पन ठरोयलं आहे एक,
तं या कानानं ऐकावं.
न् या कानानं सोडावं,
ऐकावतच नही काही
तवा बोये घाली घेव्वा
दोन्ही कानांत.
सोल्डी पाच साल पह्यलेनच.
आसंच पलॅश्टर चालू होतं,
दुपारी माले न् बेगाऱ्यांन्लेबी
गह्यरी तल्लफ लागे चाहाची
तं मालकिनीले बोल्ला धाडा
चाहा चार-पाच कामावऱ्हे आसं
तं ते माऊली बोल्ली का मजुरीत
चाहा पाज्याचं तं काही ठरलं नही.
आन् लागली बाँ जाडं-मोठं बोल्याले.
मी तं जसा चोट्टा झालो मांगीसन.
बाहेर जाईसन चाहा तं पी आले
त्या रोजी मी थुकला मनात माह्यावऱ्हे
त्याच शेजी सोल्डी चाहा. हातात थापी आहे. आन् मी रोजीवऱ्हे उभा आहे... भाऊ
द्या यान्ले लागीन् तं...
0
बापाकून व्हयेना काम. माय तान्याची
घर एखली. आम्ही चाऱ्ही भाऊ, बहीन
मोठी. तिचं लगन करनं पडलं.
त्यानं झालं कर्ज. मग गावात भागेना. तवापासून आलो वैतागवाडीत
रेल्वेच्या बोग्द्याजोय्. आमच्या
टपऱ्याखालून गटार गेलेली मोठी.
आख्ख्या शहराचं पानी खय-खय कायं
वहात जाये तिच्यातून. त्या वासानं
घान्या मरी गेल्या नाकाच्या लहानपनी.
आता सुवास काय नि दुर्गंध काय. सारखंच. 0
पन् पाय धुवून पानी प्यावं रोज
असा मोठा भाऊ आहे माह्यावाला.
त्यानंच तं खरं पोसलं आमाला.
शिकाड्याचीबी गन कोशीत केली तेनं
पन आमचं नही चाललं डोकं.
तो सोता कामाले जाये कंपनीत, तढी
त्याले जड हमाली कामं करने पडत.
म्हणून माय तेले चांगलं-चांगलं दे डब्यात. आंडे-पोया-बिया आसं पौष्टिक
तिले वाटे ते- तं भाऊ आमले भावान्ले
शाळेत जातांना बोगद्या जोय्च गाठे
त्याच्या डब्यातलं आमच्या डब्यात टाके
आन् आमची तीखं-भाकर तो घी जाये कामावऱ्हे!
0
मंग मी माह्या-माह्याच शेजारच्या हटकर मामाबरोबर
जायाले लागला शेंट्रींग कामावऱ्हे,
तवा तं घन बी उचलाये ना.
बोटांन्ल छिन्नी लागे आसारी तोडताना ठिनगी उडे ती... तवा मजा वाटे. हूक वयताना
नरम चार-आणी आसारीचे. पह्यले-पह्यले-
रिंगा शिकला, बेंड कुठे मारता सलाप मधी
आसारी कशी पसारता... कोन्ही शिकाल्डं नही काही.
बेगारी करून शिकला. पुढे हटकर मामाशी वाजलं.
म्हणजे मनोमन नुसता वापरी घेतो म्हणून. मंग
सफा मिस्तरीच्या गँगमधी घुसला.. सालभरात
ईट-काम, पलॅश्टर, फुटिंगा भरल्या कधी पाया खोदाईचे खड्डे बी घे उक्त्यानं... आसं करता-करता
शेंट्रींगच घेतलं सोताचं. गँग बांधली. आता
आपले चार ठिकानी कामं चालू आहे शहरात.
घामाचे पैशे मांगतो आपन. ठरोयेल मधे हा नही
केलं कोनं का माथं सटकतं आपलंवालं. मंग आपन
मालक पहात नाही का इंजनेर... अशीन तुह्या घरी!
याच्यानं सामनेवाला त टरकतोच आपल्याले आनि
टरक्यालेबी पाह्यजेच या धंद्यात.
0
हाँ, आझूनबी एकंदरीतच आहे चाऱ्ही भावांचं खटलं.
एकच रेशनकार्ड, बारा जनाईचं एक-गठ्ठा मतदान.
...माय-बाबा गेले. मांघल्ल्यासालीच. दहा-पोते लागतं अनाज
खटल्याले सालाचं. खायाले कमी नही करता आपू काही.
बहिनीचे दोन्ही पोरं बी आमीच शिकाडले. मोठा
याले लागला कामांवऱ्हे. ईन एखाद्या दिशी तं इचारजा
त्याले, तुह्या बापानं तुले आजून चड्डी तरी घेल आहे का?
0
मंग बांधलं ना घरबी बांधलं. तवढं झोपडं का पुरे पडे,
पोरवाडा वाढला तसा रेल-पटरी जोय्चा पलाट
बांधी घेतला. आता तीन्ही बाया त्यांची पोऱ्हं... सुना
भांड्याला भांडं लागतंच म्हना, त्यात आमच्या
खटल्यात तीन नंबरची वाह्याद् आहे जराक.
आनं हे नवी पिढी लगेच त् माह्यं-माह्यं- तुह्यं-तुह्यं
मांगे एक डाव तं वाटणीच झाली होती.
सगळं अनाज, दायी-सायी अलग-अलग केलं होतं मोठ्यानं.
सोताच्या हातून. आमी कामाहून येता नही तवढ्यात
अनाजपासून सुईलोंग चार-चार भाग करी टाकले
होते त्यानं. मोड खोकला त्याच्या मायचा एकदा...
0
संध्याकायी आमी तीन्ही भाऊ
आले घरी कामाहून तं घरात हे सन्नाटा. माह्य लगन व्हयाले साल तं झालं. मंग
मीच बोललो भावाले, तुमी आमाले लहानाचं
मोठं केलं. तसे तुचेही मुलं मोठे झाले एकमेकाईच्या
अंगा-खांद्यावर... दोन-दोन, तीन-तीन माया
त्यांना मियाल्या. त्यांचं दुखनं-खुपनं, गू-मूत काढलं. पन माह्या पोरानं तं आजून
दुनियाबी पाहली नही. ते त्याच्या मायच्या
पोटातच आहे. येनाऱ्या त्यानं/तिनं आसं
कोन्तं पाप केलं का त्यांच्या जल्मा-आधीच
मोठी माय, मधली माय् झाल्या शेजारनी-पाजारनी.
माले तं हिर्दिकच दाटून आला.... सगळी लड-बोंबल
झाली. कोगाट झाला पोऱ्हं-बायांचा.
0
तं आसे आमी आन्खी एकंदर झाले.
आरे उभं कऱ्याले कितले कष्ट पडले.
मोड्याले काय एक घाव-दोन तुकडे.
0
माही बी बायको माले
राती काही-माही सांगते.
कान भरते माह्येवाले.
पन ठरोयलं आहे एक,
तं या कानानं ऐकावं.
न् या कानानं सोडावं,
ऐकावतच नही काही
तवा बोये घाली घेव्वा
दोन्ही कानांत.
जर टिकाड्याचं अशीन
खटलं एकंदर
तं काही चुकलं का
माह्यवालं?
Tags: महेंद्र पाटील भाकर शाळा पौष्टिक हमाली Mahendra Patil टॅग- कंपनी Bread School Nutrition Carrier Company weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या