डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्याची ताई

इकडे मालतीताई आपल्या लहान मुलांसह वाड्याच्या वसतिगृहात राहत असत. आश्रमातील मुलांबरोबरच त्यांचीही मुले वाढत होती. श्रमनिष्ठा हे राऊत दांपत्यांचे वैभव! मग मुले तरी कशी वेगळी होणार? ताईंनी स्वतः मेहनत करून भाजीपाला, फळ फळावळ लावणे, घरांच्या भिंती बांधणे, सारविणे, अंगण तयार करणे, आईच्या मायेने आदिवासी मुलांची देखभाल करणे, त्यांना संस्कार देणे ही कामे केली व आजही करत आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी उच्च शिक्षित, मोठमोठ्या पदांवर आहेत, पण ते ताईंची ओळख विसरलेले नाहीत.

मालतीताई राऊत - एक ऋजु व्यक्तिमत्त्व

समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडेल असे काही नाही- शरीरयष्टी किरकोळ, उंची जेमतेम चार-साडेचार फूट, डोळ्यांना चष्मा, त्यातून लकाकणारे डोळे, अंगावर सफेद खादी साडी, खांद्यावर कागद पत्रांनी भरलेली कातडी पिशवी, चालणे मात्र झपझप! जणू काही ठरविलेले काम वेळेवर व्हावे यासाठीच! चेहरा चारचौघींसारखाच. आवाज मात्र मायेने ओथंबलेला. तोंडातून बाहेर पडणारा शब्द समोरच्या ऐकणाऱ्याच्या हृदयाला हातच घालील इतकी भाषा आर्जवी! त्या वेळी वाटते की, ही व्यक्ती आपलीही कुणीतरी आहे.

रस्त्यावरून जाताना एका दमात घरी येणे शक्यच नाही. कुठला तरी उत्तम पोषाखाचा तरुण चरणस्पर्श करतो आहे. तर पुढच्या चार पावलांवर कुणी नम्रतेने प्रणाम करतो तर कुणाचे तरी कुशल त्या व्यक्तीला थांबवून विचारले जाते. कामाची चौकशी होते तर एखादा बाईंचे कुशल विचारतो. अशी आहे वाडा तालुक्यातील लहान-थोर गरीब, दीन-दुबळे आदिवासी या सर्वांची 'ताई' मालतीताई राऊत.

22 डिसेंबर 1925 साली बोर्डीच्या एका शिक्षित सेवाभावी पाटील घरात ताईंचा जन्म झाला. ताई काही तशा मोठ्या विदुषी नाहीत पण आदिवासींवर उत्तम संस्कार करू शकतील इतपत त्यांचे शिक्षण झालेले आहे. 1941 साली त्या व्हर्नाक्युलर फायनल झाल्या.

आचार्य भिसे, डॉ. चुरी, चित्रे गुरुजी, रामराव पाटील यांच्यासारख्या, तोलामोलाच्या विधायक कार्यकर्त्यांचे सेवेचे संस्कार त्यांच्यावर झाले.

त्या काळात आचार्य भिसे यांनी लाल बावटेवाल्यांना टक्कर देऊन आदिवासींत काम सुरू केले होते. आदिवासींचे शिक्षण, वसतिगृहे, जंगल कामगार सोसायट्या, स्थानिक कार्यकर्ते तयार करणे आदी कामे त्यांनी सुरू केली. त्याचवेळी ताराबाई मोडक यांनी आदिवासींमध्ये बालशिक्षणाचे काम सुरू केले.

आचार्यांच्या समवेत आदिवासी सेवा मंडळात सक्रिय असे अनेक तरुण कार्यकर्ते असत. त्यापैकी एक राऊत गुरुजी, त्यांच्याबरोबर 1947 साली ताईंचा विवाह झाला. राऊत गुरुजी पक्के ध्येयवादी व गांधींच्या विचारावर निष्ठा असलेले त्यामुळे जेमतेम स्वयंपाकापुरती भांडी घेऊन ताई बोर्डी सोडून वाडा मोखाडा येथे आदिवासी सेवा मंडळाच्या मुलामुलींच्या वसतिगृहात काम करण्यासाठी पतीच्या बरोबरीने कामाला लागल्या. याकरिता त्यांनी ताराबाई मोडक यांच्या संस्थेतून बालवाडी शिक्षिकेचा कोर्स पुरा केला.

आदिवासी सेवा मंडळाच्या कामाचे जाळे ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांत पसरलेले आहे. त्यामुळे राऊत गुरुजींना फिरावे लागत असे. इकडे मालतीताई आपल्या लहान मुलांसह वाड्याच्या वसतिगृहात राहत असत. आश्रमातील मुलांबरोबरच त्यांचीही मुले वाढत होती. श्रमनिष्ठा हे राऊत दांपत्यांचे वैभव! मग मुले तरी कशी वेगळी होणार? ताईंनी स्वतः मेहनत करून भाजीपाला, फळ फळावळ लावणे, घरांच्या भिंती बांधणे, सारविणे, अंगण तयार करणे, आईच्या मायेने आदिवासी मुलांची देखभाल करणे, त्यांना संस्कार देणे ही कामे केली व आजही करत आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी उच्च शिक्षित, मोठमोठ्या पदांवर आहेत, पण ते ताईंची ओळख विसरलेले नाहीत.

ताईंच्या कर्तृत्वामुळेच आश्रमाला 1961 साली आदर्श आश्रम पुरस्कार मिळाला. त्यांच्या पुरस्कारांची, ज्या ज्या संस्थांवर त्या सक्रिय आहेत त्यांची मोठी मालिकाच आहे.

1986 साली सरकारने त्यांना दलितमित्र ही पदवी देऊन गौरवित केले. तर 1975 साली ठाणे जिल्हा स्त्री शक्ती समितीने महिला पुरस्कार त्यांना दिला. त्यांचे काम इतके बोलके आहे की, 12 वर्षे त्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी होत्या. सदस्य या नात्याने ठाणे जिल्हा परिषद, ठाणे जिल्हा अन्नधान्य सल्लागार मंडळ, ठाणे जिल्हा बालविकास समिती यांवरही त्यांनी काम केले आहे. वाडा मोखाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सल्लागार म्हणून त्या काम पाहतात.

आदिवासी सेवा मंडळाच्या त्या आजीव सदस्य तर आहेतच पण वाडा मोखाडा येथील वसतिगृहाचे संचालकपदही त्यांनी सांभाळले आहे. वाडा तालुक्याचे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन हे चांगले काम करत आहे. मग त्यात ताई नाही असे शक्यच नाही. आज त्या विक्रमगड प्रकल्पाच्या सल्लागार आहेत. याशिवाय ठाणे जिल्हा दक्षता समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या त्या सक्रिय सदस्य आहेत. अशा सक्रिय ताई ठाणे जिल्हा सर्वोदय मंडळाच्या अध्यक्षा आहेत. आमचे बळ वाढावे म्हणून आम्ही त्यांना महाराष्ट्र ग्रामस्वराज्य समितीचे सदस्यत्व दिले आहे. नुकत्याच त्या ठाणे जिल्हा महिला मंडळाच्या अध्यक्षपदावरून मुक्त झाल्या आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी जे महिला अधिवेशन घेतले त्याकरिता सर्व थरांतील 800/900 स्त्रिया/युवती उपस्थित होत्या. इतकेच नव्हे तर पुरुषांचीही संख्या लक्षणीय होती. त्यांनीही स्त्रियांच्या बरोबरीने सहकार्य केले. साऱ्या गावाने तर संपूर्ण भोजनखर्च केला. इतका ताईंचा त्या गावाशी घनिष्ट संबंध!

इतका सर्व व्याप सांभाळत असतानादेखील, ताईंच्या चेहऱ्यावर एकही आठी किंवा दिसणार नाही. उच्च स्वरातील रागाचा शब्द ऐकू येणार नाही. त्यांना एकच ध्यास, आदिवासी मुलांना राहायला व्यवस्थित घर कसे मिळेल! यासाठीच त्यांची धडपड आहे. 

यापुढे जव्हार जिल्ह्यात संपूर्ण नशाबंदी व स्त्रीशक्तीचे काम यासाठीच आपण वेळ द्यावा असे त्यांनी ठरविले आहे.

त्यांची मुले, सुना, उच्च शिक्षित असून त्यांचे गोकुळ नांदते आहे पण ताई त्या गोकुळात फार रमत नाहीत. त्यांची धाव या आदिवासी पिल्लांना खायला अन्न, डोक्यावर छप्पर व स्वावलंबनासाठी शिक्षण कसे मिळेल, याकडे आहे.

असे हे वाडा तालुक्याचे वैभव - मालतीताई राऊत.

Tags: वाडा आचार्य भिसे ताराबाई मोडक मालतीताई राऊत आदिवासी ठाणे Wada Aachary Bhise Tarabai Modak Malatitai Raut Adiwasi Thane weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके