डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

समईनृत्यातली ही ‘नर्तकी’ कोण? नंतर चौकाचौकांत हा प्रश्न रंगत असे; आणि प्रत्येक ठिकाणी तो अनुत्तरित राहून पुढच्या चौकात पुन्हा नव्यानं पडत राही. सर्वांत शेवटच्या चौकात तो शोध लागे. आणि नर्तकीची ओळख पुढं येई : ती नर्तिका म्हणजे बाबू कुंभार! कुणाचाही त्यावर विश्वासच बसायचा नाही. गावात बाबू कुंभाराचं हॉटेल होतं. तो कायम तिथं दिसे. कधी चहाची उकळी पातेल्यात ओगराळ्यानं फिरविताना. कधी भज्याचे खमंग घाणे तळताना. कधी शेव-पापडी तयार करताना. कधी बुंदी पाडताना. जिलेबी करताना. कधी भेळीचे पुडे बांधून देताना. बाबू कुंभार. मध्यमवयीन. गोरापान. अंगानं चांगलाच मजबूत, काहीशा नाजूक आवाजाचा. गरीब स्वभावाचा. त्याचा आवाज कधीच चढायचा नाही. बाबू कुंभार म्हणजे ती नर्तिका, हे काही केल्या खरं वाटत नसे. 

गावात होलिकोत्सवाची नुसती धमाल असे. मोठ्या वाड्यांच्या प्रशस्त अंगणात किंवा वाड्या-वस्त्यांत होळ्या पेटायच्या; पण तरीही गावाची म्हणून एक मोठी होळी पेटविली जायची. नाथाच्या देवळापुढचं मैदान म्हणजे कुठल्याही सार्वजनिक उत्सवाचं-कार्यक्रमाचं ठरलेलं ठिकाण. गावाची होळीही तिथंच होई. गावकरी मंडळींना या होळीचे वेध आधीपासूनच लागलेले असत. तरुणांचा उत्साह त्यात मोठा असे. आधीच्या दोन-तीन आठवड्यांपासून त्यांच्या शोधक नजरा गावभर भटकू लागत. होळीत टाकण्यासाठी चांगली वाळलेली लाकडं कुठं कुठं आहेत, ते या नजरा डोळ्यांत बंद करून ठेवीत. कुणाच्या घरांच्या परसांत वाळलेल्या लाकडांचे मोठे ओंडके साठवलेले आहेत, कुणाच्या उंच लाकडी शिड्या बऱ्याच दिवसांपासून घराबाहेर खुंट्यांना लटकावून ठेवलेल्या आहेत, कुठं सरपणाचे ढीग आहेत, कडब्याच्या गंजी एकत्रित कुठं आहेत, बंबफोडीच्या तुकड्यांच्या, हातांच्या मुठींतही न बसू शकणाऱ्या कोळशांच्या गोण्या कुठं भरून ठेवलेल्या आहेत, शेलकी- मोठी लाकडं वखारीत कुठल्या बाजूला आहेत, त्यांची खडान्‌खडा माहिती या तरुणांनी जमा करण्याचा सपाटाच लावलेला असे. कुठल्या आडांवरचे लाकडी रहाट लांबविता येतील, कुणाच्या पडवीतील जुन्या लाकडी टेबल-खुर्च्यांवर हात मारता येईल, कुणाचे पलंग किंवा त्यांच्यावर ठेवायच्या लाकडी फळ्या हातोहात उचलता येतील, त्याच्या योजना या मंडळींच्या डोक्यात पक्क्या  झालेल्या असत. अशा भटकत्या मंडळींच्या ‘व्रात्य’ नजरांना काही दिसणारच नाही, या दृष्टीनं काहींनी आधीच ‘व्यवस्था’ करून ठेवलेली असे. काहींची ही व्यवस्था यशस्वी ठरे; पण असलीही काही ठिकाणं चाणाक्ष तरुणांनी नोंदवून घेतलेली असत. आपल्या मालकीचं असलं काही ‘घबाड’ गायब झाल्याचं बहुतेकांना ते तिथून नाहीसं झाल्यावरच कळायचं. गावात आणखीही एक रीत पडलेली होती : असल्या गोष्टींबद्दल कुणाला दोष द्यायचा नाही, कुणावरही ठपकाही ठेवायचा नाही आणि भांडण वगैरे तर करायचंच नाही. त्यातूनही एखादा तक्रारदार पुढं आलाच, तर त्याचा सामूहिक ‘उद्धार’ पेटलेल्या होळीच्या साक्षीनं होणार, हे जवळजवळ ठरलेलंच असे. त्यामुळंही सहसा कुणीच अशा ‘तक्रारी’च्या भानगडीत पडत नसे. कुणाचं काय उचलून नेलं, त्याच्या चर्चांच्या वावटळी गावात पुढचे कित्येक दिवस फिरत राहत आणि ते गावगप्पांचे विषय होऊन जात.

होळीच्या निमित्तानं असला ‘खोडकरपणा’ होत राही; आणि त्याचीही एक धमाल रंगून जाई. होळीच्या सणाचं आणखी एक आकर्षण असे. ते आकर्षण होतं ‘सोंगां’चं. कोकणात तर ही प्रथाच आहे. देशावर मात्र ती क्वचितच आढळते; मात्र आमच्या गावात तेव्हा तरी अशी सोंगं आणली जायची. सोंग म्हणजे आपण जे नाही, ते वठविणं. म्हणजे माणूस मुळात वेगळा, त्याचा व्यवसाय-कामधंदा वेगळा; पण तो वठवितो, ते सोंग मात्र त्यापेक्षा किती तरी भिन्न. ते केवळ वेशांतर नसे. आवाजाची पट्टी, बोलण्याची ढब, हावभाव, विशिष्ट लकबी यांची ती अगदी हुबेहूब नक्कल असे. ‘हा मूळचा आहे तरी कोण?’ असा प्रश्न वारंवार पडावा, इतक्या या भूमिका हुबेहूब असत. त्यातलं कुणीही कलाकार नव्हतं. कलेच्या शिक्षणाची बातच सोडा, त्याचं साधं शिक्षणही जुजबी अक्षरओळख आणि अंकओळख यांपलीकडं सरकलेलं नव्हतं. मग या मंडळींत एवढ्या विविध कला आल्या कुठून? या विद्यांत त्यांना कुणी गुरू नव्हता, ना त्यांनी कुणाचा गंडा बांधला होता. आणखी एक गंमत म्हणजे, सोंग वठविण्यापुरता काळ सोडला, तर ही माणसं पुन्हा त्यांच्या मूळ कामाधामांत दिसायची. त्यांचं कौतुक कुणी करायचं नाही आणि त्यांनाही तशी काही अपेक्षा असायची नाही. त्यांचे रोजचे पेहरावही तेच असायचे. साधे. फाटलेल्या  जागी ठिगळांचे जोड दिलेले. रंग उडून गेलेले.

होळी धडाडली म्हणजे मोठमोठी लाकडं, गोवऱ्यांचे ढीग टाकून ती आणखी पेटती राहण्याची व्यवस्था केली जाई. पिवळट-केशरी ज्वाळांची धाव दहा-बारा फुटांपर्यंत उंच झेपावत असे. ज्वाळांची वरची टोकं पाहताना काहींच्या डोक्यांवरच्या टोप्या घरंगळून खाली पडत; आणि काहींचे खोडकर हात या टोप्या उचलून होळीच्या पोटात भिरकावून देत. ज्वाळा बघण्यात गुंग झालेल्याचा हात टोपी सारखी करायला डोक्यावर जाई; तेव्हाच ‘काय होऊन गेलं आहे’ याची कल्पना त्याला येई आणि टोप्या भिरकावण्याच्या खेळात मग तोही सरसावून पुढं होई. होळीचा आकार चांगला गोलाकार झाला, म्हणजे घराघरांतून पुरणपोळीच्या नैवेद्याची ताटं नाथाच्या देवळाच्या दिशेनं निघालेली असत. वेगवेगळ्या रंगांच्या दोऱ्यांनी विणलेले रुमाल अंथरलेली नैवेद्याची ताटं घेऊन, जरीच्या नव्या साड्यांतल्या स्त्रिया एका हातानं जरीकाठाची पट्टी डोक्यावरून इकडंतिकडं सरकणार नाही, याची दक्षता घेत चाललेल्या असत. पाण्यानं भरलेला गडू किंवा तांब्या घेऊन एखादं पोर धांदरटपणानं पावलं उचलीत तिच्या आगंमागं चाललेलं असे. नाथाच्या देवळाच्या परिसरात पेटत्या होळीचा भगभगता उजेड सगळीकडं पसरलेला असे. भरारत्या वाऱ्याबरोबर होळीची धगही जाणवत असे. ‘‘आजूबाजूची झाडं तेवढी सांभाळा रे बाबांनो,’’ असे काही वयस्क आवाज ‘कारभाऱ्यां’ना दिले जात. या आवाजांची दखल घेतल्याचा देखावा करण्यासाठी होळीच्या आजूबाजूनं थांबलेले कारभारी काही हालचाली करीत, आणि होळीच्या ज्वाळा पुन्हा आधी होत्या, तशाच उंच उंच होत जात.

घरोघरी पुरणपोळीचा तृप्त बेत असे. ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ ही पारंपरिक घोषणा आधी सगळ्यांच्या ओठांत, आणि मग भरलेल्या पोटांत जाऊन बसलेली असे. घराबाहेर पडवीत किंवा अंगणात मंडळींची शतपावली सुरू होत असे. पुरणपोळीच्या जेवणानंतर ती आवश्यकच असे; पण मंडळींचा आणखी एक हेतू असे. थोड्या वेळातच ‘शिमग्याची सोंगं’ सुरू व्हायची असत. बाहेरची ये-जा वाढल्यावर किंवा कुणाकडं विचारपूस केल्यावर ‘सोंगं’ कधी निघणार, त्याचा नेमका अंदाज येत असे. आटीव केशरदुधाच्या पृष्ठभागावर तरंगताना दिसणारं पिवळेपण घेऊन पौर्णिमेचं चांदणं आकाशातून निथळत असे. त्या दाट प्रकाशात अख्खं गाव न्हाऊन गेलेलं असे. रात्रीच्या कुठल्याही प्रहरी रस्त्यावर मुक्तपणे फिरण्याचा परवाना या चांदण्यानं बहाल केलेला असे. हलगी कडकडू लागल्याचा तरणाबांड आवाज गावाच्या एखाद्या कोपऱ्यातून यायचा आणि सारं गावच त्या ठेक्यांबरोबर ताजंतवानं होऊन सरसावून बसायचं. हा आवाज यायचा गावातल्या एखाद्या चौकातून. गावाच्या रचनेत या चौकांचं वेगळेपण होतं. यात्रेच्या वेळी ग्रामदैवताची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी निघे. गावाच्या बाजारपेठेच्या रस्त्यावर मधेमधे अशा चौकांचे थांबे लागत. या प्रत्येक चौकात पालखी उभी राही. मधली काही जागा मोकळी ठेवून बाजूनं गर्दीचा गोल उभा होत असे; आणि ढोल-लेझिमांची नजरबंदी करणारा ‘कडक’ डाव तिथं काही वेळ रंगत असे. शिमग्याच्या सोंगांचं सादरीकरण त्याच ठिकाणी व्हायचं. हलगी जोरजोरानं घुमायला लागली, म्हणजे कान टवकारले जात आणि मंडळी त्या चौकात हजर होत. चांदणं असलं, तरी तिथं तीन-चार गॅसबत्त्या पेटविलेल्या असायच्या. तो झगमगता प्रकाशही गर्दी ओढून घ्यायचा. पाहता पाहता चौक भरून आणि बहरूनही जाई. कडाडणाऱ्या हलगीचा आवाज वारा पडावा तसा मधेच थांबे आणि तोच ‘कडकपणा’ पकडून गर्दीतून पुढं निवेदकाचा आवाज सुरू होई : ‘‘कोळ आलं बघा! डोळे मोठे करून बघा. चश्मे लावून बघा. आला, आला, घोडेस्वार आला! सावरून उभे राहा. घोडं थोडं नाठाळ आहे. मधेच गर्दीत घुसतं. घोडेस्वाराला नाचविता नाचविता अचानक भिरकावूनही देतं.’’ कान सावध व्हायचे. उत्सुक नजरा डोळ्यांतून बाहेर पडायच्या. गर्दीतून वाट काढीत घोडेस्वार पुढं यायचा. डोक्याला जरीकाठी पागोटं. वाऱ्यावर लहरणारा त्याचा सोगा. घोडेस्वारानं रुबाबात ठोकलेली मांड, घोडाही ऐटदार. थोराड. उंच उभारलेले कान. विस्फारलेले डोळे. फुरफुरणाऱ्या नाकपुड्या. घोडेस्वारानं वेसण खेचताच नृत्य बदलतं. घोडेस्वाराचे केस लांब. पागोट्याखालून पाठीवर रुळणारे. रंगविलेला चेहरा. लाल. पिवळा. कपाळावर मळवट. त्यावर वर्खाची नक्षी. गिरक्या घेत घोडा नाचत राही. पायांतल्या घुंगरांचा शब्द त्याबरोबर साथ देत राही. घोडेस्वार मधूनच कमरेची तलवार उपसून नाचवायचा. कधी गर्दीच्या बाजूला घोडा हाकायचा. घोडेस्वारानं तलवार पुढे करण्याआधीच गर्दीत पळापळ व्हायची. नाचण्यात रंगलेला असतानाच घोडा अचानक दिसेनासा व्हायचा. गर्दीत चर्चा सुरू व्हायची : कोण होता? काही नावं पुढं यायची. ‘हो-नाही’ची उत्तरं गोलाकारात फिरत राहायची. नंतर कळायचं : हा आपला पंडा होता. पंडा म्हणजे पंढरीनाथ; पण सगळा गाव ओळखायचा ते पंडा म्हणूनच. घोडेस्वाराचा रंगविलेला चेहरा आठवणीतून नजरेपुढं आणला, की त्याच्याशी पंडाची ओळख पटायची. पंडा पेशानं चर्मकार. रोज येता-जाता दिसायचा. हसून हात करायचा. चपला-बूट सांधीत बसायचा. कधी कुणाच्या पायाचे आकार पेपरच्या कागदावर काढून त्याबरहुकूम चपला बांधायचा. त्याची अभिनयाची ही हुनर ‘शिमग्याच्या सोंगा’तच लक्षात यायची.

तेवढ्यात पुढच्या आकर्षणाची घोषणा सुरू होई. ‘‘मंडळी लक्ष द्या. नीट ऐका. आता येणार आहेत सोवळ्यातले बामन आन्‌ त्यांचा नाऱ्या. बामन लई कडक हा. त्येला शिवू नका.’’ अचानक एक काहीशा कृश अंगकाठीचे, उंचेपुरे, गोरेपान ‘बामन’ एका हातात  ताम्हण घेऊन लगबगीनं यायचे. शुभ्र धोतर. खांद्यावर उपरणं. त्यांना उपरणं सारखं करण्याचा चाळा. दुसऱ्या हातात घंटी. एकसारखी किणकिणणारी. अंगावर फक्त उपरणंच. कपाळावर भस्माचे तीन आडवे पट्टे. त्याच्या मधोमध एक गंधाचा टिळा. भुरूभुरू उडणारी लांब शेंडी. तोंडानं स्तोत्र पुटपुटणारे. नजर मागं वळून सारखं काहीतरी शोधणारी. मधेच अनुनासिकातल्या आवाजात त्यांची त्रासिक विचारणा : ‘‘अरे नाऱ्या, आहेस कुठे?’’ नाऱ्या मागं कुठंतरी गर्दीत. घाबराघुबरा. गोंधळलेला. ‘बामनकाकां’चे कुलदीपक शोभेल असंच पात्र. उंच. काटकुळं. कमरेला फक्त पंचा. त्या कुडीचा वस्त्राशी तेवढाच संबंध. ‘‘अरे नाऱ्या, आहेस कुठं?’’ या प्रश्नाला नारायणाचं चिरक्या आवाजातलं उत्तर; तेसुद्धा अनुनासिकच : ‘‘हे काय तुमच्याच मागे.’’ पुन्हा प्रश्न : ‘‘मागे दिसला नाहीस तें!’’ नारायण : ‘‘पावलांवर पाऊल ठेवतो तुमच्या, मग दिसूं कसा?’’ काका विचारतात : ‘‘अरे नाऱ्या, पळीपंचपात्र कुठें?’’ उत्तर : ‘‘अहो, मी बसलों होतों तिथें!’’ प्रश्न : ‘‘बसला होता कुठें?’’ उत्तर : ‘‘पळीपंचपात्र होतें तिथें!’’ हे सवाल-जबाब वेगवेगळ्या आरोह-अवरोहांत सुरू राहत. काकांना नाऱ्या कधीच दिसला नाही; पण तो मागंच असे. काकांना फक्त त्याच्या उत्तरांचे आवाज ऐकू येत. हसून हसून गर्दीची पुरेवाट होई. गर्दीत कुजबुज सुरू होई : ‘‘बामनकाका कोण बरं? आणि नाऱ्या तर ओळखताच येत नाही बुवा!’’ एखादा बुजुर्ग खात्रीनं सांगायचा : ‘‘आरं ह्ये बामनकाका म्हंजे आपला परसराम नव्हं का? आन त्ये प्वार नाऱ्या तितलंच की, कुंभारवाड्यातलं!’’ परशुराम म्हणजे नाभिक व्यावसायिक. धोकटी अडकवून ये-जा करणारा. त्याचा ‘बामनकाका’ शंभर नंबरी! दुसऱ्या दिवशीपासून ‘नाऱ्या’मागं एकच प्रश्न सुरू राही : ‘‘अरे नाऱ्या, पळीपंचपात्र कुठें?’’ ‘नाऱ्या’ मात्र मित्रांच्या त्या प्रश्नांनं बेजार होऊन जाई. अशा ‘शिमग्याच्या सोंगां’त कधी कडक शिस्तीचे मास्तर, आणि त्यांना पाहताच हार्मोनियमच्या भात्यातल्या सगळ्या स्वरांचा आवाज काढीत रडणारी वर्गातली पात्रं डोकावत. कधी कथेकरी बुवा येऊन जात आणि शेवटी आरतीचं व दक्षिणेचं तबक फिरवलं जाताना त्यांची केली जाणारी गंमतही धमाल आणी. पिठानं अंघोळ केल्यासारखा सगळीकडं वावरणारा गिरणीतला चंद्रकांत सोंगातून समोर येई; आणि त्याची तिथली धांदल पाहताना हास्याचे धबधबे कोसळत राहत.

सोंगांचा चौकातला शेवट व्हायचा तो समई नृत्यानं. मोठी गोलाकार परात. त्यात ठेवलेल्या पेटत्या समया. परातीत मधे पंचारती. ही समई डोक्यावर घेऊन हे नृत्य केलं जाई. ही ‘नर्तकी’ पैंजणांचे शब्द बोलते करी. हातांच्या बोटांच्या विविधाकारी मुद्रा करी. गोल फिरे. गिरक्या घेई. एका पायावर तोल सावरीत बराच वेळ उभी राही. परात डोक्यावर ठेवूनच ती मैदानातली फुलं उचलून घेई. हे सगळं करताना ‘नर्तकी’चा मुद्राभिनयही सुरू असे. इतक्या नृत्यकसरती करताना एकही समई जागची हलत नसे; किंवा कुठल्या समईची ज्योतही विझून जात नसे. नर्तिकेनं जरीची हिरवी नऊवारी साडी अगदी चापूनचोपून नेसलेली असे. पदर पूर्ण अंगाभोवती लपेटून घेऊन कमरेच्या एका बाजूला तो घट्ट खोचलेला असे. पायाशी आलेली साडी पैंजणांच्या पट्ट्यांसह बांधलेली असे. ढोलकीवर महादू भोई यांची बोटं कडकडत असत. हे म्हादबाही असलेच अवलिये. ढोलकी, पखवाज वाजविण्यात तरबेज. त्यातलं त्यांचं शिक्षण शून्य; पण बोटांना परमेश्वरी देणगी लाभलेली. हे समईनृत्य डोळ्यांचं पारणं फेडून जाई. एका चौकात ते पाहूनही समाधान होत नसे; म्हणून अनेक मंडळी प्रत्येक चौकाचौकात पुन:पुन्हा येऊन जागा धरून बसत. चौकातलं समईनृत्य संपलं, की हेच कलाकार पुढल्या चौकात येत आणि तिथं पुन्हा नव्यानं तीच सोंगं रंगवीत. ती कितीही वेळा पाहिली, तरी त्यातली गंमत कमी होत नसे. समईनृत्यातली ही ‘नर्तकी’ कोण? नंतर चौकाचौकांत हा प्रश्न रंगत असे; आणि प्रत्येक ठिकाणी तो अनुत्तरित राहून पुढच्या चौकात पुन्हा नव्यानं पडत राही. सर्वांत शेवटच्या चौकात तो शोध लागे. आणि नर्तकीची ओळख पुढं येई : ती नर्तिका म्हणजे बाबू कुंभार! कुणाचाही त्यावर विश्वासच बसायचा नाही. गावात बाबू कुंभाराचं हॉटेल होतं. तो कायम तिथं दिसे. कधी चहाची उकळी पातेल्यात ओगराळ्यानं फिरविताना. कधी भज्याचे खमंग घाणे तळताना. कधी शेव-पापडी तयार करताना. कधी बुंदी पाडताना. जिलेबी करताना. कधी भेळीचे पुडे बांधून देताना. बाबू कुंभार. मध्यमवयीन. गोरापान. अंगानं चांगलाच मजबूत, काहीशा नाजूक आवाजाचा. गरीब स्वभावाचा. त्याचा आवाज कधीच चढायचा नाही. बाबू कुंभार म्हणजे ती नर्तिका, हे काही केल्या खरं वाटत नसे. दुसऱ्या दिवशी कुंभाराच्या हॉटेलवरून आमच्या अनेक चकरा होत. आता बाबू कुंभार कसा दिसतो, ते आम्ही निरखून पाहत असू; पण बाबू कुंभार नेहमीचाच असे. तो नर्तिका झाला, की पूर्ण बदलून जाई.

शिमग्याला सुरू झालेली ही सोंगं थेट गुढीपाडव्यापर्यंत रोज आम्हांला भेटत राहत. आता खूप मोठा काळ पुढं सरकला आहे. आता तेव्हाची ती ‘शिमग्याची सोंगं’ ही संपून गेली आहेत. अजूनही कधीतरी त्या आठवणी जाग्या होतात. सोंगांतली माणसं डोळ्यांपुढं येतात आणि मन तेव्हाच्याच उत्साहानं गावाच्या चौकाचौकांतून धावत सुटतं.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके