डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मंगलेशींची मला आणखी एक अत्यंत आवडणारी कविता आहे- पंचम. या कवितेतल्या कथेत अब्दुल करीम खाँसाहेबांचा शिष्य त्यांना म्हणतो- ‘‘गुरुजी, सातही सूरांवर, तिन्ही सप्तकांवर आपली संपूर्ण हुकूमत आहे. हे कसे साध्य होते?’’ यावर खाँसाहेब उदास स्वरात म्हणतात- ‘‘अरे बेटा, आता कुठे पंचमाचं थोडंफार आकलन होतंय.’’ ही ऐकीव कथा वाचकांना सांगून मंगलेशजी कवितेच्या अखेरीस लिहितात- ‘ही कथा ऐकल्यापासून जेव्हाही मी कविता लिहिण्यासाठी लेखणी हाती घेतो, तेव्हा क्षणभर हात थबकतो- लिहिण्यापूर्वी.’ एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की, ‘तुमच्या कुठल्या कवितांविषयी तुम्ही समाधानी आहात?’ यावर त्यांचे उत्तर होतं, ‘‘एकाही नाही. सगळ्याच कविता पुन्हा लिहून काढाव्यात असं वाटतं.’’

कुछ शब्द चीखते है
कुछ कपडे उतार कर 
घुस जाते हैं इतिहास में
कुछ हो जाते हैं खामोश...

नऊ डिसेंबरला सकाळपासूनच वातावरण कुंद होते. अत्यंत निरुत्साही. ऑडेनने येट्‌सच्या स्मृत्यर्थ लिहिलेल्या कवितेत आहे त्याप्रमाणे. आजचा दिवसच वाईट आहे, याविषयी साऱ्या उपकरणांचं एकमत झालं असावं. आणि संध्याकाळी ती बातमी कळली- प्रिय कवी मंगलेश डबराल यांनी अखेरचा श्वास घेतल्याची. हे अनपेक्षित नव्हते. त्यांचे निकटचे मित्र असद झैदी यांच्या फेसबुकवरील पोस्ट वाचून मंगलेशजींची प्रकृती चिंताजनक असल्याचे आणि शरीराचे जटिल यंत्र अटळ, ठाम निर्धाराने अंताच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे जाणवत होते. एका लेखात वाचले की, सारं संपण्यापूर्वी मंगलेशजी म्हणत होते, ‘मी थकलोय. घरी जाऊ या.’

त्यांच्या कवितेचा प्रथम परिचय झाला सहा-सात वर्षांपूर्वी एका मराठी नियतकालिकात त्यांच्या ‘अच्छाई का पाठ’ या कवितेच्या अनुवादातून. या साध्या-सरळ कवितेचा आशय मनाला थेट भिडला. नंतर त्यांच्या कविता-कोशवरील कविता वाचल्या. विशेष आवडल्या त्या संगीतविषयक कविता. नंतर त्यांचे सर्व काव्यसंग्रह, ‘घर का रास्ता’ वगळता, वाचून काढले. एका नव्या, तरल विश्वाशी ओळख झाल्याची जाणीव झाली. प्रकर्षाने जाणवलं की- चांगली कविता आपल्याला माहीत असते तेच सांगते, मात्र त्या वेळी आत जे उतरतं ते साक्षात्कारी असतं. अमिट असतं.

त्यांच्याशी तीन-चार वेळा फोनवर बोललो होतो. एकूण बोलणे सात-आठ मिनिटांपेक्षा जास्त झाले नसणार. प्रत्येक संभाषणावेळी जाणवला तो त्यांचा सौम्य, ऋजू स्वर- ऐकून खूप बरं, आश्वस्त वाटणारा. त्यांच्या बऱ्याच कवितांतून ऐकू येणारा. राजकीय आशय असणाऱ्या त्यांच्या कवितांतून मात्र ऐकू येतो त्यांचा ठाम, कणखर आणि कधी कधी घणाघाती स्वर... पण नेहमीच संयत असणारा.

मंगलेशजींशी पहिल्यांदा फोनवर बोललो ते त्यांची ‘राग मारवा’ ही कविता वाचून. अगदीच न राहवून. रागांविषयी सात-आठ कविता मी लिहिल्या आहेत, असे ते म्हणाले. त्यांची प्रसिद्ध कविता ‘संगतकार’ जी मी तोवर वाचली नव्हती, ‘वाचा’ म्हणाले. राग मारवा ही एक अप्रतिम कविता आहे. उस्ताद अमीर खाँ आणि पन्नालाल घोष यांच्या गायन-वादनाला स्मरून लिहिलेली. मंगलेशजी लिहितात- ‘कुठल्याशा दूरवरच्या, अज्ञात वस्तीच्या दिशेकडून येतायत मारव्याचे सूर. एकांतात अमीर खाँच्या कंठातून स्रवणारे. 

पन्नालाल घोष यांच्या लांबलचक बासरीतून पाझरणारे. आसमंतातील एकही वस्तू अस्पर्श न ठेवणारे. ज्याला स्पर्श केला, त्याचा आकार धारण करणारे. सावकाश साऱ्या आलापांचे अद्वैत साधणारे. या सुरात एक भाषा तडफडतेय शब्दांचा शोध घेत. या सुरात माधुर्य आहे का औदासीन्य- हे ठरतं तुम्ही त्यात शोध कशाचा घेताय, यावरून. तिन्हीसांजेला हा राग आळवतात. तेव्हा लयाला जाणारा दिवस आणि येऊ घातलेली रात्र यांची भेट होते. काही काळ हा असतो अंत आणि आरंभ या दरम्यानचा धूसर प्रदेश. जन्म आणि मृत्यूची भेट होते ते ठिकाण. त्या वेळी दिसतात प्रकाश आणि अंधकाराचे ओळखू न येणारे चेहरे. दिसतो डोळ्यांआड होणारा एक असहाय हात, घरंगळून खाली पडण्याआधी थबकलेला एक अश्रू. या रागाच्या सुरांना एक ठरावीक आकार कवेत घेईल, हे संभवत नाही. हे सूर विरघळत जातात आणि एकरूप होतात दुसऱ्या रागाच्या सूरांशी. सोपं नाही या रागाची उपज आणि विस्तार करणं. या रागाचे श्रोत्यांना यथार्थ दर्शन घडवण्यासाठी कलावंताच्या अंतरंगात असावी लागते बेचैनी, एक प्रकारचे वैराग्य. हे सूर थरथरतात आपल्याच मंद, संथ प्रकाशात.’

मंगलेशींची मला आणखी एक अत्यंत आवडणारी कविता आहे- पंचम. या कवितेतल्या कथेत अब्दुल करीम खाँसाहेबांचा शिष्य त्यांना म्हणतो- ‘‘गुरुजी, सातही सूरांवर, तिन्ही सप्तकांवर आपली संपूर्ण हुकूमत आहे. हे कसे साध्य होते?’’ यावर खाँसाहेब उदास स्वरात म्हणतात- ‘‘अरे बेटा, आता कुठे पंचमाचं थोडंफार आकलन होतंय.’’ ही ऐकीव कथा वाचकांना सांगून मंगलेशजी कवितेच्या अखेरीस लिहितात- ‘ही कथा ऐकल्यापासून जेव्हाही मी कविता लिहिण्यासाठी लेखणी हाती घेतो, तेव्हा क्षणभर हात थबकतो- लिहिण्यापूर्वी.’ एका मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की, ‘तुमच्या कुठल्या कवितांविषयी तुम्ही समाधानी आहात?’ यावर त्यांचे उत्तर होतं, ‘‘एकाही नाही. सगळ्याच कविता पुन्हा लिहून काढाव्यात असं वाटतं.’’ एवढा मोठा कवी तरीही किंवा म्हणूनच, नेमकं जे सांगायचं आहे ते शब्दांत व्यक्त करता आलंय का, याविषयी साशंक असणारा. त्यांच्या ‘अंतिम प्रारूप’ या कवितेची सुरुवात अशी आहे- ‘इस कविता का अंतिम प्रारूप वह नहीं है जो इस का पहला प्रारूप था.’ रंडेल जुरेल या कविमित्राविषयी रॉबर्ट लॉवल लिहितो, ‘यू डिड नॉट राइट. यू रिरोट.’ शब्दांच्या- रचनेच्या परिपूर्णतेविषयीची असोशी, अस्वस्थता जागरूक- संवेदनशील कवीला किती क्लेश देत असते, याची ही उदाहरणे. इथे आठवते चेस्लॉ मिलॉशच्या कवितेतील ही ओळ- मनाच्या संभ्रमावस्थेत जन्म होतो कवितेचा आणि कविता कबुलीजबाब देते आपल्यातील वैगुण्यांचा, उणिवांचा.

मंगलेशजींच्या ‘शहनाईयों के बारे में बिस्मिल्ला खाँ’ या कवितेत या महान शहनाईवादकाचं निरागस, संगीतात चिंब भिजलेलं, बनारसच्या मातीची अनावर ओढ असलेलं, ‘इस्लामला संगीत निषिद्ध असेल तर पन्नासेक उस्ताद निपजलेच कसे?’ असा रोखठोक सवाल विचारणारं, झपाट्याने बदलत चाललेल्या बनारसला पाहून खिन्न होणारं रूप दिसतं. त्यांच्या ‘क्षणिका’ ही त्यांच्या इतर कवितांप्रमाणे साक्षात्कारी आहेत. शब्दरूप मिळालेल्या क्षणाला, अनुभवाला लख्ख उजळवणाऱ्या. शब्दांची महती आणि तोकडेपणाकडे लक्ष वेधणाऱ्या. शरीर आणि मनाच्या द्वैतामुळे होणाऱ्या मानसिक ओढाताणीवर भाष्य करणाऱ्या. सत्य आणि भ्रम यातील द्वंद्व अधोरेखित करणाऱ्या. त्यांची ‘थरथर’ही क्षणिका वाचून विंदा करंदीकरांच्या ‘माथेरान- एक आभास’ या कवितेची आठवण होते. या दोन्हींत शरीराला कड्याच्या दिशेनं बोलावणारं असं काही आहे- संगीत किंवा मातीचे खुणावणे, अटळ तसंच भयावहही.

‘उपकथन’ या पुस्तकात मंगलेशजींच्या मुलाखती संकलित केल्या आहेत. या मुलाखतींतून घडतं एका प्रांजळ, विनम्र कवी-लेखकाचे मनोज्ञ दर्शन. एका मुलाखतीत ते आपल्या वडिलांची एक आठवण सांगतात. त्यांनी आपला काव्यसंग्रह ‘घर का रास्ता’ वडिलांना अर्पण केला. यावर वडिलांची प्रतिक्रिया होती- ‘उस ने ये किताब लिखी और घर का रास्ता भूल गया.’ मंगलेशजींना ही आठवण का सांगावी वाटली असेल? त्यांनी वडिलांविषयी अनेक कवितांतून लिहिलं आहे. त्यांचे वडील गायचे छान.  ‘राग दुर्गा’ या कवितेत मंगलेशजी लिहितात- ‘शेजारच्या खोलीत गात होते तरुण वयातले माझे वडील. आळवत होते दुर्गा रागातील बंदिश- सखी मोरी रुमझुम आणि सांगत होते- गवत, पिकं झपाट्याने मोठी होतात या रागाचे स्वर ऐकून. पिता-पुत्राचं नातंच वेगळं असतं. क्वचितच व्यक्त होणारं. सहसा अव्यक्तच राहणारं. व्यक्त झालं तरी कडवट स्वर लागण्याची शक्यता अधिक असलेलं.’ पिता का चश्मा या कवितेत मंगलेशजी लिहितात- ‘वडिलांची दृष्टी जवळपास निकामी झाली होती. कुठल्याच उपचारांचा उपयोग होणार नव्हता. त्यांचा अंतकाळ निकट आला होता. तेव्हा मी घरी गेलो, तर वडील म्हणाले- आता मला हे जग सोडताना कुठलं दुःख नाही. तू जरी घराकडे फार कमी लक्ष दिलंस तरी घरातल्या माणसांनी मात्र माझी व्यवस्थित काळजी घेतली. एक इच्छा मात्र पूर्ण झाली नाही- फुटपाथवर विकायला ठेवलेला आणि ज्याने मला व्यवस्थित दिसू शकले असते असा चश्मा वापरण्याची.’ असं हे नातं. सहसा सल, उणीव व्यक्त करणारं. ओऱ्हान पामुकने वडिलांविषयी लिहिलेल्या लेखाच्या अखेरीस तो म्हणतो- ‘आपल्या मृत्यूची सुरुवात आपल्या पित्याच्या मृत्यूपासून होते.’ वडिलांविषयी मुलाखतीत, कवितेत आठवणी सांगत असताना पामुक म्हणतो तसं काही मंगलेशजींच्या मनात असेल का?

एका मुलाखतीत मंगलेशजी म्हणाले होते- ‘स्मृती का कोई अतीत नहीं होता.’ आपलं गाव आणि तो पहाडी प्रदेश सोडून शहरात येताना मंगलेशजी सोबत घेऊन आले होते आठ-नऊ कविता. पहाड आणि एकंदरीतच काफलपानीचा तो सारा आसमंत, नातीगोती यापासून तुटल्याची ठसठसती वेदना त्यांच्या अनेक कवितांतून व्यक्त झाली आहे. या वेदनेवरचा उतारा म्हणून मंगलेशजींनी आठवणींना भूतकाळाऐवजी वर्तमानात वस्तीला आणलं असेल का? अर्थात आयुष्यात काळाची सरमिसळ अपरिहार्य असते आणि यालाही जबाबदार असते बेभरवशाची स्मृतीच.

प्रत्येक मोठा कवी ज्या भाषेत लिखाण करतो, त्या भाषेच्या व्याकरणात भर घालत असतो. मंगलेशजींनीही हे केलंय. आता ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. ‘ऑन दी डेथ ऑफ ए पोएट’ या कवितेत मिलॉश म्हणतो- ‘तो पाठमोरा, दृष्टिआड झाला आणि लगोलग बंद झाली व्याकरणाची प्रवेशद्वारे. आता त्याचा शोध घ्यावा लागेल शब्दकोशांच्या घनदाट रायांत, निबिड अरण्यात...’

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके