका गोड गळ्याच्या मुलीला, ‘हम चन्दन तुम पानी' ही बंदिश ईशरचणी मग्न होऊन शिकवतात. मध्येच ते म्हणतात. 'अग, तू पाणी आहेस - तू क:पदार्थ आहेस, आणि ईश्वर म्हणजे सर्वस्व' ही भावना, ही लीनता. तुझ्या स्वरात आली पाहिजे. आणि ती कशी आणावी हे मास्तर स्वतः गाऊन दाखवतात. हेच खऱ्या अर्थाने सर्वोच्च असे विद्यादान नव्हे काय? तेव्हा मास्तरांनी आपले भांडार, (ते Estate म्हणायचे) पारख करून जरूर दिले. आपला वारसा कमावण्याच्या कामी ते अल्लादियाखाँसाहेबांचे बंधू दौलतखाँसाहेब यांना अत्यंत मानायचे. 

चाल-राग निर्मितीचा वारसा, ललित सौंदर्यदृष्टी, भारदस्त व्यासंग, खानदानी अभिरुची - ही खरी ठेव नाही का? कारण ह्याच गोष्टी चिरंतन असतात. आणि एकदा हे गुण प्राप्त झाल्यावर होतो एक चमत्कार! त्याच राग-चाल-चिजांचा कायापालट होऊन त्यांचे रूपांतर होते. त्या नवीन अवतार धारण करतात. Forms are more real than living man.

The nurselings of immortality ह्याचे एक उत्तम उदाहरण, सुप्रसिद्ध भावगीत गायक श्री. गजानन वाटवे यांनी दिले.  प्रभातचा 'वहाँ' हा चित्रपट पडला. त्यातील मास्तरांची एक छान चाल 'हर गली में है बगीचे' वाया जाईल म्हणून वाटव्यांनी मास्तरांची परवानगी घेतली व ती चाल ‘गगनी उगवला सायंतारा' ह्या सर्वमान्यता मिळालेल्या भावगीताच्या रूपाने पुनरुज्जीवित केली. 

आता एक गायक म्हणून आपण मास्तरांकडे पाहू. त्यांची वैशिष्ट्ये काय होती? मास्तर हे एक अचूक व सदासर्वदा फड जिंकणारे बैठकीचे गायक होते, हे नि:संशयच आहे. त्यांची विजयी हास्यमुद्रा, मिष्किलपणा व प्रेक्षकांची नाडी बरोबर ओळखायची त्यांची हातोटी, यामुळे पदार्पण करताच मैफल त्यांना शरण! गायक व श्रोते एकजीव- 'सहृदय' असतात या भट्टनायकाच्या प्रतिपादनाचे उज्ज्वल उदाहरण म्हणजे मास्तरांची गायकी. गायन सुबोध, चाल सरल व वाद्य एकजीव, श्रोते वश झालेले- ह्या सर्वामुळे ते मन जिंकीत. नाट्यशास्त्रात भरताने नमूद केले आहे, जो गायक रसनिष्पती करतो तो लगेच श्रोत्याला भिडतो, रसिक बनवतो. आणि मग दोघेही रसास्वाद घेतात- मास्तरांच्या बाबतीत या विधानाचा तात्काळ प्रत्यय यायचा. कोणाला काय ऐकवावे, किती सुनवावे याचे मास्तरांचे निदान अचूक असे. 

भास्करबुवासुद्धा, वेळप्रसंगी त्यांना विचारायचे, “कृष्णा काय गाऊ ह्या शाळेकरी मुलांसमोर?” मास्तर म्हणायचे, “राग फार वेळ आळवू नका.” पंधरा-वीस मिनिटांच्या भूपानंतर एखादे नाट्यपद- 'उगीच का कांता'. झाले, बुवांनी फड जिंकला. मग मुलांना 'आपले गाणे' ऐकवले - अडाणा- मुंदरी मोरी का. आधी वश केले, मग आपले घोडे पुढे दामटले! प्रतिवर्षी ब्राह्मणसभेत गणपती उत्सवात मास्तरांचे गाणे व्हायचे. ही प्रथा सत्तावीस-अठावीस वर्षे चालली. मुंबईच्या रसिकांसाठी ही मोठी पर्वणी असे. बेस्ट गाड्यांना व पोलिसांना प्रार्थना समाजाच्या आसपास रहदारीचे नियंत्रण करणे मुश्किल होत असे. सभेचे कोषाध्यक्ष खानविलकर - आमचे खानसाहेब - म्हणायचे की केवळ या एका गाण्याच्या पासासाठी एकाच आठवड्यात वर्षाची थकलेली वर्गणी वसूल होते. 

पु. ल. देशपांडे यांनी लिहिले आहे की, वर्षानुवर्षे मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय माणसाच्या आयुष्यात दर वर्षी आपल्या कुटुंबासहित दोन सहली अपरिहार्य असत - दसऱ्यात महालक्ष्मीला, आणि बालगंधर्वाच्या एका तरी नाटकाला. मला वाटते की विचारान्ति ते आता तिसरी गोष्ट या पंक्तीत बसवतील - मास्तरांच्या ब्राह्मण सभेतील गाण्याला! 

मास्तरांची गायकी खानदानी पण ललित अशीच होती. त्याचा अजगर त्यांनी कधी बनविला नाही. त्यांचे गाणे सदैव पुढे जाणारे होते - नदीच्या प्रवाहाप्रमाणे. ते रेंगाळणारे नव्हते. आग्रा व जयपूर, यांतले भास्करबुवांचे अनोखे मिश्रण- फैज महम्मद खाँ, नथ्यन खाँ, अल्लादिया खाँ- हे सगळे 'चविष्ट बदाम' सहज लीलया पचवून, मास्तरांनी आपली एक अतिशय अनोखी व सुश्राव्य अशी शैली बनविली होती. आपले स्वतःचे वेगळेच रसायन तयार केले होते. स्वतःचा असा वैयक्तिक छाप त्यावर होता. गायक म्हणून मास्तरांचा दमसास जरूर लहान होता. पण लहान अक्षरसुद्धा सुंदर दिसू शकते ना? मोठ्या पानावर एकच भले मोठे अक्षर लिहिले, तर ते विद्रूप नाही का? अशी काही घराणी आहेत ज्यात धबधब्यासारख्या लांबच लांब ताना घ्यायची प्रथा आहे. मग राग कुठलाही असो, बड्या ख्यालाकडून द्रुतकडे जाताना हमखास त्याच त्या लांबच्या लांब ताना. त्यांचा शेवटी कंटाळा येतोच ना? रात्रभर भरमसाठ लांब ताना घेऊन गायले, पण सांगितले काय? काहीही नाही!

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मास्तरांच्या गायकीत नवनिर्मिती समक्ष घडताना दिसायची. प्रथम विचार सुचणे, त्याचे स्वरात रूपांतर करणे, व ते मैफलीत सादर करणे - त्यांच्या गायकीत ही विविध अनोखी प्रक्रिया सदैव होताना दिसे. मास्तरांच्या बैठकीत सर्व वादये एकजीव, समरस होत असतो. लय, सूर, तान या सर्वांचा हृद्य विलास असे. अनेक वेळा ते समेवर कसे येतील, याची श्रोत्यांना चिंता पडायची. Mozart म्हणायचे तसे - It is the audience who should sweat, not the conductor तसाच प्रकार, कारण मास्तरांची हुकमत होतीच ना, पूर्णत्वे.

असे म्हणतात की, भास्करबुवा व अल्लादियाखाँसाहेबांनी आपल्या गाण्याच्या रेकॉर्डस् काढल्या नाहीत, अडीच मिनिटांच्या तबकडीत आमची गायकी कशी बसवायची या फिकिरीत पडून! पण मास्तरांच्या मात्र पन्नास/साठांहून तरी अधिक रेकॉर्डस निघाल्या आहेत. त्या तेवढ्यातच खूप काही सांगून जातात - संक्षिप्त पण संपूर्ण, दोन्हीही. ह्यातच भास्करबुवांची इच्छा- 'शिष्यात् इच्छेत् पराजयम्।' सफल झाली नाही का? मला तर वाटते, या शतकात भारतीय संगीतात संपूर्ण वाग्गेयकार - संगीतपुरुष, ज्यांना ज्या अर्थाने 'नायक' म्हणू शकू असे दोनच, एक मास्तर आणि दुसरे कुमारगंधर्व. वैयक्तिक क्षेत्रं अनेक लोकांनी गाजविली. मैफिलनवाझ खूप झाले. तसेच दिग्दर्शकही खूप झाले. अनेकांनी शिष्यांना मार्गदर्शन केले. अभिरुची उंचावली. काहींनी अनोखी नवनिर्मिती केली. काही उत्तम संगीतशास्त्रज्ञ झाले. पण फक्त ह्याच दोघांनी संपूर्ण संगीतक्षेत्रात अधिकारवाणीने, अनभिषिक्त राज्य केले. 

त्यांच्या हुकमतीचा अबलख, पंचकल्याणी घोडा लीलया अखिल संगीत क्षेत्रात दिसत राहिला. झेप (Grasp), व्याप (Range), पोच (Reach) दोघांचीही विलक्षण होती. शुद्ध राग-संगीत, अभंग, लोकगीते, गवळण, भावगीते, सिनेसंगीत, अष्टपदी, प्रलोक, लावणी, ठुमरी, भजने, ऋतुकौतुक... प्रत्येक क्षेत्रात प्रभुत्वच. दोघेही त्रिशूळासारखे – त्रिमुखी – ब्रह्मा-विष्णू-महेश – कर्ता-त्राता-विलयकर्ता. अर्थातच महेश हा येथे पशुपती, जटाधारी, वैरागी नसून सर्व कलेचा विधाता, उमावेल्हाळ, विस्मयकारा चंद्रमौळी असा नटराज आहे हे सांगणे नलगेच.

कुमार म्हणायचे, गाण्याचा 'कठिन ये विस्तार'. छानपणे विस्तार करणे, 'कर्मकठीण'. पण दोघेही – कुमार आणि मास्तर – हा सहज लीलया करू शकत. दोघांतही एक अद्भुत असामान्य असा लयीचा 'अंदाज' होता. त्यामुळे ते गाण्याचा समज व सौंदर्य वाढविण्यासाठी लयीचा 'आघात' करू शकत. म्हणून त्यांच्या गायकीमध्ये स्वर-लयींचा एक अप्रतिम समन्वय (Balance) आपल्याला सापडतो. इतर गायकांचे व ह्यांचे गाणे तेच, गायकी वेगळी! मास्तरांचा दमसास कमी होता, हे आपण आधीच नमूद केले आहे. पण असे कोणीही दाखवावे की अमुक जागी अधिक दमसासाने गायकीचे सौंदर्य वाढले असते. कारण त्यांनी आपल्याला शोभेल आणि झेपेल अशी आपली गायकी सुंदर व अतूट घडविली, बसविली होती. 

मास्तरांनी गायकीचे विविध आविष्कार काठावरून उतरवून अस्सल गायकीच्या मूळ प्रवाहात बसविले आणि अभिजात संगीताची सीमा-सरहद्द वाढविली. कसे, ते दोन उदाहरणांनी दाखवता येईल. गावातल्या मोकळ्या फडात, भडक परकर-पोलक्यात हुंदडणारी बालिश ‘बलसागर तुम्ही’ ही सौभद्रातली लावणी मास्तरांनी नऊवारी शालू-पैठणी, तिलक, नथ चढवून भारदस्त 'भीमपलासाच्या' स्वरूपात माजघरात हळदी कुंकवासाठी, सवाष्ण बनवून आणली. तसेच माध्यान्हीच्या तापात बाहेरच्या अंगणात पाटी टाकून उष्ट्यासाठी फाटक्या पंच्यात भीक मागणाऱ्या जोहाराला मास्तरांनी ‘बिभास भैरव’चा 'झोकदार शिरी फेटा' चढवून मानाने ताट-पाटाच्या भर पंगतीत थाटाने विराजमान केले.

मास्तरांचा नाट्यसंगीताचा प्रवास जबर होता. 'द्रौपदी' नाटकामध्ये दोन चाली (त्यांतली एक - विराट ज्ञानी), 1925 साली नंदकुमार, पुढे रांगणेकरांचे 'कुलवधू', 'आशीर्वाद', ('क्षण आला भाग्याचा', 'बोला अमृत बोला')... एक प्रदीर्घ वाटचाल. 

सिनेसंगीतामध्ये मास्तरांची चाली देण्याची किमया और होती. ‘धर्मात्मा' ते 'सावता माळी' अनेक चित्रपटांतील अविस्मरणीय चाली 'वन्दित राधा बाला', 'राधिका चतुर बोले', 'श्याम बजाय तोरे घर में मुरलिया'- आजही आपल्या भोवती पिंगा घालत असतात. 

कुमार व मास्तर या दोघांनी आम जनतेमध्ये संगीताची अभिरुची वाढवली. एकदा कुमारांचे गाणे घरी झाल्यावर आमचा आचारी- बिहारचा राहणारा- म्हणाला की, माफ करा पण ही तुमची गायकी नसून आमची गायकी ते गात आहेत. मास्तरांनीसुद्धा सिनेमा व बैठकीच्या माध्यमातून अभिजात गायकी माजघर, मंडई, साखर कारखान्यापर्यंत मनोवेधक आविष्काराने पोहोचवली.

रचनाकार म्हणून मास्तरांचे चालनिर्मितीवर अनेकमुखी प्रभुत्व होते. प्रभातच्या सिनेमासाठी दोन-तीन तासांत एकेका गाण्यासाठी तीन-चार चाली ते तयार करत आणि म्हणत, “जी हवी ती घ्या.” एकदा त्यांचा सकाळचा जलसा लक्ष्मीबाग भटवाडी येथे माझ्या वडिलांनी ठेवला होता. त्या वेळी बैठकीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावंतवाडीचे राजेसाहेब वगैरे हजर होते. 1931 अखेर किंवा 32 सालाच्या सुरुवातीची ही गोष्ट, गाण्यानंतर सर्वांना भोजन. साडेबाराच्या सुमाराला भैरवीची वेळ. इकडे ताट-पाट मांडले जात होते. तेव्हा मास्तर म्हणाले, 'बापूसाहेब, कालच मी एक नवीन भैरवी बसविली, ती आज प्रथम आपल्याला ऐकवतो.' असे सांगून 'ब्रिज की बाट चालो तुम, शाम मोहन प्यारे’ ही सुंदर बन्दिश ऐकवली आणि तेव्हा 'सावित्री' नाटकाच्या तालमी चालू होत्या. त्यात ही चाल 'एकवटत जीव शिवा-मरणाचा डाव नवा' ह्या बालगंधर्वाच्या पदाला दिली. 

गोविंदराव टेंबे यांची साठी कोल्हापूरला साजरी झाली. तेव्हा मिष्किलपणे टेंबे म्हणाले, की 'आजच्या प्रसंगासाठी माझे गुरुबंधू मास्तर ह्यांनी खास एक बन्दिश बांधली आहे, व ते ती ऐकवणार आहेत. वास्तविक मास्तरांनी असे काहीही तयार केलेले नव्हते. परंतु हरिभाऊ देशपांड्यांना मास्तर म्हणाले, "तू वाद्य जुळवून घे- मी जरा आत जाऊन येतो. सुरुवातीला अडाण्याच्या स्वरांच्या आसपास ऑर्गन धर.' थोड्या वेळाने मास्तर गायला बसले त्या अवधीतच त्यांनी अडाण्यातली ‘रंग रंग मुखपे मत फेको बनवारी' ही आता प्रसिद्ध झालेली बन्दिश तयार करून, म्हणूनही दाखविली! 

अशा दर्जाच्या चाली सदैव कालप्रवाहावर वाहातच राहणार- जशा तुकारामाच्या गाथा इंद्रायणीवर. इतक्या सगळ्या अखंड कृतीमुळे मास्तरांना 'संगीतकलानिधी’ हा किताब मिळाला व प्रचलित झाला, त्यात नवल ते काय? मास्तरांच्याच गुरूंचे गुरू अल्लादिया खाँसाहेब यांनी 'तिलक कामोदात' रचलेली एक भारदस्त बन्दिश मास्तरांच्या बाबतीत अत्यंत उचित अशी आहे...

'सुरसंगत, राग विद्या, संगीत प्रमाण, तो कण्ठ कर दिखाये, वाको जानिये गुणिजन।'

Tags: भास्करबुवा बखले मास्तर कृष्णराव केसरबाई केरकर बापूसाहेब बाक्रे डॉ. एस. एम. जोशी मधुकर बाक्रे Bhaskarbuwa Bakhale Mastar Krushnarao Kesarbai Kerkar Bapusaheb Bakre Dr. S.M. Joshi Madhukar Bakre weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके