डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

मौखिक बालवाङ्‌मयाचा वारसा सोडल्यास  मराठीत स्वतंत्रपणे बालसाहित्य निर्मितीची  परंपरा नव्हती. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात  इंग्रजी आमदानीत बालसाहित्य निर्मितीला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. धार्मिक-नैतिक शिक्षणाच्या प्रेरणेतून त्या काळातले बरेचसे बालसाहित्य लिहिले गेले. विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत मराठीत पाश्चिमात्य बालसाहित्याचे  भाषांतरपर्व सुरू होते. साहसी वीर नायक  आणि अद्‌भुतरम्य कथानके ही या साहित्याची  ठळक वैशिष्ट्ये होती. त्यात बरीचशी प्रवासवर्णने होती. टिळकयुगात भारतीय  इतिहासातील वीरपुरुषांच्या चरित्रगाथांना बालसाहित्यात अग्रस्थान मिळाले. राष्ट्रीय अस्मितेचे संस्कार बालमनावर रुजविण्याच्या  प्रेरणेतून हे साहित्य लिहिले गेले. 1920 नंतर  भारताच्या राजकीय-सामाजिक जीवनात  गांधीयुग अवतरले. स्वाभाविकच बालसाहित्यलेखनात कमी-अधिक प्रमाणात त्याच्या प्रभावखुणा दिसू लागल्या.

मराठी वाङ्‌मय इतिहासकारांच्या मते,  दुसऱ्या  महायुध्दापर्यंत गांधी विचारांचा एकूण मराठी साहित्यावर आणि पर्यायाने बालसाहित्यावरही फार लक्षणीय प्रभाव  पडला आहे असे दिसत नाही. साहित्यात अपेक्षित असलेल्या संघर्षाला वा पौरुषाला आव्हान करण्याच्या संदर्भात गांधीवाद निरुपयोगी असल्याने ही साहित्यनिर्मिती  झाली नसावी, असे प्रा. गो. म. कुलकर्णी यांनी आपले मत  व्यक्त केले आहे. बालसाहित्याच्या बाबतीतही हा निकष  लागू पडतो. मुलांना परिकथा, अद्‌भुत व साहसकथांची आवड असते; परंतु गांधीवादी विचारांतून अद्‌भुत वा  वीररसाला पूरक असे विषय मिळत नसल्याने  गांधीविचारांवर अधिष्ठित बालसाहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात  फारशी लक्षणीय कामगिरी झालेली दिसत नाही. कलासौंदर्यापेक्षा कृतिसौंदर्यावर भर देण्याची गांधीजींची  भूमिका असल्याने गांधीवादाला कलासौंदर्याच्या क्षेत्रात फारसा अवकाश सापडला नसावा, असेही एक मत आहे. हे  सारे लक्षात घेऊन मराठीतील गांधीवादी बालसाहित्याचा मागोवा घ्यावयाचा आहे. सत्यनिष्ठा,  नैतिकता,  आध्यात्मिकता,  हृदयपरिवर्तन, चित्तशुध्दी, स्वच्छता, अहिंसा,  साधनशुचिता, स्वातंत्र्य,  समता,  सर्वोदय ही  गांधीविचारातील पायाभूत मूल्ये होती. बालवाङ्‌मयातून  यापैकी कोणत्या मूल्यांची कशी पाठराखण झाली याचाही  येथे तपास करावयाचा आहे.

चरित्रात्मक वाङ्‌मय : गांधीजींचे लोकविलक्षण चरित्र हा बऱ्याच बालसाहित्य लेखकांचा आस्थेचा विषय बनला असल्याचे दिसते. मराठी  बालवाङ्‌मयात अनेक लेखकांनी गांधीजींची चरित्रकथा  आपापल्या पध्दतीने कथन चरित्रवाङ्‌मयाचे दालन समृध्द केले आहे. अवंतिकाबाई गोखले यांनी 1918 मध्ये  सर्वप्रथम महात्मा गांधींचे चरित्र लिहिले; त्याला लोकमान्य टिळकांनी प्रस्तावना लिहिली. हे चरित्र जरी बालसाहित्यात  मोडत नसले,  तरी ऐतिहासिक दृष्ट्या येथून पुढे गांधीजींचे  चरित्र लिहिण्याची परंपरा सुरू झाली,  म्हणून त्याची दखल  घेणे आवश्यक आहे. चरित्रवाङ्‌मय हा लेखनप्रकार जसा  प्रौढांना भावतो तसा तो कुमारांना आणि युवकांनाही भावतो.  गांधीजींची जीवनकथा सांगण्याचे विविध आकृतिबंध गेल्या  शंभर वर्षांत पुढे आले आहेत.  एक आकृतिबंध ‘आठवणीं’चा आहे. गांधीजींच्या  सहवासातील आपापल्या आठवणी सांगणाऱ्या प्रासंगिक अनुभवकथनांचा या गटात समावेश करावा लागेल. अशा  आठवणीवजा निवडक चरित्रकथांची एक यादी माहितीस्तव  इथे नोंदून ठेवली आहे.  

ना. ग. गोरे : गांधीजींचे विविध दर्शन (1940)  
लुई फिशर (अनुवाद : स.बा.हुदलीकर) : गांधीजींच्या सहवासात एक आठवडा (1945)  
दादा धर्माधिकारी : सर्वामुखी गांधी (1946)
बा. भ. बोरकर : आम्ही पाहिलेले गांधी (1950) (अनुवादित)
सदाशिव धर्माधिकारी : ‘गांधीजींच्या आठवणी’ (1965)
बाळकोबा भावे : ‘महात्माजींच्या सहवासातील काही आठवणी’ (1969)  
विठ्ठल कोतवाल : ‘गांधीजींच्या कृपाछत्राखाली’ (1969) नारायण कातगडे : ‘गांधीजींच्या सहवासात’  (1970)

या गटातील लेखनात अर्थातच गांधीजींचे समग्र चरित्र कथन करण्यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील भावणाऱ्या पैलूंचे ललितरम्य भाषेत दर्शन घडविण्याला प्राधान्य दिले गेले आहे. उदा.- लुई फिशर यांच्या पुस्तकातून गांधीजींच्या  सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीचे चित्रण, गांधीजींची दिनचर्या, सफाईकामातला त्यांचा पुढाकार आणि विदेशी पाहुण्याला उकडलेल्या बटाट्यांचा पाहुणचार अशा विविध प्रसंगचित्रांतून बापूजींच्या आश्रमातील जीवनशैलीचे व  लोककेंद्री नेतृत्वशैलीचे विशेष लक्षात येतात. ही चरित्रे  प्रौढांना आणि मुलांनाही आवडतील अशा भाषेत लिहिली  गेली आहेत.

गांधीजींच्या लोकसंग्रहाचे व लोकप्रियतेचे दर्शन घडविणारी क्षणचित्रे टिपणाऱ्या या पुस्तकांची निरूपणशैली ही कथनात्मक घाटाला जवळ जाणारी आहे.  दुसरा गट गांधीजींची जीवनगाथा सांगणाऱ्या ‘बालचरित्रां’चा आहे. या दुसऱ्या गटात मोडणाऱ्या काही निवडक पुस्तकांची इथे नोंद केली आहे :
गांधीजींचे विद्यार्थ्यांशी हितगुज : भाऊ धर्माधिकारी (1943)  
मंगलधाम : गोपीनाथ तळवलकर (1945)
बापूजींच्या गोड गोष्टी : साने गुरुजी ( )
गांधीजींची गोष्ट : पांडुरंग श्रीधर आपटे (1949)  
बाल मोहन : भि. ल. कवडी (1950)
गांधीजींचे विद्यार्थीजीवन : श्रीपाद जोशी (1956)  
गांधी व विद्यार्थी : द. वा. फडके (1960)  
मुलांचे गांधी : मारोतराव कन्नमवार (1963)
बहुरूप गांधी : अनु बंदोपाध्याय (1964) अनुवाद : शोभा भागवत
गांधीबाबा : कृ. गो. सूर्यवंशी (1963)
असे होते गांधीजी : आनंद देशपांडे (1964)  
बापूजींचे जीवनप्रसंग : शांताबाई अत्रे (1966)
गांधी जीवनदीपिका : राजा मंगळवेढेकर (1968)
सत्याग्रही गांधीजी : पुरुषोत्तम गोखले (1968)
असे होते गांधीजी : यशवंत जोशी (1969)
असे होते बापू : गोपाळ किराणे (1969)
असे होते बापूजी : सुमेरजी जैन (1969)
असे होते आपले बापूजी : शिवाजी मराठे (1969)
सत्याग्रही महात्मा गांधी : सुधाकर प्रभू (1970)
मुलांचे बापू : लल्लुभाई मकनजी, अनु. शांताबाई अत्रे (2204)

गांधीजींचे जगभरातले चाहते त्यांना पत्र लिहीत; सर्वांना त्यांचा पत्ता ठाऊक नसे. अशा वेळी हे चाहते ‘दि किंग ऑफ इंडिया’, ‘दि ग्रेट अहिंसा नोबल ऑफ इंडिया’, ‘हेड ऑफ काँग्रेस’, ‘लीडर इन इंडिया’ असले पत्ते लिहून ही पत्रे  पोस्टात टाकत. एकाने तर कुठलेच नाव वा पत्ता न लिहिता गांधीजींचे चित्र काढून पत्र टाकले. गांधीजींची जगभर लोकप्रियता एवढी होती की,  ही सर्व पत्रे गांधीजींना मिळत. अशा पत्रांचा एक आल्बम करून मुलांना गांधीजींची गोष्ट सांगण्याचा एक नमुनाही या बालचरित्रात पाहायला मिळाला.

तिसरा गट ‘समग्र जीवनचरित्रां’चा करता येईल.  
महात्माजींची विलायत यात्रा : यदुनाथ थत्ते (1945)
महात्मा गांधी : गोवर्धन पारीख (1949)
राष्ट्रपिता गांधी : वामनराव जोशी (1955)  
महात्मा गांधी : शं. रा. देवळे (1965)  
राष्ट्रपिता महात्मा गांधी : नारायण अभ्यंकर (1967)
राष्ट्रपिता गांधी : वसंत मंगळवेढेकर (1967)
गांधी चरित्ररेखा : दा. न. शिखरे (1968)
मोहनमाळ : द. गो. दसनूरकर (1969)  
म. गांधी : जीवन आणि शिक्षण : श्रीपाद जोशी (1969)
म. गांधी : पद्माकर सावरकर (1969)
गांधीजी : पु. ल. देशपांडे (1970)
गांधीजींचे बृहत्‌ आत्मचरित्र : शंकरराव देव (संपा.) (1970)  

गांधीजींजवळ रसिकता होती. पशू, पक्षी, बालके, संगीत, निसर्ग इत्यादींबद्दल त्यांना आकर्षण होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अशाही काही पैलूंवर प्रकाश टाकणारी  स्फुट कथने या प्रकारच्या चरित्रपर वाड्‌मयातून मुलांसाठी  लिहिली गेली आहेत.

गांधीजींच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन गोष्टीरूप चरित्रलेखनाचीही एक लाट बालसाहित्यात  आलेली दिसते. चौथा गट ‘चित्रात्मक चरित्रकथां’चा करावा लागेल. मुलांना चित्रकथापुस्तके वाचण्याची आवड असते. ‘चांदोबा’सारख्या मासिकाकडे आणि ‘व्यंग्यचित्रात्मक’ पुस्तकांकडे बालवाचक लवकर वळतो. गांधीजींची जीवनकथा अशा चित्रमालिकेतून देण्याचेही काही प्रयोग झालेत. त्यात छोट्या-छोट्या घटनाचित्रांची निवड व  मांडणी या दृष्टीने दा. न. शिखरे यांची गांधी चित्रकथा (1968) आणि श्रीपाद सावंत व सुधाकर बादलकर यांच्या ‘चित्रमय गांधीकथा’ (1967) या पुस्तकांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागतो. याखेरीज गांधीजींची निवडक पत्रे संकलित करून मुलांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली  गेली. 1947 मध्ये अप्पा पटवर्धन यांनी ‘गांधीजींची पत्रे’ हे संपादित पुस्तक प्रकाशित केले. पांडुरंग देशपांडे यांनी 1950 मध्ये ‘बापूंची पत्रे’ संकलित करून त्यांच्या  आश्रमातील जीवनाचे पैलू प्रकाशात आणले. पाचवा गट पाठ्यपुस्तकांत समाविष्ट केल्या गेलेल्या ‘स्फुट चरित्रकथां’चा करता येईल. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे संस्कारक्षम पैलू विद्यार्थ्यांच्या वाचनात यावेत  म्हणून त्यांच्या चरित्रातील काही स्फुट घटना-प्रसंगांची  चिमूटभर कथने करणारे बालसाहित्य मराठीत विपुल प्रमाणात लिहिले गेले. उदा.- गांधीजींच्या विचारधारेतले ‘सत्य’ संकल्पनेचे महत्त्व त्यांना त्यांच्या बालपणात कसे  गवसले याची कहाणी ‘नवयुग वाचनमाले’च्या चौथ्या पुस्तकात दिलेली आहे. बाल मोहनदास हरिश्चंद्राचे नाटक  पाहायला गेले होते; त्या नाटकातील प्राणाची पर्वा न करता सत्यपालन करणाऱ्या हरिश्चंद्राच्या गोष्टीचा गांधीजींच्या मनावर कसा खोलवर ठसा उमटला याची हकिगत या पाठात  कथन केली आहे. तसेच एखाद्या पुस्तकाचा संस्कार माणसाची आयुष्यभर सोबत कशी करतो आणि त्याच्या समग्र जीवनाची दिशा कशी बदलून टाकतो,  याची कहाणी सातवीच्या पाठ्यपुस्तकात दिली आहे.

आफ्रिकेत हेन्री  पोलक यांनी जॉन रस्किन यांचे ‘अन्टू धिस लास्ट’ हे पुस्तक गांधीजींना दिले. एका रात्रीत ते त्यांनी वाचून संपवले आणि  त्यांना ‘सर्वोदया’च्या संकल्पनेने झपाटून टाकले. ‘सर्वांच्या  कल्याणात आपले कल्याण आहे’, वकील असो वा न्हावीसवारांच्या कामाचे मोल एकच आहे आणि अंगमेहनतीचे शेतकऱ्याचे जीवन हा जीवन जगण्याचा मूल्यात्मक आदर्श  आहे,  या संस्कारांची शिदोरी गांधीजींना या पुस्तकामुळे  मिळाली. मुलांवर वाचनसंस्कारांचे महत्त्व बिंबविण्यासाठी  अशा स्फुट कथनांचा निश्चित उपयोग होतो. अशा स्फुट  चरित्रघटनांची आणखी काही उदाहरणे नमुन्यादाखल इथे  सांगता येतील. कुठलेही काम हलके नसते,  अशा विचाराचे महात्मा  गांधी होते. हे त्यांनी स्वत:च्या आचरणातूनच दाखवून दिले  होते. आफ्रिकेत असताना त्यांनी आपल्या लोकांचे शौचकूप  साफ केले होते. ही गोष्ट अनेकांनी आपापल्या पध्दतीने कथन  केली आहे. लुई फिशरने वर्ध्याला गांधीजींनी मुलाने रस्त्यावर केलेली विष्ठा उचलून बाजूला जमिनीत पुरल्याची हकिगत नमूद केलेली आहे. अनु. बंदोपाध्याय यांनी ‘बहुरूप  गांधी’मध्ये गांधीजी कोणकोणती कामे करीत याचे बारकावे  टिपणारे प्रसंग दिले आहेत. गहू निवडणे, दळण दळणे, शिवणकाम करणे,  खाकरा तयार करणे, आश्रमातले मूल  सांभाळणे अशा किती तरी प्रसंगांतून एखाद्या कुटुंबवत्सल  गृहिणीला साजेल अशी गांधीजींची कर्मनिष्ठा त्यांनी चित्रित  केली आहे. कृष्णराव भाऊराव बाबर हे साताऱ्याला जिल्हा  लोकल बोर्डात शैक्षणिक पर्यवेक्षकाचे काम पाहत असत. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या पुरवणी वाचनाकरिता महात्माजींच्या जीवनातील काही स्फुट घटनांचे कथन करणाऱ्या गोष्टी लिहिल्या. त्यात त्यांनी आत्मप्रौढीपासून दूर  असलेल्या व साधेपणाचा सन्मान करणाऱ्या गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाचे काही प्रसंग कथन केले आहेत.

एकदा  न्यायालयात गांधीजींनी स्वत:चा धंदा शेती आणि विणकाम  असल्याचे सांगून न्यायाधीशाला चकित केल्याचा प्रसंग  वर्णन केला आहे. वास्तविक, गांधीजी काठेवाड संस्थानच्या दिवाणाचे चिरंजीव होते. विलायतेत उच्च  शिक्षण घेऊन बॅरिस्टर झाले होते. तरीही या गोष्टीचा  अभिमान न बाळगता ते सध्या आश्रमात जे काम करीत होते, ते लक्षात घेऊन त्यांनी न्यायाधीशाला आपला धंदा शेती व विणकामाचा असल्याचे सांगितले. यातून गांधीजींच्या  व्यक्तिमत्त्वातील साधेपणातला थोरपणाचा पैलू कथन करणारी गोष्ट बाबरांनी मुलांसाठी लिहून टाकली. त्यांच्या  साधेपणाचे कौतुक सांगणारी आणखी एक गोष्ट बाबरांनी  पुरवणी वाचनात घातली. एकदा गांधीजी बैलगाडीतून  निघाले होते. अंतर 20 मैलांचे होते. गाडीवानाने लवकर  पोहोचण्याच्या इराद्याने बैलाला चाबूक मारून पळवायला सुरुवात केली. बैलाला चाबूक मारल्याचे पाहून गांधीजींना अतिशय वाईट वाटले. त्यांच्यातली भूतदया जागी झाली.  गाडीतून उतरून ते थेट पायी चालत गेले. कृष्णराव बाबरांना  याला समांतर अशी एक घटना बंगालातील साधू नागमहाशयांच्या जीवनात आढळली. आपण बैलांना भरपूर  खाऊ घालून त्याच्याकडून तेवढेच कामही करून घेतो; त्यामुळे बैलाला चाबूक मारून अपेक्षित काम करवून घेण्यात कसले आले पाप, असला युक्तिवाद करणाऱ्या गाडीवानाचा प्रतिवाद करणारे नागमहाशय बैलांना मुळीच हाणणार नाही  अशा अटीवरच बैलगाडीतून कलकत्त्याला जात. साधूवृत्तीची ही कथा आणि गांधीजींची हकिगत यांची  जोडकथा बाबरांनी पुरवणी वाचनासाठी मुलांना उपलब्ध करून दिली.

(थोरांचा थोरपणा,  1931)  ‘थोरांचा मोठेपणा’ ही गांधीचरित्रातली एक सूत्रप्रतिमाच बनून गेलेली दिसते. नौखालीहून माउंटबॅटनच्या भेटीला  निघालेल्या गांधीजींसाठी मनूने 24 तासांचा लांब पल्ल्याचा  प्रवास आणि गांधीजींची प्रकृती लक्षात घेऊन रेल्वेचा मोठा डबा आरक्षित केला. गाडीला खूप गर्दी होती. डब्याला लोंबकळून प्रवासी निरनिराळ्या डब्यांत घुसत होते. ते पाहून आपल्यासाठी मनूने मोठा डबा आरक्षित केल्याचे गांधीजींना  पसंत पडले नाही. गांधीजींनी छोट्या डब्यात स्थलांतरित  व्हायचे ठरविले. रेल्वे अधिकाऱ्याने गांधीजींना मोठ्या डब्यातच थांबायची विनंती केली व गरिबांसाठी आणखी  एक स्वतंत्र डबा जोडायची तयारी दाखविली. मात्र गांधीजी  रेल्वे अधिकाऱ्याला म्हणाले, ‘‘तुम्ही गाडीला आणखी एक डबा जोडाच; पण माझ्याही डब्यात उतारूंना बसवा.’’ गांधींनी सांगितल्याप्रमाणे रेल्वे अधिकाऱ्याला व्यवस्था करावी लागली. गांधीजींच्या या समभावाची कथा मुलांसाठी लिहिलेल्या चरित्रात दिमाखाने मिरवू लागली. (सुनीती कथामाला,  भाग 5)  सहावा गट गांधीजींच्या जीवनसरणीतून वेचलेल्या मूल्यसंस्कारांना साहित्यरूप देणाऱ्या ‘संस्कारगद्या’चा करता येईल. मुलांची जीवनशैली संस्कारित करणं हे बालसाहित्याचे आणि विशेषत: शालेय पाठ्यपुस्तकातील वेच्यांचे एक महत्त्वाचे ध्येय असते. त्यामुळे हे लेखन जरी महापुरुषांच्या चरित्रावर आधारित असले तरी त्याचा घाट इतिहासातील कालक्रमिक, घटनाप्रधान व वर्णनात्मक धाटणीचा राहत नाही. मुलांच्या रंजन-प्रबोधनाबरोबरच  त्यांची वाङ्‌मयीन अभिरुची व व्यक्तित्वाची जडण-घडण  यांचे पोषणमूल्य असणारे ललित लेखन हे बालसाहित्याचे वैशिष्ट्य असते.

कृ.भा. बाबर यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्कारमूल्य असणारे बालसाहित्य जाणीवपूर्वक लिहिले आहे. नमुन्यादाखल त्यांच्या ‘आरसा’ या कथनपर घाटाच्या  पुस्तकाची निवड केली आहे. मुलांना सतत आरशात डोकावून पाहण्याची हौस असते,  ही दैनंदिन जीवनातली  साधी घटना हा या लेखनाचा प्रारंभबिंदू आहे. आरशात  आपली छबी सतत पाहण्यामागे मुलांची नार्सिसस वृत्ती- आत्मरतीची प्रेरणा- असते, हे मानसशास्त्रीय सत्य आहे. आपल्यातला अजागळपणा दूर करण्यासाठी आरशात पाहणे  वाईट नसले तरी, आत्मरतीची ही प्रेरणा सातत्याने जोपासली गेली, तर विकृती निर्माण होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी बाबरांनी गांधीजींचा जीवनादर्श मुलांपर्यंत पोहोचविण्याचे काम या कलाकृतीच्या माध्यमातून केले  आहे. ‘वेश असावा बावळा/ अंगी असाव्या नाना कळा’ या  न्यायाने पोषाखी सुंदरतेपेक्षा आत्मिक गुणकौशल्यांच्या साधनेला महत्त्व देण्याचा विचार या पुस्तकातून बिंबवण्यात  आला आहे. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वातील साधी राहणी,  पण उच्च विचारसरणी,  नियमित व्यायाम, साधा परंतु ताजा व सकस आहार, अपरिग्रह, दीर्घोद्योग, रात्री झोपण्यापूर्वी  प्रार्थना व आत्मपरीक्षणाची सवय या गुणविशेषांचा संस्कार  करणाऱ्या कथा-घटना यांच्या निवेदनातून हा कथनप्रवास  चाललेला असतो. त्यात निर्व्यसनी व ब्रह्मचर्याचे व्रत आचरणाऱ्या शिष्य कचाची पौराणिक कथा आणि  गांधीचरित्राची सांगड घालून मिथके, पुराणकथा यांच्या वाचनाची अभिरुची घडविणारी दृष्टीही दिली जाते. निरनिराळ्या लेखकांच्या बालसाहित्यात गांधीजींच्या चरित्रातील पोषाखाचा मूलबंध सातत्याने आवृत झालेला  दिसतो.

आफ्रिकेत वकिली करताना आंग्ल वळणाचे टाय- कोट-सूट परिधान करणारे गांधीजी, दक्षिण आफ्रिकेतून परतल्यावर स्वीकारलेला काठेवाडी फेट्याचा पोषाख, खादीचे व्रत अंगीकारल्यावर फेटा जाऊन गांधी टोपीचा स्वीकार करतात. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यावर भारतभ्रमण करीत असताना अंगावर लज्जारक्षणापुरतेही वस्त्र  परिधान करता येत नसलेल्या भारतातील गरिबीचे भीषण  दर्शन त्यांना होते. त्यानंतर त्यांनी अंगरखा घालण्याचे सोडून  दिले आणि साधा पंचा नेसून आयुष्यभर अर्धनग्न फकिराचे राहणीमान स्वीकारले. इंग्लंडच्या गोलमेज परिषदेत व  व्हिक्टोरिया राणीच्या भेटीला जातानाही त्यांनी अंगात सदरा  घातला नाही,  ही हकिगत बालसाहित्याचा विषय झाली. यासंदर्भातली एक गोष्ट राजा मंगळवेढेकर यांनी अशी  सांगितली आहे,  ती सुबोधवाचनमालेच्या सातवीच्या  पुस्तकात संग्रहित झाली आहे.  एकदा बापूजी इंग्लंडच्या शाळेत गेले. ‘अंकल,  अंकल’ म्हणत अनेक मुले त्यांच्याभोवती जमली. त्यातील एक  मुलगा म्हणाला,  ‘‘इतक्या थंडीत तुम्ही सदरा का घालत  नाहीत?’’  त्यावर बापूजी म्हणाले, ‘‘माझ्याकडे सदरा  नाही.’’ एक मुलगा चटकन म्हणाला, ‘‘मी आईकडून  तुमच्यासाठी एक सदरा आणतो.’’  त्यावर गांधीजी म्हणाले,  ‘‘मला एक सदरा कसा पुरेल?’’ मुलांनी विचारले,  ‘‘किती  हवेत ? दोन,  चार,  सहा?’’ बापूजी म्हणाले, ‘‘चाळीस  कोटी. आमच्या देशात चाळीस कोटी लोकांना पुरेसे अन्नवस्त्र नसताना मी कसा काय सदरा घालू ?’’  सदऱ्याच्या  कथेचा हा मूलबंध स्वीकारून या काळात ‘सुखी माणसाचा  सदरा’ नामक निरनिराळ्या मिथककथा लिहिल्या गेलेल्या दिसतात.

वि.स.खांडेकर यांच्या ‘क्रौंचवध’ कादंबरीतील  दिनकर गांधीजींच्या सहवासातील प्रसंगांचे वर्णन करताना ही गोष्ट सांगतो. साररूपाने सांगायचे तर- भौतिक सुखाच्या मागे लागण्यापेक्षा साध्या राहणीतले सौंदर्य, परदु:खाशी साहनुभाव अशा संस्कारांचे मूल्य घेऊन या कथा लिहिल्या  गेल्या आहेत.

कथा-कादंबरी वाड्‌मय : गांधीजींच्या जीवनदर्शनातून प्रेरणा घेऊन चरित्रलेखनाखेरीज  अन्य वाङ्‌मयप्रकारातही काही वैविध्यपूर्ण  बालसाहित्य लेखनाचे प्रयोग झालेत. मात्र त्यांचे प्रमाण  कमी आहे. बालसाहित्यात लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी  मराठीत सकस साहित्यनिर्मिती केली आहे;  मात्र त्यातले बहुतेक बालनायक हे साहसी, धडपडणारे वीर नायक  आहेत. ताम्हणकरांचा शहरी भागातला खोडकर गोट्या, भा. रा. भागवतांचा पराक्रमी वीर फास्टर फेणे,  दिलीप प्रभावळकरांचा बोक्या सातबंडे हे नायक खोडकर असले तरी गरिबांना,  अडल्या-नडलेल्यांना मदत करणारे आहेत.  परंतु या नायकांना थेट गांधीविचारधारेशी जोडता येईल,  असे वाटत नाही. अर्थात असे असले, तरी गांधीविचारांना  अनुसरणारे थोडेफार बालसाहित्य मराठीत लिहिले गेले  आहे.  गांधीविचारांनी भारलेले शांतिलाल भंडारी यांनी स्वाभिमानी व देशाभिमानी मुलांच्या गोष्टी लिहिल्या. त्यांचा  बालनायक ‘टिल्लू’  हा देशभक्तीने भारलेला आहे.  दुष्काळासारख्या आपत्तीत होरपळणाऱ्या माणसांचा  आक्रोश आणि त्यांच्याविषयी निर्माण होणारी सहवेदना या  विषयावरची ‘मालवते दीप’  ही शांतिलाल भंडारी यांची  कादंबरी किशोर-कुमारवयीन मुलांच्या मनावर  सामीलकीचा व सहवेदनेचा संस्कार घडविणारी आहे.

शरच्चंद्र टोंगो यांनी स्वदेशप्रीती,  कर्तव्यपरायणता व  मित्रप्रेमाची मूल्ये मनावर बिंबवणारी ‘कुमार’नामक कादंबरी  लिहिली. यदुनाथ थत्ते यांनी गांधीजींच्या ग्रामोद्योगाच्या संकल्पनेचे महत्त्व आधोरेखित करणारी ‘संतू’ नामक गोष्ट  लिहिली. या गोष्टीचा चरित्रनायक संतु हा कुंभाराचा मुलगा.  घरात परंपरेने चालत आलेल्या कुंभारकामात तो प्रावीण्य  संपादित करतो. स्वत:ची कल्पकता आणि कौशल्याच्या  बळावर तो प्रत्येक सणावाराला माठ, रांजण, पणत्या, बैल, गणपती व नाना प्रकारची सौंदर्यसंपन्न अशी मातीची खेळणी बनवतो. श्रमातून सौंदर्यनिर्मितीचा आनंदही मिळवतो आणि  आर्थिक स्वावलंबनही प्राप्त करून घेतो. कला, शिक्षण आणि जीवनमूल्यांची सांगड घालणारी ही कथा गांधीवादी विचारदर्शनाची प्रातिनिधिक कथा म्हणता येईल. गांधीजींचा  शिक्षणविषयक दृष्टिकोन पुस्तकी शिक्षणापेक्षा व्यक्तीच्या  अंगभूत अशा हस्तकौशल्यांवर भर देणारा होता. त्यांच्या  बुनियादी शिक्षणप्रणालीचा हा दृष्टिकोन प्रशस्त करणारी आणखी एक कादंबरी ना. धों. ताम्हणकर यांनी लिहिली. ‘खडकावरला अंकुर’ या कादंबरीचा बालनायक नावाने पंडित असला तरी पुस्तकी विद्येत त्याला मुळीच गती नसते.  त्याच्या अंगी साहस वा धाडस नसल्याने क्रीडा क्षेत्रात अथवा  अंगमेहनतीच्या कामासाठी तो पात्र ठरत नाही. मात्र सूरांची  त्याला जाण होती,  गाण्याचा छंद होता. त्याच्यातल्या या  सुप्त गुणाला वाव देणारे शिक्षण मिळताच तो संगीतक्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करू लागतो. खडकावरचा अंकुर  फुलू लागतो.

पंडितच्या यशोगाथेचा हा प्रवास  गांधीविचारातील शैक्षणिक धोरणाची प्रस्तुतता पटवून  देण्याच्या दृष्टीने अतिशय परिणामकारक उतरला आहे.  मागासलेल्या जातीत जन्माला आल्याने काही बिघडत  नसते. स्वकर्तृत्वाने व श्रमसाधनेतून माणूस आपला  श्रेणीबदल घडवून आणू शकतो व आपल्या ध्येयापर्यंत पोहोचून नवा इतिहास घडवू शकतो,  अशा आशयाची  मालती दांडेकर यांची ‘दगडातून देव’ ही कादंबरीही गांधीवादी बालसाहित्याचा उत्तम नमुना आहे. गोपाळराव  कुलकर्णी यांच्या ‘मौनी सेवकराम’ या कादंबरीचा बालनायक गांधीजींच्या ग्रामसुधारणेच्या विचारांनी  भारावलेला आहे. आपला गाव सुधारण्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन त्याने गावाचा कायापालट कसा घडवून आणला याची एक उत्तम समाजकार्यकथा या कादंबरीतून  लेखकाने शब्दबध्द केली आहे. ग्रामोध्दार, आदिवासींचे  जीवन आणि पर्यावरण हे विषय श. रा. राणे यांनी ‘नाना जोगा’ आणि ‘परिवर्तन’ या कादंबऱ्यांतून हाताळले आहेत. खानदेशाच्या सातपुड्यातील आदिवासींच्या जीवनात बदल  घडवून आणण्यासाठी त्यांच्यातीलच आजी, भिंगऱ्यापावरा  यासारख्या नि:स्वार्थी व्यक्ती पुढे सरसावतात व  परिसराचा कायापालट घडवतात. हे आदिवासी डोंगरी  वनस्पतींपासून रंग तयार करतात. महाकुच फुलांपासून निळा  रंग,  मंजिष्ठापासून तांबडा रंग, फणसापासून पिवळा रंग, तांदळाच्या पिठापासून पांढरा आणि कोळशापासून काळा  रंग तयार करतात. झाडाच्या काड्यांचे ब्रश तयार करतात  आणि या साधनातून चित्रे, पिशव्या, बटवे रंगवतात;  मोटारीत ठेवण्यासाठी बाहुल्या, भिंतीवर टांगण्यासाठी वॉल  हँगिंग बनवतात. स्थानिक आदिवासी कलेतून लघुउद्योग  उभा करतात,  मुंबईस प्रदर्शने लावून स्थानिक मालाला  बाजारपेठ मिळवतात. आदिवासींचे दारिद्य्र संपते.  ग्रामोद्योगातून स्वावलंबनाचा गांधीजींचा कित्ता गिरवला जातो.

अमळनेरला साने गुरुजींच्या कर्मभूमीत राहिलेले वा. रा. सोनार यांनी यातना भोगणारी दुबळी माणसे सद्‌गुणांचा  आधार मिळाल्यावर दु:खावर मात करून कशी आनंदी बनतात,  याविषयीच्या कथा लिहिल्या. ‘दुबळी माणसे’  नावानेच या कथांचा संग्रह प्रसिध्द झाला.  भूतदयेचे मूल्य अनुसरून मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याची  शिकवण देणाऱ्या बोधकथा म. वि. गोखले यांनी लिहिल्या. ‘मुक्यांच्या भावकथा’ या संग्रहातील प्राणिकथांतून मुक्या  प्राण्यांमध्येही माणसासारख्या प्रेम,  मैत्री,  वात्सल्य,  विरह,  सूड अशा भावभावना कशा असतात याची घटनाचित्रे  रंगविली आहेत. अस्पृश्यता निवारण,  हिंदू-मुसलमान ऐक्य हा गांधीजींच्या जीवितकार्याचा एक महत्त्वाचा भाग होता. या विषयांची बाबा भांड यांनी ‘रंग नाही पाण्याला’, ‘देवगिरीचा हसन’, ‘धर्मा’ या कादंबऱ्यांतून उत्तम हाताळणी केली आहे. ‘देवगिरीचा हसन’मध्ये हिंदू-मुसलमानांतील ताणतणावांचे  तपशीलवार चित्रण येते. मात्र जात वाईट नसते,  माणसाची  वृत्ती वाईट असते; तसेच पश्चात्तापाने वाईट प्रवृतीवर मात  करता येते व आत्मशु्‌ध्दिचा मार्ग सापडतो,  हा हृदयपरिवर्तनाचा प्रवास लंगड्या हसनच्या व्यक्तिरेखेतून  उत्तमरीत्या चित्रित केला आहे.  गांधीजींचे खरे वाङ्‌मयीन वारसदार म्हणून साने  गुरुजींचेच नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांची ‘श्यामची आई’ आणि ‘श्याम’चे कादंबरी खंड यातून गांधीजींचा  वारसा चालविणाऱ्या गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वातील ऋजुता, प्रेम, करुणा, वत्सलता, निसर्गाशी असलेले हृद्य नाते आणि  मानव्याची मूल्यनिष्ठा अशा सर्व पैलूंचे पवित्र दर्शन घडते.

अस्पृश्यता निवारणासाठी देहविसर्जनाची तयारी करणाऱ्या, पंढरपूरच्या वाळवंटात मंदिरप्रवेशासाठी उपास करणाऱ्या  साने गुरुजींचे बालजीवन कसे घडले याचा प्रत्यक्षदर्शी वृत्तांत  म्हणजे श्यामची आई हे कादंबरीमय आत्मकथन. ज्या  काळात अस्पृश्याची सावली पडली तरी स्नान करणारे लोक  होते, त्याच काळात श्यामच्या आईने अस्पृश्य म्हातारीची  खाली पडलेली मोळी उचलून तिच्या डोक्यावर घालण्यास सांगून समताभावाचा मूल्यसंस्कार केला. कुठलेही काम  हलके नसते,  श्रमसंस्कारा्‌तून स्वावलंबन साधता येते- अशा किती तरी संस्कारांची गाथा म्हणजे श्यामची आई!

नाट्यवाङ्‌मय : गांधीजींच्या विचारधारांना वाङ्‌मयीन रूप देऊन  मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी नाट्यलेखनाचेही काही प्रयोग  मराठी बालसाहित्यात झालेले दिसतात. गांधींच्या  अस्पृश्योद्धाराच्या चळवळीचा विषय नाटकासाठी निवडला  गेला. साने गुरुजी यांनी ‘अस्पृश्योध्दार’ नावाचेच नाटक लिहिले. ना. धों. ताम्हणकर यांनी ‘प्रसाद’नामक नाटिकेच्या  माध्यमातून अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे वस्तुनिष्ठपणे पाहण्याची दृष्टी मुलांना मिळावी, या हेतूने हे बालनाट्य लिहिले गेले.  शिवाशिवीच्या मुद्यावरून स्वच्छतेचे महत्त्व लक्षात आणून  दिले जाते. मात्र त्याचबरोबर श्रीमंतांच्या बडेजावामुळे  वंचित गटातील लोकांना आंधळेपणाने अस्पृश्य ठरविले  जाते,  यातली अन्यायाची बाजू नाटकातून सुस्पष्ट करण्यावर  भर दिला जातो. वर्णजातीतून वा दारिद्य्रातू्‌न माणसांच्या  वाट्याला येणारी हीनता चुकीची असून स्पृश्यास्पृश्य- भावापलीकडे असणारे माणुसकीचे मूल्य हेच शोशत सत्य  असल्याचा संस्कार या नाटकातून यशस्वीपणे बिंबवला  जातो. गरिबांना मदत करण्यासाठी पुढे येण्यातच खरा  मानवधर्म आहे,  हा गांधीविचार पुढे आणणारी ‘पारितोषिक’ नावाची नाटिकाही 1939 मध्ये ताम्हणकरांनी लिहिली  होती. ‘खेड्याकडे चला’ या महात्मा गांधीजींच्या आवाहनाला  प्रतिसाद मिळून ग्रामोध्दाराच्या चळवळीत अनेक तरुणांनी  स्वत:ला झोकून दिले. खेड्यातले जीवन साहित्यिकांचे  आस्थाविषय बनले. भाऊ मांडवकर यांनी ‘खेड्याकडे  चला’ या नावाचेच नाटक लिहिले. खेड्यातल्या लोकांच्या  शहरवासीयांविषयीच्या समजुती,  शहरातील लोकांच्या खेड्यातल्या जीवनाविषयीच्या समजुती यातील  अपसमजांना दूर करण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे.

कविता : महात्मा गांधींच्या सत्य,  अहिंसा,  असहकार या  तत्त्वप्रणालीला अनुसरणारे व प्रत्यक्ष स्वातंत्र्यलढ्यात आणि  ग्रामोध्दाराच्या चळवळीत सहभागी होऊन गांधीविचारांसाठी  जीवन समर्पित करणारे लेखक म्हणजे साने गुरुजी.  गांधीजींची प्रार्थनेची संकल्पना साने गुरुजींच्या दैनंदिन कर्माचाही अविभाज्य भाग बनलेली होती. अमळनेरला थेट  मुलांच्या छात्रालयात राहून त्यांनी मुलांवर संस्कार करणारे  वाङ्‌मय निर्माण केले.  खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे /  जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पददलित /तया  जाऊन उठवावे । सदा जे अति विकल,  जयांना गांजति सकळ/ तया  जाऊन हसवावे । कुणा ना व्यर्थ शिणवावे,  कुणा ना व्यर्थ हिणवावे/ समस्तां बंधू मानावे । ही गांधीविचारांची शिकवण देणारी प्रार्थना शालेय  जीवनातील विद्यार्थ्यांच्या परिपाठाचा विषय झाली होती. ‘पत्री’ हा त्यांचा काव्यसंग्रह म्हणजे गांधीविचारांच्या प्रसारासाठी घेतल्या जाणाऱ्या शिबिरात आणि मेळ्यात  म्हटली जाणारी गाणी होती.

आम्ही देवाचे मजूर । आम्ही देशाचे मजूर । आम्ही कष्ट करू भरपूर । आम्ही यत्न करू भरपूर । किंवा स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई । सुखवू प्रियतम भारतमाई। कळिकाळाला धक्के देऊ । मरणालाही मारून जाऊ।प्रताप आमुचा त्रिभुवन गाईल| यासारखी स्फूर्तिगीते त्यांनी लिहिली. वारा वदे कानामध्ये । गीत गाईन तुला । हस रे माझ्या  मुला । चिमणी येऊन नाचून बागडून । काय म्हणे मला । चिवचिव करीन, चिंता हरीन । हस रे माझ्या मुला । यासारखी अंगाईगीताला जवळ जाणारी बाळगाणीही त्यांनी लिहिली.

गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’च्या आवाहनानंतर  मराठीत जानपदगीतांचा एक नवा प्रवाह सुरू झाला. या प्रेरणेतून मुलांसाठीही काही काव्यरचना झाल्या. उदा., ग. ह. पाटील यांची गावच्या पिंपळाच्या पारावर भरणारी ‘पाखरांची शाळा’ ही कविता. ग. ल. ठोकळ यांची ‘खळ्यावर’, गोपीनाथांची ‘रानपाखरा’, केशवकुमारांची ‘आजीचे घड्याळ’ या कविता ग्रामजीवनाचे व खेड्यातल्या  संस्कृतीचे हृदयंगम दर्शन घडवितात.

इतिकथन : आतापर्यंत गांधीजींच्या प्रभावातून प्रसिध्द झालेल्या  मराठीतील निवडक बालसाहित्याचा मागोवा आपण घेतला. या आढाव्यातून हाती लागलेल्या निष्कर्षांचे व्यवस्थापन करताना गांधीविचार दर्शनाचा (बालसाहित्याच्या आशयसंघटनेवर व वाड्‌मयीन मूल्यधारणांवर) नेमका काय परिणाम झाला, हे साररूपाने लक्षात घ्यावयाचे आहे.

निर्मितिप्रक्रिया : बालसाहित्य लिहिणाऱ्या लेखकांपैकी बहुतांश  लेखकांचा शिक्षकी पेशा होता. काही लेखक थेट  स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. त्यामुळे शाळेत किंवा शिबिरात मुलांना गोष्टी सांगणे,  मेळ्यासाठी पदे लिहिणे  यातून ही साहित्यनिर्मिती झाली आहे. शालेय जीवनात  आणि वयानुसार होणाऱ्या शारीर-मानसिक बदलांच्या संक्रमणकाळात मुलांची योग्य मानसिक घडण होण्यासाठी,  त्यांच्यावर योग्य ते भावनिक,  नैतिक संस्कार होण्यासाठी  साहित्यनिर्मिती करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. मुलांच्या वाढसंगोपनातले शारीरिक, बौध्दिक,  भावनिक,  सामाजिक मुद्दे लक्षात घेऊन कथनविषयातील आशयाची संघटना बांधण्याचा या लेखकांनी प्रयत्न केला. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील विविध अवस्थांतरांचा व सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेतल्या सर्व गुण-दोषांच्या परिणामांचे भान ठेवून त्यांनी आपल्या वाङ्‌मयाची निर्मिती केली आहे.

आशयघनता : बालसाहित्याची आशयघनता कशी तपासावी,  हा एक कळीचा मुद्दा आहे. मात्र निवडलेल्या विषयाची  आशयसंघटना बांधताना या लेखकांनी कोणकोणत्या परिमाणांचा विचार केला आहे, हे लक्षात घ्यायला हवे.  उदा.  मुलांच्या वाढ-संगोपनातले पेचप्रसंग,  समवयस्कां- सोबतचे संबंध, व्यक्तीची ‘आदर्श जीवना’ची संकल्पना, अंत:प्रेरणांचा व भावनांचा विचारप्रक्रियेतील वाटा, मिळालेला काळ कसा व्यतीत करावा याची निवड करण्याचे  स्वातंत्र्य इत्यादी मुद्दे लक्षात घेतले आहेत.

नैतिकतेचा मुद्दा  बालसाहित्यातील नैतिकता हा बराच सूक्ष्म चर्चेचा  विषय आहे. एखाद्या गोष्टीसाठी शिक्षा करणे,  दुर्लक्ष करणे  अथवा चिकित्सक फेरतपासणी करून फेरमूल्यांकन करणे,  याबाबतची निवड त्या-त्या समाजाच्या ऐतिहासिक  अनुभवांच्या संचितातून होत असते. सांप्रदायिक मूल्ये आपल्या साहित्यातून पुढे न्यायची की नवी मूल्ये रचण्याची  जोखीम पत्करायची,  याचा निर्णय बालसाहित्यिकाला घ्यावा लागतो. मराठी बालसाहित्यिकांनी गांधी चरित्राच्या अनुषंगाने हरिश्चंद्राची सत्यपरायणता, शिष्य कचाच्या  संयमित ब्रह्मचर्याचा व बलोपासनेचा नमुनादर्श अशा  पुराणकथांशी सांगड घालून गांधीजींच्या नवमूल्य धारणांची  पेरणी केली आहे. साने गुरुजींचे उदाहरण घेऊन सांगायचे तर  गुरुजी भारतीय संस्कृतीच्या मूल्यदृष्टीचा आदर करतात; परंतु पारंपरिक रूढी-संप्रदायाच्या चौकटीत अडकून  नैतिकतेचा विचार करीत नाहीत. गांधीजींच्या विचारांनी  प्रभावित झाल्यामुळे ते ‘समताधिष्ठित, अहिंसक व प्रेममूलक सहयोगी जीवना’च्या व्यापक संदर्भात नैतिकतेची नवी  व्याख्या करतात.

सामान्यत: बालपण,  आजारपण,  वार्धक्य या शारीर अवस्थांमध्ये परावलंबित्व असते. अशा वेळी आंतरवैयक्तिक संबंध कसे काम करतात यावरून नैतिक  वर्तनाची कसोटी लागते. साने गुरुजी व अन्य बालसाहित्यिकांनी याबाबतीत बहुतेक ठिकाणी अहिंसा,  करुणा, सुश्रूषा,  परमतसहिष्णुता या मूल्यांची पाठराखण केली आहे.

निरूपणपद्धती

बालसाहित्याच्या कथनपध्दतीचा विस्ताराने आढावा  घेण्याचे हे स्थळ नाही. मात्र बहुतांश चरित्रलेखनात वा कथाकथनात बालवाचकांच्या वाचनसवयी लक्षात घेऊन निरूपणाचे विविध प्रयोग करण्यात आले आहेत. काहींनी  विहंगमावलोकन पध्दतीतून कालक्रम सोईने विचलित केला  आहे,  काहींनी माहिती आणि तपशिलाच्या पसाऱ्याला कमी  न लेखता समग्रतेकडे जायला पसंती दिली. प्रतीके- मिथकांच्या माध्यमातून पूर्व वाङ्‌मयीन-सांस्कृतिक  परंपरेशी नाते सांधीत कथाविषयाची आशयव्याप्ती वाढविण्याचाही काही लेखकांनी प्रयत्न केला आहे.  सारांश- मराठीत गांधीविचारधारेला अनुसरणारे  बालवाङ्‌मय संख्यात्मक दृष्ट्या विपुल नसले तरी,  गुणात्मक दृष्ट्या प्रयोगशील व संस्कारशील आहे,  असा निष्कर्ष काढता येतो. राष्ट्रपिता म्हणून विभूतिमत्वाचा गौरव करणारे जीवनचरित्र एवढ्या मर्यादित परिघात  बालसाहित्यिकांनी गांधीचरित्राचा विषय हाताळलेला नाही.  छोट्या-छोट्या स्फुट प्रसंगांतून मूल्यसंस्कार वेचता येतील, अशा चरित्रघटकांची निवड करून हे साहित्य लिहिले गेले  आहे. चरित्रेतर अन्य ललित साहित्यही केवळ चमत्कृतीपूर्ण व रंजक घटना-प्रसंगांना महत्त्व न देता नैतिक मूल्य कथानके  संरचित झाली आहेत. याही अर्थाने गांधीकेंद्री बालसाहित्याने आपले बाळबोध वळण ओलांडून नवी  प्रयोगशील वाट चोखाळली आहे, असे म्हणता येईल.

‘साहित्य अकादमी’ आणि ‘राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज नागपूर  विद्यापीठा’चे मराठी विभाग व ‘गांधी विचारधारा विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात दि. 15 सप्टेंबर 2019 रोजी वाचलेला हा निबंध आहे.  

Tags: साहित्य बालसाहित्य महात्मा गांधी मंगला वरखेडे mahatma gandhi mangla varkhade weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात