Diwali_4 क्षणचित्रे : महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार : 2010
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

क्षणचित्रे : महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार : 2010

तरुणाईला सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील उपेक्षित घटकातील समाजाला विकासाची फळे चाखता यावीत, यासाठी धोरणे आखली पाहिजेत. भारताच्या आर्थिक विकास दराबद्दल बोलतो, तेव्हा वाढत असलेला विकासदर ‘इंडिया’चा असतो. तो भारताचा होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

1. समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार दिला गेला ते नागनाथअण्णा नायकवडी पुरस्कार वितरण समारंभाला व्यासपीठावर उपस्थित होते, पण त्यांचे भाषण त्यांचे चिरंजीव वैभव नायकवडी यांनी वाचून दाखवले. क्रांतिसिंह नाना पाटील व पत्रीसरकार या पार्श्वभूमीवर जडणघडण झालेले नागनाथअण्णा आता वयाच्या नव्वदीत आहेत. त्यांना पुरस्कार दिला जात असताना सभागृहातील जुने-जाणते प्रेक्षक-श्रोते रोमांचित झाले होते, अनेकांनी नागनाथअण्णा, रघुनाथ माशेलकर, अमोल पालेकर यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.

2. चंद्रकांत केळकर व सय्यदभाई यांना विशेष पुरस्कार दिले गेले तेव्हा ‘पर्यायी जग शक्य आहे’ ही मांडणी करणारे चंद्रकांत केळकर आणि हमीद दलवाई यांचे कार्य पुढे चालवणारे म्हणून सय्यदभाई या दोघांविषयी अनेक लोकांना विशेष कुतूहल वाटत होते.

3. रा.शं.दातार नाट्य पुरस्कार आशुतोष पोतदार आणि युवा कार्यकर्ता पुरस्कार नीलेश निमकरला देण्यात आला. हे दोघेही तरुण असल्याने त्यांचे अनेकांना विशेष कौतुक वाटत होते.

4. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांना त्यांनी गेल्या दीड वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात राबवलेल्या ‘सेव्ह द बेबी गर्ल, सेव्ह द नेशन’ या अभिनयासाठी लक्षवेधी प्रशासकीय कार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रशासकीय कार्यासाठी रक्कम स्वरूपात पुरस्कार स्वीकारता येत नाही, त्यामुळे लक्ष्मीकांत देशमुख यांना केवळ एक मोठे आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले, पण त्याच दिवशी कोल्हापूर शहरात कोल्हापूर महोत्सवाचा प्रारंभ होणार असल्याने श्री.देशमुख हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी येऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या वतीने श्रीमती देशमुख यांनी तो स्वीकारला. ‘सेव्ह द बेबी गर्ल’ अभियानाची पार्श्वभूमी सांगितली गेली तेव्हा उपस्थितांनी सर्वाधिक टाळ्या वाजवून या कल्पनेचे स्वागत केले.

5. एकूण 13 पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये एकही महिला नाही, याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या पुरस्कारांसाठी शिफारसी केल्या गेल्या तेव्हा त्यात काही महिलांची नावे होती आणि पुरस्कार निवड समितीवरही महिला होत्या, पण अंतिम निवडीत मात्र एकही महिला नव्हती हे एक न्यून राहिले खरे. जाणीवपूर्वक व व्यापक प्रयत्न करून महिलांचा समावेश अंतिम पुरस्कारार्थींमध्ये असेल असे पाहिले पाहिजे, अशा भावना काही जणांनी व्यक्त केल्या; त्यांच्याशी कोणीही पटकन सहमत होईल.

6. जी.के.ऐनापुरे, आनंद तेलतुंबडे, सय्यदभाई, डॉ.वि.ना.श्रीखंडे या चौघांनाही साहित्य : ग्रंथ पुरस्कार देण्यात आले, पण चौघांचीही मनोगते ऐकताना यांना कार्यकर्ता पुरस्कार दिला गेलाय की काय असा भास होत होता, इतक्या उत्कटतेने ते बोलत होते.

7. परिवर्तनवादी विचार व कार्याला बळ देण्यासाठी हे पुरस्कार आहेत अशी सुनील देशमुख यांनी पुरस्कारांमागची भूमिका स्पष्ट केली.

8. पुरस्कार वितरणाचे प्रमुख पाहुणे रघुनाथ माशेलकर म्हणाले, ‘‘तरुणाईला सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील उपेक्षित घटकातील समाजाला विकासाची फळे चाखता यावीत, यासाठी धोरणे आखली पाहिजेत. भारताच्या आर्थिक विकास दराबद्दल बोलतो, तेव्हा वाढत असलेला विकासदर ‘इंडिया’चा असतो. तो भारताचा होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.’’ तसेच दुसरे प्रमुख पाहुणे अमोल पालेकर म्हणाले, ‘‘समाजात छोटी पणती घेऊन काम करणाऱ्या लोकांना बघतो, तेव्हा अगदीच निराश होण्यासारखी परिस्थिती नाही, असा विश्वास वाटतो.’’

9. बालगंधर्वमधील समारंभाच्या आधी भीमसेन जोशी व यशवंत सोनावणे यांना आदरांजली वाहण्यात आली. सभागृहात प्रवेश करतानाच सर्व (जवळपास एक हजार) उपस्थितांना साधनाचा पुरस्कार विशेषांक भेट देण्यात आला.

Tags: महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार संपादकीय maharashtra foundation awards editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात