डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

शेवटी शेवटी काही तरी अत्यावश्यक-तातडीच्या कामांची कारणं सांगून मंडळी कंडक्टरला विनवण्या करू लागत. सगळेच कंडक्टर खूप सहृदयी असत. कुणालाही खाली ठेवून ते जात नसत. टपालगाडी दिवसातून दोन वेळाच स्टँडवर येई; पण प्रत्येक वेळी ती बरोबर एक अनोखं चैतन्य घेऊन आल्यासारखी जाणवे. गाडी आल्यावर गावभर जसा एकच गलका होई, तशीच स्थिती गाडी पुन्हा रवाना झाल्यावरही होई. खचाखच भरलेल्या गाडीत जागा मिळविण्यासाठी केलेल्या धाडसाच्या गमतीची चर्चा त्या दिवशी रात्री गावात मुख्य गप्पांच्या अड्ड्यांत चांगलीच रंगून जाई. हिरव्यागार शेतांच्या लुसलुशीत ताटव्यांतून जाणाऱ्या एसटी रस्त्यावरून एसटीची लाल चौकट मोठ्या डौलानं धावताना पाहिली की, डोळ्यांची भूक भागत असे; कारण हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी थेट दुसऱ्या दिवशीच्या दुपारपर्यंत वाट पाहावी लागे.

गावाकडे जाणारे रस्ते आता डांबरी-गुळगुळीत झाले आहेत. रस्त्यांना छेदून जाणाऱ्या ओढ्यांच्या ठिकाणी छोटे-मोठे पूल आहेत. अपघाती वळणं काढून टाकली गेली आहेत. मोठे उतार आणि त्यापुढं जोडून येणारे मोठे चढ बदलले आहेत. रस्त्याच्या कडेवर उभी राहून अधेमधे डोकावणारी झाडं तिथून बाजूला घेण्यात आली आहेत. गावापर्यंतचा रस्ता आता बऱ्यापैकी वाहता असतो. या पार्श्वभूमीवर ‘टपालगाडी’ची आठवण हमखास होते.

साठएक वर्षांपूर्वीची गोष्ट. शहरातून गावाला जाण्यासाठी दिवसभरात ही एकमेव एसटी असे. शहरापर्यंत येण्यासाठीही पुन्हा तीच गाडी. अख्ख्या पंचक्रोशीत या गाडीची ओळख ‘टपालगाडी’ अशीच झाली होती; कारण गावातल्या- वाड्यावस्त्यांतल्या टपालाची थैली या गाडीतूनच येत असे. टपालगाडी साधारणपणे दुपारी बारा-साडेबारा वाजता गावात पोचत असे. या गाडीतून टपालाच्या थैलीबरोबरच रोजचे पेपरही यायचे. कुणा-कुणाकडचे शहरी पाहुणे या गाडीतून उतरायचे, तर काहींना या गाडीनं पुढं जायचं असे. टपालगाडीची वेळ होण्याच्या सुमारास गावाच्या स्टँडवर थोडी वर्दळ वाढत असे. गाडी पुढं निघून गेली, की स्टँडचा रंगच जणून उडून जात असे. मोकळ्या माळावरून भरारत येणाऱ्या वाऱ्याबरोबर तिथं अधूनमधून धुळीचे लोट फिरत राहत. झाडांची वाळलेली पानं, पाचोळा, कुणी-कुणी टाकून दिलेले कागदाचे कपटे हेही त्यांची सोबत करीत राही. वारा पडला, की ही सगळी मंडळीही निपचित पडून राहत. रस्त्यावरून कधी तरी एखादी बैलगाडी घरंगळत गेल्यासारखी निघून जाई. रस्त्यावरल्या दगडांना चाकांच्या लोखंडी धावा घासून जाताना वेगवेगळे आवाज होत. बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा खुळखुळ विशिष्ट नाद पकडून असल्यासारखे कानीं येई. आजूबाजूला दुसरे फारसे आवाज नसल्यानं घुंगरांचा आवाज आपल्यालाही स्वत:बरोबर घेऊन पुढं पुढं सरकत असल्यासारखं वाटे. एखाद्या बैलानं मानेला हिसका दिल्याचंही लक्षात येई. कारण तेव्हा आधीच्या आवाजाची लय काहीशी हेलकावत असे. गाडीवानाच्या आसूडाचा ‘सप्‌’ असा आवाज कानांवर आला, की घुंगरांची गती धाप लागल्यासारखी वाढत चालल्याचं लक्षात येई. एसटी स्टँडलगतच्या रस्त्यावरून एखादी बैलगाडी पुढं जाण्याचं दृश्य पाहायला मिळालं, की अगदी हरखून जायला होई. गाडीला जोडलेले खिलारी बैल, त्यांच्या शिंगांची ऐट, शेपटाचा तुरा मधूनच हवेत उडविण्याची त्यांची लकब, पुढची पावलं उचलून टाकताना बैलांच्या सशक्त वशिंडांची होणारी रुबाबदार हालचाल, झालरीसारखी दिसणारी बैलांच्या गळ्यालगतची पोळी, बैलजोडीचे रंग- यांची वर्णनं मित्रांना कधी सांगायला मिळतील, याची मनाला विलक्षण ओढ लागून राही. काही बैलगाड्यांना तट्ट्याचं अर्धगोलाकार आच्छादन असे. या आच्छादनाच्या छताला रंगीबेरंगी निशाणं बांधलेली असत. एखादं चिमणाळंही असे. एखादा कंदीलही तिथं झोके घेताना दिसे. लग्नसमारंभासाठी लागणारी बाशिंगंही कधी तरी अशा गाड्यांत पाहायला मिळत. तट्ट्याच्या बैलगाडीत असला जामानिमा दिसू लागला, की त्या क्षणी मन भुर्रकन उडून त्या गाडीतच जाऊन बसे. दूर दूर जाणाऱ्या गाडीच्या तट्ट्याचं उंचावलेलं टोक एखाद्या ठिपक्यासारखं होईपर्यंत नजर त्यावरून हलत नसे. जादूच्या गोष्टीतला महाकाय राक्षस अचानक गायब व्हावा, तशी ही अख्खी गाडी एकाद्या वळणावरून अदृश्य होई.

पंचक्रोशीतल्या मोठ्या गावात कोणत्या ना कोणत्या दिवशी आठवडेबाजार भरत असे. स्टँडवर जाऊन निरुद्देश उभं राहणं किंवा एखाद्या झाडाचा बुंधा पकडून त्यावर आरामात बसून राहणं ही आम्हां मुलांसाठी मोठी पर्वणी असे. त्या दिवशी क्वचित एखादी स्कूटर-मोटारसायकल विकाऊ सामानाची ओझी अडकवून वेगानं जात असे. या वाहनांच्या वेगामुळं रस्त्यावरल्या धुळीचं चक्र गाडीमागं लागल्यासारखं काही वेळ भिरभिरत असल्यासारखं वाटे. काही बैलगाड्याही ये-जा करीत. स्टँडवरच्या या जिवंत चित्रपटांनी किती अनुभवसमृद्ध केलं, ते आज प्रकर्षानं जाणवतं आहे. रस्त्यावर वाहन नसलं, तरी आजूबाजूनं पसरत गेलेला भला मोठा माळ, त्याच्या चौफेर उभे राहिलेले डोंगर, अधेमधे डोलणारी झाडं, लांबून रांगोळ्यांसारखे भासणारे झाडांच्या सावल्यांचे गोलाकार आणि माळावर नजर फेकावी तिथपर्यंत दिसणारं हिरव्या गवताचं सळसळतं लावण्य हे सारं डोळ्यांत साठवताना भान हरपून जात असे. आकाशाच्या निळाईवर चिवचिवाट करत जाणारे पक्ष्यांचे थवे आपल्याबरोबर पंखात आमचं लक्षही उचलून घेऊन जात आहेत, असं एकसारखं वाटे. एसटी स्टँडवर एका खोपटात लोहाराचं काम सुरू असे. भट्टीत तोंड खुपसलेल्या भात्याची हालचाल बघताना गंमत वाटे. भात्यातून येणाऱ्या फुंकरीसारख्या वाऱ्यामुळे भट्टीतले कोळसे क्षणात फुलून जात. त्या लालबुंद निखाऱ्यांची झळ बरीच दूरवर जाणवे. त्यात तापायला ठेवलेलं लोखंड हातात धरून लोहार ते ऐरणीवर ठेवी. त्याचा मुलगा, भाऊ किंवा घरातलं कुणीही तापून लाल झालेल्या लोखंडावर हातोड्याचे घाव टाकी. प्रत्येक घावाबरोबर लोखंडाच्या ठिणग्या आजूबाजूला उडून पडत. ठिणग्यांचे लालबुंद डोळे नंतर काही क्षणांतच मिटूनही जात. ‘ऐरणीच्या देवा तुला...’ या गाण्याचे गोड सूर वाहत्या वाऱ्यावर बसून आपल्याभोवती हेलकावत असल्यासारखं वाटे. नांगराचे फाळ, बैलगाडीच्या चाकांभोवतीच्या लोखंडी धावा, खुरपे, विळे, कोयते, कुऱ्हाडी असं काही काही घेऊन शेतकरी येत. विळ्या-सुऱ्या घेऊन गावातूनही कुणी कुणी येई. काही काम काढून सुतारही लोहाराकडं डोकावत.

हे सगळं न्याहाळण्यात मग्न होऊन गेल्यावर सूर्य माथ्यावर कधी आला, ते लक्षातही येत नसे. ही वेळ असे टपालगाडी येण्याची. स्टँडवर आलेली मोठी मंडळी ही गाडी कुठपर्यंत आली आहे, त्याची माहिती सांगत. रस्त्याची वळणं, त्यावरले चढउतार, वडाची मोठी जुनी झाडं, कुठलं मंदिर अशा काही खुणा त्यांच्या ओळखीच्या असत. टाचा उंचावून ते रस्त्याकडं नजर रोखत. हाताचा तळवा डोळ्यांवर धरून किलकिल्या नजरेनं गाडीचा माग शोधून काढत. इकडं-तिकडं टेकलेली मंडळी पिशव्या- वळकट्या- बोचकी-गाठोडी सावरत रस्त्याच्या कडेला येऊन उभी राहत. त्या दिवशीच्या पेपरांचे गठ्ठे घेण्यासाठी विक्रेता आलेला असे. टपालांची थैली घेण्यासाठी पोस्टमन हजर झालेला असे. या सगळ्या हालचाली मोठ्या उत्साहवर्धक आणि उत्कंठावर्धक असत. स्टँडवर उभ्या असलेल्यांच्या नजरा एसटी येण्याच्या दिशेवर पोचलेल्या असत. काही वेळातच एसटीचा लाल रंग वळणावरून पुढे सरकताना दिसे आणि स्टँडच्या परिसरात सगळीकडे अनोखं चैतन्य पसरे. रस्त्यावरला उतार आला, की एसटी खाली जाई व गुडूप होई; तर चढावर आली, की तिचं दर्शन पुन्हा होई. रस्त्याच्या बाजूनं लांबवर पसरलेलं झाडही कधी कधी तिला लपवून ठेवी. स्टँडवर येऊन थांबेपर्यंत एसटीचा हा लपंडाव सुरू राही.

एसटी स्टँडजवळच्या टेकडीला वळसा घालून गाडी पुढं आली, की मग थेट नजरेच्या टप्प्यातच राही. टेकडीच्या पुढचा स्टँडपर्यंतचा रस्ता सरळ होता. गाडीच्या पाठीमागं मात्र धुळीचे उंच लोट हवेत तरंगत असत. हे लोट जणू गाडीचा पाठलागच करीत असल्यासारखं वाटत राही. गाडी थांबविण्यासाठी कंडक्टरनं वाजवलेली घंटी ऐकू आल्यावर सगळा एसटी स्टँडचा परिसरच सज्ज झाल्यासारखा दिसे. गाडी येऊन उभी राहिली, की तिच्याभोवती काही क्षण धुळीचा मोठा थोरला गोल तयार होई; आणि तो निघून जाईपर्यंत जवळपासचंही काही स्पष्ट दिसत नसे. वाऱ्यावर धूळ वाहून गेली म्हणजे सगळ्यांत आधी पोस्टमन आणि पाठोपाठ वृत्तपत्र विक्रेते दरवाजापाशी जात. स्टँडवर उतरणाऱ्यांच्या घाईतच काही जण आत घुसण्याचा प्रयत्न करीत. तिथं मग चांगलीच रेटारेटी होई. टपालाची थैली आणि पेपरचा गठ्ठा कंडक्टर त्या गर्दीतूनच बाहेर काढी. टपालाची थैली पाठीवर टाकून पोस्टमन गावातल्या टपाल कार्यालयाकडं झपाझप निघालेला दिसे. पेपरवाल्याच्या गठ्ठ्याचं वाटप स्टँडपासूनच सुरू होई. गावभर घराघरांत टपालगाडी आल्याची उत्सुकता लागलेली असे. दुपारचे बारा-साडेबारा वाजल्याचा अंदाज गावकरी त्यावरून बांधत असत. या वेळचं पोस्टमनचं दर्शन गावात हा वेळेचा तर्क पक्का करणारं ठरे. काही घरांच्या उंबरठ्यावर टपालाची-मनीऑर्डरची वाट पाहणारे डोळे उभे असत. कार्यालयात जाऊन पोस्टमन थैलीचं सील तोडून काढत. मग सगळ्या पत्रांवर तारखेचे शिक्के ठोकत. सारी पत्रं  घरांनुसार, गावातल्या आळ्या आणि गल्ल्या यांनुसार लावून घेत. नंतर त्यांचं टपालवाटप सुरू होई. कुठं कुठं त्यांना पत्रं वाचून निरोप पोचवावा लागे. एखाद्या घरातलं आशा-निराशा, आनंद-दु:ख यांचं वातावरण मोठ्या कौशल्यानं हाताळावं लागे. मनीऑर्डर संबंधितांच्या हवाली करताना, पोस्टमन अतिशय काळजी घेत. दोन-तीन घटका त्या घराच्या पडवीत टेकत. भांडभर पाणी घेत आणि पुढच्या घराकडं जात. रस्त्यातून ये-जा करणारी मुलं पोस्टमनला विचारीत : ‘‘काका आमचं पत्र आणलं का?’’ पोस्टमनही तेवढ्याच तत्परतेनं उत्तर देत : ‘‘आज नाही आणलं, पण उद्या घेऊन येतो.’’ या उत्तरानं मुलांचंही समाधान होई आणि त्या आनंदावर स्वार होऊन ती घरापर्यंत फुलपाखरासारखी लहरत-भिरभिरत जात.

पोस्टमनचं टपाल वाटपाचं काम सुरू असतानाच, वृत्तपत्रंही गावात पोहोचलेली असत. काही उत्सुक मंडळी त्यासाठी स्टँडवरच जाऊन थांबत व तिथंच पेपर घेत. ज्यांना ते शक्य नसे, ते घरांच्या पडव्यांत, अंगणात किंवा पेठ-रस्त्याला पेपरची वाट पाहत बसलेले असत. पेपरची नवी कोरी घडी काही क्षणांत ऐन पानांच्या जोड्यांनुसार वेगळी होत असे; आणि तिथं जमा झालेल्या वेगवेगळ्या गटांत जात असे. ती पानं वाचून झाली, की या गटांत आपापसांत बदलली जात. मंडळी सगळ्याच बातम्या, लेख, वाचकांचा पत्रव्यवहार, जाहिराती, नोटिसा असं सारं काही वाचून काढत. काही गटांत त्यावर चर्चाही सुरू होई. ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ या सदरात गावातल्या एक-दोघांची पत्रं अधूनमधून प्रसिद्ध होत असत. त्या दिवशी ही मंडळी धोतराचा सोगा एका हातात पकडून, डोक्यावरची टोकदार टोपी किंचित तिरकस करून तो पेपर काखोटीला मारून पेठ-रस्त्यानं मिरवीत राहत. तो दिवस खास त्यांचा असे. गावाची किंवा पंचक्रोशीतल्या एखाद्या गावाची बातमी पेपरात कधीतरी दिसे. त्या वेळी गावातला प्रत्येक सुशिक्षित माणूस अभिमानानं हरखून जात असे. बटवड्याचं काम संपवून पोस्टमन दुसरी एक थैली पाठीवर टाकून स्टँडकडं निघालेले असत. परतीच्या गाडीबरोबर त्यांना ती द्यायची असे.

टपालगाडी पुढं जाऊन चांगली दोन-एक तासांनी स्टँडवर परत येत असे. शहराकडं जाणाऱ्यांना ती गाडी पकडावी लागे. गावातून, आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांतून डोक्यावर गाठोडी आणि पिशव्या घेतलेली मंडळी घाईनं स्टँडवर येऊन थांबत. टपालगाडी काही वेळा आधीच्या गावांतच प्रवाशांनी भरून जाई. अशा वेळी गाडी पकडण्याचं दिव्य करावं लागे. गाडी येऊन थांबली, की तिच्या दरवाजाभोवती या मंडळींची एकच लगबग आणि धांदल होई. स्टँडवर उतरणाऱ्या मंडळींआधी आत घुसरणाऱ्यांचीच संख्या मोठी असे. कंडक्टर जोरजोरात खेकसून बोलत राही : ‘‘चला, गाडी फुल्ल झाली. मागं तुम्ही थांबा.’’ त्याच्या या म्हणण्याकडं कुणीही लक्ष देत नसे. शेवटी शेवटी काहीतरी अत्यावश्यक-तातडीच्या कामांची कारणं सांगून मंडळी कंडक्टरला विनवण्या करू लागत. सगळेच कंडक्टर खूप सहृदयी असत. कुणालाही खाली ठेवून ते जात नसत. टपालगाडी दिवसातून दोन वेळाच स्टँडवर येई; पण प्रत्येक वेळी ती बरोबर एक अनोखं चैतन्य घेऊन आल्यासारखी जाणवे. गाडी आल्यावर गावभर जसा एकच गलका होई, तशीच स्थिती गाडी पुन्हा रवाना झाल्यावरही होई. खचाखच भरलेल्या गाडीत जागा मिळविण्यासाठी केलेल्या धाडसाच्या गमतीची चर्चा त्या दिवशी रात्री गावात मुख्य गप्पांच्या अड्ड्यांत चांगलीच रंगून जाई. हिरव्यागार शेतांच्या लुसलुशीत ताटव्यांतून जाणाऱ्या एसटी रस्त्यावरून एसटीची लाल चौकट मोठ्या डौलानं धावताना पाहिली की, डोळ्यांची भूक भागत असे; कारण हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी थेट दुसऱ्या दिवशीच्या दुपारपर्यंत वाट पाहावी लागे.

त्या वेळचा तो एसटी स्टँड आता पूर्णपणे बदलून गेला आहे. अनेक मार्गांवरच्या गाड्यांची ये-जा तिथं वाढली आहे. स्टँडवर मोठी दुकानं झाली आहेत. काहींनी तिथं घरंही बांधली आहेत. ग्रामपंचायतीचं कार्यालय आहे. हायस्कूलची मोठी इमारत आहे. खाजगी गाड्यांची ये-जा वाढली आहे. हे सगळं असलं, तरी नजरेनं टिपून घेतलेल्या टपालगाडीचं ते दृश्य आजही क्षणात दिसू लागतं; आणि त्या वेळेची गजबज मनात साद घालू लागते.

(पुढील सहा महिने ललित लेखांचे हे सदर महिन्यातून दोन वेळा याप्रमाणे प्रसिद्ध होईल.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Vachak- 12 Jul 2021

    खूपच छान

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके