डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आमजनतेने तिरस्कार केला व असंतोष बाळगला तरी राजकीय पातळीवर या स्थलांतरितांना समाजात न्याय्य स्थान मिळवून देणे फ्रेंचांना आवश्यक वाटले. संधी, हक्क, न्याय या बाबतीत समानता रहावी, धर्माचा निकष लावला गेल्याने कुणीही व्यक्तिमात्र जीवनावश्यक गोष्टींपासून वंचित राहिला जाऊ नये, हा विचार धर्मनिरपेक्षतेच्या कायद्यामागे होता. एका विचारसमृद्ध, सहिष्णु, सर्वसमावेशक अशा समाजाचे असे हे स्वप्न फ्रेंचांनी पाहिले होते.

धर्मनिरपेक्षतेचा कायदा करून धर्मसत्ता व राज्यशासन संस्था यांचे विभक्तीकरण करण्याची गरज फ्रान्समध्ये जाणवू लागली होती; याला दोन कारणे आहेत. मध्ययुगात युरोपमध्ये सगळीकडेच धर्मसत्तेचे प्राबल्य फार वाढले होते. धर्मसंस्थेचे प्रतिनिधी वारंवार राज्यकारभारात हस्तक्षेप करीत असत व राजकारणावर दबाव टाकीत असत. यामुळे हे विभक्तीकरण निकडीचे झाले होते.

दुसरे तितकेच महत्त्वाचे कारण असे, की फ्रान्स हा स्थलांतरितांनी वसवलेला देश आहे. भारताप्रमाणेच फ्रान्सचाही मागील दोन-अडीच सहस्रकांचा इतिहास हेच दाखवितो की या देशाने अनेक परकीय आक्रमणांना तोंड दिलेले आहे व आक्रमकांना आपल्या भूमीवर सामावूनही घेतलेले आहे. आधुनिक काळात स्वतःला 'मूळचे फ्रेंच' म्हणविणारे फ्रेंचही बाहेरूनच आलेले आहेत. रोमन सम्राट ज्युलिअस सीझर, सुदूर उत्तरेकडून आलेले व्हायकिंग हे दर्यावर्दी लोक, मध्य आशियाचे हूण, पूर्व युरोपातून आलेल्या विविध 'गोथ' टोळ्या, ज्यांच्यामुळे या भूमीला 'फ्रान्स' हे नाव पडले ते 'फ्रँक' लोक हे सगळे ऐतिहासिक काळात आले.

आधुनिक काळात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करून फ्रान्सला आलेले लोक फ्रान्सची भूतपूर्व वसाहत अल्जीरिया येथले होते. सन 1962 मध्ये अल्जीरिया स्वतंत्र झाला व तेथे मुस्लिम मूलतत्त्ववादी राजवट सुरू झाली. वसाहतकाळात तिथे जाऊन वस्ती करणाऱ्यासाठी फ्रेंच सरकारकडून उत्तेजन घेऊन अनेक फ्रेंच व इतरही अनेक युरोपीय लोक गेले होते. त्यांतील बवंशी लोकांना अल्जीरियन सरकारने देशाबाहेर घालवले. ते लोकही फ्रान्समध्ये उपजीविकेसाठी आले. वांशिकदृष्ट्या हे लोक मूळ फ्रेंच रहिवाशांना जवळचे वाटले. सांस्कृतिकदृष्ट्या त्यांचा मिलाफ सहज रीतीने झाला. मात्र त्यांच्या आगमनामुळे नोकरीधंद्यांवर विपरीत परिणाम झालाच. त्यामुळे या मंडळींचीही संभावना 'काळ्या पायांचे' अशीच झाली.

दोन महायुद्धानंतर फ्रान्समध्ये पुरुषमजुरांची वाण पडू लागली. तेव्हा अनेक मध्यपूर्ववासी व उत्तर आफ्रिकन अरब फ्रान्समध्ये आले. फ्रेंचांची जीवनपद्धती, त्यांची आधुनिक मानवतावादी जीवनमूल्ये, त्यांची व्यक्तिस्वातंत्र्याची संकल्पना या सर्व गोष्टींचे या मंडळींना संपूर्ण वावडे आहे. धर्म, भाषा, सामाजिक आचार व कायदे, राहणीपद्धती, जेवणखाण, शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन यांपैकी कोणत्याही मुद्यावर त्यांची फ्रेंचांशी जवळीक होऊ शकत नाही. या लोकांना फ्रान्सने बहाल केलेले संबोधन आहे - "Beur", म्हणजे एखाद्या पदार्थावरची मळी, वगळून टाकायचा अंश, कचरा वगैरे.

अशा रीतीने आमजनतेने तिरस्कार केला व असंतोष बाळगला तरी राजकीय पातळीवर या स्थलांतरितांना समाजात न्याय्य स्थान मिळवून देणे फ्रेंचांना आवश्यक वाटले. संधी, हक्क, न्याय या बाबतीत समानता रहावी, धर्माचा निकष लावला गेल्याने कुणीही व्यक्तिमात्र जीवनावश्यक गोष्टींपासून वंचित राहिला जाऊ नये, हा विचार धर्मनिरपेक्षतेच्या कायद्यामागे होता. एका विचारसमृद्ध, सहिष्णु, सर्वसमावेशक अशा समाजाचे असे हे स्वप्न फ्रेंचांनी पाहिले होते.

हे स्वप्न, ही जीवनदृष्टी फार थोर आहे, उज्ज्वल आहे हे तर खरेच। "सर्वे सुखिनः सन्तु" असे म्हणणाऱ्या भारतीय उपनिषदकारांनाही हीच दृष्टी होती. पण फ्रेंचांचे जे राजकीय व सामाजिक वास्तव आहे त्या वास्तवात हे स्वप्न साकार करणे त्यांना अवघड जाणार आहे. मध्यपूर्वेतील व उत्तरआफ्रिकेतील अरब हे ‘वाळवंटी संस्कृती’त घडलेल्या वंशाचे आहेत. त्यांच्या जीवनदृष्टीशी मिळवून-जुळवून घेणे व त्यांना आपल्या परिप्रेक्ष्याच्या चौकटीत सामावून घेणे म्हणजे आवळ्या-भोपळ्याची मोट बांधणे आहे. धर्म या एका घटकावर नजर केन्द्रित करून फ्रेंचांनी सन 1905 व 2004 चे कायदे केले. 2004च्या कायद्याला फ्रेंच मुस्लिमांनी आपला कट्टरपणा सोडून मान तुकवली व आपल्याला आपल्या ‘मुस्लिमपणा’पेक्षा 'फ्रेंचपणा’चे अधिक महत्त्व वाटते, हे दाखवून दिले. आपल्या यजमान समाजाविषयी मनात असलेले विकल्प, धर्म या मुद्यांवरून नसल्याचेच ते लक्षण होते. आणि तरीही फ्रान्समध्ये नोव्हेंबर' 05 मध्ये विद्वेषाचे जे डोंब उसळले ते का? फ्रेंचांच्या स्वप्नातल्या एकजिनसी समाजाला पडलेले तडे जगाला दिसले, ते का? 

या स्वप्नपूर्तीची किल्ली फ्रेंच धर्मनिरपेक्षतेच्या दिव्याखाली शोधत आहेत, ते त्यांचे चुकतेय काय? चुकत नाहीये, पण आकलन कमी पडतेय, त्या दिव्यापलीकडेही आणखी उजेड असेल तर शोधला पाहिजे. त्या दृष्टीने 1905 चा कायदा केला ते ठीक वाटते, पण 2004 चा कायदा अनाठायी वाटतो. एक तर आंतरराष्ट्रीय मानवी हक्क समितीच्या आदेशाचे या कायद्यामुळे फ्रान्सकडून उल्लंघन झाले आहे, याचे आश्चर्य वाटते. शिवाय मूठभर शीख लोकांच्या कट्टरपणापुढे फ्रेंच सरकारचे काही चालले नाही. या घटनेतून त्यांच्या कृतीमधला नैतिक आवेश थोडा कमी झाल्यासारखा वाटतो. अशा परिस्थितीतही फ्रेंच मुस्लिम मूग गिळून राहिले, यामुळे त्यांचा उद्रेक ज्या रूपाने बाहेर पडला त्याबद्दल सहानुभूती वाटते.

फ्रेंच आणि त्यांचे मुस्लिम (मध्यपूर्वीय) स्थलांतरित नागरिक यांच्यामधील तणाव हा आमूलाग्र भिन्न अशा दोन मानसिकतांमधला तणाव आहे. लोकशाही मूल्यांना जीवनाच्या सर्व अंगांमध्ये बाणवून घेण्याची वैचारिक प्रक्रिया फ्रान्समध्ये गेली काही शतके घडत आली आहे. अल्जीरियासारखे देश 19व्या शतकापर्यंत रानटी, भटक्या टोळ्यांनी व्यापलेले होते आणि तिथला आम माणूस एकाधिकारशाहीच्या पठडीत जीवन जगत होता. जीवन जगण्याच्या क्रियेला व्यक्तिस्वातंत्र्य मिळवणे, व्यक्तिविकास घडवणे असे आयाम असू शकतात याचा त्याला गंधही नव्हता. वाळवंटातल्या रौद्र जीवनकलहाला तोंड देताना त्याच्या मानवी अपेक्षा त्याच्या पार्थिव अस्तित्वाशीच चिकटलेल्या असणे साहजिकच होते.

19 व्या शतकात परक्या भूभागावर स्वतःच्या वसाहती स्थापन करण्यास फ्रेंचांनी सुरुवात केली, तेव्हा त्यांनी असा पवित्रा घेतला होता की ‘वाळवंटात भटकणाऱ्या बेदविन अरबांना स्वातंत्र्य गमवावे लागते म्हणून दुःख करण्याचे कारण नाही. नाहीतरी हे अरब लूटमार करणारे टोळीवालेच होते. स्थायिक होऊन राहणारा शेतकरी गृहस्थ काय किंवा भटका लुटारू काय, दोघांसाठीही आधुनिक पद्धतीचे मध्यमवर्गीय जीवन - ज्याला काही सुसूत्रता असते, उद्योगधंद्यांची व आधुनिक विचारांची जोड असते-हे केव्हाही फायदेशीरच ठरेल.' अशा रीतीने या जित जनतेचा सांस्कृतिक उद्धार आपण करणार आहोत, अशी फ्रेंचांनी भूमिका घेतली.

फ्रेंचांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून अल्जीरियाचा उजाड मुलुख शेतीखाली आणला. जागोजागी द्राक्षांचे मळे पिकले, पण सगळा आर्थिक फायदा फ्रेंचांनी स्वतःच लुटला. अल्जीरियाच्या मूळ रहिवाशांमध्ये काही ज्यू होते, जे दुसऱ्या देशांतील छळाला कंटाळून इकडे आले होते. या ज्यूंना फ्रेंचांनी फ्रेंच नागरिकत्व दिले व आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात सामावून घेतले. मुस्लिम अरबांना मात्र ही सवलत फ्रेंच नागरिकत्वही मिळवायचे व तरीही कुराणाचे आदेश पाळायचे - नाकारण्यात आली.

या घटनेचा सल अरब मानसिकतेवर फार खोल रुजला. 1970 च्या दशकात या अरबांचे मजूरकाम स्वस्तात मिळू लागले, म्हणून फ्रेंचांनी त्यांना आपल्या देशात थारा दिला. आता त्या अरबांच्या दुसऱ्या व तिसऱ्या पिढ्या फ्रान्समध्ये हक्काचे नागरिकत्व उपभोगत आहेत. परंतु त्यांच्या पारंपरिक जीवनपद्धतीत ते कोणताही बदल करायला तयार नाहीत. शिक्षणाच्या सवलती नाकारून मागासलेलेच राहतात. अतिशय बेशिस्त व गलिच्छ, गुन्हेगारी व पुंडाव्याकडे झुकलेले असे जीवन स्वतः जगून, फ्रेंचांच्या प्रगत सामाजिक जीवनात आकस, अस्थिरता, अविश्वास, दुरावा असलेले असे वातावरण निर्माण करतात.

या मुस्लिम नागरिकांच्या वागण्याला कंटाळलेल्या फ्रेंच जनतेला ‘फ्रान्स फक्त फ्रेंच लोकांचा’ ही विचारसरणी मांडणारा 'ज्याँ-मारी ल पेन' हा वंशविद्वेषी नेता जवळचा वाटू लागला आहे. पण या विचारसरणीला शह देणारा दुसरा वर्गही फ्रान्समध्ये आहे. "एस.ओ.एस. रासीझम' सारख्या संघटना खूप सजग आणि सक्रिय आहेत. 'माझ्या दोस्ताला झळ पोचता कामा नये', अशी घोषवाक्ये या संघटनांचे सदस्य सगळीकडे उधारत असतात.

अशा त-हेने अरब मुस्लिमांच्या बाबतीत फ्रेंच समाज द्विधा अवस्थेत आहे. परराष्ट्रीय, विशेषतः मध्यपूर्वेतील मुस्लिम देशातील घडामोडीविषयी पवित्रा घेताना, फ्रेंचांना नेहमी त्यांच्या स्वतःच्या देशात स्थायिक झालेल्या मुस्लिम जनतेचा विचार करावा लागतो. अल्जिरियाला स्वातंत्र्य दिले तेव्हाच जनरल द गोल यांनी इशारा दिला होता, की अल्जीरिया हा फ्रान्ससाठी 'तिसऱ्या जगातील देशांकडे जाण्याचे एक 'छोटे फाटक' आहे.’ द गोलच्या नंतरच्या राजकारण्यांनी हे फाटक नेहमी खुले ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. तरीही अल्जीरिया हा फ्रान्ससाठी 'एक चिघळती जखम’च ठरतो आहे.

अन्न, वस्त्र, निवारा व रोजगाराची हमी या मूलभूत गरजांची पूर्ती जोपर्यंत न्याय्य रीतीने होत नाही तोपर्यंत धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचाच पाठपुरावा करत राहणे पुरेसे नाही. आपल्या देशात आलेल्या या वाळवंटी रहिवाशांना खूप संयमाने चुचकारून घेऊन, त्यांना आधुनिक जीवनपद्धतीचे वळण लावण्यात जोपर्यंत 'मूळ' फ्रेंच समाज यशस्वी होत नाही तोपर्यंत एकजिनसी समाजाचे स्वप्न अधुरेच राहणार. 'स्थलांतरित समाजकंटकांचा निकाल लावला जाईल', असे विधान फ्रान्सचे गृहमंत्री करतात याचे फार नवल वाटते.

फ्रेंच तत्त्वज्ञ रेजी देब्रे याचे म्हणणे असे आहे की ‘धर्मनिरपेक्षता' ही गोष्ट तत्त्वतः ठीक आहे, मात्र शाळांमधून मुलांना सर्व धर्माचा इतिहास शिकवला जाणे आवश्यक आहे. कारण हा इतिहास, मानवाच्या सामुदायिक अनुभूतींमधील एक महत्त्वाचा घटक आहे. सांस्कृतिक वैविध्य असलेल्या समाजात, या इतिहासाच्या अभ्यासामुळे मनावर सहिष्णुता विंबते व जगाकडे पाहण्याचे परिप्रेक्ष्य विशाल होते असे रेजी देब्रेचे म्हणणे आहे.

खूप दीर्घकाळ व खूप अवघड अशी तारेवरची कसरत फ्रेंच समाजाला करावी लागणार आहे, पण दब्रेसारखे विचारवंत त्या समाजात आहेत, म्हणून भविष्यात तरी या समाजाचे स्वप्न साकार होईल अशी आशा वाटते.

[समाप्त]

Tags: युरोप अरब मुस्लीम अल्जिरिया धर्मनिरपेक्षता फ्रान्स Europe arab muslim Algeria secularism france weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माणिक कोतवाल
vijayykotwal@gmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके