राजाच्या घरानं- सेवादलाच्या या घरानं आम्हाला दिलेलं पहिलं जेवण. आम्हाला जिंकून घेणारं, कायमचं उच्चवर्गीय घरातलं आमचं हे पहिलेच ब्राम्हणी जेवण. स्वच्छ ताट, वाटी, पेला, लोटा, पोळी- भात, भाजी, आमटी-वरण (बापरे! एवढे पदार्थ!) वाढायला राजाची मोठी वहिनी. शेजारी आई-ताई. राजाची माझ्या मांडीला मांडी. आग्रहाची कोड-कौतुक नवलाई, बरेचदा मातीच्या ताटात माशांचं कालवण-भात जेवणाऱ्या एका खेड्यातील शेतकऱ्याच्या मुलाला अगदी घरघरचं असं स्वागतशील आतिथ्यभरलं जेवण या घरानं दिलं. यानंतर असंच कितीदा तरी. जातीपातीच्या पलीकडला हा पहिला स्वागतशील रोटी- मुक्तीचा संस्कार असा जन्मभर पुरला की जातीपातीच्या पलीकडली मुक्ती आमच्या आचार-विचारांना अक्षयपणे लाभली.
9 जानेवारीच्या ‘लोकसत्ता’ दैनिकात छापून आलं- ‘ज्येष्ठ पत्रकार राजा केळकर यांचे निधन.’ पुढील मजकूर त्यांच्या पत्रकारितेच्या संबंधीचा... साने गुरुजींच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या ‘कर्तव्य’ या नियतकालिकामधून त्यांनी आपली पत्रकारिता सुरू केली. ‘प्रभात’, ‘सांजक्रांती’, ‘नवा काळ’ या वृत्तपत्रांचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले. ‘लोकसत्ता’मध्ये असताना त्यांनी राजकीय पत्रकारिता करताना अनेक गौप्यस्फोट केले. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील या माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकीय व्यक्तींशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या जडणघडणीत त्यांचा प्रमुख सहभाग होता. 1978 साली ते पत्रकार संघाचे अध्यक्ष होते आणि 1981 ते 1990 च्या काळात ते विश्वस्त होते.’ या अगोदरच्या मजकुरात त्यांची एक-दोन वाक्यांतील त्रोटक माहिती अशी होती... ‘राष्ट्र सेवादलाच्या पहिल्या तुकडीचे सदस्य असलेले राजा केळकर यांनी पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यात सेवादलाची उभारणी करण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनामध्ये त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.’ 1942 ते 1947 या काळात मॅट्रिकच्या वर्गापर्यंत शाळा सुटल्याबरोबर संध्याकाळी अलिबागच्या सेवादल शाखेत, आम्ही किशोरवयीन मुलांनी अनुभवलेले सेवादल प्रमुख राजा केळकर यांच्याबद्दल थोडे अधिक बोलावयास हवे. सागरकिनारच्या मैदानावरील खेळ, सैनिक गीते, प्रासंगिक भाषणे, झेंडावंदन, राष्ट्रगीत अशा विविध कार्यक्रमांची राजा केळकरांची रोजची सेवादल शाखा होतीच, पण राजानं आपल्या घराचं अक्षरश: ‘सेवादलाच्या घरा’त रूपांतर केले होते.
या ‘सेवादल घराबद्दल बोलायचे म्हणजेच राजाबद्दल बोलायचे.’ राजाच्या शेतीवाडीची श्रीमंती कधीच संपलेली होती, पण आता ही मंतरलेल्या दिवसांची सेवादल चळवळीची श्रीमंती घर भरून येऊ लागली होती. त्यावेळी होऊन गेलेले हे सेवादलाचे घर. बालकवींच्या जणू राजबागेतलं सांजअंगण. सेवादल शाखेतल्या परकरातल्या चिवचिव चिमण्यांनी फुललेलं. देशभक्त लेले-लिमये-देशमुख अशा वकील-डॉक्टरांच्या पोरी इथं येतच; पण अगदी डेप्युटी कलेक्टरच्या मुलीसकट होइन्स्पेक्टरची तिची धिटुकली मैत्रीणही सी. आय. डी. च्या देखत या अंगणसेवादल शाखेत येई. असं हे मोठं सुंदर निर्भय अभिमानाचे घर- राजाचं. 1942 च्या क्रांतीच्या जयजयकारात, याच घरातील तो राजा, कोळीवाड्यातील नारायण भगत, के. डी. सुर्वे पकडले गेले. बंड्या सावंत भूमिगत झाला. सुधाकर कामत, दत्ता कुंटे, नाना लिमये, मल्हार देशपांडे या शाळकरी पोरांनी सत्याग्रह केले, याच राजाच्या घराच्या प्रेरणेने आणि ही वानरसेना तुरुंगातून सुटून आल्यावर राजाच्या घराने गुढ्या-तोरणे उभारून केलेलं अलौकिक स्वागत-कौतुक अविस्मरणीय.
याच राजाच्या माडीवरील दिवाणखान्यातील बौध्दीकांनी आमचं किशोरवयीन व्यक्तिमत्त्व समृध्द झालं. स्वातंत्र्याचा संग्राम, हिंदु-मुस्लिम ऐक्य, सामाजिक समता, अहिंसा, जागतिक शांतता, लोकशाही, समाजवाद हे सारे संस्कार इथलेच. राजाच्या घरानं- सेवादलाच्या या घरानं आम्हाला दिलेलं पहिलं जेवण. आम्हाला जिंकून घेणारं, कायमचं. उच्चवर्गीय घरातलं आमचं हे पहिलेच ब्राह्मणी जेवण. स्वच्छ ताट, वाटी, पेला, लोटा, पोळी-भात, भाजी, आमटी-वरण (बापरे! एवढे पदार्थ!) वाढायला राजाची मोठी वहिनी. शेजारी आई-ताई.
राजाची माझ्या मांडीला मांडी. आग्रहाची कोड-कौतुक नवलाई, बरेचदा मातीच्या ताटात माशांचं कालवण-भात जेवणाऱ्या एका खेड्यातील शेतकऱ्याच्या मुलाला अगदी घरघरचं असं स्वागतशील आतिथ्यभरलं जेवण या घरानं दिलं. यानंतर असंच कितीदा तरी. जातीपातीच्या पलीकडला हा पहिला स्वागतशील रोटी-मुक्तीचा संस्कार असा जन्मभर पुरला की जातीपातीच्या पलीकडली मुक्ती आमच्या आचार-विचारांना अक्षयपणे लाभली. शुभ्र खादीच्या ‘खमीसासह विचार खाकी, खुले मस्तकी टोपी तिरकी’ हा आमचा सेवादलीय रुबाब याच घरातील राजाला मिळणाऱ्या तुटपुंज्या सेवादलीय फुलटाई मानधनातून अगदी माझ्या मॅट्रिकपर्यंत सांभाळला गेला. याच घरामुळे साऱ्या अलिबागकरांनी आम्हाला डोक्यावर घेतलं.
कुसुाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार’च्या आधारानं राजानं उभं केलेलं क्रांतिकारकांचं आत्मसमर्पण, ‘लावा कुंकू तिच्या भाळी’च्या शब्दस्वरांवर जिवंत केलेलं भारतमातेसाठीचं आवाहन, मजुरांचे प्रश्न मांडण्यासाठी गाजलेले नागेश जोशींचे ‘विजय’ नाटक, ‘उठू देत देश, पेटू दे देश...’, ‘तुझ्या घामातून तुझ्या कामामधून’, ‘या गरिबांनु या झेंडा हाती घ्या...’ अशा कित्येक सैनिक गीतांचे राजाने दिलेले अलिबागकरांना भरगच्च अग्निसंप्रदायी कार्यक्रम- ज्यात आम्ही सर्वच नाचणारे-घडणारे याच घराच्या वळचणीतून जन्मलो आणि ‘शिंग फुंकले रणी’च्या तालावर राजाप्रेरित निघणाऱ्या प्रभातफेऱ्यांचे सारे संचलन होई याच घरातून. शाळेतील अभ्यास-पुस्तकांपेक्षा राजाच्या प्रेरणेने एक वेगळीच सांस्कृतिक ज्ञानगंगा याच घरातून वाहू लागली आणि आम्ही ऐल तटावरली मंडळी तीमध्ये अगदी तुडुंब सुस्नात होऊन गेलो.
साने गुरुजींची ‘श्यामची आई’, ‘धडपडणारी मुले’ वि. स. खांडकरांची ‘उल्का’, ‘दोन धु्रव’, मामा वरेकरांची ‘धावता धोटा’, ‘सत्तेचे गुलाम’, बंकिमचंद्रांची ‘आनंदमठ’, शरच्चंद्रांचा ‘श्रीकांत’, खाडिलकरांचा ‘कीचकवध’, कुसुाग्रजांची ‘विशाखा’, यशवंतांची ‘बंदिशाळा’, ‘द्या आम्हाला सुळी’, खलिल जिब्रानचं ‘जीवनदर्शन’ आचार्य अत्रे यांच्या साप्ताहिक ‘नवयुग’मधील ‘अत्रे उवाच’, पां. वा. गाडगीळ यांचे ‘लोकमान्य’ आणि प्रभाकर पाध्ये यांचे ‘नवशक्ती’ या दोन्ही दैनिकांतील अग्रलेख या साऱ्या साहित्यानं आमचं भावनिक-सांस्कृतिक पालनपोषण याच घराने केले आणि आमच्या त्या किशोरकालीन वयात, राजाच्या मार्गदर्शनाखाली याच घराने आमच्या वैचारिक विवेचक विश्लेषणासाठी दिली वादविवेचन मालिकेतील ‘निरीश्वरवाद’, ‘अराजकवाद’, ‘गांधीवाद’, ‘लोकशाही’, ‘समाजवाद’ अशी वैचारिक ग्रंथसंपदा आणखी एक या घराची धमाल!
हिंसा-अहिंसा, हुकूमशाही-लोकशाही, स्वातंत्र्य-गुलामगिरी, हिंसक क्रांती- अहिंसात्मक सत्याग्रह, हिंदुराष्ट्र-धर्मातीत राष्ट्र अशा राजाच्या झोपाळ्या- भोवतीच्या त्याच्या बरोबरच्या चर्चा तर नेहमीच्याच; पण कलेसाठी कला की जीवनासाठी कला, पुरोगामी साहित्य की सौंदर्यवादी साहित्य अशाही चर्चा राजासहित याच घरात रंगल्या आणि याच घरातील या चर्चांतून आमच्यातील वक्ते घडले, अन् शाळा, तालुका, जिल्हा अशा चढत्या स्पर्धांतून ते गाजले. गुरुकुल याच सेवादलाच्या घरातले- राजाचे. याच घरातील राजाच्या गुरुकुलाने आम्हाला अगदी हसतखेळत सौंदर्यदृष्टीही दिली. स्वच्छ पोषाख दिला. मुक्त मन घडवलं. निसर्ग अन् स्त्री-पुरुषासहितच्या मानवी सौंदर्याकडे पाहण्याचा दिलखुलासपणा दिला.
स्त्री-पुरुष समतेतील सौंदर्य रूजवलं. एसे, नानासाहेब, साने गुरुजींपासून शिरुभाऊ-अनुतार्इंपर्यंतची अनेक सेवादल आमंत्रित नेतेंडळी याच राजाच्या सेवादल घरात उतरत. किती जवळूनचं आम्हाला होणारं त्यांचं दर्शन. त्या किशोर वयात, त्या उंच शिखरांच्या सहवासात मिळणारे श्रीमंत अनुभव आणि संध्याकाळच्या डोंगरे हॉलच्या पटांगणात त्यांची जाहीर व्याख्याने... ऐकलेले राजकीय, सामाजिक क्रांतिकारक तेजस्वी विचार... सारं सारं मिळत होतं आम्हा सर्वांना राजामुळेच. आणि तिथेच कधीतरीची वसंत बापट, लीलाधर हेगडे यांची राजाच्या हार्मोनियम साथीसहितची शाहिरी धमाल आम्हाला स्वातंत्र्यसन्मुख क्रांतिकारकतेने बेधुंद करणारी.
राजा, त्याच्याच घरात सेवादल कार्यक्रमाच्या कधी रात्री उशीरापर्यंतच्या तालमी झाल्यानंतर, त्याच्याच घरी आम्हाला कित्येकदा ते पांढरपेशी वरणभात-पोळी भाजीचे जेवण देऊन, त्याच्या दिवाणखान्यात गाद्या घालून आमची झोपण्याची व्यवस्था करावयाचा. आणि गावोगाव सेवादल शाखा स्थापण्यासाठी आमच्या खेडुत शेतकरी आईबाबांच्या घरी आल्यानंतर कुणाचेही श्रीमंती घर नाकारून, आमच्याच घरी जमिनीवर टाकलेल्या घोंगडी आणि मांजरपाटी पासोडीवर रात्रभर गाढ झोपायचा आणि सकाळी, माशाच्या कालवणाबरोबरची भाकरी अगदी चवीने खात, तृप्त मनाने माझ्या आई-बाबांना, दादा-वहिनीला हात जोडून नमस्कार करीत निरोप द्यायचा.
आम्ही उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेलो. त्याचदरम्यान राजाही पत्रकाराच्या भूमिकेत मुंबईस आला. आमच्या कॉलेज प्रवेशाचे पुढे वसतिगृह प्रवेशाची आदी कामे त्याने मंत्र्यांसंत्र्यांच्या चिठ्ठ्या मिळवून केलेच. पण पुढे तर मुंबई प्रांतांचे मंत्री पी. के. सावंत, ‘लोकमान्य’, ‘नवशक्ती’ यांचे संपादक पां. वा. गाडगीळ, प्रभाकर पाध्ये, राजकमलचे संगीतदिग्दर्शक वसंत देसाई यांच्या अगदी घरीदारी आम्हाला नेऊन आमच्या शैक्षणिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी त्यांच्याशी परिचय करून देणारा राजा. तसेच ‘लोकसत्ता’, ‘नवशक्ती’, ‘नवयुग’, ‘प्रभात’चे ‘मौज’ प्रफुल्ल चित्रपट शूटिंगगृह आदींच्या कार्यालयांमध्ये नेऊन तेथील मान्यवर, कर्मचारी यांच्याबरोबरच्या गप्पात सहभागी करीत. आमच्यातला काहीसा खेडुत न्यूनगंड काढून नागरी जीवनात आम्हाला आत्मविश्वासपूर्ण मोकळेपणाने वावरण्याचे जणू ट्रेनिंगच देणारा राजा. अधिकाधिक उंचीवरच्या आमच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोलाची भर घालणारा राजा.
Tags: राजा केळकर मधुकर पाटील raja kelkar madhukar patil weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या