डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आपणांबाहेरी । न लगे ठाव धुंडावा

या लेखाचे आता औचित्य काय असा प्रश्न पडू शकतो कारण आपण उत्सवप्रिय आहोत. त्यामुळे वयाची पन्नास वर्षे झाली की आपण ‘सुवर्ण महोत्सव’ म्हणतो, साठीला ‘हीरक महोत्सव’ म्हणतो, पंचाहत्तरीला ‘अमृत महोत्सव’ म्हणतो. मिलिंदसर येत्या 1 मे रोजी वयाची 62 वर्षे पूर्ण करतील म्हणजेच रूढ अर्थाने हे उत्सवी वर्ष नाही. पण त्यांचे हीरक महोत्सवी वर्ष कोरोनाने झाकोळले होते आणि तेव्हा कोणीच उत्सवाच्या मानसिकतेत नव्हते. पण आता ‘न्यू नॉर्मल’ सुरू झाल्यावर अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ व जाणत्या व्यक्ती प्रतिपादन करत आहेत की आयुष्यातील मागची दोन वर्षे वजा करा. त्या न्यायाने हे वर्ष मिलिंदसरांचे ‘हीरक महोत्सवी’ वर्ष ठरते.

जन्माला आलेला प्रत्येक माणूस आणि त्याच्या आयुष्याचा पट वेगळा असतो. माणसाच्या आयुष्यात अनेक चढउतार, वेगवेगळी वळणे येत असतात. तसेच जन्मदात्या आईपासून ते सरणावर चढवणाऱ्या माणसापर्यंत त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी माणसे येत असतात. आपले नातेवाईक-आप्तस्वकीय यांचे असणे जन्माधिष्ठित असते, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने येणारी माणसे आणि त्यांच्याशी असलेले संबंध औपचारिक असतात, मित्रांचे आयुष्यातील स्थान वेगळेच असते, काही माणसे आपल्या आयुष्यात असतात; पण आपण त्यांच्या आयुष्यात नसतो. उदा; आवडता अभिनेता/अभिनेत्री, कलावंत, लेखक, राजकीय-सामाजिक आदर्श इत्यादी, पण आपला त्यांच्याशी अमूर्त/आत्मीय पातळीवर संवाद चालू असतो. पण काही माणसे एखद्या सामान्य वाटाव्या अशा घटनेने किंवा योगायोगाने आयुष्यात येतात आणि आपलं आयुष्य आपल्या नकळत समृद्ध करून टाकतात. अशी माणसे आपल्या आयुष्यात असणे हा परम भाग्याचा आणि आपल्या वर्तुळातील इतरांसाठी कुतूहलमिश्रित आदराचा विषय असतो.

प्रचंड बुद्धिमत्ता, बहुआयामी व्यासंग, पराकोटीची मूल्यनिष्ठा, कमालीची प्रसिद्धिपराङ्‌मुखता, मितभाषीपणा आणि ‘माणसा’विषयी असलेली अविरत तळमळ या सर्व गुणांचा समुच्चय म्हणजे जेष्ठ साहित्यिक, समाज संशोधक मिलिंद बोकील.

‘शाळा’ कादंबरीच्या निमित्ताने मी प्रथम मिलिंद बोकील यांच्या आयुष्यात शिरलो आणि नंतर आमचा ऋणानुबंध इतका जुळला की त्यांनी माझ्या आयुष्याचा एक कोपरा व्यापून ठेवला आहे. वय, अनुभव, समज या सर्वच बाबतींत मी त्यांच्या समोर न्यून असल्याने त्यांना माझ्याकडून मिळण्यासारखे काही नव्हतेच; त्यामुळे त्यांचा माझ्याबद्दलचा निर्व्याज जिव्हाळा आणि मी त्यांचा मनापासून करत असलेला आदर याशिवाय या ‘एका तपा’च्या ऋणानुबंधाला दुसरा आयाम नाही.

ललित, वैचारिक, सामाजिक संशोधन, व्यक्तिचित्रण, समाजचित्रण, संपादन, सहलेखन अशा सर्व ‘ढंगां’च्या साहित्यात सकस निर्मिती करणारे त्यांच्यासारखे साहित्यिक फारच थोडे आहेत. पुन्हा केवळ साहित्यिक अशी त्यांची ओळखसुद्धा अपूर्णच ठरते. जीवनाला विविध अंगांनी उत्स्फूर्तपणे व उत्कटपणे कसे भिडावे हे त्यांच्याकडून शिकावे.

त्यांनी इलेक्ट्रॉनिक व रेडियो इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला आहे, मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्रात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे, पुणे विद्यापीठातून पीएचडी केलेली आहे, होमियोपॅथी मेडिसिनचा डिप्लोमा केलेला आहे आणि एखाद्या रुग्णावर उपचार करता येतील इतपत प्रावीण्य त्यात मिळवलेले आहे. हे बहुतांश लोकांना माहीत असण्याची शक्यता कमीच; कारण आत्मप्रौढी, आत्मस्तुती यांपासून हा माणूस कोसो दूर आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनादिनी आणि स्थापनावर्षात त्यांचा जन्म झाला. 1975-1977 हा आणीबाणीचा आणि पर्यायाने भारतीय राजकारण समाजकारणातील उलथापालथ व घुसळण यांचा काळ. हा मिलिंद सरांच्या पौगंडावस्थेचा काळ. त्यामुळे त्यांचे जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात ओढले जाणे आणि त्यांनी ‘छात्र युवा संघर्ष वाहिनी’चे कार्य करणे स्वाभाविक होते. आणीबाणीनंतरच्या ‘जनता सरकार’मुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे बरेच लोक पुन्हा आपापल्या कामधंद्याला लागले, काहींनी पुन्हा काँग्रेसशरण  होण्यात धन्यता मानली, काहींना जनसंघाची उजव्या राजकारणाची वाट हितकारक वाटली, काहींनी डाव्या पक्षांची वाट धरली, काहींनी समाजवादाची कास धरून समाजकार्यात/समाजसेवेला  स्वत:ला वाहून घेतले, काहींनी 'Das Capital' ला प्रमाण मानून क्रांतीची वाट धरली. फारच थोड्या लोकांनी भ्रमनिरास करून न घेता आणि कोणताही ‘इझम’ कवटाळून न घेता मूलभूत संशोधन, वस्तुनिष्ठ अभ्यास, परस्पर सहकार्य, सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन, लोकसहभागातून लोकशाही मूल्यांना/प्रक्रियेला अधिक तावून सुलाखून सर्वसमावेशक विकासाचा मार्ग पत्करला; अशा ‘जाणत्या जनां’चे मिलिंद बोकील हे अग्रणी प्रतिनिधी.

तर वयाच्या पौगंडावस्थेतच ‘जाणत्या’ झालेल्या मिलिंद सरांनी रुळलेली वाट सोडली आणि वरील, त्या वेळी अवघड असलेली वाट निवडली. लक्षात घ्या की तो 1977 नंतरचा काळ आहे आणि त्या काळी ही वाट पकडणे म्हणजे जीवनातील अनिश्चितता स्वीकारणे. आज सामाजिक कार्याला वलय आहे, या ‘फील्ड’मधील नोकऱ्यांसाठी job
description  देताना तुमचा ‘सीटीसी’, भत्ते, सुट्‌ट्या, हुद्दा असे सर्व लिहिलेले असते. त्या काळी जेवणखाण आणि राहण्याची व्यवस्था इतके जरी ‘कमिट’ केले तरी ‘सोन्याहून पिवळे’ असे.  (प्रस्तुत लेखकाने मिलिंद सरांच्या वडिलांना ‘‘तुम्हांला त्यांचा हा निर्णय पचवायला जड गेला असेल ना? तुम्ही विरोध केला का?’’ असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांचे वडील म्हणाले की, आम्ही मध्यम वर्गीय होतो त्यामुळे आमचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यामुळे त्याला समजावून पाहिले. पण तो त्याच्या निर्णयावर ठाम आहे हे कळल्यावर आम्ही विरोध केला नाही. कारण आमचा त्याच्या क्षमतेवर विश्वास होता.) या धारणेतूनच प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या दृष्टीने प्रथम युसुफ मेहेर अली सेंटर आणि नगर जिल्ह्यात त्यांनी कार्य केले आणि त्या अनुभवाला मुंबई व पुणे विद्यापीठांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातून पुस्तकी ज्ञानाची व संशोधनांची जोड दिली.

आज जवळपास 35 वर्षे ते विविध व्यक्तिसमूहांवर, त्यांच्या प्रश्नांवर मूलभूत संशोधन आणि दिशादर्शन करत आहेत. त्यांच्या संशोधनाचा आवाका लातूरमधील भूकंपामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या महिला ते नेदरलँड्‌समधील स्वखुशीने देहविक्री करणाऱ्या महिला इतका प्रचंड आहे. त्यांचा ‘कातकरी : विकास की विस्थापन’ हा ग्रंथ कोकणातील कातकरी समाजाच्या मानववंशशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने मूलभूत दस्तऐवज मानला जातो. ज्यांना महाराष्ट्राच्या विविध व्यक्तिसमूहांपुढे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत आणि त्यांच्या जीवनमरणाचा संघर्ष कसा सुरू आहे याचे वस्तुनिष्ठ आकलन करून घ्यायचे आहे त्यांनी मिलिंद सरांचे ‘जनाचे अनुभव पुसता’ हे पुस्तक वाचावे. त्यांच्या लेखनाची मौज अशी की त्यांचे संशोधनात्मक ग्रंथसुद्धा एखादी गोष्ट वाचावी तसे वाटतात. प्रवाही भाषा, सखोल अभ्यास, सोपी मांडणी आणि पूर्वग्रहांना दूर ठेवत वस्तुनिष्ठ विश्लेषण करताना ज्यांच्याबद्दल आपण लिहितोय त्यांच्याबद्दल असलेली आपुलकी हे त्यामागील गमक असावे. ‘‘तुमच्या ‘जनाचे अनुभव पुसता’चे वर्गीकरण संशोधनात्मक ग्रंथ असे न करता ‘खऱ्या गोष्टींचे पुस्तक’ असे केले पाहिजे’’ असे मी त्यांना म्हणालो होतो आणि माझ्या या विधानाचे समर्थन करण्यासाठी त्यांच्याच ‘गोष्ट मेंढा गावाची’ आणि ‘कहाणी पाचगावची’ या संशोधनात्मक पुस्तकांना दिलेल्या शीर्षकांचा संदर्भ दिलेला होता. तेव्हा त्यांच्या नेहमीच्या शैलीत सूक्ष्मपणे हसून ‘‘तुला जे मनापासून योग्य वाटतं ते तू म्हण, ते तू लिही,’’असे ते म्हणाले होते.

त्यांच्या पुस्तकांची शीर्षके हा माझ्या कायम आकर्षणाचा विषय राहिला आहे. ते अंकशास्त्र वगैरे निश्चित मानत नसतील, पण त्यांच्या पुस्तकांच्या शीर्षकांत मला एक संगती दिसते. त्यांच्या कादंबऱ्यांची व लघु कादंबऱ्यांची शीर्षके एका शब्दाची असतात. उदा. शाळा, गवत्या, समुद्र, मार्ग, सरोवर, रणदुर्ग (हे पुस्तक एकच असलं तरी त्यात रण व दुर्ग अशा दोन दीर्घ कथा आहेत). त्यांच्या संशोधनात्मक लिखाणाचे शीर्षक तीन शब्दांचे असते आणि बहुतांश वेळा ते संतवांङ्‌मयातून आलेले असते. उदा., ‘जनाचे अनुभव पुसता’ (दासबोध), ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ (गीताई), उदक चालवावे युक्ती (तुकारामाचे अभंग). त्यांची प्रवासवर्णनात्मक पुस्तके दोन शब्दांची असतात (समुद्रापारचे समाज, समुद्रापारच्या संस्कृती). व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाला ज्ञानेश्वरीतील ओवीमधून दिलेले शीर्षक ‘चिद्‌गगनाचे भुवनदिवे’. त्यांचे कथासंग्रह दोनशब्दी शीर्षकाचे असतात. उदा. ‘उदकाचिया आर्ती’ (ज्ञानेश्वरी), झेन गार्डन. अपवाद म्हणजे नुकताच आलेला कथासंग्रह ‘पतंग’.

या शीर्षकांशी जोडलेली आठवण सांगावीशी वाटते. ही आठवण/किस्सा आजपर्यंत तीन लोकांनाच माहीत आहे आणि त्यातील एक आज हयात नाही. मिलिंद सरांचा स्वभाव बघता ते रागावणार नाहीत ह्याची खात्री असल्याने (‘हे लिहिणं आवश्यक होत का,’ असं ते विचारू शकतील.)  लिहीत आहे. त्यांची पहिली कथा ‘पुन्हा सूर्य, पुन्हा प्रकाश’ सन 1981 मध्ये ‘किर्लोस्कर’मध्ये छापून आली. तर त्यांचा पहिला कथासंग्रह ‘उदकाचिया आर्ती’ सन 1994 मध्ये मौज प्रकाशनने प्रकाशित केला. ही आठवण ‘उदकाचिया आर्ती’च्या संदर्भाने देत आहे.

कवी ग्रेस त्यांच्या अंतिम काळात पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर उपचार घेत असताना प्रस्तुत लेखकाला त्यांना भेटण्याचा योग आला. प्राथमिक बोलण्यानंतर ग्रेस यांनी विचारल्यामुळे ‘तुमचा नंबर मिलिंद बोकील यांनी दिला’ असे प्रस्तुत लेखकाने सांगताच ग्रेस यांनी मिलिंद सरांची चौकशी केली आणि त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मिलिंद सरांना ही गोष्ट कळताच आम्ही ग्रेस यांना आगाऊ कल्पना न देता भेटायचे ठरवले. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या व्ही.आय.पी. कक्ष क्रमांक 8 मध्ये ग्रेस पलंगावर पहुडलेले होते, केमोथेरपीमुळे जर्जर झालेला त्यांचा देह मिलिंद सरांना पाहताच अंगात वीज शिरावी तसा ताडकन उठला, काही काळ त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ग्रेस यांनी सद्‌गदित होऊन मिलिंद सरांचा हात एका हातात धरून ठेवला आणि दुसऱ्या हाताने त्यावर थोपटत हाताचे चुंबन घेतले आणि ग्रेस यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

मग सुरू झाला एक निखळ संवाद. ग्रेस यांचं एका मुक्त धबधब्याप्रमाणे कोसळणं आणि मिलिंद सरांचं शांत निर्झराप्रमाणे वाहणं. हे दोन्ही प्रकारचं पाणी वाहताना बघण्याचं, त्या पाण्याच्या स्पर्शाचं  भाग्य मला लाभलं. त्या संवादात ग्रेस यांनी किमान 10 वेळा उल्लेख केला तो ‘उदकाचिया आर्ती’ या शीर्षकाचा. ते म्हणाले, ‘ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांचे शब्द वापरलेत. बढिया!’ नंतर चहा आला. ग्रेस यांना चहाचा कप उचलणेसुद्धा जमत नव्हते. तेव्हा मिलिंद सरांनी क्षणाचाही विलंब न लावता चहाचा कप धरून त्यांच्या तोंडाला लावला. त्यांचा निरोप घेताना आम्हांला खूप जड गेलं, आयुष्यभर ज्याने साथ केली ते दुखः ग्रेस यांच्या डोळ्यांतपण दिसत होतं. ही आमची शेवटची भेट आहे हे आम्हां सर्वांनाच कळत होतं. त्यानंतर आठच दिवसांत ग्रेस गेले.

सदर लेखाचा उद्देश मिलिंद बोकील यांच्या लिखाणाची समीक्षा करणे हा नाही. पण त्यांच्या लिखाणातील काही संदर्भ घेऊन त्यांच्या निर्मितिमूल्यांचा/भूमिकेचा आढावा घेण्याचा आहे. सबब त्यांच्या ‘वाटा आणि मुक्काम’ या सहलेखन प्रकारातील पुस्तकातील पुढील परिच्छेदाचा संदर्भ देणे समयोचित ठरावे. 

‘‘तुम्ही जर लेखक असाल तर तुमची मनोभूमी ही लिंगभाव समानतेला अनुकूलच असते. तुम्ही तथाकथित नैतिकतेच्या किंवा परंपरांच्या जोखडाखालून किंवा सामाजिक पूर्वग्रहामधून स्त्री-पुरुष संबंधांकडे बघत नाही. लेखकाला लिंगभाव समानता शिकवावी लागत नाही. किंबहुना तो जे लिहितो त्यातूनच समाजात लिंगभाव समानतेची पायाभरणी होत असते.’’

या विवेचनाशी सर्वांनी सहमत असावे अशी खुद्द मिलिंद सरांचीदेखील अपेक्षा नसेल. ज्या प्रामाणिकपणे व सातत्याने त्यांनी लिंगभाव समानता, स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व, स्त्रीच्या आई, बहीण,पत्नी इ. नातेसंबंधांच्या पलीकडल्या जाणिवा यांचा उद्घोष व पाठपुरावा शांतपणे, ठामपणे (समुद्र, एकम, मार्ग, रणदुर्ग या कादंबऱ्यांमध्ये व कथांमध्ये) केला आहे; त्यातून त्यांची अढळ मूल्यनिष्ठा दिसून येते आणि समाजात या निकोप विचाराचे रोपण करण्याची तळमळ दिसून येते.

संशोधनात्मक लिखाणात ‘सध्या काय परिस्थिती आहे?’ याबद्दल विस्ताराने सांगताना ते अशी परिस्थिती का निर्माण झाली त्याचे वास्तववादी विश्लेषण करतात आणि ही परिस्थिती कशी बदलता येईल याचे दिशादर्शन करतात आणि या संपूर्ण प्रक्रियेत ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हे सूत्र कटाक्षाने पाळतात. तसेच कोणत्याही विवेचनाला पूर्वग्रहाची बाधा न झाल्यामुळे त्यांचे लिखाण केवळ वस्तुनिष्ठच नाही तर विश्वासार्हदेखील ठरते, आणि तटस्थता केवळ संशोधन प्रक्रियेत ठेवल्यामुळे संपूर्ण लिखाणाचे मानवीपण उत्कटपणे अबाधित राहते.

हीच भूमिका त्यांच्या कथा, कादंबऱ्या यांना लागू पडते. 1981 च्या पहिल्या कथेपासून ते आजपर्यंत ते ही भूमिका वठवत आले आहेत.

मिलिंद बोकील हा माणूस आणि मिलिंद बोकील हा लेखक यांच्यामध्ये अद्वैत आहे, त्यांच्यातलं माणूसपण त्यांच्या लेखनात उतरलं आहे त्यामुळे त्याला कसल्याच दांभिकतेचा स्पर्श झालेला नाही. लिंगभाव समानता हे त्यांच्या लेखनातील मुख्य सूत्र. लेखक आणि माणूस यांतील त्यांच्या अद्वैताचा पहिला प्रत्यय येतो तो त्यांच्या घरात शिरताना..!  त्यांच्या घराच्या पाटीवर पाहिलं नाव डॉ.नीता बोकील या त्यांच्या सुविद्य पत्नीचं आहे आणि हे केवळ प्रतीकात्मक नाही.

समाजशास्त्र शाखेचे काही विद्यार्थी 'Research Methodology' वर चर्चा करत असताना प्रस्तुत लेखक उपस्थित होता. तेव्हा त्यांना मार्गदर्शन करताना मिलिंद सर म्हणाले Research Methodology वस्तुनिष्ठ संशोधनासाठी आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर स्वत:ची निरीक्षण शक्ती आणि कॉमन सेन्स तितकाच महत्त्वाचा आहे. उदा., एखाद्या घरात स्त्रीचे स्थान काय आहे किंवा स्त्री-पुरुष समानतेची पातळी काय आहे ह्याचा अंदाज बांधायचा असेल तर एक साधे निरीक्षण करा. त्या घरातील स्त्री बाहेरून आली तर घरातला पुरुष लगेच उठून आपणहून तिला पाणी आणून देतो का?

मिलिंद सरांच्या साहित्याची समीक्षा करणे हा या लेखाचा हेतू नाही. पण काही निरीक्षणे नोंदवतो. त्यांच्या कथा वा लघु कादंबऱ्यांमध्ये घटनावैविध्य आणि पात्रबाहुल्य आढळत नाही. एखाद्या घाटदार नदीप्रमाणे त्या उगमापासून अंतापर्यंत पूररेषा निश्चित केल्याप्रमाणे प्रवाही असतात. ‘समुद्र’, ‘मार्ग’ यांमध्ये दोनच मध्यवर्ती पात्रे आहेत. ‘एकम’मध्ये तर एकच मध्यवर्ती पात्र आहे. परंतु त्यांच्या कादंबऱ्यांचा पैस इतका विशाल असतो की त्यातीत प्रत्येक पात्र ठाशीवपणे समोर उभे राहते आणि त्या पात्रांच्या भोवतीच्या घटना बेमालूमपणे कादंबरीच्या मुख्य आशयाला येऊन मिळतात.

ज्यांना कलात्मक-लालित्यपूर्ण आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी ‘उदकाचिया आर्ती’ आणि ‘झेन गार्डन’ हे कथासंग्रह वाचावेत. सजीव-निर्जीव यांतील अद्वैत मांडणारी ‘यंत्र’ ही कथा असो किंवा ‘प्रारंभ’ ही अणुयुद्धाच्या पार्श्भूमीवरची अस्सल विज्ञानकथा असो. या मोठ्या ‘कॅनव्हास’मध्ये आपल्याला काही ना काही गवसणार हे नक्की. त्यांच्या कथांतील पात्रे बहुतांश वेळा सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असणारे असतात. ज्यांना धरणग्रस्त, आदिवासी, धनगर, मच्छीमार, शेतकरी अशा विविध समूहांसमोरील समस्यांचे आकलन करून घ्यायचे असेल त्यांनी ‘जनाचे अनुभव पुसता’ वाचावे. ज्यांना (फारसे प्रसिद्ध नसलेल्या) सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांचे कार्य याविषयी जाणून घ्यायचे आहे  त्यांनी ‘कार्य आणि कार्यकर्ते’ वाचावे. ज्यांना लेखक म्हणून ‘बैठक’ पक्की करायची आहे त्यांनी लेखन, लेखनप्रक्रिया, निर्मितिमूल्ये यांविषयी गंभीर चिकित्सा व मीमांसा करणारे ‘वाटा आणि मुक्काम’ वाचावे, परदेशी संस्कृतींशी तोंडओळख करण्यासाठी ‘समुद्रापारचे समाज’, ‘समुद्रापारच्या संस्कुती’ वाचावे. आणीबाणीदरम्यान वादग्रस्त ठरलेले व नरहर कुरुंदकर यांच्यासारख्या अस्सल विचारवंताने टीका केलेले विनोबा हे गूढ व्यक्तिमत्व. त्यांचे समग्र विचार एकाच ठिकाणी जाणून घ्यायचे असतील तर ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ वाचावे. सहभागी लोकशाहीची यशोगाथा जाणून घ्यायची  असेल आणि सध्याच्या राजकारण-समाजकारण यांमुळे येणारी निराशा झटकायची असेल तर ‘गोष्ट मेंढा गावाची’, ‘कहाणी पाचगावची’, ‘मेळघाट शोध स्वराज्याचा’ ही प्रवाही भाषेत संशोधनात्मक लिखाण कसे करावे याचा वस्तुपाठ घालून देणारी ‘त्रिधारा’ वाचावी. स्त्री-पुरुष समानता आणि पर्यायाने निकोप समाजाच्या रचनेचे सूचन करणारी ‘समुद्र’, ‘एकम’, ‘रणदुर्ग’ वाचणे आवश्यक बाब ठरेल. ‘समुद्र’ ही खऱ्या अर्थाने भास्करच्या आत्मभानाची कथा आहे, हे ज्यांना समजेल त्यांना त्याचे आकलन अधिक चांगल्या प्रकारे होईल. ‘एकम’मधील काही वाक्ये वाचून आपण थबकतो, डोळे मिटून विचार करतो आणि मग पुढे जातो. पण ती वाक्ये डोक्यात घोळत राहतात. उदा., ‘नवरा तसा परकाच गं! लग्न झालंय म्हणून आपलं नवराबायकोचं नातं कृत्रिम असेल देवकी; पण स्त्री-पुरुषाचे नाही.’ मिलिंदसरांच्या आयुष्यातील व्यक्तींचे चित्रण वाचायचे असेल तर काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेले ‘चिद्‌गगनाचे भुवनदिवे’ वाचनीय ठरते.

‘शाळा’ आणि ‘गवत्या’ यांना टाळून त्यांच्या लेखनाबद्दल लिहिता येणे शक्यच नाही. या दोन्ही कादंबऱ्या प्रस्तुत लेखकाच्या मनाजवळच्या आहेत. ‘शाळा’ वाचून प्रस्तुत लेखक झपाटून गेला आणि दोन-तीन दिवस तो त्या विश्वातून बाहेर येऊ शकला नाही. याच झपाटलेपणातून त्याने मिलिंद बोकिलांना पत्र लिहिले. हा सन 2010चा काळ आहे, जेव्हा इंटरनेटवर माहितीचा विस्फोट झालेला नव्हता. तरीही ‘नेटा’ने प्रयत्न करून सरांचा ईमेल आयडी शोधून त्यावर पत्ता विचारून पहिले पत्र पाठवले, काही दिवसांनी दुसरे पत्र पाठवले. ‘भेटायला ये,’ असा सरांचा मेसेज आल्यावर त्यांची भेट घेतली व ती आजतागायत होत आहे.

त्यामुळे ‘शाळे’शिवाय हा लेख अपूर्ण राहील. ‘पौगंडावस्थेतील मुलांच्या भावविश्वाचे वर्णन करणारी कादंबरी’ असे ‘शाळा’चे सर्रास केले जाणारे वर्णन हे खूपच वरवरचे व उथळ ठरते. ‘शाळा’ समाजप्रबोधन करत नाही अशी टीका काही समीक्षकांनी केलेली आहे. लक्षात घ्या, मिलिंदसरांना समाजप्रबोधन करायचे असते तर त्यांनी कादंबरी कशाला लिहिली असती? त्यांनी तसा ग्रंथ लिहिला नसता का? ‘शाळा’साठी त्यांनी प्रथमपुरुषी निवेदन हा ‘फॉर्म’ निवडला आहे आणि हे निवेदन नववीमधल्या मुलाचे आहे. नववीमधला मुलगा समाजप्रबोधन करू शकेल काय? असे असले तरी ‘शाळा’मधला मुकुंद त्याच्या आजूबाजूचा भवताल निखळपणे मांडतो आणि त्यात समाजकारण, राजकारण, मैत्री, प्रेम, सुख-दु:ख, गरीब-मध्यम वर्ग-श्रीमंत यांच्या घरातील परिस्थिती, ताणेबाणे, शिक्षणव्यवस्था, जाती व्यवस्था यांवर भाष्य करतो. यासाठी 'Reading between the lines'. (हेरंब ओक या तरुणाने याविषयी फारच अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. ते त्याच्या ब्लॉगवर वाचता येईल.) या कादंबरीत मुकुंद त्याच्या प्रेयसी ‘शिरोडकर’ चे नाव एकदाही घेत नाही. यावरदेखील काही समीक्षकांनी ‘हे मनाला पटत नाही’ असे लिहिले आहे. प्रस्तुत लेखकाने मिलिंद सरांना हा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘‘अरे, त्याला नाही गरज वाटत शिरोडकरचे नाव घेण्याची आणि तशी गरज निर्माण झाली असती तर त्याने तिचे नाव घेतलेही असते.’’

‘शाळा’ हा तुमचा स्वअनुभव आहे का असेदेखील मिलिंद सरांना अनेक जण विचारतात, त्यावर ते हसून उत्तर देण्याचे टाळतात. पण त्या निमित्ताने त्यांची भूमिका लक्षात घेण्यासारखी आहे. त्यांचे प्रतिपादन असे आहे की, लेखकाच्या लिखाणाचा त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संदर्भ जोडू नये आणि त्याच्या व्यक्तिगत आयुष्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करू नये. शाळा वाचणारा प्रत्येक माणूस 'nostalgic'  होऊन आपल्या शाळेत मनाने वावरून येतो हे त्या पुस्तकाचे यश आहे. ‘शाळा’ वाचून अनेक ‘मुकुंद’, ‘शिरोडकर’ यांनी एकमेकांचे संपर्क शोधून (लग्न मूल-बाळ झालं असतानादेखील) निखळ संवाद साधला आणि त्यांत निकोप नातं टिकून राहिलं. एका कलाकृतीच्या यशाची मोजपट्टी आणखी काय असू शकते?

‘शाळा’ आणि ‘गवत्या’ ही एक द्विधारा आहे असे प्रकर्षाने जाणवते. गवत्या हे शाळेचे उन्नत स्वरूप आहे. दोन्ही कादंबऱ्यांचा ‘फॉर्म’ प्रथमपुरुषी निवेदनाचा आहे. ‘शाळा’मध्ये ‘मुकुंद’ची भूमिका भोवतालाचे निरीक्षण करणे आणि नोंदवणे इतपत मर्यादित राहते. तर ‘गवत्या’मध्ये ‘आनंद’ निरीक्षणे नोंदवतो, त्याची आपल्या अनुभवाशी सांगड घालतो आणि काहीएक निष्कर्ष काढायचा प्रयत्न करतो. सृष्टीशी तादात्म्य पावताना आयुष्याचा अर्थ शोधण्याचा तो प्रयत्न करतो. आनंद-गुरुजी, आनंद-मार्टिन, आनंद-जानकी, आनंद-नागू आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आनंद आणि त्याच्या खिडकीतून दिसणारा गवताळ डोंगर (गवत्या) यांच्या संवादातून मिलिंद बोकील आपल्याला तत्त्वज्ञानाच्या निबिड अरण्यात प्रकाशवाटेने घेऊन जातात. ‘गवत्या’चा उद्देश कादंबरीच्या पहिल्याच पानावर स्पष्ट होतो. या पानावर सॉक्रेटीसचं वाक्य दिलेलं आहे. ‘ज्याचं परीक्षण केलेलं नाही ते जीवन जगण्यायोग्यच नाही.’

‘शाळा’चा शेवट दु:खान्त आहे तर गवत्याचा सुखान्त.  गवत्याच्या शेवटच्या पानावरील खालून चौथा परिच्छेद गवत्याचे सार आहे असे प्रस्तुत लेखकास वाटते. तो परिच्छेद असा-

‘‘समजतंय गवत्या, की आपली एक जिंदगी असते. या सभोवतालच्या भव्य सृष्टीत सामावलेली. आणि आपण तिच्याशी शांतपणे भिडायचं असतं. कुणाचाही राग न धरता. कुणाचाही हेवा न करता. सगळ्यांचं कल्याण होवो अशी इच्छा धरत. बाकी आपण काहीच करायचं नसतं. करणारे आपण असलो तरी. आपण नुसतं बघत राहायचं असतं गवत्या. आणि आपल्या भोवतीची परिस्थिती जे करते ते शांतपणे होऊ द्यायचं असतं. तिने दिलेले इशारे समजून घेत आणि तिच्या सुरावटीशी आपला सूर मिळवत.’’

इथे ‘जिंदगी’ हा शब्द वापरला आहे. जीवन, आयुष्य असे शब्ददेखील वापरता आले असते. पण ‘जिंदगी’ या शब्दाला विशिष्ट आयाम आहे, शब्दांत व्यक्त करता येणार अशी वेगळीच छटा आहे, सगळ्यांविषयी ममत्व बाळगून जगण्याला उत्कट करण्याचा भाव आहे. गवत्या ही कादंबरी ‘मैलाचा दगड’ ठरते.

मिलिंद सरांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी देणे येथे टाळतो आहे. कारण ते त्या बाबतीत कमालीचे तटस्थ (उदासीन नव्हे) आहेत. पुरस्कार मिळत नसताना तटस्थ ‘होणे’ वेगळे आणि ‘राष्ट्रपती कथा पुरस्कार’सारखे पुरस्कार मिळालेले असतानादेखील तटस्थ ‘असणे’ वेगळे. पुरस्कारांबाबत ‘तटस्थ’ राहणारे मिलिंद बोकील त्यांच्या साहित्यावर आधारित असलेल्या दृकश्राव्य आविष्कारांबाबत मात्र ‘इदम्‌ न मम’ या सूत्राप्रमाणे अलिप्त राहतात. ‘समुद्र’चे ऑडिओ व्हर्जन आले, पुढे त्यावर आलेल्या नाटकाचे 25-30 प्रयोग झाले. ‘शाळा’वर ‘ग म भ न’ हे नाटुकलं, ‘हमने जीना सीख लिया’ आणि राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारलेला ‘शाळा’  असे चित्रपट येऊन गेले. त्यावर प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ‘फेसबुक’वर ‘लाइक-डिसलाइक’च्या लढाया झाल्या. पण मिलिंदसरांनी कोणाचीही टीका वा स्तुती केलेली दिसले नाही. या बाबत त्यांची भूमिका अशी की पुस्तक वाचून प्रत्येकाच्या मनात प्रतिमा तयार होते आणि स्वत:च्या आकलनाअनुसार त्याची कलाकृती बनते. ‘‘माझं काम पुस्तक लिहिण्याचं आहे आणि ते पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे त्या पुस्तकावर आधारित कलाकृतीच्या यशाचे श्रेय हे संबंधित दिग्दर्शक-कलाकारांचे आहे आणि अपश्रेयदेखील त्यांचेच आहे.’’

प्रस्तुत लेखकाने सरांची आणि त्यांच्या साहित्याची विविध रूपे अनुभवली आहेत. कधी वादळात भरकटणाऱ्या गलबताला दिशा दाखवणारे दीपगृह, कुंद आभाळात अचानक दिसणारे इंद्रधनुष्य, तृष्णेने जीव व्याकूळ झालेला असताना दिसणारा निर्मळ झरा, दिग्मूढ झालेलं असताना दिसणारी बाणाची खूण, आधार देणारी आणि पाठीस मऊसुद्धा वाटणारी शिळा, विभ्रमातून वास्तवात आणणारी हलकेच टोचलेली टाचणी, एखाद्या मंदिरात शांतपणे तेवत असलेला नंदादीप आणि शब्दांत सांगता न येणारं सर्व काही.

मिलिंद सरांना वाढदिवसाच्या मनापासून अनंत शुभेच्छा!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके